Tag: मराठी मालिका

रात्रीस खेळ चाले!

रात्रीस खेळ चाले!

#रात्रीचा खेळ संपला  ||  #शेवटाक असा का?  || #प्रेक्षकांची नाराजी  ||  #रात्रीसखेळचाले समीक्षा

रात्रीस खेळ चाले या झी मराठीवरील रहस्य मालिकेचा अखेर झाला. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, विविध घटना अन पात्र यांच्यामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण करणारी रात्रीस खेळ चाले! ही मालिका अखेर संपली आहे. 22 Oct ला ह्या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. सगळ्या कारस्थान नाट्य-थरारा मागचा सुत्रधार नीलिमा असते हे सिद्ध झालं. पण शेवटच्या भागानंतर प्रेक्षकांनी मात्र तीव्र नापसंती दर्शवली आहे. कारण आजपर्यंत घडत असलेल्या अनेक घडामोडीवरचा पडदा उठेल अन सर्व उकल होईल ही उत्कंठा मनाशी धरून बसलेल्या प्रेक्षकांची मात्र घोर निराशा झाली आहे.

नेने वकील अन पोलिसांचा खबरी अजय यांचा खून कोण केला हयाभोवती मालिका अखेरच्या काही भागांत घुमत राहिली. पण मालिकेच्या सुरूवातीपासूनच अशा अनेक घटना अन थरारनाट्य दाखवण्यात आलं होतं जे मानवनिर्मित वाटत नव्हतं. त्यामुळे ही मालिका केवळ रहस्यप्रधान अशी मर्यादित न राहता भुताटकी प्रकारात मोडते असा समज दृढ झाला होता. पण हळूहळू कथानक पुढे सरकत गेलं आणि हे सगळं मानवनिर्मित आहे अशा घटना समोर येऊ लागल्या. मग ह्या सगळ्यांचा छडा लावण्यासाठी विश्वासराव ह्या पोलिस पात्राचा प्रवेश झाला. खरंतर ह्या एंट्री ने मालिकेत चांगलीच रंगत आली होती. आणि विश्वास हे पात्रच सर्व गोष्टी तडीस नेणार हेही एव्हाना लक्षात आलं होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मालिकेचा शेवट ज्या अर्धवट अन अपूर्ण स्वरूपाचा आहे तो खरच भ्रमनिरास करणाराच होता. कारण पूर्वी ज्या घटना घडल्या त्या सर्व घटना नीलिमाने केल्या असा जर तर्क असेल तर त्या कशा घडल्या हे दाखवायला हवं होतं. कारण त्या सर्व घटना केवळ एका व्यक्तीच्या क्षमतेच्या बाहेरच्या वाटत होत्या. त्या सर्व गोष्टी अखेर अनुत्तरितच राहिल्या. कदाचित त्या सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण लेखक-दिग्दर्शक जोडीकडेही नसावं असं दिसत आहे.

हे प्रश्न अनुत्तरीत…

पांडू खुळा नसून शहाणा असतो? पांडू पैसे-दागिने का जमा करत असतो? माधववर हल्ला कोण केलेला असतो? म्हातारीला अण्णा दिसतात हे आजार असू शकतो, पण गणेशाक ते ‘अण्णा कुठेही गेले नाहीत, अण्णा इथेच हत’ असं का म्हणतो? छायाची बाहुलीचा काय प्रकार होता? त्या बाहुलीला पुरताना ती बाहुली हलते, जड लागते तो काय प्रकार होता? मग तीच बाहुली देविकाच्या घरात कशी पोचते??? तळघरातील हाडं कोणाची व त्यांना मारणारा कोण??? फक्त अण्णा की त्यांच्यासोबत कोण?? बर नाथाचा सगळ्या गुन्ह्यात सहभाग असले तर मग त्याला अटक का नाही? गणेशच्या गुरुला अटक का केली??? विहिरीतून छायाला आवाज का येत असतात? शेवंताचा आवाज? झाडावरून बांगड्या हलण्याचा आवाज??? नाईकांना पाण्याची भीती. अर्चिसचं पाण्याकडे आकर्षित होणं?? नाना का बडबडायचा??? सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुशल्या… ती एकाच वेळेस अनेक ठिकाणी कशी दिसते? ती करत असलेल्या अतार्किक गोष्टी? घरावर थाप पडणे, घरावर दगडांचा पाऊस हे काय होतं? एक तर सगळ्या भानगडी नीलिमाला एकटीला शक्य नव्हत्या. त्यात कॉंट्रॅक्ट अन जतिन सेठ नंतर आले. त्याआधी घडणार्‍या घडामोडी कोण करत होतं? नीलिमाला शेवंताचा आवाज कसा माहीत? ती ह्या गावातील नव्हतीच. मग जुने reference तिला कसे माहीत. गुन्हेगार नीलिमा तर मग रघुकाका, गण्या अन त्याच्या गुरुला अटक का केली मग???

Image result for रात्रीस खेळ चाले

ह्या व अशा अनेक प्रश्नांची उकल होईल ह्या आशेने प्रेक्षक गेली अनेक महीने न चुकता ही मालिका बघत होते. पण मालिका संपली अन हे प्रश्न तसेच मागे ठेऊन गेली असं म्हणायची वेळ आली आहे. ह्या प्रकारामुळे शिखरावर पोहचत असलेला माणूस अचानक घसरून खाली कोसळतो असा अनुभव येत आहे. रहस्यप्रधान, गूढ, भय मालिका बघण्यात मजाच ही असते की त्याचा शेवट सगळ्यांना हवाहवासा असतो. हे कोण करतं? केवळ ह्या एका प्रश्नासाठी लोक खिळून बसतात. पण हेच मूळ प्रश्न अनुत्तरित राहिले. मालिका अगदी नारायण धारप यांच्या कादंबरीसारखी वाटली. प्रत्येक घटनेचं बारीक वर्णन, भय-गूढतेची निर्मिती. कथेला त्यात गुंफत पुढे नेणं आणि अखेर काही क्षणांत किंवा गडबडीत सर्व विषयाचा पसारा आवरणे!!! अरे, काय चाल्लय हे??? हा पसारा आवरून जागच्या जागी ठेवणे हे उद्दीष्ट असायला हवे. त्यामुळे अखेरचे भाग लोकांना तृप्त करू शकली नाही हे खरं….

शेवटच्या भागात तर विश्वास प्रत्येकावर पुन्हा तेच-तेच आरोप करत सुटतो. एक क्षण वाटतं की आता तो पांडूला उघडं पाडणार, पण अगदी अनपेक्षितपणे तो नीलिमावर आरोप करतो, अख्खी मालिका दीड-शहाण्या टेचात वावरणारी नीलिमा लागलीच सगळं कबुल करते आणि आणि…. संपलं…….. This Is Not Done!!!

पण….

अशा अनेक त्रुटींसह ह्या मालिकेने आपला निरोप घेतला आहे. पण मालिकेने प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं यात शंका नाही. मालिकेतील प्रत्येक पात्र जीवंत वाटत होतं. प्रत्येकाशी काहीतरी जिव्हाळा वाटत होता. तो नाईक वाडाही बोलका होता. वेडा पांडू कधी चिरड, कधी हास्य, कधी सहानुभूती मिळवायचा. प्रत्येकाचा अभिनय चांगला होता. कथा-दिग्दर्शनही छान होतं. संगीत तर अजरामर. एक उत्तम, उत्कृष्ट, शाही भोज झाल्यावर केसर पान खाताना चुना जास्त होऊन जीभ खराब व्हावी हे सर्वथा नको…

….इतकं होऊनही एक सांगतो, मालिका प्रेक्षकांच्या मनातून कधीच ‘विसरलय’ अशी होणार नाही.

रात्रीस खेळ चाले!

नीलिमा येडी हाय! – राखेचा

नीलिमा येडी हाय! – राखेचा

#रात्रीस खेळ चाले  की रात्रीस वेळ चाले  || मालिकेची दशक्रिया  || भानामती, भुतं, हडळ वगैरे आणि अनिस

रात्रीस खेळ चाले ही मालिका सुरू झाली तेंव्हा खूप उत्सुकता होती. तशी ती अजूनही टिकून आहे पण छोटी कथानक घुसवून ती अर्धवट सोडून दिली जात असल्याने निरास होतो आहे. संगीत ऐकल्याशिवाय मजा येत नाही… हमं…हो…हमं…हो… वगैरे… अजूनही रहस्य टिकून आहे पण एक विषय घेऊन कथा जरा पुढे न्यावी असं वाटत आहे. नाहीतर ‘ते माका काय माहीत’ असं व्हायला नको…

पण आज विषय दूसरा आहे. विषय आहे निलीमाचा आणि त्यासारख्या असंख्य वृत्तींचा. नीलिमा हे पात्र काय असेल आणि कसं असेल हे सुरुवातीलाच कळलं होतं, पण ते आता अजूनच विक्षिप्त होत आहे. नीलिमा सारख्या असंख्य व्यक्ति आज समाजात वावरत आहेत. त्यांना स्वतःला सामाजिक कार्यकर्ते वगैरे म्हणवून घ्यायची हौस असते. त्यांना दुसर्‍यात नेहमी दोष दिसत असतात आणि स्वतः म्हणजे नैतिकतेचे महामेरू असल्याचा भास होत असतो. तशांचा हा समाचार…

नीलिमा स्वतःला वैज्ञानिक वगैरे म्हणवून घेते. त्यात समाज सुधारक आणि पुरोगामी विचारांची पण. शिवाय प्रॅक्टिकल विचार करणारी. पण अशा लोकांच्या वागण्याबाबत खूप प्रश्न पडतात. विशेषतः त्यांच्यात ‘मला सगळं माहिती’ असा अहंकार तर मला खूप चीड आणतो.

पहिली गोष्ट म्हणजे पेहराव. जैसा देस वैसा वेस असं आपण म्हणतो. अगदी दुसर्‍या देशात जाताना तेथील पेहराव करायचा प्रयत्न करतो. पण गावाकडे जायचं म्हंटलं की आपला ‘मॉडर्न’ पोशाख आणि रूप मिरवायची आवड अशा अनेकांना असते. त्यावर काही कोण बोललं की मग, ‘हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि व्यक्तिस्वातंत्र्य आहे’ अशा बाता ते मारतात. पण मग खेड्यातील एखादा शहरात आला आणि त्याला शहरी तरिके माहीत नसल्याने तो तसाच गावातल्याप्रमाणे राहतो तेंव्हा तुम्ही त्याला गावांढळ म्हणता! म्हणजे त्यांच्या तेथे तुम्ही गेलात तरी तुम्हीच शहाणे आणि ते तुमच्या येथे आले तरी तुम्हीच शहाणे. हा अहंकार आहे.

दूसरा मुद्दा. यांना परंपरा अन पारंपरिक प्रथा आवडत नाहीतच शिवाय विरोध असतो. म्हणजे लग्नात अक्षता म्हणून तांदूळ वाया घालू नये असं वाटतं, मेल्यानंतरच्या विधी तर निरर्थक आहेत असा त्यांचा समाज असतो. असतीलही. मग हेच एखाद्या गरिबाला वाटू किंवा हा निरर्थक खर्च आहे असा त्यांचा अट्टहास असतो. ठीक आहे. सुरुवात तुमच्यापासून करू. तुम्ही तुमच्या रहाणीमन आणि इतर गोष्टींवर अमाप खर्च केलेला चालतो. भारी मोबाइल, कपडे, गाड्या अन अशा अनेक गोष्टींवर केलेला खर्च तुम्हाला दिसत नाही. बर्थडे वर लाखोंच्या पार्ट्या दिलेल्या चालतात पण पारंपरिक सण आणि प्रथा म्हंटलं की तुमची नाके मुरडतात. ही तुमची सामाजिक जाण!

मालिकेत जे दाखवत आहेत ती अंधश्रद्धा आहे यात दुमत नाही. पण दरवेळेस ‘कोणीतरी मुद्दाम करतय’ किंवा ‘यात काहीतरी कट आहे’ शिवाय ही अंधश्रद्धा आहे, तुम्ही मूर्ख आहात अशी जाणीव करून देणे यात गर्व आहे आणि अहंकारही… स्वतःला सगळं कळतं याच्यातला. पण मालिकेत नीलिमाकडे कसलीही उत्तरे नसतात. कशाचाच शोध ती घेऊ शकत नसते. कुठलेच अर्थ लागत नाहीत. उलट जे घडत आहे ते ‘बाहेरचं’ आहे असं दिसत असूनही ते दुसर्‍यांना मूर्खात काढतात ते बरोबर वाटत नाही. आपल्याला ज्यातलं समजत नाही त्यावर बोलू नये हा साधा संकेत ते न पाळता ‘ज्ञान पाजळत’ सुटतात.

आता महत्वाची गोष्ट. ही लोक स्वतःचा स्वार्थ आला की प्रॅक्टिकल होतात. एरवी पैसा गरीबला द्या, पैसा काय करायचा, आम्ही सामाजिक कार्य करतो वगैरे ते म्हणत असतात पण नीलिमा जेंव्हा जमीन देऊन टाकायची वेळ येते तेंव्हा काय करते? तर तिच्याही हातून ती जमीन सुटत नसते. मग त्या मोहाला ते एक व्यवस्थित गोंडस असं नाव देतात. काय तर future planning वगैरे.  नीलिमा तर तिकडे परस्पर जमिनीचा सौदा करत असते. हे काय म्हणावं? हे कसले सामाजिक आणि पुरोगामी विचारांचे? हे तर स्वार्थी लोक. स्वतःचा स्वार्थ बघणारे अन सरड्याप्रमाणे रंग बदलणारे. स्वतःला हव्या असलेल्या वस्तूसाठी, स्वतःच्या हेतुसाठी ते एका गोंडस नावाचा आधार घेऊन लपतात.

अशा प्रकारच्या वृत्तीची अनेक माणसे आपल्या समाजात वावरत असतात. यांचा एक समज असतो, आपण शिकलेले, चार पुस्तकं वाचतो, इकडे-तिकडे फिरतो अशा गोष्टींमुळे आपण समाजातील इतर लोकांपेक्षा जास्त हुशार आहोत. आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे आणि ते योग्यरीत्या व्यक्त करता येतं म्हणून अडाण्यांना चार गोष्टी शिकवायचा आपला अधिकार आहे आणि त्यांच्यावर हुकूम गाजवायचा आपला हक्क आहे. अशांना मग अहंकार असतो. रात्रीस खेळ चाले ह्या मालिकेतील नीलिमा हे त्यांचं प्रातींनिधिक उदाहरण आहे. जिथे-तिथे स्वतःचा शहाणपणा दाखवायचा आणि इतरांना मूर्खात काढत राहायचं असाच त्यांचं वागणं असतं. मालिकेतील नीलिमा हे पात्र पुर्णपणे ग्रे अन ब्लॅक शेड कडे झुकणारं आहे. स्पष्ट बोलण्याच्या नादात दुसर्‍यांना दुखावणं, त्यांना कमीपणा दाखवणं हा तर त्यांच्या वागण्यातील प्रमुख घटक. सोयीनुसार अर्थ काढणे आणि त्यानुसार वागणे हेच त्यांना अभिप्रेत असतं. ह्या मालिकेत नीलिमा येड्याप्रमाणे वागते असं बरीच मंडळी मानतात… त्यामुळे हा लेख!!!

नोट- ही टीका नीलिमासारख्या वृत्तीच्या व्यक्तींवर आहे. कोणा एका एका व्यक्तिला आणि कलाकाराला किंवा संघटनेला दुखावणे हा हेतु सर्वथा नाही.

रात्रीस खेळ चाले!

रात्रीस खेळ चाले!

रात्रीस खेळ चाले!

#Ratris Khel Chaale  || रात्रीस खेळ चाले  ||  मराठी मालिका  || भयकथा  ||

विश्वास-अविश्वास, तर्क-अतर्क यामध्ये पुसटशा रेषा असतात. आयुष्यात अशा काही घटना घडतात की ह्या रेषा अलगद अन अनाहूतपणे ओलांडून माणूस एका वेगळ्याच संकल्पानेला शरण जातो. मानवी मनाच्या गाभर्यात अशा अनेक गोष्ट असतात ज्याला नेमकी कसलीही ओळख नसते पण त्याची स्वतःची अशी एक ओळख असते. आपल्या आवाक्याच्या बाहेरील घटना जेंव्हा घडतात तेंव्हा एका स्वनिर्मित शक्तीचा जन्म होतो. मानवाच्या अनेक मर्यादा असल्या तरी नसलेल्या मर्यादा तो अजूनही ओळखू शकलेला नाही. ईश्वर-नश्वर ह्या गोष्टींच्या अधीन जाऊन माणूस काही घटनांचा मागोवा घेत असतो. गूढता अन अज्ञान हे सामान्य बुद्धीच्या व्यक्तीलाच नव्हे तर अगदी विज्ञानाच्याही मर्यादा आहेतच. म्हणजे, परग्रहावर काय आहे हा तर विज्ञानाचा अजूनही न सुटलेला अन गूढ असा प्रश्न आहे. तसच देवाच्या श्रद्धेपुढे भूत-राक्षस ही अंधश्रद्धा आहे असं आपण मानतो हा फोलपणा आहे. विज्ञान असो वा अध्यात्म हे नेहमी अस्तीत्वात नसलेल्या गोष्टींचाच शोध घेत असतात. जोपर्यंत ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत ती नसतेच, पण तिचं अस्तित्व जाणवल्यावर एक वेगळाच हुरूप चढतो. निसर्गातील गूढ अमानवीय अन अ-दैवी शक्तींचा वावर मानवी मनाने नेहमीच मानला असला तरी विज्ञान त्याला नाकारत असतं. तो दोष ना कोणाचा, दोष तो नजरेचा असं म्हणून हा वाद संपतो.

नारायण धारप, रत्नाकर मतकरी, गुरु नाईक यांच्या अन इतर लेखकांच्या लिखाणातून किंवा अगदी स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट वगैरेतून आपण अशा अमानवी शक्तींच्या अस्तित्वाबद्धल जाणून घेतो.

->मालिका सुरू झाली तेंव्हा अतिशय उत्कंठा होती की यात नेमकं काय असेल याची. कारण विषय नावीन्यपूर्ण वाटत होता. मालिकेच्या सुरूवातीला तसा वेगही उत्तम होता. नवनवीन रहस्यमय घटना अन भांडणं यामुळे प्रेक्षक जरा खिळून होता पण मध्यंतरीच्या काळात मालिकेने सगळा अर्थ गमावला. कथा कोणत्या दिशेला जात आहे हेच समजत नव्हतं. अभिराम उठसूट लग्न म्हणायचा, सरिता संपत्ति म्हणायची आणि असला प्रकार निरर्थक वाटत होता. मालिकेत तोचतोचपणा जाणवू लागला होता. कथा भरकटत होती. मूळ विषयापासून दूर सरकत होती. ज्या भूत-प्रेत घडामोडी दाखवायच्या आहेत ते सोडून भलत्याच बाबी बघायला कंटाळा येत होता. पण गेल्या काही दिवसांत कथेने परत जम बसवला आहे आणि एक दिशा पकडली आहे. मालिकेचं संपूर्ण यश हे कथेतच आहे. कोकणच्या मातीत घडणार्‍या घटना म्हणून याकडे एका वेगळ्या दृष्टीकोणातून बघितलं जात आहे. तसे काही वादही झाले, पण रम्य कोकण अन गूढ कथा हे मूळ ठेवलं तर मालिका यशस्वी होईल यात वाद नाही. त्यामुळे कथा हीच प्रथा म्हणून लेखक-दिग्दर्शकाने याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे.

संगीत

मालिकेतील संगीत भन्नाट आहे. कथानकाला साजेसं असं संगीत आहे ते. त्यातही नावीन्य आहे. सुरुवातीचं शीर्षकगीतही विशेष आहे. हूं..हो…हूं…हो असं संगीत ऐकल्याशिवाय रोजचा भागही संपत नाही आणि प्रेक्षकही त्या संगीताची वाट बघत असतात. त्यामुळे संगीतकाराला स्पेशल पॉईंट्स!!!

अभिनय

यातील जे कलाकार आहेत ते सगळे फ्रेश चेहरे आहेत. दत्ता हा त्यातल्या त्यात ओळखीचा चेहरा आहे. बाकीचे कलाकार इकडेतिकडे दिसत असले तरी जास्त परिचयाचे नाहीत, त्यामुळे नवीन चेहरे पाहिल्याने नाविन्यत भर पडते. काहींचा अभिनय चांगला आहे पण कुठेतरी गल्लत होतेच आहे. काहींच्या अभिनयात काहीच दम नाही, उगा चेहरा वेडावाकडा करून किंवा भुवया उडवून अभिनय सादर करण्याचा प्रयत्न असतो… पण खरोखर कोकणातील कलावंतांना अन त्यांच्या उपजत कलेला येथून काम मिळत आहे, व्यासपीठ मिळत आहे याचं कौतुक व्हायला हवं… पट्टीच्या कलाकारांना तर नेहमीच बघतो, ह्या कलाकारांची कला काही असह्य नाही…

रहस्य

कथेत रहस्यं भरपूर आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखा ही ‘suspect’ असल्याप्रमाणे वाटते. नीलिमाचं अतिरेकी वागणं, एकाच वेळेस दोन ठिकाणी दिसणं… माधवचं डायरीत काहीतरी खरडणे त्यात लहानपणी एक निबंध लिहिण्यासाठी मांजराला मारणं… छायाचं बाहुलीशी अन विहीरीशी बोलणं… गणेशचं तर सगळं यावरचं अवलंबुनत्व असतं… अभिराम चं लग्नासाठी आणि देवीकाचं विचित्र वागणं… नेने वकील यांची पैशांची हाव, गुरवाचं ही संशयित वागणं… असं प्रत्येकजण संशयाच्या भोवर्‍यात आहेच… त्यात घरासमोरील ते झाड जेथे शेवंताने फाशी घेतली असते, ती विहीर जेथे त्यांच्या पूर्वजाला उभं पुरलेलं असणं… एका जोडप्याचा बळी… हे सगळं रहस्य वाढवणारं आहे… ह्यामुळेच कदाचित प्रेक्षक अजूनही खिळून आहे अन ह्या गोष्टींचा उलगडा होईपर्यंत तो खिळूनच राहील अशी आशा अन अंदाज आहे…

फक्त कथानक विनाकारण वाढवू नये अशी प्रेक्षकांची इच्छा असते. एकच एक वाक्य वारंवार वेगवेगळयांच्या तोंडून वदवून घेऊन दिग्दर्शक वेळ काढत असेल तर कथा भरकटू शकते… उत्कंठा एका विशिष्ट क्षणापर्यंतच ठीक असते नंतर त्याचा निराशेत अन चिडचिडीत बदल होत असतो…

मालिका बघताना एक गोष्ट नेहमी जाणवते की ही कथा लेखक-दिग्दर्शकाने नक्कीच कुठेतरी बघितली, ऐकली किंवा अनुभवली आहे. त्यात सत्यता जाणवते. भले त्याकडे बघण्याचा दृष्टीकोण वेगळा असो. शिवाय ही मालिका म्हणजे दिवसेंदिवस गूढ कादंबरीचं एक-एक पान उघडल्याप्रमाणे वाटतं.

मालिका, संकल्पना अन कथा उत्कृष्ट असली तरी प्रेक्षकांचा भ्रमनिरास होईल अशा गोष्ट घडल्या नाहीत तर उत्तम!!!

Cast & Crew अर्थात कलाकार

Madhav – Mangesh Salvi
Neelima – Prachi Sukhathankar
Archi – Adish Vaidya
Dattaram – Suhash Sirsat
Sarita – Ashwini Mukadam
Ganesh – Abhishek Gavan
Purva – Pooja Gore
Abhiram – Sainkeet Kamat
Aajji – Shakuntala Nare
Pandu – Pralhad Kudtarkar
Devika – Nupur Chitale
Sushma – Rutuja Dharmadhikari
Natha – Vikas Thorat
Gurav – Anil Gawade
Naths’s Wife – Pratibha Vale
Chhaya – Namrata Pavasakar
Vakil – Dilip Bapat

Crew
Directed by = Shivaji Badadare
Concept by = Nilesh Mayekar
written by = Pralhad Kudtarkar
Assistant director = Prashant Adsul , Amar Kate
DOP = Ajay Pandey
Editor = Joy Mukherjee & Dinesh R .kuche
Costume = Pooja Kamat
Art director = Mahesh Kudalkar
Music= A.V AV Prafullachandra
Colorist = Gaurav Deshpande
Audio Mixing = Pravin
Voice over = Sanchit Wartak
Production = Maruti & Yogesh
Production House: Saajiri Creations
Producers: Santosh Ayachit & Sunil Vasant Bhosale

वाड्याची ओळख – लोकसत्ता मधील लेख ->

http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=11799150

रात्रीस खेळ चाले!

रात्रीस खेळ चाले!

रात्रीस खेळ चाले!

#Ratris Khel Chale   || रात्रीस खेळ चाले  || मराठी मालिका  ||  काळा जादू, करणी, भानामती, बाहेरचं वगैरे

#झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले मालिकेवर प्रकाशझोत!

मालिकेतील पात्रे

रात्रीचे साडेदहा वाजले ‘डिंग डिंग डिंग डिंग’ असे धुन झी मराठीवर सुरू व्हायचे आणि दोस्तांची दुनियादारी सुरू व्हायची. पण दिल दोस्ती दुनियादारी मालिका संपली आणि त्याच वेळेत सुरू झाली नवी मालिका रात्रीस खेळ चाले! रहस्यप्रधान, गूढमय, भयसंपन्न अशी ही मालिका. मानवाला नेहमीच उत्कंठा असलेल्या भूत-प्रेत-पिशाच-आत्मा-हडळ-डाकीण-चुडेल-हाकमारी-चेटकीण आणि असल्या जगाचं दर्शन ह्या मालिकेतून घडतं. कोकण आधीच गूढ आणि रहस्यमय त्यामुळे ह्या मालिकेला चांगली पार्श्वभूमी आधीच तयार होती.

कोकणातील नाईक कुटुंब. कुटुंबातील कर्ता पुरुष अर्थात, अण्णा घरात लग्न असताना अचानक वारतात. त्यांच्यानंतर सुरू होतात ते त्यांच्या मागे राहिलेल्या मुला-सुनांचे भांडणे. मग ती संपत्ती असो, न झालेलं लग्न, पूर्वी झालेल्या घटना, प्रेम, माया ह्या प्रपंचातून ती भांडणे वाढत जातात अन रक्ता-रक्तातील दुरावा वाढत जातो. ह्या दुराव्याचा फायदा मग काही घरभेदी अन हितशत्रू घेत असतात. शिवाय घरात काही अघोरी खेळही सुरू राहतात. ह्या सगळ्यामगे काय आहे, कोण आहे, का चालू आहे हे सगळं ह्या सगळ्यावर मालिकेचं संपूर्ण कथानक बेतलेलं आहे.

अण्णांच्या नंतर घरातील मोठा मुलगा असतो तो माधव. पण तो मुळातच वेंधळा अन बावळट दाखवण्यात आला आहे. इतकी वर्षे मुंबईत प्राध्यापकी करत त्याचं आयुष्य व्यवस्थित चालू असत पण त्याचा धाकटा भाऊ अभिराम याच्या लग्नाच्या साखरपुडयाला तो गावाकडे येतो आणि तेथे घडणार्‍या विविध घडामोडींमुळे तो तिथेच अडकून राहतो. माधव हे पात्र लेखकाने भलतं रंगवलं आहे. बायकोसमोर वारंवार नमतं घेणारा, सांभाळून घेणारा, नम्र, घाबरट, भावुक असा हा माधव. कुठल्याही प्रसंगात केवळ एका विशिष्ट तारसप्तकात एखाद्याचं नाव घेण्याइतपत तो मर्यादित असतो. म्हणजे नीलिमाआआ, दत्ताआ, सरिताआ असा त्याचा नेहमीचा सुर. सॉरी, प्लीज हे तर त्याचे ठेवणीतील शब्द. पण असं असलं तरी त्याची स्वतःची अशी काही मते आहेत आणि स्वतःचे काही आडाखे आहेत. घडणार्‍या घटनांकडे तो केवळ एका दृष्टीकोणातून न पाहता तटस्थपणे त्याचा विचार करत असतो. त्याच्या बायकोचं त्या घटनांकडे अंधश्रद्धा म्हणून बघण असलं तरी तो त्या मताखाली दाबला जात नाही. किंवा घरातील इतर मंडळी त्याच्याकडे अघोरी विद्या, अनैसर्गिक प्रकार, बाहेरचं म्हणून बघत असले तरी त्यावर त्याचा पुर्णपणे विश्वास नसतो. तो प्रत्येकाच्या मतांचा आदर राखत त्यातून बाहेर पडू इच्छित असतो.

माधवची बायको नीलिमा ही एक संशोधक असते. गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर ती दीड-शहाणी असते. किंवा आधुनिक भाषेत सांगायचं म्हंटलं तर ती पुरोगामी असते. गावाकडे होणार्‍या घटनांकडे ती अंधश्रद्धा या एकाच नजरेतून बघत असते. ती वस्तुनिष्ठ वागणारी एक करती स्त्री असते. तिचा गावातील लोकांकडे बघण्याचा एकंदरीत दृष्टीकोण हा नकारात्मक असतो. सामाजिक वगैरे काम करणारी असल्याने ह्यांच्यापेक्षा आपण बुद्धीने अन कृतीने जरा उजवे आहोत असा तिचा समाज असतो. तिच्या स्वतःच्या मतापुढे ती कोणाचेच मत ग्राह्य धरत नाहीच, शिवाय स्वतःच्या नवर्‍याला अन मुलाला त्या मतांवर विश्वास ठेवावा असं तिचं म्हणणं असतं. एकंदरीतच ती वर्चस्ववादी स्त्री असते.

तिसरी महत्वाची भूमिका आहे ती दत्ताची. दत्ता माधवनंतरचा अण्णांचा दूसरा मुलगा. माधव मुंबईला गेल्यावर दत्ता हाच गावकडचा सगळा कारभार बघत असतो. अण्णांच्या नंतर सगळी जबाबदारी त्याचीच असते आणि तो ती उचलतही असतो. माधव एकंदरीतच निलीमाच्या धाकात असल्याने तो ज्या काही घटना घडत आहेत त्यात पारंपरिक उपाय करू शकत नाही. पण दत्ताला सर्व प्रकारे सर्व काही करणं भाग असतं.  घराचा डोलारा सांभाळणे हा तो स्वतःचं कर्तव्य समजतो. त्याची बायको सरिता ही जरा गरम डोक्याची असते. गावातील गृहिणी असते त्याप्रमाणेच ती वागत असते. संपत्तीच्या वाट्यात काहीच महत्वाचं न आल्याने तिचं मन खट्टू झालं असतं. घरासाठी सगळं करूनही हातात काहीच न आल्याने ती निराश असते ज्यातून चिडचिडेपणा बाहेर पडत असतो. तिचा एक मुलगा वेगळ्याच विश्वात वावरत असतो तर मुलगी अजून शिकत असते. आलेल्या वाट्यातून घर आणि मुलांचं भविष्य दत्ता-सरिताला अवघड दिसत असल्याने दोघेही नाराज असतात. ही त्यांची मूळ व्यथा असते.

तिसरे सुपुत्र आहेत अभिराम चिरंजीव. हे तर गुढग्या बाशिंग बांधलं करून तयार असतात ते फक्त लग्नासाठी. यांच्याच साखरपुडयात अण्णा अचानक वारले असतात. त्यामुळे हिच्या होणार्‍या बायकोला, देविकाला, अपशकुनी ठरवलं जातं जे ह्यांना कदापी मान्य नसतं. लग्न केलं तर हिच्याशीच एवढाच त्यांच्या आयुष्याचा भाग. कुठलीही घटना लग्नाच्या मुद्द्यापर्यंत नेऊन पोचवतात हे. देविकाशी लग्न एवढाच काय तो यांचा अट्टहास, त्यापुढे सगळं निरर्थक. तिकडे देविका हे काय रसायन आहे अजूनही काही कळत नाहीये. ती नेमकं कोणत्या बाजूने आहे हेच कळत नाहीये.

छाया ही अण्णाची मुलगी. तिचं लग्न झाल्याच्या रात्रीच तिचा नवरा मेला असतो. तेंव्हापासून ती येथेच राहते. जाताना अण्णा तिच्या नावावरही काहीतरी ठेऊन जातात. पण तिची व्यथा वेगळीच असते. तिला एकटेपणा सतावत असतो. घरात तिच्याशी कोणी बोलणारही नसतं. भविष्यात आपली काय दशा होईल एवढीच चिता तिला सतावत असते. घडलेल्या वाईट घटना आणि समोर आलेलं निष्क्रिय-निरर्थक आयुष्य यामुळे आपलं नशीब फूटकं हे तिच्या मेंदूत पक्क झालेलं असतं.

आता महत्वाची बाब आहे ती म्हणजे अण्णांच्या दुसर्‍या खात्याची. अण्णा हयात असताना त्यांचं लग्नाशिवाय दुसरं एक खातं असतं. शेवंता तिचं नाव. शेवंता हे अंनधिकृत खातं असल्याने त्यांचं अधिकृत खातं तिला जिवंतपणी घरात येऊ देत नाही. ह्या भांडणात शेवंता वाड्यासामोरच्या झाडाला फाशी घेऊन मरते. पण तत्पूर्वी शेवंता अन अण्णा यांच्यात सुशल्या (सुषमा) ही जमा होते. अण्णा असेपर्यंत ती घरातील गडी नाथाच्या घरात राहत असते. पण अण्णा जाताना तिला घरात घ्या अशी अट इच्छापत्रात टाकून जातात. त्यामुळे तिला घरात घेणे हे कायदेशीर बाब असते. ही सुशल्या काही सरळ रसायन दिसत नाही. हिच्या मनात विश दिसत आहे. घरातील इतरांची बरबादी अशीच तिची इच्छा असते.

आता नंबर आहे तो अण्णांच्या मागे राहिलेल्या पत्नीचा अन ह्या सगळ्यांच्या आईचा. आता अण्णा गेल्याने ती हतबल झाली आहे. एकतर घरात घडणार्‍या भयानक घटना, भावंडातील भांडणे यामुळे त्रस्त आहे. ह्या सगळ्याने घराची घडी तर कोलमडली असतेच, पण सर्व घराणं कोसळेल अशी तिची भीती असते. त्यामुळे जमेल तसं, आपल्या शक्तीने ती हे सर्व सावरत असते. घरातील सगळ्या गोष्टी आपल्या परीने सांभाळणे एवढच तिच्या हातात असतं.

नंतर महत्वाची पात्रे आहेत ती गुरव आणि नेने वकिलांची. अण्णा अकाली गेल्याने आणि घरातील भेद लक्षात आल्याने हे दोघे स्वतःचा हेतु साधू पाहत असतात. नेने वकील तर उघडउघड अण्णांची संपत्ती लाटू पाहत असतात. गुरव यांचा हेतु अजून उघडा पडला नाही. पण नीलिमाने केलेल्या अपमानाचा बदला हा त्यांचा अहंकाराचा विषय असू शकतो.

कथेतील इतर पात्रे आहेत पूर्वा, गणेश (दत्ता-सरिता) चे मुलं, अर्चिस (माधव-नीलिमा पुत्र), विसरभोळा-वेडा पांडू, घरगडी नाथा अन त्याची बायको. यातील गणेश हा काळ्या विद्या, भविष्य वगैरे असल्या गोष्टींच्या आहारी गेलेला असतो. मालिकेत पुढे त्याला चांगले दिवस असतील असं वाटत आहे. पूर्वा ही समजूतदार, कामाळू वगैरे आजीबाई प्रकार आहे. अर्चिस म्हणजे निरर्थक भटकणार्‍या प्राण्याप्रमाणे इकडून तिकडे भटकत असतो. पांडू हा विसरभोळा-वेडा असा सांग काम्या प्राणी वाटत असला तरी तो तसा नाही याची मला खात्री आहे. त्याचं तिथे असण्याला काहीतरी अर्थ आहे. मालिकेत त्यालाही महत्वाचं काम असावं असा अंदाज आहे. नाथा हा अण्णांचा विश्वासू नोकर. तो सरळमार्गी दिसत असला तरी त्याची बायको तशी नाही. त्याच्याही मनात काही आडाखे आहेत पण अजून तो शांत आहे.

to be continue…

अभिषेक बुचके लिखित || @Late_Night1991

नीलिमा येडी हाय!

error: Content is protected !!