Tag: जातीयवाद

जातीय राजकारणाचा वीट येतोय.

जातीय राजकारणाचा वीट येतोय.

#मराठा_मोर्चा   ||  #दलित_मोर्चा   ||  #ब्राम्हण_मुख्यमंत्री  ||  #बहुजन_नेतृत्व_नाराज   ||  #वैताग

खरं तर ह्या विषयावर बोलायचं नाही असं ठरवलं होतं, पण फार अस्वस्थ होत आहे. अगदी घुसमट! रोज टीव्ही अन वृत्तपत्र बघितले की भीती वाटत आहे, कधी स्फोट होईल होईल याचा म्हणून. कोपर्डी अत्याचार झाला अन संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. खरं तर एक जात दुसर्‍या जातीवर अत्याचार करत नसते; अत्याचार माणूस (अमानवी) करत असतो आणि नंतर आपण त्याला जातीय स्वरुपात बसवतो. आजवर अनेकदा अत्याचार झाले, त्याच्या निषेधार्थ मोर्चेही निघाले आहेत. पण ती अत्याचारीत मुलगी मराठा होती अन अत्याचारी दलित होते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात एक संतप्त लाट आली आहे. ज्या जातीच्या व्यक्तीवर अत्याचार झाले त्याच जातीचे संघटना मोर्चा व निषेध फेर्‍या काढतात. पण इतिहासात डोकावून बघितलं तर समजेल सर्वच जातींवर-धर्मावर अत्याचार झालेला आहे. पण ह्या वेळेस जो अत्याचार झाला आहे त्यावरून सगळीकडे मराठा मोर्चा, अगदी भव्य अन ऐतिहासिक असे, निघत आहेत. अत्याचाराचं समर्थन कोणीही करत नाही पण तो मुद्दा उचलून समाजात अस्थिरता निर्माण होत आहे. इतरांवर अत्याचार झाल्यावर शांत बसायचं अन स्वतःच्या जातीवर आलं की आगडोंब? दलितांनाही आणि इतर समाजालाही हा नियम लागू होतो. पण अशा मोर्चा अन एकीच्या हाकेने एकमेकांच्याबद्धल मनात संशय निर्माण होत आहे. एक साधा प्रश्न आहे, माझ्या समाजाचा हा-हा माणूस अत्याचारी आहे, गुन्हेगार आहे म्हणून त्या माणसाला आम्ही नाकारत आहोत, निषेध करत आहोत असा मोर्चा कधी निघतो का?

महाराष्ट्रात अल्पसंख्यांक ‘ब्राम्हण’ माणूस मुख्यमंत्री होतोच कसा असा अनेकांचा थयथयाट आहे. त्यातूनच मग पवार साहेब यांच्यासारखे नेते पेशवाई आहे का? असे समाजभेदी वक्तव्य करतात. तिकडे त्यांच्याच पक्षातील खडसे तर सरळ बहुजन नेतृत्ववर अन्याय म्हणून सगळ्या महाराष्ट्रात ठिणग्या टाकत आहेत. सोशल मीडिया वर तर रोज खोटारडे जातीविरोधी मेसेज येत आहेत. आता तर हद्द झाली. विराट मोर्चे काढून शक्ति दाखवून द्यायची स्पर्धाच सगळ्या जातींत लागली आहे. चार जाती-धर्माचे लोक एकत्र बसून पेपर वाचू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे आज महाराष्ट्रात. ग्रामीण भागात वादळापूर्वी असते तशी शांतता आहे. मध्यंतरी भुजबळांना अटक केली म्हणून त्या समाजाचं राजकारण झालं. मग धनगर आरक्षण वरुण त्यांचं राजकारण झालं. येनकेनप्रकारेण महाराष्ट्र जातीयदृष्ट्या अस्थिर कसा राहील याची काळजी घेतली जात होती. यात विरोधी पक्ष तर आहेच पण सत्ताधारी पक्षातील जास्त लोक समाविष्ट आहेत. गेल्या दोन वर्षात हे सगळे जातीचे खेळ नव्याने मांडले आहेत. पूर्वी नव्हते अशातला भाग नाही, पण ते मर्यादेत होते.

आज एका मित्राला भेटायला हॉस्पिटलला गेलो होतो. आमच्या मित्राला त्याची आई सांगत होती की आता आराम कर, मोर्चा वगैरे नंतर! पलीकडे बसलेला एक माणूस उठला अन इकडे येऊन म्हणाला, आम्ही लांब-लांबून स्वतःच्या खर्चाने सगळा महाराष्ट्रात मोर्चात सहभागी होत आहोत. तुम्हाला इथल्या इथे यायला काय हरकत आहे. आत्ता तर जाग आली आहे, आपली एकी दाखवून देऊ वगैरे बोलत होता. ह्यावरून समजतं की जातीय अस्मिता कुठल्या टोकाला गेली आहे.

संख्येने सर्वाधिक असलेल्या मराठ्यांच्या महाराष्ट्रात ब्राम्हण मुख्यमंत्री होतो हे काहींना रुचत-पचत नाही. त्यात पुरंदरेंना पुरस्कार दिल्याने आम्ही संतप्त आहोत. आम्हाला आरक्षण मिळत नाहीये. शिवस्मारक होत नाहीये. अशा आमच्या भावना आहेत. ह्या सगळ्या घडामोडींत धनगर समाजावर अन्यायाची वाचा फोडणारा #ख्वाडा आणि मराठा-दलित संबंधावर (ज्याला आम्ही मराठा विरोधी मानतो) आलेला #सैराट हे दोन चित्रपट खूप मोठी भूमिका बजावतात. आजवर सत्तेत असलेले आपण सगळीकडून दाबले जात आहोत ह्या अस्वस्थतेतुन ह्या गोष्टी घडत आहेत.

आम्हाला खरच एक गोष्ट खूप घडाविशी वाटते. कुठेतरी दहशतवादी हल्ला व्हावा अन आमच्यासारखे निरपराध लोक मारले जावेत. आम्ही मारू तेंव्हा आमच्या अंगावर जातीच्या ओळखी अन लेबल नसतील. आम्ही भारतीय म्हणून मारले जाऊ. मग सगळे समाज एकत्र येतील याची खात्री आहे. कारण दुखात एकत्र येण्याची आपली संस्कृती आहे. 26/11 नंतर आम्ही आमचे जाती धर्म सोडून एकत्र उभे होतो, कारण त्यांनी आम्हाला मारताना आमच्या जातींत भेद केला नाही.

आरक्षण म्हणत असाल तर ह्या सगळ्या बड्या-बड्या नेत्यांनी गल्ली-बोळात शाळा, कॉलेज अन खासगी संस्था आहेत तेथे आरक्षण द्यावे… मग नेतृत्व करून सरकारकडे मागायची हिम्मत करावी!

खरं तर ह्या जातीयवादाचा (सगळ्यांच्या) वीट आलाय. सिरिया किंवा त्या राष्ट्रांत जे अराजक आलेलं होतं ते अशाच सामान्य घटनांच्या ठिणगीतून!

अशाने स्थलांतराला आमंत्रण येत असतं असा इतिहास आहे…

error: Content is protected !!