आपल्याला जर आपल्या रचना, संकल्पना, मत येथे मांडायचं असेल किंवा कुठलीही जाहिरात ह्या संकेतस्थळावर करायची असेल तर latenightedition.in@gmail.com यावर संपर्क करावा!

Tag: चित्रपट

एक हजाराची नोट

एक हजाराची नोट

#मराठीचित्रपट  }{ Ek Hazaraachi Note  }{  भावस्पर्शी  }{   अप्रतिम कलाकृती  }{

पंतप्रधान मोदींनी नुकतीच नोटबंदीची घोषणा केली. त्या निर्णयाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. त्याचे जे चांगले-वाईट परिणाम व्हायचे आहेत ते येणारा काळ ठरवेल. आजच एक मराठी चित्रपट बघितला. त्याचं नाव होतं ‘एक हजाराची नोट’. एरवी हा चित्रपट बघितला असता तर त्यात विशेष काही नव्हतं, पण नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट विचार करायला भाग पाडतो अन एका वेगळ्याच अवकाशात नेऊन ठेवतो.

गोष्ट आहे एका म्हातारीची. विदर्भात राहणारी एकटी म्हातारी.  तिचं नाव बुढी! एक गरीब म्हातारी, जिच्या तरण्या शेतकरी पोराणं आत्महत्या केलेली असते. मग उरलेलं आयुष्य ती एकट्याने पुढे ढकलत असते. निराधारपणे पण समाधानाने ती जीवन जगत असते. तिच्या शेजारी राहणारा सुदामा हा तिला पोरसारखाच असतो. त्या कुटुंबाच्या साथीने ती जगत असते. कधीतरी अगदी दोन रुपये घालून चहा पिणे यातच तिला आनंद असतो. जीवन असच चालू असतं, पण आयुष्य एक महत्वाचं वळण घेतं. निवडणुकीच्या निमित्ताने गावात एक पुढारी येतो अन सर्वांना पैसे वाटत असतो. सुदामा त्या बुढीची करूनकहाणी नेत्यापर्यंत पोचवतो आणि तो नेता निवडणुकीचा काळ म्हणून सहानुभूती दाखवत तिला एक हजाराच्या पाच नोटा वाटतो. मग त्या म्हातारीच्या आयुष्याला एक कलाटणी मिळते. सगळ्या गावात बोभाटा होतो. नेहमी दोन रूपयांचा गूळ, दूध देणारे तिला पैसे मिळाले म्हणून वेगळी वागणूक देतात. त्या बुढीलाही पैसे खर्च करून टाकायचे असतात. त्यासाठी ती सुदामाला घेऊन तालुक्याला जाते. तेथूनच सुरू होतो दुर्दैवाचा खेळ!

चित्रपटाची मांडणी अतिशय सरळ आणि साधेपणाने आहे. लेखक-दिग्दर्शकाला कथा थेटपणे सांगायची असल्याने विनाकारण कसलेही अडथळे येत नाहीत. कथेबाबतीत स्पष्टपणा असल्याने चित्रपट कुठेच कंटाळवाणा होत नाही. टप्प्याटप्प्याने घडत जाणार्‍या घटना ह्याच चित्रपटाला एका आशयासहित पुढे घेऊन जात असतात. बुढीचं पात्र साकारणार्‍या उषा नाईक यांनी उत्तम अभिनय केला आहे. गरीब, बिचारी, निराधार आजीची भूमिका त्यांनी खणखणीतपणे बजावली आहे. एक-एका सीनमध्ये चेहर्‍यावरचे भाव तर थेट काळजाला भिडणारे आहेत. त्यात संदीप पाठक नावाच्या अवलियाने सुदामाची भूमिकाही सुरेख उमटवली आहे. नेहमी वेगवेगळ्या भूमिकेतून सर्वांना हसवणारा संदीप सुदामा म्हणून चांगुलपणा घेतो अन कुठेतरी मनाला चटकाही लावून जातो. बाकी उत्तमराव जाधवच्या भूमिकेतील गणेश यादव अन पोलीसाच्या भूमिकेतील श्रीकांत यादव यांनीही खलनायकी ठसा चांगलाच उमटवला आहे.

Related image

शहरातील माणूस रोज हजारांची उधळण करत असतो. केवळ सिगार, सुपारीवर दिवसाला शेकड्यावर खर्च करणारे असतात. पण एकेकाची परिस्थिती अशी असते की चहा पिण्यासाठीही पैसे जमा करावे लागतात. रोजच्या जगण्यासाठी संघर्ष अटळ असतो. त्यात चार सहानुभूती अन आपुलकीचे शब्दच मोठा आनंद देऊन जातात. ही बुढीही तशीच परिस्थितीने गांजलेली आहे. पण जेंव्हा ती गूळ मंदीरासमोरील मुंग्यांना ठेवते तेंव्हा मनात कालवाकालव होते. ज्या लोकांना कशाशी काहीच देणं-घेणं नसतं त्या लोकांसमोर नेते भाषणं ठोकून जातात. केवळ जेवायला मिळेल म्हणून जमा होणार्‍या गर्दीसमोर देशाचे प्रश्न मांडतो तेंव्हा आपलीच लाज वाटते. केवळ जेवणाकडे डोळे लावून बसणारी जनता हेच देशाचं खरं वास्तव आहे. त्यांना आपण काय समजावून देऊ शकतो. अशा म्हातारीच्या हातात जेंव्हा हजाराची नोट येते तेंव्हा तिचं विश्व एकाच वेळेस, पण विविध संदर्भात आकुंचन आणि प्रसरण पावतं. तिच्याकडे हजाराची नोट आल्याचं समजल्यावर नेहमी दोन रूपयांचा गूळ देणारा दुकानदार तिला नकार देतो. तिच्या आयुष्याचे संदर्भ बदललेले असतात. रात्री झोपताना आठवणीने दरवाजा लावला आहे का तपासताना आपल्याला तिच्या मनातील कल्लोळ जाणवतो. गरीबाला त्या हजार रूपायाचंही किती अप्रूप असतं. तालुक्याला गेल्यावर तिला त्या हजाराच्या नोटेचं चिल्लर मिळत नाही. मुळात तिच्यासारख्या दरिद्री, खेडूत म्हातारीकडे हजार रुपयांची नोट असूच कशी शकते हाच मुख्य प्रश्न असतो इतरांना.

थोडं विषयांतर म्हंटलं तर, आज सरकार दोन हजारांच्या नोटा वाटत आहे, पण गरीब माणसाला त्याचा जराही उपयोग नाही. कशातरी फाटक्या नोटा अन चिल्लर गोळा करून त्यावर जीवनाचा गाडा पुढे ढकलणारे आपल्या देशात अजूनही अस्तीत्वात आहेत याचं भानच राजकीय मंडळींना राहिलेलं नाही. हजारभर रुपयांत आयुष्यभराची स्वप्नं पूर्ण करायची हौस त्यांच्यात असते. हातात कधीतरी आलेल्या पैशात आभाळभरून सुख मिळवायची त्यांची तयारी असते. पण प्रस्थापित व्यवस्थेत त्यांचं हे सुखही हिरावून घेण्याचा क्रूरपणा असतो. त्यांच्यासारख्या गरिबाचा वापर करून पोलिसांसारखी भ्रष्ट अन सडकी प्रशासकीय यंत्रणा केवळ गरिबाचं सुखच हिरावून घेत नाही तर त्यांच्या जीवनाची आसही शोषून घेत असते. पदाला असलेल्या अधिकाराचा माज दाखवत, गैरवापर करत गरीबांना लुटायचा खुला तमाशा चित्रपटातून उलगडण्यात आला आहे. त्या बुढी अन सुदामाची निष्कारण झालेली होरपळ खरच बघवत नाही. श्रीमंतांच्या दृष्टीने किरकोळ असलेल्या पैशात ते स्वर्ग मिळवत असतात अन त्याच जगाचा चकनाचूर होतो अन त्यांच्या गरीबीचे धिंडवडे निघतात. आपण कुठल्या देशात राहतो असा प्रश्न क्षणभर डोळ्यासमोर उभा राहतो. हराम मार्गाने आलेला पैसा पचत नाही हेच शेवटी त्यांच्या मनावर कोरलं जातं. लक्ष्मी आपल्या गरिबाच्या घरी राहत नसते असं त्यांना वाटत राहतं.

एक हजाराची नोट हा चित्रपट बरच काही देऊन जातो. चार-सहा रुपयांवर आयुष्य जगणारी जमात ह्या देशात राहते हे बघून मन स्तब्ध होतं. नोटबंदी वगैरे निर्णय घेताना ह्या लोकांना कोणीही लक्षात घेत नसावं. बुढीच्या आयुष्यावर सतत दया येत असते. पण त्यातही इतरांना काहीतरी देण्याचं अन सुख वाटण्याचं काम समाधानानं करताना कोणालाही आपल्या मोठेपणाची लाज वाटेल. शेवटाला पोलिसाने दिलेले त्याचे पन्नास रुपयेही ती म्हातारी तसेच ठेऊन गरिबीतही असलेला स्वाभिमान दाखवून पोलिसाला त्याची जागा दाखवते. गावाकडून येताना आनंदानं नदीत टाकलेलं नाणं आणि परतत असताना पीडेने टाकलेली हजाराची नोट यातच सर्व मानवी भावनांचा स्फोट उलगडला जातो. उषा नाईक यांच्या रूपाने ती बुढी मनाला घरघर लाऊन जाते तर संदीप पाठक सुदामाच्या रूपाने इतरांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देऊन जातो.

श्रीहरी साठे हा संवेदनशील मनाचा माणूस असल्याशिवाय अशी कलाकृती करू शकत नव्हता. त्याच्या ह्या प्रयत्नाला सलाम! सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या नजरा बद्ध करून ठेवणारा कॅमेरा चांगलाच बोलका आहे. संगीतही ठीकठाक म्हणावं लागेल. पण भावुक कथेपुढे हे दुय्यम म्हणावं लागेल. कथा संपताना हुरहूर लागून राहते. शेवट काहीतरी गोड होईल ह्याच आशेने प्रेक्षक सर्व अनाचार बघत असतो. पण त्यात त्याची पुरती निराशा होते. चित्रपट करूनामय दुखाने संपतो. शेवटी गरीब-पीडित तसाच किंबहुना त्याहून पीडलेला असतो. हे मनाला अस्वस्थ करणारं असतं.  लेखक-दिग्दर्शक जे सांगायचं आहे ते मोजक्या पण प्रभावी पद्धतीने मांडतो. काही वर्‍हाडी संवाद सोडले तर चित्रपटात काहीच कृत्रिम जाणवत नाही.

नदीच्या संथ पाण्याप्रमाणे चित्रपट पुढे जात असतो. अचानक कुठेतरी डबकं, कुठेतरी झरा, कुठेतरी धबदबा बनून तो शेवटाला पोचतो. शेवटाला एक म्हातारा बुढीला त्याच्या मेलेल्या पोराचा नीट करायला टाकलेला फोटो परत करतो तेथे संवेदनशीलतेचा अविष्कार जाणवतो. बटाव्यातून काढलेल्या पाचच्या फाटक्या नोटा अन चिल्लर यांचं मूल्य त्या फुकटात संकट घेऊन आलेल्या हजाराच्या नोटेपूढे प्रचंड महान असतं…

एक हजाराची नोट… एक संवेदनशील कलाकृती

हूल – भालचंद्र नेमाडे

अभेद्य किल्ला!

अभेद्य किल्ला!

किल्ला  || मराठी चित्रपट  || जाणिवांचा समुद्र  || संवेदना  ||  पौगंडअवस्था  || एकटेपणा

जेमतेम दीड तासांचा हा चित्रपट, पण त्याने लहानपणीच्या विश्वातील अनेक आठवणींना अलगदपणे स्पर्श केला. जणू काही जुना फोटो अल्बम डोळ्यासमोरून जात होता. यातील प्रसंग जरी वेगळे असले, संदर्भ जरी वेगळे असले तरी तो एकटेपणा आयुष्याच्या त्या टप्प्यावर गाठल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाच्या मनातील दडलेल्या अन अधूनमधून उचमळून येणार्‍या, वाहत येणार्‍या बालपणाला करून दिलेली वाट म्हणजेच हा चित्रपट!!! एक मनमोहक अनुभूती!!

शांततेचाही एक आवाज असतो; कोणाला हवाहवासा अन कोणाला कर्कश्य वाटणारा असा आवाज. तो आवाज नेहमीच बुद्धासारखी स्थिरता देणारा किंवा अंतर्मुख करणारा नसतो, तर कधीकधी तो इतका कर्कश्य होतो की त्यापेक्षा गोंगाट हवाहवासा वाटू लागतो. असे शांततेचे प्रतिध्वनी किल्ला हा चित्रपट पाहिल्यावर मनात घुमत राहतात.

आयुष्यात एकटेपणाइतका क्रूर सोबती कोणीही असत नाही. एकवेळ असंगाशी संग बरा वाटतो पण एकटेपणाशी संग झाला तर आयुष्याचा वाळवंट होण्यास वेळ लागत नाही. अशाच एकटेपणाची हुरहूर अनुभवायला लावणारी कलाकृती म्हणजे किल्ला हा चित्रपट!

एक मध्यमवयीन नौकरी करणारी स्त्री आपल्या एकुलत्या एक, सातवीत शिकणार्‍या मुलाला घेऊन कोंकणात येते, किंबहुना नौकरीत बदली होते म्हणून अपरिहार्यपणे तिला पुण्याहून कोकणातील एका छोट्याशा खेड्यात यावं लागतं. ह्या स्त्रीने वर्षभरापूर्वीच आपला नवरा अन त्या मुलाने आपला पिता गमावला आहे. अशा भावनिक पातळीवर एकटेपणाच्या परिस्थितीत ते दोघे एका नवीन ठिकाणी येऊन राहत आहेत.

एकटी स्त्री एका किशोरवयीन मुलाला घेऊन एका परक्या शहरात येते, तेथे नौकरी करते अन नुकताच झालेला आघात विसरायचा प्रयत्न करत असते. कामानिमित्त झालेली बदली ही तिला कदाचित हवीहवीशी वाटत असते. नवीन ठिकाण जुन्या आघातांचे घाव भरून काढेल असा तिचा अंदाज असतो. पण त्यासोबत येणार्‍या जबाबदार्‍या पेलणे तितकं सहज नसतं. एका बाजूला ती काळाचे घाव विसरून नव्याने आयुष्याला सुरुवात करायचा प्रयत्न करत असते पण तिचा मुलगा चिन्मय जुने आघात विसरू शकत नसतो. तो त्यात आणखीनच गुरफटत जातो. वारंवार त्या आठवणी त्याला त्याच्या एकांतपणाची जाणीव करून देत असतात. दुसर्‍या बाजूला नवीन जागा, नवीन शाळा आणि आईचं कामात जास्त गुंतत जाणं हे त्याच्या एकटेपणाच्या अंधाराला अजूनच दाट करत असतं.

पौगंडवस्था ही अशीच मनात कल्लोळ निर्माण करणारी. आपलं स्वतःचं वलय निर्माण करू बघणारी. स्वतःला जगाच्या पसार्‍यात कुठे आहे असे प्रश्न विचारणारी, जगाला आपल्या दृष्टीतून एक आकार देऊ पाहणारी. वडलांचं सोडून जाणं, तो एकटेपणा आणि अशी पौगंडवस्था चिन्मयच्या मनात एक पोकळी निर्माण करत असतात, एक संक्रमण घडवत असतात.

कोकण ही केवळ एक जागा नसून ईश्वराने निर्मित केलेली एक जीवंत कलाकृती आहे. असं ठिकाण जे प्रत्येकाला त्याचं खरं रूप दाखवत असतं अशी मायानगरी! एक पारदर्शक आरसा! मनाला हुरहूर लावणारी, एकांतालाही भय वाटेल अशा देखण्या रूपाने कोकणनगरी भावविश्वावर घाव करत असते. अशा ठिकाणी येऊन ती स्त्री आपल्या पतीला अन तो मुलगा आपल्या पित्याला अजूनच आठवत राहतात. तो मुलगा अन त्याची आई एकमेकांना धड आपल्या वेदना-दुखं ही सांगू शकत नाहीत. तुला मी अन मला तू अशीच त्यांच्या आयुष्याची रूपरेखा असूनही दोघांच्या मध्ये विसंवादाचे जणू अभेद्य तटबंदी उभी आहे असं जाणवत जातं.

आई कामावर गेल्यामुळे भेडसावत जाणारा एकटेपणा अन नवीन ठिकाणी नवीन माणसांत रमू पाहणारा चिन्मय, ज्याला खर्‍या-खोट्याची किंवा चांगल्या वाईटची काहीच जाण नाही तो एकटेपणा दूर करण्यासाठी कोणाचातरी सहवास शोधत असतो. मग ते त्याच्या शाळेतील उनाड पोरं असोत किंवा दारू पिणारा मासेमार! हे करत असताना आपण कसलीतरी चौकट मोडत आहोत हे माहीत नसतं, पण आपल्या आईला हे कळलं तर ती रागवेल हेही माहीत असतं, अशा गोंधळलेल्या अवस्थेत चिन्मय अडकला असतो. तो पुण्यात असताना त्याच्यासोबत २४ तास सोबत असणार्‍या त्याच्या मामेभावाची आठवण त्याला येत असते अन तो त्याला आपल्या नवीन आयुष्याची कथाही पत्राद्वारे सांगत असतो. कदाचित तेच एक त्याच्या व्यक्त होण्याची जागा असते. कोवळं वय, नुकताच झालेला आघात, नवीन जागा, कामाला जाणारी आई अन दिवसभर जिवावर उठणारा एकांत यामुळे तो चिडचिडा होत जातो. मनाच्या खोल कुठेतरी बरच काहीतरी खुपत असतं पण त्याला वाट मिळत नसते. त्यात कोकणातील गूढ शांतता जी मनातील एकांताला एकटेपणाला वाढवत असते.

ह्या एकांताला वाट करून देण्यासाठी तो मित्रांत मिसळतो. त्याची अनेकांशी गट्टी जमते. तो त्यांच्यात राहून व्यक्त होऊ लागत असतो. काहीही करून आयुष्यातील एकटेपणा तो घालवत असतो. अशातच तो एका दिवशी मित्रांसोबत जवळच्या एका किल्ल्यावर जातो… अथांग समुद्राच्या काठावर एखाद्या तपस्वी ऋषिसारखा उभा अभेद्य किल्ला!!

Image result for killa movie

आपण कधीतरी एखादी जागा बघतो अन नकळतपणे त्या जागेच्या प्रभावाखाली जातो. ती जागा आपल्या मनावर धुक्याची चादर आच्छादून टाकते अन स्वतःचं अस्तित्व आपण त्या भोवतालात हरवून जातो. चिन्मय सर्व विसरून त्या किल्ल्याला निरखत असतो. कदाचित त्याचं अस्तित्व त्याला स्वतःसारख वाटत असतं.

मग पावसाच्या सरी सुरू होतात अन त्या भल्या मोठ्या किल्ल्याच्या तटबंदित तो हरवतो… जोराच्या पाऊस-वार्‍यात एकटा त्या किल्ल्यावर अडकतो… त्याचे नवीन मित्र, ज्यांना तो स्वतःचे सोबती समजत असतो ते त्याला सोडून निघून गेलेले असतात… हा धक्का त्याच्या संवेदनशील मनावर आघात करणरा असतो.. तेथे त्याला जाणीव होते स्वतःच्या ह्या जगातील एकटेपणाची… आपली काळजी करणारं कोणीच नाही अशी ती भावना… आपण जगात एकटेच आहोत, आपण जगलो-मेलो तरी आपली काळजी कोणाला पडलेली नाही असं त्याला वाटू लागतं… तेथे त्याला वडलांची उणीव प्रकर्षाने जाणवते…

गूढ सावल्याणी घेरले गेल्याची भावना त्याच्या मनात घट्ट होते… कामावर जाणारी आई अन आपल्याला सोडून जाणारे मित्र ह्यामुळे तो आणखीनच बिथरतो… आयुष्यात एकटेपनाशिवाय काहीच नाही ही ती भावना.. अगदी मग दारुड्या मासेमार व्यक्तीतही तो सोबती शोधतो… पण कुठेतरी चुकत आहे असही त्याला वाटत असतं… तडक उठून पुण्याला जावं, कुठेतरी निघून जावं ही साहजिक भावना त्याच्या मनात उमटत जाते… आयुष्यात नव्यानेच घडणार्‍या घटना सांगव्यात तरी कोणाला असं त्याला वाटत असतं… त्याला व्यक्तच होता येत नसतं. एक क्षण तर असा येतो की त्याला वाटतं आपली आई नोकरीतील बढतीमुळे खुश आहे अन नवीन आयुष्यात रमत आहे अन आपल्याकडे तिचं दुर्लक्ष होत आहे..

दुसरीकडे चिन्मयची आईही एका वेगळ्याच संकटातून जात असते… नवीन ठिकाणी नोकरीत येणारे अडथळे अन त्यात होणारा नाहक त्रास यात ती गुरफटते आणि तिचं चिन्मयकडे दुर्लक्ष होत असतं… बिकट परिस्थितीत समुद्राच्या मध्यावर अडकलेल्या एका लहानशा होडीप्रमाणे तिची अवस्था असते… अशा परिस्तितीत कुठेतरी दीपस्तंभ चमकेल अन त्याकडे धावत सुटू असं तिला वाटत असतं… ह्या परिस्थितला एकट्यानेच मार्गस्थ व्हावं लागणार आहे अन आपल्या मुलालाही सुखरूप ठेवायचं आहे हेही तिच्या मनात पक्क असतं… तिच्याही मनावर वारंवार होणारे आघात याने ती आणखीनच कमकुवत अन हळवी होत असते पण त्यातून बाहेर पडायचा मार्ग तिला सापडत नसतो…. चिन्मयचा स्वभाव चिडका अन अबोल होत असल्याने तीही चिंतेत असते.

एका बाजूला हातातू जाणारा मुलगा अन दुसरीकडे नोकरीतील पेच अशा पेचात ती सापडते… तिचंही आयुष्य एका काळोख्या अन अभेद्य तटबंदी असणार्‍या किल्ल्याप्रमाणे असतं… बोलावं तर कोणाला अन सांगावं ते काय हाच तिच्यासमोरचा प्रश्न…

प्रसंगाची गुंफणही अशी होत जाते की ते दोघे एकमेकांपसून अजूनच दूर जात राहतात. पण शेवटी दूर जाणारे मार्ग हे वर्तुळाकार असून शेवटी ते दोघे पुन्हा एकमेकांच्या विश्वाशी संलग्न होतात. समुद्राच्या लाटा कधी शांतपणे किनार्‍याला लागतात तर कधी खळखळाट करत आदळतात. चंद्राच्या अस्तित्वाने स्थिर पाण्यालाही जिवंतपणा येतो. पण किनार्‍यावर येणार्‍या प्रत्येक लाटेला पुन्हा विशाल सागरात मिसळावं लागतं.

हे दोघेही अशा एका चिरेबंदी किल्ल्यात अडकले आहेत जो पार करणं अशक्य वाटत असतं… दोघांच्या अडचणी वेगळ्या असल्या तरी ते एकमेकाला त्या स्पष्टपणे सांगू शकत नाहीत… समुद्राच्या तटावर समुद्रांचे आघात सोसणार्‍या अन एकांती असलेल्या किल्ल्याप्रमाणे त्यांचं आयुष्य बनलेलं असतं.

एकटेपणा हा त्यांच्या अडचंनींचा मूळ गाभाच बनलेला असतो… हाच तो किल्ला!!! प्रचंड पावसात, खळाळत्या लाटांचा सामना करणारा पण बुरूज ढासळले तरी खंबीरपणे स्वतःची ओळख दाखवून देणारा किल्ला!!

खर्‍या आयुष्यात काहीही चमत्कार नसतात. असतात त्या फक्त तडजोडी… समोर येणार्‍या परिस्थितीशी जमेल तसं झगडायचं! जिंकणे हरणे याला काही अर्थच नसतो… शेवटी एक तडजोड करावी लागते अन पुन्हा त्याच वर्तुळात पुन्हा नव्याने प्रवास करावा लागतो!! बास हेच आयुष्य!!!

कुठेतरी दीपस्तंभ चमकतो आणि सर्वस्व पणाला लावून त्याच्याकडे धावत सुटावं लागतं. मळभ दूर होते. निरभ्र होतं. आहोटी लागते आणि खळाळणार्‍या लाटा पुन्हा शांत होतात. कटू अंनुभावातून गेल्यानंतर, आईला मिठी मारून मनमोकळ झाल्यानंतर मनातील अव्यक्तपणा दूर होतो. मन हलकं होतं. तो जगाला नव्या जाणिवेने सामोरा जात असतो. चिन्मयचे मित्रांशी असलेला मनमुटाव दूर होतो अन स्वच्छ मनाने तो सर्वाला सामोरा जातो. मनात एक उत्साह दाटतो. सगळं व्यवस्थित होतं. पुन्हा त्याच्या आईची बदली होते पण आता चिन्मय आपल्या कोशातून बाहेर आलेला असतो, किल्ल्याच्या तटबंदी ओलांडायची ताकत त्याच्यात असते. पौगंडअवस्थेतून तो बरच शिकून जातो. ज्या किल्ल्यावर त्याला एकटेपणाच्या खोल विहिरीत ढकलल असतं तिथे पुन्हा त्याच मित्रांसोबत जाऊन तो नवीन संवेदना भरून ऊर्जित होतो.

चित्रपट हा काही मनोरंजक वगैरे नाही. चित्रपट हा मनातील खदखद बोलून दाखवणारा आहे. पण सामाजिक वगैरे अशा भानगडीतही अडकलेला नाही. आहे ती फक्त एक अस्वस्थता, खदखद, जाणिवांचा समुद्र!! जगातील प्रत्येक मनुष्याच्या टप्प्यात एकदातरी ही परिस्थिती येतेच येते, ज्याला प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने सामोरा जात असतो. कुठल्याही संवेदनशील माणसाच्या मनाला स्पर्श करणारा असा हा चित्रपट किंवा एक कथा आहे. याला नेहमीच्या मोजपट्टीत मोजता येणार नाही. याचं विश्व वेगळं आहे, एखाद्या परिकथेप्रमाणे… कोशातून बाहेर पडणार्‍या फुलपाखराप्रमाणे… चित्रपटाचा प्रत्येक सीन हा वस्तुनिष्ठ वाटतो. कुठेही बटबटीतपणा नाही. एक संथ प्रवाह.. नदीचा संथ प्रवाह…

एक कविता जी ह्या चित्रपटात आहे…

सागराने नाविका मनी संकट मोठे पेरले,

वादळाने होडीस एका दशदिशांनी घेरले…

शीड तुटले, खीळ तुटले, कथा काय या वल्हयाची,

नाविकासही फिकीर नव्हती पुढे राहिल्या पल्ल्याची…

नशीब नव्हते पाठीशी, नव्हता अनुभव गाठीशी,

उभा ठाकला एकटाच युध्द होते वादळाच्या वय वर्ष साठीशी…

स्वबळी विश्वास मोठा त्यास तोड कर्तुत्वाची,

रौद्र वादळ शांत जाहले पागळले शत्रुत्वही…

एकवटला धीर हा, कोठून येतो तत्क्षणी,

शतबाहुंचे बाल येते जो मातृत्व तरळते मनी…

कोकण जितकं सुंदर आहे तितकच ते गुढही आहे… अंतर्मुख करणारं, स्वतःला स्वतःच्या आयुष्यात डोळे उघडून बघायला लावणारं कोकण… शांतातेचाही आवाज ऐकायला लावणारं कोकण… मनाला एकटं पाडणारं कोकण… किल्ला असो किंवा शाळा हा चित्रपट असो, कोकण दर्शन मन खिन्न करणारं वाटतं… मनाला रुखरुख लावणारं वाटतं…

===समाप्त===

@Late_Night1991  ||  अभिषेक बुचके

एक हजाराची नोट

PROMOTIONS
error: Content is protected !!