लेख || #कोरोंनावायरस || #Lockdown || बदलतं जग
सध्या जगभरात कोरोंना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. बड्या बड्या महासत्ता या व्हायरसच्या दहशतीपुढे गुडघे टेकताना दिसत आहेत. त्या व्हायरसच्या केवळ अस्तित्वाने मोठमोठी शहरं अक्षरशः बंद करावी लागली आहेत. अशा एका कोरोंनाने जग बदललं आहे आणि त्यानिमित्ताने जे बदल होणार आहेत ते केवळ एका देशाचं नाही तर अख्ख्या जगाचं सामाजिक, राजकीय आणि आर्थिक शिस्त बिघडवणारं आहे.
मानव जेंव्हापसून समूह करून राहू लागला तेंव्हापासूनच मानवाची प्रगती होऊ लागली. आपण इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक संपन्न आहोत आणि या पृथ्वीवर राज्य करण्यास लायक आहोत हे मानवाला समूहात राहू लागल्यानंतरचं ज्ञान आहे. याच समूहशक्तिच्या बळावर मानव आज पृथ्वीवरील, नव्हे तर आपल्या आकाशमालेतील सर्वात शक्तिमान सजीव आहे. पण एका व्हायरसने मानवाची जी मुख्य ताकत होती त्यावरच आघात केला आहे. ते म्हणजे समूहात राहणे! आज जग सगळं घरात लपून बसलं आहे. समूहात येणं आता मानवाच्या जिवावर बेतू लागलं आहे. समूहात आल्याशिवाय आपली प्रगती नाही हे ज्या अश्मयुगीन मानवाला समजलं होतं आज आपण तशाच एका टप्प्यावर आलो आहोत. आपल्याला आता समूहात येण्याची भीती आहे आणि तितकीच ती एकटं राहण्याची सुद्धा आहेच.
ज्या स्वातंत्र्यासाठी मानवाने रक्त सांडलं त्याला आज एखाद्या कैद्यासारखं स्वतःच्याच घरात लपून बसावं लागत आहे. आणि आज त्या स्वातंत्र्याची उपलब्धता असूनही मनुष्य त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. मानवी उत्क्रांतीत ज्या-ज्या म्हणून प्रगतीच्या आणि स्थित्यंतरच्या घटना होत्या त्यावर कोरोंनाने घाला घातला आहे. हा एक प्रकारे मानवी समाजाच्या अस्तित्वावरच आघात आहे.
काही काळाने हा व्हायरससुद्धा परास्त होईल आणि माणूस पुन्हा एकदा विजयाच्या शिखरावर असेल यात शंका नाही, पण मुद्दा असा आहे की तो पूर्वीसारखाच असेल का? कारण कोरोंना मुळे केवळ नेत्यांनाच नव्हे तर वैयक्तिकरित्या प्रत्येक माणसाला बदलून टाकलं आहे. कोरोंना हा चीन या देशाच्या जाणते-अजाणतेपणामुळे पसरलेला व्हायरस आहे अशी टीका केली जात आहे. हा अपघात नसून षडयंत्र आहे अशीही चर्चा सुरू झाली आहे. ज्यावेळी या कोरोंनाचं सावट कमी होईल त्यावेळी जगातील महासत्ता या आपापसांत भांडण करायला लागतील यात शंका नाही. यामागे केवळ राजकारणच असेल असं नाही तर अर्थकारणही असणार आहे. कोरोंनाच्या निमित्ताने जगभरातील अर्थव्यवस्था कोलमडून पडतील किंवा मंदावतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जर असं झालं तर जगाची पर्वा सोडून प्रत्येक राष्ट्र आपापले स्वार्थ बघू लागणार आहे. आत्ताच बातम्या येत आहेत की अमेरिकेत Lockdown मुळे मोठ्या प्रमाणात नोकर्या जाणार आहेत. येणार्या काळात अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकासुद्धा आहेत. अशा वेळेस तेथील जनतेला खुश करण्यासाठी बाहेरील कंपन्या व नागरिकांना काही अटकाव होऊ शकतो. त्यातून भारतासारख्या देशलाही मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. हे केवळ एका देशातच नव्हे तर सरसकट सर्वच देशात होताना दिसून येईल. येणार्या काळात बेरोजगारी वाढण्याची शक्यता तर आहेच पण त्यासोबतच आंतरराष्ट्रीय संबंधात सुद्धा कटुता येऊ शकते. असंही म्हंटलं जात आहे की ज्या उदारमतवादी धोरणांचा व भांडवलशाही व्यवस्थेचा अनेक देशांनी अवलंब केला होता तिसुद्धा धोक्यात येऊ शकते. कारण ही व्यवस्था अर्थजगताच्या एका वर्तुळाकार चक्रावर सुरू असते आणि त्यातील एकही भाग गळून पडला तर संपूर्ण व्यवस्थेत दोष निर्माण होतो. 1990 साली जेंव्हा सोवियत रशियाचं विघटन होऊन साम्यवादाचा अस्त झाला होता त्यावेळी जगभरातील समाजकारण, राजकारण व अर्थकारणणे कूस बदलली होती. कोरोंना व्हायरसचा उगम हा साम्यवादी चीनमधला आहे; पराकोटीचं स्वातंत्र्य मानणार्या फ्रांस व युरोपसारख्या देशात तो सर्वाधिक पसरला आहे आणि रशियासारख्या साम्यवादाची पाळेमुळे खोलवर अस्तीत्वात असलेल्या देशात तो पसरलासुद्धा नाही. या व्यवस्था आता पुन्हा आहे त्या मार्गाने वाटचाल करत राहतील की पुन्हा संक्रमणवस्थेत जातील याची शाश्वती नाही. याला कारण म्हणजे नुकतच तेथे Brexit होऊन एकत्रित मूठ ढिली झाली आहे.
एका बाजूला जगभरात असे स्थित्यंतर होत असताना भारत आपल्या पारंपरिक संकटात सापडतो की काय अशीच चिन्हं दिसत आहेत. कोरोंनाने भारतात हातपाय पसरायला सुरुवात केली आणि सरकार त्याच्यावर उपाययोजना करत असताना मरकत निजामूद्दीन प्रकरण समोर आलं. त्यानंतर अशा घटनांचा सिलसिला सुरूच राहिला. देशभरात हल्ले होऊ लागले, बंदी असतांनाही सामूहिक नमाज पठन होऊ लागलं आणि त्याचे विडियो व्हायरल होऊ लागले. सोबतच अन्य काही विडियोही व्हायरल झाले जे समाजमन अस्थिर करणारे आहेत. व्हायरसच्या विरोधात लढत असताना व्हायरलची जी घटना झाली आहे ती जास्त घातक आहे. यातून एक समाज देशाप्रती एकनिष्ठ नाही असं चित्र समोर उभं राहताना दिसत आहे. याला इलाज म्हणून ‘नंतर आम्ही आहोतच’ असाही प्रतिवाद येत आहे. ज्यावेळी कोरोंना व्हायरसचा प्रभाव ओसरेल तेंव्हा समाज वेगळ्याच मानसिकतेत असेल. दीर्घ काळाच्या Lockdown मुळे आर्थिक व्यवस्था बिघडणार आहे यात शंकाच नाही. आधीच आर्थिक मंदीचा सामना करणारा देश आता आणखीनच अडचणीत येणार आहे. नोकर्या जाण्याचं प्रमाण वधारणार आहे आणि हातात पैसा नसलेलं आणि मेंदूला काम नसलेला तरुण वर्ग चुकीच्या दिशेने जाण्याची अधिक शक्यता आहे. हा Lockdown जरी काही काळापुरता असला तरी त्याचे परिणाम दीर्घकालीन असणार आहेत.
हा एक व्हायरस जगाला बदलून जाणारा आहे. मानव घरात बसला आणि पृथ्वीने काही काळ मोकळा श्वास घेतला असं दिसत आहे. प्रदुषनापासून ते गुन्हेगारीपर्यन्त अनेक बाबी कमी झाल्या आहेत. जणू काही हे जग Restart होत आहे. आणि जेंव्हा System Restart होते तेंव्हा आधीच्या स्मृती पुसल्या जातात, काही फाइल्स डिलीट होतात आणि नव्याने मांडणी करायची असते!
यावेळी Batman The Dark Knight चित्रपटातील Harvey Dent या पात्राचा एक संवाद आठवतो…
You either die a hero, or you live long enough to see yourself become the villain.
नियती प्रत्येकाला त्याच्या वाटेने घेऊन जाणार आहे!
अभिषेक बुचके (ब्लॉगर)