Tag: मराठी साहित्य

अमृतवेल – वि. स. खांडेकर

अमृतवेल – वि. स. खांडेकर

पुस्तकप्रेमी   ||  पुस्तक समालोचन   ||  वाचन  ||  प्रीती आणि वासना

बर्‍याच महिन्यांनी काहीतरी वाचून पूर्ण झालं. सहा महिन्यांपासून वि. स. खांडेकर यांचं “अमृतवेल” डोक्याशी पडून होतं. वाचायला सुरुवातही केली होती पण फार कंटाळवाण वाटलं. लिहिताना मन अस्थिर असलं तर एकवेळ चालू शकतं पण वाचन करताना मन मोकळंच हवं. एखाद्या पाण्याच्या टाकीप्रमाणे मानसाच्या मनाचीही पुर्णपणे भरून जाण्याची क्षमता असते. जर मन चित्रविचित्र भावनांनी भारलेलं असेल आणि मेंदू तर्‍हेतर्‍हेच्या विचारांनी घेरलेला असेल तर त्याची Intake ची क्षमता संपते. अजून काही नवीन घ्यावं अशी इच्छाच होत नाही. घेण्याचा (म्हणजे वाचनातून विचार वगैरे) प्रयत्न केला तरी Overflow होत असतो. त्यापेक्षा थोडासा रीतेपणा येण्याची वाट बघावी.

खांडेकर यांचं “ययाती” आधी वाचलेलं होतं. तेही सरासरी आवडलं. ते सुमार होतं असं नाही पण, आवड असते प्रत्येकाची. खांडेकर यांच्या लिखाणात नात्यांची गुंतागुंत आणि त्यातून आयुष्याचा मंच चित्रित करण्याचा प्रयत्न असतो. याशिवाय मानवी मन किती चंचल आणि क्लिष्ट आहे हेही त्यातून प्रतीत होत असतं.

अमृतवेल हा एक नीरस वाटणारा प्रवास वाटतो. त्यात सर्वच प्रवासी अतिशय निराशाग्रस्त आणि जीवनाला विटलेले वाटतात. त्यातील जी मुख्य पात्र आहेत त्यांनी “आत्महत्या” ही एक सुखद निवड किंबहुना पळवाट शोधलेली असते. मृत्यू हा किती जवळचा आहे प्रत्येकासाठी याचे संदर्भ वारंवार येत असतात. माणसाला दुखं सहन करण्याची शक्ति नकोच असते. उलट दुखाला कुरवाळत बसून स्वतःच्या अंताची वाट बघण्यातच स्वारस्य वाटू लागतं. पण ते काही काळपुरताच. रात्रीचा अंधारमय प्रहर संपून दिवसाचा प्रसन्न प्रकाश येईपर्यंत ते मळभ तसच राहतं. मानवी मनाला मनोरंजन हवं असतं. काहीतरी नवीन हवं असतं. कधी खेळायचा तर कधी चघळायला! कितीही मोठं दुखं असलं तरी ते काळाच्या ओघात विसरता येतं, त्यासाठी नवीन दुखाची वेदना हवी किंवा प्रेमाची फुंकर घालणारं कोणीतरी सोबती हवा असतो. माणसं चांगली किंवा वाईट आहेत हे आपला त्याच्याकडे बघायच्या दृष्टीकोणावरून ठरतं. एखाद्या प्रती असलेलं ग्राह्य मत हेच त्याची प्रतिमा ठरवतं. पण ती व्यक्ति दुसर्‍या कोणासाठी तशीच असेल असं नाही. माणसागणिक माणसाची प्रतिमा बदलत जाते. याच सर्व मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या गुंतागुंतीचा “अमृतवेल” मध्ये धांडोळा घेतला आहे. येथे अमृतवेल या नावाला बराच अर्थ आहे. एक चित्र आहे त्याला अमृतवेल म्हंटलं आहे. त्यात प्रीतीचा सुगंधही आहे आणि वासनेचा मुर्छित करणारा उग्र दर्पही आहे. आकाशाकडे झेपावणेही आहे आणि पुन्हा जमिनीकडे झुकणेही आहे.

अमृतवेल वाचत असताना ययाती मधील पात्र मध्ये-मध्ये डोकावत होते असं वाटतं. पण ययाती, यती आणि कच्छ तीनही एकाच देवदत्तमध्ये सामावले आहेत अशीही जाणीव होते. ययातीमध्ये मानवी जीवनाचं जे भेसूर वर्णन आहे तेच अमृतवेलमध्येही आहे. प्रेम, प्रीती, वासना, प्रतिशोध, द्वेष, माया, भक्ति या भावनांच्या विविध रंगांनी हे चित्र रेखाटलं आहे. दुसरं म्हणजे, अमृतवेल वाचत असताना ‘साहेब, बिवी और गॅंगस्टार’ या चित्रपटातील काही संदर्भ डोळ्यासमोर आल्याखेरीज राहत नाहीत. मोह संपत्तीचा कितीही असला तरी मायेच्या तराजूत त्याला किम्मत नसते. नंदा, वसू, देवदत्त ही तीन प्रमुख पात्र एकाच जहाजात बसून प्रवास करत असतात. पण हे त्रिकुट परस्परांच्या प्रती किती वेगवेगळे दृष्टीकोण ठेऊन असतात हे वाचकाला टप्प्याटप्प्याने उलगडत जातं. सोबत्यांप्रती मतं बनवताना केवळ डोळ्याला दिसतं ते यावर विश्वास ठेवला तरी नात्यांत दरी वाढत जाते. त्यासाठी मनाची कवाडे उघडी ठेवावी लागतात अन मायेच्या संवादांनी जाणिवेच्या कक्षा रुंद कराव्या लागतात.

पूर्वार्धात कथानक अत्यंत रटाळ वाटतं. काही घटना, नाट्य घडतच नाही. नंदा या पात्राची पार्श्वभूमी आणि मनोस्थिती ठळक करण्यासाठी बराच अवधि जातो. तिथे जीवनाचं तत्वज्ञान आणि वास्तव वगैरे समजावून सांगण्यात संथपणा आला आहे. पूर्वार्ध त्यामुळेच कदाचित कंटाळवाणा वाटतो. पण नंदाच्या आयुष्यात वसू-देवदत्त हे जोडपं आणि त्यांची मुलगी मधुरा येतात तेंव्हा कथेत जिवंतपणा येऊ लागतो. पण रस्ता कितीही सुरेख असला तरी गाडीचा वेग न वाढवल्याने प्रवासात वेगळेपण येत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत संथपणा कथेला ‘कधी एकदा संपते’ या अधीरतेवर नेऊन सोडतो. तेथे लेखकाने वापरलेली वचने, उदाहरणे आणि अलंकारिक भाषा यामुळेच कदाचित वाचक (किमान मी) खिळून बसतो. पुढे काय होणार याची उत्कंठा तर असतेच आणि साजेसे ट्विस्ट सुद्धा आहेत पण एकत्रित परिणामकारकता येत नाही. पण उत्तरार्ध आणि शेवट चांगला झाला आहे. कथेत जी परिस्थिती उभी आणि लेखक ती ज्या कोनातून दाखवतो ते वाचण्यासारखं आहे.

जेंव्हा मानसाच्या आयुष्यात जगण्यासाठी निमित्त राहत नाही तेंव्हा तो मृत्युची वाट बघत बसतो. जेंव्हा दुखं मनातच ठसठसत राहतं तेंव्हा त्याचे प्रतिध्वनी सतत उमटत राहतात. पण जगण्याला उमेद मिळते, कारण मिळतं तेंव्हा मात्र साचलेली नकारात्मकता उफाळून येते अन सकारात्मकतेतं परावर्तीत होते. अमृतवेल तेच सांगते!

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

वाचा भयकथा खालील लिंकवर

https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-m4gdjtXUO2YX 

 

राधा – प्रेमकथा

राधा – प्रेमकथा

मराठी प्रेमकथा   ||  मराठी साहित्य  ||  मराठी कथा  || Marathi Story  ||  लघुकथा  ||  Love Story

मी जरी कृष्ण नसलो तरी तू मात्र मला नेहमीच राधा वाटायचीस!!! पण मी कृष्ण असतो तरी काय फरक पडणार होता, कारण कृष्ण-राधा प्रेम तरी कुठे पूर्ण होऊ शकलं. तुझ्या आणि माझ्या प्रेमाचीही तीच तर्‍हा… जगातील अनेक अयशस्वी प्रेमकथांपैकी आपलीही एक… अयशस्वी प्रेमानंतर आयुष्य थोडीच थांबतं..?

प्रत्येकालाच स्वतःची प्रेमकथा वेगळी वाटत असते, पण आकाशातील असंख्य तार्‍यांप्रमाणेच तीही एक असते. तिचं अस्तित्व जरी वेगळं असलं तरी ती गर्दीत हरवलेली असते. माझीही प्रेमकथा तशीच असेल.

कधीतरी भावनांचा कोंडमारा होतो अन मनातील उद्विग्न भाव ओठांवर येतात.

ती आज कशी असेल ? कुठे असेल ? अर्थात, तिने मला आठवायचं काही कारणच नाही म्हणा. किंवा माझ्याच आठवणीत झुरत असेल. माहीत नाही.

                 मी फारतर 16-17 वर्षांचा असेन तेंव्हा. बारावीत होतो. प्रेम वगैरे काय भानगड असते याबद्दल कसलीच माहिती नसलेलं वय. चित्रपटात बघितलेलं ते प्रेम असं वाटायचं. सगळं स्वप्नवत. प्रेमाच्या सगळ्या संकल्पना चित्रपटातून उगम पावायच्या. भ्रामक!

आयुष्य कसं अगदी रेल्वेच्या गतीप्रमाणे संथपणे पुढे जात होतं. पण तिला पाहिलं अन गाडी रुळावरून घसरली… राधा… राधा… राधा… नावातच किती गोडवा तिच्या! सतत राधा नावाचा जप केला तरी प्रेमात आकंठ रंगून गेल्यासारखं होईल.

पावसाळ्याचे दिवस होते ते. काळकुट्ट आभाळ अन धो-धो बरसणारा पाऊस. दिवसाही अंधारून यायचं. कॉलेजच्या पायर्‍यांवरून जात होतो. पायर्‍यांवर अंधार होता. वर जाताना गर्दीत तिचा हलकासा स्पर्श झाला अन सारं अंग मोहरून गेलं. मी वळून पाहीलं, तीही मंदपणे हसून माझ्याकडे बघत होती. मी फक्त तिच्याकडे एकटक बघत होतो. गर्दीने मला वर नेलं, नाहीतर मी तिथेच उभा राहून फक्त तिच्याकडे बघत राहिलो असतो.

कृष्णाच्या राधासारखी… हो अगदी तशीच… किती गोड दिसायची… थोडासा गोल चेहरा, मोठे पाणीदार डोळे, नक्षीदार भुवया, उभट नाक, चपटे ओठ अन हनुवटीवर काळा तीळ. मोकळे सोडलेले पण व्यवस्थित केस पाठीवर रेलायचे अन त्यावर गुलाबी रिबिन…. उफ्फ!!!

काय झालं माहीत नाही, पण ते रूप माझ्या मनावर कायमचं कोरल्या गेलं. तिचं मागे वळून पाहणं अन स्मितहास्य करणं म्हणजे खळखळणार्‍या लाटेला किनार्‍याने साद घालावी तसं होतं. लाघवी हास्य!!! त्यात सार्‍या विश्वाची शांतता लपल्यासारखं वाटायचं. मोहक आणि अगदी निरागस!

ती पहिली भेट आयुष्यभरासाठी एक अमूल्य आठवण देऊन गेली. दुसर्‍या दिवशी तिची सर्व माहिती काढली. तिचं नाव राधा आहे हे कळल्यावर त्या दोन शब्दांत आयुष्याचा सार लपलाय असं वाटू लागलं. ती अकरवीत होती. माझ्यापेक्षा एक वर्ष मागे. फार हुशार नव्हती, पण गाणं खूप सुंदर म्हणायची असं कळलं. तिचा आवाज ऐकायला मी उतावीळ झालो होतो. जमेल तिथे, जमेल तसं तिच्या जवळ जाण्याचे माझे प्रयत्न चालू होते. संधी स्वतः चालून आली.

कॉलेजात स्नेह-संमेलना निमित्त फॉर्म वगैरे वाटप करून नाव नोंदवून घेणं चालू होतं. आमच्या केंद्रे सरांनी ते काम मला दिलं.

ती माझ्याकडे चालत येत होती… माझ्याकडेच बघत होती… तिचे ते पाणीदार डोळे बघून माझ्या अंगाला घाम सुटला… तिच्याशी बोलायचं म्हणजे आता त…त…प…प होणार. ती चालताना अशी हळुवार चालायची जणू एखाद सुंदर पक्षी पावसात धुंद होऊन डोलत असल्याप्रमाणे भास व्हायचा. मीही तिच्याकडे एकटक बघायचा असफल प्रयत्न केला. तिची इतकी भीती मला का वाटत होती हे कोडं मला कधी सुटलंच नाही. अंतराळातून चंद्राचा प्रकाश फक्त आपल्याकडे येतो आहे तसं वाटत होतं.

ती समोर येऊन उभी राहिली अन म्हणाली, हॅलो मला गाण्यासाठी नाव नोंदवायचं आहे.

मी खूप घाबरलेलो होतो. काय बोलावं, कसं बोलावं ते काहीच सुचत नव्हतं. मेंदूची सारासार काम करण्याची प्रक्रियाच बंद झाली होती. मी गडबडीने उत्तर दिलं पण ते तिला तुसडेपणा वाटला असावं असं आज वाटतं.

“हे घ्या, नीट भरून द्या.” मी असं काहीतरी बरळलो.

डोळे तिरपे करून मी तिच्याकडे बघत होतो. तिच्या हनुवटीवरील बारीक तिळाने माझं लक्ष फारच वेधून घेतलं. एखाद्या परिप्रमाणे ती माझ्यासमोर उभी होती. तिच्या गालावरील सौम्य लाली मला खुणावत होती. तिचं डोळे भिरभिर फिरवणं माझ्या काळजाचं पाणी-पाणी करत होती.

“हे इथे काय लिहायचं?” तिने शांतपणे मला विचारलं.

तिचा आवाज कांनांतून थेट हृदयाला भिडल्यासारखा वाटत होता. छाती मोठमोठ्याने ठोके देत होती. मी मूर्खासारखा आ वासून तिच्याकडे बघत होतो. त्या चेहर्‍याशिवाय विश्वात काहीच नाही असं वाटत होतं. त्या दोन डोळ्यांत मी हरवलो… स्तब्ध झालो… माझं शरीर मला मोरपंखाप्रमाणे अलगद वाटू लागलं…

तिने परत प्रश्न करताच मी भानावर आलो अन गडबडीने तिला उत्तर दिलं… तिला सांगत असताना तिच्या हातांकडे लक्ष गेलं अन हातावरील लाल मेहंदी दिसली… गोर्‍या हातांवर लाल मेहंदी किती खुलून दिसत होती. मी काहीतरी उत्तर देऊन वेळ निभावून नेली.

पेन परत घेत असताना तिच्या हातांचा हलकासा स्पर्श माझ्या हातांना झाला. मी तर मोहरून गेलो होतो, पण त्या स्पर्शाने तिला कदाचित आमची पहिली भेट आठवली असेल. पायर्‍यांवर झालेला तो उबदार स्पर्श कदाचित तिला आठवला असेल. त्या स्पर्शानिशी ती माझ्याकडे बघून गालातल्या-गालात हसली. उफ!!!!

तू सुंदरा, तू अप्सरा, वसतेस तू मनमंदिरा

तू लाघवी, तू मोहिनी, राधा जशी वृंदावनी…

मनात घालमेल सुरू झाली. ब्बास!!! अजून काय पाहिजे आयुष्यात? इतकी सोज्वळ मुलगी आपली व्हावी केवळ ही भावनाच विश्व जिंकल्याचा आभास निर्माण करत होती अन त्या आभासात राहण्याची मेंदूला सवयच जडली होती. क्षणोक्षणी तिची आठवण मनाला नेहमी ऊर्जित ठेवत असे.

आयुष्य काय असतं हे कळायच्या आधीच आयुष्याचे निर्णय घेण्याची घाई झाली होती. अल्लड मन वार्‍यावरती वाहत जाऊन तिच्यापर्यंत पोचत होतं. आता काहीही करून तिला आपलं बनवायचे विचार मनात घोळत असायचे. येता-जाता तिला बघून हसणं, तिच्या घरापर्यंत पाठलाग करणं, तिच्यासमोर आपली चांगली प्रतिमा उभी करणं असे उद्योग चालू होते. तिलाही ते कळत असावं, कारण तीही कधीतरी स्मितहास्य करून प्रतिसाद देत असे.

                 कॉलेजच्या स्नेहसंमेलनात तिने गाणं म्हंटलं होतं. तिच्या त्या मधुर आवाजाचे प्रतिध्वनी अन ते प्रेमगीताचे बोल मनाच्या गाभार्यात अक्षरशः थैमान घालत होते. खुल्या मैदानात घोडा धावत सुटावा तसं माझं मन तिला आपलं बनवण्यासाठी उत्साहित होत होतं. राधेचं माझ्याप्रती काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी मी उतावीळ झालो होतो. माझ्या आयुष्यात मी तिला सर्वोच्च स्थानावर बसवलं असताना तिच्या मनात माझ्यासाठी तीच प्रेमाची भावना आहे का हे जाणून घेणं मला अत्यंत महत्वाचं वाटत होतं. मी तिला पत्र लिहिलं.

Image result for love

प्रिय राधे,

                 सर्वप्रथम, तूला माझी ओळख व्हावी म्हणून सांगतो, मी बारावी अ तुकडीतील ध्रुव. तू मला कितपत ओळखतेस हे मला माहीत नाही, पण प्रथम आपली भेट त्या पायर्‍यांवर झाली होती. त्यादिवशी तुझ्याशी झालेली चकमक पुढचे अनेक दिवस माझ्या आयुष्यात थैमान घालत होती. तुझ्या निरागस डोळ्यांत अन प्रेमळ चेहर्‍यात मी स्वतःचं अस्तित्व हरवून बसलो होतो. तो अपघात ईश्वराने जाणीवपूर्वक जुळवला असेल असं मला वाटतं. कारण त्यानंतर प्रत्येक क्षण मी माझं आयुष्य तुझ्याशी जोडून बघत आलो आहे. आकाशातून सुंदर चांदणं तुटावं अन अलगदपणे जमिनीच्या कुशीत विसावा घ्यावं तसं तू माझ्या आयुष्यात आलीस.

आभासात का होईना, मी तुझ्याशी माझं जीवन बांधून टाकलं आहे. दिवसातला प्रत्येकक्षण तू दिसत रहावीस म्हणून सतत तुझ्या मागे-पुढे राहण्याचा वेडा हट्ट माझ्या मनाने केला. त्या दिवशी तू जे गाणं म्हंटलंस त्यानंतर मन थार्‍यावर नाही. सतत तुझा आवाज मनात उमटत असतो अन तुझ्या सोबतीची आशा करत असतो. आता धीर धरवत नाही. मी तुला केंव्हाच आपलं मानलं आहे. पण तू… तू माझ्याबद्दल काय विचार करतेस हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुला माझ्याप्रती कोणती भावना आहे हेच आपलं भविष्य ठरवणार आहे. मला माहीत नाही प्रेम काय असतं, कधी त्या मार्गावर गेलोच नाही; पण जे तुझ्याशी झालं आहे त्याहून वेगळं काही प्रेम असतं असं मला वाटत नाही.  आयुष्यात पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं ज्याच्यामुळे जगणं हे खूप उत्साही वाटत आहे. जगातील प्रत्येक चांगली गोष्ट मी जिंकू शकतो असं वाटतंय हल्ली. हे सगळं तू माझ्या मनात घर करून राहिलीस तेंव्हापासून होतंय… हेच प्रेम असतं ना?

तुला माझ्याप्रती काय वाटतं ते अगदी मोकळेपणाने सांग…. किमान तुझ्या मैत्रीची अपेक्षातरी मी नक्कीच ठेऊ शकतो. तुझ्यात गुंतलेला जीव सुटणार नसला तरी तुझ्या नकारानंतर तुझं स्वातंत्र्य स्वीकारायचं हे माझ्या वेड्या मनाला ठाऊक आहे. तुझ्या केवळ नावाचा उच्चार हा माझ्या अंगावर रोमांच उभे करतो… तू माझ्यासाठी कोण आहेस याहून काय वेगळं सांगू… पण या पत्राला माझी गुस्ताखी समजू नकोस… तुझे हजारो चाहते असतील, मी फक्त ते भाव व्यक्त करणारा पहिला असेन… माझ्यावर विश्वास नसेल अन हा माझा उद्धटपणा वाटत असेल तर हे पत्र फेकून दे… पण माझ्यावर जराही विश्वास वाटत असेल तर मित्र म्हणून तरी तू माझा विचार करू शकतेस….

तुझाच

ध्रुव

हे पत्र तिच्या हातात देण्यापूर्वी चिंता वं भीती माझे सोबती झाले होते. पण जेंव्हा धाडस करून तिला हे पत्र सोपवलं तेंव्हा मन शांत झालं. उंच पर्वतावरून उडी मारावी तसं. आता माझ्या हातात काहीच नव्हतं.

मी तिला पत्र देत असताना ती अतिशय शुष्क भाव चेहर्‍यावर आणून माझ्याकडे बघत होती. मला क्षणभर तिच्या त्या नजरेची भीती वाटली. समोरून येणारा प्रेमाचा प्रस्ताव कुठल्याही मुलीला “आपण मोठे झालो” अशी जाणीव करून देत असावा.

माझी अस्वस्थता वाढली होती. पत्र वाचल्यानंतर तिची प्रतिक्रिया काय असेल हे जाणून घेण्यासाठी मी अत्यंत उतावीळ झालो होतो. तिचा होकार किंवा नकार माझ्या आयुष्याची पुढचं वळण ठरवणारा होता. क्षणोक्षण तिची आकृती डोळ्यांसमोर उभी राहायची. ती हसून मला मिठी मारत आहे असं गुलाबी स्वप्न जागेपणी पडायचं तर कधी, ती भेदक नजरेने माझ्याकडे बघत माझ्या भावना पायदळी तुडवतीय असं भयानक स्वप्नही पडायचं.

दोन-तीन दिवसांनी उत्तर आलं. तिने मला कॉलेजच्या फंक्शन हॉलमध्ये बोलावलं. त्या हॉलमध्ये आम्ही दोघे म्हणजे विश्वाच्या पोकळीत फक्त दोन ध्रुवतारे असल्याप्रमाणे वाटत होतं. फक्त एकमेकांसाठी…

मला बघताच ती गोड हसली. मला माझं उत्तर मिळालं होतं. तिचे होकाराचे शब्द ऐकण्यासाठी माझे पंचप्राण आतुर झाले होते.

ध्रुव तूही मला आवडतोस… तुझ्या स्पर्शाने माझ्याही मनात प्रेमांकुर फुलू लागला होता. गेले कित्येक दिवस तुझं माझ्या आजूबाजूला असणं मला एका वेगळ्याच धुंदीत न्यायचं… एक नशा चढायची… रोज आरशात बघताना तुला मी कशी वाटते याचा विचार पहिला मनात यायचा… मी मलाच तुझ्यासोबत बघायचे… जितकं प्रेम तुझ्या मनात माझ्यासाठी आहे तितकंच प्रेम माझही आहे… प्रेमाला कसलीच बंधने नसतात.. आपल्या दोघांत कधीच दुरावा येणार नाही…

                 ते क्षण माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षण होते. कोठे जपून ठेऊ त्या क्षणांना असं वाटत होतं. मी अक्षरशः स्वर्गप्राप्तीच्या आनंदात होतो. राधा माझी होणार ही कल्पनाच मला वेड लावत होती. ती बोलत असताना अंगावर शहारा येत होता पण तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता… बस, ती माझी आहे ही भावनाच मला व्यक्त करण्यासाठी पुरेशी होती… राधा…

त्या दिवशी उत्साहाच्या भरात मी घरी निघालो होतो. जितक्या वेगाने माझं मन धावत होतं तितक्याच वेगाने माझी सायकलही धावत होती. सगळ्या जगाकडे मी वेगळ्याच नजरेने बघत होतो. आता कसलीच उणीव भासणार नाही असं वाटत होतं.

                          काय झालं ते कळलच नाही. जाग आली तेंव्हा सगळं धुरकट पांढरं दिसत होतं. मेंदू अचानक जागृत झाला. मी स्वर्गात होतो!!! माझा मृत्यू झाला होता. सायकल एका ट्रकखाली येऊन मी जागेवरच मृत पावलो होतो. त्या ट्रकच्या चाकांखाली चिरडल्या गेलेल्या माझ्या शरीरापेक्षा माझ्या भावनांचा, माझ्या प्रेमचा जो चुराडा झालाय ते जास्त भयावह होतं. क्षणात सर्वस्व मिळावं अन क्षणात सगळं नाहीसं व्हावं अशी गत… ईश्वर इतका का निर्दयी असतो…?

माझा आत्मा तळमळत होता. राधाची आठवण इतक्या अंतरावर असूनही जराही कमी झाली नव्हती. तिचा तो निरागस चेहरा, तो मधुर आवाज अन तिचे प्रेमाचे शब्द मला खूप छळत होते. माझ्या तिच्या शेवटच्या भेटीत, तिच्या डोळ्यात आयुष्याची सुरेख स्वप्ने दिसत होती.

मी ईश्वराला खडसावून विचारलं, रागावलो अन उद्विग्नपणे आरोप केले, पण त्याने मला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं समर्पक उत्तर दिलं. त्यात राधेचं काहीच चूक नव्हतं.

आता मलाच जळत राहायचं होतं… माझा आत्मा नवीन शरीरात जाणार होता… तिथे दुसर्‍या अस्मिता, दुसरी ओळख, दुसरे भाव घेऊन जगणार होतो मी. पण मधूनच कधीतरी स्वप्नात राधेची पुसटशी आकृती मला गतजन्मीची झलक दाखवणार होती. भलेही मला काही समजलं नाही तरीही राधा माझ्या आत्म्याच्या एका बंद कुप्पीत असणारच होती. फक्त त्या जाणिवा मला येणार नव्हत्या.

इकडे राधा माझ्याविणा काय करत असेल दे दृश्य मला कल्पनाच करवत नाही. तिने ज्या मुलाला आपलं सर्वस्व मानलं अन तो क्षणार्धात निघून गेला हे वास्तव तिचं मन कसं स्वीकारू शकेल? तिच्या हृदयाला घाव बसल्याशिवाय राहणार नव्हता. तिचं काय चालू आहे हे बघायची अनुमती देवाने दिली नाही. त्या जन्मात आमचं एकत्र असणं नियतीने लिहिलं नव्हतं. पण देवाने एक वचन दिलं की पुढच्या कुठल्यातरी जन्मी राधा व मी एकत्र असू… केवळ हे शब्दच मला अनेक जन्म-मृत्युच्या फेर्‍यांतून जाण्यासाठी प्रेरित करत होते… मी वाट्टेल ते दुखं भोगायला क्षणार्धात तयार झालो… अनेक योन्यांतून जन्म घेऊन अन अनेक चीतेच्या भक्षस्थानी पडून मला माझ्या राधेला भेटायचं होतं… देवाकडून त्या स्मृती मी बंद कुप्पीत का असेना साठवून घेतल्या… भविष्यात कधीतरी राधा माझीच होणार होती… आज नसली तरी… मी हजारो वर्षे वाट बघायला तयार होतो… बघणार होतो… राधा माझी होण्यासाठी…

===समाप्त===

सर्व हक्क सुरक्षित @ अभिषेक बुचके  &  latenightedition.in  &  @Late_Night1991

मी ब्रम्हचारी

‘ती’ची गोष्ट – समाजवास्तव

‘ती’ची गोष्ट – समाजवास्तव

मराठी कथा  ||  अंधश्रद्धा आणि वास्तव ||  स्त्रीशोषण  ||  

Image result for स्त्री अत्याचार

हेलावून सोडणारी कथा… 

https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-OGRXN5Wc3IBq

 

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

वाचा अजून काही कथा…

तोच असे सोबती…

संवार लूं – प्रेमकथा

संवार लूं – प्रेमकथा

मराठी कथा   ||  मराठी साहित्य   ||  प्रेम  ||  मृगजळ  ||

झोपेत कोणती स्वप्नं बघावीत हेसुद्धा आपल्या हातात नसतं. मग रोज बदलत जाणारं आयुष्यतरी हातात ठेवण्याचा अट्टहास का करावा! डायरीची पानं उलटली तर एकतरीअनोळखी कोपरा सापडतोच जो विचार करायला भाग पाडतो. हरवलेलं खूप दिवसांनी सापडलं की ते आपलंच होतं का हा प्रश्न पडतोच…

Related image

https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%82-3FeYUi1aenl7

 

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

अजून कथा वाचा…

प्रवासयोग

 

मार्गस्थ – मराठी कथा

मार्गस्थ – मराठी कथा

मराठी कथा  || नैराश्य  ||  संन्यास  ||  मोक्ष  ||  मराठी साहित्य  || 

कधी कधी सगळं सोडून जायची इच्छा होत असते. मानवी मन प्रसंगानुसार हेलकावे खात असतं. तोल जातो तेंव्हाच स्वतःला सांभाळायचं सामर्थ्य लाभतं. माणूस स्वतःला ओळखायला शिकतो कारण जगाने त्याला ओळखलं नसतं. अशाच एका व्यक्तीची कथा!

Image result for संन्यासी

https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5-vDodPbfJW8dJ

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

अजून कथा वाचा… 

पृथ्वीवरील परप्रांतीय!

Morning Motivation

Morning Motivation

मराठी कथा   ||   प्रवासकथा   ||  निवांतक्षणी   ||  फिरस्ती  ||  प्रसन्न पहाट ||  निसर्ग 

रोजच्या जीवनात इतका पसारा असतो की तिथे मनाला प्रसन्न करणार्‍या साध्या-सरळ अनुभवांना मनसोक्त जगताच येत नाही. साधेपणात, निसर्गाच्या सानिध्यात माणसाचं खरं रूप माणसाला दिसतं. स्वतःचीच प्रतिमा अधिक उजळपणे दिसू लागते.

Related image

तीन मित्र भल्या पहाटे फिरण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी जातात. शहरापासून थोडसं दूर गेल्यावर निसर्गाचं मनमोहक रूप बघून ते हरवून जातात. सगळं नैराश्य लयाला जातं आणि एकटेपणा हवाहवासा वाटू लागतो. तेथे मिळालेले अनुभव हे सकाळच्या Morning Motivation च्या मेसेजपेक्षा अधिक सुखावह असतात!

https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-x5p7NFpXcclz

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

अजून कथा वाचा… 

चेहरे आणि मुखवटे

अंधार जंगलातील रात्र! – भयकथा

अंधार जंगलातील रात्र! – भयकथा

मराठी भयकथा   ||  मराठी साहित्य   ||  गूढ शक्ति   ||  थरार  ||  

सत्य आणि आभासाच्या मध्ये पुसटशी रेषा असते. त्या रेषेच्या सीमेपलीकडे मानवी मेंदूची कसोटी लागते. सर्वस्व पणाला लागूनही आभासी जग पाठलाग करतच राहतं!

Image result for horror jungle

आपण वृत्तपत्रात, टीव्हीवर किंवा कोणाच्यातरी तोंडून बर्‍याचदा अशा गोष्टी ऐकतो-बघतो ज्याचं नेमकं विश्लेषण आपल्या मेंदूला करता येत नाही. आपण त्यावर मत देऊन मोकळे होतो, पण त्याबद्दलची उत्सुकता आपल्या मनात कायम राहते. त्या घटनेमागे नेमकं काय आहे, तो प्रसंग नेमका कसा घडला याबद्दल तर्‍हेतर्‍हेने चर्चा होत असते. सत्य कायम अनुत्तरितच राहतं…

काही मित्र मजा-मस्ती करण्यासाठी एका अपरिचित जंगलात जातात. तिथे गूढ आणि अमानवी शक्तींशी त्यांचा सामना होतो. मृत्यू आणि जीवनाचा संघर्ष सुरू होतो… शेवट होतोच! पण कोणाचा?

पूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-m4gdjtXUO2YX

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

अजून कथा वाचा… 

मोहजाल- भयकथा

कुरूप प्रेम

कुरूप प्रेम

मराठी कथा  ||  मराठी साहित्य  ||  प्रेमाचा रंग  ||  Marathi Story  ||  लघुकथा

Image result for love images

आज तिचा मुलगा दिसला। तोही अगदी तिच्यासारखाच गोड, गोरा अन पाणीदार डोळ्यांचा. त्याच्याकडे बघून आज तिचीच आठवण प्रकर्षाने दाटून येत होती. पुरुषाच्या आयुष्यात ती असतेच असते. कधी कोणाला ती भेटते तर कधी ती फक्त आठवणीत राहते… प्रेम तर जीवापाड करत होतो तिच्यावर, पण चतुर्थीच्या चंद्राप्रमाणे ते अर्धवट पण पवित्र, पूजनीय राहिलं… निरागसपणे, अनाहूतपणे झालेलं प्रेम जितकं जुनं होत जातं तितकं ते लिंबाच्या लोणच्याप्रमाणे नसनसात मुरत जातं, पण त्यातला गोडवा कधीच कमी होत नाही….

हा जर आमच्या दोघांचा मुलगा असता तर इतका गोड असला असता का? हा प्रश्न मला लागलीच स्पर्शून गेला. त्या गोऱ्या, सुरेख लावण्यवती समोर मी अक्षरशः राख होतो. माझ्या मनातला हाच न्यूनगंड मला कधी तिच्यावर मनमुरादपणे प्रेम करू देत नव्हता. चंद्राला ग्रहण लागेल की काय अशी भीती वाटत राहायची.

तिच्याशी बोलतानाही मनात सतत स्वतःच्या कुरूप असण्याची सल कायम बोचत असायची. तिच्या पाणीदार डोळ्यात मला माझं विचित्र, अप्रिय रूप दिसायचं. यामुळेच आमचं प्रेम कधी बहरू शकलच नाही. तिचं माझ्यापेक्षा सुंदर असणंच मला आमच्या प्रेमात अडसर वाटत होतं… मी स्वतःच्याच कोंडमार्‍यात अडकलो होतो…

तिला माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या तर मित्र म्हणूनही ती माझ्या कबड चेहऱ्याबद्दल थट्टा करेल हीच भीती कायम असायची. दुर्दैवाने एकतर्फी प्रेमाचं ते वर्तुळ कधी पूर्ण होऊच शकलं नाही आणि कर्करोगाप्रमाणे विरहाची अन अपराधीपणाची दाह मनात नेहमीच घर करून राहिली…

तिच्या मुलाशी मी बोलत होतो… त्या गोंडस चेहर्‍याकडे बघितल्यावर आपसूकपणे एका जुन्या असह्य जखमेवरची खपली उकरल्या गेली होती… फेसबुकवरील फोटोपेक्षा तो खूपच गोरा अन लाघवी वाटत होता… अगदी त्याच्या आईसारखाच सुंदर!!

त्याच्याशी बोलत असताना आमच्या चिमुकलीने मला, “बाबा” म्हणून हाक दिली. माझी मुलगी! माझी मुलगी खूपच सुंदर, गोड अन छान दिसते… तिच्या आईवर गेलीय न! जेंव्हा तिच्याकडे बघतो तेंव्हा मन समाधानाने भरून वाहतं.. ती माझ्यासारखी नाही दिसत यामुळेच.. माझी कुरूपता तिच्यात उतरली नाही यासाठी परमेश्वराचे शतदा आभार मानत असतो…

मी माझाच नव्हतो. माझ्याच मनाने मला मारलं होतं. सृष्टीत निर्माण होणारा प्रत्येक जीव हा सुंदर असूच शकत नाही, पण तरीही सृष्टीने त्याला स्वतःची ओळख, स्वतःचं वेगळेपण दिलेलं आहे हे मला कधी उमजलच नाही. स्वतःवर प्रेम करायला शिकलं की जगही आपल्याला कवेत घेतं ही जाणीव कधीच नव्हती. प्रेम हे मनापासून केलं जातं, त्याचा वरवरच्या सौन्दर्यवर, आकर्षनावर काहीच संबंध नसतो…

जोपर्यंत माझ्या पत्नीने मला फक्त वरवरच्या सौंदर्यापेक्षा मनातील सौंदर्यावर प्रेम करायला शिकवलं नाही तोपर्यंत

मी न्युंनगंडच्या दरीत अडकून होतो.. तिनेच माझा दृष्टीकोण बदलला… डोळ्यावर चढवलेला चश्मा उतरवला… तिच्यामुळेच मी खूप सुखी होऊ शकलो… पण हे सगळं तिने, माझ्या प्रेयसीने, पहिल्या प्रेमाने का केलं नाही याचही दुखं होतं… तिने मला कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलाच नाही…

माझी बायको खेड्यातील अडाणी स्त्री. तिने माझ्याशी का लग्न केलं हा प्रश्न मला नेहमी सतावत असे. तिचं कुटुंब परिस्थितीने गांजलेलं होतं. माझ्याकडे चांगला पैसा होता. लग्न लागलीच जमलं. लग्न वगैरेवर विश्वास राहिला नसताना मी तिच्याशी लग्न केलं अन ती माझ्या आयुष्यात आली. पण माझ्यासारख्या कुरूप माणसाने पैशाच्या बळावर तिला विकत घेतलं आहे असा आरोप मीच माझ्यावर करत असे. पण मी चुकत होतो. तिने माझ्या वरच्या रूपावर किंवा पैशांकडे बघून नव्हे, तर आतल्या संवेदनशील माणसाकडे बघून मला स्वीकारलं. माझ्या कुरूपतेप्रती तिच्या मनात कधीही घृणा किंवा राग मी कधीच बघितला नाही, कारण तिच्याप्रती ते सगळं निरर्थक होतं. भरकटत असलेल्या नावेला किनारा भेटला. मला पूर्णतः बदलून टाकलं तिने. जगण्याचा नवा दृष्टीकोण दिला. तिथे मला खरं प्रेम झालं… उमगलं…

         भूतकाळ लयाला जाऊन आज मी अतिशय सुखी, समाधानी आयुष्य जगत होतो. एक नवा उदय झाला होता.

माझी मुलगी अन तिचा (जुन्या प्रेयसीचा) मुलगा वर्गमित्र!!! ते एकमेकांसोबत मनमोकळेपणाने खेळत होते, मस्ती करत होते. त्या निरागस मनात कसल्याही न्यूनगंड वगैरे जाणिवा नव्हत्या.. खूप समाधान वाटत होतं… आमचं अर्धवट राहिलेलं वर्तुळ यांनी पूर्ण करावं असा विचार मनात डोकावून गेला!!!

         तसं पाहायला गेलं तर एकतर्फी प्रेमातून काहीही साध्य होत नसेल, तरीही कधीतरी हळुवारपणे स्वप्नात प्रवेश करून धुक्यात दिसणारी तिची अंधुकशी प्रतिमाही जगण्यातील उर्मि, हुरहूर वाढवून जाते… अशा एकतर्फी प्रेमात न वासनेचा दर्प असतो न असूयेला स्थान असतं… देवघरातील समईतील अखंड तेवत राहणार्‍या मंद ज्योतीप्रमाणे ते प्रेमही स्तब्धपणे अन मंदपणे तेवत असतं… तितकच पवित्र, तितकच सुखावह… त्याचा प्रकाश मनातील गाभर्याला सतत उजळून टाकत असतो अन ऊब देत राहतो…

===समाप्त===

सर्व हक्क सुरक्षित @ अभिषेक बुचके & latenightedition.in  &  @Late_Night1991

प्रवासयोग

खिडकी : अंतिम भाग

खिडकी : अंतिम भाग

भाग ५ – अंतिम भाग

मराठी कथा   ||  मराठी साहित्य  ||  प्रेमाची बंधने

Image result for time travel

मी खोलीवर आलो तेंव्हा खूप निर्धास्त, हललं हलकं वाटत होतं. प्रश्न अजूनही होते, पण ते सुटतील असा दिलासाही वाटत होता. मी थंडगार पाणी अंगावर ओतून घेतलं. आजीबाईंच्या सांगितल्यानुसार हा माझा कितवातरी पुनर्जन्म चालू होता. किंवा काहीतरी अजब जरूर होतं. मला वाटत होतं की आपण काहीतरी वेगळे आहोत. इतरांसारखे नाहीत. कदाचित कोट्यवधीच्या अंतरावरून प्रवास करून आलो आहे. माझी अस्मिता मलाच बोचत होती. ओळख संदिग्ध वाटत होती. माझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा कुठे अन कशा उमटल्या हे मलाच माहीत नव्हतं. मी त्या फोटोतील व्यक्तिसारखाच दिसत होतो. खोलीतील मोठ्या आरशात बघितल्यावर क्षणभर मला वाटलं की समोर त्याचीच प्रतिमा आहे. म्हणजे मी मी नाहीच?मी दत्ता की सूर्यकांत? का अजून काही…

खरंच नियतीने हे ठरवून केलं असेल का? काय प्रयोजन असेल?केवळ ओढ, नातं आणि प्रेम इतकं मजबूत असतं का?अज्ञात वाटेवर मी आलोच कसा?पण ही वाट अज्ञात तरी कोठे आहे?त्या आजी… ती गोंडस मुलगी… हे एकच! शिवाय ती फक्त मला दिसायची… इतरांना नाही… आणि त्याच जागेवर… नक्कीच आजी सांगतात तेच सत्य असलं पाहिजे… जगात गूढ रहस्य खूप आहेत… विज्ञान तरी कुठे सर्व रहस्यांवरून पडदा हटवू शकलं आहे. कितीतरी गोष्टी विज्ञानाला अजूनही गुढच आहेत. हेसुद्धा त्यातीलच. मानव अजूनही मेंदूचा फक्त 10% वापर करू शकतो. कधी कोणाला भुतं दिसतात तर कोणाला भविष्य… सगळं कसं अस्थिर जगातील सोंगाट्या असतात. मीही त्यातलाच आता.

विचारप्रवाह अगदी संथपणे चालू होते. संध्याकाळच्या वेळेस शांत नदीत होडीत बसून सूर्यास्त बघावा तसं वाटत होतं. गुंता सुटल्यासारखा वाटत होता. उत्तर माहीत असतं पण ते सांगता येत नाही तशी अवस्था. मन कित्तेक प्रकाशवर्ष दूर भटकून येत होतं. मला सहज वाटलं की ह्या घटना, प्रसंग आपल्याला उलगडू शकतात. फक्त थोडासा शोध घेतला पाहिजे.

मी इंटरनेटवर शोध सुरू केला. पुनर्जन्म, आत्मा,supernatural activity, असामान्य शक्ती, आत्म्याचा प्रवास असे अनेक प्रश्न मी शोधत होतो. बर्‍याच गोष्टी मला नव्याने अवगत होत होत्या. कुठे-कुठे ह्या सर्व गोष्टींच्या मागील अर्थ लावून त्याची विज्ञानाशी सांगड घातली होती. अनेक शक्यता अन theories मांडले होते. विविध संस्कृतीतील अध्यात्म, परंपरा मला नव्याने उमजत होत्या. विज्ञान याच्याकडे कोणत्या दृष्टीकोणातून बघतं तेही थोडंसं समजत होतं. सर्व माहिती माझ्या मेंदूत जमा होऊन मोरपिस हवेत तरंगावा तशी तरंगत होती.

सर्व बाबी लक्षात घेऊन मी संदर्भ जोडत मी माझं उत्तर तयार करत होतो. कदाचित स्वतःच्या मनाला पटवून देत होतो की हा माझा पुनर्जन्म आहे. माझ्या एकत्रित अस्मिता मला जाणवतात का हे तपासून बघत होतो.

अनेक समांतर विश्व अस्तीत्वात असतात. एका वेळेस अनेक पृथ्वी जगत असतात. त्यात माणसेही सारखीच असतात. म्हणजे ह्या वेळेला मी ह्या जागेवर आहे, तर समांतर विश्वात मीच किंवा माझ्यासारखी व्यक्ति त्या दुसर्‍या पृथ्वीवर आहे. अशा अनेक पृथ्वी एकाच वेळेस अस्तीत्वात असतात. ह्याच वेळेस समांतर विश्वात कदाचित dinosaur युग चालू असेल. कदाचित दुसरं महायुद्ध, पानीपत लढाई आत्ताही एखाद्या समांतर विश्वात चालू असेल.

अशीही एक संकल्पना एका शास्त्रज्ञाने मांडली की, जर एखादी मोठी घटना घडली तर तेथून काळाला दोन रस्ते फुटतात. तेथून दोन विश्व निर्माण होतात. उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेथून दोन विश्व निर्माण झाले असावेत. एका बाजूला आपण अस्तीत्वात असलेलं विश्व आणि दुसर्‍या बाजूला समांतर विश्व जेथे इंदिराजी जीवंत असतील अन देशात वेगळी परिस्थिती असेल. असे infinity अर्थात अमर्याद विश्व अस्तीत्वात असतील. फक्त ते आपल्याला माहीत नसतील अन आपल्या बुद्धीच्या बाहेरचे असतील.

पुनर्जन्मबद्धल मिळालेली माहितीही रंजक होती. एखाद्या माणसाच्या जर भावना, संवेदना अडकून राहिल्या किंवा तो अतृप्त मेला तर मृत्यूनंतर त्याचा आत्मा अंतराळात भटकत राहतो. मग नवयोनीचा शोध सुरू होतो. चित्रगुप्तने ठरवून दिल्याप्रमाणे त्याचा पुन्हा जन्म होतो, त्याच्या पाप-पुण्याचा तराजू खाली-वर होत राहतो. मागील जन्मी कळकळीने अर्धवट राहिलेल्या भावना व इच्छा पुढील जन्मात पूर्ण होतात अन शेवटी एक वेळ अशी येते की आत्मा मोक्ष प्राप्त करून ईश्वराला जाऊन विलीन होतो.

असे अनेक theorem & theories मांडले गेले होते. बर्‍याच संकल्पना होत्या. माझ्या बाबतीत नेमकं काय घडलं असावं याचा मी अंदाज घेत होतो. आजी म्हणतात त्याप्रमाणे आज अन त्या काळी राखी पोर्णिमेची तारीख सारखी होती अन ग्रहण होतं. कदाचित हेसुद्धा महत्वाचं होतं. मी जर त्या जन्मी त्या मुलीचा, अर्थात त्या आजीचा मोठा भाऊ असेन अन माझी इच्छा अतृप्त राहिली असेल तर हा माझा पुंनर्जन्म शक्य आहे. कदाचित होऊ न शकलेली भेट, त्या दोघांतील प्रेमाचं नातं, ओलावा हा महत्वाचा धागा असावा. ही भेट कदाचित ठरलेली असावी. मग त्या मुलीचं मला दिसणं? आणि तेही त्याच जागेवर, त्या रूपात? हे कसं शक्य आहे? न तो आत्मा आहे न भास. मग काय झालं असेल?

याचं उत्तर कदाचित विज्ञान देणार होतं. समांतर विश्व! कदाचित ती मुलगी ही वास्तविक असेल… म्हणजे वास्तवात दिसत असेल… पण आजची नव्हे, तर त्या काळची… म्हणजे आजी जेंव्हा लहान होत्या तेंव्हा त्या सतत त्या जागी येऊन बसायच्या… मला तेच दिसलं असेल… ह्या आणि त्या दोन समांतर विश्वातील खिडकी??? हो खिडकीच! कारण खिडकीतून काहीच देवाण-घेवाण होत नसते. ती फक्त बघण्यासाठी असते. जाणून घेण्यासाठी! त्या जागेवर कदाचित दोन विश्वांतील, दोन विविध काळओघातीलखिडकी उघडत असावी. केवळ मी तिचा शोध घ्यावा अन आमची भेट घडावी हा उद्देश असेलच! मीही काहीच वेळ त्या मुलीला बघू शकत होतो. कधी बोलूही शकलो नाही. मग ती खिडकीच असणार. एकटी असताना ती मुलगी किती आतुरतेणे आपल्या भावाची, अर्थात माझी वाट बघायची याची जाणीव मला व्हावी म्हणून मला ते दृश्य दिसत असावं. तिची ओढ, तिची माया, माझ्यावरील जीव मला समजून घेता यावा यासाठीच हे प्रयोजन असणार.

माझे दोन मुख्य प्रश्न होते. एकाचं उत्तर अध्यात्माने दिलं तर दुसर्‍याचं विज्ञानाने! हा माझा पुनर्जन्म असावा, त्या काळातील अस्मिता, देह, रूप मी आजही वाहतो आहे याची जाणीव मला अध्यात्माने करून दिली. तर ती मुलगी, केवळ मला दिसणारी,ही माझ्याशी कसा संपर्क साधते अन तिथेच का दिसते हे मला विज्ञानाने पटवून दिलं.

हा नक्कीच योगायोग नसावा. नियतीने, ईश्वराने ठरवून केलेलं प्रयोजन आहे यावर माझाही विश्वास बसत होता. एका बहिणीची भावाप्रती असलेली ओढ, ओलावा, जिव्हाळा नियतीचे नियम मोडून भेट घडवून आणत होता. मला त्या स्मृती आज ज्ञात नसतीलही, पण ती आर्त जाणीव खोल मनात होत होती. माझं अन त्या मुलीचं नातं काय ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. हा चमत्कारच होता…

रात्र सरली होती विचार करत-करत. पोर्णिमेच्या चंद्राने काळ्या ढगांनाही शुभ्र करून टाकलं होतं. वातावरणातील गारवा अजूनच भावुक करत होता. उद्याचं ग्रहण मात्र चंद्राला कवेत घेणार होतं. त्याचं अस्तित्व काही काळ का असेना नाकारणार होतं…

पहाटे झोप लागली. पुन्हा काळाच्या डोहात घसरत असल्याचा भास होत होता. झोपेत अनेक चित्र-विचित्र जागा अन चेहरे दिसत होते. नदीत वाहून जाणारा मीच दिसत होतो. मी ओरडत होतो,“मने… मने… मी येणार गं… थांब तू… जाऊ नकोस… मी नक्की येणार…”

मला अचानक जाग आली. जे बघितलं ते सत्य होतं? पूर्वजन्मीच्या आठवणी? का आजीने सांगितलं अन ते तपासून पाहिल्यावर त्या घटनेने माझ्यावर प्रभाव टाकला अन हे दृश्य दाखवलं?काहीच अशक्य नव्हतं. पण मी तिला “मने…” म्हणून हाक मारायचो का? आजीने तर तसं काही सांगितलेलं आठवत नाही… मग खरच ती पूर्वजन्मीची झलक होती; स्वप्नाच्या खिडकीतून मी माझंच गमावलेलं अस्तित्व बघितलं होतं की काय?

अंग घामाने भरलं होतं. शरीरही जड वाटत होतं. मेंदूची तर वेगळीच तर्‍हा होती. माझा मेंदू दुसर्‍याच्या ताब्यात आहे असं वाटत होतं. पण गुंता सुटला होता… हो… गुंता सुटला होता… मनाने तर मी आधीच त्या ‘गत-वास्तवाला’शरण गेलो होतो, पण काळाच्या सचोटीवर तपासून मेंदूनेही ते मान्य केलं होतं.

कधी-कधी पंचेंद्रियेही निश्चल होतात, मनात निर्वात पोकळी तयार होते, विचारशून्य होतो, माझ्यात असलेल्या मीच्या जवळ जातो, नि:संगाची अनुभूती येते.

कालच्या झोपेनंतर आज आलेली जाग नव्या अस्तित्वाची जाण करून देणारी होती. अंधार्‍या गुहेतून झालेला प्रवास, दुसर्‍या टोकाला गेल्यानंतर नवीन जगाची ओळख देत होता. असंख्य चेतांनानी भारलेला मी,नवपंख घेऊन भरारी घेत होतो, नव्या अश्वावर आरुढ होत होतो…

काय होत होतं माहीत नाही, पण मी तयारीला लागलो होतो. आज राखीपोर्णिमा होती. माझी ऐंशी वर्षाची धाकटी बहीण माझी वाट बघत होती. अनेक तपाच्या प्रतिक्षेनंतर मोकळ्या सोडणार्‍या राखीला आज मनगट भेटणार होतं. हजारो अश्रुंचे आभूषणे घेऊन नटलेली राखी माझी वाट बघत होती. काळाने तिची परीक्षा घेतली पण बंधन काही कमी झालं नाही. काळाच्या अग्निपरीक्षेत बहिणीच्या श्रद्धेची राखी उजळून निघाली होती…

ओवाळणी काय घ्यावी? साडी घेतली. खूप पूर्वी आईने घातलेली माझ्या बोटातील अंगठीही आज बहिणीला देणार होतो. अनेक वर्षांची ओवाळणी राहिली होती. मिठाई घेतली. दोन लहान बाहुल्या घेतल्या. पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. मेंदुतून काहीतरी वेगाने समोर आलं अन वाटलं गुळाच्या पाकात आकांत बुडालेले तुटके शेंगदाने!!! हे तिला आवडतं… मी त्याचीही सोय केली…

सगळं घेतलं अन दुपार होण्याच्या सुमारास मी आजीच्या, नव्हे, मनेच्या घराकडे निघालो… बाहेर आलो अन समोर बघितलं, त्या कट्ट्यावर आजी बसली होती. फिकट गुलाबी रंगाची नवी साडी, बांधलेले केस, केसावर फूल अन डोळ्यात गोड भाव!!! माझे डोळे भरून आले. क्षणभर लहानपणीची “मने” तिथे बसली आहे असं वाटलं. तेच चित्र डोळ्यासमोर येत होतं. डोळ्यात प्राण आणून माझी वाट बघत बसणारी ती अन बाहेरून आलेला मी. इतिहासाची, गतजन्माची खिडकी पुन्हा उघडल्या गेली.

मी जवळ गेलो अन आजी मला येऊन बिलगली. तिचे थरथरणारे हात माझ्या खांद्यावर होते अन डोळ्यांतून वाहणारे अश्रु छातीवर ढळत होते. गच्च झालेल्या गळ्यामध्ये कित्येक वर्षांचं दुखं अन आठवणी दाटल्या होत्या. सुरकुतलेल्या त्वचेवरून अनेक तपांची तपश्चर्या उभी ठाकली होती. एक आत्मिक समाधान लाभत होतं. खूप जुने बंध जुळले होते अन अतृप्ततेचे पाश तुटले होते. मुक्ती… मुक्ती लाभल्याप्रमाणे… स्वर्गातून फूल-अत्तराचा वर्षाव चालू होता… मी माझा हात आजीच्या, मनेच्या पांढर्‍या केसांवर ठेवला… “बास आता!! मी आलोय न.”

ह्या शब्दांनी आजीचं मन समाधानी झालं.

“मी अशीच वाट बघायचे… अशीच गळे पडायचे… पण तूच आला नाहीस… कित्ती वाट बघायला लावतोस रे…”

हे शब्द अनाहूतपणे तिच्या तोंडून निघून गेले पण माझ्या काळजाला हादरून सोडणारे होते.

काही क्षण असेच भावनेच्या प्रवाहात वाहत गेले. मग आम्ही आजीच्या घरी गेलो. आजीने स्वतःच्या हाताने स्वयपाक केला होता. पुरणपोळी केली होती. मला आवडती खोबर्‍याची चटणी केली होती. आजीच्या मुलाला, सुनेला मी कोण वगैरे काहीच माहीत नव्हतं. सगळं अनुत्तरित… पण आमच्या दोघांना ते माहीत होतं… तेच महत्वाचं होतं…

जेवण झालं अन आजीने, मनेने माझ्या हातात राखी बांधली. तो क्षण अविस्मरणीय होता. थरथरत्या हातांनी राखीची गाठ हाताला गच्च होताना हे बंधन केवळ धाग्याचा नसून मनाचं आहे याची तीव्र जाणीव होत होती. मनात प्रचंड घालमेल होत होती. आनंद की दुखं? काहीच कळत नव्हतं. राखी बांधल्यावर ती माझ्या पाया पडली तेंव्हा मात्र डोळ्यांनी सय्यम सोडला अन रडू आवरलं नाही. हे भावा-बहिणीचं नातं ईश्वराच्या साक्षीने तेजोमय होत होतं. कधी-कधी नियतीचे नियम,काळाची चक्रे नात्यांसमोर अन प्रेमासमोर निष्क्रिय ठरतात…

मी तिला ओवाळणी टाकली. तिने आधारशीपणे ती उघडली. कदाचित लहानपणीही अशीच असावी… सगळं बघितलं अन ती खूप खुश झाली… राहून-राहून मला तिच्याजागी ती लहानगी, बारकी मुलगी दिसत होती. गुळात बुडालेले शेंगदाने बघून आजी मधुर हसली अन म्हणाली, तुला आठवतं न, मला हे आवडतं ते?

मी फक्त खांदे उडवले. पण नंतर गेलेले दात दाखवत ती म्हणाली, “आता कसे खाऊ?”

फार बोलवसं वाटलच नाही. मुक्यानेच संवाद झाला. काय बोलावं दोघांनाही समजत नव्हतं. आम्ही केवळ मंतरलेल्या क्षणांचे साक्षीदार होत होतो. जणू विश्वाची एक पोकळी केवळ आमच्यासाठी वेगळी ठेवली आहे असं वाटत होतं. मन भरून आलं होतं… रक्तातील पेशीही भारावून गेली होती!

वेळ झाली होती. मी माझ्या घरी निघालो होतो. हे बहीण-भावाचं नातं कोणालाही समजणार नव्हतं. आजी मला सोडायला आली. आम्ही सावकाश त्या कट्ट्यापाशी आलो. तिथे बसलो. तिचा थरथरणारा हात माझ्या हातात होता.

काही क्षण शांत गेले असताना आजी म्हणाली,“तू नसताना, तुझी वाट बघताना ह्या जागेनेच मला समजून घेतलं, आधार दिला. ही ईश्वरी जागा आहे.”

मी नकळतपणे म्हणालो, “इथे ईश्वराची खिडकी उघडते. तीनेच मला तुझ्यापर्यंत पोचवलं.”

ह्याच जागेनेच आपल्यातील अंतर संपवून भेट घडवली. खूप छान खिडकी बघ… सूर्या दादा…

मी शांतच होतो. काहीच बोललो नाही. हळू स्वरात म्हंटलं, “मने…”

आजी शांतपणे टेकून बसली होती. तिचा हात माझ्या हातात होता. ती शांतच होती… कायमची शांत… मला ते कळायला फार वेळ लागला नाही. ते अगदीच अनपेक्षितही नव्हतं. अनेक वर्षांच्या अवकाशानंतर पाऊस पडून गेल्यानंतरची स्तब्धता जाणवत होती. अतिशय समाधानी अन शांत चित्ताने बसल्याप्रमाणे दिसत होती ती. मी हमसून हमसून रडत होतो. ज्या जागेवर बसून आयुष्य काढलं, किंबहुना जिथे बसून वाट बघण हेच तिचं आयुष्य झालं होतं, तिथेच तिने शेवटचा निरोप घेतला. ईश्वरी खिडकी!

खिडकीतून देवाण-घेवाण होत नसते. पण ही ईश्वरी खिडकी! ह्या खिडकीतून ईश्वराने तिला बोलावलं होतं. अनेक वर्षांची तपश्चर्या संपली होती. जणू, देव प्रसन्न होऊन तिला वरदान देऊन गेला. चंद्राला ग्रहण लागलं होतं. निर्मळ प्रकाश देऊन चंद्र आज काळोखाने आच्छादुन गेला होता. पण पुन्हा तेच तेज येणार होतं… कदाचित नव्या जन्मात…

सगळं उरकून मीही आपल्या वाटेवर निघालो होतो. वाटेत कितीही सुंदर पडाव आला तरी वाट सोडून चालत नाही. चालवंच लागतं. जुना जन्म संपला होता. त्या जन्मात अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण झालं होतं.एकाच वेळेस दोन अस्मिता, दोन ओळख घेऊन जगणं शक्य नसतं. त्यातील एक तरी विसर्जित करावीच लागणार होती.जो उद्देश्य होता तो पूर्ण झाला होता. आता जुनी ओळख अन अस्मिता कोणासाठी जपायची. ती फक्त मनाच्या कोपर्‍यात गुप्तपणे ठेवावी लागणार होती.

रात्रीचे प्रहर अधून-मधून जुनी अस्मिता उफाळून येण्यास कारणीभूत ठरणार होते. त्या आठवणी, ती चित्रे, ती मुलगी… सर्व मला छळणार होते. अंतर्मनाच्या स्वतंत्र कक्षेत मुक्त विहार करत ते मला पुन्हा पुन्हा अस्वस्थ करणार होते… पण हे अस्तित्वही नाकारता येणार नव्हतं. हे पूर्वजन्माचं ओझं कितीतरी अंतर कापून मी वाहत आलो होतो. आता ओझं नसलं तरी त्या स्मृती, आठवणी आणखीनच तीव्र होऊन समुद्राच्या लाटा खडकावर आदळतात त्याप्रमाणे सतत माझ्या मनावर आदळत राहणार होत्या.

गेल्या काही दिवसांत कितीतरी प्रकारच्या खिडक्यांनी माझं आयुष्य व्यापून टाकलं होतं. सुरूवातीला माझ्या खोलीच्या खिडकीतून दिसणारी ती चिमुकली. नंतर दोन समांतर विश्वात खिडकी बनून मला त्या मुलीचं अस्तित्व दाखवणारी काळखिडकी. अध्यात्म अन विज्ञानाची खिडकी. स्वप्नं ही सुद्धा एक खिडकी होती जेथून मला माझं जुनं, गतजन्मीचं अस्तित्व दिसलं होतं. शेवटी त्या आजीला, माझ्या लहान बहिणीला, मनेला माझ्यापासून दूर करणारी ती ईश्वरी खिडकी!!!

अस्तित्व अन भासाच्या जगाच्या पलीकडेही एक जग असतं. मी नुकताच त्याचा साक्षीदार झालो होतो. अंतराळ, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म हे ईश्वराच्या नाभिशी जोडले जातात. मोक्ष पावलेला आत्मा शेवटी त्यालाच जाऊन मिळतो अन अतृप्त राहिलेला पुन्हा-पुन्हा हेच चक्र फिरत राहतो. मी, माझा आत्मा,माझ्या अस्मिता हा प्रवास करून आल्या होत्या.

अडकलेला जीव पुन्हा-पुन्हा आकांताने आवाज देत असतो. प्रेम-मायेची बंधने अतूट असतात. शेवटची भेट व्हावी,मनात सल राहू नये म्हणून जीवन मरणालाही वाट बघायला लावतं… आणि शुक्राची चांदणी दिसून प्रहर संपावा तसं नवीन प्रकाशाला सुरुवात होते. एक रात्र संपलेली असते!!

कधीतरी अनाहूतपणे मनातील आठवणींचं गाठोडं उघडलं जातं. पत्त्याचा बंगला कोसळावा तसं मनही जमीनदोस्त होतं. मग भरलेलं मन अन रिता होत जाणारा आत्मा हातात हात घालून अस्थिरपणे भटकत राहतात. त्या शक्तीचा विलय होत नाही. शरीर लोप पावत असलं तरी जिवंतपणाची कसलीतरी लकेर मागे ठेऊन जातं…

===समाप्त?===

सूचना =कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. ह्या कथेचा वापर करण्यापूर्वी लेखकाची रीतसर परवानगी आवश्यक आहे. ||

All Copyrights Of The Story Reserved @ Author Abhishek Buchake.

सहकारी माध्यम=> latenightedition.in ||  @Late_Night1991

error: Content is protected !!