लघुकथा || रहस्यकथा || मराठी कथा || अक्षय तृतीया आणि रहस्य || चमत्कारिक गाव
या जगात अनेक चमत्कारिक गोष्टी, माणसं आणि जागा आहेत. जिथे जगाचे नीती-नियम चालत नाहीत, रिती-भाती चालत नाहीत, कायदे चालत नाहीत त्याला चमत्कारिक म्हणता येईल. गप्पांचे फड रंगल्यावर बर्याचदा असे किस्से समोर येत असतात. काहीजण स्वतःचे अनुभव सांगत असतो. पण या जगात चमत्कारिक असं काहीतरी आहे यावर प्रत्येकाचा काही अंशी का होईना विश्वास बसतोच!
आज अशाच एका जागेबद्दल, चमत्कारिक जागेबद्दल सांगायचं आहे. विश्वास ठेवणे न ठेवणे ज्याच्या त्याच्या विचारस्वातंत्र्याचा आणि दृष्टीकोणाचा भाग आहे. या चमत्कारिक जागेबद्दल मला कसं माहिती हासुद्धा एक चमत्कारिक किस्सा आहे. पण ते नंतर कधीतरी सांगेन. आज त्या चमत्कारिक जागेबद्दल सांगितलं पाहिजे. कारण मुहूर्त अक्षय तृतीयेचा आहे.
अक्षय! म्हणजे ज्याचा क्षय होत नाही, ज्याची क्षती होत नाही, जे चिरंतर टिकणार आहे असं. म्हणूनच हा मुहूर्त साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी शुभ कार्य केलं की ते टिकून राहतं असं मानलं जातं. पण अपवाद असतातच… इथेही आहे. हा किस्सा आहे अभय आणि त्याच्या कुटुंबाचा. अभय, त्याची पत्नी विशाखा, त्यांचा मुलगा स्वगत आणि अभयचे वडील सुभाषराव. सगळी नावं खोटी आहेत. पण असं एक कुटुंब फिरायला कुठेतरी गेलं होतं.

अभय गाडी चालवत होता. विशाखा टेपवर सतत गाणे बदलत होती आणि आठ वर्षांचा स्वगत तिला चांगलं गाणं लाव म्हणून आज्ञा सोडत होता. गाडी संथपणे घाटातून जात होती. आजूबाजूला घनदाट जंगल होतं. संध्याकाळची वेळ होती. मावळतीचा सूर्य गाडीच्या डावीकडे होता ज्याच्याकडे बघत अभयचे वडील कसलातरी विचार करत होते. अचानक अभय जोरात ओरडला, “आईगं!! समोर काय ते…?” विशाखा, अभयचे वडील आणि स्वगत घाबरलेल्या नजरेने तिकडे बघत होते. प्रत्येकाच्या चेहर्यावर मृत्युचं भय स्पष्ट दिसत होतं. अभयचे वडील मोठ्याने ओरडले, “गाडी थांबव अभय… ब्रेक मार…” अभय भानावर येऊन ब्रेक मारायचा प्रयत्न करत होता, पण आजूबाजूला हिरवट, जांभळा प्रकाश दाटला. आजूबाजूच्या वातावरणात एकाएकी बदल झाले. काहीही कळायच्या आत गाडी समोरच्या त्या अपरिचित प्रकाशात विलीन झाली, आरपार गेली. एखाद्या बोगद्यात प्रवेश करावा तसा तो प्रकार होता. पण अचानक तो बोगदा अवतरला कोठून? सरळ रस्त्यावर असं एकाएकी घडल्याने सगळे प्राणांतिक घाबरले होते.
गाडी बाजूला थांबली होती. अभय सर्वात आधी गाडीतून बाहेर उतरला आणि सर्वांना त्याने सावकाश बाहेर उतरवलं. सगळ्यांचं अंग लटलट कापत होतं. स्वगत रडत होता. भीतीने गाळण उडाली होती. अभयचे वडील म्हणाले, काय होतं रे ते अभय?
अभय मोठा श्वास घेत म्हणाला, “माहीत नाही बाबा. आपण थोडक्यात बचावलो!”
अभयचे वडील, “हे काही बरोबर वाटत नाही… ताबडतोप निघूयात इथून. आपल्याला सुरक्षित ठिकाणी जावं लागेल.”
विशाखा स्वगतला शांत करत म्हणाली, “बाबा बरोबर बोलत आहेत. निघूयात इथून.”
अभय, “मला भीती वाटतेय… पुन्हा जर तेच, ते जे काय होतं ते गाडीसमोर आलं तर…?” बोलतानाही अभयचा आवाज खाली-वर होत होता.
त्याने वर्तवलेल्या शक्यतेने सर्वांचे चेहरे रडवेले झाले.
अभयचे वडील म्हणाले, “तू सोहमला फोन लाव आधी. असशील तसा इथे ये म्हणावं… पोलिस पाठव किंवा काहीतरी कर म्हणा… वेळ घालवू नकोस… फोन कर.”
सोहम म्हणजे अभयचा चुलतभाऊ. अभयचे वडील त्याला बोलावून मदत घेऊ इच्छित होते.
अभयने फोन काढला आणि त्याच्या चेहर्यावर अधिकच भीती दाटून आली. त्याने विशाखाचा फोन मागितला, तिने तातडीने दिला… अभय दोन्ही फोनमध्ये बघत घाबरत म्हणाला, “बाबा या दोन्ही फोनमध्ये नेटवर्क नाही!”
सर्वांचा धीर सुटला. ते आजूबाजूला पाहू लागले. आत्ता त्यांच्या लक्षात आलं की आजूबाजूला काहीच नाही. गर्दी नाही किंवा काहीच मानवी खुणा नाहीत. ते फक्त एका रस्त्याच्या कडेला उभे होते. आणि हा रस्ता आधीचा रस्ता नव्हता याबद्दल त्यांची खात्री पटली होती. ते भलत्याच जागी येऊन पडले होते.
विचार करून अभयचे वडील म्हणाले, “हे शक्य नाही… अभय आपल्याला चकवा लागलाय! आपल्याला कोणीतरी जाळ्यात ओढत आहे. इथून निघ आधी.”
हे ऐकून विशाखाच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागलं. स्वगत रडू लागला. अभयला कोणाला सावरू असं झालं होतं. मोठा श्वास घेऊन तो म्हणाला, “मी आहे तोपर्यंत कोणालाही काहीही होणार नाही. काळजी करू नका.”
अभयच्या कणखर बोलण्याने दोघेही सावरले. स्वगत रडतच होता. अभयला त्याची अवस्था बघवली नाही आणि त्याला उचलून घेत अभय म्हणाला, “स्वगत… तुझा तुझ्या बाबावर विश्वास आहे न? मी असेपर्यंत तुला काही होऊ शकतं का?”
लहानगा स्वगत “नाही” म्हणून मान हलवत अभयच्या गळी पडला.
अभय स्वगतला म्हणाला, “अजिबात रडायचं नाही. तू रडलास तर तुझ्या आईची काळजी कोण घेणार? मी माझ्या बाबांची काळजी घेतो तू तुझ्या आईची घेतली पाहिजेस न? तू रडलास तर आईही रडेल…”
हे ऐकताच स्वगत शांत झाला आणि विशाखाचा हात हातात घेऊन धिराने उभा राहिला.
विशाखा म्हणाली, “काय करायचं अभय?”
अभयचे वडील म्हणाले, “गाडीत बसून निघूयात का?”
अभय मान हलवत म्हणाला, “नाही… गाडीत बसून जाणं आता शक्य नाही. हा चकवा वगैरे माझा विश्वास नाही बाबा. काहीतरी अघटित घडलं आहे हे नक्की, पण चकवा नाही.”
बोलत असताना अभयचं लक्ष जंगलाकडे गेलं. तो टक लावून जंगलात बघू लागला. त्याला काहीतरी दिसत होतं. तो चटकन गाडीच्या टपावर चढला. लक्ष देऊन बघताच त्याच्या जीवात जीव आला. खाली उडी मारत आनंदाने तो म्हणाला, “बाबा, विशाखा… तिकडे गाव आहे!”
विशाखा, स्वगत व अभयचे वडील तिकडे बघू लागले. झाडांच्या आडून काही दिसतय का याचा अंदाज घेऊ लागले. झाडांच्या गर्दीतून रोषणाई दिसत होती.
अभय म्हणाला, “संध्याकाळ आहे. काहीच वेळात किट्ट काळोख होईल. त्यापूर्वी तिथे पोचुयात. मदत मागुया आणि सकाळ होताच निघून जाऊ. ही जागा सुरक्षित नाही.”
विशाखाने लागलीच होकार दर्शवला. स्वगतही आईला बिलगून उभा राहिला. पण अभयचे वडील विचार करून म्हणाले, “गाव असेल ना रे पण तिकडे?”
अभय न समजून बोलला, “म्हणजे बाबा?”
अभयचे वडील, “म्हणजे तो छळ तर नसेल, आभास तर नसेल?”
अभय गंभीरपणे म्हणाला, “नाही बाबा, मला नाही वाटत तसं. गाव दिसतं आहे. उद्या अक्षय तृतीया असल्याने काहीतरी उत्सव दिसतोय त्यामुळे रोषणाई केली आहे. आपल्याला तिथेच गेलं पाहिजे.
अभयचे वडील शांतपणे होकार देत म्हणाले, “ठीक आहे. पण तिघांनाही सांगतोय, काहीही झालं तरी एकमेकांचा हात सोडायचा नाही. अगदी काहीही झालं तरी.”
अभय बोलत होता, “बाबा घाबरतील हे. तुम्ही…”
तो काही बोलेल यापूर्वीच अभयचे वडील म्हणाले, “सर्वांनी सावधान असावं म्हणूनच सांगितलं मी अभय!”
सर्वांनी एकमेकांचे हात हातात घेतले. अभयने स्वगतला कडेवर घेतलं आणि तिथे झपझप पाऊले टाकत गावाच्या दिशेने निघाली.
गावाकडे जाण्यासाठि एक अरुंद वाट होतीच. कदाचित गावातील लोक त्याच वाटेने मुख्य रस्त्यावर येत असावेत असा अंदाज अभयने बांधला. फार तर फार अर्ध्या तासाचं अंतर होतं. तिघेही सावधपणे चालत होते. जंगल घनदाट होतं. हिंस्र प्राणी आणि ‘अपरिचिताची’ भीती मनात घर करून होतीच. देवाचा धावा करत, एकमेकांना धीर देत आणि मनाची समजूत काढत ते चालत होते. बघता बघता गावाच्या वेशीजवळ ते पोचले.
ते सर्वजण गावाच्या बाहेर थांबले. सर्वांच्या जीवात जीव आला. मोठ्या संकटातून सुटलो असं त्यांना वाटत होतं. गावात खरंच काहीतरी मोठा उत्सव होत असावा. कारण सगळी घरं उजळून निघाली होती. गावाची वेस जुनी असली तरी त्यावरही सजावट आणि रोषणाई केली होती. शिवाय समोर एक मंदिरही दिसल्याने मनातील भलत्या शंका लोप पावल्या. मंदिर दिसल्यावर सर्वांचे हात आपोआप जोडल्या गेले. एकेकांकडे बघत चौघेही वेशीच्या आत गेले.
सर्व घरांतून उत्साहाचे आवाज येत होते. जणू काही दिवाळी असावी. रस्त्यावर काही लोक एकमेकांना गळाभेट देत होते. काही लोकांनी यांच्याकडे बघून स्मितहास्य केलं. लोकं आपआपल्या आनंदात गुंतलेले होते. चौघेही चालत पुढे आले. सर्वांना पाणी हवं होतं. पलीकडे एक बाग दिसत होती. त्यांनी तिकडे कूच केली. बागेतील एका ओट्यावर ते बसले. आळीपाळीने सर्वांनी पाणी घेतलं आणि ताजेतवाने झाले. काही काळ बसून कोणालातरी मदत मागु असं ठरलं.
अभयचे वडील म्हणाले, “अक्षय तृतीयेच्या मानाने यांचा उत्साह जरा जास्तच नाही का वाटत..?”
विशाखा समर्थन देत म्हणाली, “हो ना बाबा, मलाही तेच वाटतंय. अक्षय तृतीयेला एवढं काही असतं हे मी आज बघतेय.”
अभय उडवत म्हणाला, “असेल गं काही. प्रत्येक गावाच्या परंपरा असतात. जत्रा बित्रा संपत असेल आज.”
अभयचे वडील, “हं शक्य आहे. गाव तितक्या परंपरा. अगदी विलक्षण परंपरा असतात एक-एक. ते सोड… अभय मदतीचं बघ काहीतरी. कोणालातरी विचारून बघ. सोहमला फोन लाव.”
“तुम्ही बसा इथेच, मी जाऊन बघून येतो.” अभय लागलीच निघून गेला.
अभय एकदोघांना पोलिस स्टेशन बद्दल विचारत होता आणि लोकांनी त्याला एक दिशा दाखवली तिकडे तो गेला.
इकडे, अभय गेल्यावर एक वृद्ध माणूस अभयच्या वडलांच्या बाजूला येऊन बसला.
त्याने त्यांना विचारलं, “तुम्ही नाही का Celebrate करणार?”
अभयचे वडील हातवारे करत म्हणाले, “नाही, अभय गेलात तिकडे. येईल इतक्यात.”
“अभय?” त्या व्यक्तीने प्रश्नार्थक उद्देशाने विचारलं.
“माझा मुलगा!”
“ओह! माझं तर जमलंच नाही कोणाशी. आणि वर्षभरासाठी कोणाला का जुळवून घ्या. आपलं आयुष्य असच आहे. दहा वर्षांपूर्वीही कदाचित असच असेल आणि उद्यापासूनही कदाचित असच असेल.”
अभयचे वडील व विशाखा एकमेकांकडे बघत होते. त्यांना याच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळाला नाही.
उगाच गावभरच्या गप्पा मारण्यापेक्षा स्वगत त्या व्यक्तिला चटकन बोलून गेला, “आजोबा आम्ही हरवलो आहोत. आम्हाला हेल्प पाहिजे म्हणून बाबा पोलिसांकडे गेलाय!”
स्वगतच्या तोंडून हे शब्द पडताच तो व्यक्ति ताडकन जागेवरून उठला आणि स्वगतकडे एकटक पाहू लागला. अभयचे वडील जेंव्हा म्हणाले, “काही झालं का? नाही म्हणजे आम्हाला खरच मदत हवी आहे. आमच्यासोबत जरा अपघातच झालाय, चमत्कारिक अपघात!”
ती व्यक्ति जराशी मागे सरकत गेली आणि तिघांच्याही चेहर्याकडे आळीपाळीने पाहत होती.
“त्या व्यक्तिला एकाएकी काय झालं…?” विशाखाने बाबांना विचारलं.
“काय माहीत अगं! विक्षिप्तचं दिसतोय.”
विशाखाने पर्समधून बिस्किटे काढली आणि दोघांना दिली. दोघे बिस्किट खात असताना काही वेळाने त्याच वृद्ध गृहस्थाने दोन तीन लोकांना तिथे आणलं. दूर उभा राहून या तिघांकडे हात करून तो इतर लोकांना काहीतरी सांगत होता.
विशाखाने ते बघितलं आणि तिला अस्वस्थ वाटू लागलं. ती आजूबाजूला बघू लागली. अभय अजून का आलेला नाही याची तिला चिंता वाटत होती. ती बाबांना खालच्या सुरात म्हणाली, “बाबा काहीतरी चुकत आहे. ती लोकं आपल्याकडे येत आहेत.”
अभयचे वडील त्या लोकांकडे बघत होते. त्यांनी येणार्या लोकांकडे बघून हास्य केलं आणि विशाखाला म्हणाले, “घाबरू नकोस बेटा. मी आहे ना. तू फक्त शांत रहा. जे घडलं आहे ते त्यांना सांगायचं आहे. आपण चुकीचे नाही आहोत. आणि लक्षात ठेव, हात सोडायचा नाही! कळलं ना स्वगत…?”
स्वगत जरा घाबरतच हो म्हणाला!
अभय पोलिस स्टेशन शोधत निघाला होता. गावात पोलिस स्टेशन सापडणे अवघड होतं पण एखादी चौकी तरी असेल असा त्याचा अंदाज होता. वाटेत एक दोघांना विचारत तो चौकी शोधत होता. पोलिस चौकी कुठे आहे विचारताच लोक चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे बघत होते. एका तरुण मुलीला त्याने पोलिस चौकी कुठं आहे हे विचारताच ती हसली आणि म्हणाली, “आता काय तक्रार करणार तुम्ही?” अभयला बोध लागला नाही. पण विचारत विचारत तो चौकीजवळ पोचला. चौकी कसली…? चांगलं पोलिस स्टेशन होतं ते.
अभय आतमध्ये गेला. आतमध्ये कोणीच नव्हतं. अगदी तुरुंगाचे दरवाजेही उघडे होते. एक जाडजूड पोलिस दिसणारे गृहस्थ सोफ्यावर तिरपे झाले होते. अभयला पाहताच ते सरळ झाले आणि मोठ्याने म्हणाले, “काय हवय रे?”
त्या आवाजानेच अभय जरासा दचकला. अतिशय खमका आवाज होता तो.
“साहेब जरा अडचणीत आहोत आम्ही.” अभय अदबीने बोलत होता.
“आम्ही?” साहेबांचा पुन्हा चढा आवाज.
“म्हणजे मी आणि माझं कुटुंब. माझे वडील, पत्नी आणि मुलगा. ते बाहेर बागेत बसले आहेत.”
त्या माणसाचा चेहरा अधिकच त्रासिक झाला आणि तो म्हणाला, “आज कसली आलीय अडचण. उद्या अक्षय तृतीय आहे. जाऊ द्या की!”
“अभयला काहीच कळत नव्हतं तो पोलिस काय बोलत होता ते. पण तो मात्र आपलं बोलणं पुन्हा एकदा विनम्रतापूर्वक सांगू पाहत होता.”
तेवढ्यात तो पोलिस स्वतःचं अवाढव्य शरीर सावरत सोफ्यावरून उठले आणि पोलिस चौकीच्या दरवाजात जाऊन उभे राहिले. बाहेरचा उत्साह, रोषणाई आणि आतिषबाजी बघत ते अभयकडे वळत म्हणाले, “बघा, काय सजले आहे गाव. सगळे आनंदाने प्रत्येक क्षण जगत आहेत आणि तुम्हाला आता कोणावर सूड उगवायचा आहे?”
अभयचा सुर जरासा वाढला आणि तो सलग बोलू लागला, “मी तुम्हाला सांगतोय की मी आणि माझं कुटुंब अडचणीत आहोत. हे गाव कुठलं आहे हेसुद्धा आम्हाला माहीत नाही. संध्याकाळी घाटातून गाडी चालवत असताना अचानक काहीतरी समोर आलं आणि आमची गाडी त्या जंगलात येऊन अडकली. गाव जवळ दिसताच आम्ही मदत मागायला आलो. आमचा आमच्या घरच्यांशी सुद्धा संपर्क होऊ शकत नाहीये. प्लीज साहेब समजून घ्या परिस्थिती! हात जोडतो.”
अभय जसा जसा सांगत होता तसा तसा तो पोलिस मागे वळत अभयकडे एकटक बघत होता. त्याचे डोळे विस्फारले गेले होते. तो सावकाश चालत चालत अभयकडे येत होता. अभयला धस्स झालं! आवाज चढवल्याने पोलिस रागावले की काय याची भीती त्याला वाटत होती. तो पोलिस अभयच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. अभय अंग चोरून उभा होता. तो पोलिस धीम्या सुरात म्हणाला, “म्हणजे तुम्ही इथले नाहीत?”
अभय सावकाश “नाही ओ!” असं म्हणताच त्या पोलिसाने हात वर केला आणि अभयचा हात हातात घेत म्हणाला, “माफ करा, माझी चूक झाली. मी जोरीवाड! स्टेशन इन्चार्ज. गावातील सर्व केस माझ्याअंतर्गतच येतात. तुम्ही बसा.”
त्यांनी लागलीच कोणालातरी फोन लावला आणि फोनवर बोलू लागले, “सर, आज बाहेरून काही मंडळी गावात आली आहेत. फॅमिली आहे. संकटात आहे.”
पलीकडून ती व्यक्ति काहीतरी बोलत असावी ज्याला जोरीवाडने हो सर, जी सर म्हणून उत्तर दिलं.
फोन ठेवल्यावर जोरीवाड हसत-हसत म्हणाला, “माफ करा. मी ओळखू शकलो नाही. तुम्ही आता निश्चिंत रहा. तुमचा प्रॉब्लेम उद्या सकाळपर्यन्त solve होऊन जाईल.”
अभयच्या जीवात जीव आला. त्याने लागलीच जोरीवाडचे आभार मानले आणि सहज म्हणून बोलू लागला.
“साहेब गावाचं नाव काय? मला तर तेही माहीत नाही. बाहेर कुठे दिसलं नाही.” अभयने विचारलं.
अभयकडे बघत जोरीवाडने सावकाश उत्तर दिलं, “सिलरा!”
“अच्छा…”
जोरीवाड पुढे बोलू लागले, “तुम्ही इथे आलात कसे…? सहसा इकडे कोण येत नाही. गाव जरा आडवाटेलाच आहे.”
अभयने सगळी हकीकत सांगितली. सांगतानाही तो प्रचंड घाबरलेला होता.
जोरीवाडने अभयला पाणी दिलं आणि म्हणाला, “होतं इथे असं कधी कधी.”
अभय आश्चर्याने म्हणाला, “नेहमी होतं?”
जोरीवाड लागलीच सावरसावर करत म्हणाला, “म्हणजे… घाट आहे न. तर प्रकाशाचे खेळ होत असतात. घाबरू नका, तुम्ही आता सुरक्षित आहात.”
अभयला लागलीच आठवलं आपलं कुटुंब तिकडे बसलेलं आहे. तो जागेवरून उठला तोच गडबडीत जोरीवाडही उठला आणि म्हणाला, “कुठे… जातात साहेब?”
अभय गडबडीत म्हणाला, “तुम्हाला सांगितलं नाही का, माझे वडील, पत्नी आणि मुलगा तिकडे एकटेच आहेत.”
जोरीवाड जरा धीर दिल्यासारख बोलत म्हणाला, “तुम्ही बसा, मी पाठवतो कोणालातरी. काय, आता गावप्रमुख येतील तेंव्हा तुम्ही असले पाहिजेत न. कारण तुमची सगळी सोय ते करतील.”
“हो” अभयने समर्थन दिलं. पण अभयला त्या पोलीसाचं वागणं जरा खटकू लागलं होतं. पण माणूस जेंव्हा सुरक्षिततेच्या कोशात असतो तेंव्हा त्याला समोर घडणार्या विचित्र घटनाही दुर्लक्षित करण्याची सवय असते.
अभय आणि जोरीवाडचा संवाद सुरू असताना उघड्या असलेल्या तुरुंगात बसलेला एक माणूस ते सगळं लक्षपूर्वक ऐकत होता.
तिकडे अभय पोलिस जोरीवाडशी संवाद साधत असताना काही गावकरी अभयचे वडील, विशाखा व स्वगत जवळ आले होते.
“काय मदत हवीय का काका?” त्यांच्यातील एकाने विचारलं.
अभयच्या वडलांनी सगळं खरं-खरं सांगितलं. सोहम किंवा इतरांना बोलून परतायची सोय व्हावी यासाठी ते गावकर्यांना विणवू लागले.
गावकर्यांना अंदाज आला काय झालं आहे याचा. त्यांच्यातील एकाने दुसर्याला इशारा केला आणि तो माणूस कुठेतरी निघून गेला. कदाचित कोणालातरी हे सांगण्यासाठी.
त्यांच्यातील एकाने दिलासा दिला, “घाबरू नका काका. आता तुमचं कुटुंब म्हणजे गावाची जबाबदारी आहे. तुम्ही निश्चिंत रहा. आमचे गाव प्रमुख तुमची सगळी सोय लावतील. उद्या सकाळपर्यंत सगळं ठीक होईल.”
अभयचे वडील अन विशाखाला त्या शब्दांनी मोठी ताकत मिळाली.
विशाखाने न राहवून विचारलं, “आज एवढा उत्सव कसला होत आहे?”
गावकरी एकमेकांकडे बघू लागले. त्यांच्यातील एकाने म्हंटलं, अक्षय तृतीयेच्या आदल्या रात्री आमच्याकडे असाच उत्साह असतो.
विशाखाने “वाह! मस्त” म्हणत कौतुक केलं. पण लागलीच ती पुढे म्हणाली, “आम्हाला तर गावाचं नावही माहीत नाही हो…”
“सिलरा” दोघा तिघांनी उत्तर दिलं.
काही वेळाने गावकर्यांनी विशाखा, अभयचे वडील व स्वगतला पोलिस स्टेशनकडे नेलं. तिथे कुटुंबाची पुन्हा भेट झाली आणि एकमेकांना सुरक्षित बघून ते आनंदी झाले.
अभय म्हणाला, “घाबरण्याचं कारण नाही. आज रात्री आपल्या मुक्कामची सोय त्यांनी केली आहे. उद्या सकाळी आपल्याला ते गाडीपर्यंत सोडतील.”
हे बोलताच जोरीवाड व इतर काही गावकरी एकमेकांकडे बघत जरा खाणाखुणा करू लागले.
गावप्रमुख आले आणि त्यांनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला. सर्वांची राहायची सोय केल्याचं सांगितलं. सर्वांना त्यांच्या राहण्याच्या जागेकडे ते स्वतः घेऊन गेले. त्यांच्यासोबत इतकी माणसं आणि जोरीवाड का होते हे मात्र अभयला उमगलं नाही.
एका मजबूत वाड्यात त्यांची राहायची सोय केली होती. खायला-प्यायला सगळे जिन्नस आणून दिले होते. सगळं मजेत सुरू होतं. विचारपूस करून गावप्रमुख निघून गेले आणि जाता-जाता जोरीवाडला दटावून गेले की पाहुण्यांकडे लक्ष द्या.
अभयचे वडील आणि विशाखा आदरातिथ्याने भारावून गेले होते. मात्र, अभयला संशय यायला सुरुवात झाली होती.
tbc…
abhishek buchake
© 2020, ||-अभिषेकी-||. All rights reserved.
Leave a Reply
Be the First to Comment!