Tag: पुस्तकप्रेमी

अमृतवेल – वि. स. खांडेकर

अमृतवेल – वि. स. खांडेकर

पुस्तकप्रेमी   ||  पुस्तक समालोचन   ||  वाचन  ||  प्रीती आणि वासना

बर्‍याच महिन्यांनी काहीतरी वाचून पूर्ण झालं. सहा महिन्यांपासून वि. स. खांडेकर यांचं “अमृतवेल” डोक्याशी पडून होतं. वाचायला सुरुवातही केली होती पण फार कंटाळवाण वाटलं. लिहिताना मन अस्थिर असलं तर एकवेळ चालू शकतं पण वाचन करताना मन मोकळंच हवं. एखाद्या पाण्याच्या टाकीप्रमाणे मानसाच्या मनाचीही पुर्णपणे भरून जाण्याची क्षमता असते. जर मन चित्रविचित्र भावनांनी भारलेलं असेल आणि मेंदू तर्‍हेतर्‍हेच्या विचारांनी घेरलेला असेल तर त्याची Intake ची क्षमता संपते. अजून काही नवीन घ्यावं अशी इच्छाच होत नाही. घेण्याचा (म्हणजे वाचनातून विचार वगैरे) प्रयत्न केला तरी Overflow होत असतो. त्यापेक्षा थोडासा रीतेपणा येण्याची वाट बघावी.

खांडेकर यांचं “ययाती” आधी वाचलेलं होतं. तेही सरासरी आवडलं. ते सुमार होतं असं नाही पण, आवड असते प्रत्येकाची. खांडेकर यांच्या लिखाणात नात्यांची गुंतागुंत आणि त्यातून आयुष्याचा मंच चित्रित करण्याचा प्रयत्न असतो. याशिवाय मानवी मन किती चंचल आणि क्लिष्ट आहे हेही त्यातून प्रतीत होत असतं.

अमृतवेल हा एक नीरस वाटणारा प्रवास वाटतो. त्यात सर्वच प्रवासी अतिशय निराशाग्रस्त आणि जीवनाला विटलेले वाटतात. त्यातील जी मुख्य पात्र आहेत त्यांनी “आत्महत्या” ही एक सुखद निवड किंबहुना पळवाट शोधलेली असते. मृत्यू हा किती जवळचा आहे प्रत्येकासाठी याचे संदर्भ वारंवार येत असतात. माणसाला दुखं सहन करण्याची शक्ति नकोच असते. उलट दुखाला कुरवाळत बसून स्वतःच्या अंताची वाट बघण्यातच स्वारस्य वाटू लागतं. पण ते काही काळपुरताच. रात्रीचा अंधारमय प्रहर संपून दिवसाचा प्रसन्न प्रकाश येईपर्यंत ते मळभ तसच राहतं. मानवी मनाला मनोरंजन हवं असतं. काहीतरी नवीन हवं असतं. कधी खेळायचा तर कधी चघळायला! कितीही मोठं दुखं असलं तरी ते काळाच्या ओघात विसरता येतं, त्यासाठी नवीन दुखाची वेदना हवी किंवा प्रेमाची फुंकर घालणारं कोणीतरी सोबती हवा असतो. माणसं चांगली किंवा वाईट आहेत हे आपला त्याच्याकडे बघायच्या दृष्टीकोणावरून ठरतं. एखाद्या प्रती असलेलं ग्राह्य मत हेच त्याची प्रतिमा ठरवतं. पण ती व्यक्ति दुसर्‍या कोणासाठी तशीच असेल असं नाही. माणसागणिक माणसाची प्रतिमा बदलत जाते. याच सर्व मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या गुंतागुंतीचा “अमृतवेल” मध्ये धांडोळा घेतला आहे. येथे अमृतवेल या नावाला बराच अर्थ आहे. एक चित्र आहे त्याला अमृतवेल म्हंटलं आहे. त्यात प्रीतीचा सुगंधही आहे आणि वासनेचा मुर्छित करणारा उग्र दर्पही आहे. आकाशाकडे झेपावणेही आहे आणि पुन्हा जमिनीकडे झुकणेही आहे.

अमृतवेल वाचत असताना ययाती मधील पात्र मध्ये-मध्ये डोकावत होते असं वाटतं. पण ययाती, यती आणि कच्छ तीनही एकाच देवदत्तमध्ये सामावले आहेत अशीही जाणीव होते. ययातीमध्ये मानवी जीवनाचं जे भेसूर वर्णन आहे तेच अमृतवेलमध्येही आहे. प्रेम, प्रीती, वासना, प्रतिशोध, द्वेष, माया, भक्ति या भावनांच्या विविध रंगांनी हे चित्र रेखाटलं आहे. दुसरं म्हणजे, अमृतवेल वाचत असताना ‘साहेब, बिवी और गॅंगस्टार’ या चित्रपटातील काही संदर्भ डोळ्यासमोर आल्याखेरीज राहत नाहीत. मोह संपत्तीचा कितीही असला तरी मायेच्या तराजूत त्याला किम्मत नसते. नंदा, वसू, देवदत्त ही तीन प्रमुख पात्र एकाच जहाजात बसून प्रवास करत असतात. पण हे त्रिकुट परस्परांच्या प्रती किती वेगवेगळे दृष्टीकोण ठेऊन असतात हे वाचकाला टप्प्याटप्प्याने उलगडत जातं. सोबत्यांप्रती मतं बनवताना केवळ डोळ्याला दिसतं ते यावर विश्वास ठेवला तरी नात्यांत दरी वाढत जाते. त्यासाठी मनाची कवाडे उघडी ठेवावी लागतात अन मायेच्या संवादांनी जाणिवेच्या कक्षा रुंद कराव्या लागतात.

पूर्वार्धात कथानक अत्यंत रटाळ वाटतं. काही घटना, नाट्य घडतच नाही. नंदा या पात्राची पार्श्वभूमी आणि मनोस्थिती ठळक करण्यासाठी बराच अवधि जातो. तिथे जीवनाचं तत्वज्ञान आणि वास्तव वगैरे समजावून सांगण्यात संथपणा आला आहे. पूर्वार्ध त्यामुळेच कदाचित कंटाळवाणा वाटतो. पण नंदाच्या आयुष्यात वसू-देवदत्त हे जोडपं आणि त्यांची मुलगी मधुरा येतात तेंव्हा कथेत जिवंतपणा येऊ लागतो. पण रस्ता कितीही सुरेख असला तरी गाडीचा वेग न वाढवल्याने प्रवासात वेगळेपण येत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत संथपणा कथेला ‘कधी एकदा संपते’ या अधीरतेवर नेऊन सोडतो. तेथे लेखकाने वापरलेली वचने, उदाहरणे आणि अलंकारिक भाषा यामुळेच कदाचित वाचक (किमान मी) खिळून बसतो. पुढे काय होणार याची उत्कंठा तर असतेच आणि साजेसे ट्विस्ट सुद्धा आहेत पण एकत्रित परिणामकारकता येत नाही. पण उत्तरार्ध आणि शेवट चांगला झाला आहे. कथेत जी परिस्थिती उभी आणि लेखक ती ज्या कोनातून दाखवतो ते वाचण्यासारखं आहे.

जेंव्हा मानसाच्या आयुष्यात जगण्यासाठी निमित्त राहत नाही तेंव्हा तो मृत्युची वाट बघत बसतो. जेंव्हा दुखं मनातच ठसठसत राहतं तेंव्हा त्याचे प्रतिध्वनी सतत उमटत राहतात. पण जगण्याला उमेद मिळते, कारण मिळतं तेंव्हा मात्र साचलेली नकारात्मकता उफाळून येते अन सकारात्मकतेतं परावर्तीत होते. अमृतवेल तेच सांगते!

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

वाचा भयकथा खालील लिंकवर

https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-m4gdjtXUO2YX 

 

The Chosen One

The Chosen One

    The Chosen One

Author -Manali Gharat

मनाली घरात यांचं “The Chosen One” हे पुस्तक वाचण्यात आलं. खरं तर इंग्रजी पुस्तक फार वाचत (वाचवत) नाहीत. म्हणजे, Harry Potter नंतर कुठलेच इंग्रजी पुस्तकं वाचले नाहीत. पण या पुस्तकाचं नाव “The Chosen One” असं असल्याने आणि Harry Potter सुद्धा The Chosen One असल्याने हे पुस्तक वाचवसं वाटलं.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून पुस्तकात नेमकं काय असेल याचे संदर्भ लागत नाहीत. पण नाव The Chosen One आहे म्हणजे काहीतरी गूढ असेल वाटतं. पुस्तकाच्या Contents मध्ये एकूण 13 chapter दिसतात. त्यावरून असं वाटतं की पुस्तकात विविध कथा असतील, कथासंग्रह असेल. त्यातील पहिला Chapter ‘The Father’ वाचायला सुरुवात केली. आई-वडील-मुलगा अशा त्रिकोणी परिवाराची कथा सुरू होते. पात्रांची ओळख होते. लागलीच दूसरा Chapter वाचायला सुरुवात केली आणि समजलं की पहिल्या भागातील कथाच पुढे सरकत आहे. एकंदरीत कादंबरी आहे हे समजलं. कादंबरी वाचताना एक असतं, एकदा पात्रांच्या आयुष्यात शिरकाव केला, त्यांची गोष्ट वाचायला सुरुवात केली, त्यांची सुख-दुखे समजायला सुरवात केली की शेवट होईपर्यंत थांबावं वाटत नाही. त्यासाठी लिखाण दर्जेदार हवं आणि कथेला गती हवी. येथे दोनहिची सांगड उत्तमरीत्या घातली. योग्य गतीने पुढे जाणारी कथा आणि आणि त्याची मांडणी छान आहे. कुठेही रटाळपणा नाही किंवा कथा थांबल्यासारखी वाटत नाही. अय्यर कुटुंबाची कथा वाचकाला पुढे घेऊन जात असते. कथेत Twist & Turn येत राहिल्याने पुढे काय होणार? हा प्रश्न वाचकाला सतत पडत असतो. एक एक करत एकूण 13 chapter संपतात आणि उलगडतो तो “The Chosen One” याचा अर्थ! शेवटाला जो जर्क आहे तो स्तब्ध करणारा आहे. वाचकाच्या डोक्यात नसलेला शेवट जेंव्हा येतो तिथे लेखक/लेखिकेचं लिखाण जिंकलेलं असतं. लेखिकेला कदाचित शेवट आधी सुचलेला असावा असं वाटतं आणि त्याच्या अवतीभोवती कथा विणली आहे असं वाटतं.

कथा आहे अय्यर कुटुंबाची आणि त्या कुटुंबातील सदस्य आदित्य हा या कथेचा ‘नायक’ आहे. कथेबद्दल फार सांगणं उचित होणार नाही, त्यामुळे पुस्तक वाचतानाच ते पदर उलगडत गेले तर वाचनातील मजा टिकून राहील.

तरुणपणी अनेकांच्या आकांक्षा असतात, स्वप्नं असतात. ती स्वप्नं त्याचा अवकाश हा वास्तविकतेच्या पल्याड स्वतंत्र अस्तित्व राखून असतो. कल्पनेत असलेलं ते विश्व साकार करण्यात तरुणपण खर्ची पडत असतं. ज्याला ते साकार करता येतं तो यशस्वी म्हणवला जातो आणि ज्याला ते मिळवता येत नाही तो आयुष्यभर स्वप्नांच्या जगात हरवलेला असतो. बर्‍याचदा ती स्वप्न आपल्या वंशजाने, अपत्याने पूर्ण करावी असा त्याचा अट्टहास असतो. पण तरुणपनीच वास्तविक जीवनातील तीव्र स्फोटांची धग जर त्या स्वप्नाच्या विश्वाला बसत असेल तर माणूस हतबल होतो आणि कधीकधी त्यातून वेगळीच प्रतिक्रिया बाहेर पडते. आदित्यच्या जीवनातही अशा काही घटना एकामागून एक घडत जातात ज्याचा त्याच्या मनावर खोल परिणाम होत असतो. आपल्याच प्रियजनांनी केलेले आघात मनावर दडपण निर्माण करतात आणि आदित्य नैराश्येच्या, एकटेपणाच्या आणि अविश्वाच्या कोशात गुंफला जातो. तेथेच खरं व्यक्तिमत्व आकार घेत असतं. कथेत अशा काही प्रभावी घटना आहेत ज्यामुळे तीव्रता जाणवते. कथेत “नातं” आणि “नातेवाईक” याला वेगळ्या दृष्टीकोणातून दाखवलं आहे. ते थोडंसं गडद वाटत असलं तरी आजच्या काळात ती शक्यता नाकारताही येत नाही. रुंद होत जाणार्‍या अंधार्‍या गुहेतून बाहेर पडल्यावर अचानक लख्खं प्रकाश दिसावा तसं 11-12 chapter मधून दाटलेल्या अंधाराचा शेवट 13 chapter मध्ये होतो.

कथेचा विषय आणि मांडणी चांगली आहे. हळूहळू वाढत जाणारी उत्कंठा हीसुद्धा चांगली आहे. पण कथा अजून वाढावली असती तर शेवटाला जो जर्क बसतो तो आणखीन हेलावून सोडणारा असता. बाकी गोळाबेरीज केली तर नक्की वाचावं असंच पुस्तक आहे. एक नमूद करण्यासारखं म्हणजे, या कथानकावर एक web series येऊ शकते. शेवटून सुरुवात केली तर अफलातून होईल. कारण दृश्य माध्यमात जर हा विषय बघायला मिळाला तर आदित्य, सिया, गौरव, अप्पा वगैरे पात्र उभी करायला, ती बघायला भारी वाटेल. शिवाय scene detailing & description यामधून ही कथा आणखीन रंजकपणे मांडता येईल.

बाकी, मनाली घरत यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा!

@Late_Night1991

मराठी कथा – e – book [Updated]

मराठी कथा – e – book [Updated]

मराठी कथा  ||  मराठी साहित्य  ||  कथासंग्रह  ||  मराठी ई-पुस्तक  ||  माझं लिखाण  || 

Marathi Stories  ||  Short Stories || Story Collection  ||  Marathi e-Book  

गेल्या वर्षी “मराठी कथा” नावाने e-book सुरू करायचा निर्णय घेतला त्यावेळेस फार उत्साह वाटत नव्हता. playstore वर अनेक दर्जेदार लिखानांची e-book असताना त्या गर्दीत आपलं हे पुस्तक कुठेतरी अडगळीतच राहील असं वाटत होतं. माझं जे काही तोडकं-मोडकं लिखाण आहे ते मी “मराठी कथा” या app मध्ये संग्रहीत करायचं असा निर्णय घेतला होता. वाचणारे कोणी असतील-नसतील पण आपली आवड म्हणून आपल्या कथा-लिखाण मी तेथे upload करत गेलो. सुरूवातीला फार प्रतिसाद नव्हता, कारण सुरूवातीला कथाही फार नव्हत्या, विविध शैलीच्या नव्हत्या त्यामुळे वाचक तेथे येत नसावा. पण हळूहळू कथांचा संग्रह वाढत गेला, विविध प्रकारच्या कथा मी जोडत गेलो अन वाचकांना त्या आवडू लागल्या. खासकरून “खिडकी” आणि “नरक्षी” आणि “एक अजनबी हसिना से..”  ह्या कथांना चांगला प्रतिसाद मिळाला. विविध ढंगाच्या कथा असणं किती महत्वाचं असतं याची जाणीव झाली.

     

कसल्याही प्रकारचं लिखाण असेल किंवा कसलीही कला-छंद असेल, तो स्वतःच्या आनंदासाठी आणि समाधानासाठी जोपासला जातो, पण त्याला जर वाहवा मिळाली तर त्या कलेप्रती उत्साह वाढतो. वाचकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया ह्या स्फूर्ती देणार्‍या ठरल्या. अनेकांनी सुधारणा सुचवल्या व त्रुटी दाखवल्या त्यांचा मंनापासून आभारी आहे, कारण त्यातून चुका होण्याचं प्रमाण कमी होत गेलं.

आज “मराठी कथा” मध्ये विविध प्रकारच्या तीसेक कथा आहेत. त्या नुकत्याच update केल्या आहेत. वेळ भेटेल तसं यात अजून भर टाकायची इच्छा आहेच. आज दीड हजार मोबाइल्स वर हे app install आहे, एकूण दहा हजार इंस्टॉल झालेले आहेत… हा आनंद खूप मोलाचा आहे… प्रत्येकाचे आभार…!

 

आजच आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करा… 

https://play.google.com/store/apps/details?id=com.latenight.somethingsamajik.MarathiKatha&hl=en

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

मराठी कथा – अभिषेक बुचके

हूल – भालचंद्र नेमाडे

हूल – भालचंद्र नेमाडे

#हूल  #भालचंद्रनेमाडे  }{  #चांगदेव चतुष्टय – भाग 2  }{  मराठी साहित्यImage result for हूल – भालचंद्र नेमाडे

जग हे खरच भूलभुलय्या आहे. भूलभुलय्याच्या प्रदेशात अडकलेल्या माणसाला अनेक मार्गांची यात्रा करावी लागते. त्यातून सुटण्यासाठी प्रत्येक मार्ग जोखावा लागतो. वाटेत कधी वाटसरु मिळतात, तर कधी साथीदार. कधी निवार्‍याला, कधी आडोशाला थांबल्यावर त्यालाच घर समजून राहायचा लोभही होतो. पण मार्ग सोडता येत नाही. मार्गक्रमण करत राहावं लागतं. मागे राहतात त्या फक्त पाऊलखुणा अन आठवणींचा ओलावा. पुन्हा जगण्याच्या प्रवाहात झोकून द्यावं लागतं… मरणाच्या अंतिम ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी…

#चांगदेव पाटील. कोसला मधील #पांडुरंग सांगवीकरनंतर नेमाडेंच्या कादंबरीतील  नायक. अनेक मान्यवर मानतात की पांडुरंग अन चांगदेव हे दोन भिन्न व्यक्तिमत्व आहेत. काहीतरी साम्य असलं तरी भिन्न स्वभावाचे दोन स्वतंत्र पात्र. पण माणसाच्या आयुष्यात स्थित्यंतरं येत असतात. आयुष्यात भेटत जाणारी माणसं अन घडणारे प्रसंग हे माणसाच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडत असतात. गोंधळलेला अन निराशाग्रस्त असलेला पांडुरंग अनेक भावनात्मक संक्रमणातून अन भावनिक गुंतागुंतीमधून पार पडल्यावर एका अशा पातळीवर पोचतो जेथे त्याला स्वतःला व्यक्त होण्याची एक कला गवसते. ती निराशेतून जन्मलेली असते पण त्याला एक अहंगंडाची किनार असते. पांडुरंग एका कोषातुन दुसर्‍या प्रकारच्या कोषात जाऊन बसतो. भीतीच्या, न्युंनगंडच्या अन निराशेच्या भावनेला तो मुक्तता, भिडस्तपणा अन रांगडेपणात बदलतो आणि जन्म घेतो चांगदेव पाटील!

एका मोठ्या अन एकत्र कुटुंबात जन्मलेला चांगदेव शिकायला मुंबईसारख्या शहरात येतो. लहानपणापासून हुशार असलेला चांगदेव मुंबईत आल्यावर जीवनाशी संघर्ष करू लागतो. आपला बाप बनवाबनवी करून आपल्याला शिकवू पाहत आहे ही सल त्याच्या मनात असते. त्यात एका गूढ आजाराने तो ग्रासल्या जातो. जीवनापेक्षा मरण अधिक प्रिय वाटू लागतो. परिस्थितीशी सामना करण्याऐवजी तो त्यापासून पळत असतो. पण नंतर प्रकाशाचे किरण दिसू लागतात. त्याचा आजार बरा होतो. आता आपण ‘मरून जाऊ’ ते आता आपल्याला ‘जगायला हवं’ असा त्याच्यात बदल होतो. पण मुंबईमधील शुष्क जीवन, तेथे सहन करावा लागलेला त्रास, रोजची जगण्याची धडपड यापासून तो दूर जाऊ बघत असतो. त्याला दूर कुठेतरी गावात जाऊन आरामात आयुष्य जगावं वाटत असतं. आयुष्याबद्धलची एक रोमॅंटिक संकल्पना मनात घेऊन तो वाटचाल करत असतो. जुने सगळे पाश तोडून टाकावे अन नवीन स्वप्नांच्या प्रदेशात जाऊन सहवास करावा असं त्याला वाटत असतं. ते जुनं कळकटलेलं अन दुखाची किनार असलेलं बिढार मागे टाकून तो पुढची वाटचाल करू लागतो. सुंदर अन रम्य कल्पनेच्या विश्वाची चाहूल लागलेली असते. मृत्युने हूल दिलेली असते.. जुनं ओझं विसरून जुनं बिढार तेथेच टाकून तो नवीन अन स्वतःच रंगवलेल्या जगात जात असतो!

चांगदेव एका लहानशा शहरात जाऊन पोचतो. काहीही करून जुन्या आठवणीच्या प्रदेशातून त्याला बाहेर पडायचं असतं, त्यासाठी तो वाट्टेल ते सहन करायची त्याची तयारी असते. स्वतःची ध्येय, आशा-आकांक्षा घेऊन तो येथे आलेला असतो. लाथ मारू तेथे पाणी असा विश्वास त्याच्या मनात असतो. पण लवकरच त्याचा स्वप्नभंग होऊ लागतो. शिक्षणाचं झालेलं बाजरीकरण, जनावरासारखे वर्गात कोंबलेले विद्यार्थी, त्यांना शिकवण्याचा दिखावा करणारे मास्तर, कॉलेजमधील जातीय वातावरण आणि शहरातील कोरडेपणा त्याला असह्य होत असतो. मुंबईतून ज्या सुंदर स्वप्नांचं चित्र रंगवून तो इथे आलेला असतो त्याचा पूर्ण बोजा वाजतो. रोमॅंटिक कल्पनाविश्वाची हूल!!! त्याचे जे आदर्श, तत्व वगैरे असतात ते सगळे खुंटीवर टांगून ठेवायच्या कामाचे असतात असं त्याला वाटू लागतं. आयुष्य हे संघर्ष अन तडजोडी करूनच जगलं जातं हे त्याला दिसू लागतं. रोज उगवून मावळणार्‍या सूर्याप्रमाणे येथेही कटिबद्ध पण अंधारं आयुष्य असतं.

Image result for हूल – भालचंद्र नेमाडे


BUY BOOK WITH DISCOUNT

चांगदेव नीरस आयुष्य जगत असतो. येणारा दिवस पुढे ढकलत असतो. त्या गावात फार पाऊस पडत नसल्याने तेथील राहणीमानात शुष्कपणा त्याला जाणवतो. कार्‍या मुलांना शहरात राहायला जागा मिळत नसते. गावभर लफड्यांचा उत आला आहे असं वातावरण त्याला दिसू लागतं. मग कमरेखालचे विनोद आलेच! इडली-दोसा आणि लिंबू सरबतही मिळत नाही म्हणून त्याचा चिडचिडेपणा वाढत जातो. वर्गात त्याला टारगट पोरं शिकवूही देत नसतात. त्यात कॉलेजमधील राजकरणात त्याला त्रास होऊ लागतो. अशा अनेक कारणांमुळे ज्या सुखाच्या अन समाधानी आयुष्याच्या कल्पना घेऊन तो येथे आलेला असतो त्या खोट्या ठरतात. मुंबईतील जीवनापेक्षा येथील जीवन अधिक नीरस अन भकास आहे हे त्याला पटतं. नेहमीप्रमाणे त्याला येथेही अवलिया साथीदार मिळतात. सतत ‘… असं म्हंटलं तर फार वावगं होणार नाही’ असं म्हणणारा गायकवाडसारखा साथीदार त्याला भेटतो. ते दोघे एकाच लॉजवर राहत असतात. त्या गायकवाडकडे पैसा आहे पण याला लग्नाला किंवा शरीरसुखासाठी पोरगी भेटत नाही. तो सतत त्याच विचारात अन प्रयत्नात गढलेला असतो. शेवटपर्यंत त्याला ते काही भेटत नाही. चांगदेवचे मित्र प्राध्यापक पवार यांच्या कुटुंबाशी त्याचा घरोबा वाढतो. त्यांच्याही आयुष्यात कमी-अधिक प्रमाणात अशाच अडचणी असतात. मग  बोलण्यात सतत ‘काम’विषय येतात. त्यात शिकवण्या घेणारे झोपे हे तर ह्या सगळ्या प्रकरणात मास्टरी केलेले असतात. ह्या सगळ्यांच्या संवादातून गोष्ट पुढे सरकत जाते. कार्‍या असलेल्या माणसाच्या मनातील भाव नेमाडेंनी येथे अगदी व्यवस्थित फुलवले आहेत. गावात फिरताना त्याला गरीबीचं दर्शन होतं. काय परिस्थितीतून मुलं शिक्षणासाठी येतात याचं भान येतं. गरीबीपाई होणारं धर्मांतर याचीही त्याला चीड येते. तो वरचेवर अस्वस्थ होत जातो. मन दुभंगल्यासारखं होतं. तो आतून गलबलायला लागतो. झालेला भ्रमनिरास अन समोर येणारं चित्र यातून त्याची निरसता पुन्हा डोकं वर काढू लागते. तो पुन्हा निराशेत ढकलल्या जातो.

पण अशा अधांरलेल्या आयुष्यात पारू सावनूर नावाची ख्रिश्चन तरुणी येते. त्याचं मन पुन्हा उभारी घेऊ लागतं. अनेकांकडून जिच्याबद्धल बरं-वाईट ऐकलेलं असतं तिच्यात तो गुंतत जातो. तिच्या अबोल डोळ्यात अन मुक चेहर्‍यात त्याला स्वतःचं अस्तित्व जाणवू लागतं. ज्या भौतिक जगापासून तो दूर पळत असतो, तो पुन्हा तिच्यासाठी त्यात गुंतत जातो. पगारातील वर राहिलेल्या पैशांचं काय करावं असा प्रश्न पडणारा चांगदेव काही पैशांसाठी नोकरीवर लाथ मारायला तयार असतो. तिच्यात तो इतका गुंतलेला असतो की त्याला कसलच भान राहत नाही. आपण काय करत आहोत? असा गोंधळून टाकणारा प्रश्न तो स्वतःला विचारतो. पण नंतर त्या दोघांच्या नात्यात दुरावा येतो. हा प्रसंग ज्याप्रकारे घडतो त्यात थोडा नाटकीयपणा वाटतो. मग पुन्हा निराशेच्या गर्तेत तो ओढल्या जातो. खोलीत पडून राहून तो अजूनच अस्वस्थ अन विचलित होत जातो. त्याला काहीही करून गाव सोडायचं असतं. मग पुन्हा पायपीट. गावोगावी नोकरीसाठी भटकणे! त्यात संस्थेचं झालेलं बाजरीकरण त्याचा पुरता भ्रमनिरास करणारं असतं. तो मास्तरी पेशाच्या ज्या स्वर्गकल्पनात असतो त्या धुळीला मिळाल्या जातात. पण ते शहर सोडायचं अन बरं शहर पकडून अगदी झोकून द्यायचं तो ठरवतो. मागे सोडून आलेलं नकोसं बिढार ते मखमली स्वप्नांना हूल असा हा प्रवास पूर्ण होतो!!!

संपूर्ण कादंबरीत चांगदेव हे पात्र अतिशय स्वतंत्ररित्या समोर येतं. नेमाडेंनी त्या पात्राला मुक्त करून त्याला त्याच्या विचाराने वाढायची मोकळीक दिलेली जाणवते. चांगदेव हा हट्टी, अहंकारी तरीही संवेदनशील तरुण आहे. त्याला स्वतःचे तोडकेमोडके का असेनात विचार अन तत्व आहेत. तो केवळ त्याला त्याची ध्येय असली तरी तो आयुष्याच्या बाबतीत गोंधळलेला आहे. तो भिडस्त आहे. संतापी आहे. त्याला परिणामांची पर्वा नाही. नेमाडेंनी ह्या पात्राला एका वास्तववादी तरुनाप्रमाणे प्रस्तुत केलं आहे. कधी दिवसभर अंथरुणावर लोळत असलेला चांगदेव तर कधी उत्साही, संचारी, गावोगाव फिरणारा चांगदेव भेटतो. अत्यंत लहरी. एरवी तुसडेपणा जाणवणारा स्वभाव कधी बदलेल याचीही काही ग्वाही नाही. त्याच्यावर कसलच नियंत्रण नाही. खोली मिळवून दिली नाही म्हणून पवारसारख्या मित्रावर चिडणारा चांगदेव किंवा वर्गात मुलांना बदडणारा चांगदेव किंवा पारू सावनूरशी अलगद वागणारा चांगदेव… कुठेच हिशोबी वागणं नाही! वार्‍यासारखं! नेमाडेंनी चांगदेवला हवं तसं वागायचा, संचार करायचं स्वतंत्र दिल्यानेच असं अजरामर पात्र जन्म घेतलं! तो कुठल्याही पठडीतील नाही… सामान्य तरूनाप्रमाणे तो वागतो येथेच त्या पात्राचा विजय आहे.

ह्या सगळ्यात कौतुक करावं लागेल नेमाडेंच्या शैलीचं. नेमाडेंनी एक-एक पात्रात अक्षरशः जीव ओतला आहे. गायकवाड, पवार, झोपे, शबीर, पारू, प्रिन्सिपल किंवा सरबतवाला मारवाडी… प्रत्येकाचं एक वागणं आहे… स्वतंत्र रूपरेषा… स्वतंत्र अस्तित्व… संपूर्ण कादंबरीत पुरुषांचं कारेपण अन त्यांचं लैंगिक भूक यावर बरच भाष्य आहे. तारुण्यात अतिशय महत्वाची असणारी लैंगिक समाधानाचा मुद्दा नेमाडेंनी बरोब्बर हेरला आहे. येथे कुठेही अडून-अडून भाष्य नाही. प्रत्येक मुद्द्यावर थेट भाष्य आहे. पुरुषाचा स्त्रीकडे बघायचा दृष्टीकोण कसा असावा यावर कसलं तात्विक भाष्य नाही, तर पुरुष बाईबद्धल काय विचार करतात हे वास्तववादी चित्रण आहे. पारू सावनूरची बदनामी असेल किंवा पवारांचं वाड्यातील भाडेकरू बायांशी असलेले संबंध असोत… नेमाडे कोठेच तात्विकतेचे डोस पाजत नाहीत. जे समाजात आहे त्याच्याशी त्यांना कर्तव्य आहे. गायकवाड किंवा झोपेसारखी मंडळी तर स्त्रीसुखासाठी आसुसलेली असतातच. त्यात झोपेसारखी बेरकी लोक स्वतःचं हित कसही साधून घेतात तर गायकवाडसारखी घाबरट शेवटपर्यंत उपाशीच राहतात. पण स्त्रियांकडे कसाही दृष्टीकोण असला तरी शायरी अन दर्दभरे गाणे वाजल्यावर गायकवाडसारखी लोकही प्रेमावाचून अस्वस्थ वाटतात अन बर्फासारखी वितळून जातात. प्रत्येकाच्या मनात एक कोपरा असतो जेथे संवेदनशीलता लपलेली असते. तारुण्य, प्रेम, शरीरसुख यावर अस्सल वर्णन कादंबरीत येतं. पण ते उपदेश किंवा भाषणवजा नसून संवादातून पुढे येतं. मानवी भावनेतून त्याचं मोल उलगडत जातं.

 ALSO READ BHALCHANDR NEMADE’S OTHER NOVELS HERE

नेमाडेंनी येथे जातीयवादावरही भाष्य केलं आहे. केवळ जातीय नव्हे तर धार्मिकही! गरीबी किंवा इतर कारणांसाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले अजूनही परंपरेने हिंदुच आहेत. पण हिंदूंनीच त्यांना परकं केलं आहे असं पारू सावनूरच्या उदाहरणातून समोर येतं. त्यांचं कुटुंब किंवा पूर्वज धर्मांतरीत असतात. पण त्यांच्यातील स्त्रियांना अजूनही हिंदूमध्ये येण्याची आस असते, त्यासाठी ते हिंदू नवरा शोधत असतात. इकडे चांगदेव तिला असा भेटतो जो तिला तिच्या धर्मासहित स्वीकारायला तयार असतो. दोन मन अन दोन धर्म यातील गोंधळलेपण समोर येतं. येथे नेमाडे यांचा देशीवाद विनाकारण लुडबूड करत नाही हे विशेष. हा प्रसंग चांगदेवच्याच नजरेतून घडत जातो. त्यात मग उदारमतवादी असलेले ख्रिश्चन प्रिन्सिपल हेही आले. कॉलेजमध्ये असलेलं राजकारण हेही त्याचच प्रतीक. येथे सर्वात महत्वाचा एक प्रसंग आठवतो. म्हणजे आज मराठा आरक्षण वगैरे मागण्या चालू आहेत त्याच्याशी निगडीत.

गायकवाड, जो लॉजवर चांगदेवसोबत एकत्र राहायचा, त्याचं पवार, चांगदेवचे प्राध्यापक मित्र, यांच्या लांबच्या बहिणीशी लग्न जुळवण्याचं चालू असतं. गायकवाड हे रुबाबदार, पैसेवाले अन त्यांचे काका तर मंत्री… असं कुटुंब. आणि पवार हे मूळ वतनदार. त्यांची लांबची बहिणही एका बड्या घराण्यातील. दोघेही एकमेकांना पसंत करतात, पण त्या मुलीच्या राजघराण्यातील व्यक्ति ह्या गायकवाडच्या इतिहास खणून काढतात. त्यांच्यात कोणीतरी कुणबी अन इतर बाह्य लग्न केलेलं आढळून आल्यावर ही जुळत आलेली सोयरीक मोडते. हा प्रसंग नेमाडेंनी अतिशय गमतीशीर पण प्रामाणिकपणे रंगवला आहे. येथे मराठा-कुणबी-वतनदार वगैरे पदर उघडे होतात. असो.

कादंबरीत कुठे-कुठे अतिरेक होताना जाणवतो. काही प्रसंग असे रंगवले आहेत जे सामान्य जीवनात दुर्मिळतेने घडतात. मध्येच थोडी अश्लीलताही डोकावते. विनाकारण येणारे पाचकळ संवाद अन वात्रटपणाही आहे. अर्थात, तो वाचकाला सुखावून जातो. वाचताना अनुराग_कश्यप चे सिनेमे आठवतात. कुटुंबासोबत बसून न पाहता येण्यासारखे चित्रपट. पण त्यातही एक मिश्किल अन मर्मपणा असतो.
BUY OTHER BOOKS BY BHALCHANDR NEMADE ON FLIPKART WITH DISCOUNT

काही प्रसंग अन क्षण तर अतिशय अभिरुचिसंपन्नतेचा आविष्कार करणारे अन जाणिवांशी भिडणारे आहेत. मनात दाटून येणारी अस्वस्थता अन चलबिचल काही प्रसंगांतून नेमाडेंनी अतिशय खुबीने सादर केली आहे. नेमाडेंचं लेखन म्हणजे केवळ शब्द अन प्रसंग नसून त्यात रोजच्या जगण्याशी निगडीत भावनांचे कल्लोळ दिसतात. त्यांच्या संवेदनशीलातेची खोली प्रचंड आहे. जीवनाने जीवनाला हात धरून मार्ग दाखवावा असा प्रवास वाटतो. ह्या कादंबरीत सुरुवातीपासून सुखाच्या जवळ जाऊन सुखाने हुल द्यावी अशा घटना आहेत. मग ते तात्विक अन आशावादी जीवनाबद्धल असोत, पारू सावनूर असो, गायकवाड, पवार यांचे किस्से असोत.. ते हुरहूर लाऊन जातात… अर्धवट वाटेतच प्रवाशाने प्रवास सोडवा असं काहीतरी वाटतं… पण कादंबरीच्या शेवटाला हुलीमणी काहीतरी सांगतो ते चांगदेवला पटतं… आयुष्य चालतच असतं… तुमची इच्छा असो व नसो…

एकाकी जीवनाचं फॅड असणार्‍या नंतर एकाकी पडत जाणार्‍या जगाशी संघर्ष करत जग समजू पाहणार्‍या तरीही जीवनाला तुरुंग समजणार्‍या संवेदनशील पण फटकळ तरुण मनाचा धांडोळा ह्या कादंबरीत अन एकंदरीतच #चांगदेव चतुष्टय अन नेमाडेंच्या लेखनात आढळतो. कादंबरी आपल्याला हसवते पण तरीही कुठेतरी मनाला हुरहूर लावून जाते. शोकांतिका म्हणजे केवळ रडण्यात अन रडवण्यात नसून ती मनाला भिडणारी असावी; तशीच नेमाडेंच्या नायकाची ती आहे. नित्य जीवनात सामान्यपणे घडणार्‍या प्रसंगातून उकल होणार्‍या भावना हे नेमाडेंच्या शैलीचं वैशिष्ट म्हंटलं पाहिजे. एक वैशिष्टपूर्ण कलाकृती असं म्हंटलं पाहिजे.

आयुष्य जगण्याची रीत असते. पण ती समजावी लागते. कोणाला ती समजता समजता काळ लोटून जातो. केवळ दिवस ढकलत जाणे म्हणजेही आयुष्य असतं? का काहीतरी वेगळ्या कल्पनाविश्वाने भारलेलं स्वतंत्र विश्व असतं? चांगदेव अजून त्यात अडकला आहे. तो भूलभुलय्याचे मार्ग तुडवत पुढे जात आहे. त्याला वाटसरु भेटले, त्यांना मागे सोडून तो मार्गक्रमण करत आहे. त्याचा प्रवास सुरूच आहे…!

प्रत्येकाने एकदातरी वाचावीच!

ALSO READ BHALCHANDR NEMADE’S OTHER NOVELS HERE->

 

वाचा —

जरीला – भालचंद्र नेमाडे

झूल – भालचंद्र नेमाडे

झूल – भालचंद्र नेमाडे

#Zool- Marathi Novel by Bhalachandra Nemade #चांगदेवचतुष्टय भाग ४  }{   मराठी साहित्य  }{ वाचावे असे काही }{ #पुस्तकप्रेमी

भालचंद्र नेमाडे अर्थात साहित्य क्षेत्रातील एक समृद्ध अडगळ! कोसला ह्या स्वतंत्र अभिरुचीसंपन्न असणार्‍या कादंबरीपासून सुरू केलेला प्रवास उत्तरोत्तर अधिकाधिक एका अस्थिर पण जाणिवेच्या शिखरावर जाताना दिसतो. साहित्य क्षेत्रातील नेहमीच्या पाऊलखुणा पुसून त्यांनी स्वतःची अशी संपन्नतेकडे नेणारी वेगळी ओळख जपली. नेहमीच्या कादंबरीचे नियम बाजूला ठेऊन वाचकांशी थेट संवाद साधायची शैली हीच कदाचित त्यांच्या वेगळेपणाची ओळख असेल. माणसाच्या भावामनात उमटणार्‍या शंका आणि विविध वावटळे याची ओळख आपल्याला त्यांच्या लिखाणातून होत असते. कोसला, झूल, बिढार, हुल अशा स्वतंत्र अस्तित्व असणार्‍या अस्सल मराठी मातीतील शब्द हे त्यांच्या कादंबरीचे शीर्षक होतात तेथूनच वाचक वेगळ्याच मानसिकतेत प्रवेश पावतो.

नेमाडेंची ‘झूल’ ही कादंबरी वाचण्यात आली. चांगदेव पाटील, एक तिशीतील तरुण प्राध्यापक एका नवीन शहरात स्वतःचं निरर्थक आयुष्य घेऊन येतो. तेथे त्याची ओळख होते विचारांशी संसार असणार्‍या इतर प्राध्यापक मंडळींशी. भोळे, चिपळूणकर, चांगला देशपांडे, देसाई वगैरे मंडळी ही त्याच्या आयुष्यात एक भाग म्हणून वावरू लागतात. कादंबरीत अमरावती शहरातील पुराणिक नावच्या महाविद्यालयात ही मंडळी प्राध्यापकी करत असतात. पुराणिक हे ब्राम्हण पुढार्‍यांची सत्ता असलेलं ठिकाण. त्यात हे सगळे समानता वगैरे विचारांचे. ह्या लोकांचा संस्थेवरील ब्राम्हण मंडळींशी वैचारिक संघर्ष असतो. चांगदेव मग ह्या सगळ्यात एक भाग म्हणून जगू लागतो. स्वतःच्या पूर्वष्यातील घटना विसरून तो येथे नव्याने जगू लागतो. जगण्याला मार्ग सापडतो पण दिशा नसते. निरर्थक आयुष्य सुरूच राहतं.

जातीने धनगर असलेले भोळे, चांगला देशपांडे, संस्थाचलक माठुराम, ठोसरे, भल्ला, छोटा मेंदू मोठा आणि मोठा मेंदू छोटा असलेलं देशपांडे, कुलकर्णी ला कुकर्णी वगैरे आडंनावांचा वापर म्हणजे नेमाडे यांच्या कौतुक करायला मिळालेली संधीच.

कादंबरीत जातींचा थेट उल्लेख आहे. त्याहूनही पुढे जायचं म्हणजे, यात ब्राम्हण समाजाला नकारात्मक दृष्टीकोणातून दाखवण्यात आलं आहे. धनगर असलेला भोळे हा भिडस्त अन तापट दाखवण्यात आला आहे. तोच विरोधी पक्षनेता असतो. चांगदेव त्यातल्या त्यात तटस्थ असतो असं दिसतं. किंबहुना तो ह्या सगळ्यात पडू इच्छित नसतो. कादंबरीत जातीयता हाच मुख्य विषय असला आणि तसं टोकदार लिखाण असलं तरी त्यातून द्वेष किंवा तिटकारा दिसून येत नाही. ह्यात दोन्ही बाजूचा दृष्टीकोण दाखवण्यात थोडी काटकसर केली आहे. मुलं-मुलं बसल्यावर कॉलेज, प्रिन्सिपल वगैरेंच्या कुचाळक्या जशा करतात त्यातलाच प्रकार यात दिसतो. चार स्त्रिया एकत्र जमा झाल्या की उणे-दुणे सुरू होतात असं म्हणतात, पण पुरुषांच्या बाबतीतही ह्यात फार फरक पडत नसतो. विरोधी गट जमा होतो आणि सत्ताधारी गटाला नावं ठेऊ लागतो तो प्रकार येथे सर्रास दाखवण्यात आला आहे. कादंबरीतील प्रत्येकजण स्वतःला योग्य जागेवर उभा आहे असं समजून बोलत असतो; खर्‍या जीवनातही आपण असेच वागत असतो, आणि हीच कादंबरीची जमेची बाजू आहे. Realistic लिखाण. उगाच अलंकारिक शब्दात पात्रांना अडकवण्याचा प्रयत्न लेखक करत नाही. तुम्ही आम्ही चार-चौघात बोलतो ते विषय, तीच भाषा आणि तोच वात्रटपणा!!!

 

BUY “ZOOL” OF BHALCHANDR NEMADE ON FLIPKART WITH DISCOUNT
भारतात जातीयता नसून ती मनमानात भिनून बसली आहे. जातीला जातीविषयी विश्वास नसतो आणि स्वतःच्या जातीविषय विनाकारण अभिमान असतो. कादंबरीत एक वाक्य आहे, उद्या जर महारांचं राज्य आलं तर निम्मे ब्राम्हण स्वतःला महार म्हणून घेतील! खरं तर यात वास्तव आहे. स्वतःला सत्तेजवळ जाता यावं म्हणून लालची लोक असतातच. त्याला जातीचे संदर्भ नसतात. मानवी स्वभाव असतात. ह्यातूनच जातीयता वाढली आणि टिकली. सत्तेत असणारा वर्ग ह्या न त्या कारणाने स्वतःची सत्ता टिकवतो ज्यात समाजाचं हित अहित फार लक्षात घेतलं जात नाही. कालही तेच होतं, आजही तेच आहे आणि उद्याही तेच राहणार! काल जातीचे संदर्भ होते, आज लोकशाही/हुकुमशाही वगैरेंचे आहेत उद्या ज्ञानाचे असणार?

 

BUY OTHER BOOKS OF BHALCHANDR NEMADE ON FLIPKART WITH DISCOUNT

कादंबरीचा बाज ‘नेमाड’पंथी आहे. सहज, साधी बोली भाषा हे नेमाडेंच्या लिखाणाचं वैशिष्ट. चार मित्र जमल्यावर जे जे विषय चर्चा करतात ते ते ह्यात त्या चौकडीच्या तोंडी आहेत. नेमाडे स्वतःच्या आयुष्यात जेथे व्यक्त होऊ शकले नाहीत आणि जेथे व्यक्त झाले त्या घटना येथे असतील असा माझा अंदाज आहे. अगदी जातीयता, स्त्रिया, हस्तमैथुन आणि काय काय… बाकी मजा तर कादंबरीत आहेतच… कादंबरीत अनेक ठिकाणी अश्लील वाटू शकतं असं लिखाण आहे. चुळबुळे आणि गोगटे हा किस्सा तर कहर आहे. पोफळे बंगल्यातील गमतीजमती, त्याच्या तरुण मुली हे किस्से अनेकन तरुणांच्या आयुष्यात येऊन गेलेले असतात. आदर्शवादी जीवन जगणार्‍या भोळे सरांना लेख-पुस्तक वगैरे लिहिण्यासाठी स्वतःच्या बायका-मुलांना माहेरी पाठवावं लागतं, चिपलुंनकरला गोरी आणि सुंदर मुलगीच बायको म्हणून पाहिजे असते, देसायाला कोड फुटलेला असल्याने तो मनातल्या मनात न्युंनगंड घेऊन जगत असतो असे प्रत्येकाचे प्रश्न असतात. असे प्रश्न जे तुमच्या आमच्या आयुष्यात असतातच. ह्या सगळ्या पसार्‍यात चांगदेव पाटीलही एक असतो. त्याला एक आजार असतो जो त्याचं जीवन नीरस करायला पुरेसा असतो. ह्या सगळ्या दुष्काळात टुरिस्ट हॉटेल वर राहणारी समवयीन राजेश्वरी ही त्याच्या आयुष्यातील हिरवळ! तिच्यासोबत चांगला वेळ जातो हे माहीत असूनही तिच्याशी भेटता न येणं याची असलेली खंत. जगायला काय अर्थ आहे असा प्रश्न प्रत्येकालाच असतो, पण प्रत्येकजण त्याला एक उत्तर शोधून स्वतःच्या मनाचं समाधान करून घेत असतो आणि येईल ते आयुष्य जगत असतो. इतरांना दोष देणं, निराशा, पैसा, समाधान, लैंगिगता वगैरे ह्यातील बाबी अनेकांच्या आयुष्यात असतात; चांगला-वाईट किंवा असेल तसा माणूस आपआपल्या मार्गाने जीवन जगत असतो. मृत्यू हे अंतिम सत्य माहीत असलं तरी निरर्थक मृगजळात जाणीवपूर्वक अडकवून घेऊन तो जीवनाला शेवटच्या सत्यापर्यंत पोचवत असतो. चांगदेवही त्याच प्रयत्नात असतो.

WP_20160227_01_23_23_Proकादंबरीत कोठेही झाकलेपणा जाणवत नाही. जे आहे ते बोलण्यातील स्पष्टपणा असतो त्याप्रमाणे स्पष्टपणे मनाला भिडत जातं असं लिखाण आहे. तसं पाहता कादंबरी म्हणजे जीवनातील प्रसंगांचं वर्णन असतं. सर्वांचं आयुष्य सारखं नसलं तरी प्रत्येकाला एक मन असतं ज्यात स्वतंत्र भावनांचा कल्लोळ चालू असतो. आयुष्यात असे टप्पे अनेक येतात जे कधीच संपू नयेत असं वाटतात. पण भविष्यात त्या टप्प्याकडे बघितलं तर तेथेच आयुष्याची सर्वाधिक कसोटी लागलेली असते आणि तेथेच जीवनाला अर्थ मिळालेला असतो. भोळे सरांची भेट जेंव्हा जुन्या वर्गमैत्रिणीशी होते आणि तिचा नवरा एक सरकारी अधिकारी आहे. त्याची संपत्ती, वैभव पाहून स्वतःच्या आदर्शांचं पीक निरर्थक वाटू लागतं. जेंव्हा माणसाकडे समोरच्याला सांगण्यासारखं काही नसतं तेंव्हा जीवनातील रंग निघून जाऊ लागतो, म्हणून सांगण्यासारखं काहीतरी हुडकण्यात धन्यता मानणारा माणूस असतो. प्रत्येकाच्या प्राथमिकता ठरलेल्या असतात. कोणी दूसरा त्याला काय समजेल हे अलाहिजा. ब्राम्हण संस्थाचालक यांना नावे ठेवणारी मंडळीमध्ये ब्राम्हणही असतातच. त्यात सत्तेची फळे चाखता यावी म्हणून ईकडून तिकडे जाणारी लोकही असतात. चार बहीणींची लग्ने असतात म्हणून नेहमी दबून राहणारा देशपांडेही समोर येईल ते सहन करत दिवस काढत असतो. उपकुलगुरूपद मिळावं म्हणून राज्याच्या सरकारला अडचणीत असणारे माठुराम आणि त्यांचे समर्थकही असतात. कादंबरीत ब्राम्हण वृत्तीला दोष देण्यात आला आहे. अर्थात तो एका बाजूच्या दृष्टीकोणातून केलेली समीक्षा आहे. प्रत्येकाला एक बाजू असते. ती चूक की बरोबर कोण ठरवणार?

शैक्षणिक संस्था, विद्यापीठे ही राजकारण्यांची अन राजकारणाची अड्डे आहेत ही जुनीच परंपरा आहे आजची नव्हे हे ह्या कादंबरीतून अधोरेखित होतं. तरुणांना राजकारणासाठी वापरलं जातं हेही जुनंच सत्य आहे. शिक्षण कमी आणि भानगडी जास्त अशी विद्यालये, महाविद्यालये आपल्याकडे कमी नाहीत, त्याचं उदाहरण म्हणजे कादंबरीतील घटना.

नेमाडेंची शैली, कथेचा जिवंतपणा, स्वतःच्या जीवनातील काही प्रसंगाशी समरस होण्यासाठी असेल किंवा मनाच्या गाभर्‍यातील जाणिवेला वाट करून देण्यासाठी असेल. अस्सल अभिरुचिसंपन्न साहित्य. एकदा ही कादंबरी वाचलीच पाहिजे.

 

भालचंद्र नेमाडे: साहित्य क्षेत्रातील एक समृद्ध अडगळ!

बिढार – भालचंद्र नेमाडे

वाचा संपूर्ण चांगदेव चतुष्टय:-

error: Content is protected !!