विकास, अस्मिता, राजकारण आणि मतदान

विकास, अस्मिता, राजकारण आणि मतदान

भारतात आजपर्यंत अनेक
निवडणुका आली आणि गेल्या. अशी एकही निवडणूक नसेल की ज्यात जात-धर्म-प्रादेशिक
अस्मिता वगैरेंचा झाला नसेल. अशा मुद्द्यांच्या आधारावर राजकारण करत मूलभूत
विकासाच्या प्रश्नांच्या बाबतीत दिशाभूल केली जाते यात काही नवीन नाही. पण एक क्षण
असा विचार केला की, अशा जात-धर्म-प्रादेशिक/स्थानिक
अस्मिता बाजूला ठेऊन फक्त दगड-मातीच्या विकासाचेच प्रश्न जर हाताळले गेले तर काय
होईल? माझं वैयक्तिक मत तर असं आहे की,
आपल्या देशाचा युरोपिय महासंघासारखा काहीतरी प्रकार घडेल.
       इतकं जागतिक पातळीवरचा वगैरे विचार मांडायची गरज पडली ती एका
साध्या अन सध्याच्या ताज्या विषयामुळे; मुंबई ची तुंबई
झाल्यामुळे! ह्या मुद्दयाचा वरवर पाहता अशा अखंड भारत वगैरेशी तसा काहीच संबंध
नाही, पण जर काही घटना घडल्या, तर तो
येऊही शकतो.
       विषय तसा साधा आहे तो पावसामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत होण्याचा.
पण जवळपास प्रत्येक मराठी माध्यमाने आणि विरोधकांनी याचं राजकारण करायचा मोह आवरला
नाही. यांचं म्हणणं होतं की, केवळ अस्मितेच्या मुद्द्यावर
मराठी माणसांची मते मिळवायची आणि कसलाही विकास न करता बकाल कारभार करायचा.
मुंबईतील पावसाचा, त्यामुळे आलेल्या आपत्तीचा संबंध
भ्रष्टाचार, पालिकेतील राजकरणी-अधिकार्‍यांचा बेजबाबदार अन
बकाल कारभार, मुंबईची भौगोलिक परिस्थिती, सर्वपक्षीय राजकरणी, राज्य सरकार, केंद्र सरकार अन सामान्य माणूस इथपर्यंत जाऊन पोचतो. पण अनेकांनी तो
मराठी माणसाने ज्या विश्वासाने सेनेला गेली वीस वर्षे सत्तेत बसवलं त्या निवडणूक
मुद्द्यांपर्यंत नेऊन ठेवला. निवडणुकीत मतदान करताना अनेक गोष्टींचा विचार करावा
लागतो; त्यात मग स्थानिक नेतृत्वाची विश्वासार्हता, सुरक्षितता, अस्तित्वाचे मुद्दे वगैरे वगैरे. ही
निवडणुकीतील मुद्दे असतात जे डोळ्यासमोर ठेऊन मतदार मतदान करत असतो. केवळ
दगड-मातीच्या विकासाचे मुद्दे डोळ्यासमोर ठेवायचे असते तर भारतात एकही सरकार
(ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका ते
केंद्र सरकार) पुन्हा निवडून आलं नसतं. मुंबईची जी अवस्था आहे ती भारतातील बहुतांश
सर्वच शहरांची आहे; एखाद-दूसरा अपवाद वगळता. हाच दृष्टीकोण
लावायचा तर अशा अनेक नगरपालिका, महापालिका आहेत ज्या
दशकानूदशके एका पक्षाच्या ताब्यात आहे पण तेथे काडीचाही विकास (दगड-मातीचा) झालेला
नाही. मग त्या ठिकाणी तोच पक्ष तिथे पुन्हा का निवडून येतो हा विचार करायला हवा.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे (जी बदलून अहमदाबाद येथे हलवण्याचे सविस्तर
प्रयत्न चालू आहेत, जे करताना मुंबईचा हा बकालपणा एक उदाहरण
म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकतो.) आणि हे शहर जागतिक दर्जाचं असलं पाहिजे यात दुमत
नाही. पण देशातील इतर प्रमुख शहरे बघा, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई वगैरे येथेही अशा गैरकारभारचे
प्रश्न आहेतच ना? पण तेथे काही घडल्याची ‘headline’ बनत नाही. अर्थात, याला अनेक पदर आहेत.
मुंबईच्या बाबतीत म्हणाल
तर, मराठी अस्मिता केवळ एवढा एकच मुद्दा पुरेसा आहे ज्यामुळे मराठी माणसाने
एका विशिष्ट पक्षाला मतं द्यायला काहीच हरकत नाही, किंवा तसं
करावंच असा आग्रह आहे. मग तो पक्ष शिवसेना असो किंवा इतर कोणताही; मुंबईतील मराठी मतदाराला वाटलं पाहिजे की तो मराठी अस्मितेचं रक्षण, जतन करू शकतो. तुम्हाला जर मराठी अस्मिता हा मतदानाचा मुद्दा वाटत नसेल
तर तुम्ही कोणालाही मत द्यायला मोकळे आहात, जो तुमचा हक्क
आहे. पण तुम्हाला जर मराठी अस्मिता हा तुमच्या, मुंबईच्या अस्तित्वाचा मुद्दा वाटत असेल आणि जर तुमचा शिवसेनेवर सोडून
इतर पक्षावर विश्वास असेल तर तोही पर्याय तुम्ही निवडू शकता. पण महत्वाचा मुद्दा
असा आहे की, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करत
असाल तर विकास ही संकल्पना थोडीशी मागे पडली तर हरकत कोठे आहे. कारण
अस्मिता/संस्कृती टिकली तर तुम्ही टिकाल, मगच तुमचा विकास
होईल ना? जसं जात-धर्म वगैरेच्या मुद्द्यापुढे खर्‍या आर्थिक, मानवी विकास बर्‍याचदा फिका पडतो तसेच एखाद्या वेळेस अस्मितेच्या
मुद्द्यापुढे अशा विकासाचा मुद्दा मागे पडला तर फरक काय पडतो. जे लोक जनतेला सांगत
आहेत की, अस्मितेचा मुद्दा बाजूला ठेऊन विकासाच्या
मुद्द्यावर मुंबई महापालिका निवडणुकीत मतदान करा, त्यांना एक
माहीत आहे की अशा अस्मितेच्या मुद्द्यावर मराठी माणूस जोपर्यंत ठाम आहे तोपर्यंत
त्यांची डाळ शिजणार नाही. म्हणून मग विकासाचं गाजर पुढे करायचं, त्यावर निवडणुका जिंकायच्या आणि सत्तेत आल्यावर विकासापेक्षा मराठी
अस्मिता दडपून त्यांचं राजकीय महत्व कमी करायचं. बर, हे
सांगणारे कोण आहेत; एक असा पक्ष ज्याने गेली साठ वर्ष
धर्मनिरपेक्षता, देशाचं अखंडत्व वगैरे मुद्दे पुढे करून
निवडणुका जिंकल्या आणि नंतर सत्तेत आल्यावर दुसरंच काहीतरी करत बसले; दूसरा पक्ष तो आहे ज्यांच्या आजच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने एकेकाळी
अस्मिता अन धर्माच्या नावावर एकहाती निवडणुका जिंकल्या आहेत. ही लोकं मुंबई
महापालिका विकासाच्या नावावर लढवणार आणि मराठी अस्मिता संपवणार!
             मराठी माणूसही मूर्ख बनवण्याचं सर्वात सोप्पं टार्गेट आहे.
ज्या माध्यमांवर ह्या मुंबई-तुंबई,
मुंबापुरी-तुंबापुरी, भरून दाखवलं अशा नावाने बातम्या देत
आहेत त्या माध्यमांचे मालक कोण आहेत हे तरी एकदा पाहा. सगळे अमराठी आहेत आणि
कोणत्यातरी राष्ट्रीय पक्षाशी संबंधित आहेत. ह्या व्यापार्‍यांचे मुंबईबद्धल काय
मत आहे, त्यांचे हितसंबंध काय आहेत हे काही लपून राहिलेलं
नाही. काही मराठी पत्रकार खरेच प्रामाणिक असल्याने ह्या
आपत्ती बद्धल पोटतीड्किणे बोलतात तर काही मालकांच्या आदेशानुसार!
देशातील सरकार हे स्वबळावर
आल्याने प्रादेशिक अस्मितांना (गुजरात वगळता!) फार किम्मत राहणार नाही. याचं एक
उदाहरण द्यायचं म्हंटलं तर, लोकसभा निवडणुकीदरम्यान (म्हणजे, निवडणूक होण्याच्या पूर्वी आणि निकाल लागेपर्यंत) एनडीए ह्या राष्ट्रीय
आघाडीत असणारा पक्ष काहीच काळात त्या आघाडीतून बाहेर पडला कारण त्यांच्यामते
केंद्र सरकारने तामिळ अस्मितांचा कसलाही विचार न करता राष्ट्रीय धोरणे राबवलीत.
एका छोट्या मुद्द्यावर तो पक्ष केंद्र सरकारमधून बाहेर पडला. सेनेत तो दम
असल्या-नसल्याचं त्यांनी दाखवून द्यायची वेळ लवकरच येणार असल्याचं दिसत आहेत.
वारंवार जर अशा प्रादेशिक अस्मिता दडपण्याचा प्रयत्न होत राहिला तर तेथे असंतोष
निर्माण होऊन (जसा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेस निर्माण झाला होता) केंद्र
सरकारविषयी टोकाला जाऊन ‘स्वतंत्र’ अशी
भाषा केली जाऊ शकते (काही काळापूर्वी राज ठाकरे यांनी अशा अर्थाचे एक वाक्य सहजच
काढले होते आणि काही पक्ष स्वतःचं राजकीय अस्तित्वासाठी/फायद्यासाठी स्वतंत्र विदर्भ
असे मुद्दे उकरत असतातच).
       हे सगळं आठवलं ते मुंबईत जोरदार पावसानंतर जी आपत्ति निर्माण झाली
आणि त्यानंतर मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावरून सेनेला वीस वर्षे मुंबई महापालिकेत
सत्तेवर बसवलं आणि त्यांनी काहीच केलं नाही अशा संदर्भाच्या वाक्यांवरून. माध्यमांचे
अन विरोधकांचे सुतावरून स्वर्ग गाठणे झाले तसेच माझा हा लेखही त्याच वर्गातला वाटू
शकतो. पण सेनेने हातात असलेल्या सत्तेच्या जोरावर उत्तम काहीतरी ‘करून दाखवावं’ जेणेकरून मराठी माणसाच्या अस्मितेवरून
मत देण्याच्या प्रकाराला कोण नाव ठेवण्याची हिम्मत करणार नाही. नाहीतर मराठी माणूस
असाही न्युनगंडात असतो आणि त्यालाच जर असं मूर्खात काढायचे प्रकार कोण सुरू करत असेल
तर मराठी माणूस २०१७ ला गोंधळात सापडू शकतो.          

© 2015 – 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!