शेअर बाजार मराठीत || मराठी गुंतवणूकदार || Share Market Investment
काही दिवसांपूर्वी Wipro, ITC आणि Infosys या शेअर्समधील दीर्घकालीन गुंतवणूकीमधून अनेक पटीने मिळालेल्या परताव्याबद्दल माहिती पोस्ट केली होती. काही हजारांचे कितीतरी कोटी परतावा मिळाल्याची वस्तुस्थिती त्यात मांडली होती. त्यावर काहींनी अगदी रास्त प्रश्न विचारला होता की असे किती गुंतवणूकदार असतील ज्यांनी इतका काळ तो शेअर होल्ड केला असेल किंवा त्याकाळी शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसा तरी उपलब्ध होता का वगैरे. हे प्रश्न बरोबरच आहेत. पण त्याकाळी शेअर बाजारातील गुंतवणूक याबाबत जागरूकता नव्हती आणि गुंतवणूक करण्याचे मार्गही कठीण होते. पण आज ती अवस्था नाही. सध्या एका क्लिकवर डिमॅट अकाउंट सुरू होतं आणि इंटरनेटवर माहितीचा खजिना हाताशी आहे. सोबतच माहिती देणाऱ्यांची आणि सल्लागार मंडळींचीही कमी नाही. आधीच्या पिढीला ते शक्य झालं नसेल पण आजच्या काळात हे शक्य आहे. संपत्तीनिर्मितीची ही संधी तुम्हाला मिळतेय ती सोडू नका!
Wipro, ITC वगैरे उदाहरणे अशासाठी आहेत की आतातरी दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार करावा. चांगला बिजनेस असलेल्या, चांगलं भवितव्य असलेल्या, चांगली मॅनेजमेंट असलेल्या हळूहळू SIP पध्दतीने आपल्या पोर्टफोलिओत जमा कराव्यात. आज खरेदी करून उद्या विकून टाकले असं करण्यापेक्षा निश्चित ध्येय असणं आवश्यक आहे.
चांगल्या कंपन्या निश्चितच खूप चांगला परतावा देऊ शकतात हे या सर्व उदाहरण देत असताना अधोरेखित करायचं असतं.
हे सगळं आज सांगायचं निमित्त म्हणजे टाटा स्टील (Tata Steel) ने दिलेला परतावा. तसं तर गेल्या वर्षात अनेक शेअर्सनी दोनपट/तीनपट परतावा दिला आहे पण मेटल सेक्टरने दिलेला परतावा विशेष आनंद देणारा आहे. कोविडपूर्वी हे क्षेत्र मंदीच्या कचाट्यात सापडलं होतं.

त्यात अमेरिका-चीन ट्रेड वॉर यामुळे खूपच नकारात्मक परिणाम झाला. पण दोन ते तीन वर्षानंतर मेटल क्षेत्र चमकदार कामगिरी करत आहे. काही काळ तरी ही तेजी चालू राहील असं दिसत आहे. असो! मुख्य मुद्दा लक्षात घ्यायचा म्हणजे “Class Never Goes” जो चांगला शेअर आहे तो निश्चित परतावा देतो. सबुरीने घेतलं आणि होल्ड करायची तयारी असेल तर Equity Market मध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीत उत्तम परतावा मिळतो हे तुम्ही स्वतः बघाल.
(टीप- या शेअर अथवा सेक्टरमध्ये गुंतवणूक सल्ला नाही. अभ्यासासाठी हा सारा लेखाजोखा!)