सोशल मीडिया पेक्षा डायरी लिहिणं फार फायद्याचं आहे असं वाटतंय. कारण आपली डायरी ही फक्त आपण वाचत असतो, त्यातून अंतर्मुख होण्याची संधी मिळत असते. दुसऱ्यांच्या वाटण्या, न वाटण्याचा तिथे संबंध येत नाही. मनातील प्रत्येक खदखद व्यक्त करता येते. भूतकाळाचा पट समोर असतो ज्यातून कदाचित भविष्यातील कोडी सुटू शकतात. सोशल मीडिया मात्र नेमका याउलट असतो! इथे लिहिलं जातं वाचणाऱ्यासाठी… कोणाला काय वाटेल, काय विचार करतील अशी अवस्था होऊन बसते. फेसबुक वर लिहावं म्हंटलं तर नातेवाईक, ऑफिसवाले असे असतात, WA लिहिणं म्हणजे तर नेम धरून मारल्यासारखे होईल आणि ट्विटर, इंस्टा म्हणजे तर नुसता धिंगाणा आहे. त्यात मनापासून लिहिण्यापेक्षा Likes साठीही लिहावं लागतं. आपलं अध्यात्म सुद्धा डोळे मिटून अंतर्मुख होण्याची शिकवण देतं पण आपण अधिकाधिक जगाकडे आपलं अस्तित्व फेकत चाललो आहोत. प्रत्येक व्यक्ती किरणोत्सारी पदार्थाप्रमाणे त्याच्या विचार, भावनांचा किरणोत्सार करत आहे.
मंदिरात देवासमोर डोळे मिटून, हात जोडून उभे राहणारे आपण आणि जगासमोर उभे राहून हातवारे करून बोलणारे आपण…
हे सगळं कळूनही सुटत नाही ते सोशल मीडियाचं व्यसन म्हणजे भयंकरच आहे!

अभिषेक बुचके