आपल्याला जर आपल्या रचना, संकल्पना, मत येथे मांडायचं असेल किंवा कुठलीही जाहिरात ह्या संकेतस्थळावर करायची असेल तर latenightedition.in@gmail.com यावर संपर्क करावा!

Tag: लेख

आधुनिक अस्पृश्यता

आधुनिक अस्पृश्यता

आधुनिक अस्पृश्यता   ||  Un-touchability  ||   सामाजिक  ||  जातीव्यवस्था  ||  Something सामाजिक 

आपला समाज जरा वेगळ्या दृष्टीकोणातून…

दुपारचा एक वगैरे वाजला होता. माझी जेवणाची वेळ झाली होती. पायात चपला सरकावुन मी मेसच्या दिशेने निघालो.रूमच्या जवळच असलेल्या मेसमध्ये पोचलो. मेस तशी लहान जागेतच, घरगुती वगैरे. आमच्या मेसमध्ये बसण्यासाठी मुख्य दोन टेबल आहेत, तिसरा टेबल गर्दी असेल तरच ‘अरेंज’ केला जातो.

मी मेसवर पोचलो तेंव्हा दोन तरुण (कदाचित मित्र, कलीग वगैरे असावेत) एका टेबलवर जेवत बसले होते. दोघेही अगदी भारी कपडे इन करून वगैरे होते; कुठेतरी चांगल्या कंपनीत काम करत असणार… त्या दोघांना कशाला अडचण म्हणून मी दुसर्‍या, रिकाम्या असलेल्या टेबलवर जाऊन बसलो.

मेसवाल्या काकांनी मी काहीही न सांगता रोजप्रमाणे माझ्यासाठी थाळी लावायला सुरुवात केली होती. त्या मेसच्या खोलीत मस्त सुवास पसरला होता. त्या दोन तरुणांपैकी कोणीतरी किंवा कदाचित दोघांनीही (मी विचारलो नाही आणि जवळ जाऊन वासही घेऊन बघितला नाही!) भारीचा डेओड्रन्ट वगैरे मारला असावा. त्या दोघांना मी मेसवर प्रथमच पाहत होतो.

दोघांचं जेवण करत करत गप्पा मारणं चालू होतं. मला काही देणं-घेणं नव्हतं. काकांनी माझी थाळी आणली आणि समोर चालू असलेल्या टीव्हीत बघत-बघत माझं निवांतपणे जेवण सुरू झालं.

पाच मिनिटे झाली नसतील तोच एक तरुण मुलगी मेसवर आली. ही पुण्यातील घटना आहे. पलीकडच्या टेबलवर दोघे तरुण होते आणि इकडे मी… ती मुलगी काहीतरी विचार करून माझ्या टेबलवर, माझ्या विरुद्ध दिशेला येऊन बसली आणि तिनेही थाळी वगैरे मागवली. तिलाही त्या दोन तरुणांना ‘डिस्टर्ब’ करावं वाटलं नसावं. कारण माझ्यासमोर येऊन बसायला मी खूप देखणा-रुबाबदार वगैरे नव्हतो. समोरची खुर्ची रिकामी होती एवढाच काय तो योगायोग. आणखी एक सांगायचं म्हणजे, मी काही डेओड्रन्ट मारला नव्हता, उलट तो वास तिकडून, त्या दोन स्मार्ट तरूणांकडून येत होता. यावरून एक गोष्ट पक्की की, टीव्हीवर डेओड्रन्टच्या ज्या जाहिराती दाखवतात त्यात अजिबात तथ्य नाही, की असा वास मारल्यावर मुली तुमच्याकडे खेचल्या जातात. त्या निव्वळ मादकपणा निर्माण करतात. ह्या जाहिराती आधुनिक काळातील अंधश्रद्धा आहेत… अंनिस ने याची दखल घ्यावी. केवळ धर्मातील सुधारणा करण्यानेच समाज सुधारतो असं नाही. असो…

सगळं व्यवस्थित चालू होतं. आता मेसवर एक तरुण आला. त्याने एक क्षण विचार केला आणि तो त्या दोन तरुणांच्या टेबलवर रिकाम्या असलेल्या खुर्चीवर जाऊन बसला. त्याचा निर्णय साहजिक होता. इकडच्या टेबलवर ती मुलगी होती. तिच्या बाजूला किंवा एकदम समोर येऊन बसणं बरोबर वाटलं नसेल म्हणून तो तिकडच्या रिकाम्या खुर्चीवर जाऊन बसला. त्यानेही थाळी वगैरे मागवली.

दोन मिनिट जातात तोच मेसमध्ये एकच आवाज घुमला!! महाराष्ट्राच्या पुरोगामित्व का काय म्हणतात त्याला, आधुनिक समाजाच्या विचारधारेला, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या तत्वांना तडा घालू पाहणारा तो आवाज होता,

“अये, उठ… केसं पडायलेत सगळे… दुसरीकडे जाऊन बस… चल…”

तिथे बसलेल्या त्या दोनपैकी एका तरुणाने त्या नुकत्याच आलेल्या तरुणाला हे बोल सुनावले होते…

गोष्ट अशी होती की, तो जो नुकताच आलेला तरुण होता, तो होता न्हावी, अर्थात कटिंग करणारा! मी रूमवरुण इकडे-तिकडे जाताना त्याला त्याच्या कटिंगच्या दुकानात पाहिलेलं होतं. त्या अपमानास्पद गर्जनेसह तो जागेवरून उठला होता. झालं असं होतं की त्याच्या शर्टवरचे वगैरे कटिंगचे केस (इतरांचे) तिथे टेबलवर पडले आहेत असं त्या ओरडणार्‍या तरुणाचं म्हणणं होतं. तो न्हावी तरुण बिचारा लागलीच टेबलजवळून लांब सरकला होता. आपल्या गलिच्छपणाचा लोकांना, त्यातल्या त्यात अशा सुशिक्षित, स्मार्ट लोकांना त्रास होत आहे हे जाणून तोच लांब सरकला होता. त्याचे डोळे लाल झाले होते, चेहरा एकदम पडला होता. तो तसाच उभा होता, मेसवाल्या काकांकडे बघत… त्या गर्जनेसह काकाही तो सगळा प्रकार पाहतच होते म्हणा… काका कोणालाच काही बोलू शकत नव्हते… दोघेही त्यांचे गिराईक अन त्यातल्या त्यात परमब्रम्ह अन्न ग्रहण करण्यासाठी आले होते…

आज नेमक्या तिसर्‍या टेबलवर त्यांचं काहीतरी सामान ठेवलं होतं… काका माझ्या जवळ आले अन हळूच म्हणाले, “हा बसला तर चालेल न?” एकदा नजर माझ्याकडे अन दुसर्‍यांदा समोरील मुलीकडे… दोघांनीही काही हरकत नसल्याचं सांगितलं… मीही आंघोळ न करताच आलो आहे हे काही मी त्यांना सांगितलं नाही… काकांनी त्या तरुणाला बोलावलं, माझ्याजवळची खुर्ची माझ्यापासून थोडी लांब नेऊन टेबलच्या दुसर्‍या टोकाला ठेवली अन तेथे त्याला बसायला सांगितलं… तो तरुण तसेच लालबुंद डोळे अन थरथरणारं शरीर घेऊन तेथे येऊन बसला…

त्याचवेळी टीव्हीवर बातमी चालू होती, तीही पुण्यातीलचं… मॅकडॉनल्ड का डोमिनोज मध्ये एका लहान, गरीब मुलाला येऊ दिलं नाही आणि त्या हाय-फाय शॉपमधून बाहेर हाकललं…

दोन्हीही घटनांत साम्य होतं…

Image result for प्रश्न

त्या न्हावी तरुणाच्या मनात काय वादळ निर्माण झालं असेल? स्वतःच्या गलिच्छपणावर त्याला राग येत असेल की स्वतःच्या व्यवसायाची, स्टेटस ची लाज वाटत असेल ? पण त्याने त्या दोन तरूणांकडून ते ऐकून का घेतलं असावं असा प्रश्न मला पडला. का त्यानेच मनाशी ठरवलं होतं की मी त्या दोन तरुणांपेक्षा कुठेतरी कमी, अस्वच्छ अन लो स्टेटस चा आहे ?त्याने हे सगळं सहन करण्याची गरजच नव्हती. अर्थात, प्रतिक्रिया द्यावी की देऊ नये तो स्वभावाचा गुणधर्म झाला म्हणा. पण मी जेवत असताना त्याच्या कपडे-शरीरावरील केस किंवा घाण माझ्या ताटासमोर पडत असेल तर मलाही ते किळसवाणा प्रकार अप्रियच वाटेल. कारण आरोग्य अन स्वच्छतेच्या निकषावर तो चुकीचाच असणार आहे. फक्त मी तशी अपमानास्पद प्रतिक्रिया दिली नसती. किंबहुना, माझ्याकडे असलेला पैसा, पद, प्रतिष्ठा इत्यादिमुळे मला माज असता तर मी तसं केलं नसतं तरच मी माणूस असं म्हणता येईल…

जेवता जेवता विचारचक्र सुरू झालं… अगदी कुठलेही संदर्भ आठवू लागले…

पूर्वीच्या काळी अशा घटनांना जातीयतेचे संदर्भ होते… आता ते वर्गाचे, अर्थात गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण, स्वच्छ-अस्वच्छ वगैरे वगैरे असे झाले आहेत… मेसमध्ये घडलेल्या प्रकारात कोणाचीच जात कोणाला माहीत नव्हती… मग्रुरीने बोलणार्‍या त्या तरुणाची जात माहिती नव्हती, न्हावी तरुण कोणत्या जातीचा आहे हेही माहीत नव्हतं आणि त्याने काही फरकही पडत नव्हता. ते दोघे एकाच जातीचे असते तरी हा प्रकार घडलाच असता… ही अस्पृश्यता जातीतून नव्हे तर पद-पैसा-प्रतिष्ठा-वर्ग अन राहणीमानातील भिन्नता यातून जन्मली असावी. इथे अस्पृश्यता पाळणारा ब्राम्हण आणि अस्पृश्य हा दलित वगैरे होता असं समजण्याचं कारण नाही…

विचार करायचं म्हंटलं तर मीही स्वतःहून कधी अशा अस्वच्छ व्यक्तीच्या बाजूला बसेन अशी शक्यताच नव्हती. टपरीवर चहा पिताना बाजूला कुठला सफाई कामगार, मजूर येऊन बसला तरी आपल्याला कसतरी होतं. आपण त्याला उठायला लावत नाही हा संस्कृती, सभ्यता म्हंटली पाहिजे. आणि तीच महत्वाची.

हे तर केवळ एक उदाहरण आहे… आपण किती स्वच्छ आहोत, किती सुवासित आहोत, किती सुंदर वगैरे-वगैरे आहोत आणि आपल्यासमोर हा शरीराने गलिच्छ, अस्वच्छ, दुर्गंधीत येऊन बसतो… याने आपल्याला किळस येत आहे, त्यात मी वर्चस्ववादी असल्याने त्याला येथून हाकलणे हा आपला अधिकार आहे असं त्या तरुणाला वाटत असावं… तो स्वतः असं कोणाच्या जवळ जाऊन, त्याला तेथून उठवून स्वतः तेथे बसेल असंही घडलं नसतं….

पूर्वीच्या काळीही कदाचित असच घडत असावं का? एक वर्ग सकाळी-सकाळी लवकर उठून मस्त आंघोळ करून, देवाची-ज्ञानाची उपासना करत असेल,त्यातल्या त्यात त्याला समाजात किम्मत असेल, आर्थिकदृष्ट्या तो मजबूत असेल आणि त्याच्यासमोर जर कोण शारीरिक कष्ट करणारा, ज्याच्या अंगाला शारीरिक कष्टाने उगम पावलेला घाम, त्याचा येणारा दुर्गंध जर कोणी आला तर पहिला वर्ग दुसर्‍या वर्गाशी असाच वागत असेल… त्या दोन भिन्न राहणी, दिनचर्या आणि संस्कार असलेल्या वर्गात भेद निर्माण झाले असावेत आणि नंतर मग त्याला जातीचे पदर असतील…?जातीय परंपरा अन मग अनुचित रूढी येथूनच उगम पावल्या असाव्यात का?

असो!! पूर्वीच्या काळी मी नव्हतो.

माझ्या डोळ्यासमोर घडलेली घटना फारच वाईट होती. त्या तरुणाच्या मनाला खोलवर घाव देणारी घटना होती. त्याच्या मनात काय वादळ उठलं असेल हे त्यालाच माहीत. कदाचित त्याने स्वतःला अपराधीही ठरवलं असेल. ते दोन तरुण जे सुशिक्षित, स्मार्ट वगैरे होते ते त्यांच्या जागेवर ठीक अशासाठी होते की, अशी अस्वच्छता (limit of hygienicness) समाजातील उच्चाभ्रू लोकांना आवडत नाही. ते कुठल्याही जातीचे असोत, ते स्वतःला इतर सर्वांपेक्षा भारी समजतात. पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणारे,AC ऑफिसमध्ये बसणारे, भारी गाड्यांत फिरणारे, महागडे सूट-बूट घालणारे स्वतःला फुटपाथवर चालणार्‍या-राहणार्‍या लोकांच्या बरोबरीने राहू शकतील का किंवा त्यांच्या गळ्यात गळे घालून वावरू शकतील का ? हा मोठा प्रश्न आहे.

हे सगळं बरोबर का चूक हे मी सांगत नाही, ती माझी पात्रताही नाही. प्रश्न असा आहे की शाहू-फुले-आंबेडकर होऊन गेले, त्यांनी समाजाला योग्य दिशा दिली तरी ही साली अस्पृश्यता तशीच का? ती आजही तशीच आहे, फक्त वेगळ्या स्वरुपात आहे. जाती मागे पडल्या असून ‘वर्ग’ झाले आहेत.

खेड्यातुन येणार्‍या आपल्या साध्या, ग्रामीण भागातील लोकांना पुण्या-मुंबईसारख्या शहरात आल्यावर तेथील लोक कोणत्या नजरेने बघतात???गावाकडचे लोकं ग्रामीण पेहराव करून शहरात आली तर त्यांच्या राहणीकडे बघून कमीपणाची वागणूक दिली जाते. कुठल्या मोठ्या हॉटेलमध्ये लुगडं घातलेली आजी अन धोतर घातलेले आजोबा गेले तर आधी पैशाचा फलक दाखवला जातो. असो, भयंकर आहे हे सगळं…

माझं मेसवर जाणं चालूच आहे. कधी आंघोळ करून तर कधी आंघोळ न करता (फक्त इतरांना काही सांगत नाही मी). ती दोन तरुण मुले मेसवर परत कधी दिसली नाहीत. तो तरुण न्हावी येतो, पण थाळी पार्सल बांधून नेतो…!

===समाप्त???

          सर्व हक्क सुरक्षित @ latenightedition.in  || लेखन – अभिषेक बुचके

Something सामाजिक या e-book मधून…

मजूर

कल्याण

कल्याण

मराठी कथा  ||  Marathi Story  ||     पौगंडावस्था   ||  वैफल्य  ||   चुकलेली वाट ||  #मित्र

आज माझा मुलगा अंगद शाळेत जाणार नाही असा हट्ट करत होता. सहावीत आहे तो. असं कधी करायचा नाही पण आज काय झालं ते कळायला मार्ग नव्हता. त्याला माझ्या बायकोने रागावून शाळेत जायला भाग पाडलं तरीही तो जाण्यास तयार नव्हता. आजीने समजावून सांगायचा प्रयत्न केला तरीही तो कोणाचं काहीही ऐकायला तयार नव्हता. मी हे सगळं शांतपणे पाहत होतो. मनात एक अडगळ असते, कुठेतरी तळघरात… तिथून काहीतरी बाहेर येऊन समोर उभं राहतं अन आपण काही क्षण स्तब्ध होतो. मला माझे शाळेतले दिवस आठवत होते, त्या जुन्या आठवणी अचानक डोळ्यासमोर ठळकपणे उभ्या होत्या.

मी अंगदला शाळेत जाऊ नकोस असं सांगितलं. त्याला त्याच्या आजोबाबरोबर चित्रपट बघायला जाण्याची परवानगी दिली. यामुळे माझी बायको माझ्यावर प्रचंड संतापली, असले लाड पुरवू नका, भलत्या हट्टाला शरण जाऊ नका असं म्हणत होती. पण काहीही उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हतो. बायकोलाही माझं वागणं वेगळं वाटल्याने तीही शांत झाली.

मी त्या दिवशी कामावर गेलो नाही. मी ज्या शाळेत शिकलो तिथे गेलो. बर्‍याच दिवसांनी लक्ष देऊन मी त्या शाळेकडे बघत होतो. कितीतरी बदल झाले होते. अनेकदा मी शाळेसमोरून जात-येत असेन, पण तेथील बदल मला कधी इतक्या प्रकर्षाने दिसले नव्हते जितके आज दिसत आहेत.

शाळेसामोरील एका झाडाखाली बसून होतो मी. डोळ्यासमोर कल्याणचा चेहरा सतत दिसत होता. आठवणीचा पेटारा उघडल्या गेला होता, त्यातून नेमकं काय काय बाहेर निघेल याची शाश्वती नव्हती.

कल्याण! माझा शाळेतील मित्र. पाचवीपासून तो आमच्या वर्गात होता. आम्ही एकाच बाकावर बसायचो. तो माझा चांगला मित्र झाला होता.

सहावीत असतांनाची घटना ती! कल्याणने अचानक शाळेत येणं कमी केलं होतं आणि हळूहळू ते बंदही झालं. त्या काळी काही फोन नव्हते की लागलीच एकमेकांचे हालहवाल विचारता यावेत असं.

एके दिवशी वर्ग चालू असताना कल्याणचे वडील वर्गात आले आणि म्हणाले, “कल्याण आहे का? त्याला भेटायचं आहे…”

कल्याण तर शाळेत नव्हताच. शिक्षकांनी त्याचा हजेरीपट त्याच्या वडलांना दाखवला. त्याची गैरहजेरी खूप होती. त्याच्या वडलाला धक्का बसला. ते म्हणाले की कल्याण तर शाळेत जाण्यासाठी रोज घरातून बाहेर पडतो. मग मी त्याचा मित्र म्हणून मला बोलावून त्याची चौकशी केली. मलाही काहीच माहिती नव्हतं. तो शाळेत का येत नसावा याबद्दल मलाही तितकस माहीत नव्हतं. पण त्याच्या स्वभावात झालेला बदल मला जाणवत होता.

काही दिवसांनातरची गोष्ट जी माझ्या मनात कायमची लक्षात राहिली. त्या दिवशी शाळेत कल्याणला घेऊन पोलिस आले होते. सोबत त्याचे वडीलही होते. आमच्यासमोर हा प्रकार घडत होता.

कल्याण शाळेतून गायब असतो हे कळताच त्याच्या वडलांनी त्याच्यावर लक्ष ठेवायला सुरू केलं होतं. ते त्याचा पाठलाग करायचे तेंव्हा त्यांना कळलं की काही टपोरी मुलं त्याला त्रास देत होती. ती टपोरी मुलं याचं दफ्तर ताब्यात घ्यायची आणि दिवसभर त्याची टिंगल टवाळी करायची, त्याच्याकडून आपली लहान-मोठी कामे करून घ्यायची. ती टपोरी मुलं चांगल्या वळनाची नव्हती. त्यांनी कल्याणला धमकी दिली होती की त्याने जर हे कोणाला सांगितलं तर ते त्याला घरात घुसून मारतील. सहावीत असणार्‍या मुलाला खर्‍या-खोट्याची काय ती जाणीव असणार. तो घाबरून काहीच बोलला नाही आणि सर्व सहन करत होता. कल्याणच्या वडलांनी त्याचा पाठलाग करून सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि थेट पोलिसांना सांगून त्या टपोरी पोरांना पकडून दिलं.

पोलिसांनी आणि कल्याणच्या वडलांनी शाळेत सगळा प्रकार सांगितला आणि अजून कोण मुले यात अडकू नयेत याची काळजी घ्यायला सांगितली.

त्या दिवसानंतर सगळी मुलं कल्याणकडे वेगळ्याच नजरेने बघत होती. तो आमच्या सगळ्यात वेगळाच वाटत होता. तो अजूनही माझ्याच शेजारी बसायचा. पण आता त्याचा स्वभाव पूर्णतः बदलला होता. तो पहिलेसारखा राहिला नव्हता. त्याच्या वागण्यातही थोडासा टपोरीपणा आल्यासारखा वाटत होता. फार विक्षिप्त झाला होता. छोट्या-छोट्या गोष्टींवरून कोणाचीही कॉलर पकडून मारामारी करायचा. आम्ही पहिलेसारखे फार बोलत नव्हतो. त्याचं अभ्यासातही लक्ष नसायचं. सतत कसल्यातरी गहन विचारात तो असायचा. दुसर्‍यांचे डबे जबरदस्तीने किंवा चोरून खायचा. तो कल्याण राहिला नव्हता.

काही दिवसांनी त्याने मला काही गोष्टी सांगायला सुरू केल्या तेंव्हापासून तर मला त्याची खूपच भीती वाटू लागली. त्याने मला सांगितलं की त्याच्या आईवर कोणीतरी करणी केली आहे. त्यांच्या घरात कुठेही लिंबू-मिरची-हळद असल्या गोष्टी सापडतात. त्याची गुरांसारखी ओरडायची म्हणे, उगीच रडायची. तिला जिथे-तिथे किडे-पाली अन साप दिसायचे म्हणे, जेवणाचं ताट ती फेकून मारत म्हणे. तिने कल्याणलाही फेकून मारलं होतं म्हणजे ज्याच्या कपाळावर झालेल्या जखमा त्याने मला दाखवल्या. तिच्यावर कोणीतरी काळी जादू केलीय असं तो मला सांगायचा. मला तेंव्हा यातील फार काही माहिती नव्हतं, पण मला खूप भीती वाटत होती. कल्याण जेंव्हा माझ्याकडे बघायचा तेंव्हा मला त्याची खूप भीती वाटत असे. त्याचा वर्ण काळा होता अन पिंगट डोळे होते. त्याने केस वाढवल्याणे तो मला भयावह वाटे. मला तो आता नकोसा झाला होता. तो कल्याण नाहीच असं मला वाटे.

एकदा त्याने एका मुलाच्या अंगावर लिंबू-मिरची अन कुंकू टाकलं होतं. मुलं त्याला घाबरत होती. मग मी सरांना सांगून माझी बसायची जागा बदलून घेतली. माझा त्याचा संपर्क कमी झाला होता, पण एकाच वर्गात असल्याने आमची भेट होत असे. पण मी त्याला टाळत होतो.

काही दिवसांनी तो स्वतः माझ्याजवळ आला आणि गळे पडून रडत-रडत म्हणाला, “माझी आई मेली, तिला मारलं… करणी केली होती कोणीतरी… सगळं रक्त बाहेर पडलं तिचं…”

आमची वये कोवळी होती. न त्याला व्यवस्थित व्यक्त होता येत होतं न मला त्याला सावरता येत होतं. बास तेवढाच शेवटचा मला खराखुरा कल्याण भेटला होता. त्यानंतर तो पुर्णपणे बिथरला. तो वाट्टेल तसा वागत होता. वर्गात येणारा प्रत्येक शिक्षक त्याला तुडवत असे. तोही निगरगट्ट असल्याप्रमाणे ते सगळं सहन करत. त्याचं आयुष्य चुकीच्या मार्गाने जात होतं.

त्यानंतर माझा व त्याचा संबंध संपला होता. तो शाळेतही कधी दिसला नाही. एकदा नववीत असताना मला तो बाहेर एका रस्त्यावर भेटला. आता तो अत्यंत टपोरी दिसत होता. चेहर्‍यावर निरागसपणा लवलेशही नव्हता. त्याने मला ओळखलं, पण मी नाही.

त्याने मला त्याच्या नवीन मित्रांशी भेट घालून दिली. ती मुलही तशीच टपोरी दिसत होती. त्याने मला आवर्जून सांगितलं की, ही तीच मुलं आहेत जी त्याला सहावीत असताना त्रास द्यायची. माझी तर भंबेरी उडाली. मला भीती वाटत होती. कल्याण मला समोरून म्हणाला, “घाबरू नकोस आम्ही त्रास देणार नाहीत तुला, पण काही पैसे असतील तर देतोस का…?”

दफ्तरात होते तेवढे पैसे मी त्याला देऊन टाकले. त्याने मला मिठी मारली आणि जाऊ दिलं. मग मी दोन-तीन दिवस शाळेत गेलो नाही. नंतर काहीतरी कारण करून मी आई-बाबा ला घेऊन शाळेत जात होतो.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट, मला पेपरमधून कळलं की कल्याणचा encounter झाला आहे. तो अट्टल गुन्हेगार झाला होता आणि पोलिसांनी त्याला ठार मारलं होतं. मी ती बातमी वाचून बधिर झालो होतो. एकेकाळीचा माझा जवळचा मित्र, आज त्याने काय करून घेतलं…? चुकत गेलेला रस्ता सतत चुकतच गेला अन त्याचा अंत असा भयावह अन दुर्दैवी झाला. चांगल्या घरातला मुलगा असा…

त्याच्या आयुष्यात क्रमाने घडलेल्या घटना त्याच्यात संक्रमण घडवत गेल्या. दुर्दैवाने प्रत्येकवेळेस ते बदल नकारात्मकच होते. एक चुकीचं वळण त्याच्या आयुष्यासाठी इतकं घातक ठरलं. रस्ता चुकायला नको आणि त्यात वाटकरी तर अजिबात चुकायला नको… सगळं नेस्तनाबुत होतं…

सगळ्या घटना डोळ्यासमोरून जात होत्या. मन अस्थिर झालं होतं. शाळेचा बदललेला परिसर बघत मी बदललेला काळाचा ओघही बघत होतो. मन अतिशय खट्ट झालं. खिशातील सिगारेट काढली; त्या धुराबरोबर, त्या झुरक्याबरोबर सगळं विसरून जाणार होतो. मी सिगारेट पेटवणार तितक्यात शाळेतील काही मुले माझ्यासमोरून जात असताना मी बघितलं. माझं मलाच चूक वाटलं. मी ती सिगारेट फेकून दिली. त्या मुलांसमोर सिगारेट ओढणे मला अनैतिक वाटलं.

रात्री घरी गेलो. अंगद चित्रपट बघून अतिशय आनंदित झाला होता. मला बरं वाटलं. शाळेचा ताप त्याच्या डोक्यात नव्हता. जेवण वगैरे झाल्यावर मी त्याच्याजवळ गेलो आणि म्हंटलं की, कधीही कसलीही अडचण आली तर तुझा बाप कायम तुझ्यासोबत असेल… तू चूक असलास तरीही…

मी इतक्या गंभीरपणे काय सांगतोय अशा आश्चर्यचकित नजरेने अंगद माझ्याकडे बघत होता.

अडचण कसलीही येऊ देत पण कितीही सोपा वाटला, तरी आपल्याला योग्य मार्ग कोणता हे आपल्याला निवडता आलं पाहिजे. लहानपणी, तुझ्याएवढा असताना माझा एक मित्र असाच चुकला होता, तोही शाळेत जायला नको म्हणायचा.. त्याचं वाईट झालं नंतर… तू शाळेत जायला का नको म्हणतोस यालाही काही कारणे असतीलच… ती काहीही असोत, पण एकमेव मीच तुला त्यातून बाहेर काढून योग्य मार्गावर नेऊ शकतो. एकदा वळण चुकलं की मग खूप त्रास होतो.

अंगद एक-दोन दिवस शाळेत गेला नाही. पण त्या रात्री त्याने मला सत्य सांगितलं. त्याने मला ते सांगितलं यातच माझा विजय होता. त्याचं कल्याण व्हावं आणि कल्याणसारखं होऊ नये यासाठी मलाच काळजी घ्यावी लागणार होती. त्याला शाळेतीलच काही मुलं त्रास देत होते. ही गोष्ट त्याने सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. मला त्याच्यात कल्याण जन्म घेताना दिसत होता. पण मी ते कदापी होऊ देणार नव्हतो. कदापी नाही… माणसाने चुकांतून शिकावं, अनुभावातून शहाणं व्हावं…

मी अंगदच्या शाळेत जाऊन योग्य त्या गोष्टी केल्या. त्यानंतर अंगदला त्याबद्दल विचार करायला वेळ भेटू नये अशी सोय केली. कल्याणच्या आयुष्यात ज्या चुकीच्या घटना घडल्या त्या अंगदपासून कशा लांब राहतील यासाठी मी सतत दक्ष होतो…

अंगद योग्य मार्गावर राहिला. मी त्याला मुकलो नाही. त्याच्यासोबत कायम उभा होतो. कदाचित कल्याण नावाचा धडा माझ्या आयुष्यात आला नसता तर माझ्या मुलाला चुकीच्या व अज्ञात मार्गावर जाण्यापासून मी रोखू शकलो नसतो. कधीकधी अंधारातील सावल्याही बरचकाही शिकवून जातात…

===समाप्त===

सर्व हक्क सुरक्षित @ अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

पाटील पेटले

#BoycottChineseProducts भाग 2

#BoycottChineseProducts भाग 2

नियम पाळा, चीनी माल टाळा || चीनी उत्पादन बहिष्कार  || #NoChinaMade  || #BoycottMadeInChina  || आयना का बायना, घेणार नाही चायना  ||   चीन शत्रू राष्ट्र ||  चीनला रोखूया  ||

भारत-चीन सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आहे. युद्ध सुरू होईल तेंव्हा होईल, पण सध्या भारतातील काही नागरिकांनी चीनविरोधी युद्धाचं बिगुल वाजवला आहे. अर्थात, कोणी हत्यार घेऊन सीमेवर जात नाहीये किंवा चीनी माणूस शोधून त्याला मारत सुटलं नाही. हे युद्ध अतिशय अहिंसेच्या मार्गाने सुरू आहे. गांधीजी ज्याला हत्यार म्हणायचे ते हत्यार… बहिष्काराचं! चीनी वस्तूंचा बहिष्कार!!! चीनचं चिन्ह भारतात दिसेल तिथे त्याचा बहिष्कार अन असहकार! आता ही चळवळ उभी करणारे कोण महात्मा गांधी किंवा स्वातंत्र्यसैनिक वगैरे नाहीत. हे आहेत अतिशय सामान्य लोक ज्यांना वाटतं की चीन हा आपला शत्रू आहे अन त्याला एका व्यापक मोहिमेने आपण आपल्या पातळीवर चोख प्रत्युत्तर देऊ शकतो.

भारत-चीन चे संबंध केवळ आजचे किंवा आधुनिक काळातले संबंध आहेत असं नाही. भारत-चीन व्यापारी व संस्कृतिक संबंध अतिशय प्राचीन काळापासून चालत आले आहेत. वस्तूंसह संस्कृतीची देवाणघेवाण करत आपण आपल्या शेजर्‍याशी अतिशय सौजन्याने अन प्रेमाने राहत होतो. पण अलीकडच्या शतकात, 1950मध्ये वगैरे चीनमध्ये राजकीय उलथापालथ झाली अन एक वेगळच राष्ट्र अन राष्ट्रवाद तिथे उदयास आला. चीनचं विस्तारवादी धोरण ते तेथे नसलेली लोकशाही अन एकपक्षीय सत्ता ह्या सगळ्या संक्रमणातून आजचा चीन उभा आहे अन तो आपला शेजारी आहे ही वस्तुस्थिती आहे.

सध्या डोकलाम भागवरून भारत-चीन सीमेवर तणाव आहे. पण तो नसता तरी ह्या न त्या कारणावरून भारत-चीन संबंध फार काही बरे नसतात. 1962 च्या भारत-चीन युद्धांनंतर भारत चीनच्या बाबतीत अतिशय सावधगिरीने वागत असतो. 1962 चा पराभव भारतीय मनावरची सतत वेदना देणारी जखम आहे. हयापेक्षा तीव्र जखम 1947 च्या फाळणीच्या वेळेसची आहे; पाकिस्तान बाबतीत. पण शेजारी असल्याने काही गोष्टी तडजोड म्हणून कराव्याच लागतात. मग त्यात वेगवेगळे आंतरराष्ट्रीय, व्यापारी, सांस्कृतिक वगैरे करार आलेच.

ज्या पाकिस्तानशी आपली अनेकदा युद्धं झाली आहेत, ज्या पाकिस्तानने भारतात 26/11 सह अनेक अतिरेकी कारवाया केल्या, ज्या पाकिस्तानने भारतापासून कश्मीर तोडायचे प्रत्येक प्रयत्न चालवते त्या पाकिस्तानशी भारताला व्यापारी, आंतरराष्ट्रीय संबंध टिकवावे (चालवावे) लागतात. शिवाय 15 ऑगस्टला मिठाईही द्यावी लागते. हे सगळं मजबूरीने पाकिस्तानसारख्या राष्ट्रासोबत करावं लागत असताना चीनसारख्या बलाढ्य देशाशी तर भारत सरकारला अनेक पातळ्यांवर संबंध व राजकीय प्रोटोकॉल पाळावे लागतातच.

ही सगळी पार्श्वभूमी झाली. आजच्या काळात, वास्तविक जगात चीन हे काही भारताचं मित्र राष्ट्र नाही. तो फक्त स्पर्धक अन शेजारी आहे. पाकिस्तान व चीनमध्ये आपल्या दृष्टीने फरक इतकाच आहे की पाकिस्तान द्वेषापोटी भारताला उध्वस्त करू इच्छितो तर चीन स्पर्धक व राजकीय महत्वाकांक्षेपोटी भारताला नमवू पाहतो.

चीन भारताला सतत कुठेणाकुठे अडकवत असतो अन त्रास देत असतो. NSG ची कायम सदस्यताला चीन भारताला आडकाठी करतो, कश्मीरप्रश्नी पाकिस्तानला मदत, पाकिस्तानला भारताविरोधी प्रत्येक बाबतीत मदत, जमीन व जलमार्गे भारताला घेरण्याची चीनची तयारी, सीमावादावरून सतत आगपाखड, भारतातील नक्षलवादी चळवळींना छुपा पाठिंबा व हत्यार पुरवठा, यासारख्या कुरापती काढून चीन भारताला सतत त्रास देण्याच्या प्रयत्नात असतो.

Image result for #BoycottChineseProducts logo

हे सगळं पाल्हाळ लावण्याचा उद्देश एकच की, चीन हा भारताचा शत्रू आहे हे पटवून देणे. फाळणीच्या वेळी भारतातून मुस्लिम वेगळे झाले अन त्यांनी अट्टहासाने पाकिस्तान घेतला, ते मुस्लिम म्हणजे हिंदू व भारताचे शत्रू… म्हणून पाकिस्तान भारताचा शत्रू हे जितकं ठळकपणे आपल्या डोळ्यांसमोर असतं तितकं चीनबाबतीत नसतं. कदाचित चीन मुस्लिम राष्ट्र असता तर प्रत्येक भारतीयच्या मनात चीनबद्धल द्वेष व तिटकारा बघायला मिळाला असता. पण ते पडले बौद्ध; म्हणजे हिंदूमधील (हेही सर्व मानत नाहीत) एक म्हणे!!! म्हणून आपल्या भावना जरा बोथट झालेल्या असतात.

त्यामुळेच की काय पाकीस्तांनातून कलाकार आला की आपण ओरडतो न की ‘आपल्याकडे कलाकार नाहीत का? कशाला शत्रूराष्ट्रातील लोक बोलवता वगैरे.’ मग चीनही शत्रूराष्ट्रच असताना त्याच्याकडून आलेल्या वस्तु कशा खरेदी करता? Songs.pk ही पाकिस्तानी वेबसाइट आहे हे कळल्यापासून तर त्या साइटवर आजपर्यंत कधीच नजर गेली नाही.

हे सगळं सांगण्याचा उद्देश म्हणजे, चीनी मालावर बहिष्कार घालून काय उपयोग? चीनी मालावरच बहिष्कार का घालावा? ह्या काहींच्या साहजिक व मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न.

चीनी उत्पादनांनी भारतीय बाजारपेठा अक्षरशः ताब्यात घेतल्या आहेत. सुई, पेनपासून ते मोबाइल, टीव्ही पर्यन्त चीनी वस्तु भारतीय ग्राहकांच्या घरात घुसल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात चीनने स्वतःची उत्पादने कमी किमतीत विकून स्वतःचा ठसा उमटवला आहे. उत्सवाच्या दिवसांत तर दिवाळं भारतीयांच निघत असलं तरी श्रीमंत मात्र चीनी कंपन्या होत आहेत. जे राष्ट्र भारताच्या वाईटावर उठलं आहे, भारताचं स्पर्धक राष्ट्र आहे त्या राष्ट्राला आपणच मदत करत आहोत हे आपल्या लक्षात येत नाही. हे दुर्दैव, शोकांतिका की मजबूरी यावर नक्कीच चर्चा होऊ शकते.

               पण नेटकर्‍यांनी एक प्रयत्न सुरू केला आहे. तो आज लहान रोपट्यासारखा असला तरी उद्या जाऊन, निदान पुढच्या पिढीसाठी सावली देणारा असेल अशी अपेक्षा आहे. #BoycottChineseProducts ही ती मोहीम आहे.

या मोहिमेच्या अंतर्गत एकच उद्दीष्ट आहे; ते म्हणजे जमेल तिथे जमेल त्या पद्धतीने चीनचा ड्रॅगन भारतात पसरल्यापासून रोखणे. त्यासाठी फार काही मोठं करण्याची गरज नाही. फक्त आपल्या घरात चीनची उत्पादने येण्यापासून रोखणे! येनकेनप्रकारेण चीनचा भारतीय बाजारपेठेतील पाया खिळखिळा करणे. तुम्ही जे टीव्ही, मोबाइल, लाइटच्या माळा, घरात वापरल्या जाणार्‍या वस्तु, सजवटीचं सामान किंवा अन्य काहीही असो त्याचा चीनशी संबंध असता कामा नये.

चीनची उत्पादने कोणती हे ओळखणे तर सोप्पं आहे. वस्तु घेताना त्यावर Made In असतं ते एकदा तपासून पहा, तिथे चायनाचा उल्लेख असेल तर ती वस्तु टाळा. शिवाय त्याबाबतीत मार्गदर्शन करणारी, सहज माहिती उपलब्ध करून देणारी एक वेबसाइट व मोबाइल app लवकरच येणार आहे. आपल्याला फक्त कृती करायची आहे.

          या मोहिमेवर अनेकजण टिंगलटवाळी करत आहेत अन शंकाही उपस्थित करत आहेत. पण ते मान्य आहे. मोहिमेत त्रुटि असतील तर त्या नक्कीच दूर करण्यात येतील. शंका उपस्थित करणारे आकडेवारी घेऊन बसतात. आम्ही वीस रुपयांची माळ घेतली नाही तर चीनसारख्या देशाला काहीच फरक पडत नाही. हेही पुर्णपणे मान्य आहे. चीनकाही गरीब देश नाही की आपण एखादी वस्तु त्याच्याकडून घेतली नाही तर तो उपाशी मरेल; तो सावकार देश आहे. ह्याच अति पैशांचा वापर तो भारताविरोधी करत आहे. जाणीवपूर्वक विविध वस्तु कमी किमतीत विकून भारतीय अर्थव्यवस्था काबिज करण्याची ही चाल आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार चीनी मोबाइल भारतीय नागरिकांचा महत्वाचा डेटा चीन सरकारला पोचवत आहे. तुम्ही मोबाइलमध्ये वापरत असलेलं UC Browser हे चीनी आहे. त्याबद्धल माहिती अशी की त्या browser ने भारतीयांची माहिती चीन सरकारला विकली आहे. आता चीन सरकार सामान्य भारतीयांची माहिती गोळा करून काही credit card साठी फोन करणार नाही. यात नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे. या सगळ्या युद्धपूर्व strategies असू शकतात. अर्थात हे आपल्याकडील मंडळींना समजत नाही. त्यांना कुठल्याच गोष्टीचं गांभीर्य वाटत नाही. पण ‘मीठाचं shortage’ म्हंटलं की दुकानासमोर जाऊन उभे राहणारे आपण.

चीनमधील माध्यमेही भारताला आव्हान देत असतात, युद्धाची भाषा करतात अन भारतीयांची खिल्ली उडवत असतात. पण आपल्याकडची माध्यमे याबाबतीत जागरूक नाहीत. त्यांचं वेगळच काहीतरी चालू असतं. या विषयावर ‘सकाळ’ वृत्तपत्रात नुकताच एक लेखही येऊन गेला. चीनची माध्यमे तेथील सरकारच्या अधिपत्याखाली असल्याने असं करतात; पण भारतीय माध्यमे स्वातंत्र्याचा योग्य वापर करत नाहीत. अजूनही आपली माध्यमे चीनी उत्पादनांच्या जाहिराती सर्रास देत असतात. पैशापेक्षा मोठं काहीच नसतं तेही खरच म्हणावं लागेल.

“मी बहिष्कार टाकून काय होणार?” असा विचार काहीच कामाचा नाही. यामागील भावना महत्वाची आहे. तुमच्या बहिष्काराने चीन काही लागलीच वठणीवर येणार आहे असं नाही, पण एक भारतीय म्हणून तुम्ही हे स्वतःच्या मनाने, सारासार विचार करून अवलंबू शकता. ज्याप्रकारे ‘पाकिस्तान’ ऐकताच तुम्ही सावध होता तसच ‘चीन’ ऐकताच सावध होण्याची वेळ आलेली आहे. आपण काय करू शकतो? असा हतबलपणा सोडून ‘आम्ही बहिष्कार घालू शकतो’ असं तुम्ही म्हणू शकता. असे अनेक मित्र, नागरिक आहेत जे अतिशय चौकसपणे चीनी वस्तु टाळून इतर वस्तु घेतात. भाजी घेताना चारदा बघून घेताच की; मग हेसुद्धा बघा.

यामध्ये एक मुख्य अडसर आहे तो पैशांचा. गरीबाला हे राष्ट्रकर्तव्य परवडत नाही. मान्य आहे. जी वस्तु शंभर रुपयाला आहे ती वस्तु साठ रुपयाला मिळत असेल तर काय चूक? पण एकदा डोळसपणे विचार करायला हवा. निदान ज्यांच्याकडे पैसा आहे, आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांनी तरी निदान पुढाकार घ्यावा.

बहिष्काराने काय होईल हेही सांगतो. यामुळे एक जनमत तयार होईल की, भारतात चीनविरोधी जनभावणा निर्माण होत आहे. अशा लोकभावना खूप महत्वाच्या असतात. जपान, मंगोलिया सारखी राष्ट्र चीनच्या उत्पादनांवर थुंकतसुद्धा नाहीत; जसं आपण पाकिस्तानला ट्रीट करतो तसं! कारण ते आपल्या राष्ट्राच्या विरोधी आहेत ही भावना असते. अशी भावना जर निर्माण झाली अन त्याला मोठ्या पातळीवर यश मिळालं तर खूप मोठं काम होईल. चीनचा भारतातील कमी होत जाणारा व्यापार, भारताकडे कमी होत चाललेली निर्यात ही त्या देशाला कुठेतरी थांबवावी लागेल अन तो देश भारताशी स्पर्धक दृष्टीकोणातून मागे पडेल तेंव्हा हा तराजू समतोल असेल.

या मोहिमेची खिल्ली उडवणारे आकडेवारी व वस्तुनिष्ठ आधारावर सरस ठरतीलही, पण समजा युद्ध सुरू झालं तर ते नेमकी काय भूमिका घेतील? का तेंव्हाही मला चीन चालतो म्हणत तीच उत्पादने घेतील? किंवा 1962 ला चीनकडून झालेल्या पराभवाच्या वेळेस ते काय म्हणाले असते? त्याहूनही वाईट, जर आपण चीनकडून परत पराभूत झालो तरीही ते हीच आकडेवारी घेऊन बसतील का?

ह्या मोहिमेतील फोलपणा शोधत बसण्यापेक्षा निदान एकदा तरी प्रयत्न करणं आपलं काम आहे असा विचार करा. अर्थशास्त्री अन परराष्ट्रतज्ञ त्यांचं काम करतील. आपण आपल्या बाजूने कुठेतरी हातभार लावायला पाहिजे का नाही? ही मोहीम राबवून कोणाचा कसलाही वैयक्तिक फायदा होणार नाही. पण तरीही ही मोहीम, चळवळ सुरू आहे ती एका राष्ट्रभावनेतून. आज जर याची सुरुवात झाली तर निदान पुढच्या पिढीला याचा फायदा होईल. निव्वळ वंदे मातरम म्हणून किंवा चित्रपटगृहात राष्ट्रगीताला उभ राहून राष्ट्रभक्ती सिद्ध होत नसते. देशात जी काही राष्ट्रे महासत्ता किंवा सुजलाम_सुफलाम झाली आहेत त्या-त्या राष्ट्रात जनतेने महत्वाची कामगिरी बजावली आहे. चीन जगाला सगळ्या वस्तु निर्यात करत असला तरी तिथे बाहेरच्या वस्तु वापरत नाहीत. साबणापासून, मोबाइल, सर्च इंजिन पर्यन्त ते स्वतःच्या वस्तु वापरतात. आपण वापरतो ते ट्वीटर, WA किंवा gmail ही ते वापरत नाहीत. फक्त स्वदेसी… मग आपण का मागे…?

राष्ट्रभक्ती चेतवा

अन चीनी माल पेटवा…    

पुढे अजून आहे…

#BoycottChineseProducts : भाग १

#BoycottChineseProducts : भाग १

#BoycottChineseProducts : भाग १

#BoycottChineseProducts भाग १  ||  चीनी मालाचा बहिष्कार || देशभक्ती की ढोंग ||  #माझंमत

गौरी-गणपती-दिवाळी सह अनेक उत्सव-सणांचा कालावधी आहे. परिस्थिती कशीही असो, पण सामान्य भारतीय माणूस एकही सण चुकवत नाही. आयुष्यात येणार्‍या प्रत्येक सकारात्मक घटनेला तो उत्साहाने सामोरा जात असतो.

सणांच्या निमित्ताने बाजारपेठाही नटलेल्या आहेत. पण यंदा एक बदल प्रकर्षाने जाणवत आहे, तो म्हणजे “चीनी मालाचा बहिष्कार”. अर्थात, हा बदल विकणार्‍याच्या पातळीवर नसून घेणार्‍याच्या मानसिकतेतील आहे.

विकणार्‍या व्यापर्‍याला सर्व प्रकारचा माल, उत्पादनं ठेवावेच लागतात. भलेही मग ते त्याच्या दुश्मनाचा असला तरी चार पैसे कमवायचे असल्याने त्याला ते उत्पादनं ठेवावं लागतं. आधीच नोटबंदीने मेटाकुटीला आलेला व्यापारी अजून देशभक्ती करायच्या मूडमध्ये नाहीये. त्यामुळे जे विकल्या जाईल, ज्यात त्याला नफा आहे तीच उत्पादनं तो ठेवणार यात शंका नाही. त्यामुळे ग्राहक काय मागेल यावर आधारित दुकानात काय ठेवायचं ह्याचा निर्णय व्यापारी घेत असतो.

पण एक समाधानाची बाब म्हणजे, ग्राहक अर्थात सामान्य नागरिक सध्या चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहे. अर्थात, हा बालिशपणा तो करतोय कारण देशभक्ती नावाची नशा वगैरे त्याला चढली आहे असं बोललं जात आहे. उगाच आपला कामधंदा सोडून असले उपद्व्याप करणार्‍याला बालिश म्हणणेच योग्य ठरेल.

नुकत्याच पार पडलेल्या 15 ऑगस्ट ह्या स्वातंत्र्यदिनी देशभक्तीचा ज्वर जरासा ओहोटीला लागला आहे. चार मेसेज पाठवणे, झेंड्यासोबतचा एखाद फोटो काढणे, असतील तर पोराबाळांना स्वच्छतेचा संदेश वगैरे देणे यापेक्षा पुढे देशभक्ती करणे म्हणजे निव्वळ बकवास असते. आमचं देशप्रेम श्रावण मासातील मद्य-मास बहिष्कार याप्रमाणे असतं; खाण्या-पिण्याचं-आचारणचं बंधन एक महिना, बाकी आम्ही कसेही वागू; तसेच देशप्रेम वगैरे 15 ऑगस्ट वगैरेला ठीक असतं. बाकी 364 (लीप year असेल तर 365 धरा; उगाच वाद नकोत) आम्ही आमच्या कामात व्यग्र असतो.

तर मूळ मुद्दा आहे चीनी मालाचा बहिष्कार. हा मुद्दा समोर आला की पहिला प्रश्न असतो, हा आम्हीच का टाकायचा? सरकार का चीनी मालाला देशबंदी करत नाही? अहो पण तुम्ही शेजार्‍याला दारासमोर कचरा टाकल्यापासून अडवू शकत नाही तर भारतासारखा चिमुरडा देश चीनसारख्या भल्यामोठ्या देशाला कशी बंदी करू शकेल. तुम्ही कचाकचा शेजर्‍याशी भांडता तसं भारतीय सरकारने आंतरराष्ट्रीय कायदे विसरून बॉर्डर वर जाऊन भांडावं का? कधी काळी सरकारने आंतरराष्ट्रीय करार केलेले असतात की बाबा असं असं झालं तर असं असं करू… ह्या-ह्या देवाण-घेवाण साठी देशातील गरजा समजून आम्ही असा असा व्यापारी करार केला होता… तो बंधनकारक आहे हे सगळं विसरून ‘अब तुमसे नाता नही, हम छोड आये वो गलिया चौबारा’ करत हानमार्‍या सुरू कराव्यात का? इथे बांधावरचे वाद आम्हाला पिढ्यान-पिढ्या सुटेनात तर ते सीमावाद कसे सोडवणार हो… म्हणजे तुम्ही भांडणं असतानाही शेजार्‍याला सण-वार सुख-दुखात सामील करून घेतात, ते नैतिक बंधन असतं तसं सरकारलाही बंधन आहे म्हणा की… हे झालं सरकार का काही करत नाही याचं उत्तर…

दूसरा प्रश्न असतो, तुम्ही चीनच्याच का मागे लागता. आरं गड्या तुझ्या घरासमोर जो शेजारी कचरा टाकतो त्याच्याशीच भांडशील न? का उगा गावातल्या कोणाशीही भांडत बसशील? हेही तसच आहे… चीनला आशिया खंडातील भारताचं वाढतं वर्चस्व, प्राबल्य पटणारं आणि परवडणारं नाही. त्यामुळे तो जाणीवपूर्वक भारताला त्रास देऊ इच्छितो.. पाकिस्तानला पैसा पुरवणे, कश्मीरप्रश्नी पाकिस्तानला मदत करणे, भारतीय सीमेवर तनाव निर्माण करणे, त्या NSG का काय परिषदेत भारताला येण्यास अटकाव करणे… हे असले उपद्व्याप चीन भारताविरोधी करत असतो…

आता मला सांगा, तुमच्या वडलांना-आईला जर शेजारचे त्रास देत असतील तरी तुम्ही लट्टू होऊन त्या शेजर्‍यांच्या पिंकी बरोबर खेळणार का… सांगा न सांगा… नाही न खेळणार?

तुमचा तिसरा प्रश्न असतो, चीनी वस्तु नाही घ्यायच्या तर कुठल्या घ्यायच्या? त्या स्वस्त असतात… बरं बाबा हे मात्र खरं! चीनी वस्तु स्वस्त असतात. पण एक गोष्ट सांगतो. माझा इस्त्रीचा धंदा होता. माझ्या शेजार्‍याला तो बिलकुल बघवत नव्हता. मग त्याने तिसर्‍याच इसमला पैसे देऊन माझ्याच दुकानाच्या बाजूला इस्त्रीचं दुकान टाकून दिलं. त्या शेजार्‍याला काय यातून पैसा कामवायचा नव्हता, पण माझा धंदा कसा बसेल, मी बेरोजगार कसा होईन यात जास्त आनंद होता त्याला… मग त्याने माझ्यापेक्षा स्वस्तात सेवा सुरू केली… तो सावकार असल्याने त्याला सगळं सहज शक्य होतं. माझं गिर्हाइकही तुटलं. हा असा खेळ केला बघा त्याने.

तुमच्या प्रश्नाचं उत्तर राहिलच न… चीनी नाहीतर कोणती घ्यायची… मी म्हणतो चीनी नको, त्याची सोडून कोणाचीही घ्या… पाकिस्तानी सिंगर-अॅक्टर आल्यावर इंगळी डसल्यासारखे किंचाळता तुम्ही, मग चीनच्या वेळेसपण बघा न… का पाकिस्तानी म्हणजे हिंदूविरोधी मुस्लिम अन चीनी म्हणजे हिंदुमधले बौद्ध अशा भ्रमात असता?

चीन भारतात कोणत्या क्षेत्रात वरचढ आहे? तर सगळ्यात आधी इलेक्ट्रॉनिक्स, टेक्नॉलजी यात आहे. म्हणजे तुम्ही-आम्ही वापरतो ते मोबाइल टीव्ही वगैरे वगैरे. त्यानंतर किरकोळ वाटणारी पण अवाढव्य असलेली बाजारपेठ. म्हणजे राखीपोर्णिमेला हातात बांधायची राखी, सजावट करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या लाइटच्या माळा, प्लॅस्टिकची फुले, सजवटीचं इतर सामान, पणत्या, मुखवटे वगैरे वगैरे… यादी खूप मोठी आहे. अगदी आपल्या बाप्पाची मूर्तिही चीनी बनावटीची असते हो. नशीब अजून आपला बाप्पा बारीक डोळे करून नाही आला… इतपत पोचलं आहे हे… छोट्यातल्या छोट्या वस्तूपासून भारीतल्या भारी मोबाइल-टीव्ही पर्यन्त चीन चांग चू उत्पादने आपल्याकडे खपवतात… ह्या सगळ्या वस्तु स्वस्त असतात असं आपण आपल्यालाच म्हणतो… पण कधी तुलना करूनही पहा…

ते युद्ध झालं तर भारताकडे काय-काय अस्त्रे आहेत हे मीडियावाले जोर लाऊन सांगत असतात पण चीनी मालाला पर्याय काय हे काही ते सांगत नाहीत. भारत लहान-सहान वस्तु बनवण्यात (manufacturing) मागे आहे हे आपल्याला पटतं पण तरीही ‘मेरा भारत महान’ असं आपण म्हणतो. आपण ‘बनविण्यात’ हुशार नाहीत पण वापरण्यात कुशल आहोत असं म्हणतात ते खरं आहे. पण होईल ते कधीतरी…

सध्या आपण काय करू शकतो? तर मोबाइल तर तुम्ही काही सोडणार नाहीत हे माहिती. तुम्हाला आवडणार तोच घेता. ठीक आहे घ्या. पण झेपत असेल तर Sony, Samsung, Nokia जमलच तर Micromax वगैरेकडे पण लक्ष द्या. दुसरं म्हणजे, सजवटीचं सामान भारतीय भेटतं ही वस्तुस्थिती आहे. उगाच चमचम करणार्‍या लाइटच्या माळा घेण्यापेक्षा आपल्या शेतकरी बांधवाकडून खरीखुरी फुले घ्या. नुसतं त्यांना सहानुभूती दाखवून, कविता करून काय उपेग? चार पैसे जास्त जाऊद्यात… दिवाळीत तर त्या चीनी पणत्यापेक्षा कुंभाराने बनवलेल्या पणत्या घेऊ शकता. त्या तर स्वस्तच असतात की. ह्या छोट्या-छोट्या वस्तु तर तुम्ही सहजपणे घेऊ शकता.

विशेष म्हणजे असं कोणीही म्हणत नाही की घराघरात ठेवलेल्या चीनी वस्तु बाहेर आणून त्यांना हेंडगा लावा… अजिबात नाही… फक्त “आतापासून चीनी वस्तु नको” एवढं तरी मान्य करा… आता माझा मोबाइलपण चीनी आहे… पण मी तो नाही फेकून देत… मी काय करू शकतो, तर त्यात असलेले सगळे चीनी अॅप्लिकेशन सरसकट उडवू शकतो… पुढच्या वेळेस पगार-पाणी व्यवस्थित असला तर Sony वगैरे घेईन की…

ते डोकलांग वगैरे वाचत-बघत असतालच की? त्या Z News ने तर आता फक्त चीनवर डायरेक्ट हल्ला करायचाच बाकी ठेवला आहे… हे असं असताना आपण उगीच कशाला त्यांच्या वस्तु घेऊन त्यांचा धंदा वाढवायचा… कदाचित तुम्ही-आम्ही घेतलेल्या वस्तूच्या पैशातून चीनने बनवलेली बंदुकीची गोळी आपल्या भारतीय जवानाच्या छातीत गेली असेल… त्यामुळे यंदा नकोच ते चीनी… एकदा करून तर बघा ‘महागडी’ समाजसेवा…

विनोदाचा भाग म्हणजे, चीनी जास्त खाल्याने शुगर होते… आपण घरी चीनी कमी केलेली असताना हे चीनी उत्पादनं बंद करूच की…

आता महत्वाचा प्रश्न… मी एकट्याने केल्याने फरक पडतो का? अरे पण गड्या “Happy Independence Day” असं तुझ्या एकट्याच्या म्हणण्याने देशाला फरक पडतो का? नाही न… तरीपण तू म्हणतोसच की…

भले भले लोक म्हणतात असलं केल्याने काही फरक पडत नाही. मान्य! अगदी शंभर टक्के मान्य! हे उत्पादनं बहिष्कार वगैरे केल्याने चीनसारख्या सावकारी देशाला काहीच फरक पडणार नाही. पण मनाचं समाधान असतं का नाही काही? जपानसारखा देश चीन-अमेरिका सारख्या देशांची उत्पादनं हिंग लावूनपण विचारात नाही. तेथील लोकांच्या मनात राग आहे ह्या राष्ट्रांच्या विरोधात. पाकीस्तांनातून आलेली फ्रेंड request पण आपण स्वीकारत नाही, त्यांचा मालतर लांबच. मग चीन काय आपला जावई हाय का? तोही आपला शत्रूच आहे. निदान आजतरी आहेच आहे. त्याच्यावरही बहिष्कार योग्यच आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळेस चर्चिल नुसता म्हणाला की, शेवटचा ब्रिटिश नागरिक जीवंत असेपर्यंत आम्ही लढू… आणि ते जिंकले…

एकदा का जनभावणा निर्माण झाली की त्यापुढे कोणाचंही चालत नाही.

“हो, आम्ही चीनी उत्पादनं घेणार नाही. आम्हाला गरज नाही.”

ही अशी भावना निर्माण झाली पाहिजे. याने काही लागलीच चीन आपली शस्त्रे टाकून मागे जाणार असं नाही, पण त्यांना निदान हे समजेल की ह्या देशात आपल्याविरोधी जनमत उभं राहत आहे. कुरापत काढायच्या आधी तो एकदा तरी विचार करेल. वेळ आली तर हे सगळे “भारतीय” उभे राहतील, झुकणार नाहीत. ही भावना महत्वाची. जनतेच्या रेट्यापूढे काहीच चालत नसतं. जगाचा इतिहास आहे हा…

तुमच्या जातीय अस्मिता, प्रांतीय अस्मिता, भाषिक अस्मिता जितक्या लवकर चेततात तितकी तीव्रता ह्या राष्ट्रीय अस्मितेत का नसते? निव्वळ घोषणा देणे, थिएटरमध्ये राष्ट्रगीताला उभं राहणे, वंदे मातरम वगैरे याच्या पुढे राष्ट्रीय अस्मिता नसते की काय? कृती करायची वेळ येते तेंव्हा काढते पाय का घ्यावेत? मनात जर राष्ट्रभावना असेल तर आपण एवढं तरी नक्कीच करू शकतो. अर्थात, हे केलं नाही तर तुम्ही काही देशद्रोही ठरणार नाहीत. किंबहुना चीन बहिष्कार म्हणजेच राष्ट्रप्रेम असंही नाही. मी तसं certificate देणार्‍यापैकी नाही हा खुलासा महत्वाचा. फक्त आशय महत्वाचा की चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्याने “फरक पडतो”. ती उत्स्फूर्तता, तो जाज्वल्यपणा असायला हवा. पाकिस्तानसोबतच्या फाळणीची खपली निघताच आपला द्वेष जागा होत असेल तर 1962 ला चीनकडून पराभूत झालेला भारत आठवून का बरं आपल्याला काही वाटत नाही? असो.

आता बरेच लोक टिंगल-टवाळी करतात ह्या मोहिमेची. खरंही आहे म्हणा… बहिष्कार वगैरे करणारा बापू नावाचा एक चतुर बनिया होता. त्याने काय साधलं हे त्यांनाच माहीत. बहिष्कार, असहकार वगैरेने क्रांति वगैरे घडते म्हणायचे… पण आपण कुठे क्रांति करणार आहोत… आपण तर “फरक पडावा” म्हणून प्रयत्न करत आहोत…

पटलं तर घ्या… भारतीय वस्तु, नाहीतर गोड चीनी आहेच की….

{ लेख फार मनावर घेऊ नये. पहिला धडा हलकाच असतो म्हणून हे असं. अर्थतज्ञ व परराष्ट्रतज्ञ मित्रांसाठी नंतर आकडेवारी घेऊन येणारच आहे. पण तूर्तास इतकेच!!! }

वसुधैव कुटुंबकम

वसुधैव कुटुंबकम

#भारतीय_मानसिकता ||  #वसुधैव_कुटुंबकम  ||  #परदेशी_नागरिकत्व  || #वंश  || #माझंमत  ||  अस्मितेचे प्रश्न

नुकतच एक बातमी आली ज्याने आपल्या भारतीयांची अन त्यातल्या त्यात महाराष्ट्राची अन त्यातल्या त्यात कोकणवासीयांची मान अभिमानाने ताठ वगैरे झाली होती. ती बातमी होती, लियो वर्‍हाडकर नावाचा मूळ भारतीय-मराठी व्यक्ति आयरलॅंड देशाचा पंतप्रधान झाला. आपल्याकडील बालिश माध्यमांनी त्यांच्या घरी जाऊन डेरा टाकला होता अन त्यातले माहीत असलेले नसलेले गुण ठासून संगितले.

भारतात जगाचा विश्वगुरू बनायची कुवत आहे हे आपण अनेकदा ऐकलं असेल. त्याचीच सुरुवात की काय म्हणून सध्या जगभरात भारतीय ‘वंशाचे’ असलेले लोक मोठमोठ्या पदांवर विराजमान होत आहेत. अगदी गूगल, मायक्रोसॉफ्ट वगैरे कंपनीमध्येही भारतीय सर्वोच्च पदावर स्वतःच्या स्व-कर्तुत्वाने पोचले आहेत. खरं तर एकाच ‘वंशाचे’ म्हणून आपण त्यांचं कौतुक करणे अन अभिमानाने आपली छाती भरून येणे साहजिक आहे.

त्यानंतर आपण जरा राजकीय क्षेत्रात बघितलं तरी जगातील विविध देशात भारतीय ‘वंशाचे’ अनेक कर्तुत्ववान व्यक्तिमत्व आपल्याला मोठमोठ्या पदांवर विराजमान होताना दिसत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री निकी हॅले यासुद्धा मूळ भारतीय वंशाच्या आहेत म्हणे. त्यानंतर कॅनडाचे संरक्षणमंत्री हरजितसिंग सज्जन नावाचे एक मूळ शीख (भारतीय) ‘वंशाचे’ आहेत. कॅनडाच्या कॅबिनेट मंत्र्यांत जितके शीख बांधव मंत्री म्हणून आहेत तितके आपल्या भारतातही नाहीत. त्यांच्या संसदेतही बरेच शीख बांधव आहेत. अमेरिकन संसदेतही बरेच भारतीय ‘वंशाचे’ लोक निवडून आले आहेत. बॉबी जिंदाल नावाचे मूळ भारतीय ‘वंशाचे’ नेते सध्या अमेरिकेतील Louisiana ह्या मोठ्या राज्याचे गवर्नर आहेत. भविष्यात ते त्यांच्या पक्षाकडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात. आणि तेथील लोकांनी निवडून दिलं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एक भारतीय ‘वंशाची’ व्यक्ति असेल. नुकत्याच ब्रिटेनच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यातही बरीच भारतीय वंशाची मंडळी निवडून आली. ही यादी बरीच मोठी आहे. एकंदरीत काय तर भारतीय ‘वंशाची’ व्यक्ती बाहेरदेशात जाऊन तेथील राजकरणात स्वतःच्या कर्तुत्वाने जागा निर्माण करू शकते अन सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकते.

              हे सगळं बघून आपल्या सर्वांना अभिमान वाटणे साहजिक आहे. पण आपल्या भारतात एकही परदेशी व्यक्ति अशा पदावर पोहोचणे शक्य आहे का हा विचार मनात आला. यात पहिलं नाव आठवलं ते अर्थातच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं. सोनिया यांचा राजीव यांच्याशी विवाह 1968 साली झाला होता. त्यानंतरच्या गोष्टी इतिहासात नमूद आहेत. त्यानंतर 1999 साली त्या कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवडून आल्या. त्यांच्या परदेशी नागरिकत्व ह्या मुद्द्यावर शरद पवार वगैरे मंडळींनी तीव्र आक्षेप घेत वेगळा पक्ष काढला अन काहीच दिवसांत त्यांच्याशी आघाडी केली, त्यांच्या नेतृत्वात मंत्रिपद उपभोगलं अन आज ते त्याच पक्षासोबत आहेत. हा इतिहास आहे.

सोनिया गांधी भारतात आल्यानंतर इंदिरा गांधी अन राजीव गांधी हे पंतप्रधान पदावर राहिले होते. सोनिया गांधी यांनी देशाचं राजकारण जवळून, म्हणजे अगदी सत्ताकेंद्रापसून पाहिलेलं होतं. त्यामुळे त्यांना देश माहीत नाही असा भाग नव्हता. राजकारणाचा भाग काहीही असो, पण सोनिया गांधी जेंव्हा राजकरणात आल्या तेंव्हा देशाचे राजकारण ढवळून निघालं. अक्षरशः त्यांच्याच पक्षात गोंधळ माजला अन फुट पडली. एक परदेशी बाई भारतीय राजकरणात महत्वाची भूमिका बजावत आहे हे कोणालाच मान्य नव्हतं. त्यावरून अतिशय खालच्या थराची टीकाही झाली. ते चूक-बरोबर असा काही विषय नाही. पण ज्याप्रमाणे परदेशात भारतीय वंशाच्या व्यक्तिला स्वीकारले जातं त्याप्रमाणे आपण केलेलं नाही. सोनिया गांधी यांच्या हेतुवरही शंका उपस्थित केल्या जात होत्या अन त्या आजही तशाच आहेत. मग जे भारतीय परदेशात मोठ्या पदावर विराजमान होत आहेत त्यांचा इतिहास-भूगोल माहीत नसताना आपण इथे बसून टाळ्या वाजवण्यात काय अर्थ आहे. तिकडे जिंदाल, वर्‍हाडकर, हॅले, सज्जन यांच्या हेतुवर शंका उपस्थित केलेली दिसत नाही. मग आपणच इतके कद्रू कसे? हे म्हणजे. आपला तो बाब्या अन दुसर्‍याचं ते कारटं यातला प्रकार झाला. दुसर्‍या देशात भारतीय मोठा झाला की वाहवा करायची अन भारतात परदेशी व्यक्ती मोठा होत असेल तर त्याला शिव्या द्यायच्या. वसुधैव कुटुंबकम म्हणणारा भारत तो हाच का मग?

2004 साली जनतेने सोनिया यांच्यावर विश्वास ठेऊन कोंग्रेसला मते दिली का भाजप नको म्हणून, हे सांगणं कठीण आहे. येथे सोनिया गांधी यांची बाजू घेण्याची काहीही हौस नाही हेही स्पष्ट करू इच्छितो नाहीतर देशभक्तांच्या गर्दीत मी देशद्रोही जाहीर व्हायचो. त्यांनी केलेला भ्रष्टाचार किंवा अनागोंदी कारभार यावर चर्चा होऊ शकते. पण एकंदरीत भारतीय मानसिकता मला खूप आश्चर्यचकित करणारी वाटली. एका बाजूला “वसुधैव कुटुंबकम” हे घोषवाक्य आमचं असं मिरवत जगाला उपदेश करायचा अन स्वतःच्या घरात बाहेरच्याला महत्वाची जागा देताना कद्रूपणा करायचा हा भाग पटत नाही.

परदेशातील भारतीय ‘वंशाच्या’ व्यक्ति स्वकर्तुत्वाने त्या पदावर पोचल्या, इथे सोनिया यांचं कर्तुत्व काय होतं? किंवा घराणेशाही वगैरे हा मुद्दा ग्राह्य धरला तरी त्यांच्या परदेशी असण्याबद्दल सतत शंका का उपस्थित केल्या जातात हा प्रश्न आहे. भारताचा संरक्षणमंत्री किंवा परराष्ट्रमंत्री हा परदेशी व्यक्ति आहे हे आपण कधी मान्य करू का? मुद्दा केवळ सोनिया गांधी यांच्या असण्या-नसण्याचा नाही, पण परदेशात भारतीयांना ज्या मोठ्या मनाने स्वीकारलं गेलं त्याप्रकारे आपण स्वीकारू का हा प्रश्न आहे. हा मुद्दा केवळ नागरिक नव्हे तर राजकरणी, माध्यमं, विचारवंत अन साहित्यिक इथपर्यंत जाऊन पोचतो. आपल्यात ती वसुधैव कुटुंबकम वाली भावना आहे का हाच प्रश्न आहे. मध्यप्रदेश, राजस्थान सारख्या राज्यांचे आजी-माजी मुख्यमंत्री मूळ मराठी आहेत/होते असं अभिमानाने सांगताना मूळ उत्तरप्रदेश किंवा अन्य राज्यातला माणूस आपण मुख्यमंत्री म्हणून स्वीकारू का? हाही महत्वाचा मुद्दा आहे. जर कर्तुत्व अन जाण असेल तर आपण ‘वंश’ याच्यापुढे जाणार का हाच कळीचा मुद्दा आहे.

@Late_Night1991  || अभिषेक बुचके

शिवसेना मनसे मिलन सिद्धांत!

योग आणि नशीब

योग आणि नशीब

#वास्तु_लग्न_पैसा  ||  मराठी कथा   ||  अनुभव  ||  Destiny   

बर्‍याचदा आपण वयस्कर मंडळींकडून किंवा जेष्ठांकडून ऐकत असतो, ‘शेवटी जे नशिबात असेल ते होईल.’ किंवा ‘योगायोगाची गोष्ट असते.’ हे वाक्य तर आपण नेहमीच ऐकत असतो. अशी वाक्ये ऐकल्यावर आपल्याला त्याचा कधी-कधी रागही येतो. योग किंवा नशीब वगैरे असं काही नसतं असं म्हणणरेही भरपूर आहेत. कोणाचा अशा गोष्टींवर विश्वास असतो तर कोणाचा अजिबात नसतो. बरं, याचा अन सुशिक्षित-अशिक्षित असल्याचा काहीच संबंध नाही.

वास्तु, पैसा अन लग्न ह्या योगायोगाने अन नशिबात असणार्‍या गोष्टी असतात असं बरेचजण सांगत असतात. गेले काही दिवस ह्याच ‘योगाचा’ अनुभव मला येत आहे. लग्नाच्या किंवा पैशाच्या नाही. तर वास्तूच्या!

पुण्यात आनंदनगर मध्ये गेली तीन वर्षे एका फ्लॅट मध्ये भाड्याने राहत होतो. तो फ्लॅट असाच योगायोगाने भेटला होता. म्हणजे ओळखीच्या एका गृहस्थांकडून तो मिळाला होता. चांगली साडेतीन वर्षे काढली तिथे. त्या वास्तुचं किंवा त्या मालकांचं आम्ही देणं लागत असू असा काहीतरी तो योग! म्हणजे तितके दिवस आम्ही तिथे राहिलो हे आमचं नशीब! नंतर नवीन जागेची शोधाशोध सुरू केली. २८ एप्रिलला सकाळ पेपरमध्ये एक जागेसंबंधी जाहिरात वाचली. त्या जागामालकाशी संपर्क केला आणि एक महिन्याचं advance भाडं देऊन नवीन जागा बूक करून टाकली. पण तिथे राहणारा जो आधीचा भाडेकरू होता त्याच्या घरी श्राद्ध होतं. त्यामुळे चार तारखेपर्यन्त थांबावे लागणार होते. म्हणजे जुन्या वास्तूशी अजून चार-सहा दिवस जास्तीचा सहवासयोग होता. मग चार तारखेला नवीन जागेत गेलो. व्यवस्थित राहू लागलो. पण सात-आठ तारखेला त्या मालकाचा फोन आला. त्यांना स्वतः त्या जागेत राहायचं होतं. मग काय. पुन्हा शोधाशोध! त्या मालकाविषयी अन संपूर्ण घटनेविषयी सविस्तर ‘उघडणी’ मी नंतर ‘अशी ही बनवाबनवी’ ह्या मालिकेतून करणारच आहे.

Image result for destiny quotes

आठ मे पासून पुन्हा शोधाशोध सुरू. त्या वास्तूचा योग केवळ चार दिवसच होता. नंतरचे दिवस विनियोग होता. मग शेवटी कटकट करत पुढच्या चार तारखेला ती वास्तु नावाची भंगार जागा सोडली. त्या वास्तुच्या नशिबात आम्ही कमी दिवस होतं यात त्या वास्तुचं कमनशिब अन आमचं चांगलं नशीब म्हणावं लागेल. पण नंतर मिळून तरी जागा कोठे मिळाली; तर त्याच सोसायटीत अगदी समोरचीच. सोसायटीचं नाव #शिवपुष्प होतं. मग तिथे काही दिवस काढले. त्या तिसर्‍या वास्तूत राहायला गेलो पंधरा जून ला. नंतर मग दहा जुलै ला परत त्या मालकांचा फोन. ते स्वतः त्या जागेत पुन्हा राहायला येणार होते. अवघ्या महिनाभरात त्यांचा निर्णय बदलला. मग पुन्हा शोधाशोध!

ह्या सगळ्यातून सांगायचं एकच आहे. योग! म्हणजे मी तीन महिन्यांत तीन जागा बदलल्या. म्हणजे त्या तीन वास्तूंचं अन त्या तीन मालकांचं मी काहीतरी देणं लागत असतो म्हणे! त्या शिवपुष्प सोसायटी मधले कर्मकठिण तीन महीने हे माझ्या नशिबात लिहिले गेले होते. त्या तिन्ही वेळेस स्वतः मालक त्या-त्या जागेत राहायला येणार होते. एकाचा निर्णय चार दिवसांत बदलला. एकाचा महिन्याभरात. पण त्यापेक्षा महत्वाचा भाग म्हणजे ते तीन महीने ती वास्तु अन माझा योग जुळून आला होता. योग चांगला नव्हता हा भाग नशिबाचा!

त्यातच अजून एक वास्तु योग जुळत होता. भाड्याच्या घरात राहून उगाच भलते योग नशिबी येत होते म्हणून मग स्वतःचं घर बघत होतो आम्ही. बराच शोध घेतल्यावर एक वास्तु सापडली. चांगली होती. सगळं व्यवस्थित होतं. आमच्या सगळ्या गरजा व मागण्या त्या वास्तूकडून पूर्ण होऊ शकल्या असत्या. वास्तु पसंत पडली. पैशांचा प्रश्न आडवा येत होता पण तोही बेमोसमी ढगांप्रमाणे पुढे सरकत गेला. वास्तु अन आमचा योग जुळत होता पण पुन्हा माशी शिंकली. त्या वास्तूवर काहीतरी लहानशी कोर्ट केस, तीही ग्राहक न्यायालयात चालू होती. पुढे सरसावलेले हात पुन्हा मागे आले. जुळत असलेला योग अर्धवट राहिला. ती पसंत पडलेली वास्तु नशिबी नव्हती! ती वास्तु आमच्या अन आम्ही त्या वास्तूच्या नशिबी नसू कदाचित. अन वास्तु खरेदीचा योग नसावा. तत्पूर्वी अशीच एक घटना घडली होती. आम्हाला एक वास्तु पसंत पडली होती. पण नंतर समजलं की ती ईमारतच अंनधिकृत असून, रस्ता रुंदीकरण प्रक्रियेत जाणार आहे. तेथेही योग जुळला नाही. वास्तु घेताना पैसे देणे-घेणे व्यवहार असतात. आपण त्याचं देणं अन आपल्याकडून त्याचं येणं असा काहीतरी तो योग असतो म्हणे. त्यात वास्तु ही जीवंत असते असं आपल्याकडे मानतात. त्या वास्तूशी आपलं जितकं काही देणं-घेणं आहे ते होतच.

वर म्हंटल्याप्रमाणे वास्तु, लग्न अन पैसा ह्या गोष्टी नशिबात अन योगात असतात. मी शेअर मार्केट मध्ये काम करतो. तिथे तर पैसा अन नशीब-योग यांचा खूप जवळचा संबंध असतो. आज विकलेला शेअर उद्या दुपटीने वाढतो तेंव्हा काल विकल्याचं दुखं असतं पण तेंव्हा समजतं की इतकाच पैसा आपल्या नशिबी होता. किंवा लग्नाचं म्हणाल तर जुळत असलेल्या गाठी केवळ क्षुल्लक कारणाने तुटतात आणि पुन्हा काहीतरी कारणाने त्याच जुळल्या जातात. हे योग असतात.

मूल जन्मल्यावर सटवाई त्याचं नशीब लिहून जाते, असं आपल्याकडे मानलं जातं. पण मग योगायोगचं काय? ते घडणारे किंवा न घडणारे योगायोग कुठे लिहिलेले असतात?

—*—

अभिषेक बुचके  }{   @Late_Night1991

गल्लोगल्ली नटसम्राट!!!

तिशीकडे वळताना…

तिशीकडे वळताना…

 लग्नव्यवस्था  ||  आधुनिक समाज  ||  Something सामाजिक  ||  लग्नाचं वय
 
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. एकूण 543 जागा असल्या तरी निवडणुकीला उभ्या असणार्‍या हजारो उमेदवारांचे
नशीब टांगणीला लागले आहे. भारतात निवडणुकीला एक उत्सव मानला जातो. एका बाजूला लोकशाहीचा हा उत्सव चालू असताना दुसर्‍या बाजूला मानवी संस्कृतीत महत्वाचा टप्पा ठरलेल्या ‘लग्नाच्या’ उत्सवाचे ह्याच दिवसात मुहूर्त असतात. अनेक वर्षांच्या परंपरेनुसार कडक उन्हाळ्यात लग्न ‘लावून’ देण्याचे कार्यक्रम चालू आहेत. तसाही निवडणुकीला उभ्या असणार्‍या आणि लग्नाला उभ्या असणार्‍या उमेदवारांमध्ये फार फरक नसतो; कारण ‘पुढे काय’ हाच प्रश्न त्यांच्या डोक्यात असतो.
 
अलीकडेच एका जवळच्या मित्राच्या लग्नाला जाण्याचा योग आला होता. खरं तर अनेक लग्नासारखच हे लग्नही साधं-सरळच होतं. पण मित्राचं वय होत २७ वर्षे आणि वधूचं वय होतं १८-१९. मित्र असाही फार शिकलेला नव्हता पण चांगला व्यवसाय करत होता आणि अर्थातच मुलीचंही शिक्षण फार नव्हतं. आपण स्वतःला कितीही आधुनिक विचारांचे वगैरे म्हणत असलो तरी अजूनही खेड्यापाड्यात लग्नाचं वय (त्यांच्या हिशोबाणे) निघून जाण्याच्या आतच लग्न उरकली जातात. फक्त कायद्याच्या भीतीने का होईना वयाचे १८ ओलांडेपर्यंत धीर धरतात. आधीच्या काळी बालविवाह वगैरे करण्याच्या रूढी होत्या, पण अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने #बालविवाह बंद करण्यात आले. तरीही काही गावात अजून बालविवाह होतातच. आणि कमी वयातच लग्न, हे जवळपास सर्वच धर्मातील प्रघात होता.
 
अशातच एक लेख वाचण्यात आला होता, त्यात आजची लग्नव्यवस्था व पद्धती यावर भाष्य केलं होतं. त्या लेखात उशिरा लग्न (म्हणजे वय निघून गेल्यावर) तोटे (अर्थात आरोग्याच्या दृष्टीने) सांगितले होते. त्या लेखामध्ये म्हंटल्याप्रमाणे उशिरा लग्नाचे तोटे आहेत आणि परंपरेनुसार लवकर लग्न करण्याची पध्दत याचेही काही तोटे आहेत असं नमूद करण्यात आलं होतं . त्याच्यामुळे , या दोन्ही पद्धतीच्या मध्ये आपला समाज एका कात्रीत अडकल्यासारखा आहे.
आपल्या समाजात, किंवा सगळीकडेच जागतिकीकरणमुळे आपलं आयुष्य आर्थिक पातळींवर जास्त अवलंबून आहे. पैशांशिवाय कुठल्याच पातळीवर कामे होत नाहीत किंवा प्रतिष्ठा मिळत नाही असं चित्र आहे.
हल्ली शिक्षण पूर्ण करणे, त्यानंतर नौकरी आणि त्यानंतर ‘सेटल’ झाल्यावर लग्नाच्या उठाठेवी सुरू होतात. म्हणजे आर्थिक बाजू भक्कम करणे याला जगभर महत्व प्राप्त झालं आहे. त्यानंतर वैयक्तिक गरजा बघितल्या जात आहेत. त्यातल्या त्यात भारतासारख्या देशात माणसाच्या विविध गरजा फार लक्षात घेतल्या जात नाहीत. असो. आजकाल साध graduation जरी पूर्ण करायचं असेल तर वयाची २१-२२ वर्षे आलेली असतात, त्यानंतर post-graduation केल तर अजून दोन वर्षे, त्यानंतर नौकरी ला अजून एखाद दूसरा वर्षे. ह्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी जवळजवळ वयाची सव्विशी-सत्ताविशी निघून गेलेली असते आणि त्यानंतर लग्न जुळवून येण्यात अजून एक-दोन वर्षे
लागतात. अर्थात, ह्या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित नियोजित कालावधीत पूर्ण झाल्या तर ठीक; अन्यथा शिक्षणात गॅप पडला, नौकरी उशिरा लागली तर अजून कालावधी निघून जातो. त्याच्यामुळे सध्याच्या काळात लग्नाचं वय सरासरी ३० झालं आहे.
 
त्या लेखात मत व्यक्त केल्याप्रमाणे, त्या वयात किंवा नंतर लग्न झाल्यास विविध त्रास सुरू होतात. त्यात नमूद केल्याप्रमाणे, मुलांमध्ये ‘low sperm count’ आणि मुलींमध्ये ‘pregnancy problems’ असे त्रास उद्भवतात. त्यात आजकालच्या जीवनशैलीमुळे बीपी, शुगर, depression वगैरे वगैरे प्रकारचे रोग कमी वयातच मागे लागतात. एकंदरीत उशिरा लग्नं यामुळे शारीरिक पातळीवर काही अडचणी निर्माण होऊ शकतात हा त्यातला पहिला भाग होता.
 
एकतर उशिरा लग्नामुळे आधीच वयाची तिशी ओलांडून गेलेली असते आणि मग फॅमिली प्लॅनिंग आणि “हम अभी parents बनने के लिए तैयार नही है” असे समज करून घेतल्याने मुलं होण्यास अजूनच वेळ लागतो. त्यात आरोग्य दृष्टीकोणातून complications तर येतातच शिवाय पालक आणि मुलांच्या वयांमध्ये खूपअंतर राहत. म्हणजे, मूल होण्याच्या वेळेस आई-वडलांचं वय ३० ते ३५ च्या आसपास असतं. सरासरी ३० वर्षांचं अंतर! आधीच्या काळी आजी-आजोबा आणि नातू यांच्या वयात जे अंतर असायचं ते आता आई-वडील आणि मुलांमध्ये असतं. हे कुटुंब व्यवस्थेला एका दृष्टीने सकारात्मकही आहे आणि नकारात्मकही आहे. सकारात्मक अशा दृष्टीने कारण, पालक आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने मुलांचं भविष्य सुरक्षित तर असतंच आणि एकंदरीत पोषक वातावरण असल्याने ती पिढी अधिक क्षमतेने कार्यक्षम राहू शकते. नकारात्मक अशा दृशीने, की 
जेनेरेशन गॅप!! कारण, पालक आणि मुलं यांच्या वयात अंतर असल्याने त्यांच्यात वैचारिक मतभेद असू शकतात. आणि दूसरा भाग म्हणजे, पालक वृद्धत्वाचा उंबरा ओलांडून पलीकडे जातात तेंव्हाच मुलांचा ऐन तारुण्याचा अन उमेदीचा काळ असतो. मग पालकांची आजारपण वगैरे मुलांना जड वाटू लागतात. त्यातून मग वृद्धाश्रम हा पर्याय निवडला जातो. कारण नवीन पिढीलाही त्यांच्या मुलांसाठी आर्थिक प्रगती साधायची असते. त्यामध्ये मग भारतीय कुटुंबव्यवस्था कोलमडुन पडू शकते. आधीच विभक्त कुटुंबपद्धती वाढली आहे आणि त्यात हा प्रकार म्हणजे समाजाला अयोग्य वाटेवर नेणारा असू शकतो.
आमच्या पिढीने आजी-आजोबा बघितले, पण येणारी पिढी त्यांचे आजी-आजोबा बघू शकेल का ही भीती आहे. उशिराने होणारे लग्न सध्या जरी वरवरचा मुद्दा वाटत असला तरी पुढे जाऊन हाच जटिल प्रश्न होणार आहे असं दिसतय.
 
आज आमच्या नातेवाईक असो किंवा मित्रमंडळी असोत, यांच्यात असे अनेक मूलं-मुली आहेत जे वय जास्त असल्याने लग्न जमण्यास विलंब होत असल्याने त्रस्त आहेत.घराघरात कुकरच्या शिट्टीप्रमाणे वाफेवर असलेले तरुण-तरुणी आहेत. त्यांच्या शारीरिक गरजा वगैरे असतात याची फिकीर कोणालाच नाही. होणारे व्यभिचार, अत्याचार अन अनाचार अशाच असंतुलित घटकांचे परिणाम असू शकतात का याचाही तपास घ्यायला हवा. असो. 
एका बाजूला उशिरा लग्नाचे असे त्रास असताना दुसर्‍या बाजूला लवकर लग्नं जमवण्यातही अनेक समस्या आहेत. एका बाजूला मुलगा आर्थिकदृष्ट्या सक्षमही पाहिजे आणि जास्त वयही नको. हा सुवर्णमध्य साधने गरजेचे होऊन बसलं आहे. कारण, जर लग्न झाल्यावरही मुलगा-मुलगी आणि एकंदरीतचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या संपन्न नसेल तर मग अशा परिस्थतीत संसाराचा गाडा हाकताणा तारेवरची कसरत
तर होतेच आणि होणार्‍या मुलांचं देखील भविष्य सुरक्षित असत नाही. एकंदरीत दोन्हीही बाजूंनी पेच झालेला दिसतोय.
या सर्व वरवर जरी पर्सनल, व्यक्तिस्वातंत्राच्या आणि आर्थिक स्थिरतेच्या गोष्टी वाटत असल्या तरी भविष्यात देशाला, समाजाला आणि जगातही एक समस्या निर्माण करू शकतात.
या सर्वात एकच जाणवलं की, लवकर लग्न केलं तर आर्थिकदृष्ट्या ते जोखमीच असतं आणि उशिरा लग्न हे शारीरिकदृष्ट्या जोखमीचं असतं. त्यामुळे आजच्या काळात लग्नाचं नेमकं वय काय असावं हे कसं ठरवायचं हा
एक यक्ष प्रश्न आहे. आधीचा काळ बरा होता. मुलं-मुली वयात आले की लग्न लाऊन देत असत आणि मग त्यांच्यावर जबाबदर्‍या पडत आणि मग ते सर्व अनुभव घेत संसार करत. पण हल्ली क्रॅश कोर्सेस अन शिकवण्यांचा काळ आहे. सगळं शिकूनच उडी मारायची अशी व्यवस्था चालू आहे. पण आधी पैशांना तितकी किम्मत नव्हती. शिवाय शेती हा मूळ व्यवसाय असल्याने तोच उपजीविकेचा मार्ग असायचा. पण आज आपण अत्यंत जीवघेण्या स्पर्धेच्या युगात उभे आहोत जेथे हे सर्व विचार अन परंपरा कालबाह्य आहेत हेही तितकच खरं!!!
पण काहीही असो, तिशीकडे वळताना काही अविवाहित तरुण-तरुणींच्या मनात लग्नंनंतरच्या आयुष्याची ओढ असते, काहींच्या मनात लग्नंनंतच्या येणार्‍या जबाबदारीची आणि काहींना जाणार्‍या स्वातंत्र्याची भीती असते तर काहींच्या मनात हा प्रपंच जमेल का नाही हीच भीती असते.
 ===समाप्त===
अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991    ||   latenightedition.in 
“मराठी कथा” Android App
खालील लिंकवर वाचा, आधुनिक अस्पृशता…

PROMOTIONS
error: Content is protected !!