संभाजी…

संभाजी…

इतिहास  ||   पुस्तकप्रेमी  ||  महाराज  ||  आवडलेले पुस्तक  ||

लेखक – बाबुराव अडकित्ते

स्वराज्याचे दुसरे छत्रपती युवराज संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे. इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी संभाजी ही कादंबरी एक पर्वणीच आहे. जसा जसा काळ सरत गेला तसं तसं संभाजी महाराजांची बदनामी करणारे अनेक लेख/बखरी/कादंबरी लिहिल्या गेल्या आणि संभाजी राजांचा खरा इतिहास लपवला गेला. विश्वास पाटीलांनी अगदी पुराव्यासहीत यांना कादंबरीतून उत्तर दिले आहे.

कादंबरी सुरुवातीपासूनच तुमच्या मनावर पकड निर्माण करते. पुस्तकात इतिहासाचे दाखले सुद्धा अतिशय उत्तमरीत्या मांडले आहेत. मुघल सम्राट औरंगजेब शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर स्वराज्यावर चालून आला. त्या मुघल ५ लाख सैन्याला संभाजी महाराजांनी एकही किल्ला न गमवता सलग आठ वर्षे झुंज दिली. फक्त मुघलच नाही तर इंग्रज,पोर्तुगीज,फ्रेंच,सिद्दी यांच्याविरुद्धचा हा ८ वर्षांचा अतिशय संघर्षाचा आणि जोखमीचा काळ या कादंबरीतून तुम्हाला वाचायला मिळेल.
संभाजी महाराजांना परक्यांचा त्रास होताच पण स्वकीयांनीसुद्धा राजेंना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शिवरायांच्या अतिशय महत्वाच्या दक्षिण दिग्विजयाचं नेतृत्व युवराजांना मिळालं पण ऐनवेळी नेते मंडळीनी राजकारण करून युवराजांना या मोहिमेतून डावललं. संभाजी महाराज मुघलांना जाऊन मिळाले आणि स्वराज्यावर आक्रमण केले असा आरोप नेहमी होत आला आहे, त्यात नेमकं किती तथ्य आहे हे कादंबरी वाचल्यावर कळतं.

या कादंबरीत आवर्जून उल्लेख करावा अस व्यक्तिमत्व म्हणजे कवी कलश. कवी कलश हा युवराजांचा जीव की प्राण. मित्र असावा कलशांसारखा जो आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याला साथ देईल. कवींच्या शब्दांना जेवढी धार होती तितकीच धार त्यांच्या तलवारीला देखील होती. कवी कलशांसारखा एक मित्र आपल्याही आयुष्यात असावा असं वाटतं.

कादंबरीचा शेवट वाचताना मन हेलावून जातं. दगाफटका झाला आणि युवराजांसोबत कलशसुद्धा पकडले गेले. ४० दिवस मुघल छावणीत अतोनात अत्याचार होऊन सुद्धा युवराजांनी स्वराज्याचा सौदा केला नाही. निर्भीडपणे मृत्यूला सामोरे गेले आणि राजे अमर झाले.

पाहून शौर्य तुजपुढे मृत्यू नतमस्तक झाला,
स्वराज्यासाठी माझा शंभुराजा अमर झाला…

© 2018 – 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!