Tag: भयकथा

मोहजाल- भयकथा

मोहजाल- भयकथा

मराठी भयकथा  || प्रणयकथा लिहिता लिहिता भयकथा घडली  ||  Marathi Short Story  ||  रात्र आरंभ  || अतृप्त आत्मा  || 

 

खूप रात्र झाली होती. दोन अडीच तरी वाजले असावेत. खरं तर वाटेत बस बिघडल्याने मला खूपच उशीर झाला, अन्यथा दहा-अकरा वाजताच पोचलो असतो. बसमधून उतरल्यावर थंडीची तीव्रता आणखीनच जाणवू लागली. बस स्टँड तर अक्षरशः ओस पडलेलं होतं. बसऐवेजी तिथे जनावरेच दिसत होती. दोन चार लोकं इकडे-तिकडे दिसत होती. मध्यम आकार व लोकसंख्या असलेलं शहर असूनही फार गर्दी नसल्याने मला विचित्र वाटलं.

ह्या गावात पहिल्यांदाच आलो होतो. मित्राच्या लग्नाचं निमित्त. तो खूप सांगत होता, कितीही उशीर झाला तरी फोन कर घ्यायला येतो किंवा कोणालातरी पाठवतो, पण उद्याचं लग्न असल्याने सर्वजण गडबडीत असतील असं मला वाटलं. शिवाय इतक्या रात्री त्याला फोन करणं बरोबरही वाटत नव्हतं त्यामुळे मी काही त्याला फोन लावला नाही. थेट मंगल कार्यालयावर जायचं होतं. मंगल कार्यालयाचं नाव व पत्ता व्यवस्थित घेतला होता आणि त्याने location ही whatsappवर पाठवलेलं होतं. शिवाय मंगल कार्यालय map नुसार फक्त दीड-दोन किलोमीटर दाखवत असल्याने चालत जायचं ठरवलं.

बस स्टँडच्या गेटजवळ वॉचमन शेकोटी पेटवून बसला होता. अजून दोन लोकं होती तिथे. मीही शेकोटीजवळ गेलो आणि जरा अंग शेकून घेतलं. वॉचमनशी बोललो तर तो म्हणाला ते मंगल कार्यालय जवळच आहे, पंधरा मिनिटांत चालत जाता येण्यासारखं. मलाही ते ऐकून बरं वाटलं. वॉचमन ने बाजूच्या चहा टपरीवाल्याला जागं केलं. आम्ही सिगार फुकून, चहा वगैरे घेतला. वॉचमन मोफतचा चहा घेऊन खुश झाला आणि चहा, सिगार आणि वॉचमनचेशी बोलून माझाही प्रवासाचा शीण निघून गेला. त्याला धन्यवाद देऊन मी त्याने सांगितलेल्या वाटेने निघालो. सोबत map मदतीला होताच.

Image result for चुड़ैल का फोटो

          येथे थंडी प्रचंड होती. त्यामुळे दूरवरचे गूढ वाटणारे आवाजाही ऐकू येत होते. अंगाला बोचणारी थंडी आणि स्थिर वातावरण!

मी स्वतःशीच बोलत चाललो होतो. उद्याचा दिनक्रम व इतर बाबी डोक्यात मांडत होतो. समोर एक चिंचोळी वाट दिसत होती. मी map तपासाला; ती लहानशी वाट ओलांडून गेल्यावर मोठा रस्ता लागणार होता आणि त्या रस्त्यावरच कार्यालय होतं. मी त्या वाटेवरून जाऊ लागलो. दोन्हीही बाजूंनी जुन्या इमारती होत्या. रंग उडालेल्या आणि पोपडे दिसणार्‍या भिंती, इकडून तिकडे गेलेल्या विजेच्या वाहिन्या,cables, आधीच अरुंद रस्ता अन त्यावर दोन्हीही बाजूंनी वाहने लावलेली, फुटलेल्या जलवाहिन्यांमधून उखडलेल्या रस्त्यावर वाहणारं पाणी अशा स्थितीमुळे मला तो रस्ता खूपच नकोसा वाटत होता. कदाचित हा शॉर्ट कट असावा. पण इथून लवकर निघावं वाटत होतं. मी झपाझप पाऊले उचलत होतो. एक कुत्रं रस्त्याच्या मधोमध उभं राहून विनाकारण एकटच विव्हळत होतं.

मला आता भीती वाटत होती. ह्या रस्त्याने का आलो आहे असं वाटू लागलं. एकतर अनोळखी गाव अन अशी अवेळ. भलतं संकट आलं तर काही निभाव लागणार नव्हता. वाट अडवून जर कोणी पैसे वगैरे लुबडायचा प्रयत्न केला तर काही खैर नव्हती. मी एकदा मागे वळून बघितलं. फक्त काळोख पसरला होता. पलीकडचं टोकही व्यवस्थित दिसत नव्हतं. एखाद्या भुयारातून जात असल्यासारखं वाटत होतं. मी अस्वस्थ होऊ लागलो. माझी नजर आजूबाजूच्या इमारतींवर गेली. एका कुजकट इमारतीकडे माझं लक्ष स्थिरावलं. त्या इमारतीच्या बाल्कनीत एक खिडकी होती, अर्धवट फुटलेली. मी त्या खिडकीकडे बघत पाऊले उचलत होतो तितक्यात एक वेगळीच गहिरी, अनाहूत चाहूल लागली. मन भकास झालं. अंगात थंडी भरून आली. मी त्या खिडकीकडे बघत होतो आणि एक विक्षिप्त चेहर्‍याची बाई तेथून टक लावून माझ्याकडे बघत होती. पिवळसर चेहरा अन काळेकुट्ट डोळे. विखुरलेले केस अन अन… तिला तोंडच नव्हतं… भूत-पिशाच्च-हडळ-डाकीण-आत्मा-प्रेत असे शब्द डोक्यात घुमू लागले. मी डोळे फाडून त्या विद्रूप चेहर्‍याकडे बघत होतो. हृदयाची धडधड वाढली होती अन शरीर मात्र बधिर पडलं होतं. सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता. ती हिडीस आकृती तिच्या काळ्या डोळ्यांनी माझ्याकडे एकटक बघत होती. त्या आकृतीने हात उचलला अन मला प्राणांतिक भीती वाटू लागली. बास!! काळ जणू थांबला होता. त्या खिडकीच्या आतून त्या आकृतीने आपले अभद्र हात बाहेर काढले अन ते माझ्याकडे येत आहेत असा भास मला होत होता. मघाचं ते कुत्रं मोठयाने ओरडत होतं. माझ्या पायात त्राण आले. मी भानावर आलो. हातातील बॅग टाकून मी किंचाळत पळत सुटलो. मागून कोणीतरी पाठलाग करतंय, मला ओढत आहे असं वाटत होतं पण मी धावत होतो. रस्त्याच्या जवळ जात होतो, त्या वाटेवरून दूर.

बराच धावल्यानंतर मी थांबलो. सुटलो म्हंटलं स्वतःला. त्या आठवणीनेही अंगावर काटा आला. मला धाप लागली होती. मी दम खाऊन समोर बघितलं… पुन्हा तीच वाट!!!!

मला समजलं, खेळ आत्ता तर सुरू झालाय. आता कसलीच सुटका नाही. जी भीती माणसाला अगदी लहान वयापसून सतावत असते ती आज माझ्यासमोर उभी टाकली होती. अज्ञाताची भीती असते, पण त्या अज्ञातात जे अगम्य, अघोरी शक्ति लपलेली आहे त्याची जाण मला होत होती. एकांतात असताना माणूस ज्या भीतीने अर्धमेला असतो त्या भीतीचं वास्तव माझ्या डोळ्यासमोर उभं होतं. फक्त ऐकीव असलेल्या घटना आज माझ्यासोबत घडत होत्या. मृत्युपेक्षा भीती ही वरचढ असते. भीतीला कधीच मृत्यू नसतो. जगात जाणिवा, संवेदना किंबहुना सजीव जोपर्यंत आहे तोपर्यंत भीती अमर्त्य असणार!

मी मागे वळून बघितलं. मागेही तीच वाट होती आणि पुढेही तीच वाट. आता मृत्युने मला कचाट्यात पकडलं होतं. भयभीत झालेला मी आता फक्त शरणार्थी म्हणून उभा होतो. कुठल्याही बाजूने मृत्यू आता माझ्यावर झडप घालायला सज्ज होता. पण त्या अपेक्षित मृत्युचा चेहरा विद्रूप अन पछाडलेला असू नये असं वाटत होतं. वाघाच्या पिंजर्‍यात बकरीला सोडावं तशी अवस्था झाली होती माझी.

थरथरत्या शरीराने मी पुढे चालू लागलो. आजुबाजुने अनेक विखारी नजारा मला बघत आहेत अशी जाणीव तीव्र होत होती. हळूहळू मेंदूवर कसलीतरी नशा चढत होती.

मी पुन्हा त्या इमारतीजवळ पोचलो. वर बघायची माझी हिम्मत होत नव्हती, पण मान आपोआप त्या दिशेने वळाली. ती बाल्कनी आता स्वच्छ होती. तिथे बल्बचा मंद पिवळसर प्रकाश पसरला होता. त्या बाल्कनीत एक अतिशय सुंदर, सुरेख अन मादक स्त्री ग्रीलला रेलून उभी होती. अंगावर फिक्कट निळ्या रंगाचा गाऊन दिसत होता. अतिशय गोरी. लालबुंद ओठ लांबूनही दिसत होते. छान, मोठे हरिणीसारखे पण मोहक डोळे. ते रूप बघून मी भारावून गेलो. असं सौंदर्य मी उभ्या आयुष्यात कधीच बघितलं नव्हतं. ऐन तिशीतील ती स्त्री अतिशय कामुक नजरेने माझ्याकडे बघत होती. ती जरा फिरली अन तिच्या देहाचा घाटदार डोलारा मला दिसत होता. तिच्या कमरेवरून अन तिरकस व समोर आलेल्या वक्षांवरून माझी नजर हटत नव्हती. मन आक्रोश करत होतं. ती स्त्री हसून मला बोलावत होती. मनातल्या मनात मी तिचं चुंबन घेऊन तिला बाहुपाशात घेतलंही होतं. ऐन तारुण्यात अशी संधी मी सोडणार तरी कशी!! मी तिच्या भेटीसाठी आसुसलो होतो. तिच्या माझ्या मिलनाचे चित्र मी मनात रंगवलं होतं.

माझं माझ्या शरीरावर काहीच नियंत्रण राहिलेलं नव्हतं. हा सगळा आभासी खेळ आहे हे मेंदूला कोण सांगणार?त्या शक्तीच्या विवरात मी अडकलो होतो. त्या मादक स्त्रीकडे पडणारं प्रत्येक पाऊल मला मृत्युच्या दलदलीत ओढत होतं. माझं भक्षण करून त्या शक्तीला कदाचित स्वतःच्या अस्तित्वाचं वलय वाढवायचं असेल किंवा माझ्या शरीरातील रक्ताचा थेंब न थेंब प्राशन करून ती अतृप्त आकृती आपली भूक भागवू इच्छित असेल. माझं काय होणार हे अघोरी, हिडीस आकृतीने आधीच ठरवलेलं असणार. पण माझ्या वेदनादायी मृत्युशिवाय त्या आकृतीला आपलं इस्पित साध्य करता येणार नव्हतं हेही निश्चित. त्या विक्षिप्त प्रेतात्मा आकृतीला मी पाहिलं तेंव्हाच त्या आकृतीने मला जाळ्यात ओढायचा प्रयत्न केला असणार, पण तिच्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर मी निसटतो आहे हे पाहून कदाचित मला चकव्यात अडकवण्याचा खेळ त्या शक्तीने केला. माझं शरीर आणि मेंदू तर त्या शक्तीने आपल्या वशात केलं होतं.

मी त्या स्त्रीच्या देहाच्या मोहात हळूहळू त्या दिशेने सरकत होतो. माझी पाऊले त्या इमारतीच्या आत पडत होती. एका कुजकत लाकडी जिन्यावरून मी पहिल्या मजल्यावरील त्या खोलीकडे जात होतो जिथे ती कामुक स्त्री होती. मला न रस्ता माहिती होता न तिथे पुरेसा प्रकाश होता; तरीही मी त्या दिशेने जात होतो. कारण माझ्या मेंदूवर प्रभावी असलेली ती शक्ति मला स्वतःकडे ओढत होती. त्या जुनाट घाणेरड्या जिन्यावरून जाताना, विश्वाच्या एका पोकळीतून दुसर्‍या पोकळीत प्रवास करतोय की काय अशी पुसटशी जाणीव मला होत होती. मागून क्षणभर कसलातरी आवाज आला जो माझी पाऊले थांबवत होता, पण तो लागलीच तो लोप पावला.

मी त्या खोलीसमोर उभा होतो. ती फिक्कट निळ्या गाऊनमधील मस्त स्त्री समोर उभी होती. मला बघताच ती शांतपणे हसत होती. त्या हास्यात कसलाही लाजरेपणा किंवा ओढ नव्हती; ते अतिशय हिशोबी अन कुत्सित हास्य होतं. काहीतरी जिंकल्याच्या आविर्भावात असतात तसं. माझ्या घशाला कोरड पडली होती. शरीरात मुंग्या धावत होत्या. कधी एकदा तिच्यावर तुटून पडू असं होत होतं; पण मेंदूतील कुठलातरी भाग अजूनही जागृत असावा जो माझे पाय त्या खोलीत पडण्यापासून रोखत होता. मी तिच्या देहावरून माझी लोभी नजर फिरवत होतो तेंव्हा तिने वरचा गाऊन उतरवला आणि तिचे गोरेप्पान हात मला दिसू लागले. तिचं घाटदार शरीर अजूनच उठावदार वाटत होतं. मी माझे पाय उचलले अन त्या खोलीत जाऊ लागलो. बाहेरच्या किलकिल्या प्रकाशाने तिची सावली खोलीतील भिंतीवर पडत होती. एक विक्षिप्त अन अमानवी पद्धतीची ती सावली होती. पण मला त्याचं भान नव्हतं. मी थेट तिच्या गळ्यात जाऊन पडलो. तिचं उबदार शरीर माझ्या सर्वांगाला स्पर्श करत होतो. माझ्या मेंदूला आता कसलंच स्ववलय राहिलं नव्हतं. भूल दिल्याप्रमाणे मी बेशुद्धीत होतो. मी तिच्या शरीरशी सलगी करत असताना तिच्या शरीराची रूपरेषा बदलली जात होती. ते मोहक, मादक, सुंदर रूप लोप पावत होतं आणि तिथे एक अक्राळ-विक्राळ, विद्रूप अन अमानवी रूप आकारास येत होतं. पण मला त्याचं भान नव्हतं. लहान मूल कसं हातात दिलेल्या चॉकलेटशी खेळत बसतं, पण दुसरीकडे त्याच्यावर उपचार चालू असतात; तशीच माझी अवस्था होती. त्या शरीराला खरं मानून मी त्याच्याशी प्रणय करण्यात व्यग्र होतो, म्हणजे त्या आभासात होतो, आणि इकडे माझ्या शरीराच्या चिरफाड करणारा देह आकार घेत होता.

अत्यंत गलिच्छ रूप ते. पिवळसर शरीर, काळेकुट्ट डोळे, लांब पसरलेले पांढरट केस, वेडावाकडा चेहरा आणि तोंडाच्या ठिकाणी मात्र आता एक गोल अन तीक्ष्ण दात असलेला जबडा दिसत होता. त्या कुबट वासाला मी शरीराचा गुलाबसुगंध मानून ओठांनी चुंबन करत होतो. ते पाशवी हात माझ्याभोवती आवळले जाण्यासाठी सज्ज होत होते. आता मी मृत्युच्या दरवाजात उभा होतो.

एक किंकाळी उमटली अन ते हात माझ्या शरीराच्या आरपार जाणार तेवढ्यात आगीचा एक गोळा त्या विद्रूप चेहर्‍यावर बसला अन ती आकृती किंचाळत मागे कोसळली. एक फटका माझ्या डोक्यावरही बसला आणि ब्रम्हांड फिरून आल्यासारखा मी जागेवर आलो. डोकं खूप दुखत होतं पण ते ताळ्यावर आलं होतं.

मागून कसल्यातरी कवितेच्या, मंत्रांच्या किंवा तत्सम कसल्यातरी ओळी कानावर पडत होत्या. मी मागे वळून बघितलं तर अंधुकपणे मला तो मघाचा वॉचमन दिसला. एका हातात मशाल अन दुसर्‍या हातात भगव्या रंगाचं कापड गुंडाळून तो ते शब्द उच्चारत होता. त्यात वारंवार ‘अग्निदेव’ असा शब्द ऐकू येत होता. मला आठवलं ह्या गावाचं नाव ‘अगनसेव’ आहे.

ती अमानवी आकृती अत्यंत त्वेषाने किंचाळत होती. ती खूप संतापाने आमच्याकडे बघून ओरडत होती. त्या वॉचमनने मला आपल्या पाठीमागे लपवलं आणि ती अग्नि अर्थात मशाल त्या आकृतीच्या दिशेने करत तो ते शब्द उच्चारत होता. आम्ही हळूहळू तेथून बाहेर पडलो. ती आकृती आमच्यामागे येऊ बघत होती पण त्या वॉचमनने ती संधी तिला दिली नाही. अर्धवट जळका चेहरा घेऊन, शिकार सुटली ह्या संतापाने आमचा सर्वनाश करू इछित होती; पण ते शक्य नव्हतं. आम्ही धावतच बाहेर आलो. परतत असताना मी त्या बाल्कनीकडे बघितलं तर मला पुन्हा तिथे ती मोहक स्त्री दिसत होती. पण तो वॉचमन मला ओढून त्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर नेत होता. मी मृत्युच्या दारातून परतलो होतो.

          पहाटे मला जाग आली तेंव्हा मी बसस्टँड मध्येच होतो. वॉचमन माझ्याकडे एकटक बघत होता. मी पुर्णपणे शुद्धीवर आल्यावर आम्ही चर्चा केली. यातून मला एक वेगळच सत्य समजलं. हे गाव अंधारछाया म्हणून कुप्रसिद्ध होतं. इथे नकारात्मक शक्तींचा वास होता. पण एका ऋषींनी अग्निदेवाची उपासना करून देवाला येथे निवास करण्याची विनंती केली जेणेकरून इथला अंधकार कमी होईल. त्यानंतर अग्निदेवाच्या आशीर्वादाने पवित्र झालं आणि मानव येथे राहू लागला. ज्या नकारात्मक शक्ति येथे राहायच्या त्या अग्निला घाबरून लुप्त झाल्या. त्या ऋषींनी तो मंत्र निर्माण केला होता. त्या मंत्राचा उच्चार करताच अग्निदेव त्याला नकारात्मक शक्तींशी लढायला मदत करेल.

वॉचमन म्हणाला, आमचे पूर्वज आधी गावाचे रक्षक होते जे आता आम्ही वॉचमन बनून राहिलो. पण अजूनही त्या शक्तींशी आमचा सामना होतच असतो. तुम्हाला एकटा ह्या रस्त्यावरून जायला सांगितलं तेंव्हाच मला चुकल्यासारखं वाटलं. गावातील मूळ लोक अग्निदेवची उपासना करतातत्यामुळे ते निर्भय असतात, पण तुम्ही बाहेरचे बघून तुमच्यावर त्या शक्ति आघात करतील हे लक्षात आल्यावर मी तुमच्या मागावर आलो. तुम्ही हातातील बॅग टाकून धावत सुटला तेंव्हाच मला गडबड जाणवली. त्यामुळे मशाल घेऊन मी तुमच्या मागावर आलो. वाचलात तुम्ही. ती रक्तपिपासू शक्ति होती. आभासी जाळ्यात अडकवून ती शिकार करते. तुमचा दोष नाही त्यात.

मी देवाचे अन देवाप्रमाणे धावून आलेल्या त्या वॉचमनचे मनापासून आभार मानले. त्याच्यामुळेच मला नवीन जीवन मिळालं होतं. मी बचावलो होतो,पण ही भयानक आठवण मला आयुष्यभर पुरून उरणार होती.

===समाप्त===

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991  || latenightedition.in

“मराठी कथा” android e-book

खालील लिंकवर अजून भयकथा वाचा… 

जोकर – भयकथा : भाग १

जोकर – भयकथा : भाग २

जोकर – भयकथा : भाग २

मराठी कथा  ||  भयकथा  ||  Horror Story   ||  Fear Factor  ||  भय  ||  बागेतील शापित जोकर ||  अतृप्त

सकाळी जाग आली तेंव्हा बायको माझ्यावर प्रचंड संतापली होती.

उठल्यावर माझं डोकं खूप दुखत होतं. मळमळ होत होती. बायकोने लिंबू-पाणी माझ्यासमोर आणून आपटलं अन बडबड सुरू केली.किती प्यावं माणसाने? जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी. रात्रभर ओकत होतात. वाट्टेल ते बरळत होता. ड्यूटी सोडून असं पिऊन पळून आलात तर आहे तीही नोकरी जाईल. मग राहावं लागेल उपाशी. काहीतरी वाटू द्यात. उद्या साहेबाने काढलं कामावरुन तर कुठे जाणार तोंड घेऊन. काय अवतार होता रात्री… बंद करा हो घेणं आता तरी…

तिची कटकट चालू असताना मला रात्रीचा प्रसंग हलकासा आठवला. मला तो स्वप्नाप्रमाणे वाटत होता. एखाद्या भीतीदायक स्वप्नाप्रमाणे! ते खरं होतं की भास मला कळत नव्हतं. पण त्याचं ते विचकट खिदळणे अजूनही कानात घुमत होतं अन त्यानेच माझी शुद्ध आली… मी पुन्हा घाबरलो अन बायकोला सगळं एका दमात सांगितलं.

तिने ते ऐकून घेतलं अन मलाच शिव्या देत म्हणू लागली, तुमचं दारू घेणं काही आजचं नाही मला. आणि आता असल्या थापा का मारताय??? नोकरी सोडायचा विचार आहे का? मग भागणार कसं हो? मी तिला खूप पटवून देण्याचा प्रयत्न केला पण तिने काही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मीही प्यायलेलो होतं हे खरं होतं. कारण आठवड्यातून दोन-तीनदा पिऊनच मी रात्रीची ड्यूटी करायचो. पण काल जे झालं ते खरं होतं याची मला खात्री होती.

मी चटकन उठलो अन तडक साहेबांकडे गेलो. मी रात्रीची ड्यूटी बदलून सकाळची वेळ देण्याची मागितली. त्यांनी कारण विचारलं. माझी इच्छा नव्हती पण हो-नाही करत मला सगळं खरं सांगावं लागलं अन साहेबही भयंकर संतापले.

संजय एकतर दारू पिऊन ड्यूटीवर येता. गरीब माणूस म्हणून मी कधी काही म्हंटलं नाही. पण असला मनमानी कारभार मला नका सांगू. सकाळची वेळ पाहिजे म्हणून असल्या बाता काय मारता… आणि हेबघा, असली कथा जर बाहेर कुठे ऐकवलीत तर माझ्याइतका वाईट माणूस नाही कोण. मला असल्या अफवा नकोत… चार पैसे वाढवून घेण्याचे नाटकं आहेत ही हे काही मला समजत नाही का? हे जर कुठे सांगितलात तर तुमची आहे ती नोकरी तर जाईलच पण गावात दुसरीकडे कुठेही काम मिळणार नाही याची सोय करू शकतो मी… गपचूप काम करा… अन जरा कमी ढोसत चला रात्री… नाहीतर मी तुमच्या मानगुटीवर बसेन…

साहेबांनी माझा पानाउतरा केला. तसं रेकॉर्ड खराब असल्याने माझ्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. पण मीही मग जरा गोंधळून गेलो. काल झालं ते खरं होतं की अति दारू पिल्याने झालेला भास… पण आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं. दारू पिल्यावर स्वप्नातही असला प्रकार कधी दिसला नव्हता. शेवटी विचार करून-करून मेंदू थकून गेला.

नंतर मी दिवसा बागेत जाऊन आलो. त्या जोकरकडे निरखून पाहिलं… दिवसा तरी तसं काही जाणवलं नाही. तेथे सकाळच्या ड्यूटीवर असलेल्या हरदेवला विचारलं, काही गडबड वगैरे? तो नाही म्हणाला. ह्या पुतळ्याकडे लक्ष ठेवा महाग आहे, असं मी सहज म्हणालो अन निघालो.

सूर्याच्या प्रकाशात त्या जोकरचं विदूषकी तोंड फारच अवघडल्यासारखं वाटत होतं.

त्या रात्री मी अतिशय सावधपणे कामावर जायचं ठरवलं. दारूला तर स्पर्शही केला नाही, शिवाय जवळ हनुमान चाळिसाची लहानशी पुस्तिका घेतली अन एक रुद्राक्ष माळही. साडेदहा वाजता मी त्या बागेच्या गेटच्या आत पाऊल टाकलं. मन थरथर कापत होतं. काय होईल ह्या भीतीने हाता-पायाला घाम सुटला होता. गेल्या-गेल्या पुतळ्याकडे बघितलं. तो सामान्य होता. दिवसापेक्षा थोडासा भेसूर वाटत होता इतकच.

मनात भीती होतीच, पण सत्य की भास यात अडकल्याने मीही जरा साशंक होतो.मी रात्रभर अतिशय सावध होऊन फिरत होतो. स्वतःच्या सुरक्षिततेची चिंता असल्याने डोळ्यात तेल अन कानात प्राण आणून मी संपूर्ण बाग फिरत होतो. पण माझं पूर्ण लक्ष त्या जोकरच्या पुतळ्याकडे होतं. अधून-मधून मी त्याच्याकडे एकटक बघायचो.

वार्‍याने पानांची साधी सळसळ झाली तरी काळीज थरथर कापायचं अन पोटात धस्स व्हायचं. पक्षांचे आवाज अन वाळलेल्या पानांच्या कचर्‍यातून सरपटणार्‍या प्राण्यांमुळे होणारे आवाज मनात नको नको त्या शंका उपस्थित करायचे. पण मला तेंव्हाही वाटत होतं की कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेऊन आहे आणि संधी मिळताच ते माझ्यावर झेपावेल.

हातात हनुमानचाळिसा घेऊन मी फिरत होतो. गळ्यात रुद्रक्षांची माळही होती. त्या रात्रीच्या घटनेने किंवा भासाने मी कधी नव्हे ते देव-धर्माच्या वाटेला गेलो होतो. ती संपूर्ण रात्र कडेकोट जागून पहारा देण्यात गेली. काहीच झालं नाही. तो जोकराचा पुतळा तसाच्या तसा होता. पण त्याच्या डोळ्यात बघितलं की ते हिरवट गहिरे डोळे अंगाचं पाणी-पाणी करायचे.

नंतरचे काही दिवसही सामान्य पण दडपणातच गेले. रात्रभर घाबरत अन अखंड सावध राहण्यात वेळ निघून जायचा. सकाळची सोनेरी सूर्यकिरणे मदतीला घवून आलेल्या देवदूतांप्रमाणे वाटायची. असं वाटायचं जणू काही उंदीर-मांजर पकडापकडीचे खेळ चालू आहेत. तो माझ्या मागावर आहे आणि काहीतरी हेतु ठेऊन आहे असं वाटायचं. मधूनच त्याचं ते ठेंगणं रूप, तो अवतार, तो फाकलेला जबडा आठवायचा अन मन विषन्न व्हायचं. मनातून सतत असं वाटायचं की ते जोकर माझ्या जीवावर उठलं आहे.

मनातील भीती जात नसल्याने मी दुसरी नोकरी शोधत होतो. दुसरी नोकरी मिळताच येथून कायमची सुटका करून घेता येणार होती. आयुष्यात इतक्या सावधपणे नोकरी कधीच केली नसेल.

मध्यंतरी एका रात्री बागेतून काठी वाजवत फिरत असताना एक प्रसंग घडला. मी ठक__ठक अशी काठी वाजवत संपूर्ण बाग फिरत होतो. काठीचा आवाज येताच एक मांजर समोर येऊन उभं राहिलं. त्या काळ्या रात्री काळंभोर मांजर समोर आलं. बागेच्या बाहेरून कुत्र्यांचे मोठमोठ्याने ओरडण्याचे आवाज येत होते. मी मनातून खूप घाबरलो. त्या मांजराचे घारे-हिरवे-पिवळे डोळे त्या रात्री खूप भीतीदायक वाटत होते. ते मांजर माझ्या पाठीमागे फिरत होतं. मी जात होतो तेथे ते यायचं. मी त्याला हाकललं तरीही चित्रविचित्र आवाज करत, गुरगुरत ते माझ्यासोबत चालायचं. मग त्या गर्द झाडीच्या वाटेतुन, ट्रॅकवरुन जात असताना मधूनच लहान मुलाच्या हसण्याचा आवाज आला. ते हसणं सामान्य वाटत नव्हतं. कोणीतरी मला चिडवत आहे, माझ्यावर संतापून आहे असं ते हास्य होतं. मी हनुमान चाळिसा काढून मोठ्याने वाचू लागलो. तो आवाज एक-दोनदाच आला.

त्या रात्रीही माझी गाळण उडाली होती. पण खात्री पटली की ही जागा आता शापित झाली आहे, पहिलेसारखी राहिली नाही. ते जोकर याला कारणीभूत आहे का दुसरं काही, ते मला समजत नव्हतं. बागेत कोण हळूच एखादा मुडदा गाडला असेल, किंवा पलीकडे वाहणार्‍या नाल्यात तर नेहमी काहीतरी मेलेलं असतच; कदाचित त्याचा आत्मा भटकत असेल, असे नाही नाही ते विचार मनात येत.

तो हसण्याचा आवाज ऐकून मला काहीतरी आठवलं अन मी धावत त्या जोकरच्या पुतळ्याकडे गेलो. पुतळा जागेवर आहे का हे बघायला. मी लांबूनच तो पाहणार होतो. पुतळा तेथेच होता. पण आज उत्तररात्रीच्या शुष्क प्रकाशात तो पुन्हा भयावह वाटत होता. त्याच्या पाठीमागच्या बाजूला असलेला लहानसा पिवळ्या दिव्यामुळे त्या पुतळ्याची सावली समोरच्या बाजूला पडत होती. ती सावलीही मला खूप भयानक वाटली. खासकरून त्याची हातात हात घेतलेली कृती अन चेहर्‍यावरील हिशेबी भाव यामुळे तो जोकर विनोदी न वाटता खूप बेरकी, घातकी अन कपटी वाटायचा. मला त्याचा खूप राग आला. मी दूर उभा होतो. त्याला चार शिव्या हासडून मी पुन्हा दुसरीकडे गेलो. तशा थंडीत, रात्रीच्या वेळी अन आडवाटेला कसलाही मानवी आवाज हा अशक्यच होता. अन तो आवाज आला की अंगावर काटा यायचा.

दूरवरून येणारे गाड्यांचे आवाज काने तृप्त करत अन मानवी वस्तीची खूणगाठ सांगत. पण कितीही केलं तरी मी एकटाच तेथे असायचो ज्याचं दडपण मला यायचं.

त्या रात्रीचा लहान मुलाच्या हसण्याच्या आवाजाचा प्रसंग मला अजूनच सावध करून गेला. मी आता अखंड सावधपणे फिरायचो. दरम्यान, मी त्या जोकरची इकडे-तिकडे चौकशी केली तेंव्हा समजलं की तो जोकराचा पुतळा एका सर्कसचा आहे. सर्कसचा मारवाडी मालक कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करून मेला अन त्याच्या एक-एक वस्तु लिलाव करून विकून टाकल्या. त्यात हा पुतळा तेथून कोणीतरी विकत घेतला अन ह्या उद्यानाला गिफ्ट म्हणून दिला. त्या पुतळ्याचा इतिहास फार काही बरा नव्हता. आणि ही गोष्ट मला अजून भयभीत करायला पुरेशी होती.

दोन-चार दिवसात मला दुसरीकडे नोकरी लागणार होती. बँकेच्या बाहेर वॉचमन म्हणून काम मिळेल अशी शक्यता होती. पगारही बरा होता. जीवाला चोर-दरोडेखोर यांपासून धोका असला तरी कायमची दहशत पाठ सोडणार होती. कसेबसे चार-सहा दिवस काढावे अन मोकळं व्हावं असं ठरवलं.

त्या रात्री मी शांतपणे उद्यानाच्या गिरट्या घालत होतो. उजव्या हातात काठी, डाव्या हातात हनुमानचाळिसा होती. मी शांतपणे फिरत असताना अचानक पोटात कळ लागली. आज पाहुणे आले म्हणून घरी बोकड कापलं होतं. चापून खाल्लं! पण आता फिरताना पोटात कळ येत होती. मी कंट्रोल करत फिरत होतो पण काही केल्या कंट्रोल होईना. शेवटी बागेच्या कोपर्‍यात असलेल्या स्वच्छतागृहात जायच्या हेतूने मी तिकडे वळलो. घाईघाईत तिकडे गेलो. पोटातून जोराची घंटा वाजत होती. मग मी धावतच तिकडे गेलो. स्वच्छतागृहातील अस्वच्छता कपड्यांना लागू नये म्हणून मी गडबडीने वरचे कपडे काढून आत गेलो.

मोकळं होऊन बाहेर आलो तेंव्हा समोर काढून ठेवलेले कपडे कोठेच दिसेनात. मग लक्षात आलं की मी हातातील बॅटरी, काठी, हनुमानचाळिसा पुस्तिका अन गळ्यातील रुद्राक्ष माळ काढून ठेवली होती. गडबडीत कसलच भान राहिलं नव्हतं. ते सगळं कुठेतरी गायब आहे म्हणजे काहीतरी गडबड होती. धोका होता? मन बेभान होऊन धावू लागलं. मी आत गेल्यावर कोणीतरी येऊन गेलं होतं. कोण? इतक्या रात्रीचं कोण? खरं तर उत्तर पहिल्या क्षणाला मनात आलं होतं पण मन-मेंदू ते मानायला तयार नव्हते.

रात्रीचे बारा वाजून गेले असावेत. मी कान टवकारून प्रत्येक ध्वनी ऐकू लागलो. अंधारात डोळे रोखून काहीतरी शोधत होतो. मला समजलं होतं की हे सामान्य नाही. तो जोकरच हे करत असणार. माझ्या मनातील शंका क्षणात खरी ठरली. आसमंतातून दाही दिशांतून विक्षिप्त हसण्याचा आवाज येत होता. मला तो आवाज परिचित होता! पहिल्या रात्री तोच आवाज माझा पाठलाग करत होता. अंगावर शहारा आला. आता काहीतरी अघोरी होणार हे मी जाणलं होतं. माझ्या डोळ्यांतून पाणी येत होतं. मी धावायचा प्रयत्न करणार पण पायात अवसानच नव्हतं. समोरच्या झाडीतून, अंधारातून एक आकृती येताना मला दिसली. मी एकटक तिकडे बघत होतो. फार विलंब लागला नाही.

ती आकृती माझ्याकडे हात पसरून म्हणाली, मी आलो… आज तर यावच लागेल… चल…तोच… जोकर… त्या रात्री दिसलेला… दुर्दैवाने तो भास नव्हता… तोच बुटका देह, विद्रूप चेहरा, रक्ताळलेला, लांब जबड्यातून बाहेर आलेले पिवळसर सुळे, रुंद कपाळावर गडद काळ्या भुवया अन तीच घातकी हिरवट नजर… माझी भंबेरी उडाली… तो विचकट हसत माझ्याकडे येत होता.

मी स्वतःला सावरत पळू लागलो तसा तो अजूनच आनंदाने अन विक्षिप्त हसत होता. तो शांतपणे माझ्यामागे चालत येत होता. मी त्या उद्यानात सैरावैरा धावत होतो.

सगळे दिवे अचानक बंद झाले. आकाशातून येणारा प्रकाशही नव्हता. आभाळ दाटलं होतं. थंडगार वारं अंगावरच्या घामाला स्पर्शून जात होतं. मागे वळून बघितलं तर त्याचे ते लाल मोजे घातलेले हात लांब-लांब होत माझ्याकडे येत होते. मी ठेचकळत होतो, धावत होतो पण थांबत नव्हतो. समोर झुडुपा-झाडांची गर्दी होती. मी त्या कोपर्‍यात जाऊन बसलो. तोंड दाबून रडत होतो.

तो हसण्याचा आवाज अचानक थांबला. मी काही क्षण शांत बसलो अन मान बाहेर करून अंदाज घेऊन लागलो तेंव्हा मला काहीच दिसलं नाही. अचानक पाठीमागून, त्या झुडुपांच्या अंधारातून एक थंडगार हात माझ्या डोक्यावर आला अन पुन्हा तो थंडगार आवाज,

‘तू वाचू शकत नाहीस आज… माफ कर… चल…’

तो माझ्या बाजूलाच होता. चेहर्‍यावर अभद्र भाव असले तरी तो चेहरा हसरा ठेवत होता. त्याचे हिरवट डोळे माझ्यावर गाडले गेले होते. त्याला इतक्या जवळून पाहून माझी वाचा बसली. त्याचा तो थंडगार हात माझ्या डोक्यावरुन खांद्यावर अन गळ्याकडे सरकू लागला तसा मी सारी ऊर्जा एकवटून मोठ्याने किंचाळत बाहेर पडलो. माझा आवाज बाहेर जाऊन उपयोग नव्हता. मदतीला कोणीच येणार नव्हतं.अंधाराच्या उदरात माझे दुबळे पाय वेडेवाकडे पडत होते अन तो शापित जीव माझ्यामागे लागला होता. माझी छाती भरून आली. मी अडखळत एका जागेवर जाऊन पडलो. खूप दम लागला होता. आजूबाजूला मिकी माऊस, डॉनल्ड डक आणि इतर बाहुले-पुतळे दिसत होते. मी चक्रवलो. मती गुंग झाली. मी जोकरचा पुतळा असायचा तिथे पोचलो. पण त्याच्या जागेवर कोणीच नव्हतं. बागेतील दिवे बंद-चालू होऊ लागले. मेंदू ब्लॉक झाल्यासारखा होत होता. मागून दोन हात माझ्या मानेभोवती आवळले गेले. त्या थंडगार हातांना मी ओळखलं. हे त्याचेच होते. जोकर…

जोकर!!!

हळूहळू तो फास आवळत गेला. ते विक्षिप्त हास्य कानात घुमू लागलं. काहीतरी तीव्र माझ्या पाठीत घुसलं. कदाचित त्याचे दात असावेत… त्याचा जबडा माझ्या शरीरावर सूरीसारखा फिरत होता. अखेर मृत्युने मगरमिठी मारली होती. त्या दिवशी केवळ ईश्वराच्या दयेने वाचलो… नंतरही एकदा वाचलो… पण शेवटी काळ आला होता…

हळूहळू शरीर बधिर होत गेलं, तरीही त्याच्या विक्षिप्त हसण्याचा आवाज कानात घुमत होता आणि ते हिरवट गहिरे डोळे नजरेसमोर दिसत होते. ते थंड हात लक्षात होते. शेवटी अंधाराने घेरलेली प्राणज्योत मालवली.

देहाची पीडा संपली होती. पण आत्म्याचे हाल अजून बाकीच होते. मी त्या पुतळ्याच्या, त्या निर्जीव नसलेल्या पुतळ्याच्या आत होतो. एका अंधार्‍या जगात. तेथे सर्कस चालू होती. अतृप्त आत्मे, काही जबरदस्तीने कैद केलेले तर काही स्वेच्छेने तेथे होते. एक मारवाडी त्यांना नियंत्रित करत होता. त्याची नजर मला खूप हिशोबी अन बेरकी वाटली. तो माझ्याकडे बघून विक्षिप्त हसत होता. रात्रीच्या गडद अंधारात मी त्या पुतळ्याच्या आतून माझाच मृत पडलेला देह बघत होतो. रक्ताळलेला! माझा आत्मा त्या सजीव शरीरातून ह्या निर्जीव नसलेल्या पुतळ्यात येऊन पडला होता. मीच त्या जोकराच्या अंतर्धानात विसावलो होतो!!! आता ह्या जगाची चाकरी सुरू झाली होती!!!

===समाप्त===

कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत. कथा कुठेही वापरण्यापूर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

Copyrights @ Author Abhishek Buchake

सहकारी माध्यम – latenightedition.in

पहिला भाग…

जोकर भाग १ – भयकथा

जोकर – भयकथा : भाग १

जोकर – भयकथा : भाग १

मराठी कथा  ||  भयकथा   }{  Marathi Story   ||   Horror Story  ||  जोकर  ||  अंधार रात्र  ||    थरकाप  || Fear

तो जोकर आल्यापासून मला ही नोकरी नकोशी वाटत होती. त्या निर्जीव पुतळ्यात काहीतरी होतं हे नक्की. काहीही करून मला ही नोकरी सोडणं आवश्यक वाटत होतं. पण दुसरी नोकरी मिळेपर्यंत काही इलाज नव्हता. ज्या दिवशी दुसरी नोकरी मिळेल त्याक्षणी मी इथून, ह्या शापित जागेतून पळ काढणार होतो.

मी संजय. ह्या बागेचा अन त्याला लागून असलेल्या लहान मुलांच्या प्ले-ग्राऊंडचा पहारेकरी आहे. गेली दोन वर्षे मी इथे हेच काम करत आलो आहे. माझी रातपाळीची नोकरी होती. रात्री दहा ते सकाळी सहा-सात वाजेपर्यंत मला इथे रखवलदारी करावी लागायची. तसं इथे चोरीला जाईल असं फार काही नव्हतं किंबहुना रखवाली करावी अशी महाग वस्तु नव्हती. पण बागेत-उद्यानात रात्रीचे कोण दारुडे, जुगारी, गरदुले येऊन बसू नयेत म्हणून माझी नोकरी होती. ह्या जागेची सुरक्षितता माझ्यावर असली तरी माझी सुरक्षितता परमेश्वराच्या हाती होती.

गेल्या दोन वर्षांत मला काही त्रास नव्हता. रात्री बागेत फिरायचो, रखवाली करायचो अन झोप आली तर झोपायचो. बाग बरीच मोठी होती/ गर्द झाडी, बसायला मोठमोठाले कट्टे, बेंच, मध्यात एक मस्त चौथरा होता. बागेत निरनिराळे पुतळेही होते. समाजसेवक, स्वातंत्रसैनिक वगैरे पुतळे विविध ठिकाणी बसवले होते. पलीकडे लहान मुलांच्या खेळण्यासाठी छान बाग-मैदान सजवलं होतं. रंगीबेरंगी फुलांची झाडी होती होती, पाळणे, घसरगुंडी, सी-सॉ आणि बरचकाही होतं. मिकी माऊस, डॉनल्ड डक आणि विविध कार्टूनचे छान गुबगुबीत पुतळेही होते. रात्रभर इथे फिरतानाही मस्त वाटायचं. रम्य जागा होती. झाडी तर अशी होती की पोर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश कधी जमिनीला स्पर्शही करू शकत नसे. दिवसाही छान गारवा असायचा.

पण महिन्याभरपूर्वी तो अभद्र पुतळा आणला आणि हा सगळा खेळ सुरू झाला. एका विचित्र दिसणार्‍या जोकरचा पुतळा तो. पुतळा कसला; अघोरी राक्षस म्हंटलं पाहिजे त्याला. तो पुतळा नव्हता, त्यात प्राण होता पण मानवी नाही, अमानवी, अनैसर्गिक अन अभद्र!!!

ठेंगणा पुतळा. माझ्या खांद्याइतकी त्याची ऊंची. अंगावर रंगीबेरंगी कपडे. पिवळसर कापडावर लाल-हिरवे ठिपके. ढगळ कपडे सगळे. हातात लाल मोजे. डोक्यावर उभट गुलाबी-पिवळी उंच टोपी. चेहरा पावडर लावल्याप्रमाणे पांढराशुभ्र. त्यात मोठाले डोळे. डोळे फारच बेरकी वाटायचे. हिरवट रंगाचे. लांब पसरलेल्या भुवया अन रुंद कपाळ. नाकाच्या ठिकाणी तो लाल रंगाचा बॉल आणि ते विकट हास्य… ते हास्य फारच धडकी भरवणारं होतं.. शिवाय त्या पुतळ्याची, जोकरची अवस्था अर्थात पोजिशन फार विचित्र होती. तो डावा हात उजव्या हातात घेऊन तो चोळत आहे अशी ती पोज होती. एखादा मनुष्य कुठल्यातरी कामाला लागताना उत्साहीपणे हात चोळत जशी पोज करेल तशी ती पोज होती. त्याच्या बुटकेपणामुळे ती पोज फारच बेरकी अन हिशोबी वाटायची.

लहान मुलांना तो पुतळा कसा आवडायचा ते मला कधीच समजलं नाही. इतक्या विद्रूप रूपावर लहानगी मुलं हसूच कशी शकतात, त्यांच्याशी खेळूच कशी शकतात हा प्रश्न मला नेहमी सतावत असे. त्याच्या चेहर्‍यावर फारच विचित्र भाव होते. कसल्यातरी गणितात अडकलेला तो चेहरा वाटायचा. त्या धीरगंभीर चेहर्‍याकडे बघितलं की खूप उदास-उदास वाटायचं. त्या हास्यामागे काहीतरी लपलेलं होतं. त्या डोळ्यात कसलीतरी हाव दिसायची. ते रूप, तो वेश ते रंग हे सगळे फसवे आहेत असं वाटायचं. त्याच्या ह्या चेहर्‍यामागे अतिशय क्रूर आणि घातकी काहीतरी आहे असं मला पहिल्या रात्रीच वाटलं होतं. अगदी पहिल्या रात्रीपासून मला त्याची भीती वाटायची.

मला अजूनही ती रात्र आठवते जेंव्हा त्या जोकरचा पहिला दिवस किंबहुना रात्र होती. नेहमीप्रमाणे मी ड्यूटिला आलो अन बागेत शिट्टी वाजवत फिरत होतो. बारा वगैरे वाजले असावेत. बागेत खूपच गारवा होता. पण सगळीकडे लॅम्प असल्याने काही वाटत नव्हतं. अंगात स्वेटर अन कानटोपी घालून मी फिरत होतो अन फिरत-फिरत मी तिथे, त्या जोकरपाशी जाऊन पोचलो. त्याला पहिल्यांदा बघितलं तेंव्हा मला जाणवलं की तो मिश्किलपणे माझ्याकडे बघत आहे, त्याचे ते हिरवट डोळे माझ्याकडे एकटक लक्ष देऊन आहेत. स्वतःचे हात चोळत असलेल्या पुतळ्याकडे बघितल्यावर मला अंतर्मनात काहीतरी जाणवलं. जणू माझ्या आयुष्यातील सर्व सुख-दुखे हरवून जातील अन मीही एखाद्या निष्ठुर पुतळ्याप्रमाणे स्थिर होईन. मला पहिल्या नजरेतच त्याच्यापासून धोका वाटत होता. चंद्राची चंदेरी-निळे किरणे त्याच्यावर पडत होती अन तो अजूनच घातकी वाटत होता.

मी अंदाज घेण्यासाठी जवळ गेलो. जवळ जात असताना मला अस्वस्थ वाटत होतं. सगळ्या बागेत चिडिचूप शांतता होती. त्याच्याकडे हळूहळू पडत जाणारी माझी पाऊले जणू माझ्या नियंत्रणात नव्हतीच. त्या अंधारात मला केवळ तो एकटा जोकरच दिसत होता. त्याची हिरवट हिशोबी डोळे मला स्वतःकडे बोलावत होते. रातकिडे-रातपक्षांचे आवाजाही हळूहळू माझ्या कांनातून नाहीसे झाले अन अंगावर काहीतरी आवरण आल्यासारखं वाटत होतं. मी त्याच्या समोर जाऊन उभारलो. तो जोकर माझ्या डोळ्यांत एकटक बघत होता. कसलीतरी धग माझ्या अंतर्मनाला जाळत होती असं वाटत होतं. आजूबाजूच्या झाडीत अनेक लोक दबा धरून बसले आहेत अन ते आता सावधपणे माझ्यावर चालून येतील असं वाटत होतं. क्षणात होत्याचं नव्हतं होईल असं झालं होतं. मी अतिशय सावकाशपणे त्या जोकरच्या हाताला हात लावला. त्या लालसर मोज्यांना माझा स्पर्श झाला अन जणू एखाद्या प्राचीन शिळेला हात लावल्याप्रमाणे थंडगार स्पर्श मला जाणवला. अलीकडेच माझे काका वारले होते तेंव्हाही त्याच्या मृतदेहाचा असाच स्पर्श झाल्याचं मला आठवलं. मी ताडकन मागे कोसळलो… गवतावर पडून मी त्याच्याकडे भेदरलेल्या नजरेने बघत होतो. घशाला कोरड पडली होती. मी गडबडीत उठलो अन धावत बागेच्या दुसर्‍या भागात जाऊन बसलो. मला काहीच सुचत नव्हतं. अजूनही माझ्या मागावर कोणीतरी आहे असं वाटत होतं. एकतर त्या मोठ्या बागेत मी एकटाच, रात्रीचे बारा-एक वाजले असावेत आणि अशा स्थितीत माझ्यावर कोणीतरी हल्ला करेल असं मला वाटत होतं.

मी घाबरून कट्ट्यावर बसलेलो असताना अंधारातून दोन हिरवट डोळे माझ्याकडे रोखून बघत असल्याचं मला दिसलं. माझा श्वास वाढत होता. हृदयाचे ठोके इतक्या मोठ्याने-वेगाने पडत होते की त्या बागेच्या दुसर्‍या टोकाला उभारलेला माणूसही तो ऐकू शकेल असं वाटत होतं. तो प्राणी नव्हता किंवा माणूसतर नाहीच नाही. ते काहीतरी वेगळंच होतं. माझी वाचा गेली. मी आता वाचणार नाही असं मला वाटत होतं. ते हिरवट डोळे अतिशय खुनशी भावाने माझ्याकडे रोखून बघत होते. मी हातातील बॅटरी कशीतरी चालू केली अन त्या झाडींकडे प्रकाश टाकला अन बघतो तर मघाचाच तोच जोकर तिथे होता. पण आता त्याचं रूप पहिलेसारखं नव्हतं. डोळे मोठे अन ओठ फाकलेले होते त्यातून लांब-लांब पिवळसर दात बाहेर दिसत होते. त्या उभट टोपीटुन काळे केस बाहेर आले होते. तो बुटका जोकर आपले हात फाकवून माझ्याकडे बघत होता. माझ्या अंगावरचे केस ताठ उभे राहिले. मी मोठ्याने ओरडत त्या निर्जन वाटेवरून, बागेतून धावत सुटलो तो थेट गेटच्या बाहेर जाऊन पोचलो. माझी मती गुंग झाली होती. मी धावत सुटलो. वाट मिळेल तिथे. पाठीमागून विचकट खिदळण्याचा आवाज येत होता. अतिशय विक्षिप्त हास्य होतं ते. सार्‍या आसमंतातून, दाही दिशांनी तो आवाज येतोय असं वाटत होतं मला. तो आवाज हळूहळू जवळ येत होता. मी धावत-धावत घरी पोचलो अन घरात जाताच बेशुद्ध पडलो….

===अपूर्ण=== (दूसरा भाग याच वेबसाइटवर प्रकाशित)

सूचना => कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. ह्या कथेचा वापर करण्यापूर्वी लेखकाची रीतसर परवानगी आवश्यक आहे. ||

All Copyrights Of The Story Reserved @ Author Abhishek Buchake.

सहकारी माध्यम=> http://latenightedition.in/wp/

“खिडकी” एक रहस्यकथा… खालील लिंकवर…

खिडकी: भाग १

“मैथिली”

“मैथिली”

शितल…! जरा लवकर कर मला अॉफिसला जायला उशिर होतोय, माझा रुमाल आणी टाय कुठे ठेवलीयस”? पियुष कपाटात शोधताना बोलला. “अरे तिथेच आहे बघ कपाटात लेफ्ट साइडला निट बघ जरा” शितल टिफीन भरत होती. “बरं का.. चल लवकर तुपण माझ्यासोबत.. काल ठरलय ना आपलं” पियुष शुज घालताना म्हणाला. “हो बाबा.. चल ही बघ झालीच माझी तयारी” शितलने टेबलावरच्या किल्ल्या घेतल्या घरात सगळं बंद केलय याची खात्री केली व कुलुप लावला. पियुषने तोपर्यंत पार्ककिंगमधुन गाडी बाहेर काढली व शितलच्या डोळ्यावर पट्टी बांधत म्हणाला “आज तु खुप खुष होणार आहेस.. एवढ्या वर्षांच आपलंं स्वप्न आज पुर्ण होणार आहे”.
“हो बघुयाच काय देतोय सप्राईज तु”..! शितल आतुरतेने म्हणाली. पियुषने तिचा हात पकडून तिला गाडीत बसवले. तिच्या डोळ्यांसमोरुन हात फिरवुन पट्टी घट्ट बांधल्याची खात्री केली व गाडी सुरू केली.

“पियुष मला नेमकं सांगशील तरी तु कुठे घेऊन जातोय ते”? शितलची उत्सुकता पराकोटीला पोचली. “तिथे पोहोचलो की समजेलच तुला फक्त अर्धा तास वाट बघ”, पियुष समोर बघत बोलला. शितलला काहीच कल्पना नव्हती की पुढच्या अर्ध्या तासात काय होणार आहे ते, कारण या आधीही खुप वेळा पियुषने तिला अशे सप्राईजचे सुखद धक्के दिलेत, त्यामुळे तीला थोडीशी कल्पना आलीच होती की पियुष मला लन्चला नाहीतरी एखादी ज्वेलरी घेण्यासाठी घेऊन जात असेल. तिला गाडीचा हळुहळू ब्रेक दाबण्याचा आवाज आला. पियुष गाडीतून उतरला दुस-या बाजुस येऊन दरवाजा उघडला, गाडीतून उतरण्यासाठी त्याने तीचा हात पकडला. दरवाजा लावला व हातात हात घालून ती पियुषच्या मागोमाग चालत होती. “पियुष मला सांगशील का आपण कुठे आलोय”? “सांभाळून चाल खाली पाय-या सूरू होतील” असं म्हणुन त्याने तिचा प्रश्न टाळला. दोन मजले चढल्यावर तिने परत तोच प्रश्न केला. “हे बघ आलोच इथ थांब जरा”. पियुषने खिशातून किल्ली काढली त्याने टाळा उघडला व तिचा हात पकडून तिला आतमध्ये आणलं. “झालं का तुझ आता उघडु का पट्टी”? शितलला कधी एकदा सप्राईज पाहतेय अस झालं होतं. “हो उघड”….! शितलने डोक्यामागे बांधलेली गाठ सोडली व हळुच डोळे उघडले, आणी गोल गिरकी घेत तिने सगळीकडे पाहीलं, तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. लगेचच ती पियुषला बिलगली व ढसाढसा रडायला लागली, कारण या आधी एवढं मोठ सप्राईज तिला पियुष कडुन कधी मिळाल नव्हतं व तीने कधी अपेक्षाच केली नव्हती. ती दरवाज्या जवळ गेली दरवाजावर मिसेस.शितल पियुष देशपांडे. असं लिहलं होतं, तिने हळुच हाताने त्या पाटीवरुन हात फिरवला. तीचे आनंदाश्रु काही थांबत नव्हते. “आता अशीच रडत बसणार आहेस का जा घर बघुन तरी ये आतुन” पियुषने हसत शितलला म्हटलं. तशी ती आतमध्ये शिरली घरातल्या प्रत्येक वस्तूवर ती मायेने हात फिरवत होती. शितलला ते नवीन घर फारच आवडलं रंग, पडदे, झुंबर याची चॉईसपण घराला शोभेल अशी केली होती. हे सर्व बघुन तिला पियुषचा हेवा वाटत होता. किती कमी वेळात त्याने स्वतःचे आपले घर घेतले. शितल पुर्ण घर बघुन बाहेर आली. “कसं वाटलं आपल नविन घर”? पियुषने विचारलं. “एकदम मस्त खुप आवडलं अगदी माझ्या मनासारख आहे, मी खुप सजवेन या घराला” शितलच्या बोलण्यात तीचा आनंद दिसत होता. ” हो ते नंतर आता निघुया कामाला उशिर होईल नाहितर”? पियुषने म्हणाला. शितलने नुसतीच मान हलवली अस वाटत होतं तिला अजुन थोडा वेळ नविन घरात थांबायचं होतं. ते दोघं बाहेर पडले कुलुप लावलं तोपर्यंत शितल गाडीत जाऊन बसली होती. आज ती खुप… खुप… खुष होती एवढ्या दिवसांपासूनचं तिचं मुंबईतं स्वतःचं घर घ्यायच स्वप्न पियुषने पुर्ण केल. पियुष गाडीत येउन बसला गाडी सुरू केली. “आपण कधी शिफ्ट व्हायचं इथे”? शितलने उत्सुकतेने विचारलं, तिची आतुरता पियुष समजु शकत होता कारण त्या छोट्या भाड्याच्या खोलीत राहुन ती कंटाळली होती. “उद्याच शिफ्ट व्हायचं” पियुषने खुष होऊन म्हटलं. “काय? उद्याच.? शितलने डोळे विस्फारत म्हटलं. ‘हो’ आज काही माणसं येतील सामान हलवायला तु आता घरी जाऊन सामान बांधायला घे” “ठीक आहे मी आता फुलदाणी, पडदे, बेडशीट, सगळं बांधुन ठेवते”. शितल म्हणाली. तिच्या चेह-यावर वेगळाच हुरूप आलेला होता काय करु नी काय नाही असं तिला वाटत होतं आणि ते सहाजिकच शेवटी ती तिच्या स्वतःच्या घरात जाणार होती.

पियुषने तिला घराजवळच्या चौकात सोडलं व तो पुढे कामावर निघुन गेला. शितलने घरी आल्या आल्या सामानाची बांधा बांध सुरू केली, अथर्व (शितल व पियुषचा ६ वर्षांचा मुलगा) नुकताच शाळेतुन आलेला त्याला काही कळलंच नाही आई काय करतेय सगळं सामान काढुन. “आई काय करतेयस तु”? त्याने निरागस चेह-याने विचारलं. शितल त्याचा पापा घेत म्हणाली “आपण आता आपल्या घरी जाणार आहोत स्वतःच्या, तुझ्या पप्पांनी नवीन घर घेतलंय.. तसाच तो ए……! नविन घर नविन घर…..! ओरडत बेडरूममध्ये गेला. त्याच्या निरागसतेवर शितलला हसुच आलं. पुर्ण सामान शिफ्ट करायला दोन दिवस लागले, नवीन घरात त्यांचे दोन-तीन दिवस झाले. पियुषला शितलने आपण वास्तुशांती करुन घेऊया असं सुचवलं पण पियुषचा या सगळ्यावर विश्वासच नव्हता आणी शितलनेही त्याला जबरदस्ती केली नाही शेवटी तिला त्याचं मन दुखवायचं नव्हतं

नवीन घर खुप मोठं होतं त्यामुळे अथर्वला खेळायला खुप जागा होती, नुसता घरात मस्ती करत असायचा. त्यालाही लगेचच नवीन घराचा लळा लागला होता.
नवीन घरात दिवस कसे पटकन निघुन गेले कळलंच नाही बघता बघता २ महिने झाले. त्या सकाळी मी किचनमध्ये डब्याची तयारी करत होते. पियुष हॉलमध्ये टि. व्हि बघत होता, अथर्वपण शाळेची तयारी करुन बेडरूममध्ये बसला होता. अचानक मला बेडरूममधुन अथर्वाचा जोरजोरात हसण्याचा आवाज आला, पण मी दुर्लक्ष केल. थोड्या वेळाने मला अथर्वाच्या एकट्या कुजबूजण्याचा आवाज आला. मी त्याला बघण्यासाठी बेडरुमजवळ आली, दरवाज्याच्या फटीतुन आत पाहीलं आणी माझ्या अंगावर सरसरुन काटाचं आला अथर्व बेडवर बसुन समोर कोणाशी तरी गप्पा मारत होता. मला काही समजत नव्हतं अथर्व असं कोणाशी बोलतोय. माझ्या घशाला कोरड पडली याआधी अथर्व कधीच असा वागला नव्हता. मी धावत हॉलमध्ये जाऊन पियुषला हे सांगणार तोच हॉलमध्ये सोफ्यावर पियुष आणी अथर्व बसले होते. अथर्वने मला बघुन विचित्र पण स्मितहास्य दिलं त्यावेळी ते हास्य खुप क्रुर वाटत होतं. मला समजतचं नव्हतं हा काय प्रकार चालु होता. मला एवढ्या घामाघूम झालेलं पाहुन पियुषने मला विचारलं “काय गं अशी घाबरलेली का दिसतेयसं”? मी काही बोलणार एवढ्यातं माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली व मी धपकन जमिनीवर कोसळली.
थोड्या वेळाने थंड पाण्याचा भपका कोणीतरी तोंडावर मारुन मला उठून बसवण्याचा प्रयत्न कोणीतरी करत होतं मी डोळे किलकिले करुन पाहिलं पियुष माझ्या डोक्याजवळ व अथर्व पायाजवळ बसला होता. “अगं शितल अशी कशी पडलीस तु”? “तरी तुला मी नेहमी बोलतो काहीतरी खाऊन कामाला लाग उपाशी पोटी हे असंच होतं.. हे घे नास्ता करुन ही गोळी घे थोडं बरं वाटेल ” पियुष तिचा हात हातात घेऊन म्हणत होता.

तीने पियुषच्या हातातली गोळी घेतली व पियुषला सगळं सांगणार एवढ्यात तिची नजर अथर्ववर गेली व ती गप्प बसली. अथर्व समोर पियुषला सांगणे योग्य नाही म्हणून तिनं त्याला नंतर सांगण्याचे ठरवले. “आज तु आराम कर मी जमल्यास हफ डे ने यायचा प्रयत्न करेन..! अथर्वला आज घरीच राहु देत तुझ्यासोबत” पियुष तिला धिर देत म्हणाला. “चल मी निघतो… “अथर्व आज तु मम्मीकडे लक्ष ठेव तीला काही हवं नको ते बघ मग मी आल्यावर आपण खुप मज्जा करुया”. पियुषने अथर्वला कुशीत घेतले. “ठिक आहे पप्पा मी आज मम्मीची काळाची घेईन” अथर्व बोबड्या सुरात म्हणाला. हे एकुन शितलच्या पोटात गोळाच आला. तिच्या डोक्यात सकाळचाच विचार चालु होता. तिला विश्वासच बसत नव्हता की सकाळी घडलेलं भास होता की सत्य….?
“आई तुला काही पाहिजे का”..? अथर्वच्या निरागस प्रश्नाने शितलला खात्री पटली की सकाळी घडलेलं सगळं भासचंं असेल. “माझा बाबु का असा एकटा बडबडेल..? स्वतःशीच प्रश्न विचारत ती सकाळच्या घटनेबद्दल स्वतःवरचं हसली… मध्येच कसल्यातरी खदखदल्यासारख्या आवाजाने तीला जाग आली ती उठली डोकं थोडं जड झाल्यासारखं वाटतं होतं, तिला गोळीने गुंगी कधी आली कळलच नाही. आवाज बेडरूममधुन येत होता ती बेडरुमच्या दिशेने दबकत दबकत गेली. एका डोळ्याने बेडरुमचा कानोसा घेतला तर अथर्व जोरजोरात हसत होता, गप्पा मारत होता, खेळत होता. यावेळी मात्र शितल बर्फासारखी गार पडली तिला समजतच नव्हतं अथर्वला नेमक काय झालय. ती बेडरूममध्ये गेली तेव्हा त्याने भिंतीकडे बोट दाखवत म्हटले “आई ही बघ माझी नवीन मैत्रिणी “मैथिली”. शितलच्या पायाखालची जमिनच सरकली कारण अथर्व आणी शितल सोडून घरात तिसरं कुणीच नव्हतं. तीची भितीने पुर्ण भांबेरी ऊडाली काय करावं हे तीला सुुुचेना, अथर्वाला कुशीत घेऊन ती धावत हॉलमध्ये आली व पियुषला कॉल करुन तातडीने घरी बोलवलं, झालेला सगळा प्रकार पियुषला सांगितला पण पियुषने शितलची समजुत काढली व “तुला भास झाला असेल”, असं म्हटलं. “नाही पियुष अथर्वला याआधीपण मी एकटं बोलताना पाहिलयं त्याची “मैथिली” नावाची कोणीतरी मैत्रिण आहे म्हणे या घरात तिच्याशी हा बोलत असतो खेळत असतो…! मला काहीच कळत नाहीय पियुष तु प्लिज डॉक्टरांना बोलव प्लिज ” शितल पोटतीडकीने पियुषकडे विनंती करत होती आणि सहाजिकच होतं ते, शेवटी आई ती आईच असते. पियुषने शितलची हालत बघुन डॉक्टरांना बोलवलं.

रात्री ९-९:३० च्या सुमारास डॉक्टर आले लागलीच पियुषने डॉक्टरांना अथर्वची रुम दाखवली. डॉक्टर अथर्वच्या बेडरूममध्ये गेले मागोमाग पियुष व शितलही होतेच. अथर्व आताही एकटा बोलत होता आणि यावेळी पियुषनेही ते पाहिलं त्याचा विश्वासच बसत नव्हता. “डॉक्टर अथर्वला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसअॉर्डर झाला नसेल”? पियुषने चिंतीने विचारले. पियुषला या आजाराबद्दल जरा माहिती होतं. “थांबा मला अथर्वाला चेक करु द्या. (अथर्वची एकंदर वागणूक आजारी माणसासारखी बिलकुल नव्हती त्यामुळे स्थेतस्कोपने चेक करायची औपचारीकता न करता त्यानी अथर्वला काही प्रश्न विचारले). “हाय अथर्व “कसा आहेस बेटा”? “मी एकदम मस्त आहे डॉक्टर अंकल” “बेटा तु आता कोणाशी गप्पा मारत होतास”? अंकल ती माझी नवीन मैत्रिणी आहे “मैथिली”. “अच्छा मग आमची भेट करुन नाही देणार तुझ्या मैत्रिणीशी”? “अंकल, तिला नाही आवडत मोठी माणसं.. ती फक्त माझ्याशीच बोलते” अथर्व हसुन म्हणाला. “ओके मग केवढी आहे तुझी मैत्रिणी काय वय काय तिचं”? ती खुप मोठी आहे माझ्यापेक्षा मी दुसरीत आहे आणि ती बारावीत आहे ” अच्छा एवढी मोठी मैत्रिणी वा मस्तचं आहे मग” एवढ बोलुन डॉक्टर बेडरूममधुन बाहेर निघाले, हॉलमधील सोफ्यावर येऊन बसले त्यांच्यापाठोपाठ दोघही येऊन डॉक्टरांजवळ बसले. “काय झालय अथर्वाला डॉक्टर तो असा का वागतोय..? पियुषने विचारलं. “पियुष मला अथर्वमध्ये कोणत्याही आजाराची लक्षणे दिसली नाहीत, लहान मुले नेहमी मनावर बिंबवलेल्या गोष्टी सारखे बोलत असतात. अथर्वने पण हे कुठेतरी मैथिली नावाच्या मुलीबद्दल ऐकल असेल कारण त्याने मैथिली बारावीत असल्याचं सांगितलं म्हणजे १८-१९ वर्षांची मुलगी. आणी अथर्व ६ वर्षांचा. लहान मुले नेहमी इल्युजनरी गोष्टी बोलत असतात कदाचित त्यांच्या इम्यँजीन पावर मुळे होऊ शकत. तो एकदम ठिक आहे काहीच काळजी करु नका”.! हे ऐकताच पियुषने शितलच्या खांद्यावर हित ठेवत तिला धीर दिला. डॉक्टरांनी झोपेसाठी काही गोळ्मा लिहून दिल्या त्याप्रमाणे शितलने अथर्वला गोळी दिली. गुंगीने अथर्व झोपी गेला.

६-८ दिवस झाले अथर्व एकटा बडबडत नव्हता की खिदळत नव्हता.त्यांच्यामध्ये झालेला बदल बघुन मला फार बरं वाटत होतं. एक दिवस मी सोफ्यावर पडले असताना अथर्व माझ्या कुशीत आला त्याचं शरीर बर्फासारखं थंड होतं. “आई मरणं म्हणजे काय गं..? ६ वर्षांचा मुलगा मला मरणाबद्दल का विचारतोय काही कळलेचं नाही “मरणं म्हणजे माणुसं कायमचे हे जग सोडुन देवाघरी जातात ना त्याला मरणं म्हणतात, पण तु का विचारतोय हे सगळं.? अजुन तुला खुप मोठ व्हायचंय, शिकायचयं…. “कारण मैथिली म्हणाली की ती माझ्या बेडरूममध्ये २ वर्षांआधीच फास लावुन मेली होती” अथर्व थंडपणे म्हणाला. हे एकताच शितलच्या अंगावरुन सरकन काटा आला, तिची दातखिळीचं बसली. “डॉक्टर अंकलच्या गोळ्यांमुळे मला खुप झोप येते तिच्याशी बोलायला मिळतच नाही, म्हणुन काल ती मला तिच्यासोबत बोलवत होती मीपण तीच्यासोबत गेलो.. तेवढ्यात त्याने शर्टाची कॉलर थोडी बाजुला केली. शितलने अथर्वच्या मानेवर पाहिलं आणी तीच्या पायाखालची जमिनच सरकली दोरखंडाचे लालसर काळे व्रण मानेवर उमटले होते तीची दातखिळीच बसली………. तो शांत तीच्या कुशीत डोळे मिटूुन पडुन होता………………. आणी ती एकटक त्याच्याकडे बघत राहीली…!

निरंजन साळस्कर)

जंगल – मराठी भयकथा

जंगल – मराठी भयकथा

मराठी भयकथा || मराठी लघुकथा  || Marathi Horror Story || थरारकथा  ||  Fear Factor

थंडीचे दिवस होते. घनदाट जंगल पसरलेलं होतं. सगळीकडे चिडिचूप शांतता होती. अगदी पक्ष्यांचे आवाजही नव्हते. रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड वृक्ष होते. उंचच उंच गेलेल्या वृक्षांच्या फांद्या एकमेकांत अडकून प्रकाशाला अडवत होत्या. पोर्णिमेच्या रात्रीचा चंद्र प्रखर असला तरी घनदाट जंगलात त्याचा क्षीण प्रकाश पडत होता.

काळ्याकुट्ट अंधाराला छेदत अन शांतातेचा भंग करत एक बस दूरवरून येत होती. त्या बसच्या दोन जुनाट हेडलाइटचा काय तो प्रकाश त्या जंगलात काळोखाला मागे दाटत होता. गाडी पुढे येत असताना आजूबाजूचा अंधार बाजूला सरकायचा अन गाडी पुढे जाताच पुन्हा अंधारात गढून जायचा. अवकाशात एखादा स्वप्रकाशित लघुतारा तुटून वाटचाल करावा तसं भासत होतं. थंडीने तर इतका कहर केला होता की जणू अंगाचा बर्फ व्हावा.

एकाएकी ती बस हळूहळू करत रस्त्याच्या मधोमध थांबली. आत काहीतरी प्रचंड गदारोळ चालू होता. काही वेळानंतर शेवटी त्या बसचा दरवाजा उघडल्या गेला अन आतून काही लोकांनी एका तिशीच्या आसपास असलेल्या तरुणाला बाहेर ढकललं. मागाहून त्याची बॅग बाहेर टाकली. तो तरुण अतिशय केविलवाण्या नजरेने त्या लोकांकडे पाहत होता. त्याला बाहेर हाकलून ती बस निघून गेली. गाडी सोडताना त्या बसच्या ड्रायवरने एक सुस्कारा सोडला अन त्याच्या तोंडच्या वाफेने गाडीचा समोरच्या काचेवर वाफ दिसू लागली.

त्या तरुणाचं आतमध्ये एका व्यक्तीशी भांडण झालं आणि तो व्यक्ति पोलिस निघाला. रागाच्या भरात त्याने ह्या तरुणाला बाहेर काढलं. कोणीही पोलीसशी भांडू इच्छित नव्हतं त्यामुळे तरुणाला अशा भयाण जंगलात एकटं का सोडता वगैरे कोणी म्हणालं नाही.

गाडी बरीच पुढे निघून गेली होती. गाडीची मागची लाल लाइट नजरेआड होईपर्यंत तो तसाच तरुण एकटक त्या गाडीकडे बघत उभा होता. गाडी थांबेल अन आपल्याला परत आतमध्ये घेतलं जाईल अशी भाबडी अपेक्षा धरून तो उभा होता. पण गाडी अर्थात थांबली नाहीच.

प्रचंड गारवा होता. त्याने डोक्याभोवती मफलर गुंडाळलं होतं. पण थंडी प्रचंड असल्याने त्याने बॅगेत असलेलं एक जुनाट स्वेटर काढलं अन अंगावर चढवलं. सगळ्यांसमोर त्या जुनाट स्वेटरची त्याला लाज वाटली असती पण आता तो विषय नव्हता. आता काय करावं म्हणून तो विचार करू लागला. आजूबाजूला प्रचंड जंगल होतं आणि रात्रीची वेळ. त्या पोलिसावरील राग निवळल्यावर त्याच्या मनात प्रचंड भीती दाटून आली होती. सगळीकडे चिडिचूप शांतता होती. मागचं गाव पन्नास तर पुढचं गाव पस्तीस-चाळीस किलोमीटर अंतरावर असावं. आता सकाळपर्यंत कसलंही वाहन येणार नाही याची खात्री त्याला होती. ह्या डोंगराळ आडवाटेने गाड्या येतच नसायच्या. गेलेली एकमेव कलेक्टर गाडी होती. सर्वात आधी त्याने शांतता दूर व्हावी म्हणून बॅगेतील रेडियो बाहेर काढून चालू केला अन तो विचार करू लागला.

त्याने हातातील घड्याळात बघितलं, रात्रीचे दहा वाजून गेले होते. चालत गेलं तरी काही उपयोग नाही हे त्याला माहीत होतं. अशा गर्द जंगलात अडकून बसलो ह्या जाणिवेनेच तो अर्धमेला झाला होता. अंधाराच्या विवरात अडकल्याप्रमाणे त्याला आजूबाजूला अंधार अन उंच वृक्षांशिवाय काहीच दिसत नव्हतं. कसलाही आवाज नव्हता किंवा जीवंतपणाची कसलीच खूण नव्हती. पण रेडियोवर लागलेल्या कुठल्यातरी अनोळखी भाषेतील आवाजाने त्याला जरा हायसं वाटलं. डोळे अंधाराशी संलग्न झाल्यावर नजर जरा स्थिरावली. अंधारातही आता थोडसं दिसू लागलं. पोर्णिमा असल्याने गर्द झाडीतून येणारे चंद्राच्या शुभ्र प्रकाशाचे कवडसे भोवताल दाखवू लागले.

तो झपझप पुढे चालत होता. मन दडपणाखाली येऊ नये म्हणून तो काहीतरी गाणे गुणगुणत होता. काहीही झालं तरी नकारात्मक विचार आणायचे नाहीत हे त्याने ठरवलं होतं. आणि काहीही करून लवकरात लवकर कुठल्यातरी सुरक्षित ठिकाणी पोचायला हवं असं त्याला वाटत होतं. खूप चालल्याने एवढ्या थंडीतही आता त्याला घाम आला होता. त्याने कानाला गुंडाळलेलं मफलर सोडून खांद्यावर टाकलं. तो नशिबाला दोष देत पुढे जात होता. बराच वेळ चालून-चालून त्याला दम लागला. रेडियोवर सतत काहीतरी वाजत होतं. काही नसलं तरी रेडियोची खर…खर… त्याला हवीहवीशी वाटत होती. अशा गूढ परिसरात कसलातरी अज्ञात आवाज कानावर पडू नये म्हणून त्याची ही धडपड होती. शिवाय प्राणी असा आवाज ऐकून दूर जातात असाही त्याचा समज होता. तो एका झाडाखाली श्वास घेत थांबला. एकाएकी मोठा खर…खर असा आवाज होऊन रेडियो बंद पडला. क्षणभर त्याला काळीज बंद पडल्यासारखं वाटलं. त्याचे डोळे मोठे झाले. त्याने रेडियो खाली-वर, उलटा-सुलटा करून बघितला. काहीच झालं नाही. एकाएकी रेडियोला काय झालं म्हणून तो चक्रावला होता. इतकावेळ कुठेच न ऐकू आलेली रातकीड्यांची किर्र कानावर पडत होती. ती लय फारच अभद्र वाटत होती. तो न राहवून खाली बसला. पोर्णिमेचा चंद्र जरासा ढगाआड गेला आणि अंधार दाटला. थंडगार वार्‍याची झुळूक अंगावरच्या घामाला स्पर्शून गेली.

लांबलचक पसरलेल्या निर्जन रस्त्याकडे तो बघत होता. अचानक त्याला शुक..शुक असा आवाज आला. अंगावर काटा… त्याने डोळे मोठे केले… काळीज वेगाने धावत होतं… अंग थरथर कापू लागलं… भयंकर काहीतरी जंगलात आहे आणि ते आपल्यावर डोळे रोखून आहे असा भास त्याला होत होता. त्याचा मागे अन जंगलात वळून बघायचा धीर होत नव्हता. अंग बर्फासारखं स्थिर झालं होतं. ज्या शक्यतांचे विचार मनात येऊ नये म्हणून तो खटपट करत होता तीच घटना घडत होती.

अशा भयाण जंगलात माणूस तर नक्कीच नसणार… त्याने स्वतःला प्रश्न केला…

पुन्हा एक शुक…शुक… असा आवाज आला.

त्याने सगळं बळ एकवटलं आणि तो जागेवरून उठून पळू लागला. त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेऊन आहे, पाळतीवर आहे, पाठलाग करत आहे ही जाणीव वाढत होती. काहीतरी भयानक घातकी आपल्याशी भिडणार आहे ह्या जाणिवेनेच त्याचा थरकाप उडाला होता. तो आठवेल त्या देवाची नावे घेत होता. त्या निर्मनुष्य रस्त्यावरून तो एकटाच पिसाट्ल्यासारखा धावत होता. आता आपण मरणार ही जाणीव बळावत होती. काहीही झालं तरी मागे वळून बघायचं नाही हे त्याने मनोमन पक्क केलं होतं.

त्याला गावातील जुन्या गप्पा-गोष्टी आठवू लागल्या. जंगलात एक हडळ वास्तव करते. मानवी रक्त प्राशन करून ती हजारो वर्ष ह्या जंगलात वास्तव्यास आहे… तिचं ते अभद्र अन भयाण वर्णन… तर्हेतर्हेने माणसाला छळायचे प्रकार… त्याला सगळं सगळं आठवत होतं… मागे इथेच काही गाड्यांचे झालेले अपघात… त्या लोकांचा आत्मा… असे अनेक किस्से त्याला आठवू लागले… ज्या घटना-गोष्टी आठवू नयेत म्हणून तो आटापिटा करत होता त्या एका झटक्यात मेंदूत फिरू लागल्या…

तो भीतीने अस्थिर झाला होता… आता आपलं काही खरं नाही हे त्याला माहीत होतं… मागून पुन्हा पुन्हा शुक…शुक असा आवाज येत होता… मधूनच तो आवाज अगदी पाठीजवळून येत आहे असं त्याला वाटत होतं…

त्याला माहीत नव्हतं, एक अमानवी सावली त्याच्या अगदी पाठीमागे आहे. त्या अमानवी जिवाचं हिडीस हास्य त्याला दिसलं असतं तर तो हृदय बंद पडून मेला असता…

              धावता-धावता त्याला एक पडकी झोपडी दिसली… त्याला जरा धीर आला.. कोणीतरी भेटेल, सोबत होईल म्हणून तो देवाचे आभार मानू लागला… त्या मोठ्या झाडाखालच्या छोट्याशा झोपडीकडे तो धावतच गेला… दरवाजावर गडबडीने थाप मारली… आतून कसलाच प्रतिसाद आला नाही… मागून मात्र कोणीतरी श्वापद वेगाने अंगावर येत आहे अशी जाणीव बळावत होती… मी आले रे!!! असा थंडगार पण अभद्र आवाज त्याच्या कानी पडला… त्याने दरवाजाला जोरात धक्का दिला… दरवाजा उघडाच होता… आत वाकून बघितलं… काहीतरी जुनं फुटकं-तुटकं सामान होतं… त्याची भिरभिरती नजर झोपडीत सर्वत्र फिरत होती… मानवी खुना तो शोधत होता… तो आत गेला… पुर्णपणे अंधार… विश्वाच्या निर्वात पोकळीप्रमाणे… त्याला भीती वाटू लागली… अंधारात कोणीतरी दबा धरून बसलेलं आहे आणि कोणत्याही क्षणी ते अंगावर धाव घेईल अशी असुरक्षित भावना निर्माण झाली… हे बघून तो मागे वळला आणि दरवाजावर एक किळसवाणी आकृती त्याच्या नजरेस पडली… अंगावर काळी साडी… मोकळे सोडलेले लांब पांढरे केस… लाल-भडक डोळे… मोठे हिडीस दात… फाटलेला पिवळसर चेहरा… चेहर्‍यावर पाशवी हास्य… गुढग्याच्या खालपर्यन्त गेलेले पिवळे हात… ते भीतीदायक दृश्य पाहून तो मोठयाने किंचाळला… किंचाळत राहिला… तो भीतीने मागे सरकू लागला… त्याच्या धक्क्याने कमकुवत झोपडीचा मागचा भाग तुटला.. तो जमिनीवर कोसळला, पण त्याचे ताणले गेलेले मोठे डोळे त्या विद्रूप आकृतीवर होते… हातातून पडलेलं सामान तस्स टाकून तो जीवाच्या आकांताने पळू लागला… डोळ्यातून घळघळा पाणी येत होतं. आता वाचणं अशक्य असल्याची तीव्र जाणीव त्याला होऊ लागली… देवाचा धावा सुरू होता… डोळे सताड उघडे होते अन दातखिळ बसली होती… ती अमानवी आकृती अन तो विद्रूप चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता… तो देवाचं नामस्मरन करत पळत सुटला…

मागे वळून बघायचं नाही हे त्याने मनाशी पक्क केलं होतं. पण तो पळत असताना मागून एक गगनभेदी किंचाळी उमटली. सारं जंगल शहारून उठलं. विचित्र अन पाशवी आवाज उमटू लागले. जणू काही दाही दिशांनी अंगावर कोणीतरी आक्रमण करायला उतावीळ झालं असावं.

मी आले… तुझीच वाट बघत होते… थांब… असा आवाज चित्रविचित्र तर्‍हेने येत होता.

त्या आवाजाने विचलित होऊन त्याने एक क्षण मागे वळून बघितलं अन त्याच्या लक्षात आलं की ती आकृती तिथेच उभी राहून मोठयाने हसत आहे… त्या हडळीचे पिवळसर हात लांब लांब होत त्याच्याकडे येत होते… त्या काळ्याशार रस्त्यावरून तो धावत होता. त्याच्या समोर धुकं दाटलं होतं. त्याचा धावायचा वेग कमी झाला. धुक्यात काहीतरी उभं ठाकलेलं होतं. त्याची भिरभिरती नजर ते शोधू लागली. पाठीमागून एक हात त्याच्या खांद्याला स्पर्श करत होता. त्या थंडगार अन अभद्र स्पर्शाने तो गरथून गेला अन जमिनीवर कोसळला. तो रांगतच मागे सरकू लागला. तो मागे कशालातरी थडकला. गडबडीने त्याने मागे बघितलं तर त्या घरात दिसलेली हडळ मोठाले दात काढून त्याच्याकडे एकटक बघत होती. आता मात्र त्या चेहर्‍यावर छद्मी अन रागीट भाव होते. त्याचं हृदय वेगाने धावू लागलं… डोळे फिरू लागले… अंग ताठ झालं… आणि हृदय भीतीने बंद पडत गेलं. त्या हडळीने हाताच्या पंज्याने त्याचा फडशा पाडला. रस्त्यावर रक्ताच्या चिळकांडया वाहत होत्या. लांबून रेडियोची खर्र..खर्र पुन्हा सुरू झाली… ती हडळ मोठ्या आनंदाने त्याचं मांस भक्षण करत बसली होती….

—समाप्त—

सर्व हक्क सुरक्षित @ latenightedition.in

-*-*- वाचा अशाच मराठी कथा -*-*-

नवीन मराठी कथासंग्रह

मराठी पत्रकार

एक संध्याकाळ!

error: Content is protected !!