Tag: मराठी साहित्य

कुरूप प्रेम

कुरूप प्रेम

मराठी कथा  ||  मराठी साहित्य  ||  प्रेमाचा रंग  ||  Marathi Story  ||  लघुकथा

Image result for love images

आज तिचा मुलगा दिसला। तोही अगदी तिच्यासारखाच गोड, गोरा अन पाणीदार डोळ्यांचा. त्याच्याकडे बघून आज तिचीच आठवण प्रकर्षाने दाटून येत होती. पुरुषाच्या आयुष्यात ती असतेच असते. कधी कोणाला ती भेटते तर कधी ती फक्त आठवणीत राहते… प्रेम तर जीवापाड करत होतो तिच्यावर, पण चतुर्थीच्या चंद्राप्रमाणे ते अर्धवट पण पवित्र, पूजनीय राहिलं… निरागसपणे, अनाहूतपणे झालेलं प्रेम जितकं जुनं होत जातं तितकं ते लिंबाच्या लोणच्याप्रमाणे नसनसात मुरत जातं, पण त्यातला गोडवा कधीच कमी होत नाही….

हा जर आमच्या दोघांचा मुलगा असता तर इतका गोड असला असता का? हा प्रश्न मला लागलीच स्पर्शून गेला. त्या गोऱ्या, सुरेख लावण्यवती समोर मी अक्षरशः राख होतो. माझ्या मनातला हाच न्यूनगंड मला कधी तिच्यावर मनमुरादपणे प्रेम करू देत नव्हता. चंद्राला ग्रहण लागेल की काय अशी भीती वाटत राहायची.

तिच्याशी बोलतानाही मनात सतत स्वतःच्या कुरूप असण्याची सल कायम बोचत असायची. तिच्या पाणीदार डोळ्यात मला माझं विचित्र, अप्रिय रूप दिसायचं. यामुळेच आमचं प्रेम कधी बहरू शकलच नाही. तिचं माझ्यापेक्षा सुंदर असणंच मला आमच्या प्रेमात अडसर वाटत होतं… मी स्वतःच्याच कोंडमार्‍यात अडकलो होतो…

तिला माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या तर मित्र म्हणूनही ती माझ्या कबड चेहऱ्याबद्दल थट्टा करेल हीच भीती कायम असायची. दुर्दैवाने एकतर्फी प्रेमाचं ते वर्तुळ कधी पूर्ण होऊच शकलं नाही आणि कर्करोगाप्रमाणे विरहाची अन अपराधीपणाची दाह मनात नेहमीच घर करून राहिली…

तिच्या मुलाशी मी बोलत होतो… त्या गोंडस चेहर्‍याकडे बघितल्यावर आपसूकपणे एका जुन्या असह्य जखमेवरची खपली उकरल्या गेली होती… फेसबुकवरील फोटोपेक्षा तो खूपच गोरा अन लाघवी वाटत होता… अगदी त्याच्या आईसारखाच सुंदर!!

त्याच्याशी बोलत असताना आमच्या चिमुकलीने मला, “बाबा” म्हणून हाक दिली. माझी मुलगी! माझी मुलगी खूपच सुंदर, गोड अन छान दिसते… तिच्या आईवर गेलीय न! जेंव्हा तिच्याकडे बघतो तेंव्हा मन समाधानाने भरून वाहतं.. ती माझ्यासारखी नाही दिसत यामुळेच.. माझी कुरूपता तिच्यात उतरली नाही यासाठी परमेश्वराचे शतदा आभार मानत असतो…

मी माझाच नव्हतो. माझ्याच मनाने मला मारलं होतं. सृष्टीत निर्माण होणारा प्रत्येक जीव हा सुंदर असूच शकत नाही, पण तरीही सृष्टीने त्याला स्वतःची ओळख, स्वतःचं वेगळेपण दिलेलं आहे हे मला कधी उमजलच नाही. स्वतःवर प्रेम करायला शिकलं की जगही आपल्याला कवेत घेतं ही जाणीव कधीच नव्हती. प्रेम हे मनापासून केलं जातं, त्याचा वरवरच्या सौन्दर्यवर, आकर्षनावर काहीच संबंध नसतो…

जोपर्यंत माझ्या पत्नीने मला फक्त वरवरच्या सौंदर्यापेक्षा मनातील सौंदर्यावर प्रेम करायला शिकवलं नाही तोपर्यंत

मी न्युंनगंडच्या दरीत अडकून होतो.. तिनेच माझा दृष्टीकोण बदलला… डोळ्यावर चढवलेला चश्मा उतरवला… तिच्यामुळेच मी खूप सुखी होऊ शकलो… पण हे सगळं तिने, माझ्या प्रेयसीने, पहिल्या प्रेमाने का केलं नाही याचही दुखं होतं… तिने मला कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलाच नाही…

माझी बायको खेड्यातील अडाणी स्त्री. तिने माझ्याशी का लग्न केलं हा प्रश्न मला नेहमी सतावत असे. तिचं कुटुंब परिस्थितीने गांजलेलं होतं. माझ्याकडे चांगला पैसा होता. लग्न लागलीच जमलं. लग्न वगैरेवर विश्वास राहिला नसताना मी तिच्याशी लग्न केलं अन ती माझ्या आयुष्यात आली. पण माझ्यासारख्या कुरूप माणसाने पैशाच्या बळावर तिला विकत घेतलं आहे असा आरोप मीच माझ्यावर करत असे. पण मी चुकत होतो. तिने माझ्या वरच्या रूपावर किंवा पैशांकडे बघून नव्हे, तर आतल्या संवेदनशील माणसाकडे बघून मला स्वीकारलं. माझ्या कुरूपतेप्रती तिच्या मनात कधीही घृणा किंवा राग मी कधीच बघितला नाही, कारण तिच्याप्रती ते सगळं निरर्थक होतं. भरकटत असलेल्या नावेला किनारा भेटला. मला पूर्णतः बदलून टाकलं तिने. जगण्याचा नवा दृष्टीकोण दिला. तिथे मला खरं प्रेम झालं… उमगलं…

         भूतकाळ लयाला जाऊन आज मी अतिशय सुखी, समाधानी आयुष्य जगत होतो. एक नवा उदय झाला होता.

माझी मुलगी अन तिचा (जुन्या प्रेयसीचा) मुलगा वर्गमित्र!!! ते एकमेकांसोबत मनमोकळेपणाने खेळत होते, मस्ती करत होते. त्या निरागस मनात कसल्याही न्यूनगंड वगैरे जाणिवा नव्हत्या.. खूप समाधान वाटत होतं… आमचं अर्धवट राहिलेलं वर्तुळ यांनी पूर्ण करावं असा विचार मनात डोकावून गेला!!!

         तसं पाहायला गेलं तर एकतर्फी प्रेमातून काहीही साध्य होत नसेल, तरीही कधीतरी हळुवारपणे स्वप्नात प्रवेश करून धुक्यात दिसणारी तिची अंधुकशी प्रतिमाही जगण्यातील उर्मि, हुरहूर वाढवून जाते… अशा एकतर्फी प्रेमात न वासनेचा दर्प असतो न असूयेला स्थान असतं… देवघरातील समईतील अखंड तेवत राहणार्‍या मंद ज्योतीप्रमाणे ते प्रेमही स्तब्धपणे अन मंदपणे तेवत असतं… तितकच पवित्र, तितकच सुखावह… त्याचा प्रकाश मनातील गाभर्याला सतत उजळून टाकत असतो अन ऊब देत राहतो…

===समाप्त===

सर्व हक्क सुरक्षित @ अभिषेक बुचके & latenightedition.in  &  @Late_Night1991

प्रवासयोग

विस्मरण!

विस्मरण!

मराठी कथा  ||  मराठी साहित्य  ||  लघुकथा  ||   आठवण-विस्मरण  ||  

लेखक – बाबुराव अडकित्ते 

एका मोठ्या, गर्द झाडाच्या छायेत कोणीतरी काम करत बसलेलं असतं. आजूबाजूचा गोंगाट अन मतलबी विश्वाशी संलग्न होऊन तो आपलं काम करत असतो. बहुरंगी अस्तित्व असलेल्या त्या विश्वाशी जोडून घेत तोही सरड्याप्रमाणे रंग बदलत असतो. अचानक वार्‍याची एक झुळूक येते अन झाडावरील काही फुलं अलगदपणे त्याच्या ओंजळीत येऊन विसवतात. ह्या अनपेक्षित अन सुखद धक्क्याने तो मंत्रमुग्ध होतो. त्या फुलाकडे तो एकटक बघत बसतो. मनात काहीतरी होतं अन तो आजूबाजूच्या विश्वापासून दूर फेकल्या जातो. तो गोंगाट, ती लोकं, ती बहुरंगी प्रवृत्ती तो विसरतो अन स्वतःचा मूळ रंग त्या फुलामध्ये बघू लागतो. हे असच होतं. हरवलेपण हेच मूळ स्वभावाला शोधत असतं…

              अचानक असं काहीतरी घडतं की आपण आपल्या रोजच्या विश्वापासून, रोजच्या घडामोडींपासून दूर फेकल्या जातो. कधी भविष्यात तर कधी भूतकाळात. आठवणींचा पेटारा उघडल्या गेला तर भूतकाळ जागा होतो अन कल्पनेचे अश्व उधळू लागले तर भविष्यात जाऊन पोचतो. आज अशीच एक घटना घडली. कोठुनतरी एक खूप जुना फोटो हाती लागला. खूप म्हणजे, लहानपणीचा. बारा-तेरा वर्षांचा असेल तेंव्हाचा. तो फोटो समोर येताच चित्रपटात दाखवतात तसं फ्लॅश बॅक मध्ये ओढल्या गेलो. तो फोटो होता भावंडांसोबतचा! आजोळचा!

आम्ही भावंडं सगळी ओळीत बसलो आहोत. एकदम पलीकडे मी बसलो आहे अन माझ्या बहिणीला मी मांडीवर घेतलं आहे. पलीकडे आजी-आजोबा खुर्चीवर बसून आमचं कौतुक पाहत आहेत. ह्या फोटोने मेंदूला रोजच्या प्रवाहातून बाहेर फेकलं. एखाद्या शांत-स्तब्ध-स्थिर किनार्‍यावर नेऊन बसवलं.

लहानपणीचे दिवस कधीच कोणच विसरू शकत नाही. कारण आपण त्यावेळेस आपल्या मूळ, नैसर्गिक स्वभावात असतो. कालानुरूप व्यवहारी जगाच्या साच्यात बसण्यासाठी आपण स्वतःत बदल करत जातो अन एक वेगळच व्यक्तिमत्व म्हणून जगू लागतो. असच असतं. असावं!

आजोळला सगळे जमायचे. धम्माल असायची. रोजची भांडणं अन रूसवे-फुगवे ठरलेले असायचे. पण जेवणाच्या पंगतीतपर्यन्त ते विसरून गेलेले असायचे. बसायला पाट कोणता मिळणार, जेवायला ताट कोणतं मिळणार यावरून अक्षरशः राडे व्हायचे. रोज त्याच विषयावर भांडणं करायला कसलीच लाज वाटायची नाही. मग एखाद्याने माघार घेऊन त्याबदल्यात दुसराच सौदा पदरात पाडून घ्यायचा शहाणपण दाखवलेला असतं. ते आज कितीही हास्यास्पद वाटत असलं तरी तेंव्हा ते विश्वायुद्धपेक्षा कमी नसायचं. पण अवघ्या काहीच अवधीत ते सगळं विसरून एकत्र क्रिकेट खेळताना दिसायचो. मनात कसलीही किलमिष, राग-लोभ अन जळमट नसतांनाची ती उत्कट अन तत्काल प्रतिक्रिया ह्याच खर्‍या असतात. त्यामुळेच तसल्या गोष्टींचं तेंव्हा कधी टेंशन यायचं नाही. पण हल्ली तोलून-मापून घेतले जाणारे निर्णयच जास्ती चिंता देतात. माणूस हा प्रतिक्रियावादी प्राणीच आहे हेच खरं.

असे काही फोटो कपाटात कुठेतरी खालच्या कप्प्यात धूळ खात पडलेले असतात. कधी त्यांची आठवणच होत नाही. पण संयोगाने जर त्यातील एखादा फोटो समोर आला तर मात्र वादळ यव तसं आठवणीचे उमाळे फुटू लागतात. स्मृतिकोशात कुठेतरी हरवलेल्या प्रतिमा, किस्से, घटना गर्दी करून वर येऊ लागतात. मेंदू दुसर्‍या इतर कसल्याच कामाला तयार होत नाही. त्या स्मृतींना परत एकदा लकाकी देऊन व्यवस्थित बघून परत जपून ठेवल्याशिवाय मन शांत होत नाही. मनावर, मेंदूवर कितीही ताबा ठेवायचा म्हंटला तरी वार्‍याच्या वेगावर ओथंबणारा पाऊस छत्रीतून आत येऊन चिंब ओला करतो तसं त्या आठवणी आपल्याला चिंब ओल्या करून टाकत असतात. चेहर्‍यावर पांढरे भाव दिसत असले तरी मनात मात्र कल्लोळ चालू असतो. बास!

त्या फोटोत पलीकडे खुर्चीवर बसलेले आजी-आजोबा आज आमच्यात नाहीत. आजोबांशी फार लळा नव्हता. पण आजीशी बरच चांगलं नातं होतं. म्हणजे आठवणीच्या कपाटात एक स्वतंत्र कप्पा असावा इतकं जवळच नातं तर नक्कीच होतं. आजी अशातच गेलीय. तो फोटो बघितल्यावर वाटलं की कुठेतरी बसली असेल. मुलं-सुना-नातवडांना एकत्र आनंदी बघण याशिवाय त्यांना दुसरं काहीच नको असतं. ती प्रत्येक गोष्ट आठवतेय. अगदी खाल्लेल्या मारापासून ते हातात थरथरनारे हात दिलेल्या आठवणी वर येतात. पण दुरून दिसणार्‍या शुक्र तार्‍याप्रमाणे त्याकडे एकटक बघितल्यावाचून दूसरा पर्याय नसतो. आणि ते सत्य मानल्याशिवाय आजचं अस्तित्व परिपूर्ण होऊ शकत नाही याचं भान ठेवावच लागतं.

काळानुसार आपण बदलत जातो. गढूळलेल्या जगात आपलं वलय निर्माण करताना स्वतःत किती बदल झालेत याचं भान आपलं आपल्यालाच नसतं. त्या फोटोत दिसणारा निरागसपणा आज कुठेही सापडणार नाही. आजही मनात तीच आपुलकी अन तेच प्रेम आहे, पण त्यावर सापेक्षवादी जगाची चमचमणारी झालर चढल्याने त्यातील जिव्हाळा कमी जाणवतो.

तो फोटो बघितल्यावर जाणवलं की आता तशा गाठी-भेटी होत नाहीत. धावते दौरे असतात. एकत्रित फोटो काढावेत असं सगळे एकत्र भेटत नाहीत. पलीकडे असलेल्या दोन खुर्च्या तर आता रिकाम्याच राहणार आहेत. तो बंध, जिव्हाळा आजही तसाच आहे. त्या जाणिवा मात्र मिळवता येत नाहीत.

संध्याकाळपासून डोक्यात तेच तेच चक्र फिरत होतं. इतर कामात लक्षंही लागत नव्हतं. लिहावं म्हंटलं. पावसाच्या ओलेने भिंतीवरील जुनाट ऑइल पेंट बाहेर डोकावा तसं वाटत होतं. विस्मृतीची शक्ति कधी-कधी बरी असते.

–    बाबुराव आडकित्ते

Read More…

गाव सोडताना…

खिडकी : अंतिम भाग

खिडकी : अंतिम भाग

भाग ५ – अंतिम भाग

मराठी कथा   ||  मराठी साहित्य  ||  प्रेमाची बंधने

Image result for time travel

मी खोलीवर आलो तेंव्हा खूप निर्धास्त, हललं हलकं वाटत होतं. प्रश्न अजूनही होते, पण ते सुटतील असा दिलासाही वाटत होता. मी थंडगार पाणी अंगावर ओतून घेतलं. आजीबाईंच्या सांगितल्यानुसार हा माझा कितवातरी पुनर्जन्म चालू होता. किंवा काहीतरी अजब जरूर होतं. मला वाटत होतं की आपण काहीतरी वेगळे आहोत. इतरांसारखे नाहीत. कदाचित कोट्यवधीच्या अंतरावरून प्रवास करून आलो आहे. माझी अस्मिता मलाच बोचत होती. ओळख संदिग्ध वाटत होती. माझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा कुठे अन कशा उमटल्या हे मलाच माहीत नव्हतं. मी त्या फोटोतील व्यक्तिसारखाच दिसत होतो. खोलीतील मोठ्या आरशात बघितल्यावर क्षणभर मला वाटलं की समोर त्याचीच प्रतिमा आहे. म्हणजे मी मी नाहीच?मी दत्ता की सूर्यकांत? का अजून काही…

खरंच नियतीने हे ठरवून केलं असेल का? काय प्रयोजन असेल?केवळ ओढ, नातं आणि प्रेम इतकं मजबूत असतं का?अज्ञात वाटेवर मी आलोच कसा?पण ही वाट अज्ञात तरी कोठे आहे?त्या आजी… ती गोंडस मुलगी… हे एकच! शिवाय ती फक्त मला दिसायची… इतरांना नाही… आणि त्याच जागेवर… नक्कीच आजी सांगतात तेच सत्य असलं पाहिजे… जगात गूढ रहस्य खूप आहेत… विज्ञान तरी कुठे सर्व रहस्यांवरून पडदा हटवू शकलं आहे. कितीतरी गोष्टी विज्ञानाला अजूनही गुढच आहेत. हेसुद्धा त्यातीलच. मानव अजूनही मेंदूचा फक्त 10% वापर करू शकतो. कधी कोणाला भुतं दिसतात तर कोणाला भविष्य… सगळं कसं अस्थिर जगातील सोंगाट्या असतात. मीही त्यातलाच आता.

विचारप्रवाह अगदी संथपणे चालू होते. संध्याकाळच्या वेळेस शांत नदीत होडीत बसून सूर्यास्त बघावा तसं वाटत होतं. गुंता सुटल्यासारखा वाटत होता. उत्तर माहीत असतं पण ते सांगता येत नाही तशी अवस्था. मन कित्तेक प्रकाशवर्ष दूर भटकून येत होतं. मला सहज वाटलं की ह्या घटना, प्रसंग आपल्याला उलगडू शकतात. फक्त थोडासा शोध घेतला पाहिजे.

मी इंटरनेटवर शोध सुरू केला. पुनर्जन्म, आत्मा,supernatural activity, असामान्य शक्ती, आत्म्याचा प्रवास असे अनेक प्रश्न मी शोधत होतो. बर्‍याच गोष्टी मला नव्याने अवगत होत होत्या. कुठे-कुठे ह्या सर्व गोष्टींच्या मागील अर्थ लावून त्याची विज्ञानाशी सांगड घातली होती. अनेक शक्यता अन theories मांडले होते. विविध संस्कृतीतील अध्यात्म, परंपरा मला नव्याने उमजत होत्या. विज्ञान याच्याकडे कोणत्या दृष्टीकोणातून बघतं तेही थोडंसं समजत होतं. सर्व माहिती माझ्या मेंदूत जमा होऊन मोरपिस हवेत तरंगावा तशी तरंगत होती.

सर्व बाबी लक्षात घेऊन मी संदर्भ जोडत मी माझं उत्तर तयार करत होतो. कदाचित स्वतःच्या मनाला पटवून देत होतो की हा माझा पुनर्जन्म आहे. माझ्या एकत्रित अस्मिता मला जाणवतात का हे तपासून बघत होतो.

अनेक समांतर विश्व अस्तीत्वात असतात. एका वेळेस अनेक पृथ्वी जगत असतात. त्यात माणसेही सारखीच असतात. म्हणजे ह्या वेळेला मी ह्या जागेवर आहे, तर समांतर विश्वात मीच किंवा माझ्यासारखी व्यक्ति त्या दुसर्‍या पृथ्वीवर आहे. अशा अनेक पृथ्वी एकाच वेळेस अस्तीत्वात असतात. ह्याच वेळेस समांतर विश्वात कदाचित dinosaur युग चालू असेल. कदाचित दुसरं महायुद्ध, पानीपत लढाई आत्ताही एखाद्या समांतर विश्वात चालू असेल.

अशीही एक संकल्पना एका शास्त्रज्ञाने मांडली की, जर एखादी मोठी घटना घडली तर तेथून काळाला दोन रस्ते फुटतात. तेथून दोन विश्व निर्माण होतात. उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेथून दोन विश्व निर्माण झाले असावेत. एका बाजूला आपण अस्तीत्वात असलेलं विश्व आणि दुसर्‍या बाजूला समांतर विश्व जेथे इंदिराजी जीवंत असतील अन देशात वेगळी परिस्थिती असेल. असे infinity अर्थात अमर्याद विश्व अस्तीत्वात असतील. फक्त ते आपल्याला माहीत नसतील अन आपल्या बुद्धीच्या बाहेरचे असतील.

पुनर्जन्मबद्धल मिळालेली माहितीही रंजक होती. एखाद्या माणसाच्या जर भावना, संवेदना अडकून राहिल्या किंवा तो अतृप्त मेला तर मृत्यूनंतर त्याचा आत्मा अंतराळात भटकत राहतो. मग नवयोनीचा शोध सुरू होतो. चित्रगुप्तने ठरवून दिल्याप्रमाणे त्याचा पुन्हा जन्म होतो, त्याच्या पाप-पुण्याचा तराजू खाली-वर होत राहतो. मागील जन्मी कळकळीने अर्धवट राहिलेल्या भावना व इच्छा पुढील जन्मात पूर्ण होतात अन शेवटी एक वेळ अशी येते की आत्मा मोक्ष प्राप्त करून ईश्वराला जाऊन विलीन होतो.

असे अनेक theorem & theories मांडले गेले होते. बर्‍याच संकल्पना होत्या. माझ्या बाबतीत नेमकं काय घडलं असावं याचा मी अंदाज घेत होतो. आजी म्हणतात त्याप्रमाणे आज अन त्या काळी राखी पोर्णिमेची तारीख सारखी होती अन ग्रहण होतं. कदाचित हेसुद्धा महत्वाचं होतं. मी जर त्या जन्मी त्या मुलीचा, अर्थात त्या आजीचा मोठा भाऊ असेन अन माझी इच्छा अतृप्त राहिली असेल तर हा माझा पुंनर्जन्म शक्य आहे. कदाचित होऊ न शकलेली भेट, त्या दोघांतील प्रेमाचं नातं, ओलावा हा महत्वाचा धागा असावा. ही भेट कदाचित ठरलेली असावी. मग त्या मुलीचं मला दिसणं? आणि तेही त्याच जागेवर, त्या रूपात? हे कसं शक्य आहे? न तो आत्मा आहे न भास. मग काय झालं असेल?

याचं उत्तर कदाचित विज्ञान देणार होतं. समांतर विश्व! कदाचित ती मुलगी ही वास्तविक असेल… म्हणजे वास्तवात दिसत असेल… पण आजची नव्हे, तर त्या काळची… म्हणजे आजी जेंव्हा लहान होत्या तेंव्हा त्या सतत त्या जागी येऊन बसायच्या… मला तेच दिसलं असेल… ह्या आणि त्या दोन समांतर विश्वातील खिडकी??? हो खिडकीच! कारण खिडकीतून काहीच देवाण-घेवाण होत नसते. ती फक्त बघण्यासाठी असते. जाणून घेण्यासाठी! त्या जागेवर कदाचित दोन विश्वांतील, दोन विविध काळओघातीलखिडकी उघडत असावी. केवळ मी तिचा शोध घ्यावा अन आमची भेट घडावी हा उद्देश असेलच! मीही काहीच वेळ त्या मुलीला बघू शकत होतो. कधी बोलूही शकलो नाही. मग ती खिडकीच असणार. एकटी असताना ती मुलगी किती आतुरतेणे आपल्या भावाची, अर्थात माझी वाट बघायची याची जाणीव मला व्हावी म्हणून मला ते दृश्य दिसत असावं. तिची ओढ, तिची माया, माझ्यावरील जीव मला समजून घेता यावा यासाठीच हे प्रयोजन असणार.

माझे दोन मुख्य प्रश्न होते. एकाचं उत्तर अध्यात्माने दिलं तर दुसर्‍याचं विज्ञानाने! हा माझा पुनर्जन्म असावा, त्या काळातील अस्मिता, देह, रूप मी आजही वाहतो आहे याची जाणीव मला अध्यात्माने करून दिली. तर ती मुलगी, केवळ मला दिसणारी,ही माझ्याशी कसा संपर्क साधते अन तिथेच का दिसते हे मला विज्ञानाने पटवून दिलं.

हा नक्कीच योगायोग नसावा. नियतीने, ईश्वराने ठरवून केलेलं प्रयोजन आहे यावर माझाही विश्वास बसत होता. एका बहिणीची भावाप्रती असलेली ओढ, ओलावा, जिव्हाळा नियतीचे नियम मोडून भेट घडवून आणत होता. मला त्या स्मृती आज ज्ञात नसतीलही, पण ती आर्त जाणीव खोल मनात होत होती. माझं अन त्या मुलीचं नातं काय ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. हा चमत्कारच होता…

रात्र सरली होती विचार करत-करत. पोर्णिमेच्या चंद्राने काळ्या ढगांनाही शुभ्र करून टाकलं होतं. वातावरणातील गारवा अजूनच भावुक करत होता. उद्याचं ग्रहण मात्र चंद्राला कवेत घेणार होतं. त्याचं अस्तित्व काही काळ का असेना नाकारणार होतं…

पहाटे झोप लागली. पुन्हा काळाच्या डोहात घसरत असल्याचा भास होत होता. झोपेत अनेक चित्र-विचित्र जागा अन चेहरे दिसत होते. नदीत वाहून जाणारा मीच दिसत होतो. मी ओरडत होतो,“मने… मने… मी येणार गं… थांब तू… जाऊ नकोस… मी नक्की येणार…”

मला अचानक जाग आली. जे बघितलं ते सत्य होतं? पूर्वजन्मीच्या आठवणी? का आजीने सांगितलं अन ते तपासून पाहिल्यावर त्या घटनेने माझ्यावर प्रभाव टाकला अन हे दृश्य दाखवलं?काहीच अशक्य नव्हतं. पण मी तिला “मने…” म्हणून हाक मारायचो का? आजीने तर तसं काही सांगितलेलं आठवत नाही… मग खरच ती पूर्वजन्मीची झलक होती; स्वप्नाच्या खिडकीतून मी माझंच गमावलेलं अस्तित्व बघितलं होतं की काय?

अंग घामाने भरलं होतं. शरीरही जड वाटत होतं. मेंदूची तर वेगळीच तर्‍हा होती. माझा मेंदू दुसर्‍याच्या ताब्यात आहे असं वाटत होतं. पण गुंता सुटला होता… हो… गुंता सुटला होता… मनाने तर मी आधीच त्या ‘गत-वास्तवाला’शरण गेलो होतो, पण काळाच्या सचोटीवर तपासून मेंदूनेही ते मान्य केलं होतं.

कधी-कधी पंचेंद्रियेही निश्चल होतात, मनात निर्वात पोकळी तयार होते, विचारशून्य होतो, माझ्यात असलेल्या मीच्या जवळ जातो, नि:संगाची अनुभूती येते.

कालच्या झोपेनंतर आज आलेली जाग नव्या अस्तित्वाची जाण करून देणारी होती. अंधार्‍या गुहेतून झालेला प्रवास, दुसर्‍या टोकाला गेल्यानंतर नवीन जगाची ओळख देत होता. असंख्य चेतांनानी भारलेला मी,नवपंख घेऊन भरारी घेत होतो, नव्या अश्वावर आरुढ होत होतो…

काय होत होतं माहीत नाही, पण मी तयारीला लागलो होतो. आज राखीपोर्णिमा होती. माझी ऐंशी वर्षाची धाकटी बहीण माझी वाट बघत होती. अनेक तपाच्या प्रतिक्षेनंतर मोकळ्या सोडणार्‍या राखीला आज मनगट भेटणार होतं. हजारो अश्रुंचे आभूषणे घेऊन नटलेली राखी माझी वाट बघत होती. काळाने तिची परीक्षा घेतली पण बंधन काही कमी झालं नाही. काळाच्या अग्निपरीक्षेत बहिणीच्या श्रद्धेची राखी उजळून निघाली होती…

ओवाळणी काय घ्यावी? साडी घेतली. खूप पूर्वी आईने घातलेली माझ्या बोटातील अंगठीही आज बहिणीला देणार होतो. अनेक वर्षांची ओवाळणी राहिली होती. मिठाई घेतली. दोन लहान बाहुल्या घेतल्या. पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. मेंदुतून काहीतरी वेगाने समोर आलं अन वाटलं गुळाच्या पाकात आकांत बुडालेले तुटके शेंगदाने!!! हे तिला आवडतं… मी त्याचीही सोय केली…

सगळं घेतलं अन दुपार होण्याच्या सुमारास मी आजीच्या, नव्हे, मनेच्या घराकडे निघालो… बाहेर आलो अन समोर बघितलं, त्या कट्ट्यावर आजी बसली होती. फिकट गुलाबी रंगाची नवी साडी, बांधलेले केस, केसावर फूल अन डोळ्यात गोड भाव!!! माझे डोळे भरून आले. क्षणभर लहानपणीची “मने” तिथे बसली आहे असं वाटलं. तेच चित्र डोळ्यासमोर येत होतं. डोळ्यात प्राण आणून माझी वाट बघत बसणारी ती अन बाहेरून आलेला मी. इतिहासाची, गतजन्माची खिडकी पुन्हा उघडल्या गेली.

मी जवळ गेलो अन आजी मला येऊन बिलगली. तिचे थरथरणारे हात माझ्या खांद्यावर होते अन डोळ्यांतून वाहणारे अश्रु छातीवर ढळत होते. गच्च झालेल्या गळ्यामध्ये कित्येक वर्षांचं दुखं अन आठवणी दाटल्या होत्या. सुरकुतलेल्या त्वचेवरून अनेक तपांची तपश्चर्या उभी ठाकली होती. एक आत्मिक समाधान लाभत होतं. खूप जुने बंध जुळले होते अन अतृप्ततेचे पाश तुटले होते. मुक्ती… मुक्ती लाभल्याप्रमाणे… स्वर्गातून फूल-अत्तराचा वर्षाव चालू होता… मी माझा हात आजीच्या, मनेच्या पांढर्‍या केसांवर ठेवला… “बास आता!! मी आलोय न.”

ह्या शब्दांनी आजीचं मन समाधानी झालं.

“मी अशीच वाट बघायचे… अशीच गळे पडायचे… पण तूच आला नाहीस… कित्ती वाट बघायला लावतोस रे…”

हे शब्द अनाहूतपणे तिच्या तोंडून निघून गेले पण माझ्या काळजाला हादरून सोडणारे होते.

काही क्षण असेच भावनेच्या प्रवाहात वाहत गेले. मग आम्ही आजीच्या घरी गेलो. आजीने स्वतःच्या हाताने स्वयपाक केला होता. पुरणपोळी केली होती. मला आवडती खोबर्‍याची चटणी केली होती. आजीच्या मुलाला, सुनेला मी कोण वगैरे काहीच माहीत नव्हतं. सगळं अनुत्तरित… पण आमच्या दोघांना ते माहीत होतं… तेच महत्वाचं होतं…

जेवण झालं अन आजीने, मनेने माझ्या हातात राखी बांधली. तो क्षण अविस्मरणीय होता. थरथरत्या हातांनी राखीची गाठ हाताला गच्च होताना हे बंधन केवळ धाग्याचा नसून मनाचं आहे याची तीव्र जाणीव होत होती. मनात प्रचंड घालमेल होत होती. आनंद की दुखं? काहीच कळत नव्हतं. राखी बांधल्यावर ती माझ्या पाया पडली तेंव्हा मात्र डोळ्यांनी सय्यम सोडला अन रडू आवरलं नाही. हे भावा-बहिणीचं नातं ईश्वराच्या साक्षीने तेजोमय होत होतं. कधी-कधी नियतीचे नियम,काळाची चक्रे नात्यांसमोर अन प्रेमासमोर निष्क्रिय ठरतात…

मी तिला ओवाळणी टाकली. तिने आधारशीपणे ती उघडली. कदाचित लहानपणीही अशीच असावी… सगळं बघितलं अन ती खूप खुश झाली… राहून-राहून मला तिच्याजागी ती लहानगी, बारकी मुलगी दिसत होती. गुळात बुडालेले शेंगदाने बघून आजी मधुर हसली अन म्हणाली, तुला आठवतं न, मला हे आवडतं ते?

मी फक्त खांदे उडवले. पण नंतर गेलेले दात दाखवत ती म्हणाली, “आता कसे खाऊ?”

फार बोलवसं वाटलच नाही. मुक्यानेच संवाद झाला. काय बोलावं दोघांनाही समजत नव्हतं. आम्ही केवळ मंतरलेल्या क्षणांचे साक्षीदार होत होतो. जणू विश्वाची एक पोकळी केवळ आमच्यासाठी वेगळी ठेवली आहे असं वाटत होतं. मन भरून आलं होतं… रक्तातील पेशीही भारावून गेली होती!

वेळ झाली होती. मी माझ्या घरी निघालो होतो. हे बहीण-भावाचं नातं कोणालाही समजणार नव्हतं. आजी मला सोडायला आली. आम्ही सावकाश त्या कट्ट्यापाशी आलो. तिथे बसलो. तिचा थरथरणारा हात माझ्या हातात होता.

काही क्षण शांत गेले असताना आजी म्हणाली,“तू नसताना, तुझी वाट बघताना ह्या जागेनेच मला समजून घेतलं, आधार दिला. ही ईश्वरी जागा आहे.”

मी नकळतपणे म्हणालो, “इथे ईश्वराची खिडकी उघडते. तीनेच मला तुझ्यापर्यंत पोचवलं.”

ह्याच जागेनेच आपल्यातील अंतर संपवून भेट घडवली. खूप छान खिडकी बघ… सूर्या दादा…

मी शांतच होतो. काहीच बोललो नाही. हळू स्वरात म्हंटलं, “मने…”

आजी शांतपणे टेकून बसली होती. तिचा हात माझ्या हातात होता. ती शांतच होती… कायमची शांत… मला ते कळायला फार वेळ लागला नाही. ते अगदीच अनपेक्षितही नव्हतं. अनेक वर्षांच्या अवकाशानंतर पाऊस पडून गेल्यानंतरची स्तब्धता जाणवत होती. अतिशय समाधानी अन शांत चित्ताने बसल्याप्रमाणे दिसत होती ती. मी हमसून हमसून रडत होतो. ज्या जागेवर बसून आयुष्य काढलं, किंबहुना जिथे बसून वाट बघण हेच तिचं आयुष्य झालं होतं, तिथेच तिने शेवटचा निरोप घेतला. ईश्वरी खिडकी!

खिडकीतून देवाण-घेवाण होत नसते. पण ही ईश्वरी खिडकी! ह्या खिडकीतून ईश्वराने तिला बोलावलं होतं. अनेक वर्षांची तपश्चर्या संपली होती. जणू, देव प्रसन्न होऊन तिला वरदान देऊन गेला. चंद्राला ग्रहण लागलं होतं. निर्मळ प्रकाश देऊन चंद्र आज काळोखाने आच्छादुन गेला होता. पण पुन्हा तेच तेज येणार होतं… कदाचित नव्या जन्मात…

सगळं उरकून मीही आपल्या वाटेवर निघालो होतो. वाटेत कितीही सुंदर पडाव आला तरी वाट सोडून चालत नाही. चालवंच लागतं. जुना जन्म संपला होता. त्या जन्मात अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण झालं होतं.एकाच वेळेस दोन अस्मिता, दोन ओळख घेऊन जगणं शक्य नसतं. त्यातील एक तरी विसर्जित करावीच लागणार होती.जो उद्देश्य होता तो पूर्ण झाला होता. आता जुनी ओळख अन अस्मिता कोणासाठी जपायची. ती फक्त मनाच्या कोपर्‍यात गुप्तपणे ठेवावी लागणार होती.

रात्रीचे प्रहर अधून-मधून जुनी अस्मिता उफाळून येण्यास कारणीभूत ठरणार होते. त्या आठवणी, ती चित्रे, ती मुलगी… सर्व मला छळणार होते. अंतर्मनाच्या स्वतंत्र कक्षेत मुक्त विहार करत ते मला पुन्हा पुन्हा अस्वस्थ करणार होते… पण हे अस्तित्वही नाकारता येणार नव्हतं. हे पूर्वजन्माचं ओझं कितीतरी अंतर कापून मी वाहत आलो होतो. आता ओझं नसलं तरी त्या स्मृती, आठवणी आणखीनच तीव्र होऊन समुद्राच्या लाटा खडकावर आदळतात त्याप्रमाणे सतत माझ्या मनावर आदळत राहणार होत्या.

गेल्या काही दिवसांत कितीतरी प्रकारच्या खिडक्यांनी माझं आयुष्य व्यापून टाकलं होतं. सुरूवातीला माझ्या खोलीच्या खिडकीतून दिसणारी ती चिमुकली. नंतर दोन समांतर विश्वात खिडकी बनून मला त्या मुलीचं अस्तित्व दाखवणारी काळखिडकी. अध्यात्म अन विज्ञानाची खिडकी. स्वप्नं ही सुद्धा एक खिडकी होती जेथून मला माझं जुनं, गतजन्मीचं अस्तित्व दिसलं होतं. शेवटी त्या आजीला, माझ्या लहान बहिणीला, मनेला माझ्यापासून दूर करणारी ती ईश्वरी खिडकी!!!

अस्तित्व अन भासाच्या जगाच्या पलीकडेही एक जग असतं. मी नुकताच त्याचा साक्षीदार झालो होतो. अंतराळ, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म हे ईश्वराच्या नाभिशी जोडले जातात. मोक्ष पावलेला आत्मा शेवटी त्यालाच जाऊन मिळतो अन अतृप्त राहिलेला पुन्हा-पुन्हा हेच चक्र फिरत राहतो. मी, माझा आत्मा,माझ्या अस्मिता हा प्रवास करून आल्या होत्या.

अडकलेला जीव पुन्हा-पुन्हा आकांताने आवाज देत असतो. प्रेम-मायेची बंधने अतूट असतात. शेवटची भेट व्हावी,मनात सल राहू नये म्हणून जीवन मरणालाही वाट बघायला लावतं… आणि शुक्राची चांदणी दिसून प्रहर संपावा तसं नवीन प्रकाशाला सुरुवात होते. एक रात्र संपलेली असते!!

कधीतरी अनाहूतपणे मनातील आठवणींचं गाठोडं उघडलं जातं. पत्त्याचा बंगला कोसळावा तसं मनही जमीनदोस्त होतं. मग भरलेलं मन अन रिता होत जाणारा आत्मा हातात हात घालून अस्थिरपणे भटकत राहतात. त्या शक्तीचा विलय होत नाही. शरीर लोप पावत असलं तरी जिवंतपणाची कसलीतरी लकेर मागे ठेऊन जातं…

===समाप्त?===

सूचना =कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. ह्या कथेचा वापर करण्यापूर्वी लेखकाची रीतसर परवानगी आवश्यक आहे. ||

All Copyrights Of The Story Reserved @ Author Abhishek Buchake.

सहकारी माध्यम=> latenightedition.in ||  @Late_Night1991

खिडकी : भाग ४

खिडकी : भाग ४

राखीपोर्णिमेच्या निमित्ताने… 

मराठी गूढकथा  ||  मराठी साहित्य  ||  समांतर विश्व

Image result for parallel earth

आजीबाईंचं घर आलं. दरवाजा वाजवला असता एका पन्नाशीकडे झुकलेल्या स्त्रीने दरवाजा उघडला. आत जात असतानाच आजिबाईंनी माझा परिचय करून दिला. त्या बाई आजिबाईच्या सुनबाई होत्या. त्यांनी माफक हसत माझं स्वागत केलं. आजिबाईंनी माझा हात अजूनही सोडलेला नव्हता. त्यांनी मला थेट आपल्या खोलीकडे नेलं. मागून जोरात दरवाजा लावलेला आवाज आला. मनात धस्स झालं. कुठे येऊन अडकलो असं वाटत होतं. हाता-पायाला घाम सुटला होता.

आजीबाईच्या खोलीत गेल्यावर त्यांनी खोलीचा दरवाजा लाऊन घेतला. मला कसतरीच वाटत होतं.

काय झालं आजी? कुठे आहे ती मुलगी? नाव काय तिचं? इथेच असते का? मी ठामपणे प्रश्नांची मालिका उभी केली.

त्या आजीबाई अचानक रडू लागल्या. इतका वेळ डोळ्यांतून बाहेर न येणारं पाणी आता मात्र कसलीही तमा न बाळगता ओसंडून वाहत होतं. आजीबाई चश्मा काढून रडत होत्या. काय होतय हे मला समजत नव्हतं. पण मी पटकन त्यांच्या पायापाशी जाऊन गुढग्यावर बसत त्यांना धीर देऊ लागलो. काय झालं? का रडत आहात तुम्ही? माझं काही चुकलं का?तुम्हाला त्रास होणार असेल तर नका सांगू मला काही. पण प्लीज रडू नका आजी. त्यांच्याबद्धल असणारा संशय पळाला होता. आता त्यांच्याशी नातं असल्याप्रमाणे वाटत होतं.

मन किती अस्थिर अन अल्लड असतं. काही काळाचा सहवास, काही काळाची ओळख अन क्षणक्षणात बदलणारी भावना. पावसाळ्यातील रात्रीप्रमाणे! कधी पांढराशुभ्र चंद्र दिसत असतो तर कधी डागळलेली काळे ढग! केवळ परिस्थिती माणसाला घडवत-बिघडवत असते असं म्हणतात ते खोटं नाही. काही काळाच्या भेटीत मी त्या आजिबाईबद्दल काय-काय विचार करत होतो.

काही वेळाने आजिबाईंचं रडणं थांबलं. टेबलवर ठेवलेलं पाणी पित त्या म्हणाल्या, तुला काहीच आठवत नाही का रे?

हा प्रश्न मला बधिर करायला पुरेसा होता. त्या कशाबद्धल बोलत आहेत हे मला माहीत नव्हतं. पण त्या मुलीचा संदर्भ देऊन जर त्या हे वाक्य बोलत असतील तर मात्र काहीतरी विक्षिप्त होतं हे नक्की. कारण माझ्या आठवण्याचा काय संबंध होता. माझं तिच्याशी काय देणं घेणं…?

माझ्या प्रश्नार्थक चेहर्‍याकडे बघत त्या मला म्हणाल्या, जाऊ देत.

“तो एल्बम आण.” असं म्हणत त्यांनी पलीकडच्या टेबलवर ठेवलेला एल्बमकडे हात करत तो आणायला सांगितला. मी तो एल्बम आणून त्यांच्या हातात ठेवला. अतिशय जुना एल्बम वाटत होता. पण व्यवस्थित ठेवलेला,जपल्यासारखाही दिसत होता. वरती छान खोट्या गुलाबाच्या पाकळीचं कवर होतं.

पाठ असल्याप्रमाणे त्यांनी एल्बम उघडला अन त्यातील तो फोटो त्यांनी माझ्यासमोर ठेवला. तो त्या लहान मुलीचाच फोटो होता….

कसं शक्य आहे हे? एल्बममधील फोटो बराच जुना वाटत होता. पण मला तर ती मुलगी नुकतीच दिसली होती. हृदयाचे ठोके वाढले होते अन शरीर थंड पडत आहे असं वाटत होतं. काय आणि कसं react व्हावं हेच समजत नव्हतं. गुंतागुंत अजून वाढली होती. समोर बसलेल्या आजीतर पुन्हा ढसाढसा रडत होत्या. मी दोन्ही चित्र तुलना करून बघितले. थोड्या-बहोत अंतराने त्यातील मुली सारख्याच दिसत होत्या.

मी जागेवरून उठलो अन आजीकडे बघत म्हणालो, कोण आहे ही?

“मीच आहे त्या फोटोमध्ये!!!!!” आजीबाई रडवेल्या आवाजात म्हणल्या.

मी अवाक झालो. मेंदू उलटा-सुलटा झाला. आपण कोणत्या विश्वात भरकटत आहोत असं वाटलं. मी जागा आहे का हे तपासलं.पायाखालून जमीन सरकते आहे असा भास झाला. मी तेथे ठेवलेल्या खुर्चीवर विसवलो. आता हे विचार करण्याच्या पलीकडे आहे असं वाटत होतं. मी नक्कीच काळाच्या अशक्यप्राय चक्रात अडकलो होतो.की हे सगळं स्वप्नं होतं? का मला वेड लागलं आहे?मला खचलेला अन हताश झालेलं पाहून आजीबाईंनी माझ्या मांडीवर हात ठेवला अन ओल्या डोळ्यांनी त्या माझ्याकडे बघत होत्या.

हे कसं शक्य आहे आजी? असं कुठे असतं का?एकतर तुम्ही खोटं बोलत आहात किंवा तुमच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला आहे. मी उघडपणे माझं मत मांडलं. कारण आता मला कशाचीच काही पर्वा राहिली नव्हती.

“नाही रे. काळानेच आपली भेट घडवून आणली आहे बघ! माझं ऐकलं त्या पांडुरंगाने!”

काय बोलताय हे तुम्ही आजी? कसली भेट अन कसलं काय? काल रात्री दहा वर्षांची दिसलेली मुलगी आज नव्वद वर्षांची म्हातारी म्हणून समोर बसते… हे काय चालू आहे? मला कशात अडकवू पाहताय तुम्ही?

“पुढचा फोटो बघ!” एवढाच उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडला. त्यांच्या चेहर्‍यावर स्थिर भाव होते.

मी कपाळावर आठ्या आणत मी चटकन पान पालटलं अन बघितलं. तिथे एक तरुणाचा फोटो होता. पंचेविशीत असतांनाचा होता तो फोटो. दाढी अन अंगात कोट, डोक्यावर टोपी होती. आजी माझ्याकडे बघत होत्याच. मी निरखून बघितलं. त्या फोटोकडे… अविश्वसनीय वाटेल असाच प्रकार होता तो… तिथे बर्‍यापैकी माझ्यासारख्या दिसणार्‍या एका तरुणाचा फोटो होता तो… मला दाढी लावली अन वेशभूषा-रंगभूषा केली तर त्या फोटोतील व्यक्ति अन माझ्यात बरच साम्य वाटलं असतं.

हृदय मोठमोठ्याने वाजत होतं. गाडी जास्त धावल्यावर इंजिन गरम होतं तसं माझा मेंदूही गरम झाला होता. एखाद्या मोठ्या पेटीत माझा प्राण बंदिस्त ठेवला आहे अन तो मिळवण्यासाठी मी तडफडतो आहे असं वाटत होतं. त्या पेटीची चावी आजीकडे होती. मला सर्व गोष्टींचा उलगडा झाल्याशिवाय शांत बसणं अशक्य झालं होतं. मी आजीला शरण जायचं ठरवलं. मी त्यांच्या पायाशी हात लावले अन रडकुंडीला येत म्हणालो, “आजी, आता जे काही माहीत आहे ते स्पष्ट अन लवकर सांगा. कसलीही कोडी, प्रश्न अन गुपितं नकोत. माझ्यात आता कुठलाही धक्का सहन करायची ताकद नाही उरली. हे सगळं माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे.”

तुला काहीच आठवत नसेल तर सांगते. माझ्यामुळेच तू यात अडकलास. जी मुलगी तुला दिसते ती मीच आहे. बालपणीची मी. कदाचित माझी प्रतिमा. पण जवळपास ऐंशी-ब्याऐंशी वर्षांपूर्वीची मी.शास्त्रीनी ‘जय जवान, जय किसान’नारा दिला होता तो काळ.

ही जी सोसायटी आहे न, इथे आधी आमचा मोठ्ठा वाडा होता. बरीच लोक राहायचो आम्ही. मी लहान असतानाच आई-बाबा गेले. काका-काकू मला सांभाळत असत. पण सगळ्यात लाडका होता माझा दादा! मोठा दादा! माझ्याहून पंधरा एक वर्षे तरी असेल मोठा. खूप लाड करायचा माझे. मला कधीच नाखुश नाही करायचा. माझा प्रत्येक शब्द झेलयाचा. काका-काकू लक्ष देत नसत पण दादा माझा आई-वडलांपेक्षा जास्त सांभाळ करायचा. फक्त तोच होता माझ्या जगात. माझा सर्वस्व!

दादा बाहेर गेला तरी मला करमायचं नाही. तो परत कधी येईल याचीच वाट बघत असायचे मी. सध्या बाहेर जो कट्टा आहे न, जिथे तुला मी, म्हणजे ती मुलगी दिसते, तिथे एक मोठ्ठं वडाचं झाड होतं. त्या झाडाखाली बसून मी दादाची वाट बघत असे. तो बाहेर गेला की वाडा खायला उठत असे. काका-काकूही फार लक्ष द्यायचे नाहीत. मग दादाच्या वाटेकडे डोळे लाऊन मी त्या झाडाखाली बसत. तहान-भूक कशाच्च भान राहत नसायचं. मग दादा आला की परत वाड्यात जायचे. कधी-कधी त्याला रात्री सात-आठ वाजायचे, पण मी काही झाडाखालून हलायची नाही. होतेच किती त्यावेळेस, दहा-बारा वर्षांची… काही समजत नसायचं… पण माया काही समजून-उमजून थोडी न केली जाते. मनाला कसलीच बंधन नसतात. माझं आयुष्य फक्त दादाशी जोडलं गेलं होतं. माझ्या विश्वात फक्त माझा सूर्यकांत दादाच होता. आयुष्य आपल्या प्रवाहानं पुढे जात होतं.

नारळी पोर्णिमा जवळ आली होती. मला आठवतं तेंव्हाही पोर्णिमेला ग्रहण आलं होतं. दादा कामासाठी परगावी गेला होता. दोन दिवसांत परतणार होता. त्याच्याशिवाय मला खूप एकटं-एकटं वाटायचं. अजिबात करमायचं नाही. मी नीट जेवतही नसे. उगाच त्या झाडाखाली जाऊन बसायची. त्याची वाट बघण्यात वेळ निघून जायचा.

पावसाने खूप जोर पकडला होता. सगळीकडे तूफान पाऊस. पण आमचं वडाचं झाड इतकं मोठं होतं की तिथे थेंबभरही पाऊस लागायचा नाही. मी तिथेच जाऊन बसत असे. पावसामुळे सगळीकडे पुर आला होता. गावालगतची नदीही तुडुंब वाहत होती. पण काहीही झालं तरी दादा राखी पोर्णिमेला येणार हे मला माहीत होतं. तो मला कधीच नाराज करायचा नाही. राखी पोर्णिमेला तो येणार हे मला माहीत होतं. त्या दिवशी मी अगदी तयार होऊन झाडाखाली बसून होते. दुपार झाली पण तो आला नाही तसा माझा जीव कासावीस होत होता. मन बावरून गेलं होतं. मला तो दिवस, त्यादिवशीची मनातील तळमळ अन कालवाकालव अजूनही जाणवते. आजीबाईंच्या अंगावर खरच शहारा आला होता.

संध्याकाळ झाली पण सूर्या दादा काही आला नाही. मी आता रडवेली झाले होते. काकाला माझी अवस्था कळली होती. तो दादाची चौकशी करायला गेला. गावात बस आलीच नव्हती. गावाला जोडणार्‍या पूलावरून पाणी वाहत होतं म्हणे. वाहनं तर येत नव्हती पण होडीने ये-जा होत होती म्हणे.

त्या संध्याकाळीचे प्रत्येक क्षण मला अजूनही आठवतात. तो आघात अजूनही कायम आहे. तो रोज जाणवतो. तितक्याच त्वेषाने वेदना देतो.

संध्याकाळी काका परत आला तो धावतच. मी झाडाखालीच बसलेले होते. वाट बघून-बघून ताटकळून अवतार फार खराब झाला होता. काका आला अन त्याने मला छातीशी धरलं. तो खूप बिथरला होता. मग काही क्षणांत तो मोठमोठ्याने बोंबलू लागला अन मला धरून रडू लागला.

काकाने मला सांगितलं की माझा सूर्यादादा नदीत वाहून गेला… मेला… ते वाक्य ऐकून माझे कान बधिर झाले. अंगतील त्राण गेलं होतं. शरीर लाकडासारखं स्तब्ध झालं होतं. काका ओरडून मला सांगत होता. एव्हाना लोकांचीही गर्दी झाली होती.

गावातल्याच दामू वाण्याने काकाला ही अभद्र बातमी सांगितली होती. तो नदी पार करण्यासाठी अलीकडच्या काठावर थांबला होता. होडी चालवणारा सय्यद नाविक पलीकडच्या तीरावर होता. त्याच्या नावेत कोणीतरी बसलं म्हणे. तो माझा सूर्यकांत दादा होता असं दामू वाणी सांगायचा. सय्यद नावी माझ्या दादाला होडीत बसवून इकडे आणायच्या इराद्यात होता. ते दोघं होडीत बसले अन येऊ लागले. तोच पाण्याची एक मोठी लाट आली अन नावेसहित दोघांनाही घेऊन गेली. खराट्याच्या काडीप्रमाणे ते दोघं पाण्यात वाहूनं गेले म्हणे. दामू वाण्याने हे सगळं डोळ्याने बघितलं अन नंतर सगळ्या गावाला सांगितलं. काकालाही त्याच्याकडूनच कळालं.

मला हे मान्य नव्हतं. माझा दादा मला सोडून जाऊच शकत नाही. तो माझ्यासाठी परत येणारच. ह्या जगात एकुलता एक असलेला माझा दादा मला असं टाकून जाऊच शकत नाही. मी त्याची वाट बघणार. तो परत येणारच.

सूर्यकांत दादावरील मायेपोटी, प्रेमापोटी मी हे कधीच मान्य केलं नाही की तो गेला आहे. काकाने काही दिवस सांभाळायचा प्रयत्न केला पण मी ऐकणार नव्हते. मी दिवस-दिवस त्या झाडाखाली बसून दादाच्या येण्याची पाहत बसायचे. बराच वेळ. काकू मला मारून घरात नेत असे पण मला त्या जागेची ओढ लागली होती. कारण तेथे बसलं की माझा दादा लवकर येतो हे मला माहीत होतं.मी वर्षभरतरी तिथे बसून वाट बघत असे. पुढच्या राखी पोर्णिमेला जेंव्हा तो आलाच नाही तेंव्हा वाटलं की तो आता मला सोडून गेला आहे. तेंव्हा मी फक्त दहा वर्षांची होते रे… असं म्हणत आजी हुंदके देत होती… ती लटलट कापत होती. मलाही ते ऐकून भरून आलं होतं. आजीच्या डोळ्यांतील वेदना मलाही जाणवत होत्या.

डोळे पुसून आजी पुढे सांगत होती. जशी मी मोठी होत गेले तसं मेंदूने ते सत्य मान्य केलं. पण माझं मन नेहमी सांगत होतं की तुला इथेच थांबायचं आहे, तुझ्या दादाची वाट बघायची आहे… तो कधीनं-कधी येणारच बघ. काळाचे समुद्र ओलांडून अन जन्म-मृत्युच्या भिंती तोडून तो तुझ्यासाठी येईल अन तुझी प्रतीक्षा संपवेल… तू वाट बघणे सोडू नकोस… माझा दादा कधीतरी येईल म्हणून मी वेळ मिळेल तसं किंवा करमत नसेल, किंवा दादाची आठवण आली की इथे बसून राहत असे. दर राखी पोर्णिमेला मी इथे, ह्याच जागेवर राखी ठेवते… दादाच्या आठवणीत.

काळ आपल्या गतीने चालत जातो. तो कोणासाठीही थांबत नाही. मीही काळाप्रमाणे बदलले. पण ही जागा, हे अस्तित्व सोडायचं नाही असं मनोमनी ठरवलं होतं.लग्नंही स्वतःच्या अटीवर केलं. इथे राहणारा नवरा असेल तरच लग्नं करेन असं सांगितलं. पैसा भरपूर होता. माझी अटही मान्य केली. लग्नानंतरचा संसारही इथेच झाला. कालांतराने ते वाडे, झाडं जाऊन ह्या इमारती आल्या. त्या वडाच्या अजास्र झाडाच्या ऐवेजी हे कट्टे आले अन छोटी-छोटी झाडे आली. पण मन काही मानवत नव्हतं. दादाच्या आठवणीत मी इथे येऊन बसत असते. अजूनही. त्याचे-माझे फोटो उशाशी घेऊन झोपते. अनेकदा त्याच्या फोटोशी गप्पाही मारते. माझा दादा मला भेटायला येणार असं मनोमनी वाटत राहायचं. माझ्यासाठी तो फक्त गावाला गेला होता… जो परत येणार याची मला खात्री होतीच…

दादाची वाट बघण हा माझ्या आयुष्याचा झळाळता घटक आहे. तो मला न सांगता गेलाच कसा? देव इतका निर्दयी नसतो. मी रोज त्याची याचना करते की मला माझा दादा मिळू देत… आयुष्यं सरलं. आयुष्यात अनेक प्रसंग आले, प्रेमही मिळालं, एकटेपणाही गेला, पण… पण मनाच्या एका कोपर्‍यात नेहमीच एक रुखरुख राहायची की इथे माझा दादा हवा होता. मला सतत लहानपणीची मी दिसायचे. त्या झाडाखाली दादाची वाट बघत असलेली मी अन मग दादा यायचा अन मला मिठीत घ्यायचा… मला सतत हेच नजरेसमोर दिसायचं… ती आठवण कधीच न विसरण्यासारखी. शुक्रतार्‍याप्रमाणे ते स्थान अढळ अन मोहक होतं. उलट मुरलेल्या लोणच्यासारखं, काळ सरकत गेला तशी ती जखम अजूनच खोल होत गेली. एक सल मनाशी घेऊन मी आयुष्यभर जगत आले… त्याने त्या दिवशी मला भेटायला म्हणून नदी पार केली असेल अन मग त्याच्यावर…

आजीने डोळे पुसले. त्यांचा गळा दाटून आला होता. मलाही रडू येत होतं. डोळ्यांच्या कडावर पाणी साचलं होतं. खूप जुन्या खपलीवरची जखम निघाली होती. एका अंधार्‍या गुहेतून वाटचाल करून तेजस्वी प्रकाशाला सामोरं जात होतो. त्या एका लाटेने मनातील सारे बांध तोडून टाकले होते.

आजी पुढे म्हणाली,तुला आश्चर्य वाटेल, पण ती तारीख होती सात ऑगस्ट!!! राखी पोर्णिमाच!!! त्याच दिवशी मी माझ्या दादाला गमावलं होतं. उद्याही सात ऑगस्ट आहे, राखी पोर्णिमा!!!तेंव्हाही ग्रहण होतं, उद्याही ग्रहण आहे.

कधीकधी शेवटच्या भेटीसाठी प्राणही अडकतो. कधीकधी आत्माही तळमळतो. कधीकधी साताजन्माचे दरवाजेही पार केले जातात. पण ती भेट झाल्याशिवाय त्या संवेदनेची, त्या मायेची शक्ति काही संपत नाही.

तूही हजारो डोंगर पार करून आलास. माझ्यासाठी. तुला काही आठवत असेल नसेलही… पण मी तुला ओळखलं आहे. देवाने तुला इथे माझ्यासाठीच पाठवलं आहे. तुझा चेहराही माझ्या दादासारखाच आहे. हा निव्वळ योगायोग नाही. तुझी माझी भेट व्हावी ही नियतीचीच इच्छा आहे. परमेश्वराने हे दान माझ्या पदरी टाकलं आहे. मी इतके वर्षे जगलेच कशाला? किती जन्माच्या नंतर तुला हे रूप मिळालं असेल कोणास ठाऊक. प्रवाहात उलटं वाहून तू मलाच भेटायला आलास हे सांगायला मला कोणाचीही गरज नाही. तूच माझा मोठा भाऊ… सूर्यकांत दादा!!!

तुला जे दिसलं तो भूतकाळाचा आरसा होता. देवानेच तुला दृष्टान्त दिला. ते दिसलं म्हणून तर तू शोध घेत सुटलास अन तुझा शोध तरी येऊन कुठे थांबला? माझ्याजवळ. तेही तो कट्ट्यावरच. आपली भेट तिथेच झाली.माझी प्रतीक्षा तिथेच संपली. हा ईश्वरी न्याय आहे. त्याने माझ्या कष्टाचं फळ दिलं. तू भेटावास ही इच्छा त्याने पूर्ण केली. उद्याची राखी पोर्णिमा तुला राखी बांधूंनाच पूर्ण होईल.

मला काहीच सुचत नव्हतं. मी केवळ स्तब्ध होऊन ऐकत होतो. आता त्या आजीशी आत्मीयता वाटत होती, पण जुन्या स्मृती काही मला जाणवत नव्हत्या. हा माझा पुंनर्जन्म आहे अन त्या आजी माझी धाकटी बहीण. हे जरा जड होत होतं. थेटपणे विश्वास ठेवावा वाटत नव्हता अन त्या आजींचं मनही मोडवत नव्हतं. मी मध्येच कुठेतरी अडकलो होतो.आत्ता हळूहळू काही प्रश्नांची उकल होत होती. गुंता सुटेल असं वाटत होतं. हे सत्य असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती पण तेच सत्य कसं याचे पुरावेही शोधावे लागणार होते.

आजी माझ्याकडे एकटक बघत होत्या. कदाचित माझ्यात त्या स्वतःचा भाऊ बघत असाव्यात. मला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं. मी जागेवरून उठलो तशा आजी म्हणल्या, “कुठे जातो आहेस?”

त्या प्रश्नाचे अनेक प्रतिध्वनी कानात उमटत होते. मी ह्यात अडकणार याची चाहूल लागली होती.

“माफ करा आजी, मी जातो माझ्या घरी. माझं डोकं खूप दुखत आहे.”

इतक्या वर्षांनी भेटलास आणि लागलीच जातो आहेस?

मी जागेवर शांतपणे उभा होतो. काहीच बोललो नाही.

“तुझा विश्वास नाही बसत? तुला काहीच आठवत नाही का रे?”

मी जड अंतकरनाने आजीकडे बघत होतो, “आजी, मला खरच काही आठवत नाहीये… म्हणजे तुम्ही सांगताय ते खोटं म्हणत नाही मी… पण मला जरा वेळ हवाय… मला विचार केला पाहिजे…”

आजी अतिशय समाधानाने म्हणत होत्या, “हो रे… आता मला कसलीच इच्छा नाही… तू दिसलास एकदाचा… आयुष्यभर जे स्वप्नं बघितलं ते डोळ्यासमोर आहे… तू माझा भाऊ आहे असं कोणाला सांगितलं तर मला अन तुला वेडं ठरवतील लोक… पण मला माहिती तेवढं पुरेसं आहे… तूच आहेस सूर्यकांत दादा…”

“मी येतो आजी.” मी अस्वस्थ होऊन जात होतो.

“एक ऐकशील?”

मी त्यांच्याकडे फक्त प्रश्नार्थक नजरेने बघत होतो.

“उद्या राखी पोर्णिमा. तू राखी बांधून घे माझ्याकडून…?”

माझ्या डोळ्यानेच होकार दिला. मी तसाच निघून गेलो. आजी माझ्याकडे एकटक बघत असल्याचं मात्र जाणवत होतं.

===अपूर्ण===

सर्व हक्क सुरक्षित @ अभिषेक बुचके

latenightedition.in || @Late_Night1991

पाचवा व अंतिम भाग

खिडकी : अंतिम भाग

 

प्रवासयोग

प्रवासयोग

शिवशाही बस  ||  महामंडळ एसटी चा प्रवास  ||  अनुभव  ||  मराठी कथा  ||  हास्यकथा  ||  

पू. ल. देशपांडे सांगतात, लाइफ इज सफरिंग… आयुष्य म्हणजे प्रवास आहे!

आठ दहा दिवसांखाली गावाला गेलो होतो. धावता दौरा होता. येताना महाराष्ट्र शासनाच्या शिवशाही गाडीने परतलो. गाडीचा दर्जा अप्रतिम होता. अगदी एसी वगैरे होती गाडी आणि कुठे थुंकलेलं वगैरेही नव्हतं. एरवी महामंडळाच्या बसने प्रवास करणे म्हणजे अतिशय जिवावर येतं. पण खाजगी बसेसप्रमाणे सेवा मिळत असल्याने बदल होतोय असं वाटलं. त्या शिवशाही बसची स्तुति सोशल मीडियावर केली. चांगल्या चांगल्या पोस्ट ला दुरूनच राम-राम करणारे ह्या साधारण पोस्ट वर मात्र व्यक्त होऊ लागले. बराच टाइमपास झाला. कोणी मला शिवशाहीचा ब्रॅंड अम्बॅसडर म्हंटलं, कोणी कंडक्टर, कोणी शिवसेनेचा कार्यकर्ता तर कोणी काय काय. हा खरं गमतीचा भाग होता. पण नंतरच्या काही दिवसांत शिवशाही बसेस बद्दल नकारात्मक बातम्या येऊ लागल्या. म्हणजे कुठेतरी बसचा अपघात झाला, कुठे उशिराने बस आली वगैरे वगैरे. आणि मित्र मंडळी मला त्यात टॅग करू लागली.

नंतर काही दिवसांनी परत एकदा गावाला जायची वेळ आली होती. खरं तर आपापली चारचाकी हाकत न्यावी असं वाटत होतं. कारण अंतर शंभर-दीडशे किलोमीटर असल्याने स्वतः ड्राइव करत जाणं सोयिस्कर होतं. पण एकट्यासाठी गाडी घेऊन जायला नको वाटत होतं. उगाच पेट्रोलला भारती होती. शिवशाही चा अनुभव नुकताच घेतला असल्याने महामंडळाच्या बसने जायचं ठरलं. फार तर तीन-साडेतीन तासांचा प्रवास होता.

एसटी चा प्रवास टाळायचं प्रमुख कारण म्हणजे ‘बस लागणे’. एसटी मधील स्वच्छता वगैरे बघून मळमळ होतं मला. म्हणूनच बसचा प्रवास टाळत असे. पण यंदा ठरलं होतं.

सकाळी सकाळी तयार होऊ बस स्टँड वर आलो. त्या दिवशी लग्नाची तारीख होती. सगळं बस स्टँड गच्च भरलेलं. जिथे जायचं होतं तिथे जाणार्‍या दोन गाड्या सोडून दिल्या. त्या गाड्या पोत्यात धान्य कोंबावे तसं भरल्या होत्या. मागे एक बस लागली. कसाबसा त्यात चढलो. पार शेवटची सीट भेटली. शेवटची सीट मला कधी वाईट वाटली नाही. कारण त्या सीटकडे फार कोण भटकत नाही. तिथे आपलं स्वतंत्र राज्य असतं. शाळेतही मला तसं शेवटचा बाक आवडायचा. पण मास्टर लोकांच्या खोड्याच वाईट. प्रश्नोत्तरच्या तासात मागच्या पोरांकडून सुरुवात केली तेंव्हापासून माझा मागच्या जागेचा मोह सुटला होता. मग कॉलेजमध्ये मिडल बेंचर्स झालो होतो. असो. हा मुद्दा वेगळा.

तर मी मागच्या सीटवर जाऊन बसलो. बसमध्ये मागच्या सीटवर बसण्याचे अनेक फायदे असतात हे कळलं. एकतर तुम्हाला उठवणारं कोण नसतं. खिडकी असेल तर पूर्ण खिडकी उघडायची मुभा असते. प्रवास संपेपर्यंत उगाच खिडकी मागे-पुढे ढकलण्यावरून काही खेळ होत नाहीत. सर्वात महत्वाचं म्हणजे बसमध्ये कोण चढत आहे उतरत आहे हे दिसतं.

गाडी सुरू झाली. उन्हाळा असला तरी खिडकीतून येणार्‍या सकाळच्या वार्‍यामुळे फार धगत नव्हतं. कानात हेडफोन टाकून आरामात बसलो होतो. अरुण दाते यांची भावगीते चालू होती. ही पोर्णिमा, ही चांदणे येतील का पुन्हा….

डोळे मिटून गाणे ऐकत असताना उजव्या मांडीला काहीतरी गुदगुल्या झाल्या. डोळे उघडून बघितलं तर बाजूला बसलेला म्हातारा मला अलगद स्पर्श करून उठवत होता. छान स्वप्नात रंगलो असताना याने मोडता घातला.

मी कानातील हेडफोन काढून विचारलं. काय झालं काका?

म्हातारा म्हणाला, ‘एक द्या की…’

मी आश्चर्याने म्हंटलं, ‘माझ्याकडे एकच आहे ओ…’ मी घड्याळाबद्दल बोलत होतो.

तो म्हातारा म्हणाला, ‘गाण्याचं एक द्या…” तो हेडफोनबद्दल म्हणत होता.

मला आश्चर्य वाटलं. हा म्हातारा मला झोपेतून उठवून माझ्याकडे, मी ऐकत असलेल्या, माझाच हेडफोन मागत होता.

मी वैतागून म्हंटलं, ‘काका, मला ऐकतोय की गाणे.’

तो हक्काने म्हणाला, ‘मलाही ऐकायचे आहेत.’

आता याला कसं समजावणार. तो चक्रम आहे हे नक्की होतं.

तो हसरा चेहरा करून म्हणाला, ‘तुम्ही उजव्या कानात एक घाला, मी डाव्या कानात दूसरा घालतो.’

हे मला जरा अश्लील वाटलं. कानात घाला वगैरे.

माझा नाईलाज होता. वयस्कर माणसाला नाही तरी कसं म्हणावं हा प्रश्न होता. मी तयार होताच तो मला येऊन चिटकला. कधीतरी धुतलेल्या त्याच्या टोपी अन सदर्‍याचा वास तिन्ही त्रिकाळ घुमू लागला. एक हेडफोन त्याच्या हातात देऊन मी खिडकीकडे तोंड केलं.

त्याने आधी टोपी काढली अन कान साफ केलं. टोपी परत डोक्यावर ठेवली अन मग कानात हेडफोन घातला. मला उलटीची जाणीव झाली. एकतर याने टोपी कधीतरी धुतलेली होती… त्यात त्याच्या कानाकडे बघण्याची माझी डेरिंग झालीच नाही. क्षणभर असं वाटलं की देऊन टाकावा त्याला अख्खा हेडफोन अन आपण गप बसावं खिडकीच्या बाहेर बघत. पण म्हंटलं, हेडफोन आपला आहे.

अरुण दाते यांचं या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे… चालू होतं. पण सध्याच्या परिस्थितीत मला ते गाणं अन त्याचे बोल नकोसे वाटत होते.

त्या गाण्याच्या तालावर तो म्हातारा मान हलवत होता अन हातवारे करत होता. त्याने मान हलवताच माझ्या कानातील हेडफोन गळून पडायचा. त्यात त्याचा हलणारा हात इकडे तिकडे घुसू लागला. मला प्रचंड वैताग आला. तो खात्रीने येडा होता. पण नंतर वाटलं आपलच म्हातारपण तर नाही न…? हिची भन… नको तो विचार येऊन गेला.

मग तर म्हातार्‍याने हद्दच केली. सारखं गाणं बदल म्हणू लागला अन खिशातील मोबाइलला हात लावू लागला. माझं डोकं सणकलं. मी मोबाइल थेट एरोप्लेन मोडवर टाकला अन गाणे बंद झाले. त्याला सांगितलं की नेट बंद पडलं आहे. त्याच्याकडून हेडफोन ओढून घेतला. त्याच्या कानातील मळ हेडफोनला लागलेला मला दिसला. मी अलगदपणे तो हेडफोन पिशवीत कोंबला.

माझं मी झोपलो. तो पलीकडे जाऊन दुसर्‍याला त्रास देऊ लागला.

बर्‍यापैकी झोप लागली होती. एक आवाज आला, ओ दादा उठा की…

मी डोळे उघडले. कंडक्टर साहेब मोठयाने ओरडत होते.

मी गडबडीने जागा झालो. मला वाटलं माझं स्टेशन आलं. तर तो कंडक्टर म्हणाला, उतरा खाली… गाडी फेल झालीय…’

मी काळजीच्या स्वरात म्हंटलं, किती वेळ लागेल?

तो खुन्नस देत म्हणाला, आता सगळे काय येडे म्हणून उतरले का? लई वेळ लागतय. दुसर्‍या गाडीत बसवून देतो सगळ्यांना… चला…

काय वैताग होता. आयुष्यासोबत गाड्या पण फेल लागत होत्या. सामान उचललं आणि उतरलो.

ऊन चांगलंच तापलं होतं. उतरलो. कुठल्यातरी छोट्याशा गावातल्या बस स्टँडवर गाडी थांबवली होती.

आता दुसर्‍या गाडीत बसवून देणार म्हणजे बसायला जागा मिळणे अवघड होतं. एक-दोन एसटी येऊन गेल्या. पण त्या फुल्ल असल्याने आम्हाला कोणीही बसच्या दारातही उभं केलं नाही. मग ड्रायवर अन कंडक्टर स्वतःच पंक्चर काढू लागले. विशेष म्हणजे मी ज्या चाकावर बसलो होतो ते दोन्हीही चाक पंक्चर झाले होते. मित्र मला आपैशी का म्हणायचे ते आठवलं.

अर्धा तास उन्हात बसलो. एक टायर बदलला, एक फुटलेलाच होता. पुन्हा गाडी सुरू केली. ती गाडी पुढच्या मोठ्या डेपो पर्यन्त नेऊन तिथे दुसरी गाडी करून द्यायची असं ठरलं. हे म्हणजे लग्नाच्या वरातीला निघाल्यासारखं होतं. पाहुण्यांना लग्नमंडपापर्यन्त पोचवण्याची जबाबदारी अंगावर घेतलेल्या माणसाप्रमाणे कंडक्टर-ड्रायवर ने आम्हाला आमच्या ठिकाणावर पोचवण्याची जबाबदारी घेतली होती.

धिरे धिरे चल… करत गाडी मोठ्या बस स्टँडवर आली. गाडी बस स्टँडच्या आत शिरताच नक्षली हल्ला व्हावा तसा लोकांची झुंड गाडीवर धावून आली. त्या पामरांना आमच्या गाडीत बसायचं होतं. बिचारा कंडक्टर दरवाजा गच्च धरून उभा होता. गाडी फेल आहे हे सांगून सांगून त्याचा गळा फेल झाला होता.

आम्हाला दुसर्‍या गाडीत बसवून देणार अशी प्रतिज्ञा केलेल्या कंडक्टर ने ती तोबा गर्दी बघून आपली प्रतिज्ञा मोडली. ही गाडी जेंव्हा नीट होईल तेंव्हा त्यातून सोडू असं तो म्हणाला. बरेच प्रवासी सुखी झाले, तर माझ्यासारखे दुखी झाले. इथे अजून एक-दीड तास करपत बसावं लागणार होतं. मी कंडक्टरला दुसर्‍या गाडीत बसवून द्यायला सांगितलं. त्याने माझ्याकडे रुक्षपणे बघितलं अन एक तिकीट रिसीट काढून माझ्या हातात दिली. जागा मिळव अन मला फोन कर, त्या गाडीतल्या कंडक्टरला मी सांगतो.

माझ्यातला बाजीप्रभू जागा झाला. तो आता जागेसाठी युद्ध करणार होता. एक बस आली. त्यातील गर्दी बघून इरादे डळमळीत झाले. लोकांना आजचाच मुहूर्त सापडला होता लग्न करायला. जगबुडी असल्याप्रमाणे लोकं गाडयात बसून निघाले होते.

बस स्थानकात शिवशाही ची गाडी येताच मला अत्यानंद झाला. आता यात उभं राहून गेलं तरी चालेल असं वाटलं. एसी मध्ये काय होत नाही. शिवशाहीचं तिकीट जास्त असतं हे माहीत असल्याने गर्दीने इकडे हल्ला केला नाही. फुकटचं जेवायला मिळतय म्हणून लग्नाला जाणारी पब्लिक इतकं तिकीट कशाला काढत बसणार. माझ्यासारखे चार-सहा लोक तळमळीने शिवशाहीच्या आत शिरले.

शिवशाहीच्या कंडक्टरला फेल आयुष्यातील बस फेल ची सगळी करुण कहाणी सांगितली. पण तो हळहळला नाही. लाल डब्ब्याचं तिकीट कमी असतं, याचं जास्त आहे… तुम्हाला दुसर्‍या लाल डब्ब्यात बसावं लागेल. इथे नाही जमणार. बाजीप्रभून्नी खिंड लढवली होती मी गाडी अडवली. आमच्या कंडक्टरने नंबर दिला होता, त्याला बोलावलं. तो आला. त्याने पाहिलं अन तो भांडू लागला. आयुष्यात माझी बाजू घेऊन इतक्या त्वेषाने भांडणारा हा पहिला इसम.

असं कसं बसू देत नाहीत… आमचा पासेंजर आहे… तिकीट काढलं आहे… वरचे पैसे द्यायला तयार आहे… तुम्ही नाही म्हणू शकत नाही…

मग पहिल्यापासून तिकीट काढावं लागेल. आधीचं तिकीट ग्राह्य धरता येणार नाही.

दोणीबी सरकारच्याच… पैसे सरकारला चालले, तुम्ही का अडवून धरायले…

मला खरं तर अश्रु अनावर होणार होते. हा बिचारा माझ्यासाठी इतका भांडत होता अन मी काहीकी शिवशाहीच्या एसीत ढीम्म उभारलो होतो.

बराच वेळ तू तू मै मै झाली. आम्हा दोघांना अपमानित करुण खाली उतरवलं. आमचा कंडक्टर पण जरा पोरेल होता. बिचारा खूप भांडला माझ्यासाठी. त्याच्या उपकाराची परतफेड म्हणून त्याला चहा पाजवला. चहा अत्यंत रद्दी होता. आता आधीची गाडी नीट झाल्यानंतर त्याच्यातच बसून जायचं ठरलं.

नशीब खत्रा तो क्या करेगा बत्रा! एक अर्धवट खराब टायर टाकून गाडी सुरू केली. आता कुठेही फार न थांबता थेट निघायचं ठरलं. बाहरेचे नवे प्रवासी घ्यायचे नाहीत असंही ठरलं.

गर्दी थोडी कमी झाली होती. लोकं वैतागून इतर बसने गेले होते. फक्त दोघं-तिघं उभे होते अन बाकीचे बसलेले होते.

इथे नवा राडा सुरू झाला. सुरूवातीला जो जिथे बसला होता त्याने परत तिथेच बसायचं अशा नियमाचा शोध एका प्रवाशाने लावला. कारण तो आधी जिथे बसला होता ती सीट पुढे होती अन तिथे ऊन लागत नव्हतं. पण तिथे एक मुलगी बसली होती. सुरू झाला राडा. दोघेही कमी नव्हते. मुलगीही जोराने बोलत होती. मला मळमळ होत होतं अन झोप येत होती. इतका वेळ वाया घालूनही लोकांना भांडायचा जोर कुठून येतो कोणास ठाऊक. मी मागून दोन नंबरच्या सीटवर बसलो होतो. पंक्चर झालेल्या टायरच्या सीटवर कोणीही बसणार नव्हतं.

थोडा वेळ कल्लोळ झाला अन शेवटी ती मुलगी उठली. लढाई जिंकल्याप्रमाणे तो माणूस वाकुल्या दाखवत बुड टेकवून तिथे बसला.

आयुष्य खरच फेल म्हणावं लागेल. नको त्या वेळेस नको ते होत असतं. बसमध्ये, वर्गात, कार्यक्रमात एखादी सुंदर मुलगी आल्यावर अनेक तरुण (जवळपास मीही) केस नीट करतो अन बाजूची जागा जाणीवपूर्वक रिकामी करतो जेणेकरून त्या मुलीने आपल्या शेजारी येऊन बसावे. बसमध्ये असले टुकार प्रयोग बर्‍याचदा केले होते. पुण्याची पीएमटी वगळता फार कुठे यश आलं नाही.

पण आज वाटत नव्हतं की त्या मुलीने बाजूला येऊन बसावं. कारण एक तर मी उन्हात न्हाऊन काळवंडल्या गेलो होतो. अंगाला घामाचा वास सुटला होता. त्यात मळमळ होत होतं. ती बर्‍यापैकी सुंदर मुलगी जर बाजूला येऊन बसली तर आपली फजिती होणार हे अटळ होतं. चुकून जर ओकलो वगैरे तर मग आयुष्यभर एसटी चा प्रवास करू शकलो नसतो.

ती माझ्या बाजूला येऊन बसली. माझ्या पोटात भीतीने खड्डा पडला. पोटात कालवाकालव झाली. ती समोरच्या माणसाला शिव्या देत होती. माझ्याकडे बघून म्हणाली, त्याला कोणीच कसं काही म्हणालं नाही. नुसती दादागिरी चालू आहे. मला बसलेलं उठवलं. तू खपवून घेतलं असतास का असं?

थेट अरे तुरे…! अजून तरुण दिसतोय तर!!!

तिच्या प्रश्नावर मी माफक हसलो. तोंडात लवंग-सुपारी होती. ती बडबड करत होती. मी गप बसलो होतो. मळमळ वाढत होती. मी देवाला म्हणत होतो, देवा उलटी नको रे… किती पचका करशील आयुष्याचा!!!

ती म्हणाली, शेवटचा स्टॉप का?

हो.

कठीण झालाय प्रवास.

हो.

बोललो की उबळ यायची.

साला नशीबच मराठवाडी! जेंव्हा पेरणी करुण बसतो तेंव्हा ढग येतात पण बरसत नाहीत. पेरणी केली नाही की बरोबर बरसतात. अन कधी-कधी गरज नसताना अवकळी बरसतात! दैव अन कर्म!

कधी नव्हे ते इतकी सुंदर मुलगी स्वतःहून बाजूला येऊन बसली आहे. स्वतः बोलते आहे. त्यात भांडण हा चर्चेचा विषय उपलब्ध असताना कर्मदरिद्री नशीब उलटी करायच्या मूडमध्ये होतं.

असेच मरणार!!!

मी प्रत्युत्तर देत नाही पाहून तिने आवारतं घेतलं. मला स्वतःचीच कीव आली. मोठ्या प्रयत्नाने मी धीर एकवतून म्हंटलं, खिडकीला बसायचं का? तर तेंव्हा तिने डोळे मिटले होते.

            एसटी संथपणे मुक्कामाच्या दिशेने निघाली होती. कसली गर्दी नाही की कसला कलकलाट नाही. सगळे दामून-भागून झोपले होते. गरम वारा ह्या खिडकीतून त्या खिडकीत वाहत होता. एका सुंदर मुलीच्या बाजूला बसून उलटी होईल का नाही ह्या चिंतेत मी जागा होतो. फुलदानीच्या नशिबात काटेच असतात… फुलाचं रूप त्याने फक्त अनुभवायचं असतं… शेवटचा स्टॉप आला. ती उतरली. उतरताना काहीच बोलली नाही किंवा माझ्याकडे बघितलंही नाही… एका आकड्याने लोटेरी हुकावी तसा चेहरा करुण मी बसलो होतो. ती खाली उतरली. भळभळून उलटी झाली. नशीब गाडी रिकामी होती. कंडक्टर जवळ आला. बघितलं अन हळहाळत म्हणाला… आज प्रवासयोग चांगला नव्हता दादा…

-*-*-समाप्त-*-*-

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991  ||  latenightedition.in

गाव सोडताना…

मराठी कथा – ई पुस्तक

मराठी कथा – ई पुस्तक

मराठी कथा  ||  साहित्य  || भयकथा  ||  लिखाण  ||  Marathi Stories By Abhishek Buchake  || अभिषेक बुचकेच्या मराठी कथा  ||  मराठी कथा e-Book  ||   कथासंग्रह  ||  Marathi Story Collection

 

जवळपास एक वर्ष होऊन गेला “मराठी कथा” हे e-book अर्थात ई-पुस्तक पब्लिश करून. गूगल वर इतक्या मोठ्या प्रमाणात दर्जेदार कंटेंट उपलब्ध असताना, विविध आशयाची अन विषयांची पुस्तके उपलब्ध असताना त्या गर्दीत माझं हे App त्यातील कथांवर कितपत तग धरू शकेल याची शंका होती. पण गेल्या वर्षभराचा प्रतिसाद बघता माझ्या शंका वाचकांनीच तडीपार केल्या. आज हे app दहा हजार पेक्षा अधिक लोकांनी वाचलं आहे हे सांगताना नक्कीच आनंद होतोय.

खरं तर App च्या मार्गात अनेक अडथळे होते. अनेकदा App बंदही पडत होतं. पण विविध अडचणींवर मार्ग काढत हे App सुरू ठेवण्याचा अट्टहास उपयोगी पडला. ह्या App मध्ये किती कथा मी टाकू शकेन किंवा त्या कितपत चांगल्या वगैरे असतील याची कसलीच खात्री नव्हती. पण समिश्र प्रतिक्रिया येत गेल्या, ज्यामध्ये सकारात्मक प्रतिक्रिया धीर देणार्‍या होत्या.

जसं पावसाळ्यात रोजच पाऊस पडत नाही, आणि पडणारा पाऊसही नेहमी सारख्याच तीव्रतेने पडत नाही तसंच कुठल्याच लेखकाच्या सर्वच्या सर्व कथा चांगल्या असत नाहीत. हा नियम काही अपवाद वगळता सर्वच लेखकांना लागू होतो. पण मी मुळात लेखकच नाही. मी स्वतःला लेखक म्हणवून घेणं म्हणजे अतिरेकच होईल. जे आहे ते निव्वळ काल्पनिक विश्वातील मळमळ बाहेर काढणं आहे. माझ्या लिखाणात दोन टोक असतात असं काहीजण म्हणतात. म्हणजे एका बाजूला “एक रात्र गाजवलेली!” सारखी अर्थहीन विनोदी कथा, कुठे “गाव सोडताना” सारखी भावनांची चलबिचल दाखवणारी कथा, कुठे “नरक्षी किंवा उतारा” सारख्या भयकथा, कुठे “खिडकी” सारखी रहस्यमय अन भावस्पर्शी कथा, तर कधी “मी ब्रम्हचारी” सारखी सामाजिक आशय असलेली कथा. ह्या अशा विविध प्रकारच्या कथा काही ठरवून लिहीलेल्या नाहीत. त्यांचा जन्म ओघानेच झाला. आकाशातील एखादी वीज जंगलात पडावी अन वणवा पेटावा तसं एखादी लहानशी संकल्पना, घटना, विचार ही एका कथेला जन्म घालत गेली.

ह्या सर्व कथांच्या गर्दीत तीन-चार कथांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे ज्या वाचकांना खूप आवडल्या अन त्यामुळे मला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. त्यात पहिला नंबर आहे “मी ब्रम्हचारी” ह्या आशयघन कथेचा. एका ब्रम्हचारी राहिलेल्या माणसाची व्यथा यामध्ये मांडलेली आहे. ही कथा अनेकांना भावली. त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात पण वाचकाला त्यातून काहीतरी बोध घ्यावा असं वाटलं यातच मला आनंद आहे.

त्यानंतरची कथा आहे ती “नरक्षी” ही भयकथा. सहज बसल्या बसल्या काहीतरी सुचलं आणि ही कथा लिहायला घेतली. कथा कितपत चांगली आहे याबद्दल मलाही आत्मविश्वास नव्हता. पण “प्रतिलिपी” या संकेतस्थळावर एक भयकथा स्पर्धा झालेली त्यामध्ये या कथेला उत्तेजनार्थ प्रमाणपत्र मिळालं, अत्यंत चांगलं रेटिंग मिळालं. यामुळे जरा धीर आला की मी भयकथा लिहू शकतो.

यानंतर मला चांगला प्रतिसाद मिळाला तो “गाव सोडताना” या कथेसाठी. नोकरीनिमित्त विविध गावात राहावं लागणार्‍या अन मग ते गाव सोडताना मनाला लागणारी हुरहूर ही या कथेत मांडली आहे. थोडीशी भावनात्मक पद्धतीने त्याला रंग दिलेला आहे. ही कथा वाचून एक दोन वाचक म्हणाले की माझ्याही डोळ्यांतून पाणी आलं. ही एक उल्लेखनीय बाब ठरली.

आणि एक अशी कथा ज्या कथेने मला स्वतःला जे लिखाण करतो त्याबद्दल आत्मविश्वास जाणवायला लागला. खिडकी! एक छोटासा अनुभव डोक्यात होता ज्यावर काहीतरी लिहुयात म्हणून ही कथा लिहायला सुरू केली. नंतर डोक्यात प्रचंड विचारचक्र सुरू झालं अन त्या कथेची व्याप्ती मला जाणवू लागली. मग झपाटल्यासारखं ती कथा लिहून पूर्ण केली. सुरुवातील रहस्यमय आणि भुताटकी सारखी वाटणारी कथा एक वेगळच वळण घेते. एका बहीण-भावातील अतूट नातं, बंध ह्या कथेच्या शेवटाला उलगडतो. ही कथा लिहीत असताना मलाच अस्वस्थ वाटत होतं. कथा पूर्ण झाल्याच्या नंतर मलाच ती खूप आवडली. ज्या मित्रांना ती वाचायला दिली त्यांनीही चांगल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आणि इतर वाचकांनाही या e-book मधील सर्वोत्कृष्ट कथा वाटली. मी लिहिलेली अन मलाच आवडलेली कथा वाचकांना आवडते याचं अधिक अप्रूप होतं.

अलीकडच्या काळात माझ्या प्रतिलिपी प्रोफाइलचे एक लाख वाचक झाले, माझ्या latenightedition.in या वेबसाइटचेही एक लाखांपेक्षा अधिक viewers झाले आणि “मराठी कथा” या App चेही दहा हजारांच्या अधिक वाचक झाले. काहीतरी मांडत होतो, व्यक्त होत होतो, खरडत होतो त्या कामाची पोचपावती मिळाल्यासारखं वाटत होतं म्हणून हे सगळं लिहायचा घाट घातला. वाचत रहा… प्रतिक्रिया नोंदवत रहा इतकच सांगेन… तूर्तास इतकेच…

खालील लिंकवर “मराठी कथा” हे App

https://play.google.com/store/apps/details?id=com.latenight.somethingsamajik.MarathiKatha

 

खालील लिंकवर प्रतिलिपी प्रोफाइल अन कथा

https://marathi.pratilipi.com/user/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%87-z4udmxr8la

 

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991  || latenightedition.in

मराठी कथा – e – book [Updated]

चेहरे आणि मुखवटे

चेहरे आणि मुखवटे

मुखवट्यामागील चेहरा  ||  रंग-बेरंग  ||  गोंधळलेलं मन ||  काल्पनिक कथा

काहीच अर्थ नव्हता. आयुष्य नुसतं बेरंग अन बेचव झालं होतं. सगळा रस निघून जावा अन चोथा उरावा तसं वाटत होतं. एका लयीत चालू होतं आयुष्य. मृत मानसाच्या हार्टबीट सारखा. सरळ रेष अन एकसंध आवाज. तेच ते रोजचं. उठा… कामाला जा… तिथे त्याच कटकटी… मित्रांसोबत तेच ते जोक… परत रूमवर या… त्याच मेसवर जा, त्याच त्या भाज्या खा… झोपताना youtube वर गाणे… कधीतरी हस्तमैथुन करा… झोपा.. परत उठा… परत तेच… वर्तुळात अडकल्याप्रमाणे… छा.. काहीच मजा राहिली नाही जगण्यात. स्वतःच्या स्वतःत गुरफटून राहिलेलं आयुष्य म्हणजे निव्वळ कारावास.

तिकडे गावाकडे चार एकर शेतीपायी आई-बाप अडकून पडलेले. भाऊ त्याचा-त्याचा वेगळा राहतो. म्हातार्‍या-म्हातारीला म्हंटलं, ती जमीन विकून या इकडं. निदान सोबत राहता येईल. पण ऐकत नाहीत. गावकी अन भावकी काही सोडत नाहीत. असंही मरायला इथे आले तरी राहायला जागा कुठेय म्हणा. निव्वळ अडचणीत राहावं लागेल मग. म्हणूनच मीही कधी जास्त जोर देऊन त्यांना कधी बोलवून घेत नाही.

सगळा कोंडमारा झाला आहे. महिन्याच्या सुरूवातीला कॅलेंडर बघायचा अन लागून आलेल्या सुट्ट्याला गावी जाऊन यायचं. तिथे तरी काय वेगळं असतं म्हणा. राहतो कसा, कमावतो किती, खातो काय अन लग्न कधी करणार याच्या पलीकडे गावात काही चर्चा होतच नसते. वैताग येतो त्या गोष्टींचा. आगितून फोफाट्यात.

ही नोकरी तरी काय वैताग आहे साला. त्या आकड्यांच्या गर्दीत जीव नकोसा होतो. कधीतरी बाहेरगावी जावं लागतं तोच काय तो विरंगुळा. पण आयुष्यात काही थ्रिल राहिलाच नाही. ते कॉलेजचे दिवस तरी बरे होते म्हणायची वेळ आलीय. तिथेही न्युंनगंडातच अडकलो होतो म्हणा, पण चिंता अन शुष्क प्रेमाच्या रंगाने माखल्या गेलो होतो. हल्ली आयुष्य इतकं बेरंग झालय की बेरंगाचा रंग लागलाय. कसली मजाच राहिली नाही. नाही म्हणायला एक मुलगी आली होती आयुष्यात, पण भेटीच्या दुसर्‍या आठवड्यात ती स्वतः फिजिकल झाली अन तिसर्‍या आठवड्यात सोडून गेली. काही दिवस मानसिक बलात्कार झाल्यासारख वाटत होतं, पण शारीरिक पातळीवर एक परिपूर्ण जाणतेपणा आला होता. स्त्रीसुख वेगळीच अनुभूती असते. कदाचित त्यामुळेच नंतर हस्तमैथुन करायची सवयच झाली. अशाही मुली असतात याचं आश्चर्य वाटत होतं. तिला काय हवं होतं याचा विचार सारखा मनात येत असतो.

अजून एक मुलगी आयुष्यात आलेली. नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे रविवारी बाबू बिर्याणीवाल्याकडे जायचो तिथे एक सुंदर मुलगी भेटली. ती विमा एजेंट होती. तीन चार दिवसांत बोर केलं तिने. सतत त्याच गोष्टी करायची. शेवटी तिची संगत टाळावी म्हणून बाबू बिर्याणीच सोडली. वैताग होता तो. मेंदूवर पडली असावी असं वाटायचं, पण हुशार होती.

आयुष्य इतकं निरर्थक कधी झालं कळलच नाही. अनेक वर्षे बंद पडून असलेल्या जुनाट गाडीप्रमाणे किंवा वापरात नसलेल्या जुन्या पितळ्याच्या भांड्याप्रमाणे. कसल्यातरी काल्पनिक गजांनाड आयुष्य बंदिस्त झालं होतं. खूपच विचित्र वाटू लागल्यावर एका मानसोपचारतज्ञ व आध्यात्मिक गुरुलाही भेटलो. दोघांनी सांगितलं एकच, फक्त मार्ग वेगळे होते. मी निराशावादी होतो असं तात्पर्य निघालं होतं. असेलही खरं. पण आशावादी असण्यात तरी काय सार्थक होतं हे मला कळत नव्हतं. सतत कशाच्यातरी मागे धावत राहणं आणि काहीतरी खूप भारी असण्याचा दिखावा करणं म्हणजे आशावादी असणं असेल तर त्यातही काही अर्थ नाही. आशावादानंतरचा येणारा ठेहराव हा निराशावादापेक्षा घातक असतो असं वाटतं मला.

त्या गुरु व डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे सगळं मनशान्ती, योगा, ध्यान वगैरे केलं. बरं वाटत होतं, पण मेंदूतील सगळं द्रव्य शोषून घेतल्यासारखं वाटायचं. मेंदूला वळण लावणं म्हणजे समुद्राच्या लाटेला बांधून टाकण्यासारख झालं. मला फार दिवस ते जमलं नाही. किंबहुना मेंदूला ते पटलं नाही, म्हणून मग तो प्रकार बंद केला.

दिवस कामात निघून जायचा. मित्र चिकार होते, पण वेळेवर कोण कधी भेटायचा नाही. खूप अस्थिर वाटायचं. साले हे मित्र काय रसायन असतात हे कधी कळलच नाही. त्यांचं असणं आणि नसणं हे माझी त्यांच्या मनातील प्रतिमा अन मैत्रीची तात्कालिक परिस्थिती यावर अवलंबून असतं. आपण काथ्याकूट करून उपयोग नसतो. त्या मित्रापेक्षा शहरात राहणारे भावकीतील गोपीनाथ काका बरे होते. दर रविवारी न चुकता फोन करून हालचाल विचाराचे. कधी-कधी दारूही प्यायचो सोबत.

एकदा एक सिद्धी बाबा भेटले. त्यांनी माझ्या मरणाची तारीख सांगितली. अजून तेवीस वर्षानी मी मरणार असं ते सांगत होते. नेमकं कसं मरणार हे ते सांगू शकले नाहीत, पण मरणार हे नक्की होतं. म्हणजे अजून फक्त तेवीस वर्षे… अचानक वाटलं, काय काय करायचं राहून गेलं.? मुख्य म्हणजे लग्न राहिलं होतं. शरीरसुख एकदा उपभोगून झालं असल्याने त्याची कसली ओढ नव्हती, पण संसारसुख काय असतं ते उपभोगायचं होतं. ज्यासाठी मानव ही प्रजात ओळखली जाते त्या लग्नसंस्थेत नेमकं आहे तरी काय हे शोधणं गरजेचं होतं. बाकी कुठलेच प्राणी असे लग्न वगैरे करून राहत नाहीत; ही लग्नाची वगैरे व्यवस्था अनेक शतकांपासून अन युगांपासून सुरू आहे ती नेमकी कशासाठी हे उत्तर कधीच कोणी शोधलं नसेल का? हा प्रश्न मला पडायचा. सगळे मूर्खासारखे लग्न करणार, हनिमून करणार, पोरं जन्माला घालणार अन मरून जाणार… कशासाठी हा अट्टाहास? त्यात लग्नानंतर सुरुवातीची वर्षे बरी असतात म्हणे, नंतर निव्वळ वनवास असतो.. उगाच जगत जाणं असतं असं म्हणतात… भगवान बुद्ध हुशार होता. निवांत आयुष्य जगत होता. तसं जगलं पाहिजे असं वाटायचं. शहराबाहेर अॅनाची टेकडी म्हणून आहे. उगी तिथेच जाऊन राहावं असं वाटत होतं. उगाच भानगडी नको प्रपंचाच्या. पण मी असं काही केलं तर तिकडे गावाकडे म्हातारा-म्हातारी हाय खाऊन मरायची म्हणून शांत राहायचो.

मी जर आजपासून तेवीस वर्षानी मेलोच तर सगळं कठीण होणार होतं. ते गणित मला कठीण वाटत होतं. त्यावेळेस मी पन्नाशीचा असेन. आजपासून वर्षभराने जरी माझं लग्न झालं तरी मग हातात बावीस वर्षे राहतात. त्यात लग्नानंतर वर्षभराने मूल झालं, तेही भलती प्लॅनिंग नाही केली, तर ठीक नाहीतर कठीण. म्हणजे मी मरताना माझा पोरगा/पोरगी 18 ते 20 वर्षांचे म्हणजे कोवळेच असणार. च्यायला त्यांना असं उघड्यावर टाकून मी मरूच कसा शकतो याबद्दल मला स्वतःचा राग आला. मला लागलीच त्या बाबू बिर्याणीमध्ये भेटणार्‍या मुलीची आठवण झाली. तिच्याकडून खरच जीवन विमा काढायलाच हवा असं आता मला वाटत होतं. पुढच्या पिढीला पैसे अन सुरक्षितता सोडून देण्यासारखं काहीच नसतं. साला यासाठीच का देवाने माणूस बनवला असेल…?

जे ती सुंदर मुलगी पटवून देऊ शकली नाही ते त्या ओबडधोबड साधू बाबाने पटवून दिलं. परत बाबू बिर्याणी हाऊसवर जायच्या विचाराने मन आनंदित झालं. तिच्याशी परत सूत जुळवलं पाहिजे असा स्वार्थी विचार मनात आला. नंतर मग स्वतः किती व्यावहारिक आहेस असं स्वतःला शिव्या देण्यात बराच वेळ निघून गेला.

पृथ्वी, सूर्य, समुद्र वगैरे किती स्थिर असतात. पृथ्वीला तरी काही कसं वाटत नाही. करोडो वर्ष झाली, आहे त्या गतीने फिरतेय अन चालतेय त्याच वेगाने. इतका स्थिरपणा मानवी आयुष्यातही यावा असं विश्वाच्या निर्मात्याला अपेक्षित असेल तर कठीण आहे. हे असलं स्थिर आयुष्य काही मला पटत नाही. किमान पोलिसात तरी जॉब लागायला पाहिजे होता असं वाटत होतं. काहीतरी उपद्व्याप केले असते असं वाटलं. सध्याचा जॉब म्हणजे श्रीमंत पाहुण्याच्या घरी गेल्यावर बिनसाखरेचा चहा मिळाल्यावर होते तशी परिस्थिती; ना सांगता येतं न सोडता येतं.

Related image

आयुष्याचा गुंता भलताच अडकलेला होता. मन काही थार्‍यावर येत नव्हतं. कधीतरी गावाकडे जाऊन आलं की बरं वाटायचं. पण बॅटरी उतरल्यागत नंतर सगळं उतरून जायचं. एकटेपणा हाच आयुष्याला मारक होता की माणसांची गरज राहिली नसणं हे जास्त त्रासदायक होतं हे कळत नव्हतं. कोणाच्या असण्या-नसण्याने फरक पडत नाही म्हंटलं की आयुष्य फार उदार होतं. ऑफिसमध्ये होणारे भांडणं मला कधी कधी बरी वाटायची, कारण त्यात खूप खुलेपणा असायचा.

कधीतरी एखादी उल्का किंवा काहीतरी येऊन पृथ्वीवर आदळावं अन सगळं संपून जावं असं फार वाटायचा. सगळं क्षणात बेचिराख. अख्खी मानवजात संपुष्टात येईल. विश्वातील negativity पैकी बरीच कमी होईल. कूलर बंद केल्यावर inverter निश्वास सोडतं तसं पृथ्वी संपल्यावर विश्व निश्वास सोडेल असं वाटतं. पण जेंव्हा ईश्वर पुन्हा विश्वाची निर्मिती करेल तेंव्हा काही गोष्टी त्याने पाळाव्यात-टाळाव्यात असं मला वाटतं. हा मेंदू माणसाला देऊ नये. खूप उपकार होतील. इतर प्राण्यांप्रमाणे मानवही आरामात राहू लागेल. आजच्या पोटापुरता शिकार करायची, उद्याची चिंता नको अन काल केलेल्या चुकांचं दुखंही नको. खायचं, प्यायचं, बागडायाच, हवं तेंव्हा हवं तसं समागम करायचं अन मुक्त राहायचं अन मरून जायचं. कसल्या संस्कृती अन चौकटींचं ओझं नको. तोच जन्म सार्थकी लागला असं होईल.. बाकी सगळं झुठ म्हणता येईल…

हे असे विचार आले की मी स्वतःला वेडा समजायचो, पण ही theory सर्वात उच्च असही वाटायचं. मी कोणीतरी अत्यंत गूढ मनुष्य आहे असं माझं मलाच वाटायचं. देवाने मला सर्वांपेक्षा काहीतरी वेगळी विचारप्रक्रिया दिली आहे असं वाटायचं.

काय हुक्की आली माहीत नाही, एके दिवशी चेहर्‍यावरची दाढी अन मिशी उतरवली. अनेक वर्षांच्या नंतर मैदान मोकळं केलं होतं. मला बिना मिशा-दाढी बघणे हे कोणाला माहीतच नव्हतं. सगळे माझ्या तोंडाकडे बघून हसू लागले. अगदी मुलीही! मला त्यांचे हसरे चेहरे बघून आनंद वाटला. ते माझ्यामुळे हसत होते, माझ्यावर हसत होते. ती लोक माझी मस्करी करत होती अन मला बरं वाटत होतं, मला खूप समाधान वाटलं. मग मी तसं वारंवार करू लागलो. वेडे चाळे!!!! माझ्या विचित्र वागण्याने लोकांना हसवू लागलो. मला त्यात खूप समाधान वाटत होतं. मी तो मुखवटा चढवला. माझा जुनाट अन बेरंग चेहरा सोडून दिला अन ह्या रंगीबेरंगी मुखवट्यानिशी वावरू लागलो. लोकांनाही तो मुखवटा आवडू लागला. कितीही सच्चा असला तरी तो जुनाट अन थंड चहासारखा नेहमीचा चेहरा कोणालाच फारसा आवडत नव्हता, उलट माझा विदूषकी चेहरा लोकांना आवडू लागला.

मी ठरवून सर्कस बघायला गेलो. तो विदूषक स्वतः काहीतरी वेडेपणा करायचा, विदूषकी चाळे करायचा अन लोकांना हसवायचा. त्याच्या रंगीत अवतारावर लोक बेफाम होऊन हसायचे. त्याचा चेहरा काहीही असो, पण त्याने परिधान केलेला मुखवटा खूप प्रभावी होता. त्याच्या खर्‍या रूपात तो अप्रिय असेलही, पण हे मुखवटाधारी विदूषकी रूप अत्यंत प्रभावी अन आकर्षक होतं. काळ्या आभाळात इंद्रधनुष्य मस्त दिसायचं तसं होतं ते… मी तसे रंग किंवा मुखवटे माझ्या शरीराला जरी लावले नसले तरी मनाने ते मी अंगिकारले अन माझा ओळखीचा चेहरा सोडून तो मुखवटा म्हणूनच जगू लागलो… नवीन प्रवेश…  त्या मुखवट्याने माझ्या जगण्यात रंग भरला अन सार्‍या अस्थिर भावनांना निद्रिस्त केलं… माझा माझ्याशी संवाद झाला व मी मलाच उमगलो… हाच मुखवटा माझी ओळख बनला…

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

चेहरे आणि मुखवटे

मराठी कथा – e – book [Updated]

मराठी कथा – e – book [Updated]

मराठी कथा  ||  मराठी साहित्य  ||  कथासंग्रह  ||  मराठी ई-पुस्तक  ||  माझं लिखाण  || 

Marathi Stories  ||  Short Stories || Story Collection  ||  Marathi e-Book  

गेल्या वर्षी “मराठी कथा” नावाने e-book सुरू करायचा निर्णय घेतला त्यावेळेस फार उत्साह वाटत नव्हता. playstore वर अनेक दर्जेदार लिखानांची e-book असताना त्या गर्दीत आपलं हे पुस्तक कुठेतरी अडगळीतच राहील असं वाटत होतं. माझं जे काही तोडकं-मोडकं लिखाण आहे ते मी “मराठी कथा” या app मध्ये संग्रहीत करायचं असा निर्णय घेतला होता. वाचणारे कोणी असतील-नसतील पण आपली आवड म्हणून आपल्या कथा-लिखाण मी तेथे upload करत गेलो. सुरूवातीला फार प्रतिसाद नव्हता, कारण सुरूवातीला कथाही फार नव्हत्या, विविध शैलीच्या नव्हत्या त्यामुळे वाचक तेथे येत नसावा. पण हळूहळू कथांचा संग्रह वाढत गेला, विविध प्रकारच्या कथा मी जोडत गेलो अन वाचकांना त्या आवडू लागल्या. खासकरून “खिडकी” आणि “नरक्षी” आणि “एक अजनबी हसिना से..”  ह्या कथांना चांगला प्रतिसाद मिळाला. विविध ढंगाच्या कथा असणं किती महत्वाचं असतं याची जाणीव झाली.

     

कसल्याही प्रकारचं लिखाण असेल किंवा कसलीही कला-छंद असेल, तो स्वतःच्या आनंदासाठी आणि समाधानासाठी जोपासला जातो, पण त्याला जर वाहवा मिळाली तर त्या कलेप्रती उत्साह वाढतो. वाचकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया ह्या स्फूर्ती देणार्‍या ठरल्या. अनेकांनी सुधारणा सुचवल्या व त्रुटी दाखवल्या त्यांचा मंनापासून आभारी आहे, कारण त्यातून चुका होण्याचं प्रमाण कमी होत गेलं.

आज “मराठी कथा” मध्ये विविध प्रकारच्या तीसेक कथा आहेत. त्या नुकत्याच update केल्या आहेत. वेळ भेटेल तसं यात अजून भर टाकायची इच्छा आहेच. आज दीड हजार मोबाइल्स वर हे app install आहे, एकूण दहा हजार इंस्टॉल झालेले आहेत… हा आनंद खूप मोलाचा आहे… प्रत्येकाचे आभार…!

 

आजच आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करा… 

https://play.google.com/store/apps/details?id=com.latenight.somethingsamajik.MarathiKatha&hl=en

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

मराठी कथा – अभिषेक बुचके

दिशाभूल

दिशाभूल

मराठी कथा  ||  मराठी साहित्य  ||  स्वलेखण   || Marathi Stories   ||   विचारप्रवाह   ||  सामाजिक वगैरे  ||

कधी-कधी अनोळखी दिशा अवगत करताना दिशाभूल होते…

 

सकाळी दहा अकराची वेळ होती. रस्त्याला रोजप्रमाणे वरदळ सुरू होती. कामाला, शाळेला, कॉलेज ला जाणारे अशा लोकांनी गांधी चौक रोजप्रमाणे गजबजून गेला होता. ट्रॅफिक सिग्नलही नेहमीप्रमाणे बिघडलेलाच होता. चौकात चारी बाजूने केळा-फळाचे, कपड्यांचे वगैरे गाडे उभे राहत होते. सकाळची वेळ असल्याने सगळे आपआपल्या कामात गर्क होते.

ममद्या चहावाला सगळ्यांना सकाळचे चहा पोचवत होता.

आयुर्वेदिक औषधे, पाली-उंदीर मारणारे औषधे विकणारा मारुतीमामाही गिराईक मिळवण्यासाठी ओरडत होता. गेली दहा-बारा वर्षे तो ह्याच चौकात ओरडतो अन औषध विकतो. इथे असणार्‍या लोकांना याचा आवाज ऐकला नाही तर चुकल्यासारखं वाटायचं. ट्रॅफिक हवालदार अजून आलेले नव्हते. जुन्या पिंपळाच्या झाडाखाली मजूर काम मिळायच्या अपेक्षेने बसून होते.

सगळं रोजप्रमाणे न चुकता चालू होतं. गांधी बाबा बुद्धाप्रमाणे शांतपणे बसून हे सगळं बघत होते. गेली बावीस वर्षे ते हे बघत आले होते. त्या पिंपळाच्या झाडानंतर तेच येथे सर्वात जुने!

सगळं व्यवस्थित चालू असताना एक म्हातारा कुठूनतरी चालत आला अन थेट गांधी बाबाच्या चौथर्‍यासमोर जाऊन बसला. त्याचं कुठेच लक्ष नव्हतं. अंगात जुनं धोतर, पांढरा सदरा, डोक्यावर गांधी टोपी, गळ्यात निळा मफलर अन खांद्यावर एक पिशवी. बस! शरीर तसं बरं वाटत  होतं; म्हणजे भिकारी किंवा दारुडा वगैरे वाटत नव्हता तो. तो तसाच गांधीजींच्या पुतळ्यासमोर दोन्ही गुढगे जवळ करून बसला होता. त्याचं एकटक गांधी बाबाकडे बघणे चालू होतं. कदाचित नजरेने तो गांधी बाबाशी काहीतरी वार्तालाप करत असावा. तो गांधीबाबाचा पुतळा जास्त शांत का हा म्हातारा जास्त शांत असा प्रश्न विचारला असता तर उत्तर कठीण होतं. दोघांच्याही दृष्टीत एक समाधान अन प्रचंड शांतता होती.

गांधी बुद्ध आसनात होते तर हाही शांत तशाच कशातरी आसनात होता. ते जणू एकमेकांची सावलीच होते.

सुरूवातीला याच्याकडे कोण लक्ष देत नव्हतं पण थोड्या वेळाने दोन-चार लोक त्याच्याकडे उत्सुकतेने अन संशयाने पाहत होते म्हणून येणारे जाणारे सगळेच त्याच्याकडे बघून जात होते.

ममद्या अन मारुतीमामा यांची त्याच्यावर आल्यापासुन नजर होतीच. दुपारच्या निवांत वेळी ममद्या अन मारुतीमामा बोलत उभे होते. ममद्या म्हणाला, ये क्या नया चक्कर हई मारुतीमामा? कहां से आया ये बंदा और कर क्या रहा हई???

मारुतीमामा ओठ तिरपे करून म्हणाले, तू तो ऐसे पुछरेला जैसे मेरा सगा-सौतेला हो??

अरे नही भाई आप तो यहां के पुराणे बंदे हो, आपको कुछ मालूम तो होगा???

मारुतीमामा आश्चर्य व्यक्त करीत म्हणाले, नई रे, मेरको तो पताइच नई ये क्या होरेला हई? इतने बरस से खडा हूं लेकीन इसको पेली बार देखरा हूं.

ममद्या म्हणाला, जाणे दो फिर, कोई दुनिया ने सताया हुवा रहेगा, चला जाएगा शामतक.

सगळे आपापल्या कामात गुंतले होते पण तरीही येणार्‍या-जाणार्‍याचं त्या म्हातार्‍याकडे लक्ष होतंच होतं. दुपारच्या जेवणाच्या वेळेनंतर केंव्हातरी ट्रॅफिक हवालदार ‘ड्यूटि’ वर हजार झाले. आल्या-आल्या त्यांनी कोपर्‍यावरच्या टपरीवरून आपलं रोजचं पान घेतलं अन झाडाच्या कडेला जाऊन थांबले.

हवालदाराचं त्या म्हातार्‍याकडे लक्ष गेलं. ते सुरूवातीला गोंधळले. तेही असं दृश्य प्रथमच पाहत होते. त्यांनी त्या म्हातार्‍याकडे लक्ष देत काही वेळ ड्यूटि केली आणि न राहवून ते नंतर त्या म्हातार्‍याकडे जाऊ लागले. पण त्यांच्या डोक्यात काहीतरीच आलं की, हा गांधीवादी दिसतोय, कसल्या सत्याग्रहाला तर बसला नाही ना? आपण त्याला हटकायला जायचो अन आपलीच फजिती व्हायची ह्या हेतूने ते मागे वळले. त्यांनी माहितीगार माणसाकडून माहिती मिळवण्याची तसदी घेतली; मारुतीमामा!

हवालदार मामजवळ गेले.

मामा हसत म्हणाले, या साहेब काय औषध देऊ का?

हवालदार मघाशी चघळायला घेतलेलं पान गिळून म्हणाले, औषधाचं सोडा, त्या म्हातार्‍याचं काय? काय करतोय तो?

मामा जरा आश्चर्यचकित होऊन हसत म्हणाले, ममद्या पण मलाच विचारात होता. मी त्याला म्हणू शकत होतो की त्यो म्हातारा काय माझा पाहुणा की काय? पर तुम्हाला तसं म्हणून आम्हाला जग सोडायचं नाय.

हवालदार यांनी जोरदार हसून त्यावर दाद दिली अन म्हणाले, मामा तुम्ही इथले प्रथम नागरिक, तुम्हाला नाय तर त्या पिंपळाच्या झाडाला विचारवं का? आ? दोघेही हसले अन मूळ विषयावर आले.

मामा म्हणाले, काय भानगड आहे की गड्याची, सकाळपासना येऊन गप-गुमान बसलाय; काही बोलणं नाय की इकडे-तिकडे बघणं नाय. मामला जरा वेगळाच दिसतोय याचा. मगा एक ट्रक जोरात आवाज करत गेलं, माझे कान उभे राहिले इतक्या दूर असून पर तो म्हातारा काय जराबी टु-टा करना. लय विचित्र दिसतोय. हवालदार हं करत म्हणाले, अन गांधीला काय कोडी घालत असल की सकाळपासून? ते दोनीबी कोडीच आहेत, तुम्ही नका जाऊ नादाला, आयला कशाला भलती ब्याद. गप बसलाय तर बसुद्या उगाच बिथरला तर सांभाळतानी नाकेनऊ होईल. परेशान दिसतोय बेचारा. जाईल शांत झाला की. हवालदारही योग्य ते समजून चुकले होते. आपल्याकडून काही चूक नको म्हणून ठीक काम करत होते.

आता रात्र झाली होती. परतीच्या मार्गाला लागले होते सगळे जण. रस्त्यावरची रहदारी कमी होत होती. आजूबाजूचे गाडेवाले, दुकानदार घराकडे निघाले होते. सगळे जाता-जाता देवाचं दर्शन घेतात तसं त्या म्हातार्‍याला जवळ जाऊन निरखून परतत होते. आता फक्त हवालदार, मारूतीमामा अन ममद्या तिथे होते. तिघेही चहाचे घोट घशाखाली घालत त्या म्हातार्‍याकडे बघत चर्चा करत होते.

मारूतीमामा म्हणाले सकाळपासून त्याने काही खाल्लं-पिलं पण नाही. हवालदार म्हणे, खाणं-पिणा सोडा त्याने तर आपली नजरही हलवली नाही. काय कोडी घालतोय आपल्या गांधी बाबाला काय माहीत?

ममद्या पचकला, मला वाटतं खाना नही लेकीन कल पिना जरूर ज्यादा हुवा हई उसकू.

हवालदार त्याच्याकडे बघत म्हणाले, अये ममद्या कुछ भी मत बोल; कौन हई, क्या हई पता नही अपने को. कुछ उलटा-सिधा बोलते हुवे सून लिया किसिने तो लेने के देने पडेंगे!

मामा म्हणाले, बराबर हई रे भाई!!!

तिघांनी थोडा विचार केला अन शेवटी हवालदार म्हणाला, एक काम कर ममदे, सामनेसे चार वडापाव ले, एक गिलास भरके चाय और पानी उसके सामने सिर्फ रखकर आ… बाकी कुछ नही…

ममद्या मागे सरकत म्हणाला, मै नही जानेवाला वहां.. कुछ कर दिया उसने तो…

मामा म्हणे, अरे तो काई भूत आहे का तुला कै करायला… जा जाऊन ये उगा…

ममद्या म्हणाला, दिनभर हजार लोग सामने से गये, आपके पुलीस के लोग भी सिर्फ देखते हुवे गये लेकीन कोई पास नही गया… मै तो नही जानेवाला… आप जाओ…

हवालदार डोळे बारीक करत मामाकडे बघत म्हणाला, डरपोक है मामा वो… जाओ आप जाके आओ… मै हूं यहां…

मामाने उरावर घेतलं… ममद्याने यांच्या हातात सगळं आणून दिलं.. मामा हळूहळू चौथर्‍यावर गेले अन त्या म्हातार्‍याच्या जवळ जाऊन थांबले अन म्हणाले, हे घ्या पाहूणं, जरा पोटाला घ्या अन मग चालू राहू द्या तुमचं…

तो म्हातारा सावकाश मामाकडे बघत होता आणि फक्त हसला.. इकडे लांबून बघणार्‍या ममद्या अन हवालदाराला घाम फुटला… मामा स्मितहास्य करून परत फिरले… काही मिनिटांत त्या म्हातार्‍याने ते सगळं खाल्लं अन पिशवीतून एक शाल काढून तो तिथेच आडवा झाला… इकडे तिघांनी सुटकेचा निश्वास सोडला…

मामा शेखी मिरवत होते, बघा कुठे काय झालं, सगळं ठीक. चला घरी आपापल्या. हवालदार शांत झाले अन म्हणाले, आयला झेंडा वंदनलापण इतकी ड्यूटि नाय झाली आजवर… चला निघू… उद्या लवकर यावं लागल… म्हातारा गांधीवादी असला तर आपल्याला इथे कामात कसूर करता यायचा नाय. मामा म्हणाले, सकाळपर्यंत जातो तो आपल्या वाटेला.

सकाळी कामावर येताना सगळ्यांच्या डोक्यात कालचा तो म्हातारा होताच. तो तिथे असेल का? का गेला असेल? कोठे गेला असेल? कोठून आला असेल? वगैरे प्रश्न डोक्यात घोळत होते.

सकाळी ममद्या कामाला आला तेंव्हा तो अवाक झाला. तो म्हातारा तिथेच बसून होता. अगदी कालसारखा, गांधी बाबाकडे बघत. ममद्या ने त्याला सकाळी चहा दिला होता. तो त्याने स्मितहास्य करत घेतला होता. बोलला मात्र एक शब्दही नाही. तोही गांधी बाबाच्या एखाद्या पुतळ्यासारखाच होता. निशब्द, शांत, समाधानी अन निर्जीव!

मारूतीमामा आज रोजपेक्षा जरा लवकर आले होते. हवालदार साडेनऊच्या ठोक्याला हजर होते. आल्या-आल्या त्यांनी त्या म्हातार्‍याकडे दृष्टिक्षेप टाकला. तिघे पुन्हा जमा झाले. चर्चा सुरू झाल्या. सकाळपासून हा म्हातारा इथेच आहे का असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी सकाळी सहापासून दहापर्यंत इडलीचा धंदा करणार्‍या कोट्या ला बोलावलं.

कोट्याने त्यांना सांगितलं की तेवढं लक्ष नव्हतं पण आडोशाला जाऊन येताना बघितलं त्याला. तिघांना जरा बरं वाटलं.

हवालदार म्हणाले, नशीब जागेवर आहे म्हणा दिमाग अजून; कुठे कधी काय करायचं ध्यानात आहे म्हणायचं, नाहीतर सगळं गांधी बाबासमोर उरकलं असतं.

मारूतीमामा म्हणाले, आता ह्यो काही इतून हालत नाही बघा; याची माती इथेच होणार अन आपल्यालाच त्याची शेवटची माती करावी लागणार.

हे ऐकून ममद्या अन हवालदार जरा कष्टी झाले अन हळहळले.

हवालदार म्हणाले, ते ठीक हो, पर गांधी बाबासमोर काहून बसलाय ते कोडं हाय.

ममद्या म्हणाला, इसको प्यार से सब पुछकर लेना पडेगा| कहां से तो आया होगा, कुछ तो होगा|

मारूतीमामा म्हणाले, हं पण आपल्या गावचा नाई हे नक्की. सगळं गाव ओळखतो मी, हे पाणी इतलं नाहीच.

ममद्या म्हणाला, सुबे में चाय देकर आया था अब खाना देना पडेगा|

मारूतीमामा हो म्हणाले.

हवालदार म्हणाले, तुम्ही तर किती लोकांना फुकट पोसणार. चुकून स्वतःवर पडलेला टोमणा ममद्या अन मारूतीमामाला हसवून गेला.

मारूतीमामा म्हणाले, एवडा आठवडा देऊ सकाळ-संध्याकाळ उरलं-सुरलं आणि मग बगु; मी पण एक आयुर्वेदिक टाकतो त्याच्या खाण्यात, जरा मेंदू बरा होईल गड्याचा!

हवालदार हातावर हात मारत म्हणाले, हो बसुद्या कायमचा इथं पर गांधी बाबासमोर कशाला? उगा भलती आफत यायची. लोक याला गांधीचा अवतार म्हणायला कमी करणार नाहीत अन याचा रंग-रूप बी तसाच आहे.

दुपारी त्या म्हातार्‍याने नवीनच कार्यक्रम सुरू केला. गांधीबाबाच्या आजूबाजूचा परिसर तो स्वतः साफ करू लागला. तो चौथरा त्याने एकदम चकाचक केला. जवळच्या मफलरने गांधीबाबाला स्वच्छ केलं. दूरवर उभे असलेले मारूतीमामा, ममद्या अन हवालदार एकमेकांकडे खून करून काहीतरी बोलू लागले. हवालदारने कपाळावर हात मारून घेतला.

संध्याकाळ आली अन एक पोलीसाची गाडी चौकात थांबली. त्यात बसलेल्या पोलिसाने हवालदारला हात केला. हवालदार जवळ गेला. पोलिसांनी त्या म्हातार्‍या माणसाची भानगड काय ते हवालदारला विचारले.

हवालदारने स्वतःच गोंधळात असल्याचं सांगितलं. पोलिसाने सांगितलं की हाकला त्या म्हातार्‍याला तिथून, उगाच काही करून ठेवलं तर गांधीबाबाची विटंबना झाली म्हणून नवीन धिंगाणा होईल.

हवालदाराने स्पष्ट केलं की हा माथेफिरु तर दिसत नाही, उलट याने आज सगळी स्वच्छता केली. हा गांधीभक्त दिसतोय, जरा पीडलेला असावा, आपण हटकायला गेलो तर उपोषणाला वगैरे बसेल अन मामला बिघडेल. त्यापेक्षा यावर लक्ष ठेऊ काही दिवस.

पोलिसांनी विचारलं की काही हार्मलेस तर नाही न?

हवालदार म्हणाले, समाजासाठी तर वाटत नाही पण व्यवस्थेसाठी सांगता येत नाही. पोलिस अधिकारी हवालदाराकडे एकटक बघत होते. शेवटी ते ठीक आहे म्हणून निघाले अन आज्ञा सोडली की दिवसभर यावर तुम्ही लक्ष ठेवा, रात्रीचं कोणालातरी ठेवतो.

दोन-चार दिवस निघून गेले.

म्हातारा काही तिथून हालत नव्हता. सुरूवातीला त्याच्याकडे लक्ष देऊन बघणारे आता जरा दुर्लक्ष करीत होते. नव्याचे नऊ दिवस असतात. घरात एखादी वस्तु नवीन आली की वारंवार तिकडे लक्ष जातं अन हळूहळू ते कमी होत जातं.

आता म्हातार्‍याकडे अनेकांचं लक्ष जरा कमी झालं होतं. सगळ्यांना तो निरुपद्रवी अन निरर्थक वाटत होता. सकाळी येणारा इडलीवाला दोन इडल्या त्याला टाकून यायचा. एका फळवाल्याने एका खोक्यात चार फळे रात्री घरी जाताना ठेवली होती. ज्याला जे वाटेल ते त्या खोक्यात ठेवायचा. म्हाताराही हुशार होता, लागेल ते घ्यायचा अन बाकीचं शिस्तीत कचराकुंडीत ठेवायचा. सगळ्याकडे बघून हसणं एवढच त्याला माहीत होतं; बाकी दिवसभर गांधीबाबाची सावली असल्याप्रमाणे तो बसून असायचा. आजूबाजूचा परिसर राखणे ही त्याने स्वतःवर घेतलेली जबाबदारी होती. महिन्यातून एकदा गांधीबाबाच्या जागेची देखरेख करणार्‍या माणसाचं काम सध्या वाचलं होतं. एकदोघांनी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला होता आपण तो फक्त हसतमुख त्यांच्याकडे बघायचा. लोकांना वाटलं मुका वगैरे असेल, पण हातवारेही करायचा नाही. वेगळं प्रकरण म्हणून सगळ्यांनी ते वेगळं केलं होतं.

एका दुपारी हवालदार, मारूतीमामा अन ममद्या बसले होते. बोलता-बोलता चर्चेचा विषय निघाला म्हातार्‍याचा.

मारूतीमामा म्हणाले, मी म्हणालो होतो की ह्याची माती आपल्यालाच करावी लागल; ह्यो आता कुठं जात नाही.

ममद्या म्हणाला, और कितने दिन पोसेंगे?? ये बोलता भी नही कुछ?

मारूतीमामा म्हणाले, त्यो थोडीच म्हणतो मला पोसा, त्यानं तर कायपण मागितलं नव्हतं, आपण दिलदार झालो की… बघेल त्याचं त्यो.

हवालदार गंभीर होत म्हणाले, आयुष्यात इतक्या प्रामाणिकपणे ड्यूटि गेल्या दहा दिवसांत झाली. रात्री लक्ष ठेवणारा हवालदारबी आता कंटाळला. थंडी आफाट पडतीय म्हणून तोपण थांबेना रात्री. साहेबांनी याला हार्मलेस म्हंटलं. जाऊ द्या. आसल कोनतरी अन जाईल कुठतरी. वेड्यांचा राजा आहे हे मात्र खरं. उगा पडलाय इथं येऊन.

एका दिवशी सकाळी मारूतीमामा कामावर येत होते अन दुरून त्यांना गर्दी दिसली. मामा जरा जाऊन बघतात तर काय त्यांची वाचाच बसली. पोलिस लोकांचा कसलातरी तपास सुरू होता, लोकांची, आजूबाजूच्या व्यापार्‍यांची गर्दी जमली होती, सगळीकडे आश्चर्याचं वातावरण होतं. गांधीबाबाची सावली वाटणारा तो म्हातारा गांधीबाबालाच घेऊन गायब झाला होता. अवघ्या वीस दिवसांत. सगळीकडे धिंगाणा चालू होता. हवालदारसाहेब कपाळाला हात लाऊन बाजूला बसले होते, ममद्या सगळ्यांना त्या म्हातार्‍याच्या गोष्टी सांगण्यात व्यस्त होता. पत्रकार, राजकीय-सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौकशी चालू होती, विचारपूस चालू होती पण त्या म्हातार्‍याचा कसलाच सुगावा लागत नव्हता. चेहरापट्टी सोडली तर त्याबद्दल कोणीच काही सांगू शकत नव्हतं.

गावातील एका जेष्ठ अन जाणकार व्यक्तीकडून समजलं की चोरीला गेलेली गांधीजींची ती लहान मूर्ति दुर्मिळ अशा धातुपासून बनवून घेतलेली होती. एका मोठ्या मूर्तिकाराने अतिशय रेखीव अशी ती मूर्ती घडवली होती. सुंदर मूर्तीचं मोल बरंच असल्याचं समोर येत होतं.

एका रात्रीतून त्या म्हातार्‍याने गांधीबाबाला गायब केलं होतं. थंडीची चिडिचूप शांतता असताना त्याने गांधीबाबासोबत प्रयाण केलं होतं. एखादा माणूस चालत जाताना सोबत त्याची सावली आपोआप चालत जाते तसं स्वतः निघून जाताना त्याने गांधीबाबाला सोबत घेतलं होतं. इतके दिवस गांधीबाबाकडे एकटक बघत बसणारा असं का करेल हे कोणालाच उमजत नव्हतं. तो म्हातारा येथे डाव साधण्यासाठीच आला होता असा अनेकांचा समाज झाला होता. अगदी पद्धतशीरपणे, इतरांना आपल्यावर संशय येऊ देऊनही त्याने असं केलं याचं आश्चर्य होतं.

मारूतीमामा हवालदारच्या बाजूला येऊन बसले होते. काय बोलावं दोघांनाही समजत नव्हतं. अंदाज व्यक्त करून दोघेही मोकळे झाले होते. त्यांची काही चूक नसली तरी त्यांना चुकल्यासारखं वाटत होतं. शेवटी मारूतीमामा म्हणाले, आपल्याला त्याची माती करायची संधि चुकली तरी त्याने आपली किम्मत मातीमोल केली. हवालदार हसत म्हणाले, उद्यापासून ड्यूटि पहिलेसारखी!

चौथरा आज रिकामा दिसत होता, नेहमीपेक्षा जरा जास्तच सुरेख अन स्वच्छ! आज त्यावर शांत मुद्रेचे गांधी नव्हते. सगळीकडे समाधानी दृष्टीने पहाणारे गांधी आज नव्हते. काही दिवस लोकांना चुकल्यासारखं वाटणार होतं. नवीन वस्तु आल्यावर त्याकडे जरा जास्त लक्ष जातं त्याप्रमाणे जुनी वस्तु गेल्यावरही काही दिवस त्याची आठवण येत असते. काही दिवसांनी सगळं सामान्य-साधारण; पाऊस पडून गेल्यावर होतं तसं!

चौथरा काही दिवस रिकामाच राहिला. काही दिवसांनी परत एक गांधीबाबा येऊन बसले. ते पहिल्यासारखे बुद्धासारखे शांत बसलेले, समाधानी नव्हते; जरा वेगळेच होते. काही दिवस अनोळखी वाटले. त्यांच्याभोवती आता पिंजरा होता.

म्हातारा काही सापडला नव्हता. गांधीबाबाचीही काही खबर नव्हती. त्यांना सोबत का नेलं?कुठे नेलं? वगैरे प्रश्न अनुत्तरितच होते.

अनेकांची दिशा चुकली होती.

===समाप्त===

कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत. कथा कुठेही वापरण्यापूर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

Copyrights @ Author Abhishek Buchake

सहकारी माध्यम – latenightedition.in ||  @Late_Night1991

MORE STORIES… अजून काही कथा…

एक अजनबी…

error: Content is protected !!