एकांत…

एकांत…

“एकांत – इतिहास की गुंज” हा Epic TV चॅनल वरील आणखी एक वैशिष्टपूर्ण कार्यक्रम. भारत हा देश अनेक कथांनी ‘ग्रासलेला’ एक देश आहे. येथे प्रत्येक गावाची एक कथा असते, प्रत्येक जागेची एक कथा असते.भारताच्या कानाकोपर्‍यात अशा अनेक कथा, ज्यांना एक पौराणिक महत्व आहे, एक वैशिष्टपूर्ण इतिहास आहे आणि आहेत त्याभोवती रंगवल्या गेलेल्या कथा.देशात कुठलाही जिल्हा घ्य, त्या जिल्ह्यात एकतरी अशी जागा असेल की जेथे ‘जाण्यास मनाई आहे’ अस तेथील गावकरी घाबरत सांगत असतात. अशी अनेक ठिकाणे आहेत, जी एकेकाळी माणसांच्या अन पैशाच्या श्रीमंतीनेगजबजून गेली होती, त्या जागेची एक शान होती, एक दरारा होता पण काळाच्या ओघात ती ठिकाणे आता केवळ एक पडकी वास्तु म्हणून ओळखल्या जातात, जेथे माणसे राहत नाहीत आणि जातही नाहीत. ही ठिकाणे आता केवळ जुन्या-जाणत्यांच्या चर्चेचा विषय, लहाणग्यांच्या कथेचा विषय आणि तरुणांच्या औत्सुक्याचा अन थराराचा विषय म्हणून शिल्लक आहेत. तेथे असते ती भयाण शांतता, नैराश्यचे गाणे, अपरिचित इतिहासाच्या खुणा आणि नकोसा एकांत!
                एकांत हा कार्यक्रम अशाच काही वास्तूंचा इतिहास आपल्यासमोर घेऊन येत असतो. अकुल त्रिपाठी हा निवेदक आपल्याला त्या एकांताची आपल्याशी ओळख करून देत असतो. तेथे अशी नेमकी काय घटना घडली होती, काय अघटित झालं होत जेणेकरून त्या गजबजलेल्या जागेची ‘शापित जागा’ म्हणून ओळख रूढ होऊ लागली. माणूस हा नेहमीच अज्ञाताला घाबरत आला आहे, आणि घाबरत-घाबरत का होईना त्या अज्ञाताचा पाठलागही करत आला आहे. अज्ञात गोष्टींच्या भोवती गुंफल्या जातात त्या गूढ कथा ज्यात सत्य-असत्य किती असत याला केवळ ती वास्तु साक्षीदार असते. अशा अनेक वास्तूंच्या रहस्यांचा मागोवा घेण्याच काम ‘एकांत’ या मालिकेतून केल जात.
                  मालिकेचा विषय तर अतिशय उत्कंठावर्धक आहे. आपण Discovery किंवा History चॅनल वर अशा अनेक गोष्टी पाहत असतो, पण त्यातील अनेक ह्या आपल्या मातीतील नसतात; येथे प्रत्येक गोष्ट ही आपल्या मातीतील आहे, आपल्या देशातील आहे त्यामुळे ह्याच मोल काही वेगळच आहे. आपल्या देशात असून अशा जागांची आपल्याला माहिती नसणं आणि त्याहूनही महत्वच म्हणजे त्याची कदर नसणं हे आपल्या संस्कृतीला धोकादायक आहे. याच Documentation होण गरजेचं असत जे ह्या मालिकेच्या माध्यमातून होत आहे.
                   या मालिकेत आपण पाहिलं आहे राजस्थान मधील कुलधारा गाव (ज्याला अतिरंजित करून काही माध्यमे दाखवत असतात) जेथे एका रात्रीत संपूर्ण गाव एकाएक ओस पडत! त्याबाबतीतच्या विविध कथा अन वैज्ञानिकांचे दावे हे त्या भागात दाखवले होते. खूप रंजक भाग! त्यानंतरच्या भागात होत एक ऐतिहासिक आणि रक्तरंजित किल्ला (महाल), कारगिल गावाजवळ. तेथे होत्याच नव्हतं करणारे आपलेच लोक होते, तेही काही ठोस कारणांशिवाय. मस्तच! त्यानंतरच्या भागात अंदमान बेटांपैकी एक बेट (जे कधी सुभाषचंद्र यांच्या अखत्यारीत होत) जेथे भारतीय स्वातंत्र्यसैनिकांना कैद केल जायचं, छळल जायचं. तेथे नेमकं काय झालं, त्याचा इतिहास-भूगोल आणि कही-सुनी सांगितलेली.  त्यानंतरचा भाग तर खरचं विचार करायला भाग पाडणारा होता. तलक्कड आणि माळांगी या कर्नाटकस्थित गावातील घटनेवर आधारित. अचंबित करणार्‍या गोष्टी या भागात होत्या. अशा गोष्टी तर आपण अनेक गावांत अनेकदा ऐकल्या असतील, पण ही काही वेगळी होती. एका स्त्रीचा शाप, कावेरी नदी, निर्वंश झालेला एक राजवंश, एक गाव जे राजस्थानातील रेतीसारख्या रेतीत गाडलं गेल. खरच मनोरंजक अन अचंबित करणारी कथा.
                      ज्या लोकांना इतिहासाची आवड आहे, कथा ऐकण्याची ओढ आहे, रहस्यावर विचार करण्याची सवय आहे आणि अशा जागांना भेट द्यायची रग आहे त्यांनी ही मालिका बघितलीच पाहिजे.

© 2014 – 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.

Leave a Reply

Be the First to Comment!

Notify of
avatar
wpDiscuz
error: Content is protected !!