Tag: प्रेम

संवार लूं – प्रेमकथा

संवार लूं – प्रेमकथा

मराठी कथा   ||  मराठी साहित्य   ||  प्रेम  ||  मृगजळ  ||

झोपेत कोणती स्वप्नं बघावीत हेसुद्धा आपल्या हातात नसतं. मग रोज बदलत जाणारं आयुष्यतरी हातात ठेवण्याचा अट्टहास का करावा! डायरीची पानं उलटली तर एकतरीअनोळखी कोपरा सापडतोच जो विचार करायला भाग पाडतो. हरवलेलं खूप दिवसांनी सापडलं की ते आपलंच होतं का हा प्रश्न पडतोच…

Related image

https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%82-3FeYUi1aenl7

 

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

अजून कथा वाचा…

प्रवासयोग

 

ती सध्या काय करते?

ती सध्या काय करते?

हरवलेलं प्रेम वगैरे शोधताना…

ती सध्या काय करते? Ti Sadhya Kay Karte? मराठी चित्रपट Marathi Movie Review

Director – Satish Rajwade

Actors – Ankush Cahudhari, Tejashri Pradhan, Urmila Kothare, Arya Ambekar, Hruditya Rajwade Nirmohi Agnihotri, Isha Phadke and Abhinay Berde WITH Sanjay Mone, Sukanya Mone and Tushar Dalvi.

मृगजळ, गैर, मुंबई-पुणे-मुंबई, प्रेमाची गोष्ट, एक डाव धोबीपछाड आणि पोपट यासारख्या विविध ढंगाच्या कलाकृती देणारा दिग्दर्शक सतीश राजवाडे ती सध्या काय करते? हा मराठी प्रेमपट घेऊन आला आहे. ती सध्या काय करते? ह्या नावानेच प्रेक्षकाला साद घातली आहे. आयुष्यात अपूर्ण राहिलेल्या प्रेमाची उदाहरणे प्रचंड आहेत. त्या प्रत्येकाला हा चित्रपट बघायची घाई झाली असणार यात शंका नाही. आपण जिच्यावर एकेकाळी जिवापाड प्रेम केलं ती आज काय करत असेल असे प्रश्न प्रेमभंग्या लोकांना अधून-मधून पडत असतात. केवळ तिचं असलेलं नाव जरी कुठे ऐकलं तरी कान टवकारले जातात अन काळजाचे ठोके वाढू लागतात. सतीश राजवाडेने ह्या सगळ्याचा विचार करूनच चित्रपट निर्माण केला आहे.

गोष्टीची सुरुवात होते जुन्या मित्रांच्या गेट टुगेदरपासून. त्यात जुने फोटो बघता-बघता अनुराग (अंकुश-अभिनय-हृदित्य) ला तिचा अर्थात तन्वीचा फोटो दिसतो अन आठवणींचा पेटारा उघडला जातो. चित्रपटाच्या सुरूवातीलाच गोष्ट वेगाने पुढे सरकू लागते.

अनुराग लहान असताना (हृदित्य असताना) ज्या सोसायटीत रहायचा तिथे तन्वी व तिचं कुटुंब रहायला येतं. पहिल्या नजरेत अनुरागचं तिच्यावर प्रेम जडतं. मग नेहमीप्रमाणे घटना घडतात. अनुरागचं तिच्या वडलाशी पंगा, मग मनोमीलन, अनुराग-तन्वी यांच्यात झालेली गट्टी, एकमेकांना मनापासून ओळखणं वगैरे. नंतर जरा वयात येताच अव्यक्त प्रेम; नंतर क्षुल्लक कारणावरून ‘निकल जाव मेरी जिंदगी से’ वगैरे. त्यानंतर पश्चाताप. पण वेळ निघून जाणं. मग पुन्हा भेटणं. असा प्रवास!

चित्रपटाची कथा एकदम साधी आहे. त्यात नावीन्य असं काहीच नाही. अव्यक्त प्रेम यावर जास्त भर दिलेला आहे. यावर आधीही बरेच चित्रपट आलेले आहेत. शिवाय, चित्रपटाच्या कथेत बर्‍याच उणिवा आहेत. पण याचा अर्थ असा नाही की चित्रपट पडला आहे. चित्रपट पूर्णवेळ तुम्हाला धरून ठेवतो. चित्रपटाचा लुक, कलाकार अन मांडणी चोख असल्यामुळे काहीच असह्य वाटत नाही. उलट हळुवारपणे घडत जाणार्‍या घटना बघत प्रेक्षक खिळून राहतो. चित्रपट चांगला का वाईट हे ठरवताना मात्र फार विचार करावा लागेल. कारण कथा अर्धवट अन चुकल्यासारखी वाटते. एक तर मध्यंतरापर्यन्त ज्या घटना घडताना दाखवल्या आहेत त्या आजवर आपण अनेक चित्रपटांत बघितल्या असतील. ते दोघे लहान वयात जसं वागतात ते ‘नेमकं असं होतं का?’ असंही तुम्हाला वाटू शकतं. कारण लहान मुलांतील प्रगल्भपणा हा वेगळा विषय आहे. त्यानंतर ते दोघे तरुण झाल्यावर, हे असंच असतं असंही तुम्ही बिनधास्त म्हणाल.

अनुराग हा पुर्णपणे गोंधळलेला अन भरकटलेला मुलगा आहे आणि तन्वी ही अतिशय समजूतदार आणि त्याला पुर्णपणे ओळखणारी आहे. तिचं त्याच्याशी वागणं हे जवळजवळ त्याच्या बायकोसारखंच वाटतं. तन्वी त्याच्याबाबतीत काकुबाई वगैरे असते. अनुरागचं लहानपणापासून तिच्यावर प्रेम असतं पण कॉलेज विश्वात येताच त्याला अनेक ‘पर्‍या’ खुणावत असतात. त्यात तो मोहिनी, अंजली यांच्याही तो प्रेमात पडतो. पण ते त्याचं केवळ आकर्षण असतं. चित्रपटात हे सगळं फारच वरवर दाखवण्यात आलं आहे. अनुराग लहानपणापासून तिच्या प्रेमात असतांनाही मग इतरांच्या प्रेमात कसा पडतो? हे स्थित्यंतर कुठेही दिसत नाही. बरं, त्याला तन्वीही आवडत असते. तो तिलाही प्रेमपत्र देतो. अनुरागसोबत लेखकही ह्या वर्तुळात जरासा गोंधळल्याप्रमाणे वाटतो. इकडे तन्वी त्याची बेस्ट फ्रेंड असते, तीही आवडत असते आणि इतर मुलीही. हे सगळं जरा भयंकरच वाटतं. मग शेवटी अनुरागला उमगतं की तन्वी हीच खरी आपली ‘प्रेम’ आहे. मग तो शेवटी तिला प्रपोज करायचं ठरवतो. पण त्या दिवशी तो ‘घेतो’ अन अचानक त्याच्यावर चिडतो. मग ‘निघून जा माझ्या आयुष्यातून’ असं वाक्य. हे फारच वरवर वाटतं. अचानक असं काय झालं हेच समजू शकत नाही. तिच्यावर चिडायचं नेमकं कारण काय हे उघडपणे समोर येत नाही. बर, खरं प्रेम असतं तर एकाच सोसायटीत राहणारे दोघे नंतर आयुष्यभर भेटलेच नाहीत असाही समज करून घ्यावा लागतो. कथा मांडताना हे उणेदुवे ठळकपणे दिसणारे आहेत. हे अर्थात प्रेझेंटेशन मागे जरा विरून जातात. कारण बहुतेक प्रेक्षक आतापर्यंत त्याच्याशी किंवा तिच्याशी रीलेट होऊ लागलेला असतो.

चित्रपटाचं नाव जरी ‘ती सध्या काय करते?’ असं असलं तरी चित्रपट ‘त्या’च्या नजरेतून आहे. अनुरागच्या आयुष्यात येणारे प्रेमप्रसंग, त्यात गोंधळून जाणारा अनुराग अन शेवटी एका वेगळ्याच मुलीशी, राधिका (उर्मिला कानीटकर-कोठारे) लग्न करतो. हे सगळे अनुरागच्या आयुष्यात घडणार्‍या घटना अन प्रसंग आहेत. त्यात तन्वी एक भाग आहे असं काही क्षण वाटतं. अनुरागला काय वाटतं आहे हेच येथे जास्त अधोरेखित केलं आहे.

नंतर मग आयुष्याच्या एका टप्प्यावर त्या दोघांची भेट होते. ती परदेशातून परत येते. दोघांचही लग्न झालेलं असतं. दोघांना एकमेकांना बरच काहीतरी सांगायचं असतं पण ते बोलू शकत नाहीत. दोघांच्याही मनात पश्चाताप असतो. जे घडलं ते घडायला नको होतं असं दोघांनाही वाटत असतं. पण अनुरागच्या मनात कुठेतरी पुरुषी लोभही क्षणभर जागा होताना दिसतो. तन्वीला भेटताना बायकोला अंधारात ठेवणं किंवा तिचा नवरा तिला नीट ठेवत असेल का? नसेल तर मी आहे… असे विचारही त्याला शिवून जातात. त्या दोघांनाही, लहानपणी अपूर्ण राहिलेली कथा संपवायची असते. एकमेकांच्या बाबतीत असलेले वेगळे भाव बाजूला सारून पुन्हा पक्के मित्र म्हणून राहायची दोघांची इच्छा असते.

ह्या चित्रपटाचा शेवट कसा होणार हे खूप उत्सुकतावर्धक आणि तितकच महत्वाचं होतं. दोघांचीही लग्न झालेली आहेत. त्यात अनुराग बायकोपासून लपवून तन्वीला भेटतो. बायको त्याची चोरी पकडते. इथे काही क्षण, चित्रपट #सावधानइंडिया #क्राइमपट्रोल वगैरे प्रकारात जातो की काय अशी भीती वाटायला लागते. कारण आत्तापर्यंत निरागसपणे समोर आलेली कथा एका guilt पर्यन्त पोचते का असं वाटायला लागतं. त्याला तसे संदर्भही आहेत. पण अखेर मराठी चित्रपटाला शोभेसा शेवट होतो. संवादातून मार्ग!

संपूर्ण चित्रपट अव्यक्त प्रेम, पहिलं प्रेम अन विसंवाद यावर प्रकाश टाकणारा आहे. चित्रपटात निरागसपणा जपला आहे. पहिल्या प्रेमाच्या किंवा बालपणीच्या प्रेमाच्या आठवणी चांगल्या रंगवल्या आहेत. चांगले मित्र असणारे ती आणि तो नेहमीच मित्र, सोबती किंवा साथीदार होऊ शकत नाहीत. खासकरून प्रेमभंग्या पात्रांसाठी हा चित्रपट म्हणजे मेजवानीच म्हणायला पाहिजे. कारण यात फूल इमोशनचा भरणा आहे. म्हणजे प्रेमात आडकाठी ठरणारा पोरीचा बाप किंवा दूसरा मुलगा, प्रेमपत्र, तिला गाडीवरून फिरवणे, भेटायची विशिष्ट जागा वगैरे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना उगाच आठवणीत वगैरे बुडालेला प्रेक्षक दिसतोच. त्यांना बिचारे म्हणून पुढे जावं लागतं.

चित्रपटाचे संवाद मस्त जमले आहेत. ही जमेची बाजू म्हणावी लागेल. चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे संवाद मनाला भिडतात अन मजाही आणतात. एकदम शेवटी थोडंसं भाषणवजा संवाद सर्वांनाच आवडतील याची मात्र खात्री नाही.

अभिनय:-

चित्रपटात सर्वात उत्तम अभिनय कोणाचा असेल तर तो हृदित्य राजवाडे ह्याचा आहे. लहानपणीच्या प्रेमात जो गोडवा, निरागसपणा अन मिष्किलपणा असतो तो खूपच उत्तम आहे असं म्हटलं पाहिजे. त्याचे हावभाव अन अभिनय याला दाद दिलीच पाहिजे. त्यासोबत असलेली लहपणीची तन्वी हीसुद्धा खूप गोड आहे.

Image result for ती सध्या काय करते?

ह्या चित्रपटाचा मुख्य आकर्षणबिन्दु होता अभिनय बेर्डे; आपल्या लाडक्या लक्ष्याचा मुलगा. तो अभिनयक्षेत्रात अन चित्रपटसृष्टीत पदार्पण करत होता. त्याचा परफॉर्मेंसही चांगला झाला आहे. खासकरून त्याला उत्तम नाचता येतं. अभिनयही चांगला असला तरी उत्तम म्हणता येणार नाही. पण वडलांच्या पाऊलवार पाऊल ठेवायला तो नक्कीच काबिल आहे. त्यात, अधूनमधून त्याच्यात दिसणारी लक्षाची झलक, छबी हीसुद्धा भाळून जाते. तरुणपणातील तन्वीचं काम केलं आहे आर्या आंबेकर हिने. झी मराठीवर लिटिल चंप्स मध्ये ती गायक म्हणून आली होती. ती मूळ गायकच आहे. तिने मात्र निराशा केली आहे. हे तिचं अभिनय क्षेत्रातील कदाचित पहिलं पाऊल. पण तिच्यातला कृत्रिमपणा चित्रपटात जाणवत होता.

आता मोठेपणीच्या अनुराग-तन्वीकडे येऊ. अंकुश चौधरी – तेजश्री प्रधान! अंकुश लगातार वेगवेगळ्या भूमिकेतून आपल्यासमोर येत आहे. त्याच्यात आलेला अनुभवीपणा खूपच महत्वाचा आहे. त्याने उत्तम काम केलं आहे. सोबतच तेजश्रीनेही भावनिक प्रसंग चांगले खुलवले आहेत. तिलाही थम्ब्स अप द्यायला हवेत…

मोजक्याच सीनमध्ये येणारे सुकन्या मोने, संजय मोने, तुषार दळवी यांनी अनुभवी काम काय असतं याची ओळख करून दिली आहे. तिघेही अप्रतिम! सोबतच उर्मिला कोठार (राधिका) हिनेही अनुरागच्या बायकोच्या भूमिकेत मस्त काम केलं आहे. एका प्रसंगात अंकुश दरवाजात असतो अन उर्मिला दरवाजा उघडते, तो प्रसंग खरच उर्मिलाने झकास केला आहे. काही महत्वाच्या क्षणांत पव्याची भूमिका करणार्‍या कलाकारानेही छान काम केलं आहे.

विशेष सांगायचं म्हणजे, कथा जरा कमकुवत असली तरी अभिनयाच्या जोरावर चित्रपट तारल्या जातो. कथेत उणिवा नक्कीच आहेत आणि त्या चित्रपटाला मारक ठरल्या असत्या, पण सतीश राजवाडेसारख्या दिग्दर्शकामुळे त्या झाकल्या गेल्या आहेत असंच म्हणावं लागेल. सतीशच्या विविध विषयांना हात घालायच्या यादीत हा चित्रपट पुर्णपणे बसणार नाही. सतीशनेच ‘प्रेमाची गोष्ट’ नावाचा एक चित्रपट केला होता. तोही अव्यक्त प्रेमाची गोष्ट होती. हा चित्रपट त्या चित्रपटाच्या जरा डावा ठरतो असं म्हणायला पाहिजे. कारण तिथे ज्या जानिवांसकट प्रेमाचं ओलेपण पुढे सरकत जातं त्याचा इथे अभाव प्रकर्षाने जाणवतो. निव्वळ प्रेम हा विषय असणं अन प्रसंगातून ते समोर येणं यात गफलत होते. फोडणी देण्याच्या नादात मूळ तांदूळच चांगला भिजवला नव्हता असंही म्हणू शकतो.

चित्रपटातील गाणी ठीकठाक म्हणावी लागतील. मुख्य गाणं हे उत्तम असलं तरी इतर गाणी रटाळ वाटतात. त्यात चित्रपटात मध्यंतरापूर्वी लागोपाठ येणारी गाणी बघूनही कंटाळा येतो.

                   शेवटी, ती सध्या काय करते? चित्रपट एक अनुभव आहे. पहिलं प्रेम, आठवणी, जुन्या प्रेमाचा ओलावा अशा गोष्टींत ज्यांना आवड असते त्यांनी हा चित्रपट बघायला हरकत नाही. खासकरून जुनं प्रेम घेऊन प्रेमभंगी झालेल्यांनीतर हा चित्रपट बघावाच!!!

एक सांगायचं म्हणजे…

हृदयात वाजे something…

सारे जग वाटे happening…

असतो सदा मी आता dreaming…

latenightedition.in  ||  @Late_Night1991

एक हजाराची नोट

एक संध्याकाळ!

एक संध्याकाळ!

#गणपतीपुळे  }{  #लघुकथा   }{ मराठी कथा   }{  Marathi Story  }{  प्रेम वगैरे  

गणपती पुळेच्या विस्तीर्ण किनार्‍यावर तो एकटाच बसला होता. मावळतीच्या सूर्याने आकाशात लाल-सोनेरी रंगांची उधळण केली होती. समुद्रकिनारी रेतीत पाय बुजवून तो निवांत बसला होता. जुन्या आठवणी जाग्या होत होत्या. खळखळनार्‍या समुद्राच्या फेसाळ लाटा किनार्‍यावर धडकून परतत होत्या. जणू गणेशचरणी नमस्कार करत असाव्या.

पश्चिमेचा थंड वारा सुटला होता. डिसेंबरचा महिना असल्याने चांगलीच थंडी पडली होती. नोटबंदीमुळे काय खरं-खोटं झालं असेल माहीत नाही, पण पर्यटनाला ओहोटी नक्कीच लागली होती. पण अशा रम्य ठिकाणी एकांतात वेळ घालवायला मिळाल्याने तो समाधानी होता.

समोरच्या समुद्राच्या लाटांप्रमाणेच आयुष्यातही अनेक दिवस येऊन गेले होते; अजूनही तसेच जाणार होते. नियतीचे भरती-ओहोटीचे नियम समुद्रालाही लागू होते अन आयुष्यालाही. मधूनच पक्षांचा एक थवा चिवचिव करत समोरून निघून जायचा. लांब किनार्‍यावर पसरलेल्या कचर्‍यापेक्षा त्याचं लक्ष नारळांच्या झाडांवर जास्त होतं.

एकांत खरा जीवघेणा असतो. शत्रूची आवश्यकता नसतेच… पूर्वाश्रमीच चांगलं-वाईट अन उद्याची चिंता दूर असली तरी आजच्या निरर्थक अस्तित्वाचे प्रश्न भेडसावत असतात… जाड काळ्या काडीच्या चष्म्यातून त्याचे बारीक डोळे सैरभैर फिरत असतात. मधूनच एखाद जोडपं समोरून जात होतं. कोणीतरी लहान मुले वाळूचा किल्ला घडवण्यात मश्गुल असतात. चिरंतर साथ देणारा गणपती बाजूला खांद्यावर हात देऊन बसल्याचा भास होतो… सगळं काही स्वप्नवत…

तो जवळजवळ दोन तास तसाच बसून होता. कडाक्याच्या थंडीतही त्याला एक समाधानाची ऊब जाणवत होती. वाळूत खोचलेले पाय आता बधिर पडल्याची जाणीव होते. मध्ये कितीदातरी फोन वाजून गेल्याचं त्याच्या लक्षातही नसतं. तो वाळूतुन पाय बाहेर काढतो. पायांवर असलेला वाळूचा थर बाजूला करतो. काही क्षण वाळूबाहेर काढलेले पाय दुसर्‍याचे आणून बसवल्यासारखे वाटतात त्याला. काही क्षणांसाठी शरीरापेक्षा वेगळ्या जाणिवेत राहणार्‍या पायांची ही अवस्था असेल तर नेहमीच्या परिघातून बाहेर राहणार्‍या मनाची काय अवस्था असेल… त्याला सहजच प्रश्न पडतो. नेहमीच्या कक्षेबाहेर पडणं सोप्पं नसल्याची जाणीव होते.

रात्रीच्या प्रकाशात चमकणारा समुद्र डोळ्यात साठवत तो उठतो. सगळं अंग झटकतो. आळस देतो. पायात चप्पल घालणार असतो तर त्याच्या लक्षात येतं की समोर मघाचपासून लोळणारा कुत्रा त्याच्याच चपलेशी खेळत असतो. त्याला राग येत नाही, उलट बुद्धाप्रमाणे मन शांत अन पवित्र होऊन निघल्याचा आनंद होतो… तो हसतो… कुत्र्याजवळ जातो… चप्पल घेतो… समुद्राच्या पाण्यात धुवून काढतो… चेहर्‍यावर प्रचंड आनंद असतो. काहीतरी मळभ दूर झाल्याप्रमाणे तो ताजा अन उत्साही दिसू लागतो.

तो परतत असतो. मंदिराच्या दिशेने चालत असतो. तोच त्याचं लक्ष एका नारळ-पाणी विकणार्‍या स्टॉलकडे जातं. तिथे एक तरुण मुलगी थांबलेली असते. वार्‍यावर तिचे काळे-भुरकट केस उडत असतात. तोंडात स्ट्रॉ घेऊन ती नारळपाणी संपवत असते. तिचा चंबू झालेला चेहरा तो एकाग्र होऊन पाहत असतो. अंगात काळा टी शर्ट, त्यावर ग्रे रंगाचं स्वेटर अन पांढरी जीन्स. तिच्या गौरवर्णाला अगदी साजेसा पेहराव. तिच्या जास्वंदीच्या पानासारख्या आकाराच्या डोळ्यात बघताना याचे जाड चष्म्यामागचे डोळे हरखून जातात. तो एकटक तिच्याकडे बघत असतो. तिचं मात्र याच्याकडे लक्ष नसतं. पुन्हा एक थंडगार वार्‍याची झुळूक तिच्या मोकळे सोडलेल्या केसांना तिच्या चेहर्‍यावर आणतात अन आपल्या नाजुक हातांनी ती ते बाजूला करते. अगदी फर्र फर्र करून पाणी संपल्यावर तिचा चेहरा समाधानी दिसतो.

तो मुद्दाम तिच्यासमोरून जात असतो. समुद्रात जाताना गुडघ्यापर्यन्त वर केलेली पॅंट तो आठवणीने खाली करतो. केस सावरतो अन चश्मा नाकावर नीट करत तिच्या दिशेने जातो. तिच्या जवळ गेल्यावर तिची नजर त्याच्यावर पडते… तो तर तिच्याकडेच बघत असतो… नजरानजर होते… तो एक मंद हास्य करतो… अनोळखी असली तरीही… तिच्या गोड हास्याची त्याला अपेक्षा असते… पण ती आश्चर्य होऊन त्याला धुडकावून लावते… तो नाराज होऊन सावकाश पुढे जात असतो… थोडीशी निराशा असते…

ती रिकामं नारळ बाजूला कचरापेटीत फेकते. पर्स मध्ये हात टाकते, अन त्याला पैसे देते.

तो दुकानदार म्हणतो, सुट्टे द्या…

ती म्हणते, सुट्टे तर नाहीत… 2000 ची नोट आहे…

पन्नास रुपयांसाठी 2000 चं चिल्लर कसं देता येईल ताई…

तिकडे त्याचे कान टवकरले जातात.

ती दुकानदाराला म्हणते, बघा असले तर… कोणाला विचारा…

तो लागलीच ‘नवस फेडायला यावं लागणार’ म्हणून खट्याळ हसत मागे वळतो…

दुकानदार म्हणतो, दादा सुट्टे आहेत का…?

तो सुट्टे देतो… पण फक्त 1800…

वरचे दोनशे?

दुकानदार म्हणतो, अजून नारळ-पाणी घ्या.

तो टपून असतोच. तिला विचारतो, ‘घेऊयात का?’

ती होकार देते. तिलाही अंदाज येतो. आता मात्र ती मधुर हसते.

व्यवहार संपतो.

ते दोघे बोलत असतात… अगदी मंनापासून…

समुद्रकिनार्‍यावर एक रपेट होते. नंतर ते दोघे गणपतीचं दर्शन घेतात. फिरत फिरत जात असतात.

गावातल्या अरुंद रस्त्यावरून ते दोघे जात असतात. त्याच्या बोलण्यात जरा बुजरेपणा असतो, तर ती निवडक बोलत असते. दोघांच्या चेहर्‍यावर गुलाबी हास्य असतं. पोर्णिमेच्या चंद्राने भरती आलेली असते. ते दोघे बोलत असतात.

ती तिथलीच राहणारी असते.

तू कुठला? यावर तो आधी जरा अस्वस्थ होतो अन नंतर काहीतरी थातुर उत्तर देऊन विषय बदलतो.

त्याचा मुक्काम विनायक लॉज वर असतो. ती मंदीरापासून जवळच राहत असते.

ते संध्याकाळचा बाजार फिरून येतात. लहान अन शांत वाटा फिरतांना मनाच्या वाटा मात्र मोठ्या झालेल्या असतात. वार्‍याने उडणार्‍या तिच्या केसांकडे पाहायचा मोह काही तो आवरू शकत नाही. तीही त्याच्या जाड चष्म्याच्या आतील बारीक पाणीदार डोळे अडून-अडून बघत असते.

ती आपल्या घराकडे जात असते. तोही परतत असतो.

नंबर दिले-घेतले जातात. फक्त ओळख मागे राहते. उद्याच्या जागृतीला स्वप्नांचा मुलामा असतो. चंद्राच्या प्रकाशने चकोर पक्षी धुंद होऊन नाचत-गात असतात. रात्रीच्या शेकोट्या पेटलेल्या असतात, त्यांचा धूर हवेत मिसळत असतो… दूरवरचे आवाज कानाला तृप्त करत असतात…

किनार्‍याला लागलेली लाट पुन्हा विशाल समुद्राच्या कवेत मिसळली जाते!!!

सूचना:- ही फक्त एक काल्पनिक कथा आहे एवढच लक्षात असू देत…

अभिषेक बुचके लिखित }{  @Late_Night1991

ती सध्या काय करते?

वेलांटी डे

वेलांटी डे

विनोदी कथा   ||  हास्य कथा    ||   मराठी कथा    ||  गावाकडली प्यारवाली  Love Story  ||  

स्थळ – गुलाब पार्क

पात्र अर्थात character – आपला हीरो नंदू आणि त्याची हेरोईन नीतू

दिवस – प्रियकरांचा आवडता: valentine day

वेळ – धोक्याची

जागा – मोक्याची

संध्याकाळच्या वेळी नीतू बराच वेळ वाट बघत बसलेली असते (खुलासा: नंद्या आला नाही म्हणून खरोखरच ती खड्डे पडलेल्या वाटेकडे बघत असते) आणि बर्‍याच वेळाने घाम पुसत नंद्या येतो एकदाचा…

नीतू (थोडीशी रागात अन नखरे करत) – आप यहाँ आए किसलीये…?

नंदू (थोडासा गोंधळून) – आपणे बुलाया इसलीए…

नीतू (थोडा राग कमी) – आए है तो काम भी बताइये…?

नंदू (गाणं म्हणत आहे हे लक्षात आल्याने थोडा लाडात येत) – पेहले आप थोडा मुस्कूराइये…

नीतू (आता राग कमी आणि लाड जास्त) – हे काय नंद्या तू आजबी लई उशिरा आलास…?

नंदू – काय करू राणी सॉरी कर मला… म्या लवकर निगालतो गं, पर तिकडं cultural लोक वाट अडवून उभी ठाकली हुती…

नीतू – तू कशाला ‘कचरल’ (अर्थात cultural) लोकांशी नादी लागतो…?

नंदू (हसत) – हे..हे… कचरल नाही गं बाय, cultural असतं ते… ते म्हणजे सांकृतिक रक्षक गं…

नीतू – म्हणजे रे काय बाबा…?

नंदू – अगं… म्हागल्या वेलांटी दिनाला (अर्थात Valentine day… गावाकडं याला वेलांटी दिन म्हंत्यात; कारण एका पिच्चर मदि ह्या दिवशी प्रियकर (दुकान) आणि प्रेयसी (सामान) एकमेकांला वेलांटी घालून बसलेले दाखीवलं व्हुतं तवापासनं गावकडल्या लोकांनी valentine day ला वेलांटी दिन म्हंत्यात… कळलं का भाऊ?) आपला बाळू आन बबीता बसले हुते नं हिथच पिरेम करत… तवा न्हाईका ते परशुरामभौ आनं त्याचे टाळभैरव टोळकं आले हुते आणि पुना मंग पंचाइति म्होरं त्यांना डोरलं बांदून जन्माचं न्हाई का बांदून टाकलं… म्हंजी लगीन लौन दिलं हुतं की त्यांचं…

नीतू (लाजत) – जन्माचं न्हाय.. साता जन्माचं…

नंद्या (भयंकर कल्पनेची व्याप्ती कळल्याने, जरासा घाबरून) – होय… तेच ते…

नीतू (गोंधळून) – आर त्याचं काय मंग…?

नंदू – अगं खुळी म्हणू की काय तुला…

नीतू (लाडाने नाराज होणे) – ए नंद्या…

नंदू – अगं तसं नव्ह… परशुरामभौ सारख्या लोकास्नीच तिकडं मोठ्या शरात म्हंजी पुण्या-मुंबेला cultural protector का काय ते म्हंत्यात…

नीतू (लाड वाढला) – म्हायते लय शाना हाइस… अन तुला कोण सांगितलं समदं…?

नंदू (इकडे-तिकडे बघत) – अग्ग कोणाला काय म्हणू नगस, न्हायतर तोंड उचकटशील कुटतार जाऊन…

नीतू (चिडून) – हो तेवडच काम हाय मला…?

नंदू – माहिती न किती कौतिकाचं हाय आमचं पाखरू… मागल्या येळला तुझ्यासाठी चोरून त्या भीम्याच्या रानावरनं कैरी-चिंचा आणून दिल्या तर गावभर बोंबलात उडाईली होतीस की…?

नीतू (चिडणं संपलं. आता पुन्हा लाजत) – तुझंच कौतिक सांगत हुते की रं मी…

नंदू (चिडून) – ह्या येळेला कौतिक नगं बरं आमाला…

नीतू – बर राहीलं… म्होरं बोल…

नंदू (बारीक आवाजात) – मला बाळूनंच सांगितलं…

नीतू (जोरात) – काय बाळूनंच…

नंदू – सांग वरडुन सार्‍या गावाला… आईला… अगं त्याच्यासोबत तसं झालं नं तवापासनं त्येनं ह्या ईषयावर लई म्हंजी लई अभ्यास केला तिकडं शरात जाऊन… अन आता तिकडं कुठलीतरी संघटना चालीवतो हाय… आपल्यासारख्या पिरमात अडल्या-नडल्या तरुणांसाठी…

नीतू – खरंच…?

नंदू (हसत) – आगं ते जाऊदे चिमणे… मी बघ तुझ्यासाठी काय आणलं हाय तुझ्यासाठी पेशल घरच्या पास्न लपावून… आ…

नीतू (खुशीत) – माझ्यासाठी… दाखीव ना लवकर…

नंदू (शर्टातून पिशवी काढतो) – ह्ये बघ… गुलाबाचं फूल माझ्या फूलपाखरासाठी आणि ह्ये चॉक्लेट…

नीतू (अतिउत्साह) – ह्ये माझ्यासाठी आणलंस तू नंद्या…?

नंदू (रागानं) – न्हाय, तुझ्या त्या रेड्यागत बा साठी…

नीतू (लाडाने रडत) – नंद्या…

नंदू – रडू नको बाय… तुझ्यासाठीच आणलाव ना…. मंग…

नीतू – लय भारी नंद्या… माझं तुझ्यावर लय पिरेम हाय…

नंदू (मनात: हे गिफ्ट दिल्यावर आठवलं व्हय?) – मंग… लग्नाचं जांगड घालती का माझ्यासांग…?

नीतू – अर्र… पर माझा बा… त्यो न्हाय ऐकायचा… तुला उलटा टांगल, रेड्यावर बसवून फिरवल अन नंतर गावची कुत्री मागं लावल…

नंदू (ह्या कल्पनेने आधी घाबरून जातो अन नंतर छाती फुगवून म्हणतो) – त..न…प… तू कशाला घोर लौन घेती जीवाला… म्या हाय नव्ह… बर हे चोक्लेट खल्यावर काय करत्यात माहिती हाय का…?

नीतू (अजाण पोरगी) – नाय… काय करत्यात…?

नंदू – अग्ग… ओठावरली साखर घेत्यात…

नीतू (लाजेने चूर होत) – चल… चावळट कुटचा… मागं उसातली साखर दावतो म्हणून उसात नेलास अन साखर पेरलास… आगाव… दुसरं काही सुचतच न्हाई तुला…

(आधी नीतू थोडी लाजते अन नंतर तीही तयार होते… वेलांटी पडते… ओठावरची साखर घेतल्यावर काही वेळाने नंदू खिशातला फोन काढतो अन ओरडतो)

नंदू – परशुरामभौ ओ परशुरामभौ… या आता इकडं…

(पाच मिनिटात परशुरामभौ येतात… आसपास थांबलेले असावेत…)

नीतू – हे काय नंद्या…

नंदू – अग्ग… घाबरू नगस… म्याच बुलीवलं हाय त्येसणी… आता परशुरामभौ आपल्याला पकडून पंचायती समोर पेस करतील… आपलं लफडं हाय ते सांगतील… घरचे बी हांतील दोन-दोन दोघास्नीबी… आन नंतर… देतील की आपलं लगीन लौन… तुझं माझ्यासंगती जांगड हाय हे समजल्यावर तुला कोण नवरा देईल… तुझ्या बा समोर मीच तेवडा इलाज… मीच संकटमोचक… मनाविरुद्ध का हूईना, त्याला आपलं लगीन लौन द्यावच लागल बग… कस्स…

नीतू (सगळं डोक्यात घुसल्यावर) – लय पोचलेला निगालास रं तू…

नंद्या – प्रेमासाठी एवडं करावाच लागतं चिमणे… प्रेमात समदं माफ असतं…

परशुरामभौ (हात पुढे करून, मोठ्या विश्वासाने) – हं.. बस करा… आता घाबरायचं न्हाय पोरान्नू… औ… मी म्हंटलं म्हंजी तुझा बा काय त्याचा बा बी आडवा न्हाय याचा… आन संस्कृती रक्षण करतानी तुमचं लगीन लौन दिलं की आमचे पक्षातले साहेब बी माझ्यावर लई खुस होतील… आमच्या कारकिर्दीत आणखीन एक मानाचा तूरा… आजपत्तूर त्या बामणापेक्षा चार लगीन जास्तीची जमीवलीत मी… चला माझ्या संगतीनं… त्या बाळू आणि बबीतागत तुमचा बी बार उडवितो किनाय बगा… घरच्या म्हातार्‍याना सांगा, नुक्ती घ्या म्हणावं वळायला… असाबी उद्याचा मुहुरत लय ब्येस हाय, येतानाच पचांग इचारून आलाव… चला बिगि बिगि…

-*-*-*-समाप्त-*-*-*-

सर्व हक्क सुरक्षित @ latenightedition.in  ||  @Late_Night1991

अभिषेक बुचके लिखित “मराठी कथा” e-book मधून…

दशेरी हत्याकांड!

error: Content is protected !!