Tag: माझंमत

आ गए मेरी मौत का तमाशा देखने…

आ गए मेरी मौत का तमाशा देखने…

अहमदनगरचं हत्याकांड  ||  कायदा व सुव्यवस्था  ||  लोकशाहीची विटंबना  ||   भयभीत जनता  ||
#अहमदनगर मध्ये जे #हत्याकांड झालं ते चीड आणणारं आणि स्तब्ध करणारं आहे। पण त्यानंतर जे घडलं ते तर भीषण आहे। यावर सामान्य माणूस म्हणून काय प्रतिक्रिया व्यक्त करावी तेच कळत नाही। आज सोशल मीडिया, टीव्ही अन इतर ठिकाणाहून जे सत्य परिस्थिती समजते आहे ती भयंकर आहे।
👇👇👇
जनता किती कमकुवत अन मूर्ख असते याची पदोपदी जाणीव होत असते। आपण काय लोकांना निवडून देतो याचं भान आपल्याला तरी आहे का असा प्रश्न पडतो। कुठलीतरी गुंड लोक्स वर्षानुवर्षे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात हा आपलाच दोष असेल।
👇👇👇
#राजकारण किंवा #राजकारणी वाईट नसतात हे कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी असल्या घटना त्यावर माती टाकतात।
आपण निव्वळ माझ्या जातीचा, माझ्या धर्माचा, माझ्या पक्षाचा, डॅशिंग, ऐकून घेणारा वगैरे वगैरे म्हणून निव्वळ #गावगुंडांना निवडून देतो।
👇👇👇
आज भले आपण त्यांना शिव्या देऊ, गुंड म्हणू पण उद्या परत त्यांनाच मते देणार हे त्यांनाही माहिती असतं। लोकप्रतिनिधी झाल्यावर हा माज तेथूनच येतो। मूठभर जातीची मतं अन मूठभर पैशांची मतं घेऊन हे कफल्लक लोक्स पुन्हा पुन्हा कायद्यावर उघडपणे बलात्कार करत असतात।
👇👇👇
राजकीय कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या अन पोलीस स्टेशन फोडणे ही खरं तर सामान्य जणांना धमकी असते की जिथे पोलिस आम्हाला रोखू शकत नाहीत तिथे तुम्ही काय करणार। अशी गुंडगिरी सगळीकडे व सगळ्याच पक्षातील लोकांकडून होत असते।
👇👇👇
चार चांगल्या नेत्यांकडे बघून आपण राजकारणत मत देत असतो अन सकारात्मक विचार करत असतो आणि तेही राजकारणी अशा दबाव गटासमोर हतबल दिसतात। पण तेही दोषीच म्हणावे लागतील। द्रौपदी वस्त्रहरण होत असताना हतबल असलेल्या भीष्मालाही धर्माने शासन केलं होतं। तुमचंही तेच होणार।
👇👇👇
त्या मूठभर चांगल्या लोकांचं मौन हेच लोकशाही व्यवस्था व समाजाला घातक आहे।
उद्या ही गुंड लोकं सामान्य जनतेवर अन्याय करू लागली तर कोणाकडेच न्याय मागून उपयोग नसल्याचे पायंडे घातले जात आहेत।
👇👇👇
नेत्यांसमोर हात जोडून उभी राहणारी लाचार जनता काय क्रांती घडवणार अन कसला न्याय मिळवणार? दोषी जाहीर होऊन सुद्धा दिवसभरात जामिनावर सुटणारे अमिरजादे या डोळ्यांनी बघितल्यावर दुसरी काय भावना असणार म्हणा। उगीचच स्वतःला समाधान वाटेल अन स्वतःचा षंढपणा झाकता यावा म्हणून काही नाटकं!
👇👇👇
सगळ्यांना सत्ता देऊन पाहिली! सगळे युगपुरुष म्हणवून घेणारे नेते बघितले। लाखोंच्या सभा अन देशभर गाजलेली आंदोलनं अन क्रांतीचा जागर पाहिला। पण सगळा कारभार शून्य! चार दिवसांत सगळं गारेगार!
👇👇👇
पत्रकारांची तर बातच न्यारी असते। कधी उभे राहतील अन कधी गायब होतील याचा नेम नाही। त्याच माध्यम संपादकांचे हतबलतेचे ट्विट्स ही इथेच पाहिले। कारण तेही त्या खुर्चीवरून उठल्यावर सामान्यच असतात!
👇👇👇
कालची घटना फक्त उदाहरण आहे की लोकांचा विश्वास उठवायला अन भय निर्माण व्हायला। कारण डर के आगे जीत है हे फक्त म्हणायला सोपं असतं। उद्या आपल्यातील सामान्य लोकांना याचा अनुभव आला तेंव्हा याची दाहकता समजेल!
👇👇👇
तो #क्रांतिवीर चित्रपटातील नाना पाटेकरच बरा, जो स्वतःच्या अंगावर येइपर्यंत खिदळत असतो अन खाटेवर बसून मिसळ खात बसतो। पण नंतर तोच हत्यार उचलतो अन भय संपवतो! तेंव्हाही “आ गए मेरी मौत का तमाशा देखने…” असं म्हणून गप्प राहायचं!
अभिषेक बुचके  ।।  @Late_Night1991   ।।  latenightedition.in

चेहरे आणि मुखवटे

चेहरे आणि मुखवटे

मुखवट्यामागील चेहरा  ||  रंग-बेरंग  ||  गोंधळलेलं मन ||  काल्पनिक कथा

काहीच अर्थ नव्हता. आयुष्य नुसतं बेरंग अन बेचव झालं होतं. सगळा रस निघून जावा अन चोथा उरावा तसं वाटत होतं. एका लयीत चालू होतं आयुष्य. मृत मानसाच्या हार्टबीट सारखा. सरळ रेष अन एकसंध आवाज. तेच ते रोजचं. उठा… कामाला जा… तिथे त्याच कटकटी… मित्रांसोबत तेच ते जोक… परत रूमवर या… त्याच मेसवर जा, त्याच त्या भाज्या खा… झोपताना youtube वर गाणे… कधीतरी हस्तमैथुन करा… झोपा.. परत उठा… परत तेच… वर्तुळात अडकल्याप्रमाणे… छा.. काहीच मजा राहिली नाही जगण्यात. स्वतःच्या स्वतःत गुरफटून राहिलेलं आयुष्य म्हणजे निव्वळ कारावास.

तिकडे गावाकडे चार एकर शेतीपायी आई-बाप अडकून पडलेले. भाऊ त्याचा-त्याचा वेगळा राहतो. म्हातार्‍या-म्हातारीला म्हंटलं, ती जमीन विकून या इकडं. निदान सोबत राहता येईल. पण ऐकत नाहीत. गावकी अन भावकी काही सोडत नाहीत. असंही मरायला इथे आले तरी राहायला जागा कुठेय म्हणा. निव्वळ अडचणीत राहावं लागेल मग. म्हणूनच मीही कधी जास्त जोर देऊन त्यांना कधी बोलवून घेत नाही.

सगळा कोंडमारा झाला आहे. महिन्याच्या सुरूवातीला कॅलेंडर बघायचा अन लागून आलेल्या सुट्ट्याला गावी जाऊन यायचं. तिथे तरी काय वेगळं असतं म्हणा. राहतो कसा, कमावतो किती, खातो काय अन लग्न कधी करणार याच्या पलीकडे गावात काही चर्चा होतच नसते. वैताग येतो त्या गोष्टींचा. आगितून फोफाट्यात.

ही नोकरी तरी काय वैताग आहे साला. त्या आकड्यांच्या गर्दीत जीव नकोसा होतो. कधीतरी बाहेरगावी जावं लागतं तोच काय तो विरंगुळा. पण आयुष्यात काही थ्रिल राहिलाच नाही. ते कॉलेजचे दिवस तरी बरे होते म्हणायची वेळ आलीय. तिथेही न्युंनगंडातच अडकलो होतो म्हणा, पण चिंता अन शुष्क प्रेमाच्या रंगाने माखल्या गेलो होतो. हल्ली आयुष्य इतकं बेरंग झालय की बेरंगाचा रंग लागलाय. कसली मजाच राहिली नाही. नाही म्हणायला एक मुलगी आली होती आयुष्यात, पण भेटीच्या दुसर्‍या आठवड्यात ती स्वतः फिजिकल झाली अन तिसर्‍या आठवड्यात सोडून गेली. काही दिवस मानसिक बलात्कार झाल्यासारख वाटत होतं, पण शारीरिक पातळीवर एक परिपूर्ण जाणतेपणा आला होता. स्त्रीसुख वेगळीच अनुभूती असते. कदाचित त्यामुळेच नंतर हस्तमैथुन करायची सवयच झाली. अशाही मुली असतात याचं आश्चर्य वाटत होतं. तिला काय हवं होतं याचा विचार सारखा मनात येत असतो.

अजून एक मुलगी आयुष्यात आलेली. नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे रविवारी बाबू बिर्याणीवाल्याकडे जायचो तिथे एक सुंदर मुलगी भेटली. ती विमा एजेंट होती. तीन चार दिवसांत बोर केलं तिने. सतत त्याच गोष्टी करायची. शेवटी तिची संगत टाळावी म्हणून बाबू बिर्याणीच सोडली. वैताग होता तो. मेंदूवर पडली असावी असं वाटायचं, पण हुशार होती.

आयुष्य इतकं निरर्थक कधी झालं कळलच नाही. अनेक वर्षे बंद पडून असलेल्या जुनाट गाडीप्रमाणे किंवा वापरात नसलेल्या जुन्या पितळ्याच्या भांड्याप्रमाणे. कसल्यातरी काल्पनिक गजांनाड आयुष्य बंदिस्त झालं होतं. खूपच विचित्र वाटू लागल्यावर एका मानसोपचारतज्ञ व आध्यात्मिक गुरुलाही भेटलो. दोघांनी सांगितलं एकच, फक्त मार्ग वेगळे होते. मी निराशावादी होतो असं तात्पर्य निघालं होतं. असेलही खरं. पण आशावादी असण्यात तरी काय सार्थक होतं हे मला कळत नव्हतं. सतत कशाच्यातरी मागे धावत राहणं आणि काहीतरी खूप भारी असण्याचा दिखावा करणं म्हणजे आशावादी असणं असेल तर त्यातही काही अर्थ नाही. आशावादानंतरचा येणारा ठेहराव हा निराशावादापेक्षा घातक असतो असं वाटतं मला.

त्या गुरु व डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे सगळं मनशान्ती, योगा, ध्यान वगैरे केलं. बरं वाटत होतं, पण मेंदूतील सगळं द्रव्य शोषून घेतल्यासारखं वाटायचं. मेंदूला वळण लावणं म्हणजे समुद्राच्या लाटेला बांधून टाकण्यासारख झालं. मला फार दिवस ते जमलं नाही. किंबहुना मेंदूला ते पटलं नाही, म्हणून मग तो प्रकार बंद केला.

दिवस कामात निघून जायचा. मित्र चिकार होते, पण वेळेवर कोण कधी भेटायचा नाही. खूप अस्थिर वाटायचं. साले हे मित्र काय रसायन असतात हे कधी कळलच नाही. त्यांचं असणं आणि नसणं हे माझी त्यांच्या मनातील प्रतिमा अन मैत्रीची तात्कालिक परिस्थिती यावर अवलंबून असतं. आपण काथ्याकूट करून उपयोग नसतो. त्या मित्रापेक्षा शहरात राहणारे भावकीतील गोपीनाथ काका बरे होते. दर रविवारी न चुकता फोन करून हालचाल विचाराचे. कधी-कधी दारूही प्यायचो सोबत.

एकदा एक सिद्धी बाबा भेटले. त्यांनी माझ्या मरणाची तारीख सांगितली. अजून तेवीस वर्षानी मी मरणार असं ते सांगत होते. नेमकं कसं मरणार हे ते सांगू शकले नाहीत, पण मरणार हे नक्की होतं. म्हणजे अजून फक्त तेवीस वर्षे… अचानक वाटलं, काय काय करायचं राहून गेलं.? मुख्य म्हणजे लग्न राहिलं होतं. शरीरसुख एकदा उपभोगून झालं असल्याने त्याची कसली ओढ नव्हती, पण संसारसुख काय असतं ते उपभोगायचं होतं. ज्यासाठी मानव ही प्रजात ओळखली जाते त्या लग्नसंस्थेत नेमकं आहे तरी काय हे शोधणं गरजेचं होतं. बाकी कुठलेच प्राणी असे लग्न वगैरे करून राहत नाहीत; ही लग्नाची वगैरे व्यवस्था अनेक शतकांपासून अन युगांपासून सुरू आहे ती नेमकी कशासाठी हे उत्तर कधीच कोणी शोधलं नसेल का? हा प्रश्न मला पडायचा. सगळे मूर्खासारखे लग्न करणार, हनिमून करणार, पोरं जन्माला घालणार अन मरून जाणार… कशासाठी हा अट्टाहास? त्यात लग्नानंतर सुरुवातीची वर्षे बरी असतात म्हणे, नंतर निव्वळ वनवास असतो.. उगाच जगत जाणं असतं असं म्हणतात… भगवान बुद्ध हुशार होता. निवांत आयुष्य जगत होता. तसं जगलं पाहिजे असं वाटायचं. शहराबाहेर अॅनाची टेकडी म्हणून आहे. उगी तिथेच जाऊन राहावं असं वाटत होतं. उगाच भानगडी नको प्रपंचाच्या. पण मी असं काही केलं तर तिकडे गावाकडे म्हातारा-म्हातारी हाय खाऊन मरायची म्हणून शांत राहायचो.

मी जर आजपासून तेवीस वर्षानी मेलोच तर सगळं कठीण होणार होतं. ते गणित मला कठीण वाटत होतं. त्यावेळेस मी पन्नाशीचा असेन. आजपासून वर्षभराने जरी माझं लग्न झालं तरी मग हातात बावीस वर्षे राहतात. त्यात लग्नानंतर वर्षभराने मूल झालं, तेही भलती प्लॅनिंग नाही केली, तर ठीक नाहीतर कठीण. म्हणजे मी मरताना माझा पोरगा/पोरगी 18 ते 20 वर्षांचे म्हणजे कोवळेच असणार. च्यायला त्यांना असं उघड्यावर टाकून मी मरूच कसा शकतो याबद्दल मला स्वतःचा राग आला. मला लागलीच त्या बाबू बिर्याणीमध्ये भेटणार्‍या मुलीची आठवण झाली. तिच्याकडून खरच जीवन विमा काढायलाच हवा असं आता मला वाटत होतं. पुढच्या पिढीला पैसे अन सुरक्षितता सोडून देण्यासारखं काहीच नसतं. साला यासाठीच का देवाने माणूस बनवला असेल…?

जे ती सुंदर मुलगी पटवून देऊ शकली नाही ते त्या ओबडधोबड साधू बाबाने पटवून दिलं. परत बाबू बिर्याणी हाऊसवर जायच्या विचाराने मन आनंदित झालं. तिच्याशी परत सूत जुळवलं पाहिजे असा स्वार्थी विचार मनात आला. नंतर मग स्वतः किती व्यावहारिक आहेस असं स्वतःला शिव्या देण्यात बराच वेळ निघून गेला.

पृथ्वी, सूर्य, समुद्र वगैरे किती स्थिर असतात. पृथ्वीला तरी काही कसं वाटत नाही. करोडो वर्ष झाली, आहे त्या गतीने फिरतेय अन चालतेय त्याच वेगाने. इतका स्थिरपणा मानवी आयुष्यातही यावा असं विश्वाच्या निर्मात्याला अपेक्षित असेल तर कठीण आहे. हे असलं स्थिर आयुष्य काही मला पटत नाही. किमान पोलिसात तरी जॉब लागायला पाहिजे होता असं वाटत होतं. काहीतरी उपद्व्याप केले असते असं वाटलं. सध्याचा जॉब म्हणजे श्रीमंत पाहुण्याच्या घरी गेल्यावर बिनसाखरेचा चहा मिळाल्यावर होते तशी परिस्थिती; ना सांगता येतं न सोडता येतं.

Related image

आयुष्याचा गुंता भलताच अडकलेला होता. मन काही थार्‍यावर येत नव्हतं. कधीतरी गावाकडे जाऊन आलं की बरं वाटायचं. पण बॅटरी उतरल्यागत नंतर सगळं उतरून जायचं. एकटेपणा हाच आयुष्याला मारक होता की माणसांची गरज राहिली नसणं हे जास्त त्रासदायक होतं हे कळत नव्हतं. कोणाच्या असण्या-नसण्याने फरक पडत नाही म्हंटलं की आयुष्य फार उदार होतं. ऑफिसमध्ये होणारे भांडणं मला कधी कधी बरी वाटायची, कारण त्यात खूप खुलेपणा असायचा.

कधीतरी एखादी उल्का किंवा काहीतरी येऊन पृथ्वीवर आदळावं अन सगळं संपून जावं असं फार वाटायचा. सगळं क्षणात बेचिराख. अख्खी मानवजात संपुष्टात येईल. विश्वातील negativity पैकी बरीच कमी होईल. कूलर बंद केल्यावर inverter निश्वास सोडतं तसं पृथ्वी संपल्यावर विश्व निश्वास सोडेल असं वाटतं. पण जेंव्हा ईश्वर पुन्हा विश्वाची निर्मिती करेल तेंव्हा काही गोष्टी त्याने पाळाव्यात-टाळाव्यात असं मला वाटतं. हा मेंदू माणसाला देऊ नये. खूप उपकार होतील. इतर प्राण्यांप्रमाणे मानवही आरामात राहू लागेल. आजच्या पोटापुरता शिकार करायची, उद्याची चिंता नको अन काल केलेल्या चुकांचं दुखंही नको. खायचं, प्यायचं, बागडायाच, हवं तेंव्हा हवं तसं समागम करायचं अन मुक्त राहायचं अन मरून जायचं. कसल्या संस्कृती अन चौकटींचं ओझं नको. तोच जन्म सार्थकी लागला असं होईल.. बाकी सगळं झुठ म्हणता येईल…

हे असे विचार आले की मी स्वतःला वेडा समजायचो, पण ही theory सर्वात उच्च असही वाटायचं. मी कोणीतरी अत्यंत गूढ मनुष्य आहे असं माझं मलाच वाटायचं. देवाने मला सर्वांपेक्षा काहीतरी वेगळी विचारप्रक्रिया दिली आहे असं वाटायचं.

काय हुक्की आली माहीत नाही, एके दिवशी चेहर्‍यावरची दाढी अन मिशी उतरवली. अनेक वर्षांच्या नंतर मैदान मोकळं केलं होतं. मला बिना मिशा-दाढी बघणे हे कोणाला माहीतच नव्हतं. सगळे माझ्या तोंडाकडे बघून हसू लागले. अगदी मुलीही! मला त्यांचे हसरे चेहरे बघून आनंद वाटला. ते माझ्यामुळे हसत होते, माझ्यावर हसत होते. ती लोक माझी मस्करी करत होती अन मला बरं वाटत होतं, मला खूप समाधान वाटलं. मग मी तसं वारंवार करू लागलो. वेडे चाळे!!!! माझ्या विचित्र वागण्याने लोकांना हसवू लागलो. मला त्यात खूप समाधान वाटत होतं. मी तो मुखवटा चढवला. माझा जुनाट अन बेरंग चेहरा सोडून दिला अन ह्या रंगीबेरंगी मुखवट्यानिशी वावरू लागलो. लोकांनाही तो मुखवटा आवडू लागला. कितीही सच्चा असला तरी तो जुनाट अन थंड चहासारखा नेहमीचा चेहरा कोणालाच फारसा आवडत नव्हता, उलट माझा विदूषकी चेहरा लोकांना आवडू लागला.

मी ठरवून सर्कस बघायला गेलो. तो विदूषक स्वतः काहीतरी वेडेपणा करायचा, विदूषकी चाळे करायचा अन लोकांना हसवायचा. त्याच्या रंगीत अवतारावर लोक बेफाम होऊन हसायचे. त्याचा चेहरा काहीही असो, पण त्याने परिधान केलेला मुखवटा खूप प्रभावी होता. त्याच्या खर्‍या रूपात तो अप्रिय असेलही, पण हे मुखवटाधारी विदूषकी रूप अत्यंत प्रभावी अन आकर्षक होतं. काळ्या आभाळात इंद्रधनुष्य मस्त दिसायचं तसं होतं ते… मी तसे रंग किंवा मुखवटे माझ्या शरीराला जरी लावले नसले तरी मनाने ते मी अंगिकारले अन माझा ओळखीचा चेहरा सोडून तो मुखवटा म्हणूनच जगू लागलो… नवीन प्रवेश…  त्या मुखवट्याने माझ्या जगण्यात रंग भरला अन सार्‍या अस्थिर भावनांना निद्रिस्त केलं… माझा माझ्याशी संवाद झाला व मी मलाच उमगलो… हाच मुखवटा माझी ओळख बनला…

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

चेहरे आणि मुखवटे

चेहरे आणि मुखवटे

चेहरे आणि मुखवटे

मी कोण ?   माझी खरी ओळख  || मुखवट्यामागील चेहरा

शेवटी मी कोण हा प्रश्न अन त्याचं उत्तर महत्वाचं असतं. माझं रंग, रूप, चेहरा, नाव, आडनाव, गाव, व्यवसाय, जात, धर्म, पंथ, भाषा, पक्ष, वर्ण, वर्ग, वजन, वगैरे असल्याशिवाय माझ्या ह्या भौतिक जगात असण्याला काहीच किम्मत नाही. अस्ताला जाणार्‍या सूर्याची किरणेही प्रकाशमान करतात अन सूर्योदयाची किरणेही प्रकाशमानच करत असताना मानवंदनेचा मान फक्त उदयाला येणार्‍याला असते… पण ही केवळ ह्या पृथ्वीची रीत… सूर्य मुळात तिथेच असतो, प्रश्न पृथ्वीच्या कक्षेचा असतो हे उमगणार नाही कधी.

मुखवट्यांना असणारे अर्थ कधी अजेय आणि चिरायू असतच नसावेत. चेहरे मात्र अमर राहतात. भिक्षुकाच्या वेशात साक्षात परमेश्वर आला तरी त्याला ओळखण्याची दृष्टी हवी आणि साधूच्या वेशात रावण आला हे ओळखूनही धर्म पार पाडायची रीत असते. कारण मुखवट्यामागे असलेल्या चेहर्‍यांना ओळख असते ज्यावर उघडपणे विश्वास असतो. मुखवट्यांना बिलगून परावर्तीत होणारी प्रकाश किरणे कितीही उल्हसित करणारी असली तरीही मुखवट्यामागे दडलेल्या अंधाराला निरखून बघायची रीत काही जात नाही.

Related image

कोणा मुखवटाधार्‍याने कितीही त्याग केला तरी बलिदान दिल्याशिवाय त्याच्या त्यागावर संशय करणं बंद होत नाही. पण उघडपणे विकृत चेहरे घेऊन केलेली पापांची शिक्षा देण्यासाठी पापाचे घडे अन शंभर अपराधांची वाट बघितली जाते. सगळी अवतरांची गोष्ट!

कितीही केलं तरी मी कोण ह्या प्रश्नांची उत्तरे देणं भागच असतं. अंधारात कितीही सुख मिळत असलं तरी उजेडात दिसणारी दुखाची लकेर का पहावी वाटते याचं आश्चर्य आहे. वारंवार मुखवटे ओरबाडून चेहरे बघितले जातात अन पुन्हा तिथे अज्ञात भाव दिसले की मनाशी धरलेल्या खोट्या अपेक्षांचं खोटं ओझं खाली ठेऊन देण्याचं स्वतःच्या मनाला दिलासा दिला जातो. पण मुखवट्यामागील चेहरे बघायचे अट्टहास काही कमी होत नाहीत.

मी कोण ह्या प्रश्नाचं उत्तर कधी अस्तित्वही विसरू देत नाही अन नवनिर्मितीचा, नवशोधांचा आनंदही लुटू देत नाही. ह्या मी कोण शी जुळलेली माझी ओळख ह्या मतलबी जगातील अनेक काटेरी प्रश्न माझ्यासमोर उभं करत असते. माझ्या वर्ण, धर्म, वर्ग, जात, प्रांत, गाव याची ओळख देणारा मी कोण असाच पुढे सरकत जातो. माझी ओळखच मग माझ्यावर ओझं बनु लागते. सत्याच्या प्रखर मार्गावरून जातानाही मग कुबड्यांचा आधार शोधावा लागतो. कारण मुखवटे खरे असतात पण चेहर्‍यांना आपल्या गरजा लपवता येत नाहीत. अखेर ह्या मी कोणचं उत्तर द्यावच लागतं, लागलं. आता मुखवट्यांचे व्रण मिरवणारा चेहराही दिसतोय अन हातात तो निरागस मुखवटाही दिसतोय. मलाच प्रश्न पडतोय की मी कोण?

मला तरी अजूनही मुखवटाच प्रिय वाटतोय, किमान तो माझ्याकडे असलेल्याचा हिशोब मांडतोय आणि चेहरा मात्र पडलेला आहे… मुखवटा नसल्याचं दुखं करत!!!

Image result for चेहरे आणि मुखवटे

उराशी बाळगलेलं दुखं कितीही हसर्‍या चेहर्‍याने सांगायचा प्रयत्न केला तरी डोळ्यांतून ढळणारे अश्रुंच्या चार थेंबाशिवाय त्या दुखाला सहानुभूतीचे खांदे मिळत नाहीत. पण वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या गलबताच्या कप्तानाला समोर मृत्यू उभा असतांनाही साहसाची नाट्यक्रिया पूर्ण करावीच लागते हे कसं सांगावं.

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

भाषिक अस्मिता

भाषिक अस्मिता

मराठीचा मारेकरी  ||  भाषिक वाद  ||  मराठी भाषाप्रेम  || हिन्दी भाषेचा द्वेष  ||  इंग्रजी भाषेचा अतिरेक  ||  #माझंमत

भाषावार प्रांतरचना होऊन आता साठ वर्षे लोटून गेलीत, पण अजूनही भाषिक अस्मितेवरून आरोप-प्रत्यारोप व वाद होत असतात. ते भविष्यातही होतच राहतील याबाबत खात्री आहे. भाषा हे संवादाचं माध्यम असताना वरचेवर ते वादाचं कारण बनताना दिसत आहे. याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. नेहमीप्रमाणे प्रत्येक भारतीय नागरिक अशा वादांसाठी कुठल्यातरी नेत्याला, पक्षाला किंवा वर्गाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करून स्वतः मात्र दोषमुक्त होत असतो.

भाषा की फक्त संवादाचं माध्यम असती तर हे मुद्दे इतके टोकाला कधीच गेले नसते. पण भाषा ही संस्कृतीची ओळख असते. कुठल्याही संस्कृतीचा अभ्यास करताना त्या भाषेशी आधी ओळख करू घ्यावीच लागते, आणि जेंव्हा संस्कृतीचा प्रश्न येतो तेंव्हा गदारोळ होणारच असतो.

बाकीचा सगळा फाफट पसारा सोडला तर मूळ मुद्दा आहे मराठी भाषा अन संस्कृतीचा! ते विविधतेत एकता, सर्व भाषा चांगल्या वगैरे गोष्टी सांगून फायदा नसतो.

              एका उदाहरणाने सुरुवात करुयात. आम्ही काही मित्र एकदा देवदर्शनासाठी दक्षिणेत गेलो होतो. आमच्यातील एक मित्र अगदी कट्टर मराठी. इकडे महाराष्ट्रात असताना, कुठेही जा मराठीत बोला, महाराष्ट्रात फक्त मराठीतच बोललं पाहिजे, ज्या राज्यात जाल तेथील भाषा शिकली पाहिजे, हिन्दीत संवाद करूच नये असं सांगायचा. अगदी कट्टर मराठी विचारांचा माणूस.

आता परराज्यात निघताना त्याचे हे विचार त्याच्या गिनतीत नव्हतेच. पण आम्ही मित्रांनी त्याची फिरकी घ्यायची ठरवलं होतं. आम्ही त्याला सांगितलं, आता ज्या राज्यात आपण जात आहोत तेथे तू, तेथील भाषेत बोलून सर्व व्यवहार करायचे, हिन्दीचा चुकूनही वापर करायचा नाही, इंग्लिश बोलू शकतोस. ठरलं.

गडी हुशार तसा. अगदी लहानपणापासूनच. हसत-हसत त्याने आमचं आव्हान स्वीकारलं. आम्ही त्याला कसलंही सहकार्य करणार नाही असं सांगितलं होतं.

रेल्वे स्टेशन आलं अन आम्ही उतरलो. पहाटेची वेळ. सोबत सामान बरच होतं. मित्राची परीक्षा सुरू झाली होती. एक कुली (हमाल) आला आणि त्याच्याशी मोडक्या-तोडक्या हिंदीत व इंग्रजीत संवाद साधून आम्ही भाव वगैरे ठरवला. आमचं ठरलं. तो मित्र आमच्या तोंडाकडे बघत उभा होता. दूसरा कुली आला. आमचा मित्र अस्लखित का काय म्हणतात तसलं इंग्रजी बोलू शकतो. तो फाडफाड इंग्रजीत त्या कुलीशी बोलत होता. कुलीला फक्त “लगेज” हा शब्द कळाला. पण तो लगेच तयार नाही झाला. त्याने हातवारे, इशारे व तोंड वेडंवाकडं करत भावना पोचावल्या. नो नो, यान्न बिन्न करत सौदा ठरला. पंधरा मिनिटे गेली पण आमच्या मित्राने पहिला पेपर काढला होता.

पुढच्या टप्प्यावर गेलो. आम्ही चहा वगैरे घेतला. दक्षिणेत हिन्दी अजिबातच बोलत नाहीत असं नाही. रोज कमवून खाणारे कुली, टपरीवाले, ऑटोवाले वगैरे जमेल त्या भाषेत संवाद साधून, कस्टमरची गरज ओळखून काम करत असतात. हिंदीत बोललं की तिकडे थेट मारतात असा गैरसमज महाराष्ट्रातच जास्त पसरला आहे.

तर, आम्ही चहा घेतला. आमच्या मित्रानेही चहा वगैरे घेतला. त्याच्या बॅगची चैन खराब झाली होती अन त्याला हवी होती मेणबत्ती. बिचारा त्या दुकानदाराला बराच वेळ इंग्रजीत सांगत होता, हातवारे करत होता पण त्या दुकानदाराला काय समजेना. तो काडीचीपेटी, शम्पो वगैरे वगैरे दाखवत होता. शेवटी आमच्या हुशार मित्राने मोबाइलवर भाषांतर केलं आणि मेणबत्ती मिळवली. बराच वेळ गेला पण मित्र पास झाला. शेवटी पैज ती पैज!

पुढे बर्‍याच ठिकाणी कमी जास्त प्रमाणात असेच प्रसंग झाले. तेथील सर्वांना इंग्रजी समजत नाही, मराठीचा तर प्रश्नच नाही आणि ह्याला काही त्यांची भाषा समजत नाही. तसं कायमचा इकडे स्थायिक होणार असता तर क्लास वगैरे लाऊन त्याने ही भाषा शिकली असती इतका ज्ञानी तो नक्कीच आहे, पण चार दिवसाच्या दौर्‍यात अशा काय अडचणी येतील असं त्याला वाटलं नव्हतं. एका ठिकाणी अवाजवी प्रसंग घडला. एका भाजीवाल्या महिलेला तो काय सांगू बघत होता काय माहीत, तिने याला नीट शिव्या घालायला सुरुवात केली. तिला वाटलं हा काहीतरी अश्लील हातवारे करतोय की काय. पण आम्ही वेळेत मध्यस्ती केली अन वाचला बिचारा. जोडे खाता खाता वाचला बिचारा. नंतर तो शांत शांत राहू लागला. जेवताना तर असे वांधे व्हायचे बिचार्‍याचे की सांगायला सोय नाही. भाज्यांचे व पदार्थांचे इंग्रजीत नावे सांगायचा जे त्या लोकांनी बापजन्मी कधी ऐकले नसायचे. हिन्दी वापरायची मुभा नसल्याने नेहमी नेहमी भाषांतर करून त्याला सांगावं लागायचं. भाषेचा मोठा अडसर ठरू लागला. संवाद कमी अन नाट्यशास्त्राचा अभ्यास जास्त होऊ लागला.

चार दिवसांत पुरता सुकून गेला बिचारा. इथे Theory मांडताना अन practical करताना किती त्रास होतो याचा अनुभव त्याने घेतला. भाषा कुठलीही असो, ती संवाद पूर्ण करण्यासाठी, एकमेकांचं बोलणं समजावून घेण्यासाठी असते हा महत्वाचा भाग. मग मी माझीच भाषा धरून बसणार आणि तो त्याचीच भाषा धरून बसणार असं झालं तर व्यवहारच काय तर साधा संवादही होणार नाही. भारतासारख्या देशात भाषेच्या बाबतीत कितपत अट्टाहास अन किती लवचिकता बाळगली पाहिजे याचा विचार त्याने कधीच केला नव्हता. धोरणकर्ते एकंदरीत स्वार्थासाठी भाषा लादतात, मूर्ख आहेत आणि आपल्यालाच आपल्या मात्राभाषेची अधिक काळजी आहे असा त्याचा गैरसमज कमी झाला असावा.

भारतात इतकी राज्य आहेत अन त्यांच्या इतक्या भाषा आहेत की सामान्य माणसाला त्या सर्व भाषा किमान कामापुरता शिकायच्या म्हंटलं तरी ते शक्य नाही. पर्यटन करण्यासाठी जर मी देशातील प्रत्येक राज्यात जाणार असेल तर चार-सहा दिवसांच्या कामासाठी मी ती स्थानिक भाषा शिकणे अपेक्षित आहे का? हे सर्वथा अशक्य आहे. पण मी जर नोकरी किंवा इतर कामानिमित्त जर कायमचा किंवा जास्त काळासाठी तिथे राहणार असेल तर मला ती स्थानिक भाषा शिकणे सोयिस्कर आहे. ही गरज बघूनच कदाचित धोरणकर्त्यानी एखादी संवाद भाषा असावी अशी मागणी केली असावी किंवा तशी सोय असावी असं त्यांना वाटलं असावं. पण हिन्दी ही राष्ट्रभाषा नाही नाही नाही हे अनेकदा सांगावं लागतं आणि ती केवळ संवाद करण्यासाठीची भाषा आहे असं मला वाटतं.

आता महत्वाचा मुद्दा हा की हिंदीच का? इतर भाषा काय वाईट आहेत का? तर नाही. हिन्दी ही भाषा देशातील बहुसंख्य लोक किमान बोलू व समजू शकतात. ती सर्वांना लिहिता यावी, वाचता यावी अशी अपेक्षाही नाही. याचा अर्थ असा नाही की हिन्दी ही राष्ट्रभाषा असावी. पण उत्तरेतील राज्ये, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, ओरिसा, बंगाल इत्यादी राज्यांत ज्या भाषा आहेत त्यात अन हिंदीत काही सारखे शब्द आहेत. [या भाषांचा उगम कसा व कोठून आहे याचा “अभ्यास” नाही हेही स्पष्ट करू इच्छितो.] म्हणजे तेथील लोक किमान तोडक्या-मोडक्या पद्धतीने ह्या भाषेत संवाद साधू शकतात.

उद्या जर एखादा तामिळ माणूस तामिळ भाषेत बोलत महाराष्ट्रात दारोदारी त्याचं उत्पादन विकू लागला तर त्याला कोणी दारातही उभं करणार नाही. कारण तो काय बोलतोय यातील एकही शब्द कोणाला समजणार नाही. पण तोच एखादा गुजराती तुटक हिन्दी+गुजराती भाषेत जर काही सांगू लागला तर किमान चार-सहा ओळखीचे शब्द ऐकून त्याला काय म्हणायचं आहे हे समजून घेता येईल. असही आपल्याकडील लोकं सेल्समन दिसला की स्वत:हून “केवडेको दिया, क्या लाया” करत हिन्दीतूनच बोलतात. ती भाषा त्यांनी कुठेतरी चित्रपट किंवा इकडे-तिकडे ऐकलेली असते. अशिक्षित असले तरीही.

इथे कोण कोणावर आपली भाषा लादत नव्हता. गरज असल्याने दोन्हीही बाजूंनी तडजोडी होऊन एका सामायिक भाषेद्वारे संवाद पूर्ण केला गेला.

भाषिक अस्मितेत एक मुद्दा खूप महत्वाचा असतो, तो म्हणजे भाषा लादणे! हा खूप भयंकर प्रकार आहे. भाषा म्हणजे संस्कृती अशी ओळख असलेल्या देशात भाषा लादली जाणे खूप धोकादायक आहे. कारण भाषेच्या आडून संस्कृती व प्रादेशिक अस्मिता संपवण्याचा प्रयत्न देश तोडण्याचे काम करेल. [[भाषावार प्रांतरचना होत असताना देश कोणत्या स्थितीतून गेला असेल याची कल्पना आजच्या (म्हणजे माझ्या) पिढीला नसावी. फाळणीनंतरची फाळणी टळली हे त्याकाळातील राजकीय नेतृत्वाचं तात्कालिक यश म्हणावं लागेल.]]

तत्कालीन व आजच्या परिस्थितीला राजकीय पदर आहेत जे ह्या लेखाचा भाग नाहीत. सध्या सत्तेत असलेला भाजपसारखा पक्ष, ज्याला उत्तर भारतातील पक्ष म्हंटलं जायचं, हिन्दी भाषा इतर राज्यांवर लादत आहे असा आरोप होत असतो ज्यात काही अंशी तथ्य आहे. कारण ते त्यांच्या राजकीय सोयीचं आहे. पण ह्या पक्षाचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी हे गुजराती अस्मिता व भाषा याबाबतीत किती कट्टर आहेत हे माहिती असताना ते हिंदीचा आग्रह का धरतील असा प्रश्नही समोर येऊ शकतो. भाजपबद्दल असलेली नाराजी हिन्दीचा दुस्वास करण्यासाठी कारणीभूत आहे का? याचाही शोध घेतला गेला पाहिजे. कारण बरीच मंडळी भाषिक अस्मितेच्या मुद्दयाकडे राजकीय चष्म्यातून बघत असतात.

हिन्दीतून शिक्षण, हिन्दीची ओळख होणे आणि लादणे यात फरक आहे. हल्ली इंग्रजी जशी बालवाडीपासून शिकवली जाते तसं हिन्दी पाचवीपासून शिकवतात. त्याचं कारण इतकच की त्या भाषेची थोडीफार ओळख व्हावी. नंतर तो विषय ऐच्छिक असतो. दूसरा भाग म्हणजे केंद्रीय सरकारी कार्यालयात, बँकांत हिन्दीचा वापर. तेथे स्थानिक भाषेला प्राधान्य असायलाच हवं याच्याशी सहमत. पण त्यानंतर हिन्दी असायला हरकत नाही. म्हणजे प्रामुख्याने मराठी आणि पर्याय म्हणून हिन्दी. त्यानिमित्ताने हिन्दीतील चार शब्द समजून ते उपयोगी पडतील अशी अपेक्षा असते. गेली अनेक दशके ह्या हिन्दी पाट्या बँका व कार्यालयात वगैरे आहेत, पण असा एकही माणूस नसेल की जो ह्या पाट्या वगैरे वाचून हिन्दीकडे आकर्षित होऊन त्याने आपली भाषा सोडून दिली असेल. हे अशक्य आहे. ते ‘हम हिन्दी भाषा उपयोग का स्वागत करते है|’ अशा पाट्या असल्या तरी तेथील कर्मचारीसुद्धा ती भाषा फार वापरत नाही. लाया क्या, भेजा क्या यापुढे त्या भाषेचा उपयोग होत नाही. पण महाराष्ट्राच्या कार्यक्रमात हिन्दीचा वापर हा निव्वळ मूर्खपणा आहे हेही सत्य.

ह्या लेखाचा भाग नसला तरी सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, आज दैनंदिन वापरत असलेले मराठी शब्द विविध भाषेतून आलेले आहेत. अजाणतेपणी आपण ते सर्रास वापरतो. जे सोपे होते ते अंगिकारले. जसे संस्कृतमधील शब्द इंग्रजीने घेतले तसे. ह्या नियमानुसार हिन्दीचे चार शब्द मराठीत आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण हिन्दी भाषेने इतर भाषेवर अतिक्रमण केलं असं त्यामुळे म्हणता येणार नाही. आज वापरत असलेल्या सर्वच भाषेत हे आढळून येईल.

एक साधा विचार करण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे चित्रपटांची! महाराष्ट्र हे मराठी राज्य असूनही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पहिल्यापासून हिन्दी चित्रपट बघितले जातात, गाणी ऐकले जातात. पण असं का? कोणी मराठी माणसावर ते बघण्या-ऐकण्यासाठी जबरदस्ती केली होती का? का पैसे देत होते? याला लादणे म्हणतात का? हिन्दी भाषा समजलीच कशी? महाराष्ट्रात उद्या तामिळ, कानडी भाषेतील दर्जेदार चित्रपट आणून लावा, किंवा हिंदीतीलच दर्जेदार चित्रपट कानडी, तेलगू भाषेत लावा.. बघूयात किती लोकं ती बघायला तयार असतात ते… आपण मराठी चित्रपटही आवर्जून बघत नाहीत तो भाग तर वेगळाच अजून!

पण याला काही कारण आहेत. मराठी व हिन्दी भाषेत असे अनेक सारखे शब्द आहेत. मग गुजराती, राजस्थानी, बंगाली वगैरे भाषा अन हिन्दी यात काहीतरी साम्य आहे जेणेकरून हिन्दी ही सर्वांना किमान समजता येईल अशी भाषा बनु शकते असं वाटतं. हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणणे हे हिन्दी लोकांचं आपल्या भाषेवरील प्रेम असेल अन हिन्दीला राष्ट्रभाषा बनवणे हे हिन्दी नेत्यांचं स्वार्थी राजकारण असेल. उद्या मराठीला राष्ट्रभाषेचा दर्जा जर कोणी देत असेल तर कोण मराठी माणूस त्याला विरोध करेल? आपआपल्या भाषेवर प्रत्येकाचं प्रेम असतं. भाषेच्या आडून राजकारण केलं जात असेल तर त्याला राजकीय प्रत्युत्तर मिळणे साहजिक आहे, पण सामान्य माणसाने एकमेकांच्या भाषेला कमी लेखणे किंवा द्वेष करणे हा अतिरेक आहे.

उद्या जर मराठी, तमिळ, तेलगू किंवा इतर प्रादेशिक भाषा संवाद भाषा म्हणून स्वीकार करून तिचा प्रसार करायचा निर्णय सरकारने घेतला तर आनंदच आहे, पण ती भाषा त्या-त्या राज्याच्या बाहेर किमान समजता येईल का हे बघावं लागेल.

मी मागेही म्हंटलं होतं की, जिथे रोजगार व पोटापाण्याचे मूलभूत प्रश्न बर्‍यापैकी सुटलेले असतात तिथे भाषिक अस्मितेचे मुद्दे प्रामुख्याने उचलले जातात. हे मी आजच्या काळातील बोलत आहे. अर्थात मुंबई-ठाणे पट्टा त्याला अपवाद आहे, कारण मुंबईत मराठी भाषा अस्तित्वाचा प्रश्न आहे. मराठी संस्कृतीची छाप मुंबईवर असणे यासाठी कट्टर आणि कट्टर मराठीचा मुद्दा रेटून किंवा लादून पुढे न्यायला काहीच हरकत नाही. मुंबईत भाषाप्रेम हे खूप महत्वाचं आहे, नाहीतर मुंबईतून मराठी भाषा व संस्कृती नामशेष होण्याची भीती आहे. पण इतरत्र तसं नाही. सध्या मी फक्त महाराष्ट्राच्या बाबतीत बोलतोय.

उर्वरित महाराष्ट्रात भाषिक अस्मितेचा मुद्दा फोल ठरतो. कारण जिथे रोजगाराचे, शेतीचे, अगदी पाण्याचे प्रश्नही सुटलेले नाहीत तिथे मराठीचा आग्रह आणि मराठी भाषा वाढीसाठी प्रयत्न हे म्हणजे दुष्काळपट्ट्यात LED TV विकण्यासारखी गोष्ट होईल. कारण ह्या माणसाला आपल्या मूलभूत गरजेपुढे ते बाकीचे प्रश्न अक्षरशः गौण वाटतील. मुळात ग्रामीण भागातच मराठी भाषा व संस्कृती अजूनही टिकून आहे हे सांगावं लागेल. शहरीकरण, आधुनिकीकरण किंवा जागतिकीकरण असं काहीही नाव द्या, पण मोठी शहरं आपली संस्कृती व भाषा व पर्यायाने आपली ओळख हरवून बसत आहेत हे सत्य आहे. मग तेथे असलेल्या लोकांना अचानक मराठी भाषा व संस्कृतीचा मुद्दा मोठा वाटू लागतो; परदेशात मराठी भाषा प्रतिष्ठान वगैरे असतात तसे. कारण मराठीचा वापर कमी झालेलं त्यांना आढळून येतं. मराठीवर हिन्दीपेक्षा इंग्रजीचं आक्रमण जास्त झालेलं असतं.

              आपल्याकडील अनेक भाषाप्रेमींना तामिळनाडूचं असलेलं कट्टर भाषाप्रेम वगैरे बद्दल मोठं कौतुक असतं. तामिळनाडूकडे बघून त्यांना मराठी समाजाला अन महाराष्ट्राला भाषेची प्रयोगशाळा करायची तीव्र इच्छा होऊ लागते. जेंव्हा-जेंव्हा ‘भाषा’ यावर चर्चा होते तेंव्हा-तेंव्हा तामिळनाडूचं उदाहरण दिलच जातं. पण तो किती शतकांचा संघर्ष आहे व त्याची पाळेमुळे कुठे आहेत हेही आपल्याला ठाऊक नसतं. अगदी आर्य व द्रविड इथपासूनचा तो संघर्ष आहे. कधी-कधी तो डीएनए वरही जाऊन पोचतो. आधी संस्कृती, आचरण व धर्म येथून सुरू झालेला तो मुद्दा भाषेवर पोचला. भाषावार प्रांतरचना हा अध्यायही तेथेच सुरू होतो. एका गांधीवादी तेलगू नेत्याच्या बलिदानाने (56 दिवस उपोषण) भाषावार प्रांतरचना प्रकर्षाने समोर आल्याचा इतिहास आहे. हा अनेक वर्षांचा कटू संघर्ष आहे जो तामिळनाडूला स्वतःची ओळख देऊन जातो. सारखं तामिळनाडूचं उदाहरण महाराष्ट्रासमोर मांडून काय उपयोग? आपली संस्कृती, आपलं आचरण अन स्वभाव वेगळा आहे हे कधी लक्षात येणार? महाराष्ट्र हा उत्तर भारत व दक्षिण भारताच्या मध्ये असलेला प्रदेश आहे. उलट, ही अनेक वर्षांपासूनची संस्कृती इतक्या संक्रमणानंतरही कशी टिकून आहे याचा खरं अभ्यास केला पाहिजे.

Related image

कुठलही राज्य हिन्दीला आपली राज्यभाषा/राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारायला तयार नाही (अगदी गुजरातही) आणि त्याची गरजही नाही. प्रत्येक प्रादेशिक भाषा समृद्ध आहे. ते लादणे वगैरे म्हणजे नुसता पोरखेळ आहे. त्याने काहीही हासिल होत नाही.

तसं पाहता मराठी भाषेतही अनेक मराठी भाषा आहेत. पुण्याची मराठी, मुंबईची मराठी, कोकणची मराठी, घाटी मराठी, वर्‍हाडी मराठी, अहिराणी अशा विविध बोली भाषा आहेत. पण आपण एकच मराठी का वापरतो? कागदोपत्री सर्व व्यवहार त्या मान्यताप्राप्त मराठीतच का? कोकणच्या लोकांना त्यांची मराठी नको का? का एकच मराठी सर्वांवर लादायची? हे असे प्रश्न उभे राहू शकतील का…? असो.

आता महत्वाचा मुद्दा. इंग्रजीचा! ज्या भाषेच्या अतिक्रमणामुळे भारतीय भाषा अपंग बनत आहे ती भाषा. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित व विविध भाषा-संस्कृतीचा गाढा अभ्यास असलेले भालचंद्र नेमाडे म्हणतात, इंग्रजी शाळांच्या जागी मुतार्‍या बांधायला पाहिजेत! ह्या वाक्याकडे कोणताही मराठीप्रेमी, राजकरणी, समाजकारणी गांभीर्याने बघताना दिसत नाही. कारण इंग्रजी ही ज्ञानाची भाषा, प्रगतिची भाषा अशा अंधश्रद्धेत तो वावरत असतो. इंग्रजीला विरोध केला तर आपले तथाकथित आधुनिक विचारांचे मुखवटे गळून पडतील अशी भीती त्यांना वाटते. कारण भारतीय भाषांचा अट्टहास हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व काही हिंदुत्ववादी संघटनेंचा मुद्दा असल्याने तो आग्रह तथाकथित आधुनिक विचारांची मंडळी ते करू शकत नाहीत. असो. या सगळ्यामुळेच, इंग्रजीला डोक्यावर चढवून ठेवल्याने मराठीची किती गळचेपी होत आहे याचा विचार कोण करत नाही. ही निव्वळ मानसिक गुलामगिरी आहे.

नवीन पिढी बालपणापासून इंग्रजी शिकत आहे. म्हणजे त्यांना शिकवली जात आहे. हळूहळू इंग्रजी हीच त्यांची संवाद भाषा बनत आहे. एका मराठी वाक्यात इंग्रजी शब्द ही संकल्पना जाऊन पूर्णतः इंग्रजी वाक्यात संवाद ही परिस्थिती समोर आहे. यामुळे ही पिढी मराठी साहित्य व संस्कारापासून तुटत आहे याची जाणीव कोणालाही नाही.

इंग्रजीने मराठीची जागा घेतली तरी कोणालाही फरक पडताना दिसत नाही. इंग्रजी वाचता, लिहिता, बोलता येणे उत्तमच, पण संवाद इंग्रजीतून ?? ही धोक्याची घंटा नाही का? 125 कोटी भारतीयांपैकी असे किती लोक परदेशात जाणार आहे की त्यांनी इंग्रजी भाषा शिकावी? गरजेपुरता, माहिती मिळवण्याकरिता इंग्रजी आली तरी खूप आहे, पण हल्ली असं बिंबवलं जात आहे जणू इंग्रजी येत नाही म्हणजे ज्ञान-माहिती मिळवण्यासाठी तुम्ही अपात्र आहात. हा काय मूर्खपणा आहे. छोट्या शहरात व गावोगावी इंग्रजी शाळा उघडल्या आहेत. पहिलीपासून इंग्रजी शिकवलं जात आहे. यामुळे इंग्रजी ही नवीन पिढीची बोली भाषा व विचार करण्याची भाषा होत आहे. माहिती मिळवण्यासाठी इंग्रजी पुरेशी असताना इंग्रजीचा इतका अट्टहास का? भारतात किंवा महाराष्ट्रात दोन भारतीयांनी इंग्रजीत संवाद का साधावा? भारतीय म्हणून आपली एक संवाद भाषा असू नये का? पूर्वी संस्कृत न येणार्‍याला ज्ञान मिळवता येणार नाही (असं म्हणतात, मला माहीत नाही) तसंच सध्या इंग्रजीच्या बाबतीत होत आहे. कामापुरती इंग्रजी ठीक आहे, पण इंग्रजीतून संवाद हे धोकादायक आहे. कारण भाषेसोबत संस्कृतीही येते; हळूहळू ते चित्र आपल्याला दिसत आहे. इंग्रजी हीच मराठी व इतर भाषांना धोका आहे असं माझं ठाम मत आहे.

इंग्रजी आल्याने कोणीही ज्ञानी किंवा अधिक जाणकार होत नाही हे ठासून सांगितलं पाहिजे. म्हणजे स्वतःला ज्ञानी सिद्ध करण्यासाठी इंग्रजी येणं इतकाच निकष त्यांना पुरेसा वाटतो. पण बुद्धिजीवी लोकांचा एक अहंगड किंवा न्युनगंड असतो; आपण चार पुस्तके वाचली, तीही इंग्रजीतून, आपण माहिती मिळवली याचा अर्थ आपण जास्त जाणते झालो असा त्यांचा समज असतो. मग आपल्यापेक्षा कमी शिकलेला एखादा भाजीवाला, शेतकरी किंवा अगदी पानपट्टिवाला आपल्यापेक्षा चांगला विचार करूच शकत नाही असं त्यांना वाटत असतं. कारण आपले मुद्दे योग्य शब्दांत, इंग्रजीत, उदाहरणसहित मांडल्याने आपण अधिक विचारवंत आहोत अशी त्यांची समजूत असते. असो. तो मुद्दा वेगळा!

मुळात, आपण कसे मराठीचे मोठे सेवेकरी व पुरस्कर्ते हे दाखवून देण्यासाठी हिन्दी व इतर भाषांवर टिप्पणी केली जाते. कारण समोर शत्रू आहे असं दाखवल्याशिवाय इकडच्या फौजेचं नेतृत्व करायची संधी मिळत नसते. त्यासाठी हिन्दीला शत्रू दाखवलं जातं. त्याला राजकीय कारणं असू शकतात. पण इंग्रजीलाही तोच न्याय लावताना कोणी दिसत नाही. कारण आयचा घो पेक्षा what the fuck हे सभ्यतेच्या चौकटीत बसवून घेतलं असल्याने आपल्याला इंग्रजी ही खूपच अत्याधुनिक व नम्र वाटते. काही शब्द व वाक्य मराठीऐवेजी इंग्रजीत बोलल्याने तुमची वेगळी प्रतिमा तयार होत असेल तर अशा भाषेच्या चौकटी निरर्थक आहेत.

हे सगळं सांगायचं कारण म्हणजे भाषिक अस्मितांचा सुळसुळाट. भाषेचा मुद्दा कितपत कट्टरपणे आणि केंव्हा लवचिकपणे हाताळला पाहिजे हे समजलं पाहिजे. त्यासाठी तितका अनुभव असायला हवा आणि समाजातील प्रतिक्रियांचा, परिणामांचा विचार करता येण्याइतपत प्रगल्भता असावी लागते. निव्वळ पुस्तकातील माहिती उथळपणे मांडत राहणे काही कामाचं नाही. त्याने गर्दी जमा होईल पण एका पातळीनंतर ते सगळं निरर्थक ठरेल.

टीप:- कसलाही खुलासा नाही…. आपआपल्या बौद्धिक कुवतीनुसार अर्थ काढण्यास आपण मोकळे आहात…  

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

मराठी कथा – अभिषेक बुचके

 

प्रमाणपत्र वगैरे

प्रमाणपत्र वगैरे

लेखक म्हणून काहीतरी सांगताना… 

तसा मी काही मूळचा लेखक नाही. मूळचा म्हणजे अभिजात किंवा दर्जेदार किंवा त्या क्षेत्राशी थेट निगडीत असलेला वगैरे नाही. कधीतरी ज्वालामुखी फुटतो आणि त्यातून लावारस बाहेर येतो, अचानक आलेल्या वादळाने लहानशी वृक्ष पडतात, अवकळी पाऊस पडतो तसं मी कधीतरी मनात-मेंदूत चार गोष्टी येऊ लागल्या तर त्या व्यक्त करतो. कधीतरी घटनांची मालिका निष्क्रिय पडलेल्या मेंदूत दिसू लागते आणि माझ्याकडून कथेला जन्म देण्याचा प्रकार घडतो. उगाच फिरत असताना नजरेस पडणार्‍या प्रसंगातून जुने संदर्भ उफाळून येतात तर कधी भविष्याची चित्रं दिसू लागतात अन मग मी त्यांना गोष्टीतून मांडत जातो. संवेदनशील आहे का नाही माहिती नाही, पण चंचल वगैरे आहे बहुदा. कारण हजार विश्वे अतृप्तपणे फिरणारं मन कुठल्यातरी कथेला जन्म देतच. माझं लेखक वगैरे असणं निव्वळ योगायोग अन अपघात असू शकतो. ज्याच्याकडे शब्दांचा भांडार नाही, कुठेच जाणिवांचा डोंगर वगैरे नाही त्याच्याकडून नवसाहित्याची निर्मिती म्हणजे निव्वळ नशा आहे.

इतकं सगळं माहीत असूनही मनात कुठेतरी स्वतः लेखक असणं ही भावना जरा समाधान देऊन जाते. आपण चार चौघांपैकी काहीतरी वेगळे आहोत, विचारी आहोत असा अहंगंड डोकावत असतो. स्वतःचं लेखक असणं हे स्वतःला खूपच भारी वाटत राहतं. पण कुठेतरी अंधारात चमकणारा काजवाही स्वतःला सूर्य वगैरे समजू लागतोच न? कारण त्याच्याकडे इतरांकडे नसलेला प्रकाशित करण्याचा गुणधर्म त्याला वेगळी ओळख निर्माण करून देत असतो.

ह्या अशा न्यंनगंड आणि अहंगड जाणीव-नेणीवेत अडकलेलं मन-मेंदू चार शब्दांचे आठ वेळा बुडबुडे सोडत राहतं, आणि स्वतःतच मग्न असतं. मग्न असताना स्वतःचा भग्न आणि नग्नपणा कधी कोणाला दिसतच नसतो. पायर्‍यांवरून गडगडत खाली येणार्‍या भांड्याच्या आवाजाप्रमाणे अनेक गडगडाटाचे प्रतिध्वनि कायम उमटत असतात आणि त्यात मूळ आवाजही दडपल्या जातो. मग कुठे लेखक म्हणून हवीहवीशी वाटणारी प्रशंसा, स्तुती, कौतुक ऐकण्यास मन अधीर होत जातं. त्यातून मग रोज उठून स्वतःच लिहून टाकलेल्या कथांवरचे अभिप्राय वाचण्याची उत्सुक धडपड सुरू होते. त्यात मग चांगले अभिप्राय आले तर मन मुक्त पक्षाप्रमाणे विश्वदर्शन करण्यासाठी भरारी घेत असतं. कधी-कधी अभद्र स्वप्नातून गडबडून जाग यावी तसा एखादा तिखट अभिप्रायही भानावर आणतो.

कुठल्याही आईला नऊ महीने पोटात वाढवलेल्या बाळाला चुंबन घेऊन ओलं करावसं वाटतं, त्याचं कौतुक व्हावं वाटतं तसं प्रत्येक कलाकाराला स्वतःच्या कलानिर्मितीची प्रशंसा ऐकायला आवडते आणि तोच मलाही आपल्या लिखाणाचा कौतुक वगैरे व्हावं वाटत असतं. स्वतः जन्माला घातलेल्या कथेला सार्‍या जगाने कडेवर घेऊन फिरवावे ही तर प्रत्येक कलाकार अन लेखकाची इच्छा असतेच. मी लिहीलेल्या “मी ब्रम्हचारी” ही कथा वाचून जर कोणी स्वतःच्या मनातील सल माझ्याकडे बोलून दाखवत असेल तर आनंदप्राप्तीला अन समाधानाला सीमा राहत नाही. माझ्या “गाव सोडताना” ह्या कथेला वाचून कोणीतरी परका माणूस त्याच्या भावना त्या कथेतील पात्रासारख्या आहेत असं म्हणत असेल तर तो आनंद खूप अमर्याद असतो. अनेकदा असे समाधानाचे सुखावह धक्के बसत असतात जे स्वतःच्या चार शब्दांवर अभिमान बाळगायला खूप असतात. बुडबुडे कितीही निरर्थक असले तरी रडणार्‍या लहान मुलाला हसवण्याचं काम करत असतील तर ते निरर्थक राहत नाहीत; किंबहुना तीच त्यांच्या निर्मितीची संज्ञा असते.

आता हे सगळं आठवलं का ? तर अनेक दिवसांपूर्वी #प्रतिलिपी वरील एका भयकथा स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात सातवा वगैरे नंबर आला होता, त्याचं प्रमाणपत्र मला आज मिळालं. माझ्या “नरक्षी” या भयकथेला मिळालेली ती शाबासकी होती असं माझं मन मला सांगतं. अनेक लेखक मित्र-मैत्रिणीमध्ये आपलाही कुठेतरी नंबर लागला ही भावना उत्साह वाढवणारी असते. ते उत्तेजनार्थ का काहीतरी म्हणतात अशा प्रमाणपत्राला, जे योग्यच आहे. कारण कुठल्यातरी प्रमाणपत्रावर आपलं नाव आलं आहे हे बघून परत काहीतरी काम करावं असा उत्साह दाटतो…

त्यामुळे सर्वांचे धन्यवाद वगैरे… वाचत रहा! माझ्यावर, माझ्यातील लेखाकावर प्रेम करत रहा…  

ज्या कथेला हे मिळालं ती कथा नरक्षी खालील लिंकवर… 

https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-4qwamz1qxlzd

 

सोवळं सुटलं…

सोवळं सुटलं…

#सोवळं  ||  डॉक्टर मेधा खोले वाद  || धार्मिक भावनांना ठेच  || परंपरा की अंधश्रद्धा  ||  #जातीय विखार  || अडाणी #जातीयवाद || #माझंमत

पुण्यात जे झालं ते खरं तर उत्तमच झालं. डॉक्टर मेधा खोले यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर अनेकांचे ‘बुरखे’ फाटले आहेत. सोवळं नावाचा जो प्रकार असतो तो बाजूलाच पडला असून बाकीचांचे सोवळेपण सिद्ध होत आहे. तथाकथित पुरोगामी अन सनातनी लोकांमध्ये तर तुंबळ वाकयुद्ध सुरू आहेच पण जातीय फोडणीही अप्रतिमरित्या दिली जात आहे.

प्रकरण साधं होतं पण आता त्याला नेहमीप्रमाणे जातीचा रंग चढला आहे. या प्रकरणात जो दोषी असेल ते लवकरच समोर येईल पण त्यांमित्ताने सुरू झालेला जातीयतेचा बाजार पुन्हा एकदा थाटला गेला आहे.

नुकतच भाऊ कदम यांनी गणपती बसवल्यानंतर त्यांच्यावर त्यांच्याच समाजातून टीका झाली व बहिष्काराची भाषा केली गेली हे प्रकरण ताजं असताना मेधा खोले यांचं प्रकरण समोर आलं. म्हणजे गणपतीने सगळ्यांचे खरे रूप समोर आणले आहे.

              एखादा लोकप्रतिनिधीने जर जातीचा खोटा दाखला दिला तर त्याचं पद रद्द होत असतं. नोकरी मिळवताना खोटी डिग्री किंवा खोटी माहिती दिल्याचं उघडकीस आलं तर त्याची नोकरी जाते. इथेही साधारण तेच प्रकरण होतं. पण त्याला नंतर जाणीवपूर्वक जातीय रंग देण्यात आला. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून मराठा-ब्राम्हण आणि ब्राम्हण-ब्राम्हनेतर वाद विकोपाला गेला आहे तो पुन्हा प्रतीत झाला.

आजच्या जगात तुम्ही देव-धर्म मानायचा का नाही मानायचा, श्रद्धेचं कोणतं रूप असावं, कोण किती कर्मकांड हा वादाचा प्रश्न आहे. पण घटनेने प्रत्येकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही तुमच्या घरात काय करता याबद्धल तुम्हाला कोणीही अटकाव करू शकत नाही. पण त्यावरून टोमणे मारणे अन सतत टीका करणे हा काहींचा छंद तर असतोच शिवाय स्वतःचं शेंबडं पुरोगामित्व certificate renew करायची संधी असते. आपण हिंदू धर्मातील चार टोकाची वाक्ये केली की आपण पुरोगामी अन अग्रेसर विचारांचे सिद्ध होऊ हे त्यांना माहीत असतं. त्यातल्या त्यात ब्राम्हण समाज अन ब्राम्हण्यवाद (लिहायलाही अवघड जातंय राव) यावर टीका केली की A plus ग्रेड मिळतोच. असो. पण भाऊ कदम आणि मेधा खोले यांच्या बाबतीत वेगवेगळी टिपन्नी होत आहे.

खोले यांनी गौरी-गणपती बसवावा का नाही बसवावा, त्यासाठी सोवळ्यात पुजा स्वयपाक करावा का न करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पण काहींना हेसुद्धा टीका करण्याजोगं वाटतं. आता सोवळं हे किती विज्ञानवादी संकल्पना आहे यावर भंपक भाषण करायची मला इच्छा नाही. ती नक्कीच कालबाह्य झाली आहे. पण चालत आलेल्या परंपरेप्रमाणे त्यांनी ते जे काही आहे ते भक्तिभावाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला असावा. यात कोणी त्यांना सल्ला देण्याचा काहीएक गरज नाही. पण अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने बोंबा ठोकणारे कोणी काय करावं याचे ठोकताळे मांडत असतात.

              माझ्यामते ह्या प्रकरणात ग्राहक-विक्रेता असा साधा वाद होता. त्याला भावनेचा पदर होता. यादव आडनावाच्या बाईंनी जात लपवून आपली फसवणूक केली अशी मुख्य तक्रार केली. अनेकदा आपल्याला दुकानदाराने फसवल (ते t&c आठवत असेल) म्हणून आपण त्याला जाब विचारायला जातो तोच प्रकार इथे घडला.

खोले यांना स्वयपाकासाठी (सोवळ्यातील) जातीने ब्राम्हण आणि सुवासिनी महिला हवी होती. हासुद्धा त्यांचा अधिकार आहे. त्यांची श्रद्धा काय असावी हे कोणी इतरांनी सांगू नये. आणि त्यांची श्रद्धा, भावना तोडायचा अधिकार कोणालाही नाही. मुद्दा इतकाच आहे की त्या यादवबाईंनी माहीत असतांनाही असं केलं का अजाणतेपणी ती चूक झाली. याचा निकाल कोर्ट लावेलच. सुदैवाने तिथे अजून सोवळं नावाचा प्रकार नाही. यापेक्षा जास्त काही नाराजी असण्याच काहीच कारण नाही. पण तात्विक प्रश्न सुरू झाले आहेत. म्हणजे “भांडी घासायला, फरशी पुसायला, साड्या, ड्रेस, पाय-पुसण्यापासून ते चड्ड्या, ब्रा पर्यंतची धुणी धुवायला चालतात यांना दलित, मातंग, मराठा बाया” असे प्रश्न विचारात आहेत. हे तर सगळेच करतात की. चार शिकेल अन बर्‍यापैकी पैसे कमावणारा आणि री हे कामासाठी बायका-पुरुष ठेवतातच. त्यात काहीच गैर नाही. मग सोवळ्यात स्वयपाकासाठी आपल्या जातीतली का असा जर प्रश्न असेल तर सून करून घेताना किंवा मुलीच्या लग्नासाठी तुम्ही (असे प्रश्न उपस्थित करणार्‍यांनी) यांचा विचार कराल का असा माझा प्रतिप्रश्न असेल. पण नात्यातली असेल तरच, डॉक्टर-इंजीनियर असेल तरच, पाच लाख कमावता/ती असेल तरच, पासून मेडिकल टेस्ट करून तुम्ही लग्न जुळवता याबधल तुम्हाला कधी लाज का वाटत नसावी?

आपल्याकडे भाड्याने जागा देतानाही आपण त्याची जात बघतो. तो आपल्या जातीतील असेल तरच त्याला ती जागा देण्याचं आपण ठरवतो. येथेही तसाच प्रकार आहे. पण येथे जाणीवपूर्वक वाद निर्माण केला गेला. बाकीच्या तात्विक गप्पा मारून काही उपयोग नाही की, तुम्हाला त्यांनी पिकावलेला धान्य,, फुलं हे-ते सगळं चालतं तर मग स्वयपाक का नाही वगैरे वगैरे… किंवा खोपे यांच्यासारख्या डॉक्टर महिलेने असा प्रकार का करावा वगैरे. त्यांनी जुनाट व बुरसटलेला विचार का करावा. प्रश्न त्यांच्या शिक्षणाचा नसून भावनेचा आहे. येथे ISRO सारख्या संस्थेतही पुजा बिजा करून ते satellite सोडले जातात. त्यामुळे कोणाच्या भावनेचा अन शिक्षणाचा काही संबंध नसतो.

खोलेबाईंना टार्गेट का केलं जात आहे हे सांगण्याची गरज नाही. त्या यादवबाई गरजू आहेत, वृद्ध आहेत आणि असं-तसं आहे तर त्यांची काय चुकी. मग मी म्हणतो की मी एका कंपनीत गेलो अन सांगितलं की माझं इंजीनीरिंग झालं आहे आणि मला सगळं coding वगैरे येतं आणि घ्या मला कामावर. त्यांनी मला ठेवलं कामावर अन मी कामही ठीक केलं. पण सहा महिन्यांनी कंपनीला कळालं की मी इंजीनियर नसून साधा एमए पास आहे तर? खोटं बोललो म्हणून मला त्यांनी काढावं की नाही? असे अनेक उदाहरण देता येतील. प्रश्न फसवणुकीचा आहे. बाकी सोवळं वगैरे गेलं खड्ड्यात. आपल्या विश्वासाचा जर कोण गैरफायदा घेत असेल तर राग येणे स्वाभाविक आहे. त्यात खोलेबाई काही चुकल्या असतील तर त्यांनाही दोषी धरा.

पण देव बाटल्याच्या कोणी गोष्टी करू नका. सर्वांचा देव एकच असतो. पण त्यांची भावना ही निर्मळ असेल तर त्या तोडायचा अधिकार कोणाला आहे? ते थोतांड असेलही पण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. समझा, मी जर एखाद्या मुस्लिम मित्राला फसवणुकीने डुक्कराचं मांस खाऊ घातलं किंवा कट्टर हिंदूला गाईचं मांस खाऊ घातलं तर मग ते बाटल्या जातील का? नाहीच. त्याच्याने त्यांचं मन मात्र कलुचित होईल. मुस्लिम बाबतीत तर सगळे बनवेगिरी पुरोगामी मंडळी तुटून पडतील. पण त्यांचा आदर करणे हा माझा विनम्रपणा आहे. उदाहरण द्यायचं तर…

त्या महाराष्ट्र भवनात एका मुस्लिम तरुणाच्या तोंडात पोळी का काहीतरी कोंबली होती. त्यावेळेस चालू होता रमजान महिना अन त्याचा होता रोजा. सगळ्या देशाला वाटलं की त्याच्या धार्मिकतेवर आघात झाला आहे. पण त्यावेळेस असं कोणीही म्हंटलं नाही की कामाच्या ठिकाणी धर्म वगैरे आणायचा नसतो. तो घरीच ठेवायचा. पण जणू त्या पोळीचा तुकडा त्याच्या तोंडाला लागला अन त्याचा रोजा तुटून तो पार नापाक झाला असं चालू होतं. त्याला कोणी प्रगत हो, सोड हे, असं काही नसतं रे असे शहाणपण शिकवले नाही.

किंबहुना सध्या जैन बांधव अन मांसाहार याबद्धलही बराच गदारोळ झाला. त्यांना कोणी सांगितलं नाही की सोडा हे बुरसटलेपण. विज्ञानाची कास धरा वगैरे. आपल्याइथे श्रावण संपण्याची वाट बघत असतात. उपवासाला गुटखापासून ना-ना पदार्थ चालतात. इथे कोणालाही काहीच वाटत नाही. मग करायचे कशाला भंपक उपवास अन तो श्रावण-पर्युषण-रमजाण ???

देव वगैरे बाटत नसतील तर मग करू जेथे जसं वाट्टेल ते. पुढच्यावेळेस प्रत्येकाने भंग्याच्या हातूनच देवाची पुजा करून घेऊ अन कामवाल्या मावशीकडून स्वयपाक करून घेऊ; तेही जात न विचारता. मग गणपतीसमोर पत्ते खेळणं, दारू पिऊन नाचणे हेसुद्धा चांगलच म्हणता येईल. कारण त्याने काही तो बाटल्या जाणार नाहीच. एखाद्या लहानग्याच्या हातून तिरंगा चुकून गटारीत पडल्याने देश बाटत नाही. होऊ देत तिरंग्याचा अपमान? पण मग मनात असलेली भावना, आदर याला काही किम्मत आहे की नाही.

              खरं सांगायचं तर आजकाल असले हे सोवळं वगैरे भंपकपणा प्रकार सार्वजनिक ठिकाणी कोणीच पाळत नाही. एका डब्यात चार मित्र जेवताना एकमेकांची जात बघत नाहीत. एकमेकाच्या ताटात हात घालताना आम्ही मित्रांनी तर कधीच केलं नाही किंवा दुसर्‍या जातीच्या मित्राकडून आलेला डब्बा संपवताना आम्हाला कधीच संकोच वाटला नाही. मुस्लिम मित्राच्या घरी शिरकूर्मा खाताना आम्हाला सोवळं आठवलं नाही अन गणपतीला उचलताना आम्ही आमच्या मुस्लिम मित्राला कधी अडवलं नाही.

बाहेर जेवायला गेल्यावर वाढपी किंवा स्वयंपाकी कोणत्या जातीचा आहे हेही कोण बघत बसत नाही. इतका शहाणपणा अन खुलेपणा सगळ्यांत आहे. पण घरात परंपरेने चालत आलेल्या गोष्टी पाळल्या जातात. ते सगळेच पाळतात. कोण पाळत नाही? आजही गावचे पाटील-कुलकर्णी-देशमुख वगैरे इतर जातीच्या लोकांना सोबत बसू देत नाहीत. वाड्यावर आल्यावर त्यांना चहा कोणत्या कपात द्यायचा हेही ठरलेलं असतं.

इथे बंडल पुरोगामित्व संकल्पना येतेच कोठे? आणि कोणीही असले संकेत पाळत नसतं. मतं देताना जिथे आपल्या जाती-धर्माचे बघून मतदान करणारे आपण घरात जात का नाही बघणार???

स्वतःला परवडेल अन पटेल त्या गोष्टी जो तो करत असतो. चीनी माल वापरू नका, ते देशाच्या तोट्याचं आहे हे सांगूनही लोक दुर्लक्ष करतातच. साधे सिग्नल न पाळणे हीसुद्धा बुरसटलेली विचारसरणीच आहे.

माझ्या भावनेचा कोण गैरफायदा घेत असेल अन त्या चिरडत असेल तर मला राग येणारच. माझी फसवणूक झाली ही भावना योग्यच आहे.

              देवाच्या नावाखाली पैसे कोण काढत नाही. साधा भिकारीसुद्धा देवाच्या दयेने पैसे द्या म्हणतो. त्याची जात कोणती असते? ब्राम्हण दक्षिणेसाठी तरसतो. चार रुपये जास्तीचे मिळावेत म्हणून वाट्टेल ते सांगतो. गणपती मंडळापासून ते मोठमोठ्या मंदिर ट्रस्टवर आमचेच मराठा बांधव ते सर्वधर्मीय असतातच. सगळेच मिळून वाटून पैसे खातात. देवाला लागणारे फुलं कोण पिकवतो अन कोण विकतो? त्या देवाची मूर्ती घडवतो? त्याला रंग कोण लावतो? त्याला सोन्याची आभूषणे कोण करून देतो? त्याचं मंदिर कोण बांधतो? रांगेत कोण उभा असतो? अठरापगड जाती देवाच्या नावाने पैसे कमवतात.

              प्रश्नअसा आहे की तुम्ही चार पैसे मिळवण्यासाठी खोटं सांगून जर एखाद्याच्या भावनेशी खेळत असाल तर ते चुकच आहे अन चुकच राहणार. तसं असेल तर मी माझी खोटी जात/धर्म सांगून दुसर्‍या जातीतील/धर्मातील मुलीशी लग्न करतो. मला लग्नासाठी मुलीची अत्यंत गरज होती, मी तिच्यावर मंनापासून प्रेम करतो, मी श्रीमंत-सुशिक्षित आहे… पण लग्नानंतर तिला कळलं की मी तिला फसवून लग्न केलं आणि आता म्हणतो माझ्या जात/धर्माचा स्वीकार कर…? आता ती मुलगी बाटल्या गेली नसेलच… किंवा खरच गरज आहे म्हणून मी सर्रास खोट्या पदव्या (मंत्र्यांप्रमाणे) वापरुन नोकरी मिळवत असेल तर…? सगळं योग्यच ठरेल की…

त्या खोलेबाई अन यादवबाईंच व्हायच ते होऊ देत. पण अनेकांचे बुरखेही फाटले अन सोवळे ही सुटले…

प्रत्येक जात/धर्म कसल्या न कसल्या प्रकारच सोवळं पाळतच असते. कधी उघडपणे तर कधी अजाणतेपणी…

सोवळं काय असतं? ते सगळ्याच धर्मात-जातीत आहे. ते सगळेच कोणत्या न कोणत्या प्रकारे मानतात.

जात बघून राहायला जागा देणं हे सोवळं…

जात बघून लग्न करणं हे सोवळं…

इथे बारा माशी-अकरा माशी ते शहान्नाव कुणबी असे भेद करून लग्न होतात ते आहे सोवळं…

डावे आणि उजवे विचारसारणीवाले एकमेकांपसून सोवळं पाळतात…

मनसे वाले शिवसेनेपासून सोवळं पाळतात…

ट्विटर वर फॉलो-अनफॉलो करून एकमेकांपसून सोवळं पाळतात…

कट्टर मराठीवाले हिन्दीपासून सोवळं पाळतात…

[[ चुकभुल द्यावी. दरम्यान, कोणाची जातीय भावना दुखावली गेली असेल तर माफी मागू का नको? कारण बोलल्याने कोण बाटल्या जात नाही. ]]

{{{{खुलासा – मी सोवळी नाही. उगाच तसदी घेऊ नका.}}}}

इथे दोन महत्वाचे लेख आहेत ज्यात आधुनिक सोवळं काय असतं

ते सापडेल…   आधुनिक अंधश्रद्धा आणि आधुनिक अस्पृशता… 

नवीन मराठी कथासंग्रह

 

जवाब दो

जवाब दो

#javabdo #जवाबदो || दाभोळकरांचे मारेकरी अन स्मृतीदिन || विवेकवाद वगैरे

नुकताच डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा स्मृतीदिन झाला. दाभोळकरांचे मारेकरी अजूनही पकडले गेले नाहीत. खरं तर ही खंत म्हणावी लागेल. कारण शांततामय मार्गाने अनिस व समर्थक यासाठी आंदोलन करत असतात. दाभोळकर, पानसरे यांच्याशी वैचारिक मतभेद कितीही असले तरी महाराष्ट्रासारख्या राज्यात स्वतःचं स्वतंत्र वलय असलेल्या, सामाजिक जडणघडणीत मोलाची कामगिरी बाजवणार्‍या विचारवंतांना संपवणे, हत्या करणे ही शरमेची बाब आहे. दाभोळकरांची हत्या की कोंग्रेस-एनसीपीच्या कार्यकाळात झाली होती. त्या सरकारला बराच अवधी असतांनाही दाभोळकरांचे मारेकरी सापडू शकले नाहीत. त्या तपासात जो अक्षम्य कारभार झाला तो सर्वांनीच पाहिला. त्यानंतर भाजप सरकार आलं. त्यांच्याकडूनही याबाबतीत काहीच निष्कर्ष हाती आला नाही.

असा सगळा प्रकार असताना अनिस व त्या विचाराशी संबंधित कार्यकर्ते पुण्यात शांततापूर्वक मार्गाने आंदोलन करत असतात. यंदा #jawabdo असा hashtag मोहीमही केली होती. पण हे सगळं चालू असताना अनिस विरोधी जो गट आहे (अर्थात वैचारिकदृष्ट्या) त्यांनी अनिसवर आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचे आरोप केला. तपशील फार उपलब्ध नाहीत, पण एका साहित्यिकाची संपत्ती लंपास केली असा तो आरोप होता.

मागे एकदा मुक्ता दाभोळकर अन हमीद दाभोळकर “चला हवा येऊ द्या” ह्या कार्यक्रमात आले होते. त्या कार्यक्रमाच्या शेवटाला पोस्टमन काकांनी एक पत्र वाचून दाखवलं होतं. अर्थात, तो कार्यक्रमाचा एक भाग होता.  त्यात अनिसला काही सल्लेही दिले होते. असो.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झालेली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर व त्यांच्या सहकार्‍यांनी त्या चळवळीद्वारे मोठ्या पातळीवर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम तर केलच शिवाय ती चळवळ सर्वांना माहीतही झाली. हे कार्य खरच कौतुकास पात्र आहे. पण माझ्या दृष्टीकोणातून ही चळवळ एककल्ली होती. डाव्या विचारसारणीचा स्पर्श या चळवळीला होता असं वाटतं. चळवळ म्हणून याबाबतीत मला आदर असला फार काही विशेष वाटत नाही. त्यात किती फोलपणा आहे हेही दाखवून देता येईल. याबद्धल मागेही लिहिलेलं आहे.

आजच विषय असा आहे की, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या नंतर ही चळवळ कुठे जात आहे. फक्त “दाभोळकरांचे मारेकरी पकडा. त्यांना शिक्षा द्या” याच्या पलीकडे ह्या चळवळीला काही काम करताना दिसत नाही. कारण तशा बातम्या येत नाहीत. दाभोळकरांचा खून हा निषेधार्य आहेच; खूनी पकडावे हेही सत्य, पण त्याच्या पलीकडे काय? भारतात, महाराष्ट्रात असे अनेक गुन्हे होत असतात. अनेक बड्या लोकांचे, आरटीआय कार्यकर्त्यांचे खून होतात. त्यातून तपास नावाच्या भंपक दिखाव्यात अनेकांची आयुष्य पणास लागतात. वर्षानुवर्षे त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. मालेगाव बॉम्बस्फोट सारख्या खटल्यात आरोपी (दोन्हीही बाजूचे) आठ-दहा वर्षांनंतर सुटतात. अनिससारखी संघटना तुम्ही एवढ्या एका कामासाठी वापरणार का? आज भाजप सरकार आहे, काल कोंग्रेस होतं, उद्या अजून कोणतं आलं तरी यातून काय निष्पन्न होईल याची शाश्वती नाही. यातून दाभोळकरांना शहीद आणि महात्मा बनवून त्यांची प्रतिमा घेऊन फिरणार आहात का? दाभोळकर, पानसरे ही मोठी व्यक्तिमत्व होते यात वाद नाही, पण त्यांच्यानंतर त्यांची चळवळ महत्वाची की ते? बर यात फक्त मुक्ता दाभोळकर अन हमीद दाभोळकर समोर दिसत असतात. ही निव्वळ घराणेशाही नाही का? का राजकीय मंडळींप्रमाणे तुम्हीही तेच आचरणात आणणार आहात? दाभोळकर गेल्यापासून अनिस किंबहुना मुक्ता व हमीद हे फक्त खून व त्यासंबंधित कारणाशिवाय कुठेच चर्चेत नसतात.

Image result for dabholkar

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, अनिसवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप. ही तर खूपच गंभीर बाब आहे. तो आरोप भलेही हिंदू संघटनांकडून झालेला असो, पण त्यावर खुलासा झालाच पाहिजे. कारण तुम्ही जर हिंदू संघटनांवर आरोप करत असाल अन त्यावर ते उत्तरदायी असतील तर तोच नियम तुम्हालाही लागू होतोच. मुक्ता दाभोळकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली ती तर खूपच चुकीची वाटते. त्या म्हणतात, “दाभोळकरांच्या स्मृतीदिनानिमित्त लक्ष विचलित करण्यासाठी हे आरोप आहेत. त्याकडे फार लक्ष देऊ नये.” म्हणजे तुमच्यावर केलेले आरोप लक्ष न देण्यासारखे अन त्यांच्यावर आरोप म्हणजे संघटनेवर बंदी आणावी. हा कुठचा न्याय? धर्माच्या नावाखाली हिंसा करणारे जितके गुन्हेगार असतात तितकेच समाजसेवी संघटनेच्या नावाखाली भ्रष्टाचार हासुद्धा तितकाच मोठा गुन्हा आहे.

आता यावर मला हिंदू संघटनेचा कार्यकर्ता वगैरे म्हणून हिणवायचं असेल तर ते तुम्हाला लखलाभो! पण मी काही तसला कट्टरवादी विचारसरणीचा नाही. हे म्हणजे, भक्त म्हणतात की मोदींविरोधी म्हणजे देशद्रोही तसं तुमच्या विरोधी बोलणं म्हणजे पुरोगामीविरोधी किंवा हिंदुत्ववादी! असो!

सर्वात महत्वाचं म्हणजे, काही मंडळी ह्या #javabdo #जवाबदो मध्ये सामील झाले त्यांची एंट्री म्हणजे हास्यास्पद आहे. ज्या लोकांना मोदी अन भाजपाला विरोध आहे, ते सतत सरकारला जाणीवपूर्वक अडचणीत आणत असतात, मग ते कोणत्याही पक्षाचे अन जातीचे असोत… ते जवाब दो म्हणतात. वास्तविक त्यांचा अनिस किंवा त्या विचारसरणीशी किती संबध आहे ते बघावं लागेल.

अनिसने याचा विचार करावा. संघटना पुढे न्यायची आहे की घराणेशाही करत फक्त ‘मारेकरी पकडा’ करत संघटनेला त्या मार्गावर लावायचं आहे.

खुलासा – माझ्यालेखी कट्टर हिंदुत्ववादी संघटना अन अनिस सारख्या संघटना ह्या समान अंतरावर आहेत. दोन्हीही संघटनांचा समाजाला फायदा व नुकसान आहे. शिवाय दोन्ही संघटना राजकीय पक्षांशी, विचारसरणीशी बांधील आहेत. Anti force वगैरे… त्यामुळे उगाच गर्दा करू नये…

संबंधित लेख…

दाभोळकरांच्या नावाने…

दाभोळकरांच्या नावाने…

दाभोळकरांच्या नावाने…

माझंमत  ||  अंधश्रद्धा निर्मूलन समिती  || पुरोगामी वगैरे  ||  नरेंद्र दाभोळकर
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आधार असलेले नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाला. एक वर्षाच्या नंतरही त्यांची हत्या करणारे हत्यारे तर लांबच राहिले पण त्यासंबंधीचे काहीच धागेदोरे सुद्धा मिळू नयेत ही म्हणजे खरच शरमेची तर आहेच पण आश्चर्यचकित करणारी बाब आहे. जिथे दाभोळकर यांच्यासारख्या जनमानसत ओळख व आदर असणार्‍या माणसाची ही व्यथा तर सामान्य माणसाचं काय होत असेल ही कल्पना करनेही भयावह आहे. उलट ह्या वर्षात दिलासा देणारी तर सोडाच पण प्लांचेट व इतर विचित्र घटनांच्या चर्चेने दाभोळकरांच्या विचारांचा पुन्हा खून करून त्यांचा अपमान केला आहे. हयामागे काही मतपेटीच राजकारण आहे की काय असाही संशय येऊ शकतो; कारण हत्यारे सापडले आणि ते जर मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही विशिष्ट संघटनांशी संबंधित असले तरी समाजातील एक विशिष्ट वर्ग नाराज होईल आणि जर तसे ते ‘त्या’ संघटनांशी संबंधित नसले तर मग मुख्यमंत्र्यांनी माहितीविनाच चुकीच वक्तव्य केल म्हणून तेच पुन्हा अडचणीत येतील. आणि जर का ते हत्यारे पकडलेच गेले नाहीत तर मग समाजातील सामान्य माणूस जो कायदा व्यवस्थे वर विश्वास ठेऊन असतो त्याचा सरकरवरचा विश्वास उडेल आणि त्यात काही सामाजिक कार्यकर्ते व संघटना त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभी करेल. अशा प्रकारे राज्य सरकार सर्व बाजूने घेरल्या गेल असल्याने तूर्तास तरी हयातून मार्ग नाही असच दिसत आहे.
दाभोळकर यांच्या हत्येनंतर अगदी गडबडून जागं होऊन राज्य सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक वटहुकुम काढून मंजूर केल. खर तर ह्याला काहीच अर्थ नाही; जो माणूस गेली अनेक वर्षे ह्या प्रस्तावासाठी लढत होता तेंव्हा त्यात दुरूस्ती व इतर अनेक कारणाने ते विधेयक लांबवत नेल आणि त्यांच्या हत्येनंतर लागलीच ते मंजूर केल, हे म्हणजे मनात नसताना केलेल्या कामासारख आहे, जे केवळ जनप्रक्षोभ कमी व्हावा म्हणून करण्यात आल आहे अस वाटत जात. राज्यातले अजूनतरी विरोधात असलेले पक्ष अजूनही ह्या विधेयकाच्या बाजूने बोलत नाहीत.
 ह्या झाल्या नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर च्या गोष्टी; पण नरेंद्र दाभोळकरांची हत्या नेमकी कोणत्या मानसिकतेतून झाली ह्यालाही एक बाजू आहे अस वाटत जात. दाभोळकर हे समाज पुढे नेण्याच काम करत होते हे फक्त तोच समजू शकतो जो सुशिक्षित आहे, ज्याचा अशा अंधश्रद्धेशी फार जवळून संबंध आला नाही किंवा तो ज्याचं ह्या अंधश्रद्धेमुळे आयुष्य उजाडल आहे! दुसर्‍या बाजूला, म्हणजे दाभोळकर यांच्या विरोधात ती मंडळी उभी आहेत जी साधिभोळी आहेत, ज्यांचा आजच्या विज्ञानापेक्षा परंपरेने चालत आलेल्या गोष्टींवर विश्वास आहे (ज्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो). जोपर्यंत एखादी गोष्ट ही अंधश्रद्धा आहे हे जर आपण कोणाला पटवून देऊ शकत नाही तोपर्यंत ती त्याच्या दृष्टीतून अंधश्रद्धा नसते. त्याला वाटत असत की आपण जे करत आहोत तेच योग्य आहे. तेही बरोबरच आहे म्हणा, कारण एखाद्या आजारावर एखादी विशिष्ट गोळी घेऊ नये, ती घेतल्याने दुष्परिणाम होतात असा जोपर्यंत शोध लागत नाही आणि तो लोकांपर्यंत पोहचात तोपर्यंत आपली ती गोळी घेण हे योग्य असत आणि नंतर ती अंधश्रद्धा!
 Image result for नरेंद्र दाभोळकर
आपण आजारी असल्यावर सर्वात आधी थोडासा घरचा उपाय करतो, त्याने काही उपयोग झाला नाही तर मग आपण आपल्या ‘फॅमिली डॉक्टर’ कडे जातो आणि तो सांगेल ते ऐकतो. त्या डॉक्टर कडे गेल्यावर आपण त्याला कधी विचारत नाहीत की तुम्ही हीच गोळी-औषध का दिलात किंवा त्याच्याकडे त्याच डॉक्टर असल्याच प्रमाणपत्रही मागत नाहीत, आपण तर फक्त तो सांगेल तोच ऐकतो; हाही एक प्रकारचा अंधविश्वासच म्हणावा लागेल. त्याच्यानंतर आपण कधीतरी दैनिकात वाचतो की आपला ‘फॅमिली डॉक्टर’ हा असली डॉक्टर नाही, तो तर वैद्यकीय महाविद्यालयातून नापास झालेला माणूस आहे. अस झाल्यानंतरही आपण काही सगळ्याच डॉक्टर लोकांना भामटा ठरवत नाही, सगळेच डॉक्टर फसवेगिरी करणारे अस मानत नाही उलट नवीन डॉक्टर हुडकतो ज्याच्याबद्दल आपल्याला खात्री आहे. आता हीच गोष्ट आपण ज्योतिष शास्त्राबद्दल म्हणू शकतो. ज्योतिष हे शास्त्रच नाही अस दाभोळकर म्हणायचे; ते शास्त्र आहे की नाही ह्यावर अनंत वाद होत राहतील, होत रहावेत. पण एक गोष्ट आपण लक्षात घेत नाहीत की ज्या काळात साधे चष्मे सुद्धा नव्हते त्या काळात ज्योतिष विद्या निर्माण करणार्‍या मुनीने आकाशात करोडो किलोमीटर दूर असलेल्या तार्‍यांबद्दल कस लिहिलं? ज्योतिष शास्त्रात असलेल्या किंवा उल्लेखलेल्या ग्रहांचा शोध तर अठराव्या-एकोणीसाव्या शतकात लागला, मग ते ज्ञान जर त्यांनी त्या काळी मिळवल असेल तर त्यांनी लिहीलेल्या विद्येला काहीतरी अर्थ असेलच ना. बर तसा काही अर्थ असो-नसो पण समाजातील काही घटक जर त्यावर विश्वास ठेऊन असतील तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, ज्याने समाजाला काही हानी पोहोचत नाही. ज्योतिष ही विद्या नसतानाही लोकांना फसवणारे, लुबाडणारे महाभाग आहेत, त्यांना जेरबंद करावं. हे महाभाग आणि प्रमाणपत्र नसतानाही डॉक्टर म्हणून मिरवणारे हे सारखेच की; त्यामुळे एका चुकीच्या माणसा मुळे आपण संपूर्ण डॉक्टर चुकीचे आहेत अस म्हणू शकत नाहीत तसच काही लबाड ज्योतीशींमुळे संपूर्ण ज्योतिष हे शास्त्र नाही अस म्हणणं चुकीच ठरेल.
  नरेंद्र दाभोळकर यांचा हेतु कधीच वाईट नव्हता, पण समाजात असलेल्या आणि ज्यावर अनेकांची श्रद्धा(अंध) असलेल्या अनेक गोष्टी असतात, पण त्यावर सरळ-सरळ आघात करण हे समाजाला आणि त्याच्या मानसिकतेला धक्का पोहोचवणार ठरू शकत. त्यांनी समजातल्या अनेक चुकीच्या गोष्टींबद्दल आवाज उठवला, त्या गोष्टी बंद पाडल्या आणि गावा-वस्त्यांवर जाऊन लोकजागरणाच काम केल जे कौतुक करण्याजोग आहेच. पण कालपर्यंत ज्याला देव मानतो किंवा ज्याची आपण पुजा करत होतो ती गोष्टच चुकीची आहे, त्यावर आपला विश्वास चुकीचा आहे अस जर आपल्याला कोणी येऊन सांगत असेल तर आपण बिथरतो. एका सहा वर्षाच्या मुलाला जर कोण जाऊन सांगितलं की सहा वर्ष सांभाळणारी, तुला खाऊ-पिऊ घालणारी ही तुझी खरी आई नाही तर तो त्या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवणार नाही, उलट त्यालाच तो चुकीचा ठरवेल.
                                 
नरेंद्र दाभोळकर यांच्याशी असलेली लढाई ही वैचारिक पातळीवर होती; जी त्यांना मारून त्यांच्या विरोधकांनी हरली आहे. देशात एका बाजूला वाढता चंगळवाद आहे आणि दुसर्‍या बाजूला हे अज्ञान. बाहेर जाऊन पार्ट्या करण, पिक्चर बघन मौज करण्यासाठी काहीही करन हाही एक प्रकारचा अंधविश्वासच आहे की; ह्यावर आळा कोण घालणार? अशा गोष्टींनी समाजाचं भल होत नसतच; येथेही लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेऊन पैसा कमावणारे आहेतच की; मग ह्यांना का मोकळं सोडाव? धर्माच्या आणि अंधश्रद्धेच्या नावावर लुटणार्‍या आणि अशा चंगळवादी गोष्टीचा गैरवापर आपल्या फायद्यासाठी करणार्‍यांत काय तो फरक? ह्या दोघांनाही एकाच तुरुंगात का डांबू नये? केवळ ह्याचा संबंध देशाच्या अर्थव्यवस्थेशी असल्याने ह्यांना कोणी काहीच करू शकणार आणि याच्या उलट धर्माचा आधार असल्याने त्यांना कोणी काही करू शकणार नाही.
   देशातील अनेक खेड्यापाड्यांत, वाड्या-वस्तींवर अजूनही योग्य नागरी सुविधा पोहोचलेल्या नाहीत. कुठे रस्ते नाहीत, कुठे वीज नाही, कुठे शाळा नाहीत तर कुठे साधा दवाखाना काय असतो हेसुद्धा माहीत नाही. अशा ठिकाणी एकच गोष्ट नांदत असते, ती म्हणजे अज्ञान! रस्ते व वीज नसल्याने आपल्या आप्तांनी बाहेर दूर कुठे जाऊ नये, त्यांना काही इजा पोहचू नये म्हणून मग मनाच्या गोष्टी तयार करून सांगाव्या लागतात; कोण आजारी पडल्यावर तो मरणार आहे पण, त्याला योग्य उपचार आपण देऊ शकत नाहीत म्हणून केवळ त्याच्या व आपल्या मनाच्या समाधानासाठी काहीतरी अघोर उपाय करावे लागतात; ह्या अंधारपासून, अज्ञानापासून, पीडेपासून कोणीतरी आपल रक्षण करावं म्हणून कुठलीतरी अज्ञात शक्तिवर बळजबरीने किंवा स्वेच्छेने विश्वास ठेवावाच लागतो; जिथे शिकायला शाळा नाहीत, मनोरंजनाचे काही साधन नाहीत, बेरोजगारी आहे तिथे मग भलतेसलते खेळ व कार्यक्रम आपोआप सुरू होतात. ह्या सर्व गोष्टी घडत असतात, ज्याला आपण शहरात, अगदी आराम आयष्य जगणारे अंधश्रद्धा अस म्हणतो. जेंव्हा आपल बाहेर गेलेलं लेकरू बराच वेळ होऊनही घरी आलेल नाही, बाहेर जोरदार पाऊस पडतो, त्याला फोन लागत नाही म्हणून आई-आजी देवासमोर बसतात तेंव्हा ती अंधश्रद्धा आहे का हे त्यांना काळात नाही, पण आपल लेकरू सुरक्षित राहावं यासाठी ते अज्ञात शक्तीकडे प्रार्थना करतात, नवस बोलतात आणि त्यातून मनाच्या समाधानासाठी का होईना मग आपसूकच देवासमोरची निरांजन दाराच्या कडीवर बसते. ह्या सगळ्या गोष्टी ह्या अंधश्रद्धा आहेत हे आपण मोठमोठ्याने ओरडून सांगू, पण त्याच महत्व काय आहे हे त्यांनाच काळात. जिथे मेंदूवर मन मात करत तिथे अंधश्रद्धा निर्माण होत राहतात. त्या निर्माण होऊ नयेत, समाज सुधारत जावा अस वाटण साहजिक असत, पण त्यासाठी मनाच्या ह्या गोष्टींवर हल्ला करण्याऐवेजी, मेंदूला पटणार्‍या अशा मूलभूत गरजा पुरवण आणि त्यावर विश्वास ठेवायला लावण खूप गरजेचं आहे.   

पुणे – सांस्कृतिक राजधानी???

पुणे – सांस्कृतिक राजधानी???

पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे का? || Pune – Cultural Capital  ||  पुणेकर  || पुणेरी  || इतिहास ते वर्तमान  ||
खुलासा – तुम्ही लेख वाचावा याच्याआधीच एक सांगू इच्छितो की जे काही लिहिण्याचा, मांडण्याचा प्रयत्न केला आहे तो माझ्या मर्यादित विचारांना अनुसरून केलेला प्रयत्न आहे. यात चुकीची दिशा असेल किंवा चुकीची मते असू शकतात; पण ती माझी मते आहेत. आणि सांगायची बाब म्हणजे, कालांनुरून बदलत गेलेले दृष्टीकोण, आणि बुद्धीत पडत गेलेली भर (?) यामुळे ह्या लेखात दोनदा बदल केलेले आहेत. चुकले असल्यास क्षमा!!!  
कालच एका विनोदी कार्यक्रमात ऐकून गुळगुळीत झालेला विनोद परत ऐकला की, सीताफळात सीता असते का? रामफळात राम असतो का? वगैरे वगैरे. विनोद तसा वास्तव्यास धरून आहे, की एखाद्या वस्तूला आपण ज्या नावाने ओळखतो त्या नावात आणि त्या वस्तूमध्ये खरचं काही संबंध किंवा साधर्म्य आहे का? हे म्हणजे शरीराने आडदांड असलेल्या व्यक्तिला छोटू किंवा बारक्या म्हणावं का असा सवाल आहे. असो!!! हा विचार करताना एक विचार सहज डोक्यात आला की आपण पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी म्हणतो
खरं, पण आजच्या पुण्यात खरंच आपली अशी, महाराष्ट्रची संस्कृती शिल्लक आहे का???
 
हा प्रश्न पडला आहे तो खूप गंभीर, मजेशीर आणि काल रात्रीची झोप उडवणारा होता. आपण पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी म्हणतो याला काहीतरी आधार असावेत, काही कारण असावीत जेणेकरून पुण्यालाच आपण आपली सांस्कृतिक राजधानी मानतो. ज्याप्रमाणे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे कारण तिथे अर्थकारणाशी संबंधित अनेक संस्था आहेत, बडे-बडे उद्योग आहेत, corporate houses, वित्तीय संस्था आहेत आणि तत्सम अनेक गोष्टी आहेत ज्या अर्थकारणाशी निगडीत आहेत. किंवा देशाची राजधानी दिल्ली आहे कारण तिथे संसद आहे, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, सर्व राजकीय नेते तिथेच असतात, शासकीय-प्रशासकीय केंद्र असल्याने दिल्ली राजधानी म्हणता येईल.
 
ज्याप्रमाणे आर्थिक, राजकीय, प्रशासकीय राजधानी असण्याला काही आधार आहेत त्याचप्रमाणे एखादं शहर-गाव सांस्कृतिक राजधानी असण्याला तसेच काही आधार किंवा निकष असावेत. यासाठी संस्कृती म्हणजे नेमकी काय असते त्यानुसार सांस्कृतिक आधार शोधता येतील अन त्याचे निकष ठरवता येतील.
 
माणूस जेंव्हा आदिमानव होता तेंव्हा, म्हणजे निसर्गाने माणसाला निर्माण केलं तेंव्हा तो प्रकृतीच्या अर्थात निसर्गाच्या नियमांनुसार राहत होता. उघडा-नागडा राहायचा, वाट्टेल ते खायचा, वाट्टेल तेथे राहायचा, स्पष्ट बोलू शकत नव्हता, समूहात राहत नसायचा वगैरे वगैरे. पण कालानुरूप त्याला काही गोष्टी उमजत गेल्या आणि मानवी विकास होऊ लागला. म्हणजे प्रकृतीनुसार राहणारा माणूस एका संस्कृतीनुसार राहू लागला, ज्याला organized  म्हणता येईल. 
 
जगात मग राहण्या-खाण्याच्या, बोलण्याच्या, वागण्याच्या, आचारणाच्या, भाषेच्या, विचारांच्या, पद्धतींच्या आधारावर झुंड राहू लागले. त्याला सभ्यता असं म्हणतात,म्हणजेच जगात विविधांगी अन विविधरूपी संस्कृती नांदू लागल्या. त्याप्रमाणे प्रत्येक संस्कृतीची स्वतःची एक ओळख निर्माण झाली. मग भौगोलिक प्रदेश, वातावरण, निसर्ग, गरजा, ऐतिहासिक घडामोडी, आक्रमणे यानुसार त्या-त्या संस्कृतीत बदल होत गेले. अशा अनेक संस्कृतींपैकी आपली महाराष्ट्राची एक संस्कृती उभी राहिली!!!
 
महाराष्ट्राच्या संस्कृतीला अमृताहुनी गोड अशा मराठी भाषेचा ठेवा लाभला. अनेक भाषा काळाच्या ओघात विस्मृतीत गेल्या, नामशेष झाल्या, पण मराठी अजूनही टिकून आहे, वाढत आहे. कुठल्याही संस्कृतीची पहिली ओळख ही तिथली भाषा असते, आणि आपली ती मराठी आहे!!!
 
आता मूळ विषयावर यायचं झालं तर पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे का यावर आपण बोलत होतो. तर वर जे काही सांगितलं त्यानुसार भाषा, राहणी, कला, खाद्यसंस्कृती, राजकीय-सामाजिक चळवळ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतिहास या निकषांवर आपण पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानत असू असं मला वाटतं. कारण पुण्याला सांस्कृतिक राजधानी हा दर्जा सर्वात आधी कोणी दिला किंवा तसा उल्लेख सर्वात आधी कोणी केला याबाबतीत मला काही माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे जे आधार-निकष आहेत त्यावरच पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे का हे तपासून पाहावं लागेल.
 
इतिहासापासून सुरुवात करायची ठरवली तर पुण्याला अतिशय विशाल आणि जाज्वल्य इतिहासाची पार्श्वभूमी लाभली. अगदी प्राचीन काळापासून मुळा-मुठा नदीच्या काठावर वसलेली पुनवडी ते पुण्य नगरी असा तो प्रवास आहे. ज्या भूमीत मोघलांनी गाढवाचा नांगर फिरवला तिथे जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला. आणि पुणे हे ते शहर आहे जिथे शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषाचं बालपण गेलं. तेथून पुण्याच्या सांस्कृतिक जडणघडणला वेग आला. त्यानंतरचा इतिहास झाला आणि पुण्यात पेशवाई नांदू लागली. पेशवाईचे संस्कार हेच कित्येक वर्षे पुण्याच्या संस्कृतीला वेगळी ओळख देत आले. किंबहुना याच पेशवाईमुळे इथे ब्राम्हण वर्ग मोठ्या संख्येने राहू लागला आणि पुण्याची, त्या शहराची स्वतःची संस्कृती सुरू झाली. पुण्याच्या संस्कृतीवर पेशवाई आणि ब्राम्हण संस्कारांचा पगडा हाच एकेकाळी पुण्याच्या संस्कृतीचा विषय आणि ओळख होता.
 
त्यानंतर इंग्रज आले. दरम्यानच्या काळात पुणे हे देशभर आणि जगभर प्रसिद्ध झालेलं होतं. पेशवाईनंतरचा काळ (दरम्यानचा काळ पोकळी म्हणता येईल) खरा पुण्याचा सुवर्णकाळ आणि वैभव प्राप्त करून देणारा काळ असं म्हणता येईल. कारण ह्या पुण्याने संपूर्ण भारताला एक सामाजिक व राजकीय दृष्टी दिली आणि वलय प्राप्त करून दिलं.
 
सर्वात आधी नाव घेतलं पाहिजे ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं. पुण्यात सामाजिक चळवळीची सुरुवात तर त्यांनी केलीच पण एक नवा दृष्टीकोण ठेवत एक नवीन पिढी निर्माण करण्याचा अमूल्य कार्य त्यांनी केलं. ह्या काळात पुण्यामध्ये सांस्कृतिक घुसळनीला प्रामुख्याने सुरुवात झाली असं म्हणता येईल. अन्यायाविरुद्धचा आवाज आणि संघर्ष पुण्याने स्वतः तर पाहिलाच पण त्याचा प्रकाश देशभर पसरत होता. सावित्रीबाई फुले यांचं स्त्रीमुक्तिच्या दिशेने टाकलेलं पाऊल संस्कृतीच्या बंधनाला छेद देऊन पुढे जाणारं ठरलं आणि पुण्याच्या अंतर्गत दोन विविध विचारांच्या संस्कृतींचा जन्म झाला. महात्मा फुले यांच्यानंतर आगरकर, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, गोखले  यांनी पुण्याला देशाच्या पटलावर महत्वाचं स्थान मिळवून दिलं. ह्या पिढीने देशभरात अक्षरशः सामाजिक अन सांस्कृतिक घुसळण घडवली. जहाल-मवाळ, डावे-उजवे, ब्राम्हण-ब्राम्हनेतर अशा विविध विचारधारा पुणे नामक शहरात नांदत होत्या. ह्याच काळात पुण्यावर असलेल्या पेशवाईची छाप काही प्रमाणात पुसट होत गेली आणि नवीन विचारांनी स्वतःचे सांस्कृतिक वलय निर्माण केले. ज्या काळात स्त्रिया एका चौकटीत मर्यादित होत्या तेंव्हा सावित्रीबाई फुले आणि मग रमाबाई रानडे यांनी स्त्रीमुक्ति आणि स्त्रीशिक्षणाचा दिलेला लढा हा काळाच्या पटलावर महत्वाचा बिन्दु मानला गेला.
 
यानंतरचा पुण्याचा चुंबकीय गुण ठरला तो शिक्षण क्षेत्र!! सावित्रीबाई फुले आणि रमाबाई रानडे यांच्या कार्याला पुढे नेण्याचं समाजकार्य होत राहिलं. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र इतिहास घडवला. त्यानंतर नूतन विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल यांनी आदर्श निर्माण केले. टिळक-आगरकर यांच्या फर्ग्युसन महाविद्यालयाने तर देशभर लौकिक मिळवला. टप्प्याटप्याने पुण्यात भांडारकर इंस्टीट्यूट, इतिहास संशोधक मंडळ, डेक्कन संस्था यांसारख्या दर्जेदार संस्थांची पायाभरणी झाली ज्यातून आदर्शवत कार्य घडत गेलं.
 
एका बाजूला सामाजिक-राजकीय आणि शिक्षण क्षेत्रात पुणे अग्रेसर असताना कला क्षेत्रातही पुण्याने स्वतःचा ठसा उमटवायला सुरुवात केलीच होती. ह्या कलेच्या बाबतीत सर्वात महत्वाचं स्थान हे नाटक आणि संगीत क्षेत्राला दिलं गेलं पाहिजे. अण्णासाहेब किर्लोस्कर, बालगंधर्व, राम गणेश गडकरी, कृष्णजी खाडीलकर, टेंभे गुरुजी अशा दिग्गज मंडळींनी कला क्षेत्राद्वारे पुण्याचं नाव देशभर गाजवलं. या नाटकांचे संस्कार पुण्यातील लोकांवर नकळतपणे होत राहिले. त्यातूनही पुण्याची सांस्कृतिक जडणघडण होत राहिली. खासकरून पेहराव, भाषा शैली यामध्ये स्थित्यंतर येत गेली. संस्कृती ही कशी नकळतपणे बदलत जाते याचं हे मूर्तीमंत उदाहरण म्हंटलं पाहिजे.
एका बाजूला रंगभूमीचा वैभवकाळ बघितल्यानंतर पुणे चलचित्र अर्थात चित्रपट क्षेत्रासाठी तयार झालं. रंगभूमीचे दिवस जरा मागे पडले आणि मग “प्रभात” झाली. बाबूराव पेंटर, विष्णूपंत दामले, व्ही. शांताराम, एस.फत्तेलाल, सीतारामपंत कुलकर्णी, केशवराव धायबर अशा
दिग्गजांच्या प्रयत्नाने प्रभात संस्था सुरू झाली आणि या संस्थेने मराठीच नव्हे तर हिन्दी चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ मिळवून दिला.
 
पहिली पिढी काळाच्या पडद्याआड गेली असताना पुणेकरांच्या साहित्यिक भूक भागवायला नवीन पिढी तयार होती. आचार्य अत्रे, पू. ल. देशपांडे, शांता शेळके, ना. स. ईनामदार, ना. सी. फडके, राजा ठाकूर, श्रीकांत मोघे, राजा परांजपे, सुधीर फडके, यशवंत दत्त, राम कदम, माडगुळकर बंधु, हरी नारायण आपटे……………. ही न संपणारी यादी, यांनी आपापल्या कलेने तो काळ अक्षरशः भारावून अन बहरून टाकला होता. त्यानंतर भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, पंडित अभिषेकी बुवा यांनी तर रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ही नावे संपणारी नाहीत. अशा अनेक दिग्गजांनी पुण्याच्या संस्कृतीला वेळोवेळी समृद्ध बनवलं.
 
ज्याप्रमाणे कला, साहित्य क्षेत्रात पुढच्या पिढीने समृद्ध परंपरा पुढे चालवली त्याप्रमाणे राजकीय व सामाजिक क्षेत्रात मात्र पुणे कमनशिबी ठरला असं म्हणावं लागेल. ज्या पुण्याने आणि तेथील राजकीय-सामाजिक नेतृत्वाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रक्रियेत मोलाची कामगिरी बजावली त्या पुण्याने स्वातंत्र्योत्तर काळात मात्र विसावा घेतला असं वाटतं. काही अपवाद वगळता पुण्यातून समाजाला दिशा देणारं नेतृत्व उभं राहिलं नाही असं दिसतं. ज्या शहराने देशाला नेतृत्व अन दिशा दिली ते सत्तरीच्या दशकाकडे सरकताना तिथे राज्याच्या दृष्टीने दखलपत्र नेतृत्वही देता आलं नाही.
 
आता संस्कृतीच्या बाबतीत बोलत असताना सर्वात महत्वाचा मुद्दा उरतो तो भाषेचा!!! पुणेरी मराठी याबद्दल आजही विनोद केले जातात, पण पुण्याची मराठी ही त्यांची स्वतंत्र ओळख राहिली आहे. पेशवाईच्या संस्काराखाली आणि ब्राम्हण वर्ग जास्त असल्याने पुण्याच्या मराठीला संस्कृत चा साज चढलेला होता. ते उच्चार, तो लहेजा हा पुणेरी मराठीला चकाकी मिळवून देत होता. पुढे नाटक व चित्रपट याद्वारेही तीच भाषा तसेच संस्कार रुजत गेले. पुण्याची मराठी ही ‘शुद्ध’ मराठी असते आणि बाकीची मराठी ही अशुद्ध असते अशी अंधश्रद्धा पसरत होती आणि त्यातून प्राकृत मराठी वगैरे भाषावादही झाले. पण पुणेकरांची मराठी ही नेहमीच कुतुहुलाचा विषय राहिला. संस्कृतमधील शब्दांचा वापर आणि अस्सल मराठी शब्दांची शैलीदार शब्दफेक हा त्या भाषेतील गोडवा राहिला. विनाकारण अपभ्रंश किंवा तुटक शब्द किंवा वेडेवाकडे उच्चार हे पुणेरी मराठीत कधीच घुसखोरी करत नव्हते. त्यामुळे पुणेकर बोलत असताना शुद्धतेच्या शिखरावर पोहोचल्याचा भास व्हायचा.
 
वर नमूद केलेल्या प्रत्येक बाबतीत, प्रत्येक क्षेत्रात पुणे इतर शहरांपेक्षा उठावदार होतं. इतर सर्व शहरांच्या दृष्टीने येथे अधिक गुणवत्ता आहे हे ठळकपणे उमटत होतं. येथील विविध समृद्धतेने नटलेल्या माणसांनी पुण्याला नेहमीच महाराष्ट्रापेक्षा एका वेगळ्या उंचीवर ठेवलं होतं. सर्वच बाबतीत पुणे इतरांना आदर्शवत कार्य करत होतं. ज्याला आपण भारतीय (हिंदू नव्हे?) संस्कृतीचा मूळ पाया, मूळ ओळख म्हणतो ती पुण्यात बहरत होती. पुण्यात ज्यांनी कार्य केलं, नाव कमवलं ते मूळचे पुणेकर होते असं नाही. यातील अनेकजण इतर ठिकाणांहून पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांची जन्मभूमी वेगळी असली तरी पुणे ही त्यांची कर्मभूमी होती. पण पुणेकरांनी त्यांना स्वीकारलं. येथे एकाच वेळी अनेक विचारांची लोकं राहत होती आणि कार्य करत होती. पुण्याने सर्वांना कवेत घेतलं. भारताची “वसुधैव कुटुंबकम” ही संस्कृती पुण्याने रुजवली होती. पुण्यात एखादा परदेशी व्यक्ति आला तर त्याला तेथे राजकीय-सामाजिक-भाषिक-खाद्य-कला-साहित्य अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी भेटायची, तीही विविध विचारांची प्रेरित असलेली. त्यामुळे भारतीय आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचं विविधांगी रूप प्रभावीपणे डोळ्यासमोर यायचं.
 
ह्याच विविध पातळीवर पुणे हे महाराष्ट्राची “सांस्कृतिक राजधानी” ही बिरुदावली अभिमानाने मिरवत आहे (होतं?) ज्याच्या आसपास इतर शहरे दिसत नसायची.
Related image
 
आज पुण्याकडे पाहताना –
 
आज आपण 2018 वगैरे मध्ये उभे आहोत. काळाने कूस बदलली आहे. ज्या निकषांवर अन ज्या आधारावर पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जायची त्या गोष्टी तशाच्या तशा आहेत का याचाही धांडोळा घेतला पाहिजे.
 
पुण्यातील लोकं मुंबईच्या धकाधकीच्या जीवनाकडे बघून नेहमीच नाकं मुरडत आली आहेत. जे जे इतर ठिकाणी नाही ते ते पुण्यात आहे “पुणे तिथे काय उणे” असं म्हणत पुणेकर आरामात, मनस्वी जीवन जगत होते. पुणेकरांच्या दुपारच्या झोपेचे तर काय कौतुक असायचं. चार-दोन रूम भाड्याने चढवून पुणेकर मात्र मस्त ऐसपैस जीवन जगत होता. हे सगळं पुणेरी आयुष्याचा अविभाज्य घटक झाला होता. पण अलीकडे ह्या सगळ्या गोष्टी लोप पावल्या आहेत हेही तितकच खरं. पुणेरी बाणा आणि कट्टर पुणेकर हा फक्त विनोदापुरता मर्यादित राहिला आहे असं वाटतं.
सदाशिव पेठेचं विनोदांत किंवा कथेत सांगितलं जाणारं स्वरूप हे केंव्हाच कालबाह्य झालं आहे. ह्या पेठा म्हणजे आता गर्दीची ठिकाणं आणि दुकांदारांच्या दृष्टीने ग्राहकांची वरदळ असलेली ठिकाण झाली आहेत. तेथील लोकांच्या अंगात असलेला बेरकीपणा हा चेष्टेचा विषय असतो, जो फक्त ऐकीव उरला आहे. ज्या पेठेत सांस्कृतिक पुण्याचा आरसा दिसायचा तोच मुळात धूसर झाला आहे.
 
 जागतिकीकरण होत असताना पुण्याने स्वतःची ओळख विसरली आहे असं दिसतं. इतर शहरांप्रमाणेच पुणेही केवळ एक शहर राहिलं आहे. चारही दिशांना अवाढव्यपणे वाढलेलं पुणे हे पुणेरी संस्कृतीच्या बाहेर गेलं आहे अशी जाणीव होते. पुण्याच्या एका भागातून दुसर्‍या भागात जाण्यासाठी दोन-दोन तास लागतात. जे धकाधकीचं जीवन मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या नशिबी आहे तेच पुण्याच्या पदरीही आहे हेच जाणवतं. या अवाढव्य पुण्यात कुठेच महाराष्ट्रीय संस्कृतीचा लवलेश दिसत नाही. घडाळ्याच्या काट्याच्या वेगावर धावणारा पुणेकर मात्र पुण्यात सगळीकडे दिसतो. अर्थात, काळाच्या अनुसार बदल हे क्रमप्राप्त आहेच, ते पुणेकरांनी आत्मसातही केलेलं आहे. पण आता पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी असलेलं पुणे हे शहर अन उपनगर अशा विभागात वाटल्या गेलं आहे. मुळात पुण्यामध्ये मूळ पुणेकर आणि बाहेरून आलेला असे दोन घटक आहेत. बाहेरून आलेला व्यक्ति स्वतःची ओळख पुण्याला देऊ लागला आहे, पुण्याची संस्कृती त्याच्यात भिनताना दिसत नाहीये. IT च्या प्रवाहात आजचं पुणे वाहत आहे असं जाणवतं. अर्थात ते चूक आहे असही म्हणणं नाहीये.
 
पू. ल. देशपांडे यांनी आपल्या लेखनातून पुण्याच्या बाबतीत जे सांगितलं आहे निदान ते तरी पुण्यात आज टिकून आहे का हेही तपासावं लागेल. एकेकाळी साहित्यक, संगीत, इतिहास यावर कट्ट्यावर बसून चर्चा करणारा पुणेकर आज मात्र स्क्वेर फुटाचे भाव अन वाढत चाललेला बकालपणा यावर बोलत असतात. हीच का पुण्याची ती माणसे ज्याबद्दल पुलंनी सांगितलं होतं असा साहजिक प्रश्न पडतो. हल्ली पुण्यात एखाद्या वक्त्याच्या सभेला जितकी गर्दी होते त्यापेक्षा जास्त सुजाता मस्तानी खायला होते. ही वैचारिक अदोगती नाहीतर काय ? हल्ली जितकी गर्दी मॉल वं मंदिरात होते त्याच्या दहा टक्के गर्दीही विविध चर्चासत्र किंवा सभेला होत नाही.
 
ज्या विविध क्षेत्रात पुण्याने भूतकाळात आपला ठसा उमटवला त्या क्षेत्रात आज पुणे कुठे आहे हे पाहावं लागेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रातील अवकाश तर पुण्याने केंव्हाच गमावला आहे. देशाला नेतृत्व आणि दिशा देणार्‍या पुण्यात आज साधा राज्यस्तरीय नेताही दिसत नाही. ज्या पुण्यात विचारांच्या आधारावर, तत्वांच्या आधारावर सामाजिक-सांस्कृतिक घुसळण होऊन विचारांची देवाणघेवाण झाली आणि समाज समृद्ध हेत गेला, त्या पुण्यात आजचं राजकीय नेतृत्व स्क्वेर फुट आणि गुंठेवरीच्या राजकरणात अडकलेलं दिसतं. किंबहुना उद्योगपती हेच पुण्यातील राजकीय पुढारी होऊन बसले आहेत असं चित्र आहे. वैचारिक अधिष्ठान तर नाहीच पण समाजाच्या दृष्टीने योग्य-अयोग्य याची जाण असलेलं नेतृत्वही पुण्याला लाभत नाही ही शोकांतिका म्हंटली पाहिजे. नाही म्हणायला दोन-तीन अपवाद आहेत, पण लांब पसरलेल्या अंधाराला उजळून टाकण्याची क्षमता त्या प्रकाशात नाही हेही तितकच खरं. विठ्ठल रामजी शिंदे, एसएम जोशी यांच्या समृद्ध राजकीय परंपरा पुढे चालवल्या गेल्या नाहीत. भाडोत्री गुंड आणि इवेंट मॅनेजमेंट कंपन्यांच्या मार्फत सध्याचं राजकारण चालत असून त्याला तत्वांची जोडणी कितपत आहे याचं संशोधन करावं लागेल.
 
राजकारण्यांनी समाजकारण करण्याचे दिवस कालबाह्य झाल्याने त्यांच्याकडून समाजसेवा अपेक्षित नाही. सामाजिक क्षेत्राच्या बाबतीत त्यातल्या त्यात बरी अवस्था आहे असं म्हणता येईल. त्या सामाजिक कार्याला भलेही एनजीओ चं स्वरूप आलं असेल पण त्यामार्फत तरी किमान सामाजिक कार्य चालू आहे ही समाधानाची बाब म्हणता येईल. समाजाच्या नेमक्या समस्या काय आहेत याबाबत एकेकाळी तीव्र मंथन होत होतं, पण आता ते सामान्यपणे चालू आहे.
राजकीय-सामाजिक क्षेत्राला वृत्तपत्र या स्तंभाने नेहमीच सकारात्मक दिशेने कार्यरत ठेवलं पाहिजे असं म्हणतात, पण आज पुण्यातील वृत्तपत्र निव्वळ जाहिरातींची पाने झालेली दिसून येतात. जिथे “केसरी” सारख्या वृत्तपत्रामार्फत सरकारला ताळ्यावर आणायची क्रिया घडत होती तेथील आजच्या वृत्तपत्रत बातम्यांच्या नावाखाली फक्त नागरी समस्यांचा पाढा वाचलेला असतो. प्रत्येक वृत्तपत्रात बिघडलेली पीएमटी किंवा उखडलेले रस्ते, फुटलेली पाण्याची वाहिनी याच्यापेक्षा वेगळी काहीच बातमी नसते. म्हणजे समाजात यापेक्षा वेगळं काहीच चालू नाही असा समज होतो. यामुळे मुळात जो वाचक असतो, जेथून बंड होण्याची शक्यता असते तोच थंड झालेला असतो.
त्यामुळे राजकारण-समाजकारण इत्यादि बाबतीत पुणे इतरांना काही देऊ शकत नाही ही आजची स्थिती आहे. संस्कृतीच्या बाबतीत पुण्याची ही राजकीय-सामाजिक स्थिती पुण्याला मागास बनवते आहे.
 
कला क्षेत्रात पुण्याने भूतकाळत जी गवसणी घातली त्याची आजच्या काळाशी तुलना थोडी क्रमप्राप्त ठरणार नाही. कारण तंत्रज्ञानाच्या युगात हव्या असलेल्या गोष्टी गावोगावी उपलब्ध झाल्या असल्याने फक्त पुण्यातच कलेला वाव आहे अशी परिस्थिती राहिली नाही. साहित्य-कला-अभिनय-संगीत या क्षेत्रात पुण्यातील मागच्या पिढीने इतकं करून ठेवलं आहे की आजची तरुण पिढीलाही त्याचच आकर्षण आहे. महाराष्ट्रातील इतर शहरांच्या तुलनेने पुण्यातील रंगभूमीवर अजूनही जोश टिकून आहे. तेथे नवनवे संक्रमण होत असतात, नवनवे पायंडे पाडले जात असतात. पण हल्ली दहातील पाच पुणेकर लेखक किंवा कलाकार असतात त्याला इलाज राहिलेला नाही. ज्या पुण्यात अनेक दिग्गज लेखकांनी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं तसे लेखक-साहित्यक आज मात्र घडताना दिसत नाहीत. डिजिटल झालेल्या युगात पुस्तक प्रकाशनेही थंड होत आहेत. तरुण मंडळी सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागल्याने विशिष्ट लेखनाला काही अर्थच उरला नाही. काहीतरी करण्यासाठी पुण्यात येणार्‍यांचे जत्थे मात्र अजूनही चालूच आहेत. काहीतर सृजनशील घडावं यासाठी तरुण पिढी झगडते आहे हेही नसे थोडके! राजकारण-समाजकारण बाबतील अगदीच असलेली अवकळा ह्या तरुण पिढीने कला क्षेत्रावर येऊ दिली नाही हेच खूप झालं. पण आजही प्रत्येकाच्या घरात मागच्या पिढीतील लेखकांच्या लिखाणाची पारायने चालू असतात, ती नवीन लेखकांच्या पुस्तकांच्या दिशेने जावीत यासाठी काहीतरी करायला हवं. हल्ली गावात राहणारा तरुणही डिजिटल तंत्राद्वारे स्वतःची कला जगाच्या कानाकोपर्‍यात पोचवू शकतो, त्यामुळे त्याला पुणे-मुंबई सारख्या शहरात जावं लागत नाही. पण काहीका असेना, मागच्या पिढीने साहित्य-कला याबाबत जी ओढ दाखवली आहे ती नवीन पिढीत आहे हे नक्की.
 
शिक्षण क्षेत्र, जेथून संस्कृतीला आकार, रूपरेषा मिळते ते क्षेत्र. पूर्वेच ऑक्सफोर्ड अशी बिरुदावली केंव्हाच गळून पडलीय. एकेकाळी शिक्षण घेण्यासाठी देशभरातून विद्यार्थी येत, ते आजही येतात पण तो दर्जा आज पुण्यात राहिलेला नाही. ही गत फक्त पुण्याची आहे असं नाही, पण मग पुणे वेगळं का म्हणून म्हणायचं. म्हणायला सिंबायोसिस, भारती विद्यापीठ सारख्या संस्था दर्जेदार शिक्षण देतात पण ते निव्वळ परीक्षर्थी बाहेर टाकतात असं वाटतं. प्रवेश प्रक्रियेच्या नावाखाली निव्वळ धंदा सुरू झाला आहे. शिक्षणाच्या बाबतीत पुणे उणे झालेलं आहे. तसं, जॉब वगैरे लागतात सगळ्यांना पण बाकी बाबतीत सर्वत्र निराशा वाटते. महात्मा गांधी देशात सांगायचे की पुण्यातील शिक्षणपद्धती देशाने अनुसरली पाहिजे, तेच पुढे आज काय आदर्श ठेवत आहे हेही तपासावे लागेल.
 
एकेकाळी भव्य वाडे हे पुण्याची ओळख होते. त्यात नांदणारी एकत्र कुटुंबपद्धती असेल किंवा भाडेकरूच्या नावाने कुटुंबात नव्याने जोडला गेलेला सदस्य असेल, ती खरी भारतीय संस्कृती पुणे जपत होतं. त्या वाड्यांमधून अस्सल भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा ठळकपणे दिसत. आज याबाबत बोलायलाही काहीच शिल्लक नाही अशी गत आहे. हे वाडे केंव्हाच इतिहासजमा झाले आहेत. जागतिकीकरणाच्या रेट्यात ते मान्यही केलं, पण सोसायटी आणि अपार्टमेंटच्या संस्कृतीने भारतीय, महाराष्ट्रीय आणि पुणेरी संस्कृती पुरती गायब केली आहे. सतत बंद असलेले फ्लॅटचे दरवाजे ही पुण्याची नवी राहणी आहे. आपल्या आजूबाजूला काय चालूय यामध्ये कसलीही रुची नसलेली संस्कृती. खिडकीच्या बाहेर न डोकावणारी मंडळी समाजात का डोकावतील हा मूलभूत प्रश्न आहे. एकत्र कुटुंबपद्धती केंव्हाच लयाला गेली असून घराघरातील भिंती ठळकपणे दिसत आहेत. ह्या पातळीवर सांस्कृतिक राजधानी हे प्रतीक पुण्याला अशोभनीय आहे.
 
आता जरा स्फोटक विषयावर यायला हवं. ज्याबाबतीत पुण्याने देशाला दिशा दिली ती स्त्रीमुक्तिची चळवळ आणि स्त्रीचं स्वातंत्र्य. ह्याची सुरुवात पुण्यातून झाली याचा अभिमान महाराष्ट्राला कायम राहील. इतरांना आपल्या स्वातंत्र्याचा त्रास होत असेल ते स्वातंत्र्य मिळावं म्हणून का अट्टहास केला होता असा प्रश्न पडावा इतपत बीभत्सपणा पुण्यातील सार्वजनिक जीवनात अनुभवण्यास आलेला आहे. याला दोन्हीही बाजूंनी बघितलं पाहिजे. अनेक मोठ्या शहरांप्रमाणे येथील स्त्रियाही नोकरी-व्यवसाय निमित्त सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. पुण्यामध्ये स्त्रियांवर कसलीच बंधने नाहीत, त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, समाजाला आपली कार्यक्षमता दाखवून देत आहेत. पण ह्याच पुण्यात स्त्रिया अन तरुण मुलींच्या बाबतीत पुरुषांच्या नजरेत अजूनही बदल झालेले नाहीत असं दिसतं. मग ते पीएमटी मधील बीभत्स प्रकार असोत किंवा विक्षिप्त कमेंट्स असोत, त्याबाबतीत पुणे इतर शहरांप्रमाणेच आहे. जेथे स्त्रीमुक्तीची चळवळ उभी राहिली तेथे हे प्रकार म्हणजे संतापजनक बाब आहे.
याच मुद्द्याला उलट बाजूने विचार केला तर पुण्यातील तरुण पिढीला मिळालेलं स्वातंत्र्य हे अतिरेकी आहे असं वाटतं. तुम्ही पुण्यातील शनिवार वाडा, पर्वती किंवा अशा कोणत्याही ऐतिहासिक-धार्मिक जागेवर जा किंवा सारस-बाग, पेशवे पार्क, राजीव गांधी उद्यान अशा कुठल्याही जागेवर जा आपल्या प्रेमी मित्रांचे अतूट आणि आपल्याला असह्य चाळे सुरू असतात.त्यांच्यासमोरून कोण जेष्ठ जाऊद्या किंवा कोण महिला त्यांना त्याचा काही त्रास नाही उलट बाकीचेच लाजून निघून जातात. हीच आपली संस्कृती आहे का??? ह्याला काय म्हणावं? नवीन पिढीला पुण्याच्या सांस्कृतीक असण्याचा काही पत्ताच नसावा बहुतेक. स्वातंत्र्याचा कितपत वापर करावा यालाही काही मर्यादा असतात, त्या कधीतरी कोणीतरी ओलांडत जातं आणि मूळ संस्कृतीचा गाभा नष्ट होत असतो.
 
पेहरावाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुणेरी पगडी ही पुण्याची ओळख होती. ती आज फक्त स्वागत कार्यक्रमात वापरली जाते. रोजच्या वापरात त्या पुणेरी पगडीची काहीच किम्मत नाही राहिली. पुण्यातील तरुणांचे पेहराव हे पाश्चिमात्य पद्धतीचे अन फॅशनचे असतात. आपल्या संस्कृतीतील पेहराव केलेला कोणीही दिसणार नाही. उलट ग्रामीण भागातील पेहराव केलेले आजी-आजोबा मॉल किंवा हॉटेलमध्ये गेले की त्यांची टवाळी केली जाते आणि परग्रहीय आल्याप्रमाणे त्यांच्याकडे बघितलं जातं. नवीन पिढीतील मुलींना साडी अन मुलांना धोतर वगैरे घाला असं सांगण्याचा उद्देश्य नाही, पण पुणे पेहरावाच्या बाबतीत भारतीय किंवा महाराष्ट्रीय राहिलं नसून ते पाश्चिमात्य संस्कृतीच झालं आहे.
 
खाद्यसंस्कृती ही पुण्याच्या नसनसात भिनलेली आहे. ती कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. पुण्याचे शिवरायांपासून, पेशवे आणि इंग्रज असे राजेशाही थाट पाहिलेले आहेत. त्यांचे सरदार-अधिकारी यांचं विलासी जीवन हेही पुण्याने अनुभवलं आहे. खाण्याच्या बाबतीत पुण्यात कसलीच कमी नाही. उलट एखाद नवीन हॉटेल सुरू झालं तर त्याबाहेर जमा होणारी गर्दी ही पुण्याच्या खाद्यसंस्कृतीची ओळख करून देते. फक्त हल्ली जंक फूड ने अस्सल सांस्कृतिक पदार्थांवर आक्रमण केलेलं आहे असं वाटतं. पुण्यात खाण्याचे जितके ब्रॅंड आणि विविधता आहे ती महाराष्ट्रात इतरत्र सापडणार नाही. खवय्येगिरी ही पुण्याची ओळख आहे ती कायम आहे. पण हे संस्कृतीशी कितपत जोडलेल आहे हे नाही माहीत.
 
आता तो मुद्दा जो संस्कृतीशी थेट जुळलेला आहे. भाषेचा!!! वर सांगितल्याप्रमाणे पुणेरी भाषा ही पुणेरी म्हणूनच ओळखली जाते, त्याचे स्वतःचे वलय आहेत. पण आज पुण्यात शुद्ध किंवा परिपूर्ण मराठी कितपत बोलली जाते? जुनी पिढी भलेही पुणेरी मराठी बोलत आहे, पण तरुण पिढीच्या अंगवळणी इंग्रजी मराठी पडलेली आहे हे वास्तव आहे. तिकडे आयटी पार्क मध्ये तर अस्सल पुणेकर असलेला व्यक्तिही हिन्दी किंवा इंग्रजीत बोलत असतो. शहरात बाहेरून आलेले लोकं (परप्रांतीय) हे आपापली भाषा घेऊन आले आणि मूळ पुण्याची मराठी भाषा हरवत गेली आहे.  महाराष्ट्रात अगदी वीस-वीस मैलावर भाषा बदलते. पण ती भाषा आपल्याच संस्कृतीची आहे, मग कशीही असो. केवळ प्राकृत मराठी खरी आणि ग्रामीण मराठी असांस्कृतिक असं म्हणणं योग्य ठरणार नाही, पुण्याच्या संस्कृतीत ज्या मराठी भाषेच्या उच्चार, लहेजाला वेगळं स्थान होतं ते आता अभावानेच आढळतं. रोजच्या जीवनातही इंग्रजीचा वापर सर्रासपणे होतो आहे. त्यात मराठी हरवली आहे असं ठामपणे वाटतं. 
 
लोकमान्य टिळकांनी १८९४ ला प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ ह्याच पुण्यात रोवली आणि ती संस्कृती केवळ महाराष्ट्रानेच नाही तर देशाने अन जगाने स्वीकारली, कारण त्यामागे सामाजिक ऐक्य व्हावं, सर्व जाती-धर्म एकत्र यावे असे समाजहिताच्या आकांशा होती. त्या गणेशोत्सवाचं पुण्यातील स्वरूप काय आहे हेही पाहिलं पाहिजे. गणेशोत्सव आला की, तो कोण सुरू केला हे वाद याच पुण्यातून सुरू होतात. इतर महाराष्ट्रात अतिशय आदर्शवत पद्धतीने सुरू आहे असा दावा नाही, पण मग पुण्याने सांस्कृतिक आघाडीवर नेतृत्व का करावं हा प्रश्न आहे.

आजचं पुणे आहे तरी काय?

माझ्यामते आजचं पुणे हे इतर शहरांप्रमाणे फक्त एक मेट्रो सिटी उरलेलं आहे. स्वतःची ओळख गमावून बसलेलं, भरकटलेलं, जाणिवा नसलेलं, नागरी समस्यांनी वेढलेलं, चंगळवादी, आर्थिक हितसंबंध जोपासणारं एक शहर. पुण्याच्या संस्कृतीचा काळनुसार आलेख काढला तर, उंच डोंगावरून दरीच्या दिशेने जाईल असाच तो असेल. ज्याप्रमाणे मुंबईकर घडाळ्याच्या काट्यावर आपलं आयुष्य घालवतो तेच पुणेकरही करतो आहे. पुण्यात बाहेरून येणारी लोकसंख्या भरपूर आहे (आम्ही त्यांना परप्रांतीय म्हणत नाहीत) त्यामुळे पुण्याच्या संस्कृतीतं बदल होत गेला. कामाच्या, शिक्षणाच्या, कलेच्या अन करियरच्या शोधात पुण्यात बाहेरचे लोक येऊन विसावत गेली. ती केवळ परराज्यांतील नव्हे तर महाराष्ट्राच्या कांनाकोपर्‍यातून येतात. ह्या लोकांनी पुण्याला पुणे ठेवलं नाही. मराठवड्यातील निम्मी तरुण पिढी सध्या पुण्यात आहे असं म्हणता येईल. पुण्याने ह्या सगळ्यांना कवेत घेतलं आहे. आज पुणे एक IT Hub आहे.
पुण्यात महिन्याला लाखांवर कमावणार्‍या लोकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चंगळवाद फोफावला आहे. खाद्यसंस्कृती ही त्याच आधारावर पोसली जातेय. पण निव्वळ खादाडगिरी हे संस्कृतीचं द्योतक असू शकत नाही. जागोजागी बहुराष्ट्रीय कंपन्यांची ऑफिसेस आहेत, आणि त्याबरोबर पाश्चिमात्य प्रकार येत गेले. बाहेरून जे येतात त्यांना स्वतःला हवं असलेलं स्वातंत्र्य शोधायचं असतं जे त्यांना त्यांच्या गावात मिळत नाही. त्या नादात ते पुण्याच्या संस्कृतीची फिकीर करत नाहीत. ह्या तरुणाईच्या तोंडी इंग्रजी+हिन्दी भाषा आहे (भलेही ते मराठी असले तरी), हातात मद्याचे पेले आहेत, ते डोमिनोज मध्ये पिझ्झा खातील, पार्टी करतील, हवे तसे कपडे घालतील… ते स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगातील; पण पुण्याच्या मूळ संस्कृतीची जाणीव यांच्यात कधी दिसणार नाही . हा चंगळवाद पुण्यात मोठ्या प्रमाणात फोफावतो आहे. जे आहे ते वास्तव आहे, त्याला विरोध करण्यात अर्थही नाही. ज्या पुण्यात सांस्कृतिक-सामाजिक जडणघडण होत होती ते पुणे फक्त स्वकेंद्री लोकांना घेऊन उभं आहे. एक अशी पिढी आहे ज्याला कशाशी काहीही देणं घेणं नाही. लाखोंवर कमावणारी IT मधील तरुण मंडळी आहेत ती आयुष्याचा मनमुराद उपभोग घेत आहे. ह्या पिढीला इतरांचा आपल्या आयुष्यात हस्तक्षेप अजिबात चालत नाही. उलट जुन्या पिढीला ह्या तरुण पिढीमध्ये उभं राहावं वाटत नाही, कारण त्या दोन पिढीच्या जडणघडण अन सांस्कृतिक आचरणात कमालीची तफावत आहे.
एक उदाहरण द्यायचं झालं तर, संध्याकाळच्या वेळेस जर कोणी पारंपरिक वेशात, अगदी पुणेरी पगडी घालून काही लोक शुद्ध मराठीत सांस्कृतिक-साहित्यिक-सामाजिक विषयावर चर्चा करू लागले तर त्यांना वेडं ठरवलं जाईल की काय असं वातावरण तिथे असतं. 
याचा अर्थ असा नाहीये की पुण्यात जे घडतं आहे त्याला विरोध आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात हे होणारच याबद्दल शंका नाही, पण ते घरापासून ऑफिसपर्यन्त ते सार्वजनिक ठिकाणी सगळीकडे हीच संस्कृती फोफावते आहे असं दिसतय. म्हणजे पुण्यात राहून, रजनीकांत बघा किती साधेपणाने राहतो यावर whatsapp मेसेज पाठवतो, पण त्याने इतका मोठा स्टार होऊनही आपली संस्कृती जपली ती आम्ही जपू शकतो का यावर कधी चर्चा होते का? पू. लं. देशपांडे सांगतात त्याप्रमाणे, पुण्यात एखादा कार्यक्रम झाल्यावर त्या वक्त्याला “मला तुमच्याशी या विषयावर सविस्तर बोलायचं आहे.” असं सांगणारे लोक आता भेटतील का? किंबहुना अशा कार्यक्रमांना गर्दी असते का हाही शोधाचा विषय आहे. आजचा पुणेरीपणा फक्त सोशल मीडियाच्या विनोदात मर्यादित आहे. 
 
पुण्याने नेहमीच विविध प्रवाह, तेही समकालीन, आपल्यात सामावून घेतले आहेत. विचारांमध्ये मतभिन्नता असणे आणि त्यातून संक्रमण घडणे हे पुण्याने अनुभवलं असताना मुळात आज विचारांची तफावत आहे अशा गोष्टीकडे पुणे कसं पाहतं हा प्रश्न आहे. कारण आर्थिक प्रगतीपेक्षा वेगळा काहीतरी विचार आज पुण्यात होताना दिसतच नाहीये. निव्वळ पैसा अन त्यातून येणारा चंगळवाद यामागे धावणारी यंत्रे पुण्यात वावरत असताना पुण्याने स्वतःची सांस्कृतिक ओळख काय आधारावर टिकवावी?
 
एकेकाळी पुणे हे सायकलींचं शहर म्हणूनही ओळखलं जायचं, पण आजचं पुणे हे ट्राफिकच्या बाबतीत किती बदनाम आहे हेही आपण पाहतच आहोत. मानवी “संस्कृतीच्या” आणि “सभ्यतेच्या” मूळ खानाखुनाच जेथून नष्ट होत आहेत त्याला सांस्कृतिक राजधानी म्हणावं तरी कशासाठी हा मूलभूत प्रश्न अतिशय स्वाभाविक आहे. पुन्हा सांगतो, हे जे पुण्याचं रूप मी सांगतो आहे ते इतर शहरात नाही असं मी नाहीये म्हणत, पण मग जसा वेगळेपणा पुण्याने आधीच्या काळात जपला होता तो आज नाहीये हीच तर खंत आहे. 
 
महात्मा फुले, विठ्ठल शिंदे, पू. लं. देशपांडे ते भीमसेन जोशी यांसारख्या अनेक दिग्गजांचा संस्कार लाभलेल्या पुण्याला, यांच्या नेमक्या विचारांशी संलग्नता आहे का असेही प्रश्न पडतात. निव्वळ नागरी समस्यांचं ज्वर उठलेल्या एखाद शहराप्रमाणे अवस्था झालेलं पुणे शहर आज महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या नेमकं काय आदर्श घालून देतय याचाही विचार करावा लागेल. पुण्याची खरी संस्कृती पावसाळी रात्रीत पोर्णिमेचा चंद्र मधूनच दिसावा तशी झाली आहे असं वाटतं.
एखादा परदेशी व्यक्ति भारतीय संस्कृती किंवा मराठी संस्कृती वाचून जर ती अनुभवायला पुण्यात पुणे विमानतळ, पुणे स्टेशन, शिवाजीनगर किंवा स्वार गेट इथे आला तर त्याला लगेचच महाराष्ट्रीय संस्कृती दिसेल का? नाहीतर त्याला त्या संस्कृतीच्या पुसटश्या खुणा हुडकून दाखवाव्या लागतील. त्याला सांगावं लागेल इथे असे वाडे होते, महाराज इथे राहायचे जिथे आता ही इमारत आहे, महाराज इथे ह्या टेकडीवरफिरायचे जिथे आता अंनधिकृत बांधकाम किंवा झोपड्या आहेत, पेशवे ह्या पडक्या शनिवार वाड्यात राहायचे हे त्याला पटवून द्यावं लागेल, इथे स्त्रिया नव्वारी किंवा काय त्या पारंपारिक वगैरे साड्या नेसायच्या, पुरुष धोतर-कमिज त्यावर काळा कोट आणि डोक्यावर काळी किंवा पांढरी टोपी किंवा पुणेरी पगडी घालायचे, कपाळावर गंध असायचं वगैरे वगैरे. घराघरात त्या काळी असे-असे पदार्थ बनायचे वगैरे.
हे सगळं असायचं, होत..? इतिहासात? असच त्याला सांगावं लागेल. त्याने जर शहरात चोहीकडे नजर फिरवली तर त्याला तीच संस्कृती दिसेल जेथून तो आला आहे.
पुण्यात हल्ली आपले सण तरी कसे साजरे केले जातात. गुढी पाडव्याला खिडकीतून डोकावणार्‍या गुढ्या दिसतात, ज्या बाल्कनीत कपडे वाळवले जातात तेथे दिवाळीला आकाशदिवे टांगले जातात, वटपोर्णिमेला झाडाच्या फांद्या तोडून आणून पुजा केली जाते, सणवार असला की बाहेरून पुरणपोळया मागवल्या जातात, चिटळेंचे आम्रखंड अन काका हलवाईचे पेढे मागवून परंपरा पाळल्या जातात वगैरे वगैरे. असे अनेक उदाहरणे देता येतील. जेथे नीटपणे भारतीय सण साजरे केले जात नाहीत (त्याला असलेली कारणे कितीही genuine असली तरी) तिथे संस्कृती टिकेल आणि वाढेल का? पाश्चिमात्य संस्कृतीचा शिरकाव पुण्यातील घराघरात झालेला दिसतो. कुठल्यातरी celebration ला पाहुण्यांना ब्रॅन्डी अन बीयर दिली जाते. हुक्का पार्लर, पब गच्च भरलेले असतात. ह्या सगळ्या भारतीय अन महाराष्ट्रीय संस्कृतीच्या खाणाखुणा आहेत असं म्हणता येईल का? खुलासा म्हणजे, ह्या गोष्टींना चुकीचा ठरवायचा हेतु नाही.  
इथे उपनगरात आणि मुख्य पुण्यात कसला एकधागीय संस्कृतीची ओळख दिसत नाहीये. रोजगाराच्या अन शिक्षणाच्या ओढीने राज्यभरातून आलेले लोकं ह्या शहराला बकाल करत आहेत. हा केवळ नागरी समस्येच्या पातळीवरचा मुद्दा नसून याला सांस्कृतिक पदरही असू शकतात याबाबत येथील राजकीय-सामाजिक नेतृत्व अनभिज्ञ दिसत आहे. फक्त पैसे कमावणे अन त्यातून आयुष्याचा रहाटगाडा ढकलत राहणे हा इतर मोठ्या शहरांचा विचार पुण्यात रुजत आहे. 
आजच्या पुण्यात सगळं मिळतं. इथे अजूनही उत्तम संस्था आहेत, उत्तम पर्यटन ठिकाणे आहेत, उत्तमोत्तम खाद्यसंस्कृती आहे, आधुनिक काळाची ओळख सांगणारं आयटी पार्क आहे पण हे ते सांस्कृतिक पुणे नाही जे सांस्कृतिक राजधानी म्हणून अभिप्रेत असतं. नुसती दिग्गज लोकांची स्मारके अन भौतिक विकास यातून शहराला ओळख प्राप्त होत नाही. तेथील माणसांच्या राहण्या-वागण्या-बोलण्या-खाण्यावर वगैरे त्या शहराची संस्कृती ठरते. 
पुणे आपल्या भारतीय संस्कृती पासून दूर जात आहे. आपली संस्कृती आपल्याच सांस्कृतिक राजधानीत हरवली आहे. जेंव्हा अनेक शतकांनी येथे उत्खनन होईल तेथे ऐतिहासिक पुणे, त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व पुणे याच्या खुणा आणि स्वातंत्र्यनंतरच्या खुणा यात आढळलेली तफावत अभ्यासकला गुंगवून टाकणारी असेल हे नक्की. सांस्कृतिक वाटचाल होत असताना कुठेतरी फुटलेल्या वाटा यासुद्धा त्या अभ्यासकांच्या चर्चेचा विषय असेल . त्यामुळे पुण्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा असावा का??? हा प्रश्न मला साहजिकपणे पडला.
मागे टीव्हीवर एका गाडीची जाहिरात यायची ज्यात अस सांगितलं होत की अजूनही अस कोणतंतरी गाव आहे जिथले लोक अजूनही संस्कृत भाषा बोलतात. खरंतर त्या गावाला सांस्कृतिक राजधानी का म्हणू नये? कारण त्या गावाने स्वतःची, स्वतःच्या संस्कृतीची ओळख ठळकपणे जपली आहे. किंवा असं कोणततरी गाव असेल जिथे अजूनही लोक एकत्र कुटुंबात आणि वाड्यात राहत असतील. किंवा असं कोणतंतरी गाव असेल जिथे लोक अजूनही पारंपारिक/सांस्कृतिक वस्त्रे परिधान करीत असावीत; असं कोणतंतरी शहर/गाव असावं की जिथे लोक अजूनही अस्सल मराठी पद्धतीचे जेवण जेवत असावीत; अस कोणततरी गाव असेल जे आपली
संस्कृती मराठी संस्कृती जपत असेल… अशी गावे किंवा शहरे शोधावीत आणि त्या गावांना/शहरांना सांस्कृतिक राजधानी घोषित का करू नये? किमान काही काळाकरिता. जोपर्यंत ते तिथे मराठी संस्कृती नांदते आहे तोपर्यंत.
|| अभिषेक बुचके ||             @Late_Night1991

error: Content is protected !!