रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ

#लोकसभानिवडणूक२०१९  ||  #राजकारण  ||  कोकणचो शिमगो 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आत्ताच गाजतोय तो काँग्रेस उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांच्यामुळे. त्यांचे सनातन संस्थेशी संबंध आहेत असे आरोप पुरोगामी वर्तुळातूनच होत आहेत. पण कॉंग्रेसला त्यातल्या त्यात चांगला आणि मतं मिळवेल असा उमेदवार मिळाला आहे म्हणून कॉंग्रेस या वादाकडे दुर्लक्ष करत आहे.

त्यांच्याविरोधात आहेत सेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत आणि नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे. अशा पद्धतीने हा सामना तिरंगी होईल.

कोकणात सेनेची स्वतःची ताकद आहे आणि नाणार प्रकल्प रद्द झाल्याने सेनेची कोकणात विश्वासार्हता वाढली आहे. ठाकरे कुटुंबाने दिलेला शब्द पाळला यावरून मते मागणे शिवसेनेला सोपे आहे. शिवाय युती झाल्याने थेट कुठलं आव्हान नाही. विनायक राऊत आक्रमकपणे प्रचार करत आहेत आणि कोकणात झाली न झालेली कामे यावर निवडणूक लढवत आहेत.

तिसरीकडे राणे कुटुंबीय सध्या राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटची झुंज देतील. युती झाल्याने त्यांच्यासमोर कुठलाही पर्याय उरला नाही. भाजपने केवळ वापरुन घेतल्याने त्यांच्या कुटुंबाकडे उघड संघर्षाशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच नीलेश राणे निवडणूक लढवत आहेत. कुठल्याही पक्षाचं चिन्ह आणि संघटना त्यांच्या साथीला नाही आणि जुने साथीदारही साथ सोडून गेलेले आहे. ही राणे यांच्यासाठी निकराची लढाई असेल. अस्तित्व टिकवणे आणि स्वतःची ताकद दाखवून देणे हा एकमेव मार्ग राणे कुटुंबाकडे आहे.

काँग्रेसला चौदा वर्षाच्या वनवासानंतर काहीतरी वेगळं मिळतंय हेच खूप आहे. बांदिवडेकर यांच्या रूपाने काँग्रेस पक्ष म्हणून उभा राहिला तरी पुरेसं आहे. शिवसेनेकडे असलेला भंडारी मते त्यानिमित्ताने काँग्रेसकडे सरकू शकतात. एक नवी सुरुवात होऊ शकते. शिवसेना कोकणशी नातं अधिक घट्ट करू पाहणार यात शंका नाही. मार्ग सोपा वाटत असला तरी सहजरीत्या सर्व होईल असेही नाही, कारण स्वपक्षातील गट-तट आणि छुप्या युती-आघाडी मोडून विजयाचे डोंगर सर करायचे आहेत.

मतदारसंघाचे गणित मांडले तर, मतविभाजन होऊन कोणीतरी एकजण कमी फरकाने निवडून येईल असं दिसतं आहे पण शिवसेना त्यात अग्रेसर राहील.

© 2019, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!