आपल्याला जर आपल्या रचना, संकल्पना, मत येथे मांडायचं असेल किंवा कुठलीही जाहिरात ह्या संकेतस्थळावर करायची असेल तर latenightedition.in@gmail.com यावर संपर्क करावा!

Tag: निरीक्षण

दवाखाना – एक वेदनाघर भाग २

दवाखाना – एक वेदनाघर भाग २

#इच्छामरण  ||  #मुक्ती  || ईश्वरी न्याय  || गुंतागुंत  || अव्यक्त  || 

मागील भागापासून पुढे…

……मानवाने वैद्यकशास्त्रात इतकी प्रगती केली आहे की मानवाचं सरासरी आयुष्यमान वाढलं आहे. खरं आहे. पण ते कसं वाढलं आहे. शुगर, बीपी तर आता अनेकांना झालेले असतातच. म्हातारपण म्हणजे चाळीशी-पन्नाशीच! औषध-गोळ्या रोजच्या-रोज चालू ठेवाव्या लागतात. हे असलं लांब आयुष्य जगायचं काय उपयोग? त्यापेक्षा ‘आनंद’ मध्ये राजेश खन्ना म्हणतो तसा ‘जिंदगी लंबी नही अच्छी होनी चाहीये!’ हेच खरं वाटू लागतं.

सलाईनवर अनेकांना अनेक दिवस जगवलं जातं. रुग्ण आला की त्याला सुया घुसवल्या जातात. तो जगतो हे खरं आहे. पण जिवंतपणी त्याला नरकयातना सोसाव्या लागतात. शरीराची चाळणी होते अन पोटाचा विषपात्र! नरकयातना असतात त्या ह्याच! त्याची उमर जरूर वाढते पण शरीर व मन खंगून गेलं असतं. माणूस जगवणे यालाच अर्थ असतो. डॉक्टर असतो तो समोर आलेलं शरीर श्वास्वोच्छवास कसं घेत राहील अन त्याचं हृदय कसं चालू राहील एवढच बघण्यापुरता. त्याचा उद्देश केवळ त्या शरीराला जगवणे इतकाच असतो. त्याच्या आत्म्याला अन मनाला काय वेदना होतात याच्याशी त्याचं देणं-घेणं नसतं. एखादी बंद पडलेली गाडी केवळ चालू करून देणे हे एखाद्या मेकॅनिक चे काम असते; पण ती गाडी पुढे किती वेळ चालू शकेल अन समोरची घाट-वाट त्या गाडीस झेपेल का याचा विचारही त्याने केला पाहिजे.

          रूग्णांच्या वेदना बघून मनाला क्लेश होतात. त्याच्या शरीरात निष्ठूरपणे घुसवल्या जाणार्‍या सुया अन शरीरभर लावली जाणारी यंत्रे बघून आपला आत्मा तडपतो अन आपल्या काळजाला सुया पडतात. हे सगळं भयंकर आहे. आयुर्वेद परवडलं किंवा जुन्या काळातील वैद्य परवडले अशी मानसिकता होते. आधीच्या काळी आजारी माणसाला बारे करण्यासाठी झाड-फुक करणार्‍या मांत्रिक वगैरेकडे न्यायचे. तोही झाडूने मारायचा, जिभेत वगैरे सुया टोचवायचा. हे अघोरी तर मग आज जितक्या निष्ठूरपणे रूग्णाला एक निर्जीव शरीर म्हणून वागवलं जातं ते काय? खरं तर हे सगळं भावनिक वगैरे वाटू शकतं, पण त्यात तथ्य नाही असंही म्हणता येत नाही.

डॉक्टर देव असतो हे खरं आहे. कारण जीवन-मरण हे परमेश्वराच्या अन यमदेवाच्या हाती असतं असं म्हणतात. पण डॉक्टर स्वतःच्या मेहंनतीतून मरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या माणसाला परत आणतात. ही किमया आहे अन डॉक्टर किमयागार आहेत. त्यासाठी त्यांना भावना बाजूला ठेवून अनेक गंभीर निर्णय घ्यावे लागतात. अशा डॉक्टर लोकांना सलाम आहेच. पण स्वतःची तुंबडी भरण्याकरिता रुग्ण मरणार आहे हे माहीत असतांनाही काहीतरी महागडे उपचार करून पैसा उकळणार्‍यांना काय म्हणावे?

          इच्छामरण हे खरं तर दैवी देणगीच म्हणावी लागेल. जन्म-मृत्यू मानवाच्या हातात नसतात असं म्हणतात, पण डॉक्टर मरणाच्या दाढेतून रुग्णास बाहेर काढतात तसेच रूग्णाला शारीरिक-मानसिक वेदना असह्य होत असतील तर स्वतःला मरणाला स्वाधीन करायचाही अधिकार हवाच! न्यायालय याला परवानगी देत नाही. पण आपल्या देशात अन जगात अनेक गरीब विना अन्न-पाणी मरत आहेत. अनेक गरीब लोक महागडे उपचार परवडत नाहीत म्हणून रूग्णाला घरीच तडफडून मरु देतात ते घटनेत कसं बसतं??? त्यापेक्षा त्यांना मरायचा अधिकार का नको. तीव्र वेदनेने तडफणारे रुग्ण मृत्युची भीक मागत असतात अन आपण त्यांना विनाकारण जगवत असतो हे पापकर्म आहे. त्यांच्या शरीराला अंतर्गत व्याधीच्या दुखण्यापासून मुक्त करण्यासाठी कसलेतरी मशीनं लावून अजून पीडा देत असतो. हा अन्याय आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत ‘समाधी’ हा प्रकार होता. त्याचा योग्य वापर स्वेच्छेने होत असे. आज जैन धर्मात अशीच काहीतरी ‘परंपरा’ आहे. ती आजही चालू आहे. न्यायालयाने त्यावरही बंदी आणली आहे. ती सर्वांनाच लागू असावी. न्यायालय वगैरे यात काय भूमिका बजावेल याचाही विचार करावा. पण शरीरवेदनेपासून मुक्तीसाठी इच्छामरण असायलाच हवं.

इच्छामरण हे माणुसकीने दिलेला न्याय हवा. त्याचा अतिरेक नको. नाहीतर रोज उठून असले पर्याय निवडून स्वतःचे जीव देणे किंवा खून करून त्याला इच्छामरण सिद्ध करणारे लोकही आहेत. ज्याचं वय झालं आहे. आयुष्यात आता करण्यासारखं काहीच नाही. ज्याची काळजी घ्यायला आगे-पीछे कोणीच नाही. अशा परिस्थितीत असणार्‍या रुग्णांना हा न्याय असावा. मृत्यूशय्येवर पडून वेदनांचे विष पिण्यापेक्षा समाधानी मौत ही अमृत असेल. जेंव्हा जगणं निरर्थक असतं अन अवघड होऊन बसतं तेंव्हा मृत्यू जवळचा सोबती वाटतो. तो सोबती मिळवून देण्याचं कर्म मानवाच्या पदरी पडावे अशीच इच्छा!!!

 

दवाखाना – एक वेदनाघर भाग १

दवाखाना – एक वेदनाघर भाग १

दवाखाना – एक वेदनाघर भाग १

#दवाखाना – एक वेदनाघर  ||  अनुभव  || निरीक्षण  ||  व्यक्त  || वेदना

दवाखाना म्हंटलं की एक नीरस अन वेदनादायी चित्र आपल्यासमोर उभं राहतं. परमेश्वराने हे शरीर निर्मित केलं अन त्यासोबत दिल्या त्या अनंत व्याधी. मानवी मनाला अन शरीराला किती प्रकारच्या व्याधी असू शकतात याची यादी केली तर ती फार लांबलचक होईल. पूर्वीच्या काळी आजारपण आली की वैद्य किंवा मांत्रिक वगैरे बोलावले जायचे. पण आता मानव इतका प्रगत झाला आहे की गल्ली-बोळात क्लिनिक अन दवाखाने झालेले दिसतात. विशेष म्हणजे यातील ९०% गर्दीने भरलेली असतात. खाण्या-पिण्याची उपहारगृहे, अन कट्टे जितके गर्दीने फुललेले असतात तितकीच ही दवाखानेही. पण तेथील गर्दीच्या भावनेत जमीन-अस्मानचा फरक असतो.

दवाखाने म्हणजे आजारी, रोगी लोकांचे गंभीर चेहरे. नाना प्रकारच्या व्याधी अन चिंता! स्मशानात जमलेल्या माणसांच्या चेहर्‍यावर दुखं असलं तरी मनात कुठेतरी आत्मा मुक्त झाला याचं समाधानही असतं. पण दवाखान्यात आलेल्या मानसाच्या अन त्याच्या आप्तांच्या चेहर्‍यावर अन मनातही केवळ गंभीर चिंता असते. शरीराला होणार्‍या वेदना समोर बसलेला डॉक्टररूपी देव संपून पुन्हा पहिल्यासारखा सदृढ बनवेल अशी आशा घेऊनच प्रत्येकजण आलेला असतो. क्षणाक्षणाला मनात उठणारे हजारो प्रश्न डॉक्टर नाडीवर बोट अन छातीवर ब्रम्हास्त्र ठेऊन क्षणात सोडवेल अशी भावना आपली असते. लाखो-करोडोचा मालक असलेला गृहस्थ किंवा गरिबातला गरीब माणूस जेंव्हा आजारी पडतो तेंव्हा शरीर सोडून त्याला संपूर्ण जग निरर्थक वाटू लागतं. आजारपण हे मनाला खात जातं अन त्यातून मुक्ति हेच आयुष्याचं सार्थक असं वाटू लागतं.

काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राचा अॅक्सिडेंट झाला होता. त्याची गाडी वाळूवरून घसरून पडली आणि त्याचे गुडघे फुटले होते. सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. सगळे सोपस्कार झाल्यावर त्याच्यावर उपचार सुरू झाले. त्याच्यावर उपचार चालू असताना आम्ही तेथेच बसून होतो. दवाखाना ह्या दुखाची प्रतिमा दाखवणार्‍या आरशाचा मला पहिल्यापासूनच तिटकारा होता. तेथे गेल्यावर येणारा दर्प हा संपूर्ण शरीर बधिर करणारा असतो. संपूर्ण श्वसनसंस्था पछाडुन टाकणारा तो गलिच्छ वास! शिवाय तेथे आलेल्या रोगी लोकांचे दीनवणे चेहरे अन त्यांच्या नातेवाईकांचा हतबलपणा असह्य करून टाकणारा असतो.

आम्ही बसलेलो असताना एक म्हातारा एकटाच आला होता. त्याला कोणीतरी जबर मारहाण केली होती. कसातरी लंगडत-कन्हत तो इथपर्यंत आला होता. डॉक्टरला भेटला. डॉक्टर सहानुभूतीने त्याचं बोलणं ऐकत होते. म्हातारा कुठल्यातरी खेड्यातुन आला होता. काल रात्री त्याच्या पोराने अन सुनेने त्याला यथेच्छ बडवलं होतं असं त्याचं म्हणणं होतं. काठीने अन सळईने त्याला मारहाण झालेली होती. सांगताना तो रडत होता. डॉक्टरलाही गहिवरून आलं होतं. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले. एक रात्रभर असह्य वेदना घेऊन तो दुसर्‍या दिवशी येथे आला होता. सोबत कोणीही नव्हतं. हे सगळं मन विषण्ण करणारं होतं. त्याचा x-ray वगैरे काढल्यावर समजलं की त्याचा पाय मोडला होता. हे सगळं आमच्यासमोर घडत होतं. आम्ही केवळ निपचीत अन हतबल होऊन सगळं बघत होतो. तिकडे आमच्या मित्रावर उपचार चालू होते अन तो तिकडून जोरात ओरडण्याचा आवाज येत होता. काही मित्र तिकडे गेले, पण माझं काही धाडस झालं नाही. पलीकडे एक चाळीशीतील बाई सुई टोचवून घेण्यास नकार देत होती. तिला कदाचित सुईची भीती वाटत असेल. रडत होती. शेवटी तिला धरून सुई घुसवण्यात आली अन ती जीवाच्या आकांताने ओरडत होती. तिने हाताला हिसका दिला अन सुई हातात घुसून भराभर रक्त बाहेर आलं. आता तिच्या ओरडण्याला सीमा नव्हती. तातडीने तिला कुठलातरी स्प्रे मारला अन औषध दिलं. ती बेशुद्ध झाली.

तिथे वरांड्यात आजारी रुग्णांचे नातेवाईकांचे बसले होते. एक तरुण आपल्या बापाच्या मृत्युच्या भीतीने हुंदके देऊन रडत होता. त्याला कोणीतरी सावरत होतं. जमिनीवर काहीतरी अंथरूण दोन बायका अन एक मुलगी बसली होती. त्यांनी डब्बा काढला अन तेथेच जेवण सुरू केलं. दवाखान्याच्या उग्र वासात लसणाच्या फोडणीचा वास मिसळला. पण किळस येत होती. ती मुलगी जेवण जात नाही म्हणून दुसर्‍या बाईला सांगत होती. एका बाकावर दोन मध्यमवयीन माणसे बोलत बसली होती. काहीतरी कागदपत्रे तपासत होती. एक स्मार्ट तरुण स्मार्ट फोनवर काहीतरी खटखुट करत बसला होता. एक खेडूत मघापसून अनेकांना फोन लाऊन पैशांची मागणी करत होता. त्याला सगळीकडून नकार येत होता. तो निराश होत होता. तितक्यात एक अॅम्ब्युलेन्स आली. चटकन मधून कोणालातरी बाहेर काढलं. सोबत पोलिस होते अन सात-आठ माणसे सोबत होती. त्या रूग्णाला स्ट्रेत्चरवरून आत नेत होते. त्याच्या तोंडातून फेस बाहेर पडत होता. त्याने औषध घेतलं होतं म्हणे. मला ओकारी आली. मी बाहेर थोड्या कमी अशुद्ध हवेत जाऊन उभारलो.

हे सगळं निराशादायक चित्र बघून मन हेलकावे खातं. जीवनाची यात्रा एका मुक्कामावर येऊन अस्थिर होतेच. गौतम राजाला समाजातील दुखं बघून तीव्र वेदना झाल्या अन तो सगळं वैभव सोडून निघून गेला. गेला सत्याच्या शोधत. त्याला मनशांती पाहिजे होती. ह्या सगळ्या वेदनेतून मुक्ति अन मोक्ष पाहिजे होता. तो बुद्ध झाला. सर्वसामान्य माणूस तो होऊ शकत नाही ही शोकांतिका आहे. भौतिक प्रेमापोटी माणूस काहीतरी विचित्र जीवन जगतो. शरीर हीच संपत्ती अशी म्हण खोटी वाटते अन भौतिक सुख जवळचं वाटू लागतं. शेवटी तर काहीच राहत नाही पण तो शेवटही पीडा देणारा असेल तर मग काहीच उपयोग नाही. भगवान विष्णूचे अकरा अवतार झाले म्हणे. अगदी मत्स्य अवतारपासून बुद्ध! राम हा एकवचनी होता, सत्यवचनी होता आणि भौतिक सुखाला दुय्यम मानणारा होता. नंतरचा कृष्ण हा चतुर अन भौतिक सुखाचा उपभोग घेणारा होता. अन बुद्ध सगळं त्याग करणरा. पुन्हा भौतिक सुखाला नाकारणारा होता. परमेश्वरही अवतार घेताना भौतिक सुखाला आहारी गेला अन स्वतःची चूक कळताच पुढचा अवतार पुन्हा सर्वस्व त्यागणारा!

एका दवाखान्यात एक आजी आहेत. त्यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. त्यांना माणसे ओळखता येत नाहीत. भूतकाळ आठवतो पण समोरची माणसे ओळखता येत नाहीत. स्वतःच्या पतीला अन मुलाला त्या ओळखत नाहीत. एकुलता एक मुलगा परदेशी. कधीतरी त्यांना भेटायला येतो. पण आजी त्याला ओळखत नाहीत. तो स्वतःची सुटका करून घेतो. ओळखतच नाही तर येऊ कशाला म्हणतो? आजोबा एकटे सगळं ओढत असतात. पैशांची कमी नाही. आजी मात्र कशाही असल्या तरी जगल्याच पाहिजेत असा त्यांचा अट्टहास. त्यांच्याशिवाय त्यांचं कोणीच नाही. ती गेल्यावर एकटे सडू अशी त्यांना भीती. स्वतःच्या स्वार्थापाई ते आजीला जगवतात. ओळखत नसली तरी रोज वेळच्या वेळी तिला खाऊ-पिऊ घालतात. स्वतः कसेतरी जगतात. त्या आजी शरीराने इतक्या बारीक झाल्या आहेत की सलाईन लावायला त्यांची शिर सापडत नाही. सगळ्या हाताला सुई घुसवल्याचे व्रण. शेवटी सेंटर लाइन म्हणून घशात छिद्र पाडून तेथून औषधोपचार… आजी नुसत्या तगमग करायच्या. मृत्यू दे म्हणून सतत परमेश्वराला हात जोडायच्या. आजोबा हमसून-हमसून रडायचे. त्यांना हे बघवत नसत.

अस्थिर विश्वाचे, अस्थिर मनाचे आपण केवळ एक नश्वर प्राणी आहोत. शरीराला वेदना ह्या मृत्यूपर्यंतचं मानवी दुखं आहे. मनाला वेदना ह्या तर मृत्यूपश्चातही पाठ सोडत नाहीत. अनेक अवयवांचे, अनेक पेशींचे बनलेले हे शरीर शेवटी पंचत्वात विलीन होतेच. बारा वर्षाला, अर्थात एका तपात ह्या शरीराच्या प्रत्येक पेशी बदललेल्या असतात. माणूस बदलतो का? सय्यम हा एक अमूल्य दागिना आहे. बुद्धाप्रमाणे सर्वस्व त्यागून मनशान्ती शोधत आपण जाऊ शकत नाहीत. स्वामी विवेकानंद मृत्यू पावले तेंव्हा त्यांच्या शरीरात ४० व्याधी गृह करून होत्या असं म्हंटलं जातं. परमेसवर परमात्मा सहनशक्ती देओ… अंग्निदिव्यातून पार पडायची… 

to be continue…

दवाखाना – एक वेदनाघर भाग २

श्रावण आरंभ

श्रावण आरंभ

माझे पुणेरी जीवन  || पुण्यातील अनुभव  ||  आळस वगैरे  ||

मागील कथेपसून पुढे

त्या दिवशीच्या भिजण्याने थोडीशी सर्दी झाली होती. मध्ये गटारी अमावास्या आली. आजकाल तर हा पण मोठा सण असल्याप्रमाणे तयारी सुरू असते सगळीकडे. दारूच्या बाटल्या दुकानाच्या बाहेर दृश्य भागात आणून ठेवल्या जातात. चिकन-मटनाचा तर पुर असतो. ह्या वेळेस हे फुकटे समाजसेवी कुठे जातात कोणास ठाऊक? नाहीतर नागपंचमी अन बैल शर्यतीला विरोध करायला पुढे येतात पण प्राणी कापून खाल्ले जात असताना हे गप्प बसतात. मी काही गटारी वगैरे साजरी केली नाही.

बुधवारी श्रावण सुरू झाला. अंगात थोडी कणकण होती. काल रात्री दोन-तीन पर्यन्त काहीतरी काम करत होतो, त्यामुळे सकाळी पांघरूणातून बाहेर यावं वाटत नव्हतं. शिवाय सलग दोन दिवस पाऊस पडत असल्याने वातावरण थंड अन संथ झालं होतं. वातावरणात निरसता होती. सूर्यदर्शन होत नसल्याने उत्साह वगैरे येत नव्हता. मंद प्रकाशात उगाच पडून राहिलो. थोडी अजून झोप झाली अन पांघरूणाच्या बाहेर आल्यावर बघितले तर अकरा वाजले होते. उठलो. थंडगार पाण्याचा स्पर्श नको वाटत होता पण तोंड धुतलं अन खाली जाऊन चहा-पोहे वगैरे घेऊन आलो. चहा घेतला तरी आळस काही केल्या जात नव्हता. परत आलो. येताना दोन पेपर घेतले होते. थोडा वेळ पेपर चाळले. परत अंगात आळस संचारला. मघाशी घडी न करता ठेवलेलं पांघरून पायानेच ओढलं आणि पेपर तसाच टाकून पांघरूणात शिरलो. डोळा लागला पुन्हा.

श्रावणासारख्या पवित्र महिन्याची सुरुवात अशी झाली.

सृष्टी वगैरे आनंदात असते म्हणे. पण मला भलता निरुत्साह चढला होता. उठलो तेंव्हा एक वगैरे वाजला होता. आंघोळ करायची अजिबात इच्छा नव्हती. श्रावण सण आहे वगैरे डोक्यात होतं पण उगाच त्या गोष्टी मनावर घेतल्या नाहीत. वाचायचा अर्धवट राहिलेला पेपर पूर्ण वाचला. सकाळी नाश्ता केला होता, तरी आता जेवण करायला जाणं भाग होतं. उठू-उठू म्हणत अर्धा तास गेला पण उठायचा काही मूड झाला नाही. शेवटी जेवणही वर्ज केलं. थंड वार्‍याने हुडहुडी भरत होती. डोक्यावर टोपी चढवली. पांघरून, टोपी, गरम शर्ट हे थंड वातावरणात प्रेयसीसारखे वाटतात. एक-दोन मादक विचारही मनात डोकावून गेले.

लॅपटॉप उघडला. थोडा वेळ पिक्चर वगैरे पाहिले. नंतर काहीतरी लिहीत बसलो. काय लिहीत होतो माहीत नाही पण जुन्या गोष्टी आठवून काहीतरी खरडत होतो.

मला आज वीर नावाच्या मित्राची आठवण झाली. कॉलेजचे दिवस होते ते. वीर नावाचा मित्र होता एक. हॉस्टेलवर राहायचा. चांगला होता पोरगा. पण प्रेमात पडला. वातावरण असं होतं की त्या गोष्टी आठवल्या. असं वातावरण असलं की वीर भलता भावुक व्हायचा. तो प्रेमात पडला होता न. त्याचा विरह दाटून यायचा. मग तो उगाच देवदास होऊन (आज मी पडून होतो तसा) पडून असायचा. तोही लॅपटॉपवर कुठलेतरी जुने गाणे लावून दिवसभर ऐकत बसायचा. रोमॅंटिक, प्रेमावर आधारित चित्रपट बघत बसायचा. त्याचा मूड अगदी हळवा असायचा. पावसात भिजनं, वेगाने वाहन चालवणे, रात्रभर जागने वगैरे धंदे तो करायचा.

असं पावसाळी अन ढगाळ वातावरण उगाच मनावर परिणाम करत असतं. प्रेमभंगी तर उगाच जास्ती करायचे. पण त्यावेळेस वीरची स्थिती अन आजची माझी स्थिती सारखीच होती का? पण मी प्रेमभंगी वगैरे नव्हतो. फक्त जरासा आळसावलो होतो. आजचा माझा अवतार अन तेंव्हाचा वीरचा अवतार सारखाच होता. मी जरा गोंधळून गेलो. थोडसं अस्वस्थ वाटत होतं. श्रावण हा महिना देवांचा महिना. अनेक सणवार असतात यात. ह्या पवित्र्य महिन्याच्या सुरुवातीलाच अशी अस्वस्थता बरी नव्हती. तरीही मी उगाच पडून होतो. अंगातील कणकण अजून जास्त वाटत होती. आज वीरचा काहीच संपर्क नव्हता. तो आज उगाच डोळ्यासमोर येत होता.

एखाद्या अडचणीच्या प्रसंगात कोणीतरी एक माणूस/मित्र आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. कधी कुठल्या आनंदाच्या प्रसंगात कुठल्यातरी तिसर्‍याच माणसाची/मित्राची आठवण येते. आज ह्या प्रसंगी वीर आठवत होता. त्याच्या प्रेमप्रकरणाचा शेवट फार वाईट झाला होता एवढं आठवतं. नंतर तो बराच उदास पडून असायचा. जीवन वगैरे व्यर्थ वाटायचं त्याला. आज फक्त एक दिवस मी जसा निष्क्रिय, निरुत्साही बसून होतो तसा तो रोज बसू लागला होता. एक वर्ष वाया गेलं त्याचं.

श्रावणसरी येतात. घनघोर काळं आभाळ घेऊन येतात अन कुठेतरी ते रिकामं करतात. आपल्या परंपरेत अन अध्यात्मात श्रावणाला खूप महत्व आहे. त्यात बरीच बंधने पाळायचे संकेतही आहेत. त्यात काही वैज्ञानिक असेलच. पण श्रावण मनावर काहीतरी घनघोर साचवत असतो असं आज उगाच वाटलं. काळे, पाण्याने भरलेले गच्च ढग सूर्याचं अस्तित्व समोर येऊ देत नाहीत, पण तेच ढग असं वातावरण निर्माण करतात की मनातील सगळं लख्ख समोर येतं.

मी पुन्हा एक पिक्चर वगैर पाहिला. पुन्हा अंथरुणात शिरून झोपलो. गाढ झोप लागली. छान स्वप्नं पडली. पांघरूणात गेल्यावर सगळा अंधार असतो. तिथे कसल्याच वातावरणाचा लवलेश नसतो. संध्याकाळी उठलो. छान वाटत होतं. प्रसन्न वाटत होतं. रिपरिप पाऊस चालूच होता. छान थंड पाण्याने हात-पाय खंगाळून काढले. पावसात भिजत एका टपरीवर पोचलो. मस्त गरम वडे अन वाफाळलेला चहा घेतला. श्रावणाची सुरुवात चांगली झाली.

मागील दिवस…

फिरती

फिरती

फिरती

@Puneri_Misal   || #पुणेरी_मिसळ   ||  #माझे_ पुणेरी_अनुभव  ||  पुणेकर

श्रावणाचा पहिला दिवस होता. आजही पावसाची संततधार चालूच होती. गेले तीन दिवस पाऊस काहीच हालचाल करू देत नव्हता. हालचाल करून खूप मोठं कार्य तडीस न्यायचं होतं असंही काही नव्हता म्हणा. तीन दिवसांपूर्वी काहीतरी काम होतं म्हणून बाहेर पडलो होतो. बाहेर पडताना आभाळ भरून येण्यास सुरुवात झाली होती. पण छत्री किंवा रेनकोट घ्यायचा कंटाळा आला होता. अंगात नवीन स्वच्छ कपडे होते.

त्याच दिवशी #अण्णाभाऊसाठे जयंती आणि #टिळकपुण्यतिथी होती. मी पुण्यात होतो. तसाच @बाजीराव_रोडला भटकत गेलो. जे ऑफिस गाठायचं होतं तेथून बराच लांबचा असा #पीएमटी स्टॉप नशिबी आला. मग मोबाइलवर ते ऑफिस जीपीएस च्या माध्यमातून शोधत गल्ली बोळं फिरू लागलो. पुण्यातली लहान-मोठी रस्ते फिरताना बरं वाटतं. पावसाची रिपरिप चालूच होती. फार मोठा नाही म्हणून मीही तसाच फिरत होतो. पण रिपरिप पाऊसही बर्‍यापैकी भिजवून गेली. जवळचा नॅप्किन काढून शक्य तो भाग पुसून काढला. शेवटी शोधत-शोधत ऑफिसला पोचलो तर तिथे ज्याच्याशी काम होतं ते उपलब्ध नव्हते. तास-दीड तासाने भेटतील असं कळल्यावर परत मागे फिरलो.

सकाळच्या नाश्त्याला खाल्लेल्या पोह्याचा जोर ओसरला होता. भूक लागली होती. पाऊस चालू होता. मग एका फक्कड हाटेलात गेलो. गरमा-गरम #मिसळ खायची हुक्की आली. “हाटेल” हे हाटेलच होतं अगदी. कोणीतरी पूर्वजांनी सुरू केलेला गल्ला पुढे चालवत बसला होता एक मनुष्य/इसम. हाटेल जुनं आहे  हे बघूनच वाटलं होतं इथे अस्सल #पुणेरी चवदार काहीतरी भेटेल.

दुकानात हे लोक साले पूर्वजांचे फोटो का लावतात तेच कळत नाही. नेहमी येणार्‍या गिराईकाला, ‘पूर्वीचा गेला, आता व्यवहार माझ्याकडे’ हे लक्षात आणून देण्यासाठी असेल कदाचित. पण तस्वीर तरी जरा चांगली निवडावी. छे! तो फोटोतला कोण जुना म्हातारा मालक, येणार्‍या-जाणार्‍याच्या ताटात बघितल्याप्रमाणे वाटत होतं. मी मागवलेल्या मिसळीकडेही त्याची नजर आहे असं वाटत होतं. मिसळ म्हणजे काय तर, भाडखाऊ ने चहाच्या पात्रात तेलकट रस्सा गरम केला आणि पलीकडे पत्र्याच्या डब्यात केंव्हातरी ठेवलेलं फरसान काढलं. त्यात रस्सा ओतला. कुठूनतरी पाव हजर झाले. एका थाळीत माझ्यासमोर आणून आपटले. दरम्यान फोटोतून जुना मालक #रंभा-उर्वशीमधून फुरसत काढून बघत होताच.

Image result for puneri misal

मला वाटलं, चला चव तरी चांगली असेल. त्या पोर्‍याला वाटीत रस्सा आणायला सांगितला. एखाद्या गुन्हेगाराने जेलमध्ये पोलिसाकडे दारू-सिगार मागवावी आणि पोलीसाने त्याकडे ज्या भावनेने बघावे तसा तो पोर्‍या माझ्याकडे बघत पाठीमागे वळला अन मघाशी उकळलेला रस्सा एका वाटीत आणून माझ्यासमोर आदळला. मला उगाच हसू आलं. मनात त्याला किलोभर शिव्या दिल्या. पण पोट अन जीभ तृप्त झाली असती तर नंतर आशीर्वाद देऊन त्यात संतुलन साधावं असाही विचार केला.

मिसळ जिभेवर ठेवली अन घोर अपेक्षाभंग झाला. निव्वळ रद्दी अन भंगार मिसळ होती. एक-एक घास घेता घेता शिव्या देत होतो. फरसान तर साला फोटोतल्या म्हातार्‍याच्या जमान्यात आणून ठेवलं होतं की काय कोण जाणे! मी त्या म्हातार्‍यालाही शिव्या दिल्या.

म्हंटलं, बघ बाबा तुझ्यामागे काय हाल चालू आहेत तुझ्या धंद्याचे.

तो बिचारा अप्सरेच्या हातून फळं खात म्हंटला असेल, अरे भडव्या मी असतानापेक्षा खूप बरे आहे हे, मी एक्स्ट्रा रस्सा कधीच देऊ दिला नसता.

मी मनातच इंद्रदेवाला विनंती केली आणि म्हंटलं, म्हातार्‍याला शिळे झालेले अंगूर खाऊ घाल म्हणजे हरामखोर ताळ्यावर येईल.

कशीतरी मिसळ संपवली. म्हातारा बघत होताच. लालभडक तेलाचे तवंग आणि त्यात भुसकट झालेल्या फरसानच्या गाठी.

पलीकडच्या टेबलवर कोणत्यातरी कंपनीत वगैरे काम करणारे तीन लोक येऊन बसले आणि काहीतरी मादक-अश्लील गप्पा करत होते. कोणत्यातरी बाईवर त्यांची टीका-टिपन्नी चालू होती. मी जाणीवपूर्वक संथपणा आणला अन कान टवकारून त्यांचं बोलणं डोळे तिसरीकडे ठेऊन ऐकू लागलो. दोन-पाच मिनिटांत पोर्‍याने माझ्या टेबलवर पाण्याचा ग्लास खडकण आपटला. ऐकण्यातील रेषेत तुटकपणा आला. त्याने मिसळीची डिश उचलली. वाटीतील रस्सा घेतला नाही बघून परत तो पोर्‍या माझ्याकडे खुन्नस देऊन बघू लागला. मी ह्या वेळेस हसलो नाही. फार नखरे केले तर त्याच्या मिसळीची औकात काढायची ठरवलं होतं मी. मी त्याच्याकडे तसाच बघितल्याने तो बिचारा गप निघून गेला.

माझ्या डोळ्यासमोर नको तो प्रकार घडला. तो डुक्कर तिकडे जाऊन मघाशी ज्या पात्रात मिसळ तापवली त्यातच मी शिल्लक ठेवलेली मिसळ मिसळली. कुत्रा! माझं डोकं सरकलं. काय खाल्लं म्हणून किळस आली. पलीकडे बेसिनमध्ये जाऊन हात धुतला अन दोन-तीन चुळा भरल्या. समोर लिहिलं होतं, चुळा भरू नका… मी अजून दोन-तीनदा चुळा भरल्या. थंड पावसात मला राग चढला होती. नंतर वाटलं उगाच चुळा भरल्या, पाणी तोंडात घ्यायच्या लायकीचं नसावं.

परत टेबलवर जाऊन बसलो. तोपर्यंत त्या तिघांच्या adult गप्पा संपल्या होत्या. मला वाईट वाटलं. मी एक क्षण बसलो. परत पोर्‍या आला आणि म्हणाला, ‘तहा आणू ता???’ मी ताडकन त्याच्याकडे बघितलं. तिच्या आईला म्हंटलं, हा तर तोतरा!!! मनात जोरजोरात हसलो.

तिकडे फोटोतून म्हाताराही हसतो आहे असा भास झाला मला. मी त्याला म्हंटलं ‘आण’.

मला खरं तिथे पाणी प्यायचीहि इच्छा नव्हती पण ते तिघे पुन्हा काही ‘विषय’ काढतात का याची उत्सुकता तर होतीच शिवाय पोर्‍याची गम्मत पाहायची होती. बिचारा तोंडाऐवेजी डोळ्याने जास्त का बोलतो याचं गुपित कळलं होतं.

चहा आला. मला फार इच्छा नव्हती पण गरम वाफा बघून सहज ओठांवर कप टेकवला तर फक्कड चहाची चव मिसळीच्या रद्दीला लाजवणारी होती. चहा अगदी #खुंखार होता. पावसाच्या भिजण्याने अंगात आलेला तुटकपणा अन आळस चहाच्या एका घोटाने गेला. मस्त घोट-घोट चहा घेतला. त्या तिघांनी परत काही चर्चा केली नाही याचं वाईट वाटलं.

म्हातारा बघत होता, इंद्राला तक्रार केल्याने चहा चांगला भेटला असं वाटलं मला. म्हातार्‍याकडे मी बघितलं नाही. त्या फोटोतल्या विद्रूप चेहर्‍यावर कपाळावर, दोन कानांवर अन गळ्यावर अष्टगंध लावल्याने तो अजूनच विद्रूप झाला होता. मी चहाकडे लक्ष दिलं. समोर दरफलक होता. मिसळ अन चहा धरून ४३ अर्थात त्रेचाळीस रुपये झाले होते. मला आता हसू आवरेना. मी तोंडावर हात ठेऊन हसत होतो. नशीब म्हातारा सोडून अजून कोणी बघत नव्हतं माझ्याकडे.

चहाची चव जिभेवर अन अंगात रेंगाळून झाल्यावर मी पोर्‍याला बोलावलं अन विचारलं, ‘किती झाले?’ मला प्रचंड उत्सुकता होती तो काय बोलतो याची. त्याने बोटावर अन मेंदूत काहीतरी आकडेमोड केली अन उत्तरला, ‘तेतालीस’

मी मनातच आडवा-तिडवा होऊन हसत सुटलो. म्हंटलं, साल्या बघ माझ्याकडे अजून खुन्नस देऊन… बघशील का…

मी न समजून परत विचारलं, किती?

तर तो चिडून म्हंटला मितळ पत्तीस अन तहा आठ… तेतालीस… फोती ट्री…

मी म्हातार्‍याकडे बघितलं, तो तिकडून हसत होता. मी मनात मनमुराद हसून घेतलं अन शेवटी उठलो. तोंड दाबून हसल्याने माझं पोट उडत होतं. त्याचे तेतालीस रुपये दिले. साला मालक तीन रुपये सुट्टे मागत होता. हे लोक धंदा कशाला उघडून बसतात तेच कळत नाही. दिले पैसे अन परत भुरभुर पावसात फिरायला लागलो.

पण वरून वरुण पडत असलेल्या पावसाने अन अंगतील थंडीने शरीरातील पाणी जास्त झालं आहे ते बाहेर काढ असा आदेश मेंदूने द्यायला सुरुवात केली. अर्थात, जोराची लागली होती. थोडसं इकडे-तिकडे आडोसा शोधत होतो. काही सापडलं नाही. शेवटी मग भारत संचार निगम लिमिटेड मध्ये घुसलो. तिथे सगळा भूलभुलय्या. मुतारी होती की खजिना, इतकं लपवण्यासारखं काय होतं त्यात. शेवटी सापडली. रिता झालो.

पुन्हा रिपरिप पावसात भटकंती. अजून ऑफिस मध्ये जायला बराच वेळ होता. मग चक्कर सहज #सारस_बागेकडे वळली.

अण्णा भाऊ साठे जयंती होती. मिरवणुका जोरात चालू होत्या. झिंगाट, मुंगळा वगैरे डीजे गाण्यांवर थिरकणे चालू होतं. कुठल्यातरी कॉलेज मधल्या मुली चौकात उभारल्या होत्या. त्यातली एक उत्साही गाबडी उगाच थिराकायला लागली. तिला आर्ची असल्याचा भास होत होता कदाचित. बिचारी वेंधळटासारखी नाचत होती. मलाही नाचावं वाटत होतं पण भिकारचोटपणा नको म्हणून उगा बघत होतो. रिपरिप पावसात चंगळ चालू होती नाचणार्‍यांची. त्या पोरीने तर कहर केला. आपल्याकडे  नागराज_मंजुळे बघत असेल असं तिला वाटत असावं.

थोडा वेळ फिरलो आणि पुन्हा ऑफिसकडे गेलो. तिथे साधा चहाही विचारला नाही. भर पावसात फुकटाच्या चहाची आस धरणे काही गैर नाही. त्यात मी जरा भिजलेलो होतो. पंधरा मिनिटांत काम झालं. निघालो. मजेशीर अनुभवांच्या यादीत अजून एक भर पडली!

to be continued…

लेखक – अभिषेक बुचके  || @Late_Night1991

पुढचा दिवस…

श्रावण आरंभ

PROMOTIONS
error: Content is protected !!