भस्माचा डोंगुर…

भस्माचा डोंगुर…

भारत देश हा अनेक आख्यायिका आणि कथांनी भरलेला आहे. अशी कितीतरी गावे अन ठिकाणे सापडतील की ज्याला काहीतर आख्यायिका किंवा कथा आहे. अनेक स्थळे अशी असतात जेथे सत्य-असत्य, आधुनिकता-आख्यायिका, श्रद्धा-अंधश्रद्धा, प्रतिगामी-पुरोगामी, पुराण-विज्ञान अशा गोष्टीना स्थान नसतं. कथा अन आख्यायिका ह्या भारतातील प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनु पाहतात; काही जण त्याचा आदर करून त्याच्यापुढे विलीन होतात, काही त्याच्यामागची रहस्य हुडकू पाहतात, काही गैरअर्थ काढतात, काही विरोध करून पुढे जातात. प्रत्येकाने काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार असतो.

कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यात गाणगापूर येथे श्री दत्त महाराजांचं देवस्थान आहे. देवस्थान आहे, पण जागरूक आहे अस भाविक अन तेथील पुजारीही सांगतात. जागरूक असलं तरी सामान्यांच्या अन ‘स्पेशल’ अशा दोन रांगा असतात. देव जागरूक असेल तर आनंद आहे, तो तरी हे बघत असेल एवढी अपेक्षा आहे. भाविकच्या मनातील भक्तीने देव श्रीमंत होत असतो आणि त्याच्या खिशातील पैशाने देवस्थान! असो.

गाणगापूर येथे जाण्याचा योग आला. दर्शन वगैरे आटपल्यावर (आपटल्यावर?) तेथून जवळच असलेल्या ‘भस्माचा डोंगर’ या पौराणिक भागाविषयी ऐकण्यात आल आणि तेथे चक्कर टाकली. भस्माचा डोंगुर याचा अर्थ सरळ आहे एक डोंगर जो भस्माणे तयार झाला असावा. मनात वेगवेगळ्या प्रतिमा तयार होत होत्या, तेथे गेलो अन सगळं मनातच राहील.तेथे डोंगर वगैरे तर दिसला नाही, भस्म तर लांबच राहील, पण दिसली ती गरीबी!

एक बाई साधं टपराड दुकान टाकून बसली होती, त्यात एका पिशवीत पाव विकत होती. दहा रुपयाला पावाची पिशवी घेतली अन विचारलं, याच काय करायचं? त्या बाईने सांगितलं की वाटेतील भिकार्‍यांना वाटायचं.बरं आहे! निदान येथे तरी माणसांचा विचार झाला. असो. वाटेत अनेक भिकारी झोपड्या करून भिकेच्या प्रतीक्षेत बसले होते. काही काही तर चांगल्या घरचे वाटत होते. पाव वाटले अन समोर एका विरान जागेवर पोचलो, विचारलं कुठे आहे डोंगर? तर हाच डोंगर आहे अस कळलं. सगळीकडे खड्डे होते, लोकांनी भस्म म्हणून सगळी माती खणून नेली होती.

तेथील मातीपिशवीत टाकली अन तेथेबसलेला माणूस म्हणाला की एकडून फिरून जा. जाताना थोडी माती अन काहीतरी दक्षिणा समोर असलेल्या दत्त मंदिरात ठेवायला सांगितली. त्याने सांगितलं तस केल आणि दक्षिणा ठेवत असताना तेथील सर्व भिकारी आमच्याकडे पाहत होते. दक्षिणा ठेऊन फोटो काढत उभा होतो आण सगळे भिकारी एकमेकाकडे पाहत होते; कदाचित माझ्या जाण्याची वाट पाहत असावेत. त्यातील एकाने शेवटी धाडस करून माझ्यासमोर त्या मंदिरात ठेवलेली दक्षिणा घेतली.

भस्माचा डोंगर म्हणजे पुरातन काळी ऋषिमुनींनी किंवा राजांनी विविध यज्ञ, तप साधना करताना राहिलेली राखेचा डोंगर तयार झाला असावा (त्यामुळेच त्याला तपोभूमी म्हणत असावेत) आणि ती पवित्र राख लोक घरी नेत असत. खर तर ही अतिशय पुरातन गोष्ट आहे, येथे जोभस्माचा डोंगर तयार झाला होता, तो तर केंव्हाच तयार झालाआहे, आता उरली आहे ती साधी जमीन जी भाविक उकरून नेट आहेत. एक गोष्ट मानली पाहिजे की, त्या भूमीत काहीतरी वेगळं होत जेणेकरून त्याच भूमीत दत्तांच देवस्थान आहे, लोक तेथील भस्म नेत आहेत. तेथील जमिनीत कदाचित काहीतरी विशिष्ट पदार्थ किंवा रसायनं असतील ज्यामुळे त्या मातीला वेगळं महत्व आल असेल. आज त्या मातीचा काही उपयोग आहे अस वाटत नाही. वैज्ञानिकांनी त्या मातीच सर्वेक्षण आणि चाचणी केली पाहिजे, त्यात चांगले-वाईट काही घटक आहेत का याचा शोध घेतला पाहिजे.

कुठलीही गोष्ट चिरंतर टिकणारी नसते. भूतकाळात त्या जमिनीत काहीतरी विशेष असेलही, पण आज असेलच अस नाही. कालानुरूप त्या गोष्टी लोप पावल्या असतील याची जान सर्वांनी ठेवली पाहिजे.जगातील प्रत्येक गोष्टपरमेश्वराने निर्मित केली असेल तरी तो ती नष्ट करतोच हा नियम आहे. त्या जागेची क्षमताही आता नष्ट झाली असेल. श्रद्धा. भावना अन मान्यता ठीक आहेत, पण त्या काळी आपल्या महत्म्यानी जो दृष्टीकोण ठेऊन नियम-शिकवण घालून दिल्या होत्या त्याची ओळख आज कळली पाहिजे. चुकीच्या गोष्टींचं अंध अनुकरण सोडून खरी श्रद्धा जपली पाहिजे.

© 2014 – 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!