आज जगभरातील देशांकडे आधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान बघायला मिळत. भारताकडेही अग्नि, ब्रम्होस सारखी अनेक अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहेत. मात्र, या आधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाला विकासीत होण्यास म्हैसूरचा राजा हैदर अली आणि त्याचा मुलगा टीपू सुलतानचे मोठे योगदान आहे. या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा वापर पहिल्यांदा अंग्लो-मैसूर युद्धादरम्यान बघायला मिळाला होता. टीपू सुलतानने हे क्षेपणास्त्र ब्रिटीशांविरोधात वापरून त्यांना नाकीनऊ आणले होते. त्याच्या क्षेपणास्त्राला इतिहासात ‘म्हैसुरीयन रॉकेट्स’ म्हणून ओळखले जाते. काय होते हे ‘म्हैसुरीयन रॉकेट्स’, या रॉकेट्सचा वापर अंग्लो-मैसूर युद्धात कसा केला आणि आधुनिक काळातील क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये टिपू सुलतानचे योगदान काय होते, जाणून घेऊया.
म्हैसुरीयन रॉकेट्स एक भारतीय सैन्य हत्यार होते. हे रॉकेट पूर्वी वापरलेल्या रॉकेटपेक्षा कितीतरी अधिक अचूक मारा करायचे आणि ते तेवढेच विनाशकारीही होते. हैदर अली आणि टीपू सुलतानने या रॉकेटचा वापर ब्रिटिशांविरोधात झालेला युद्धांमध्ये केला. तेव्हा ब्रिटीशांना या तंत्रज्ञानाची माहिती झाली. या माहितीचा वापर सर व्हिलीयम कॉंग्रेव्ह यांनी 1805मध्ये त्यांच्या रॉकेटचे डिझाईन बनवताना केला.
हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान दोघांनीही या रॉकेटचा वापर अंग्लो-म्हैसूर युद्धादरम्यान ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरोधात मोठ्या प्रभावीपणे केला. या रॉकेटच्या एका टोकाला तलवार बांधण्यात येत असे. तसेच या रॉकेटचे पाईप लोखंडचे असायचे. त्याकाळी ब्रिटीशांकडेही रॉकेट होते. मात्र, त्यात लोखंडाचा वापर होत नव्हता. रॉकेट बनवताना त्यात लोखंडाचा वापर जगात पहिल्यांदा टीपू सुलतानाने केला. या रॉकेटची मारक क्षमता 2 किलोमीटरपर्यंत होती. तर याची लांबी 12 ते 14 फुट असायची आणि प्रत्येक रॉकेटमध्ये पोटॅशियम नायट्रेट, चारकोल आणि मॅगनेशियम पावडरचा वापर केला जायचा. हे रॉकेट विकसित करण्यासाठी टीपू सुलतानाने बंगरुळूमध्ये प्रयोगशाळादेखील उभारली होती. 1798-99 मध्ये झालेल्या चौथ्या अंग्लो-म्हैसूर युद्धादरम्यान श्रींगेरीपट्टनम येथे झालेल्या लढाईत टीपू सुलतानचा मृत्यू झाला. त्यानंतर श्रींगेरीपट्टनम येथून 700 तयार रॉकेट्स आणि 9 हजार रिकामे रॉकेट ब्रिटीशांनी जप्त केले.
या युद्धानंतर रॉयल आर्सेनलने 1801 मध्ये म्हैसूर रॉकेट तंत्रज्ञानाच्या आधारावर लष्करी रॉकेट संशोधनाची मोहीत हाती घेतली. त्याने म्हैसूरमधली काही रॉकेट संशोधनासाठी ब्रिटनला नेली. त्याचा पहिला रिपोर्ट त्याने 1805 मध्ये सादर केला. या रिपोर्टच्या आधारावरच सर व्हिलीयम कॉंग्रेव्ह यांनी कॉंग्रेव्ह रॉकेटची निर्मिती केली. ज्याचा वापर ब्रिटीशांनी अनेक युद्धांमध्ये प्रभावीपणे केला.
आज आपण जगभरात जी अत्याधुनिका क्षेपणास्त्र बघतो, त्याची मुळ संकल्पना ही टीपू सुलतानच्या रॉकेटमधून घेतली आहे. त्यामुळे आधुनिक काळातील क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये टिपू सुलतानचे योगदान होते हे आपण नक्कीच म्हणू शकतो.