अमृतवेल – वि. स. खांडेकर

अमृतवेल – वि. स. खांडेकर

पुस्तकप्रेमी   ||  पुस्तक समालोचन   ||  वाचन  ||  प्रीती आणि वासना

बर्‍याच महिन्यांनी काहीतरी वाचून पूर्ण झालं. सहा महिन्यांपासून वि. स. खांडेकर यांचं “अमृतवेल” डोक्याशी पडून होतं. वाचायला सुरुवातही केली होती पण फार कंटाळवाण वाटलं. लिहिताना मन अस्थिर असलं तर एकवेळ चालू शकतं पण वाचन करताना मन मोकळंच हवं. एखाद्या पाण्याच्या टाकीप्रमाणे मानसाच्या मनाचीही पुर्णपणे भरून जाण्याची क्षमता असते. जर मन चित्रविचित्र भावनांनी भारलेलं असेल आणि मेंदू तर्‍हेतर्‍हेच्या विचारांनी घेरलेला असेल तर त्याची Intake ची क्षमता संपते. अजून काही नवीन घ्यावं अशी इच्छाच होत नाही. घेण्याचा (म्हणजे वाचनातून विचार वगैरे) प्रयत्न केला तरी Overflow होत असतो. त्यापेक्षा थोडासा रीतेपणा येण्याची वाट बघावी.

खांडेकर यांचं “ययाती” आधी वाचलेलं होतं. तेही सरासरी आवडलं. ते सुमार होतं असं नाही पण, आवड असते प्रत्येकाची. खांडेकर यांच्या लिखाणात नात्यांची गुंतागुंत आणि त्यातून आयुष्याचा मंच चित्रित करण्याचा प्रयत्न असतो. याशिवाय मानवी मन किती चंचल आणि क्लिष्ट आहे हेही त्यातून प्रतीत होत असतं.

अमृतवेल हा एक नीरस वाटणारा प्रवास वाटतो. त्यात सर्वच प्रवासी अतिशय निराशाग्रस्त आणि जीवनाला विटलेले वाटतात. त्यातील जी मुख्य पात्र आहेत त्यांनी “आत्महत्या” ही एक सुखद निवड किंबहुना पळवाट शोधलेली असते. मृत्यू हा किती जवळचा आहे प्रत्येकासाठी याचे संदर्भ वारंवार येत असतात. माणसाला दुखं सहन करण्याची शक्ति नकोच असते. उलट दुखाला कुरवाळत बसून स्वतःच्या अंताची वाट बघण्यातच स्वारस्य वाटू लागतं. पण ते काही काळपुरताच. रात्रीचा अंधारमय प्रहर संपून दिवसाचा प्रसन्न प्रकाश येईपर्यंत ते मळभ तसच राहतं. मानवी मनाला मनोरंजन हवं असतं. काहीतरी नवीन हवं असतं. कधी खेळायचा तर कधी चघळायला! कितीही मोठं दुखं असलं तरी ते काळाच्या ओघात विसरता येतं, त्यासाठी नवीन दुखाची वेदना हवी किंवा प्रेमाची फुंकर घालणारं कोणीतरी सोबती हवा असतो. माणसं चांगली किंवा वाईट आहेत हे आपला त्याच्याकडे बघायच्या दृष्टीकोणावरून ठरतं. एखाद्या प्रती असलेलं ग्राह्य मत हेच त्याची प्रतिमा ठरवतं. पण ती व्यक्ति दुसर्‍या कोणासाठी तशीच असेल असं नाही. माणसागणिक माणसाची प्रतिमा बदलत जाते. याच सर्व मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या गुंतागुंतीचा “अमृतवेल” मध्ये धांडोळा घेतला आहे. येथे अमृतवेल या नावाला बराच अर्थ आहे. एक चित्र आहे त्याला अमृतवेल म्हंटलं आहे. त्यात प्रीतीचा सुगंधही आहे आणि वासनेचा मुर्छित करणारा उग्र दर्पही आहे. आकाशाकडे झेपावणेही आहे आणि पुन्हा जमिनीकडे झुकणेही आहे.

अमृतवेल वाचत असताना ययाती मधील पात्र मध्ये-मध्ये डोकावत होते असं वाटतं. पण ययाती, यती आणि कच्छ तीनही एकाच देवदत्तमध्ये सामावले आहेत अशीही जाणीव होते. ययातीमध्ये मानवी जीवनाचं जे भेसूर वर्णन आहे तेच अमृतवेलमध्येही आहे. प्रेम, प्रीती, वासना, प्रतिशोध, द्वेष, माया, भक्ति या भावनांच्या विविध रंगांनी हे चित्र रेखाटलं आहे. दुसरं म्हणजे, अमृतवेल वाचत असताना ‘साहेब, बिवी और गॅंगस्टार’ या चित्रपटातील काही संदर्भ डोळ्यासमोर आल्याखेरीज राहत नाहीत. मोह संपत्तीचा कितीही असला तरी मायेच्या तराजूत त्याला किम्मत नसते. नंदा, वसू, देवदत्त ही तीन प्रमुख पात्र एकाच जहाजात बसून प्रवास करत असतात. पण हे त्रिकुट परस्परांच्या प्रती किती वेगवेगळे दृष्टीकोण ठेऊन असतात हे वाचकाला टप्प्याटप्प्याने उलगडत जातं. सोबत्यांप्रती मतं बनवताना केवळ डोळ्याला दिसतं ते यावर विश्वास ठेवला तरी नात्यांत दरी वाढत जाते. त्यासाठी मनाची कवाडे उघडी ठेवावी लागतात अन मायेच्या संवादांनी जाणिवेच्या कक्षा रुंद कराव्या लागतात.

पूर्वार्धात कथानक अत्यंत रटाळ वाटतं. काही घटना, नाट्य घडतच नाही. नंदा या पात्राची पार्श्वभूमी आणि मनोस्थिती ठळक करण्यासाठी बराच अवधि जातो. तिथे जीवनाचं तत्वज्ञान आणि वास्तव वगैरे समजावून सांगण्यात संथपणा आला आहे. पूर्वार्ध त्यामुळेच कदाचित कंटाळवाणा वाटतो. पण नंदाच्या आयुष्यात वसू-देवदत्त हे जोडपं आणि त्यांची मुलगी मधुरा येतात तेंव्हा कथेत जिवंतपणा येऊ लागतो. पण रस्ता कितीही सुरेख असला तरी गाडीचा वेग न वाढवल्याने प्रवासात वेगळेपण येत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत संथपणा कथेला ‘कधी एकदा संपते’ या अधीरतेवर नेऊन सोडतो. तेथे लेखकाने वापरलेली वचने, उदाहरणे आणि अलंकारिक भाषा यामुळेच कदाचित वाचक (किमान मी) खिळून बसतो. पुढे काय होणार याची उत्कंठा तर असतेच आणि साजेसे ट्विस्ट सुद्धा आहेत पण एकत्रित परिणामकारकता येत नाही. पण उत्तरार्ध आणि शेवट चांगला झाला आहे. कथेत जी परिस्थिती उभी आणि लेखक ती ज्या कोनातून दाखवतो ते वाचण्यासारखं आहे.

जेंव्हा मानसाच्या आयुष्यात जगण्यासाठी निमित्त राहत नाही तेंव्हा तो मृत्युची वाट बघत बसतो. जेंव्हा दुखं मनातच ठसठसत राहतं तेंव्हा त्याचे प्रतिध्वनी सतत उमटत राहतात. पण जगण्याला उमेद मिळते, कारण मिळतं तेंव्हा मात्र साचलेली नकारात्मकता उफाळून येते अन सकारात्मकतेतं परावर्तीत होते. अमृतवेल तेच सांगते!

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

वाचा भयकथा खालील लिंकवर

https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-m4gdjtXUO2YX 

 

© 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!