खिडकी : अंतिम भाग

खिडकी : अंतिम भाग

भाग ५ – अंतिम भाग

मराठी कथा   ||  मराठी साहित्य  ||  प्रेमाची बंधने

Image result for time travel

मी खोलीवर आलो तेंव्हा खूप निर्धास्त, हललं हलकं वाटत होतं. प्रश्न अजूनही होते, पण ते सुटतील असा दिलासाही वाटत होता. मी थंडगार पाणी अंगावर ओतून घेतलं. आजीबाईंच्या सांगितल्यानुसार हा माझा कितवातरी पुनर्जन्म चालू होता. किंवा काहीतरी अजब जरूर होतं. मला वाटत होतं की आपण काहीतरी वेगळे आहोत. इतरांसारखे नाहीत. कदाचित कोट्यवधीच्या अंतरावरून प्रवास करून आलो आहे. माझी अस्मिता मलाच बोचत होती. ओळख संदिग्ध वाटत होती. माझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा कुठे अन कशा उमटल्या हे मलाच माहीत नव्हतं. मी त्या फोटोतील व्यक्तिसारखाच दिसत होतो. खोलीतील मोठ्या आरशात बघितल्यावर क्षणभर मला वाटलं की समोर त्याचीच प्रतिमा आहे. म्हणजे मी मी नाहीच?मी दत्ता की सूर्यकांत? का अजून काही…

खरंच नियतीने हे ठरवून केलं असेल का? काय प्रयोजन असेल?केवळ ओढ, नातं आणि प्रेम इतकं मजबूत असतं का?अज्ञात वाटेवर मी आलोच कसा?पण ही वाट अज्ञात तरी कोठे आहे?त्या आजी… ती गोंडस मुलगी… हे एकच! शिवाय ती फक्त मला दिसायची… इतरांना नाही… आणि त्याच जागेवर… नक्कीच आजी सांगतात तेच सत्य असलं पाहिजे… जगात गूढ रहस्य खूप आहेत… विज्ञान तरी कुठे सर्व रहस्यांवरून पडदा हटवू शकलं आहे. कितीतरी गोष्टी विज्ञानाला अजूनही गुढच आहेत. हेसुद्धा त्यातीलच. मानव अजूनही मेंदूचा फक्त 10% वापर करू शकतो. कधी कोणाला भुतं दिसतात तर कोणाला भविष्य… सगळं कसं अस्थिर जगातील सोंगाट्या असतात. मीही त्यातलाच आता.

विचारप्रवाह अगदी संथपणे चालू होते. संध्याकाळच्या वेळेस शांत नदीत होडीत बसून सूर्यास्त बघावा तसं वाटत होतं. गुंता सुटल्यासारखा वाटत होता. उत्तर माहीत असतं पण ते सांगता येत नाही तशी अवस्था. मन कित्तेक प्रकाशवर्ष दूर भटकून येत होतं. मला सहज वाटलं की ह्या घटना, प्रसंग आपल्याला उलगडू शकतात. फक्त थोडासा शोध घेतला पाहिजे.

मी इंटरनेटवर शोध सुरू केला. पुनर्जन्म, आत्मा,supernatural activity, असामान्य शक्ती, आत्म्याचा प्रवास असे अनेक प्रश्न मी शोधत होतो. बर्‍याच गोष्टी मला नव्याने अवगत होत होत्या. कुठे-कुठे ह्या सर्व गोष्टींच्या मागील अर्थ लावून त्याची विज्ञानाशी सांगड घातली होती. अनेक शक्यता अन theories मांडले होते. विविध संस्कृतीतील अध्यात्म, परंपरा मला नव्याने उमजत होत्या. विज्ञान याच्याकडे कोणत्या दृष्टीकोणातून बघतं तेही थोडंसं समजत होतं. सर्व माहिती माझ्या मेंदूत जमा होऊन मोरपिस हवेत तरंगावा तशी तरंगत होती.

सर्व बाबी लक्षात घेऊन मी संदर्भ जोडत मी माझं उत्तर तयार करत होतो. कदाचित स्वतःच्या मनाला पटवून देत होतो की हा माझा पुनर्जन्म आहे. माझ्या एकत्रित अस्मिता मला जाणवतात का हे तपासून बघत होतो.

अनेक समांतर विश्व अस्तीत्वात असतात. एका वेळेस अनेक पृथ्वी जगत असतात. त्यात माणसेही सारखीच असतात. म्हणजे ह्या वेळेला मी ह्या जागेवर आहे, तर समांतर विश्वात मीच किंवा माझ्यासारखी व्यक्ति त्या दुसर्‍या पृथ्वीवर आहे. अशा अनेक पृथ्वी एकाच वेळेस अस्तीत्वात असतात. ह्याच वेळेस समांतर विश्वात कदाचित dinosaur युग चालू असेल. कदाचित दुसरं महायुद्ध, पानीपत लढाई आत्ताही एखाद्या समांतर विश्वात चालू असेल.

अशीही एक संकल्पना एका शास्त्रज्ञाने मांडली की, जर एखादी मोठी घटना घडली तर तेथून काळाला दोन रस्ते फुटतात. तेथून दोन विश्व निर्माण होतात. उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेथून दोन विश्व निर्माण झाले असावेत. एका बाजूला आपण अस्तीत्वात असलेलं विश्व आणि दुसर्‍या बाजूला समांतर विश्व जेथे इंदिराजी जीवंत असतील अन देशात वेगळी परिस्थिती असेल. असे infinity अर्थात अमर्याद विश्व अस्तीत्वात असतील. फक्त ते आपल्याला माहीत नसतील अन आपल्या बुद्धीच्या बाहेरचे असतील.

पुनर्जन्मबद्धल मिळालेली माहितीही रंजक होती. एखाद्या माणसाच्या जर भावना, संवेदना अडकून राहिल्या किंवा तो अतृप्त मेला तर मृत्यूनंतर त्याचा आत्मा अंतराळात भटकत राहतो. मग नवयोनीचा शोध सुरू होतो. चित्रगुप्तने ठरवून दिल्याप्रमाणे त्याचा पुन्हा जन्म होतो, त्याच्या पाप-पुण्याचा तराजू खाली-वर होत राहतो. मागील जन्मी कळकळीने अर्धवट राहिलेल्या भावना व इच्छा पुढील जन्मात पूर्ण होतात अन शेवटी एक वेळ अशी येते की आत्मा मोक्ष प्राप्त करून ईश्वराला जाऊन विलीन होतो.

असे अनेक theorem & theories मांडले गेले होते. बर्‍याच संकल्पना होत्या. माझ्या बाबतीत नेमकं काय घडलं असावं याचा मी अंदाज घेत होतो. आजी म्हणतात त्याप्रमाणे आज अन त्या काळी राखी पोर्णिमेची तारीख सारखी होती अन ग्रहण होतं. कदाचित हेसुद्धा महत्वाचं होतं. मी जर त्या जन्मी त्या मुलीचा, अर्थात त्या आजीचा मोठा भाऊ असेन अन माझी इच्छा अतृप्त राहिली असेल तर हा माझा पुंनर्जन्म शक्य आहे. कदाचित होऊ न शकलेली भेट, त्या दोघांतील प्रेमाचं नातं, ओलावा हा महत्वाचा धागा असावा. ही भेट कदाचित ठरलेली असावी. मग त्या मुलीचं मला दिसणं? आणि तेही त्याच जागेवर, त्या रूपात? हे कसं शक्य आहे? न तो आत्मा आहे न भास. मग काय झालं असेल?

याचं उत्तर कदाचित विज्ञान देणार होतं. समांतर विश्व! कदाचित ती मुलगी ही वास्तविक असेल… म्हणजे वास्तवात दिसत असेल… पण आजची नव्हे, तर त्या काळची… म्हणजे आजी जेंव्हा लहान होत्या तेंव्हा त्या सतत त्या जागी येऊन बसायच्या… मला तेच दिसलं असेल… ह्या आणि त्या दोन समांतर विश्वातील खिडकी??? हो खिडकीच! कारण खिडकीतून काहीच देवाण-घेवाण होत नसते. ती फक्त बघण्यासाठी असते. जाणून घेण्यासाठी! त्या जागेवर कदाचित दोन विश्वांतील, दोन विविध काळओघातीलखिडकी उघडत असावी. केवळ मी तिचा शोध घ्यावा अन आमची भेट घडावी हा उद्देश असेलच! मीही काहीच वेळ त्या मुलीला बघू शकत होतो. कधी बोलूही शकलो नाही. मग ती खिडकीच असणार. एकटी असताना ती मुलगी किती आतुरतेणे आपल्या भावाची, अर्थात माझी वाट बघायची याची जाणीव मला व्हावी म्हणून मला ते दृश्य दिसत असावं. तिची ओढ, तिची माया, माझ्यावरील जीव मला समजून घेता यावा यासाठीच हे प्रयोजन असणार.

माझे दोन मुख्य प्रश्न होते. एकाचं उत्तर अध्यात्माने दिलं तर दुसर्‍याचं विज्ञानाने! हा माझा पुनर्जन्म असावा, त्या काळातील अस्मिता, देह, रूप मी आजही वाहतो आहे याची जाणीव मला अध्यात्माने करून दिली. तर ती मुलगी, केवळ मला दिसणारी,ही माझ्याशी कसा संपर्क साधते अन तिथेच का दिसते हे मला विज्ञानाने पटवून दिलं.

हा नक्कीच योगायोग नसावा. नियतीने, ईश्वराने ठरवून केलेलं प्रयोजन आहे यावर माझाही विश्वास बसत होता. एका बहिणीची भावाप्रती असलेली ओढ, ओलावा, जिव्हाळा नियतीचे नियम मोडून भेट घडवून आणत होता. मला त्या स्मृती आज ज्ञात नसतीलही, पण ती आर्त जाणीव खोल मनात होत होती. माझं अन त्या मुलीचं नातं काय ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. हा चमत्कारच होता…

रात्र सरली होती विचार करत-करत. पोर्णिमेच्या चंद्राने काळ्या ढगांनाही शुभ्र करून टाकलं होतं. वातावरणातील गारवा अजूनच भावुक करत होता. उद्याचं ग्रहण मात्र चंद्राला कवेत घेणार होतं. त्याचं अस्तित्व काही काळ का असेना नाकारणार होतं…

पहाटे झोप लागली. पुन्हा काळाच्या डोहात घसरत असल्याचा भास होत होता. झोपेत अनेक चित्र-विचित्र जागा अन चेहरे दिसत होते. नदीत वाहून जाणारा मीच दिसत होतो. मी ओरडत होतो,“मने… मने… मी येणार गं… थांब तू… जाऊ नकोस… मी नक्की येणार…”

मला अचानक जाग आली. जे बघितलं ते सत्य होतं? पूर्वजन्मीच्या आठवणी? का आजीने सांगितलं अन ते तपासून पाहिल्यावर त्या घटनेने माझ्यावर प्रभाव टाकला अन हे दृश्य दाखवलं?काहीच अशक्य नव्हतं. पण मी तिला “मने…” म्हणून हाक मारायचो का? आजीने तर तसं काही सांगितलेलं आठवत नाही… मग खरच ती पूर्वजन्मीची झलक होती; स्वप्नाच्या खिडकीतून मी माझंच गमावलेलं अस्तित्व बघितलं होतं की काय?

अंग घामाने भरलं होतं. शरीरही जड वाटत होतं. मेंदूची तर वेगळीच तर्‍हा होती. माझा मेंदू दुसर्‍याच्या ताब्यात आहे असं वाटत होतं. पण गुंता सुटला होता… हो… गुंता सुटला होता… मनाने तर मी आधीच त्या ‘गत-वास्तवाला’शरण गेलो होतो, पण काळाच्या सचोटीवर तपासून मेंदूनेही ते मान्य केलं होतं.

कधी-कधी पंचेंद्रियेही निश्चल होतात, मनात निर्वात पोकळी तयार होते, विचारशून्य होतो, माझ्यात असलेल्या मीच्या जवळ जातो, नि:संगाची अनुभूती येते.

कालच्या झोपेनंतर आज आलेली जाग नव्या अस्तित्वाची जाण करून देणारी होती. अंधार्‍या गुहेतून झालेला प्रवास, दुसर्‍या टोकाला गेल्यानंतर नवीन जगाची ओळख देत होता. असंख्य चेतांनानी भारलेला मी,नवपंख घेऊन भरारी घेत होतो, नव्या अश्वावर आरुढ होत होतो…

काय होत होतं माहीत नाही, पण मी तयारीला लागलो होतो. आज राखीपोर्णिमा होती. माझी ऐंशी वर्षाची धाकटी बहीण माझी वाट बघत होती. अनेक तपाच्या प्रतिक्षेनंतर मोकळ्या सोडणार्‍या राखीला आज मनगट भेटणार होतं. हजारो अश्रुंचे आभूषणे घेऊन नटलेली राखी माझी वाट बघत होती. काळाने तिची परीक्षा घेतली पण बंधन काही कमी झालं नाही. काळाच्या अग्निपरीक्षेत बहिणीच्या श्रद्धेची राखी उजळून निघाली होती…

ओवाळणी काय घ्यावी? साडी घेतली. खूप पूर्वी आईने घातलेली माझ्या बोटातील अंगठीही आज बहिणीला देणार होतो. अनेक वर्षांची ओवाळणी राहिली होती. मिठाई घेतली. दोन लहान बाहुल्या घेतल्या. पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. मेंदुतून काहीतरी वेगाने समोर आलं अन वाटलं गुळाच्या पाकात आकांत बुडालेले तुटके शेंगदाने!!! हे तिला आवडतं… मी त्याचीही सोय केली…

सगळं घेतलं अन दुपार होण्याच्या सुमारास मी आजीच्या, नव्हे, मनेच्या घराकडे निघालो… बाहेर आलो अन समोर बघितलं, त्या कट्ट्यावर आजी बसली होती. फिकट गुलाबी रंगाची नवी साडी, बांधलेले केस, केसावर फूल अन डोळ्यात गोड भाव!!! माझे डोळे भरून आले. क्षणभर लहानपणीची “मने” तिथे बसली आहे असं वाटलं. तेच चित्र डोळ्यासमोर येत होतं. डोळ्यात प्राण आणून माझी वाट बघत बसणारी ती अन बाहेरून आलेला मी. इतिहासाची, गतजन्माची खिडकी पुन्हा उघडल्या गेली.

मी जवळ गेलो अन आजी मला येऊन बिलगली. तिचे थरथरणारे हात माझ्या खांद्यावर होते अन डोळ्यांतून वाहणारे अश्रु छातीवर ढळत होते. गच्च झालेल्या गळ्यामध्ये कित्येक वर्षांचं दुखं अन आठवणी दाटल्या होत्या. सुरकुतलेल्या त्वचेवरून अनेक तपांची तपश्चर्या उभी ठाकली होती. एक आत्मिक समाधान लाभत होतं. खूप जुने बंध जुळले होते अन अतृप्ततेचे पाश तुटले होते. मुक्ती… मुक्ती लाभल्याप्रमाणे… स्वर्गातून फूल-अत्तराचा वर्षाव चालू होता… मी माझा हात आजीच्या, मनेच्या पांढर्‍या केसांवर ठेवला… “बास आता!! मी आलोय न.”

ह्या शब्दांनी आजीचं मन समाधानी झालं.

“मी अशीच वाट बघायचे… अशीच गळे पडायचे… पण तूच आला नाहीस… कित्ती वाट बघायला लावतोस रे…”

हे शब्द अनाहूतपणे तिच्या तोंडून निघून गेले पण माझ्या काळजाला हादरून सोडणारे होते.

काही क्षण असेच भावनेच्या प्रवाहात वाहत गेले. मग आम्ही आजीच्या घरी गेलो. आजीने स्वतःच्या हाताने स्वयपाक केला होता. पुरणपोळी केली होती. मला आवडती खोबर्‍याची चटणी केली होती. आजीच्या मुलाला, सुनेला मी कोण वगैरे काहीच माहीत नव्हतं. सगळं अनुत्तरित… पण आमच्या दोघांना ते माहीत होतं… तेच महत्वाचं होतं…

जेवण झालं अन आजीने, मनेने माझ्या हातात राखी बांधली. तो क्षण अविस्मरणीय होता. थरथरत्या हातांनी राखीची गाठ हाताला गच्च होताना हे बंधन केवळ धाग्याचा नसून मनाचं आहे याची तीव्र जाणीव होत होती. मनात प्रचंड घालमेल होत होती. आनंद की दुखं? काहीच कळत नव्हतं. राखी बांधल्यावर ती माझ्या पाया पडली तेंव्हा मात्र डोळ्यांनी सय्यम सोडला अन रडू आवरलं नाही. हे भावा-बहिणीचं नातं ईश्वराच्या साक्षीने तेजोमय होत होतं. कधी-कधी नियतीचे नियम,काळाची चक्रे नात्यांसमोर अन प्रेमासमोर निष्क्रिय ठरतात…

मी तिला ओवाळणी टाकली. तिने आधारशीपणे ती उघडली. कदाचित लहानपणीही अशीच असावी… सगळं बघितलं अन ती खूप खुश झाली… राहून-राहून मला तिच्याजागी ती लहानगी, बारकी मुलगी दिसत होती. गुळात बुडालेले शेंगदाने बघून आजी मधुर हसली अन म्हणाली, तुला आठवतं न, मला हे आवडतं ते?

मी फक्त खांदे उडवले. पण नंतर गेलेले दात दाखवत ती म्हणाली, “आता कसे खाऊ?”

फार बोलवसं वाटलच नाही. मुक्यानेच संवाद झाला. काय बोलावं दोघांनाही समजत नव्हतं. आम्ही केवळ मंतरलेल्या क्षणांचे साक्षीदार होत होतो. जणू विश्वाची एक पोकळी केवळ आमच्यासाठी वेगळी ठेवली आहे असं वाटत होतं. मन भरून आलं होतं… रक्तातील पेशीही भारावून गेली होती!

वेळ झाली होती. मी माझ्या घरी निघालो होतो. हे बहीण-भावाचं नातं कोणालाही समजणार नव्हतं. आजी मला सोडायला आली. आम्ही सावकाश त्या कट्ट्यापाशी आलो. तिथे बसलो. तिचा थरथरणारा हात माझ्या हातात होता.

काही क्षण शांत गेले असताना आजी म्हणाली,“तू नसताना, तुझी वाट बघताना ह्या जागेनेच मला समजून घेतलं, आधार दिला. ही ईश्वरी जागा आहे.”

मी नकळतपणे म्हणालो, “इथे ईश्वराची खिडकी उघडते. तीनेच मला तुझ्यापर्यंत पोचवलं.”

ह्याच जागेनेच आपल्यातील अंतर संपवून भेट घडवली. खूप छान खिडकी बघ… सूर्या दादा…

मी शांतच होतो. काहीच बोललो नाही. हळू स्वरात म्हंटलं, “मने…”

आजी शांतपणे टेकून बसली होती. तिचा हात माझ्या हातात होता. ती शांतच होती… कायमची शांत… मला ते कळायला फार वेळ लागला नाही. ते अगदीच अनपेक्षितही नव्हतं. अनेक वर्षांच्या अवकाशानंतर पाऊस पडून गेल्यानंतरची स्तब्धता जाणवत होती. अतिशय समाधानी अन शांत चित्ताने बसल्याप्रमाणे दिसत होती ती. मी हमसून हमसून रडत होतो. ज्या जागेवर बसून आयुष्य काढलं, किंबहुना जिथे बसून वाट बघण हेच तिचं आयुष्य झालं होतं, तिथेच तिने शेवटचा निरोप घेतला. ईश्वरी खिडकी!

खिडकीतून देवाण-घेवाण होत नसते. पण ही ईश्वरी खिडकी! ह्या खिडकीतून ईश्वराने तिला बोलावलं होतं. अनेक वर्षांची तपश्चर्या संपली होती. जणू, देव प्रसन्न होऊन तिला वरदान देऊन गेला. चंद्राला ग्रहण लागलं होतं. निर्मळ प्रकाश देऊन चंद्र आज काळोखाने आच्छादुन गेला होता. पण पुन्हा तेच तेज येणार होतं… कदाचित नव्या जन्मात…

सगळं उरकून मीही आपल्या वाटेवर निघालो होतो. वाटेत कितीही सुंदर पडाव आला तरी वाट सोडून चालत नाही. चालवंच लागतं. जुना जन्म संपला होता. त्या जन्मात अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण झालं होतं.एकाच वेळेस दोन अस्मिता, दोन ओळख घेऊन जगणं शक्य नसतं. त्यातील एक तरी विसर्जित करावीच लागणार होती.जो उद्देश्य होता तो पूर्ण झाला होता. आता जुनी ओळख अन अस्मिता कोणासाठी जपायची. ती फक्त मनाच्या कोपर्‍यात गुप्तपणे ठेवावी लागणार होती.

रात्रीचे प्रहर अधून-मधून जुनी अस्मिता उफाळून येण्यास कारणीभूत ठरणार होते. त्या आठवणी, ती चित्रे, ती मुलगी… सर्व मला छळणार होते. अंतर्मनाच्या स्वतंत्र कक्षेत मुक्त विहार करत ते मला पुन्हा पुन्हा अस्वस्थ करणार होते… पण हे अस्तित्वही नाकारता येणार नव्हतं. हे पूर्वजन्माचं ओझं कितीतरी अंतर कापून मी वाहत आलो होतो. आता ओझं नसलं तरी त्या स्मृती, आठवणी आणखीनच तीव्र होऊन समुद्राच्या लाटा खडकावर आदळतात त्याप्रमाणे सतत माझ्या मनावर आदळत राहणार होत्या.

गेल्या काही दिवसांत कितीतरी प्रकारच्या खिडक्यांनी माझं आयुष्य व्यापून टाकलं होतं. सुरूवातीला माझ्या खोलीच्या खिडकीतून दिसणारी ती चिमुकली. नंतर दोन समांतर विश्वात खिडकी बनून मला त्या मुलीचं अस्तित्व दाखवणारी काळखिडकी. अध्यात्म अन विज्ञानाची खिडकी. स्वप्नं ही सुद्धा एक खिडकी होती जेथून मला माझं जुनं, गतजन्मीचं अस्तित्व दिसलं होतं. शेवटी त्या आजीला, माझ्या लहान बहिणीला, मनेला माझ्यापासून दूर करणारी ती ईश्वरी खिडकी!!!

अस्तित्व अन भासाच्या जगाच्या पलीकडेही एक जग असतं. मी नुकताच त्याचा साक्षीदार झालो होतो. अंतराळ, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म हे ईश्वराच्या नाभिशी जोडले जातात. मोक्ष पावलेला आत्मा शेवटी त्यालाच जाऊन मिळतो अन अतृप्त राहिलेला पुन्हा-पुन्हा हेच चक्र फिरत राहतो. मी, माझा आत्मा,माझ्या अस्मिता हा प्रवास करून आल्या होत्या.

अडकलेला जीव पुन्हा-पुन्हा आकांताने आवाज देत असतो. प्रेम-मायेची बंधने अतूट असतात. शेवटची भेट व्हावी,मनात सल राहू नये म्हणून जीवन मरणालाही वाट बघायला लावतं… आणि शुक्राची चांदणी दिसून प्रहर संपावा तसं नवीन प्रकाशाला सुरुवात होते. एक रात्र संपलेली असते!!

कधीतरी अनाहूतपणे मनातील आठवणींचं गाठोडं उघडलं जातं. पत्त्याचा बंगला कोसळावा तसं मनही जमीनदोस्त होतं. मग भरलेलं मन अन रिता होत जाणारा आत्मा हातात हात घालून अस्थिरपणे भटकत राहतात. त्या शक्तीचा विलय होत नाही. शरीर लोप पावत असलं तरी जिवंतपणाची कसलीतरी लकेर मागे ठेऊन जातं…

===समाप्त?===

सूचना =कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. ह्या कथेचा वापर करण्यापूर्वी लेखकाची रीतसर परवानगी आवश्यक आहे. ||

All Copyrights Of The Story Reserved @ Author Abhishek Buchake.

सहकारी माध्यम=> latenightedition.in ||  @Late_Night1991

© 2018 – 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!