Tag: लेख

CHAPTER 2: शेअर मार्केत गुंतवणूक : Period 2

CHAPTER 2: शेअर मार्केत गुंतवणूक : Period 2

Share Market In Marathi  ||  शेअर बाजार मराठीत  ||  Share Market Classes  ||  Investment || मराठी गुंतवणूकदार

Period 2

= > शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कोण करू शकतं???

शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर सर्वात पहिला प्रश्न पडतो की, मी हे करू शकतो का? किंवा हे करण्यासाठी मला काय करावं लागेल. हे कसं असतं? मला जमेल का? यात धोका आहे का? कुठे जावं लागतं?

सगळं सोप्पं आहे. एकदा पाण्यात उतरलं की माणूस पोहायला लागतो तसं ह्या क्षेत्रात उतरलं की माणूस शिकतो. आधी शिकून ह्या क्षेत्रात उतरल्यास बुडण्याची शक्यता कमी असते आणि बुडू नये म्हणून कोणाचंतरी मार्गदर्शन घ्यावं लागतं किंवा काही बचावात्मक योजना कराव्या लागतात, त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना जाणकार माणसाचा सल्ला घ्यावा.

शेअर बाजारात 18 वर्षांवरील भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. तो कितीही पैसे गुंतवू शकतो आणि हवे त्यावेळेस गुंतवणूक संपवू/थांबवू शकतो. ही गुंतवणूक 1 ऋपायांपासून कितीही असू शकते. कुठल्याही कंपनीचा 1 शेअर किंवा अनेक शेअर तुम्ही घेऊन शकता. त्यासाठी तुम्हाला कसले अर्ज करायची गरज नाही किंवा कोणाला विचारायची गरज नाही.

हा झाला मूळ भाग! इतका सोपा आहे शेअर बाजार!

त्यामुळे कितीही पैसे, कितीही shares मध्ये कितीही काळासाठी तुम्ही ठेऊ शकता!

सगळ्यात आधी => याचं अकाऊंट काढायचं कुठे किंवा कसं सुरू करायचं?

तुम्ही तुमच्या बँकेतही हे खातं काढू शकता. याला डिमॅट खातं (Demat Account) म्हणतात. तुम्ही बर्‍यापैकी मोठ्या शहरात राहत असलात तर तेथील बँक डिमॅट खातं ही सुविधा उपलब्ध करून देऊ शकते. जर तुमच्या बँकेत ही सुविधा नसेल तर याच्या वेगवेगळ्या कंपन्या असतात. उदा. Angel Broking, Sharekhan, MotilalOswal, Anandrathi वगैरे. हल्ली Open Free Demat Account Online अशा जाहिरातीही असतात. घरबसल्या हे अकाऊंट सुरू करता येतात.

जर विविध brokerage कंपन्यांचे ऑफिस तुमच्या शहरात असतील तर तेथे जाऊन तुम्ही हे खातं काढू शकता. ब्रोकर मार्फत हे अकाऊंट सुरू करता येतात.

यात Demat Account म्हणजे नेमकं काय याची सविस्तर माहिती आपण नंतर घेऊच.

= > शेअर मार्केट म्हणजे काय???

आधी सांगितल्याप्रमाणे हा गुंतवणुकीचा एक पर्याय आहे. अगदी सोप्या अन सहज भाषेत सांगायचं झालं तर कमी किमतीत एखादी वस्तु घेणे अन जास्त किमतीला ती विकणे आणि त्यातून नफा कमावणे हा या बाजाराचा मूलमंत्र आहे. हा झाला साधा-सरळ हिशोब. मग वस्तु घेताना ती कोणती घ्यायची, कशी जोखायची, पडताळून पाहायची हा अभ्यासाचा आणि कसबीचा भाग आहे.

आता इथे वस्तु म्हणजे हातात घ्यायची कुठली वस्तु नसते. ते असतात शेयर्स!!!

म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणूक म्हणजे, कमी किमतीत एखादा शेअर विकत घेणे अन योग्य किम्मत आल्यास तो विकून नफा कमावणे.

उदा. “स्टेट बँक ऑफ इंडिया” ही राष्ट्रीयकृत बँक आहे. त्या बँकेचा शेअर आपल्या शेअर बाजारात उपलब्ध आहे. सध्या त्याची किम्मत साधारणपणे 300 च्या आसपास आहे. आपण तो आपल्या डिमॅट खात्याच्या मार्फत विकत घेणार. मग Shares किती quantity मध्ये घ्यायचे हा निर्णय आपला असतो. अगदी एकपासून हजारोपर्यन्त आपण कितीही शेअर विकत घेऊ शकतो. अर्थात, आपल्या खात्यात पैसे असतील तर!

समजा, 300 रुपये किम्मत असलेला “स्टेट बँक ऑफ इंडिया” चे 50 शेअर आपण घेतले. काही काळाने त्याची किम्मत 350 झाली आणि आपण ते विकले तर आपल्याला…

विक्री किम्मत (350) – खरेदी किम्मत (300) = 50 रुपये एका शेअर मागे नफा झाला. असे आपल्याकडे 50 शेअर आहेत. म्हणजे 50*50 = 2500 रुपये हा आपला नफा झाला.

[[ सूचना – ह्या खरेदी-विक्रीवर काही कर असतात. कंपनी (Angel Broking, Anandraathi इतर) त्यावर ब्रोकरेज आकारते. पूर्ण रकमेच्या अर्धा टक्का किंवा 0.2 टक्के वगैरे. ते वेगवेगळं असू शकतं. पण खूप जास्त नसतं. त्यानंतर सरकार त्यावर नेहमीचा कर लावते. तोही किरकोळ असतो. ]]

= > शेअर खरेदी-विक्री

तुम्ही एखादा शेअर किती काळ जवळ बाळगू शकता किंवा कधी घेऊन कधी विकू शकता? उत्तर आहे कितीही काळ, कधीही…

आज-आत्ता खरेदी केलेला शेअर तुम्ही आजच-लागलीच विकू शकता.

आज खरेदी केलेला शेअर तुम्ही उद्या, परवा, महिन्यांनी, वर्षानी विकू शकता किंवा मेल्यावरही तो share तुमच्या demat खात्यावर तसाच राहतो जो वारसाला मिळतो.

अजूनही शेअर बाजार समजला नाही??? मग हे वाचा…

एक शेतकरी आपल्या शेतात धान्य करतो. त्यासाठी त्याला विविध प्रकारे खर्च येतो. म्हणजे बियाणे, खत, फवारणी इतर गोष्टी. ही झाली त्याची मूळ गुंतवणूक. गृहीत धरा ती गुंतवणूक 3000 रुपये आहे.

मग काढणी झाल्यावर तो शेतकरी त्याचं धान्य घेऊन बाजारात जातो. त्याला गुंतवलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे येतील अन नफा मिळेल अशी अपेक्षा असते.

जर त्या शेतकर्‍याला पैशांची तातडीने गरज नसेल तर, त्याच्या मालाला बाजारात योग्य भाव येईपर्यंत तो वाट बघेल आणि योग्य भाव आल्यास तो माल विकेल. बाजारातील एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन त्याचा अंदाज असेल की त्याच्या मालाला 7000 रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो, तर तो वाट बघेल.

पण समजा, त्या शेतकर्‍याला तातडीने पैशांची गरज आहे आणि नंतर भाव पडेल याची भीती  आहे किंवा साठवणूक करायला जागा नाही तत्सम कारणाने त्याने आहे तो माफक नफा पदरात घेऊन तो 5000 रुपयांना ते धान्य विकून टाकतो.

पण जर त्या शेतकर्‍याने जास्त नफा येईल अशा अपेक्षेने तो माल विकला नाही अन काही कारणास्तव तुरीचे भाव कोसळले आणि त्याचा दर फक्त 2500 झाला तर त्याचं नुकसान होईल. याला त्याची RISK म्हणता येईल. एकंदरीत, बाजाराची परिस्थिती बघून निर्णय घ्यावा लागतो.

Investment, Risk & Returns…

अशा परिस्थितीत त्याला बाजारातील जाणकाराची (बाजारतज्ञ) आणि निर्णयक्षम व्यक्तीच्या सल्ल्याची आवश्यकता असते. हा बाजारतज्ञ त्याला काळ-वेळ-परिस्थिती व इतर बाबींचा अभ्यास करून त्या शेतकर्‍याला योग्य मार्गदर्शन करून त्याला नफा मिळवून देण्यास सहाय्य करू शकतो. किंबहुना, हे बाजारतज्ञ, पुढच्या मोसमात कोणत्या पिकाला चांगला दर मिळेल हे हेरून कोणतं पीक घ्यावं याबद्दल शेतकर्‍याला सल्ला देऊन मार्गदर्शन करू शकतात.

यात दूसरा भाग असा…

एक व्यापारी ज्याला पैसा कमवायचा असतो, शेतमालाची साठवणूक करायला गोदाम आहे, भविष्यात भाव पडले तरी होणारं नुकसान सहन करायची ताकत असते. पण कालांतराने त्या मालाला चांगला भाव मिळेल अशी त्याची अपेक्षा असते अन बाजाराचा अभ्यासही असतो. तो व्यापारी शेतकर्‍याकडून 5000 रुपयांना ते धान्य खरेदी करून गोदामात ठेवतो.

मग काही कारणास्तव त्या धान्याचे भाव कमी-जास्त होतात, सरकारचा हमीभाव येतो पण व्यापारी न डगमगता ते धान्य जवळ ठेवतो. काही दिवसांत (व्यापार्‍याच्या अंदाजाप्रमाणे) मग भाव वाढतात अन तो व्यापारी ते आठ हजारांना विकतो.

हा झाला त्याचा calculated risk आणि Perception चा भाग! त्याची जोखीम घ्यायची तयारी होती, बाजाराचा अभ्यास होता अन जास्त नफा हवा होता.

शेअर बाजारही असाच काहीतरी असतो. फक्त धान्य वगैरेच्या जागी एखाद्या कंपनीचे शेअर असतात.

शेअर बाजारात विविध कंपन्यांचे शेअर असतात.

उदाहरण, बँक क्षेत्रात – SBI, Axis Bank इत्यादी. IT क्षेत्रात –TCS, Infosys इत्यादी. वाहन क्षेत्रात –Bajaj, Tata, Maruti Suzuki इत्यादी.

असे विविध क्षेत्राशी निगडीत हजारो कंपन्यांचे शेअर असतात. त्यातील चांगल्या कंपन्यांचे आणि काळ-वेळ, बाजाराचा कल, देशातील राजकीय वातावरण, नैसर्गिक स्थिति अशा विविध बाबींचा विचार करून योग्य शेअर निवडता येतात.

-*-*-*-

OPEN DEMAT ACCOUNT ONLINE // सुरू करा डिमॅट अकाऊंट घरबसल्या

https://5minwebsite.angelbroking.com/Diykyc/SubbrokerLead?SbTag=QkJDQg==

अभिषेक बुचके (शेअर ब्रोकर)

CHAPTER 1: गुंतवणूक म्हणजे काय? : Period 1

CHAPTER 1: गुंतवणूक म्हणजे काय? : Period 1

Share Market In Marathi  ||  शेअर बाजार मराठीत  ||  Share Market Classes  ||  Investment  ||  मराठी गुंतवणूकदार

Period 1

बचत आणि गुंतवणूक या भिन्न गोष्टी आहेत. बचत म्हणजे तुमचं उत्पन्न वजा खर्च यातून शिल्लक राहणारी रक्कम. बँकेत आपण बचत खातं सुरू करतो जिथे आपण ही रक्कम “save’’ करतो. ही बचतीची रक्कम तुम्हाला कधीही अडचणीच्या काळात वापरता येते. पण बचतीच्या रकमेत जास्त वाढ होत नसते. त्यावर फक्त मर्यादित व्याज मिळतो. त्याच बचतीच्या रकमेतून योग्य गुंतवणूक केल्यास ती रक्कम वाढ करू शकते.

“Investing your savings amount”

उदाहरणार्थ, जर तुमचं उत्पन्न 1000 रुपये असेल आणि सर्व खर्च होऊन त्यातील 300 रुपये शिल्लक राहत असतील (बचत/savings) आणि ते तुम्ही बँकेत ठेवत असाल तर त्या 300 रुपयांतील 200 रुपये तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर त्यात वाढ होऊ शकते. येथे 300 रुपये ही बचत आणि त्यातील 200 रुपये ही झाली गुंतवणूक.

गुंतवणूक म्हणजे, तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या पैशाला योग्य कामाला लावणे. जसं तुम्ही रोज वेळ खर्च करून काम करता अन त्याच्या मोबदल्यात तुम्हाला महिन्याला पगार मिळतो किंवा  व्यवसाय असेल तर नफा मिळतो तसेच तुम्ही तुमच्या (बचतीतून गुंतवणूक केलेल्या) पैशालाही  कामाला लावायचं जो स्वतः पैसे कमावेल.

Investment Gives Returns

साधं उदाहरण घेतलं तर बँकेत ठेवलेली रक्कम! जेंव्हा तुम्ही बँकेत एफडी करता तेंव्हा बँक तुम्हाला त्या रकमेवर बचत खात्यापेक्षा अधिकचं व्याज देते. हा माहितीतील सर्वात सोपा गुंतवणुकीचा पर्याय आहे.

एकंदरीत, तुमची जी बचत आहे ती कुठेतरी योग्य ठिकाणी गुंतवली तर तुम्हाला त्याचा चांगला मोबदला मिळतो. मग ती नेमकी कुठे गुंतवली तर उत्तम परतावा मिळेल हे सांगणार्‍याला गुंतवणूक सल्लागार (Investment Advisor) म्हणतात.

काही लोक आपल्याकडील पैसे फक्त बँकेत ठेवतात अन त्यावर येणार्‍या व्याजावर समाधानी असतात. काही लोक सोन्यात पैसे गुंतवतात ज्याचा त्यांना चांगला परतावा मिळतो किंवा लग्नात वगैरे कामाला येते. रीयल इस्टेट ही तर गुंतवणुकीची सर्वाधिक परतावा देणारी संधी मानली जाते. त्यानंतर काही लोक म्यूचुअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवतात. याहूनही वेगळे गुंतवणुकीचे मार्ग असू शकतात. पण साधारणपणे गुंतवणुकीचे असे विविध पर्याय आहेत.

आता वर नमूद केलेल्या क्षेत्रात येणारा परतावा वेगवेगळा असला तरी रिस्क अर्थात जोखीमही वेगवेगळी असते. कारण तुम्ही जर सरकारी किंवा मोठ्या बँकेत पैसा ठेवत असाल तर त्यात पैसा गमावण्याची रिस्क खूपच कमी असते. पण येणारा परतावा मर्यादित असला तरी नियमित अन खात्रीशीर असतो.

सोन्यात जर पैसे गुंतवले असतील तर धोका मध्यम असतो. विशेषतः गुंतवणूक म्हणून घेतलेलं सोनं लग्नकार्यासाठी वापरता येतं आणि काही लोक त्या दृष्टीनेच गुंतवणूक करत असतात.

रीयल इस्टेट मध्ये धोका बर्‍याच अंशी असतो. एकतर ती स्थावर मालमत्ता जपावी लागते. शिवाय त्याच्या किमती सरकारी निर्णय, दुष्काळ, अर्थसंकल्प अशा विविध घटनांवर आधारित असल्याने त्यात खूप मोठ्या प्रमाणात कमी-जास्त होऊ शकतात. पण स्थावर मालमत्तेच्या किमती बहुतांश वेळा वाढत राहतात. परतावाही चांगला मिळतो. भारतात रियल इस्टेटमध्ये सर्वाधिक गुंतवणूक आहे.

                  गुंतवणुकीच्या ह्या सर्व पर्यायांपैकी सर्वात वेगळा प्रकार आहे शेअर मार्केट. यात पैसा गुंतवला तर रिस्क तर असतेच, पण अभ्यासपूर्ण किंवा योग्य सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक केली तर त्यातून येणारा परतावाही उत्तम असतो.

= >  गुंतवणुकीचं सूत्र???

समजा, तुम्ही जर महिन्याला 1000 रुपये कमावत असाल आणि त्यातील 100 रुपये ही जर तुमची बचत असेल तर तुम्ही हा पैसा कुठे? कसा? अन किती प्रमाणात गुंतवाल?

आपण थोडासा लेखाजोखा घेऊया!

100 पैकी 25 ते 30 रुपये तुम्ही चांगल्या राष्ट्रीयकृत सरकारी बँकेत ठेवा. जो पैसा तुम्हाला हवा तेंव्हा खात्रीपूर्वक परत मिळेल.

100 पैकी 15 रुपये तुम्ही सोन्यात गुंतवा.

25 ते 30 रुपये तुम्ही एलआयसी, जीवन बीमा वगैरे पॉलिसीसाठी ठेऊ शकता. हा गुंतवणुकीचा पर्याय नसला तरी अडचणीच्या काळात याचा आधार मिळतो.

शक्य असेल तरच 10 ते 15 रुपये रीयल इस्टेट मध्ये गुंतवू शकता. पण कमी पैशात ही गुंतवणूक अशक्य आहे. पण EMI पद्धत त्यासाठी उत्तम.

25 ते 30 रुपये शेअर मार्केट अथवा म्यूचुअल फंड मध्ये ठेवाच ठेवा…!

हे काही निश्चित प्रमाण नाही किंवा कसलं गुणोत्तर नाही. हे प्रमाण ढोबळमानाने काढलं आहे. हे प्रमाण माणूस, त्याचा वर्ग, वय, आर्थिक स्थिती, वैयक्तिक आकांक्षा, त्याच्यावरील जबाबदर्‍या, त्याचं राहणीमन अन भविष्यातील तरतूद यानुसार बदलू शकतं. उदाहरण घ्यायचं तर, मुलीच्या लग्नासाठी जर तुमची गुंतवणूक असेल तर सोन्यातील गुंतवणूक तुम्ही वाढवू शकता. टप्प्याटप्प्याने सोन्यात केलेली गुंतवणूक मुलीच्या लग्नाच्या वेळी उपयुक्त ठरते.

जर तुमचं हक्काचं घर नसेल आणि स्वतःचं घर असणं जर तुमची गरज असेल तर तुम्ही कर्ज घेऊन घर विकत घेऊ शकता आणि त्याचे हफ्ते फेडू शकता. यात तुमचं हक्काचं घर झालं, ज्याची किम्मत कालानुरूप वाढतच जाते.

जर तुमची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि तुम्हाला पैशांची फार आवश्यकता नाही तर आहे तो पैसा बँकेत एफडी करून ठेवा आणि Mutual Fund मध्ये ठेवा आणि चिंतामुक्त आयुष्य जगा.

जर तुम्हाला तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबियांचं भविष्य सुरक्षित करायचं असेल किंवा तुम्ही एकटेच कुटुंबातील कमावते असाल/आधार असाल तर अशा परिस्थितीत तुम्हाला Life Insurance चा विचार करता येईल. हा गुंतवणुकीचा मार्ग नाही पण सोय आहे. जर तुमचं अकाली निधन झालं किंवा आजाराने त्रस्त असाल तर अशावेळी परतावा महत्वाचा नसून त्यावेळी तातडीने पैशांची गरज असते.

आजपासून पंधरा वर्षानी जर मुलाच्या शिक्षणासाठी गुंतवणुकीचा योग्य परतावा पाहिजे असेल तर शेअर मार्केट अथवा म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता. किंवा गुंतवणुकीतून जास्त पैसे कमवण्याची इच्छा असेल तर शेअर बाजारात पैसे गुंतवू शकता.

वरील प्रमाण प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे निश्चितपणे बदलू शकतं.

Decide Your Investment Goals

-*-*-*-

OPEN DEMAT ACCOUNT ONLINE // सुरू करा डिमॅट अकाऊंट घरबसल्या

https://5minwebsite.angelbroking.com/Diykyc/SubbrokerLead?SbTag=QkJDQg==

अभिषेक बुचके (शेअर ब्रोकर)

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ

#लोकसभानिवडणूक२०१९  ||  #राजकारण  ||  कोकणचो शिमगो 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आत्ताच गाजतोय तो काँग्रेस उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांच्यामुळे. त्यांचे सनातन संस्थेशी संबंध आहेत असे आरोप पुरोगामी वर्तुळातूनच होत आहेत. पण कॉंग्रेसला त्यातल्या त्यात चांगला आणि मतं मिळवेल असा उमेदवार मिळाला आहे म्हणून कॉंग्रेस या वादाकडे दुर्लक्ष करत आहे.

त्यांच्याविरोधात आहेत सेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत आणि नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे. अशा पद्धतीने हा सामना तिरंगी होईल.

कोकणात सेनेची स्वतःची ताकद आहे आणि नाणार प्रकल्प रद्द झाल्याने सेनेची कोकणात विश्वासार्हता वाढली आहे. ठाकरे कुटुंबाने दिलेला शब्द पाळला यावरून मते मागणे शिवसेनेला सोपे आहे. शिवाय युती झाल्याने थेट कुठलं आव्हान नाही. विनायक राऊत आक्रमकपणे प्रचार करत आहेत आणि कोकणात झाली न झालेली कामे यावर निवडणूक लढवत आहेत.

तिसरीकडे राणे कुटुंबीय सध्या राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटची झुंज देतील. युती झाल्याने त्यांच्यासमोर कुठलाही पर्याय उरला नाही. भाजपने केवळ वापरुन घेतल्याने त्यांच्या कुटुंबाकडे उघड संघर्षाशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच नीलेश राणे निवडणूक लढवत आहेत. कुठल्याही पक्षाचं चिन्ह आणि संघटना त्यांच्या साथीला नाही आणि जुने साथीदारही साथ सोडून गेलेले आहे. ही राणे यांच्यासाठी निकराची लढाई असेल. अस्तित्व टिकवणे आणि स्वतःची ताकद दाखवून देणे हा एकमेव मार्ग राणे कुटुंबाकडे आहे.

काँग्रेसला चौदा वर्षाच्या वनवासानंतर काहीतरी वेगळं मिळतंय हेच खूप आहे. बांदिवडेकर यांच्या रूपाने काँग्रेस पक्ष म्हणून उभा राहिला तरी पुरेसं आहे. शिवसेनेकडे असलेला भंडारी मते त्यानिमित्ताने काँग्रेसकडे सरकू शकतात. एक नवी सुरुवात होऊ शकते. शिवसेना कोकणशी नातं अधिक घट्ट करू पाहणार यात शंका नाही. मार्ग सोपा वाटत असला तरी सहजरीत्या सर्व होईल असेही नाही, कारण स्वपक्षातील गट-तट आणि छुप्या युती-आघाडी मोडून विजयाचे डोंगर सर करायचे आहेत.

मतदारसंघाचे गणित मांडले तर, मतविभाजन होऊन कोणीतरी एकजण कमी फरकाने निवडून येईल असं दिसतं आहे पण शिवसेना त्यात अग्रेसर राहील.

गती कळली…

गती कळली…

मराठी कथा    ||  मराठी साहित्य   ||   लेखन   ||   गती   

 

तो एकटाच बसला होता नेहमीप्रमाणे खिडकीतून बाहेरचा दिसणाऱ्या निर्जन रस्त्याकडे बघत. एकटेपणाने स्वतःशीही संवाद करायची सवय मोडली होती. त्या काळ्याशार निर्जीव रस्त्याप्रमाणे आयुष्यही स्थिर होऊन बसलं होतं. सिगरेटचा धुरही दूरच पळत होता. डोळ्यातून चार थेंब पडल्याचाही आवाज ऐकू आला!

कुठेतरी दूर आपलं घर आहे. जगात कुठेतरी माझी प्रेयसीही आहे. पण आता सगळं मागे सुटलं आहे याची खंत आहे. तो खुर्चीवर बसून रडत राहिला. पाठीमागे खोलीतील अंधार अन समोरून पथदिव्याचा प्रकाश जणू याच्या आयुष्याची प्रतल बनून उभे होते. जे ठरवलं होतं तेच घडत होतं पण ते इतकं भावनिक कसं चालेल…?

त्या रस्त्यावरून एक मोटार वेगाने धावत गेली. त्याला तो आवाज आवडला. त्याने डोळे पुसले अन उभा राहिला. सवय असल्याप्रमाणे आतल्या अंधारात गेला अन हातात एक डायरी घेऊन परत आला. ‘7 वर्षे स्वतःची’ असं काहीतरी लिहिलं होतं डायरीवर. त्याने आजच्या तारखेचं पान काढलं अन वर लिहिलं ‘गती कळली.’

भूतकाळ डोळ्यासमोरन गेला! तीन वर्षे झाली होती घर, कुटुंब, ओळख सोडून! अजून चार वर्षे काढायची होती! सुरुवातीला मजेदार वाटणारा प्रवास आता संपन्न करणारा होत आहे. जीवनाचे रंग शिकवतोय! कुठेतरी सापडेल मानवी आयुष्याचा सार या शोधात होता तो… पण स्वतःच हरवून बसला… जीवन गतिशील आहे…

जीवनाला स्थैर्य आवडत नाही, त्याला नदीसारखा प्रवास हवा असतो. एकांत माणसाला स्थैर्याकडे नेतो अन उकल होत जाते मानवी संस्कृती समृद्ध असण्याची! बुद्ध, तुकाराम, ज्ञानेश्वर यांना सापडलं ते मलाही सापडेल पण त्यासाठी एकेक अनुभुती यायला हवी! प्रवास अजून खडतर होईल अन एकटेपणा जीव घेईल…

रात्रीच्या अंधारात तो रस्ता, ही खोली, मी अन हे विश्व अनभिज्ञ असतात एकमेकांपासून आणि उजाडताच होतात जिवलग मित्र एकमेकांचे! तो अंधार संपवून पहाट होण्याची वाट बघायची. तोपर्यंत अस्वस्थ करणाऱ्या कितीतरी रात्री येतील, पण ते अश्रुंचे उमटणारे ध्वनी स्मरणात ठेवायचे! बास…

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

 

पक्षांतर करून तिकीट मिळवलेले उमेदवार

पक्षांतर करून तिकीट मिळवलेले उमेदवार

#लोकसभानिवडणूक२०१९  ||  #राजकारण  ||  राजकीय_विश्लेषण   ||  निवडणूक  ||  निष्ठा आणि विचार 

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये प्रमुख पक्षांकडून जे उमेदवार जाहीर झालेले आहेत त्यापैकी काही पक्षांतर करून लागलीच तिकीट मिळवणारे आहेत. महाराष्ट्रातील ४८ विद्यमान खासदारांपैकी अनेकजण असे आहेत ज्यांनी कधीना कधी पक्षांतर केलेलं आहे. म्हणजे ते मूळ विचारधारेपासून वेगळ्या पक्षात जाऊन काम करत आहेत. लोकांनीच अशा लोकप्रतिनिधीची निवड केली आहे.

 

२०१९

अमोल कोल्हे

सुजय विखे

धैर्यशील माने

मोहिते पाटील

नरेंद्र पाटील

धनराज महाले

नाना पटोले

बाळू धानोरकर

सुभाष वानखेडे

प्रताप पाटील चिखलीकर

भारती पवार

नरेंद्र पाटील

कांचन कुल

ही यादी वाढतच जाणार…

*

सध्याचे खासदार आणि उमेदवार यापैकी फार कमी असे आहेत जे पहिल्यापासून एकाच पक्षाशी एकनिष्ठ आहेत.

२०१४ यादी

सुभाष भामरे

संजयकाका पाटील

कपिल पाटील

राजेंद्र गवीत

सदाशिव लोखंडे

नाना पटोले

हीना गावीत

हेमंत गोडसे

 

याशिवाय असे अनेक उमेदवार आहेत जे निवडून येऊ शकले नाहीत पण पक्षांतर करून त्यांनी तिकीट मिळवलं. मुद्दा असा आहे की जर राजकीय पक्ष विचारांवर चालत असतील तर सामन्यातील सामान्य निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट देता येत नाही का? तेच ते नेते पुन्हा निवडून देण्यात काय अर्थ आहे?

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

भाजपची Portfolio Management

भाजपची Portfolio Management

#अन्वयार्थ   #राजकारण  #लोकसभानिवडणूक२०१९  राजकीय_विश्लेषण  

दीर्घकाळासाठी जेंव्हा गुंतवणूक करतात तेंव्हा Diversified Portfolio चा विचार केला जातो। म्हणजे सरसकट एकाच कंपनीचे shares घेण्याऐवजी विविध सेक्टरमध्ये गुंतवणूक केली जाते। याचा लाभ असा की, एखादं सेक्टर जर परफॉर्म करत नसेल तर दुसरं सेक्टर भर घालेल।

म्हणजे 100₹ गुंतवले तर कोणत्याही परिस्थितीत किमान 100₹ तरी परत मिळतील याची शास्वती। भाजपसाठी 272 हा जादुई आकडा आहे ज्यासाठी भाजपने Diversified Portfolio बनवला आहे। गेल्या लोकसभेला भाजपने 280 जागा मिळवल्या ज्या बहुतांश उत्तर, पश्चिम भारतातून होत्या। सत्तेत आल्यावर भाजपने ईशान्य व दक्षिणेकडे लक्ष केंद्रित करून ‘गुंतवणूक’ केली। या निवडणुकीत पश्चिम व उत्तर भारतातून आधीसारखं यश मिळवणं शक्य नाही। इथे जी तूट होईल ती ओरिसा, पश्चिम बंगाल, अष्टलक्ष्मी राज्ये व दक्षिणेतून काही अशा ठिकाणी भरून निघेल। आकड्यांच्या खेळात कमी पडू नये म्हणून ही रणनीती| ही खरं तर स्व. प्रमोद महाजन यांनी रणनीती होती जी आजची भाजपा वापरत आहे। या गृहीतकानुसार (जर जनक्षोभ फार नसेल तर) भाजपला 250 जागा मिळवता येतील।

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

BUYBACK – नफ्याची संधी

BUYBACK – नफ्याची संधी

शेअर बाजार मराठीत   ||  Share Market In Marathi  ||  Short Term Positional Investment  ||  Learn to Earn Without Risk


OPEN DEMAT ACCOUNT ONLINE

जेंव्हा कंपनी बाजारातून अर्थात, सामान्य shareholder कडून कंपनीचे shares परत विकत घेते याला BuyBack म्हणतात.

एखाद्या कंपनीने जर ठराविक rate ला shares buyback ची ऑफर देऊ केली असेट तर सामान्य shareholder (भागधारक) आपल्याकडील shares कंपनीला परत करू शकतो. Buyback चे दर हे सामान्यतः बाजार दरांपेक्षा जास्त असतात जेणेकरून सामान्य गुंतवणूकदार अधिक नफ्याच्या आशेने shares कंपनीला परत करेल. म्हणजे समजा, एखाद्या कंपनीच्या शेअरचा मार्केट रेट 70 रुपये असेल तर Buyback चा रेट हा सामान्यपणे 70 पेक्षा अधिक असतो. याला कारण असं की, गुंतवणूकदार अधिक रेट मिळणार या आशेने बाजारातून shares ची नव्याने खरेदी तर करतात आणि ते shares अधिक दराने देऊनही टाकतात.

Buyback केल्याने त्या कंपनीकडे स्वतःच्या कंपनीच्या shares ची मालकी वाढते. म्हणजे कंपनीचं shareholding वाढतं. आता जर स्वतः कंपनीच स्वतःच्या कंपनीत हिस्सेदारी वाढवते आहे तर नक्कीच त्या share चे रेट भविष्यात वाढणार आहेत असा त्याचा अर्थ होतो. जी कंपनी चांगला performance देत असते आणि ज्या कंपनीचा profit जास्त आहे त्या कंपनीलाच Buyback शक्य आहे.

वर्ष 2018 मध्ये अनेक कंपन्यांनी Buyback Offer आणलेली होती. यात मोठ्या कंपन्यासह PSU सुद्धा आहेत. खासकरून IT क्षेत्रातील कंपन्यांनी Buyback करण्याचं प्रमाण अधिक राहिलेलं आहे.

चांगल्या कंपन्यांचे Buyback offers असतील त्या काळात गुंतवणूकदाराला नफ्याची चांगली संधी असते. म्हणजे येणार्‍या काळात Tech Mahindra ही IT क्षेत्रातील मोठी कंपनी Buyback offer घेऊन येत आहे. सध्या तो शेअर 800 रुपयांच्या च्या आसपास कार्यरत आहे आणि Buyback चा रेट आहे 950. त्यासाठी 6 मार्च ही record date आहे. म्हणजे 6 मार्च पर्यन्त ज्यांच्याकडे हे shares आहेत ते गुंतवणूकदार Buyback साठी पात्र असतील. या Buyback मध्ये कंपनी सर्व गुंतवणूकदारांचे सर्वच्या सर्व shares Buy करत नाही. त्याचं एक प्रमाण निश्चित केलं जातं. म्हणजे माझ्याकडे 100 shares असतील तर त्यापैकी 40/45/48/35/13/66 असे ठरवून दिलेल्या प्रमाणात shares च कंपनी Buy करते.

एखादी कंपनी Buyback offer आणणार आहे अशी बातमी आधीच बाजारात असते. ती Business Channel किंवा Business Newspaper वगैरेच्या माध्यमातून सर्वांसमोर येत असते. जर Tech Mahindra सारखी कंपनी Buyback करणार आहे अशी बातमी समजल्यावर आपल्याला त्या कंपनीचे shares BUY करायला (जेवढे पैसे उपलब्ध आहेत तेवढेच) काहीच हरकत नाही. म्हणजे दोन महिन्यांपूर्वी Tech Mahindra 720 च्या आसपास होता त्यावेळेस जर हा share Buy करून ठेवला असता तर Buyback मध्ये 950 च्या रेटला तो देता आला असता.

खालील लिंकवर पहा Tech Mahindra च्या Buyback संबंधी बातमी-

https://www.moneycontrol.com/news/business/tech-mahindra-to-buyback-2-05-crore-shares-for-rs-1956-crore-3566641.html

सन 2018 मध्ये कोणत्या कंपन्यांनी Buyback offer आणली होती ती यादी पाहुयात. सोबतच येणार्‍या काळात कोणते Buyback आहेत त्याचीही माहिती घेऊ.

Aarti Drugs, Balrampur Chini Mills, Bharat Electronics, eClerx Services, Indiabulls Real Estate, KPR Mill and MOIL, While Mcleod Russel, ADF Foods, Indiabulls Real Estate, DCM Shriram, BSE, IOC, NMDC, Monte Carlo Fashions, SKF India, Oil India, HEG, Triveni Turbine Limited, Indian Energy Exchange, Baba Arts, NHPC, ONGC, Just dial, BHEL, Mphasis, Cochin Shipyard, KG Denim, KIOCL Limited, NLC India, National Aluminum,  Redington, Pressman Properties, NLC India, Navneet, TCS, DB Corp, HCL Tech, Navneet, Jagran Prakashan, Coal India, Tech Mahindra, Bosch, Ajanta Pharma, Tata Investment,

खालील लिंकवर पहा Buyback करणार्‍या कंपन्या व त्यासंदर्भातील माहिती-

https://www.sebi.gov.in/sebiweb/home/HomeAction.do?doListing=yes&sid=3&ssid=22&smid=17

Buyback ची news असेल तर ती एक संधी असते जेथे फार कसली Risk न घेता चांगला नफा कमावता येतो. सामान्य गुंतवणूकदारांनी ही संधी सोडता कामा नये.

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

Earn More…

Highest Dividend Paying Stocks

भारत माता की जय!!!

भारत माता की जय!!!

टीप- अर्थ समजून घेण्याची विवेकबुद्धी असेल तरच वाचायचा त्रास घ्यावा!

गोविंद बस स्टॉपवर बराच वेळ उभा होता. सकाळी आठ वाजता येणारी एसटी अजूनही आली नव्हती. किंबहुना ती आता येईल याची शक्यताही नव्हती. आठ नंतर थेट सव्वानऊ वाजताच गाडी. तोपर्यंत बसस्टॉपवर बसून टाइमपास करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. टाइमपास व्हावा म्हणून तो स्टॉपवरच्या कोपर्‍यात ‘मोफत वाचनालय’ म्हणून एक लोखंडी कप्पा केला होता त्या दिशेने गेला. तिथे सकाळी-सकाळी पेपर टाकले जातात जे पुढील अर्ध्या तासात गावातील लोकांकडून गायब केले जातात. ते वाचण्यासाठीच नेले जातात असं नाही तर समोरचा भजेवाला रद्दी कमी पडली तरी ते पेपर उचलून घेऊन जातो. त्यालाही तसं कोण विरोध करत नाही. कारण त्या कप्प्यातील पेपर गावातील प्रत्येकाच्या घरात एकदा-न-एकदा गेलेलाच असतो. गोविंद त्या पत्र्याच्या कप्प्यामध्ये डोकावून बघतो. एकही पेपर शिल्लक नसतो. कोपर्‍यात कुठलंतरी दुमडलेलं पुस्तक दिसतं. गोविंद ते उचलतो. सावरकरांचं परिचयपुस्तिका असते ती. कोणत्यातरी पक्षाने सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आयुष्यावर छोटीशी पुस्तिका तयार केलेली असते आणि इथे ठेवलेली असते. पण त्याला कोणीच हात लावत नाही. गोविंद सावरकरांना घेऊन वाचत बसतो.

काहीच वेळात ऋग्वेद स्टँडवर येतो. गोविंद ऋग्वेदपेक्षा काहीसा मोठा. येताच ऋग्वेद म्हणतो, “काय गोविंददादा, मुंबईला का?”

गोविंद उत्तरतो, “हो रे. पण आठची बस आलीच नाही. सव्वानऊच्या बसची वाट बघतोय.”

ऋग्वेद हसत म्हणतो, “एक बस वेळेवर येईल तर शपथ. पावसासारख्या वाट्टेल तेंव्हा येतात बघ. वरुन सगळ्या टपाराड बसेस आपल्या गावाला लावलेल्या… काय खरं नाय बघ!”

गोविंद वर हात करून म्हणतो, “सब भगवान भरोसे है भाई अपना…” आणि एक निश्वास सोडून म्हणतो, “पण तू काय करतोय इथे? आज सकाळपासूनच अड्डा जमवायचा का इथं?”

ऋग्वेद आपले वाढलेले केस हाताने सरळ करत म्हणतो, “नाही रे दादा, पुण्याला निघालोय. दोन वाजता राज्यासेवेचा पेपर आहे.”

गोविंद मिश्किलपणे हसत म्हणतो, “सुरूच आहे का अजून?”

ऋग्वेद नाक वाकडं करत म्हणतो, “लास्ट अटेम्प्ट!”

गोविंद हात जोडत म्हणतो, “धन्य आहे बाबा तुझी. चार वर्षे झाली रे आता. सोड हे, काहीतरी कामधंद्याचं बघ आता. किती दिवस म्हातार्‍याच्या जिवावर बसणार अजून.” हा नेहमीच अनुत्तरित राहणारा प्रश्न गोविंद विचारतोच.

थोडासा उदास होत ऋग्वेद म्हणतो, “तेच प्रयत्न चालूय दादा, पण नंबरतरी लागला पाहिजे. चार एकर शेतीवर आधीच्या पिढीने काढली, आपण स्वप्नं तरी मोठं ठेवावं की रे. एकदा सरकारी नोकरीत घुसलो की आयुष्य बनेल बघ.”

गोविंद नरमाईने म्हणतो, “खरं आहे रे तुझं, पण काहीतरी काम-धाम करत केलास हे तर म्हातार्‍याच्या खांद्यावरचं ओझं थोडं हलक होईल.”

ऋग्वेद, “ह्या गावात काय करणार? अन शहरात जाऊन करावं तर आलेले सगळे तिकडेच संपणार. त्यापेक्षा इथं राहून कधी-मधी शेतीला तर जातो.”

गोविंद हात झटकत म्हणतो, “खरय बाबा तुझं. पण तुझं एक बरं वाटतं, तू दिवसभर गावातल्या पोरांसारखा स्टँडवर बसून टवाळक्या तरी करत नाहीस.”

ऋग्वेद त्याच्या बोलण्याने जरा सावरतो. काही क्षण शांत जातात अन ऋग्वेदचं विचारतो, “पण तू कशाला निघालास मुंबईला?”

गोविंद जागेवरून उठतो, सावरकरांचं पुस्तक परत ठेवतो आणि म्हणतो, “नेहमीचच रे, आश्रमशाळेचं काम. निधी नाही, मुलं ज्यादा झालीत पण सोय नाही, साहित्य नाही वगैरे वगैरे वगैरे!”

ऋग्वेद आश्चर्याने म्हणतो, “च्यायला दादा, तुझा न आदर्श घ्यायला पाहिजे गावातल्या पोरांनी. तू जे काही करतोय ना, ते कौतुकास्पद आहे. अनाथ मुलांसाठी जे करतोस ना त्यासाठी तुला सलाम केला पाहिजे.”

गोविंद सावरकरांच्या पुस्तकाकडे हात दाखवत म्हणतो, “मला काही असं पुस्तकात बंदिस्त होऊन कुठल्यातरी वाचनालयाच्या कोपर्‍यात पडायचं नाहीये. हे मला मनापासून वाटतं म्हणून मी करतो.”

ऋग्वेद हळू आवाजात म्हणतो, “दादा, एक खरं सांगायचं, तुला मनापासून हे आवडतं?, कर्तव्य म्हणून करतोस?, नोकरी लागली नाही म्हणून करतोस? का यात छपाईचा काही मार्ग असतो म्हणून करतोस? वाईट नकोस हं वाटून घेऊ…”

गोविंद खळखळून हसतो अन म्हणतो, “छपाई अन इथे… अरे वेड्या सरकारच्या तुटपुंज्या पगारावर जगतोय मी. अनाथालयातील पोरांना महिन्याला खायला मिळालं तरी पुष्कळ झालं, मला कसलं खायला मिळणार आहे.”

ऋग्वेद, “राग आला का दादा?”

गोविंद, “नाही रे, राग कसला त्यात? मीही आधी तुझ्यासारखा नोकरीसाठी तळमळ करत होतो. एमपीएससी च्या वार्‍या मीही केल्यात. ह्या शाळेवर कशीबशी नोकरी मिळाली. गावातल्या गावात आहे म्हणून टेंपरारी करू लागलो. पण शपथ सांगतो ऋग्वेद, जेंव्हा पोरांची अवस्था बघितली ना जीव कासावीस होऊ लागला. कदाचित अतिसंवेदनशील असल्याने असेल, पण मला वाटलं देवाने या पोरांसाठीच मला इथे पाठवलं आहे. मरेपर्यंत यांच्यासाठी काही करता आलं तरी समाधान असेल बघ मला. आयुष्यात कुठल्यातरी क्षणी मनाचं ऐकावं लागतं.”

दोघांचं बोलणं सुरू असताना मुंबईला जाणारी बस आली आणि गोविंद निघाला. ऋग्वेदने क्षणभर त्याचा हात धरला आणि पुन्हा विचारलं, “दादा रागावला नाहीस न?” गडबडीतच गोविंद म्हणाला, “नाही रे वेड्या, यात कसला आलाय राग. चल निघतो, रात्री भेटू. आणि हो, शेवटचा अटेम्प्ट आहे, कर काहीतरी.” असं म्हणून तो निघून गेला.

बस सुरू झाली. एका फाटक्या सीटवर गोविंदला जागा मिळाली. खिडकीतून बाहेर बघत होता. ओसाड पडलेले रान मागे जात होते आणि खिडकीतून धूळ आत येत होती. त्याला त्या धुळीचं काहीच वावगं वाटलं नाही पण शेजारचा गृहस्थ त्रासिक चेहरा करताच त्याने खिडकी ओढून घेतली. पण हादर्‍याने खिडकी पुन्हा आपोआप उघडली जात होती. मागच्या सीटवर बसलेला एक व्यक्ति सांगू लागला, ‘भारताने बदला घेतला, पाकिस्तानवर हल्ला केला.’ बसमध्ये तीच चर्चा सुरू झाली. गोविंदने मोबाइल काढून बातम्या तपासल्या तेंव्हा त्याला कळलं की रात्री भारतीय वायुदलाने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना ठार केलं. गोविंदला प्रचंड आनंद झाला. प्रत्येक भारतीयाला आनंद होईल असाच तो क्षण होता. बसमध्ये सुरू असलेल्या चर्चेत तोही सहभागी झाला. भारताच्या सामर्थ्याचे गोडवे गायले जात होते. नेहमी कटकटीत असणारे एसटी प्रवासी आज एकसुरात आनंद व्यक्त करत होते.

गाडी मुंबईला पोहोचली. ओसाड पडलेल्या माळरान आणि इमारतींचं जंगल असा तो प्रवास होता. गोविंदने आपली पिशवी घेतली आणि निघाला. गाडीतून उतरून समोर येतो न येतो तोच दोन-तीन कार्यकर्त्यांनी त्याच्या हातात पेढा टेकवला. भारताने युद्ध जिंकल्याच्या आवेशात त्या व्यक्तीने पेढे देऊन आनंदोत्सव साजरा केला होता. गोविंदलाही खूप भारी वाटलं. सामर्थ्यशील भारताचं दर्शन घडत असल्याचा अभिमान त्याच्या चेहर्‍यावर होता. देशात काहीतरी बदल होतोय, चांगलं घडतंय असं वाटत होतं. रस्त्यावर व सगळीकडे तेच वातावरण होतं. लोकं अक्षरशः विजयोत्सव साजरा करत होते. वंदे मातरम, भारत माता की जय, इंडियन आर्मी झिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. कुठे-कुठे तर फटाकेही फोडले जात होते. आज सर्वांचा उर अभिमानाने भरून आला होता. घटनाही तशीच घडली होती, शत्रू राष्ट्राचं नाक जमिनीवर घासल्या गेलं होतं.

Image result for a boy carrying india flag

देशप्रेमाच्या अन अभिमानाच्या विचारांत गुंतलेला असताना कसल्यातरी आवाजाने त्याची तंद्री भंग पावली. समोर चौकात गर्दी झाली होती. सिग्नल तोडून जाणार्‍या एका वाहनाने दुसर्‍या वाहनाला उडवलं होतं. त्यात दूसरा व्यक्ति रक्तबंबाळ होऊन रस्त्याच्या मध्यभागी पडला होता. गर्दी जमा झाली, फोनाफोन सुरू झाले अन ट्रॅफिक वाढली. गोविंद तेथे जास्त वेळ न रेंगळता लागलीच निघाला. त्याला मंत्रालयात जायचं होतं. गावातील आश्रमशाळेची अवस्था दयनीय झाली होती. अनुदान रखडलं होतं, इमारत कोसळायला आली होती, मुलांना अंथरूण-पांघरून नव्हते, चांगलं अन्न मिळत नव्हतं. आश्रमशाळेला मदत मिळावी म्हणून तो सारखे खेटे मारत होता. असे अनेक प्रवास मुंबईत फक्त या कामासाठी घडलेले होते पण काम काही होत नव्हतं. त्यामुळे तो हताश झाला होता.

गोविंद गडबडीने मंत्रालयात पोहोचला. आज तिथे जरा जास्तच गर्दी अन जास्तच सुरक्षा व्यवस्था होती. युद्धजन्य परिस्थितीमुळे असेल कदाचित असं म्हणून त्याने ते स्वीकारलं. आज देशभर राष्ट्रभक्तीचा ज्वर उसळला होता. सामन्यातील सामान्य माणूसही सगळी सुख-दुखं विसरून देशाच्या विजयात सामील झाला होता. आजच्या या नवभारताच्या दिवशी तरी काम होईल असं गोविंदला वाटत होतं. नेहमीप्रमाणे रांगेत थांबावं लागलं. नेहमीचेच सोपस्कार झाले, किंबहुना अधिकच! तिथेही सर्व कर्मचारी देशभक्तीच्या वातावरणाने न्हावून निघाले होते. गोविंदचं काम ज्या डेस्कवर होतं तिथे तो पोचला. आज कधी नव्हे ते समोरील व्यक्ति हसरा चेहरा घेऊन बोलत होती. त्याने आधी गोविंदला पेढा दिला आणि सांगितलं, “घ्या पेढे! भारतीय सैन्याच्या कामगिरीबद्दल आम्हीच पेढे वाटत आहोत. आजचा मास्टरपीस होता. पाकिस्तानची चांगलीचं तंतरली.” गोविंदलाही आज त्याच्याशी बोलायचा उत्साह आला. भारतीय सैन्य पाकिस्तानी सैन्यापेक्षा किती सामर्थ्यवान आहे, आपल्याकडे त्यांच्यापेक्षा किती हत्यार अधिक आहेत, किती लढाऊ विमानं अधिक आहेत याची तपशीलवार चर्चा झाली दोघांत. बलाढ्य भारत, विकसित भारत यावर कसलाच मतभेद नव्हता.

शेवटी गोविंदने कामाचं सांगितलं. त्याला वाटलं आज नवीन भारत सुरू झालाय. प्रत्येकाच्या मनात राष्ट्राप्रती प्रचंड आदर आहे आणि कर्तव्यनिष्ठेची जाण आहे. त्या अधिकार्‍याने फाइल बघितली आणि सांगितलं, “होईल. पण जरा वेळ लागेल. काय, आज सगळेजण जल्लोषाच्या मूडमध्ये आहेत. देशासाठी इतका मोठा दिवस आहे ना. थोड्या वेळाने सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छोटासा कार्यक्रमही आहे त्यामुळे कर्मचारी त्या कामात अडकलेत. बघूयात आपण काय होतय ते. मी सांगतो तुमची केस वर.”

नेहमीप्रमाणे आजही रिकाम्या हातानेचं गोविंद मंत्रालयातून परतला. बदललेल्या भारताने पहिल्यांदाचं त्याचं काम केलं नाही. सकाळचा उत्साह, सकाळची जल्लोषाची भावना आता विरळ झाली होती. पुन्हा उदासीनता आली! आता पुन्हा तोच प्रवास करून गावाकडे परतायचं होतं.

समोरच्या झाडाखालील रसवंतीसमोर तो उभा राहिला. एक ऊसाचा रस दिवसभरचा थकवा मिटवू शकतो याची त्याला खात्री होती. शिवाय जेवायचा खर्चही वाचणार होता. त्याने रसाचा ग्लास घेतला अन थोडासा मागे जाऊन थांबला. त्याच झाडाखाली एक म्हातारी कुठलीतरी शिळ्या भाकरीची पुरचुंडी उघडून खात होती. रसाजवळच्या माशा तिच्या अन्नावर बसत होत्या. कडक झालेल्या भाकरीचे तुकडे नसलेल्या दातांमुळे घशाखाली जाणं अवघडच होतं तिच्यासाठी. तिच्याकडे बघताच गोविंदला आश्रमातील मुलांची आठवण झाली. असेच बेवारस, दोन वेळेच्या अन्नाचे मोहताज मुलं कालही तसेच होते आजही तसेच आहेत. फक्त त्यांच्या दुखाचा काही काळासाठी विसर पडावा इतकं मोठं सुख राष्ट्राला मिळालं आहे. दिवसभर काबाडकष्ट केल्यावर एखादा मजूर चाळीस रुपयांची देशी दारू घेऊन नशेच्या अमलाखाली जातो कारण शरीराला होणार्‍या वेदना मेंदूपर्यन्त पोहचू नयेत म्हणून! नशा माणसाला प्रत्येक दुखं विसरायला लावते. धुराळा उडाला, वावटळ आलं की उखडलेल्या रस्त्यांवरचा प्रवासही निमूटपणे करावाच लागतो. एकदा का कुठल्यातरी अव्वल दर्जाच्या नशेचा अमल मेंदूवर चढू लागला की शरीराच्या अन मनाच्या सगळ्या जखमा कितीही आक्रोश करू लागल्या तरी त्यांचा विसर पडतो. मेंदू आपल्याच धुंदीत मग्न असतो. कदाचित अशीच नशा झाली असावी जी इतर सर्व पीडा क्षणात विसरायला लावत असेल. जी आपल्या कर्तव्याचं पालन करायची आठवणही करून देत नसेल, जी योग्य मार्गाचं अनुकरण करायची शिकवण देत नसेल… तीच विजयाची नशा!

रसवाल्याने रिकामा ग्लास हातातून ओढून घेतला तेंव्हा गोविंद तंद्रितून बाहेर आला. वास्तवाची धग नशेच्या गारव्यापेक्षा कैकपटीने अधिक परिणमकारक असते. त्याने रसवाल्याला विचारलं की त्या आजीबाई कोण आहेत. त्याला कळालं की त्या झाडलोटचं काम करून जगतात. साठीच्या वर वय असलेली ती वृद्ध महिला अन्न मिळवण्यासाठी झगडतेय!!! गोविंदच्या मनात कालवाकालव झाली. त्याने एक भरलेला रसाचा ग्लास घेतला आणि त्या आजींजवळ गेला. हसर्‍या चेहर्‍याने आजींच्या हातात तो ग्लास ठेवत म्हणाला, “अहो आजी आज आनंदाचा दिवस आहे देशासाठी. भारताने पाकिस्तानला हरवलं. सगळीकडे जल्लोष होत आहे. मीही आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वांना रस देतोय. हा घ्या रस!”

आजीबाईंच्या चेहर्‍यावर कसलेच भाव नव्हते. त्यांनी ‘काय माहीत’ असे हात उडवले आणि रसाचा ग्लास निमूटपणे घेतला.

पैसे देऊन गोविंद परत निघाला. त्याचे डोळे भरले होते. आधीपासूनच तो अतिसंवेदनशील. कोणास ठाऊक का, पण त्याला महाभारतानंतरचा विदुर डोळ्यासमोर येत होता. त्याचं विचारचक्र पुन्हा सुरू झालं. काय फरक पडतो, राष्ट्र  असेल, राष्ट्र नसेल! शत्रू असेल, शत्रू नसेल! समाजव्यवस्था असेल-नसेल, पण भूक असणारच आहे, गरीबी असणारच आहे. त्या वृद्धेला काय झालं, कधी झालं आणि कशासाठी झालं याच्याशी काहीच देणं-घेणं नव्हतं. ती मरण येईपर्यंत जगणं ढकलत होती. न ती राष्ट्रभक्त, न ती राष्ट्रद्रोही! ती मानवी अवतारात जन्म घेतलेली क्षुल्लक कोणीतरी. देशात, नव्हे जगात असे कितीक लोकं असतील ज्यांना कसल्याच गोष्टींचा काहीच फरक पडत नाही, फरक पडतो तो फक्त दोन वेळच्या पोटाची भूक भागवण्याचा!

समोरून मिरवणूक निघाली होती. तरुणांचे जत्थे जल्लोष करत निघाले होते. परिसरात ‘भारत माता की जय’ चा जयघोष दुमदुमत होता. तिरंगा वार्‍यावरती डौलाने फडकत होता. लोकांचे प्रफुल्लित चेहरे गोविंदला दिसत होते आणि क्षणात त्याला त्या म्हातारीचा अन आश्रमशाळेतील पोरांचा चेहराही दिसला. त्या तिरंग्याला बघून गोविंदने सल्यूट केला अन खोल मनातून एक आर्त किंकाळी बाहेर आली, “भारत माता की जय!!!” आणि डोळे पुसत तो गर्दीतून पुढे सरकला.

सायंकाळी बसमधून परतत असताना इमारतींच्या जंगल मागे पडू लागलं आणि ओसाड पडलेल्या माळरानावर त्याची नजर स्थिरावू लागली. त्याचं मन विषण्णतेने भारल्या गेलं होतं. गावातील बसस्टॉपवर उतरताच समोर तरुण व रिकामटेकड्या वृद्धांचा घोळका त्याला दिसला. गावातही विजयोत्सव साजरा झालेला होता. तिथेही तीच चर्चा सुरू होती. कोणीतरी जवळ येऊन गोविंदला पेढा देण्याचा प्रयत्न केला पण गोविंद ताडकन पुढे निघून गेला. समोरून ऋग्वेद येत होता. गोविंद त्याच्याकडे बघून खिन्नपणे हसला अन म्हणाला, ‘तुला खरच सरकारी अधिकारी व्हायचं आहे?’

ऋग्वेदला काहीच कळलं नाही. तो पहिल्यांदाच अशा गोविंददादाला बघत होता. जेंव्हा प्रचंड मोठा पर्वत सर करून यात्री सर्वोच्च शिखरावर पोहोचतो आणि तिथे काहीच नसल्याचं त्याला कळतं तेंव्हा त्या प्रचंड ऊर्जेच्या, प्रचंड आशेच्या मानवी मनाला अतृप्ततेची अनाहूत चाहूल लागू लागते आणि तिथून सुरू होतं ते नैराश्यपर्व! ऋग्वेदला अशीच कुठलीतरी अपरिचित चाहूल गोविंददादाच्या चेहर्‍यावर दिसली.

गोविंद आश्रमशाळेत पोहोचला. अंधारातच आत गेला. सर्वांना शांतपणे जेवायला दिलं आणि मुलं नेहमीप्रमाणे हसत-बागडत झोपायला गेली. गोविंद खुर्चीवर बसून सगळं शांतपणे बघत होता आणि कसल्यातरी विचारात बुडून गेला होता. आश्रमशाळेच्या तुटलेल्या खिडक्यांतून वारा आत येतच होता, एका घोंगडीत दोन मुले झोपली होती, गाद्या नसल्याने चवाळ्यावर फाटकी बेडशीत टाकून इतरांपेक्षा मोठ्या मुलांनी आपलं कर्तव्य पार पाडलं होतं. खुर्चीवर भरल्या डोळ्यांनी बसलेल्या गोविंदजवळ लहानगा विष्णु आला आणि हळूच म्हणाला, ‘गोविंददादा मुंबईहून काय आणलं माझ्यासाठी?’

आता गोविंद थांबू शकला नाही. डोळ्यातील अश्रु गालावरून घरंगळत शर्टवर पडले. अश्रु पुसत गोविंद म्हणाला, “मी न एक गोष्ट आणलीय, राष्ट्रवादाची!”  

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

राधा – प्रेमकथा

राधा – प्रेमकथा

मराठी प्रेमकथा   ||  मराठी साहित्य  ||  मराठी कथा  || Marathi Story  ||  लघुकथा  ||  Love Story

मी जरी कृष्ण नसलो तरी तू मात्र मला नेहमीच राधा वाटायचीस!!! पण मी कृष्ण असतो तरी काय फरक पडणार होता, कारण कृष्ण-राधा प्रेम तरी कुठे पूर्ण होऊ शकलं. तुझ्या आणि माझ्या प्रेमाचीही तीच तर्‍हा… जगातील अनेक अयशस्वी प्रेमकथांपैकी आपलीही एक… अयशस्वी प्रेमानंतर आयुष्य थोडीच थांबतं..?

प्रत्येकालाच स्वतःची प्रेमकथा वेगळी वाटत असते, पण आकाशातील असंख्य तार्‍यांप्रमाणेच तीही एक असते. तिचं अस्तित्व जरी वेगळं असलं तरी ती गर्दीत हरवलेली असते. माझीही प्रेमकथा तशीच असेल.

कधीतरी भावनांचा कोंडमारा होतो अन मनातील उद्विग्न भाव ओठांवर येतात.

ती आज कशी असेल ? कुठे असेल ? अर्थात, तिने मला आठवायचं काही कारणच नाही म्हणा. किंवा माझ्याच आठवणीत झुरत असेल. माहीत नाही.

                 मी फारतर 16-17 वर्षांचा असेन तेंव्हा. बारावीत होतो. प्रेम वगैरे काय भानगड असते याबद्दल कसलीच माहिती नसलेलं वय. चित्रपटात बघितलेलं ते प्रेम असं वाटायचं. सगळं स्वप्नवत. प्रेमाच्या सगळ्या संकल्पना चित्रपटातून उगम पावायच्या. भ्रामक!

आयुष्य कसं अगदी रेल्वेच्या गतीप्रमाणे संथपणे पुढे जात होतं. पण तिला पाहिलं अन गाडी रुळावरून घसरली… राधा… राधा… राधा… नावातच किती गोडवा तिच्या! सतत राधा नावाचा जप केला तरी प्रेमात आकंठ रंगून गेल्यासारखं होईल.

पावसाळ्याचे दिवस होते ते. काळकुट्ट आभाळ अन धो-धो बरसणारा पाऊस. दिवसाही अंधारून यायचं. कॉलेजच्या पायर्‍यांवरून जात होतो. पायर्‍यांवर अंधार होता. वर जाताना गर्दीत तिचा हलकासा स्पर्श झाला अन सारं अंग मोहरून गेलं. मी वळून पाहीलं, तीही मंदपणे हसून माझ्याकडे बघत होती. मी फक्त तिच्याकडे एकटक बघत होतो. गर्दीने मला वर नेलं, नाहीतर मी तिथेच उभा राहून फक्त तिच्याकडे बघत राहिलो असतो.

कृष्णाच्या राधासारखी… हो अगदी तशीच… किती गोड दिसायची… थोडासा गोल चेहरा, मोठे पाणीदार डोळे, नक्षीदार भुवया, उभट नाक, चपटे ओठ अन हनुवटीवर काळा तीळ. मोकळे सोडलेले पण व्यवस्थित केस पाठीवर रेलायचे अन त्यावर गुलाबी रिबिन…. उफ्फ!!!

काय झालं माहीत नाही, पण ते रूप माझ्या मनावर कायमचं कोरल्या गेलं. तिचं मागे वळून पाहणं अन स्मितहास्य करणं म्हणजे खळखळणार्‍या लाटेला किनार्‍याने साद घालावी तसं होतं. लाघवी हास्य!!! त्यात सार्‍या विश्वाची शांतता लपल्यासारखं वाटायचं. मोहक आणि अगदी निरागस!

ती पहिली भेट आयुष्यभरासाठी एक अमूल्य आठवण देऊन गेली. दुसर्‍या दिवशी तिची सर्व माहिती काढली. तिचं नाव राधा आहे हे कळल्यावर त्या दोन शब्दांत आयुष्याचा सार लपलाय असं वाटू लागलं. ती अकरवीत होती. माझ्यापेक्षा एक वर्ष मागे. फार हुशार नव्हती, पण गाणं खूप सुंदर म्हणायची असं कळलं. तिचा आवाज ऐकायला मी उतावीळ झालो होतो. जमेल तिथे, जमेल तसं तिच्या जवळ जाण्याचे माझे प्रयत्न चालू होते. संधी स्वतः चालून आली.

कॉलेजात स्नेह-संमेलना निमित्त फॉर्म वगैरे वाटप करून नाव नोंदवून घेणं चालू होतं. आमच्या केंद्रे सरांनी ते काम मला दिलं.

ती माझ्याकडे चालत येत होती… माझ्याकडेच बघत होती… तिचे ते पाणीदार डोळे बघून माझ्या अंगाला घाम सुटला… तिच्याशी बोलायचं म्हणजे आता त…त…प…प होणार. ती चालताना अशी हळुवार चालायची जणू एखाद सुंदर पक्षी पावसात धुंद होऊन डोलत असल्याप्रमाणे भास व्हायचा. मीही तिच्याकडे एकटक बघायचा असफल प्रयत्न केला. तिची इतकी भीती मला का वाटत होती हे कोडं मला कधी सुटलंच नाही. अंतराळातून चंद्राचा प्रकाश फक्त आपल्याकडे येतो आहे तसं वाटत होतं.

ती समोर येऊन उभी राहिली अन म्हणाली, हॅलो मला गाण्यासाठी नाव नोंदवायचं आहे.

मी खूप घाबरलेलो होतो. काय बोलावं, कसं बोलावं ते काहीच सुचत नव्हतं. मेंदूची सारासार काम करण्याची प्रक्रियाच बंद झाली होती. मी गडबडीने उत्तर दिलं पण ते तिला तुसडेपणा वाटला असावं असं आज वाटतं.

“हे घ्या, नीट भरून द्या.” मी असं काहीतरी बरळलो.

डोळे तिरपे करून मी तिच्याकडे बघत होतो. तिच्या हनुवटीवरील बारीक तिळाने माझं लक्ष फारच वेधून घेतलं. एखाद्या परिप्रमाणे ती माझ्यासमोर उभी होती. तिच्या गालावरील सौम्य लाली मला खुणावत होती. तिचं डोळे भिरभिर फिरवणं माझ्या काळजाचं पाणी-पाणी करत होती.

“हे इथे काय लिहायचं?” तिने शांतपणे मला विचारलं.

तिचा आवाज कांनांतून थेट हृदयाला भिडल्यासारखा वाटत होता. छाती मोठमोठ्याने ठोके देत होती. मी मूर्खासारखा आ वासून तिच्याकडे बघत होतो. त्या चेहर्‍याशिवाय विश्वात काहीच नाही असं वाटत होतं. त्या दोन डोळ्यांत मी हरवलो… स्तब्ध झालो… माझं शरीर मला मोरपंखाप्रमाणे अलगद वाटू लागलं…

तिने परत प्रश्न करताच मी भानावर आलो अन गडबडीने तिला उत्तर दिलं… तिला सांगत असताना तिच्या हातांकडे लक्ष गेलं अन हातावरील लाल मेहंदी दिसली… गोर्‍या हातांवर लाल मेहंदी किती खुलून दिसत होती. मी काहीतरी उत्तर देऊन वेळ निभावून नेली.

पेन परत घेत असताना तिच्या हातांचा हलकासा स्पर्श माझ्या हातांना झाला. मी तर मोहरून गेलो होतो, पण त्या स्पर्शाने तिला कदाचित आमची पहिली भेट आठवली असेल. पायर्‍यांवर झालेला तो उबदार स्पर्श कदाचित तिला आठवला असेल. त्या स्पर्शानिशी ती माझ्याकडे बघून गालातल्या-गालात हसली. उफ!!!!

तू सुंदरा, तू अप्सरा, वसतेस तू मनमंदिरा

तू लाघवी, तू मोहिनी, राधा जशी वृंदावनी…

मनात घालमेल सुरू झाली. ब्बास!!! अजून काय पाहिजे आयुष्यात? इतकी सोज्वळ मुलगी आपली व्हावी केवळ ही भावनाच विश्व जिंकल्याचा आभास निर्माण करत होती अन त्या आभासात राहण्याची मेंदूला सवयच जडली होती. क्षणोक्षणी तिची आठवण मनाला नेहमी ऊर्जित ठेवत असे.

आयुष्य काय असतं हे कळायच्या आधीच आयुष्याचे निर्णय घेण्याची घाई झाली होती. अल्लड मन वार्‍यावरती वाहत जाऊन तिच्यापर्यंत पोचत होतं. आता काहीही करून तिला आपलं बनवायचे विचार मनात घोळत असायचे. येता-जाता तिला बघून हसणं, तिच्या घरापर्यंत पाठलाग करणं, तिच्यासमोर आपली चांगली प्रतिमा उभी करणं असे उद्योग चालू होते. तिलाही ते कळत असावं, कारण तीही कधीतरी स्मितहास्य करून प्रतिसाद देत असे.

                 कॉलेजच्या स्नेहसंमेलनात तिने गाणं म्हंटलं होतं. तिच्या त्या मधुर आवाजाचे प्रतिध्वनी अन ते प्रेमगीताचे बोल मनाच्या गाभार्यात अक्षरशः थैमान घालत होते. खुल्या मैदानात घोडा धावत सुटावा तसं माझं मन तिला आपलं बनवण्यासाठी उत्साहित होत होतं. राधेचं माझ्याप्रती काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी मी उतावीळ झालो होतो. माझ्या आयुष्यात मी तिला सर्वोच्च स्थानावर बसवलं असताना तिच्या मनात माझ्यासाठी तीच प्रेमाची भावना आहे का हे जाणून घेणं मला अत्यंत महत्वाचं वाटत होतं. मी तिला पत्र लिहिलं.

Image result for love

प्रिय राधे,

                 सर्वप्रथम, तूला माझी ओळख व्हावी म्हणून सांगतो, मी बारावी अ तुकडीतील ध्रुव. तू मला कितपत ओळखतेस हे मला माहीत नाही, पण प्रथम आपली भेट त्या पायर्‍यांवर झाली होती. त्यादिवशी तुझ्याशी झालेली चकमक पुढचे अनेक दिवस माझ्या आयुष्यात थैमान घालत होती. तुझ्या निरागस डोळ्यांत अन प्रेमळ चेहर्‍यात मी स्वतःचं अस्तित्व हरवून बसलो होतो. तो अपघात ईश्वराने जाणीवपूर्वक जुळवला असेल असं मला वाटतं. कारण त्यानंतर प्रत्येक क्षण मी माझं आयुष्य तुझ्याशी जोडून बघत आलो आहे. आकाशातून सुंदर चांदणं तुटावं अन अलगदपणे जमिनीच्या कुशीत विसावा घ्यावं तसं तू माझ्या आयुष्यात आलीस.

आभासात का होईना, मी तुझ्याशी माझं जीवन बांधून टाकलं आहे. दिवसातला प्रत्येकक्षण तू दिसत रहावीस म्हणून सतत तुझ्या मागे-पुढे राहण्याचा वेडा हट्ट माझ्या मनाने केला. त्या दिवशी तू जे गाणं म्हंटलंस त्यानंतर मन थार्‍यावर नाही. सतत तुझा आवाज मनात उमटत असतो अन तुझ्या सोबतीची आशा करत असतो. आता धीर धरवत नाही. मी तुला केंव्हाच आपलं मानलं आहे. पण तू… तू माझ्याबद्दल काय विचार करतेस हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुला माझ्याप्रती कोणती भावना आहे हेच आपलं भविष्य ठरवणार आहे. मला माहीत नाही प्रेम काय असतं, कधी त्या मार्गावर गेलोच नाही; पण जे तुझ्याशी झालं आहे त्याहून वेगळं काही प्रेम असतं असं मला वाटत नाही.  आयुष्यात पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं ज्याच्यामुळे जगणं हे खूप उत्साही वाटत आहे. जगातील प्रत्येक चांगली गोष्ट मी जिंकू शकतो असं वाटतंय हल्ली. हे सगळं तू माझ्या मनात घर करून राहिलीस तेंव्हापासून होतंय… हेच प्रेम असतं ना?

तुला माझ्याप्रती काय वाटतं ते अगदी मोकळेपणाने सांग…. किमान तुझ्या मैत्रीची अपेक्षातरी मी नक्कीच ठेऊ शकतो. तुझ्यात गुंतलेला जीव सुटणार नसला तरी तुझ्या नकारानंतर तुझं स्वातंत्र्य स्वीकारायचं हे माझ्या वेड्या मनाला ठाऊक आहे. तुझ्या केवळ नावाचा उच्चार हा माझ्या अंगावर रोमांच उभे करतो… तू माझ्यासाठी कोण आहेस याहून काय वेगळं सांगू… पण या पत्राला माझी गुस्ताखी समजू नकोस… तुझे हजारो चाहते असतील, मी फक्त ते भाव व्यक्त करणारा पहिला असेन… माझ्यावर विश्वास नसेल अन हा माझा उद्धटपणा वाटत असेल तर हे पत्र फेकून दे… पण माझ्यावर जराही विश्वास वाटत असेल तर मित्र म्हणून तरी तू माझा विचार करू शकतेस….

तुझाच

ध्रुव

हे पत्र तिच्या हातात देण्यापूर्वी चिंता वं भीती माझे सोबती झाले होते. पण जेंव्हा धाडस करून तिला हे पत्र सोपवलं तेंव्हा मन शांत झालं. उंच पर्वतावरून उडी मारावी तसं. आता माझ्या हातात काहीच नव्हतं.

मी तिला पत्र देत असताना ती अतिशय शुष्क भाव चेहर्‍यावर आणून माझ्याकडे बघत होती. मला क्षणभर तिच्या त्या नजरेची भीती वाटली. समोरून येणारा प्रेमाचा प्रस्ताव कुठल्याही मुलीला “आपण मोठे झालो” अशी जाणीव करून देत असावा.

माझी अस्वस्थता वाढली होती. पत्र वाचल्यानंतर तिची प्रतिक्रिया काय असेल हे जाणून घेण्यासाठी मी अत्यंत उतावीळ झालो होतो. तिचा होकार किंवा नकार माझ्या आयुष्याची पुढचं वळण ठरवणारा होता. क्षणोक्षण तिची आकृती डोळ्यांसमोर उभी राहायची. ती हसून मला मिठी मारत आहे असं गुलाबी स्वप्न जागेपणी पडायचं तर कधी, ती भेदक नजरेने माझ्याकडे बघत माझ्या भावना पायदळी तुडवतीय असं भयानक स्वप्नही पडायचं.

दोन-तीन दिवसांनी उत्तर आलं. तिने मला कॉलेजच्या फंक्शन हॉलमध्ये बोलावलं. त्या हॉलमध्ये आम्ही दोघे म्हणजे विश्वाच्या पोकळीत फक्त दोन ध्रुवतारे असल्याप्रमाणे वाटत होतं. फक्त एकमेकांसाठी…

मला बघताच ती गोड हसली. मला माझं उत्तर मिळालं होतं. तिचे होकाराचे शब्द ऐकण्यासाठी माझे पंचप्राण आतुर झाले होते.

ध्रुव तूही मला आवडतोस… तुझ्या स्पर्शाने माझ्याही मनात प्रेमांकुर फुलू लागला होता. गेले कित्येक दिवस तुझं माझ्या आजूबाजूला असणं मला एका वेगळ्याच धुंदीत न्यायचं… एक नशा चढायची… रोज आरशात बघताना तुला मी कशी वाटते याचा विचार पहिला मनात यायचा… मी मलाच तुझ्यासोबत बघायचे… जितकं प्रेम तुझ्या मनात माझ्यासाठी आहे तितकंच प्रेम माझही आहे… प्रेमाला कसलीच बंधने नसतात.. आपल्या दोघांत कधीच दुरावा येणार नाही…

                 ते क्षण माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षण होते. कोठे जपून ठेऊ त्या क्षणांना असं वाटत होतं. मी अक्षरशः स्वर्गप्राप्तीच्या आनंदात होतो. राधा माझी होणार ही कल्पनाच मला वेड लावत होती. ती बोलत असताना अंगावर शहारा येत होता पण तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता… बस, ती माझी आहे ही भावनाच मला व्यक्त करण्यासाठी पुरेशी होती… राधा…

त्या दिवशी उत्साहाच्या भरात मी घरी निघालो होतो. जितक्या वेगाने माझं मन धावत होतं तितक्याच वेगाने माझी सायकलही धावत होती. सगळ्या जगाकडे मी वेगळ्याच नजरेने बघत होतो. आता कसलीच उणीव भासणार नाही असं वाटत होतं.

                          काय झालं ते कळलच नाही. जाग आली तेंव्हा सगळं धुरकट पांढरं दिसत होतं. मेंदू अचानक जागृत झाला. मी स्वर्गात होतो!!! माझा मृत्यू झाला होता. सायकल एका ट्रकखाली येऊन मी जागेवरच मृत पावलो होतो. त्या ट्रकच्या चाकांखाली चिरडल्या गेलेल्या माझ्या शरीरापेक्षा माझ्या भावनांचा, माझ्या प्रेमचा जो चुराडा झालाय ते जास्त भयावह होतं. क्षणात सर्वस्व मिळावं अन क्षणात सगळं नाहीसं व्हावं अशी गत… ईश्वर इतका का निर्दयी असतो…?

माझा आत्मा तळमळत होता. राधाची आठवण इतक्या अंतरावर असूनही जराही कमी झाली नव्हती. तिचा तो निरागस चेहरा, तो मधुर आवाज अन तिचे प्रेमाचे शब्द मला खूप छळत होते. माझ्या तिच्या शेवटच्या भेटीत, तिच्या डोळ्यात आयुष्याची सुरेख स्वप्ने दिसत होती.

मी ईश्वराला खडसावून विचारलं, रागावलो अन उद्विग्नपणे आरोप केले, पण त्याने मला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं समर्पक उत्तर दिलं. त्यात राधेचं काहीच चूक नव्हतं.

आता मलाच जळत राहायचं होतं… माझा आत्मा नवीन शरीरात जाणार होता… तिथे दुसर्‍या अस्मिता, दुसरी ओळख, दुसरे भाव घेऊन जगणार होतो मी. पण मधूनच कधीतरी स्वप्नात राधेची पुसटशी आकृती मला गतजन्मीची झलक दाखवणार होती. भलेही मला काही समजलं नाही तरीही राधा माझ्या आत्म्याच्या एका बंद कुप्पीत असणारच होती. फक्त त्या जाणिवा मला येणार नव्हत्या.

इकडे राधा माझ्याविणा काय करत असेल दे दृश्य मला कल्पनाच करवत नाही. तिने ज्या मुलाला आपलं सर्वस्व मानलं अन तो क्षणार्धात निघून गेला हे वास्तव तिचं मन कसं स्वीकारू शकेल? तिच्या हृदयाला घाव बसल्याशिवाय राहणार नव्हता. तिचं काय चालू आहे हे बघायची अनुमती देवाने दिली नाही. त्या जन्मात आमचं एकत्र असणं नियतीने लिहिलं नव्हतं. पण देवाने एक वचन दिलं की पुढच्या कुठल्यातरी जन्मी राधा व मी एकत्र असू… केवळ हे शब्दच मला अनेक जन्म-मृत्युच्या फेर्‍यांतून जाण्यासाठी प्रेरित करत होते… मी वाट्टेल ते दुखं भोगायला क्षणार्धात तयार झालो… अनेक योन्यांतून जन्म घेऊन अन अनेक चीतेच्या भक्षस्थानी पडून मला माझ्या राधेला भेटायचं होतं… देवाकडून त्या स्मृती मी बंद कुप्पीत का असेना साठवून घेतल्या… भविष्यात कधीतरी राधा माझीच होणार होती… आज नसली तरी… मी हजारो वर्षे वाट बघायला तयार होतो… बघणार होतो… राधा माझी होण्यासाठी…

===समाप्त===

सर्व हक्क सुरक्षित @ अभिषेक बुचके  &  latenightedition.in  &  @Late_Night1991

मी ब्रम्हचारी

error: Content is protected !!