Tag: वाचन

मराठी कथा – e – book [Updated]

मराठी कथा – e – book [Updated]

मराठी कथा  ||  मराठी साहित्य  ||  कथासंग्रह  ||  मराठी ई-पुस्तक  ||  माझं लिखाण  || 

Marathi Stories  ||  Short Stories || Story Collection  ||  Marathi e-Book  

गेल्या वर्षी “मराठी कथा” नावाने e-book सुरू करायचा निर्णय घेतला त्यावेळेस फार उत्साह वाटत नव्हता. playstore वर अनेक दर्जेदार लिखानांची e-book असताना त्या गर्दीत आपलं हे पुस्तक कुठेतरी अडगळीतच राहील असं वाटत होतं. माझं जे काही तोडकं-मोडकं लिखाण आहे ते मी “मराठी कथा” या app मध्ये संग्रहीत करायचं असा निर्णय घेतला होता. वाचणारे कोणी असतील-नसतील पण आपली आवड म्हणून आपल्या कथा-लिखाण मी तेथे upload करत गेलो. सुरूवातीला फार प्रतिसाद नव्हता, कारण सुरूवातीला कथाही फार नव्हत्या, विविध शैलीच्या नव्हत्या त्यामुळे वाचक तेथे येत नसावा. पण हळूहळू कथांचा संग्रह वाढत गेला, विविध प्रकारच्या कथा मी जोडत गेलो अन वाचकांना त्या आवडू लागल्या. खासकरून “खिडकी” आणि “नरक्षी” आणि “एक अजनबी हसिना से..”  ह्या कथांना चांगला प्रतिसाद मिळाला. विविध ढंगाच्या कथा असणं किती महत्वाचं असतं याची जाणीव झाली.

     

कसल्याही प्रकारचं लिखाण असेल किंवा कसलीही कला-छंद असेल, तो स्वतःच्या आनंदासाठी आणि समाधानासाठी जोपासला जातो, पण त्याला जर वाहवा मिळाली तर त्या कलेप्रती उत्साह वाढतो. वाचकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया ह्या स्फूर्ती देणार्‍या ठरल्या. अनेकांनी सुधारणा सुचवल्या व त्रुटी दाखवल्या त्यांचा मंनापासून आभारी आहे, कारण त्यातून चुका होण्याचं प्रमाण कमी होत गेलं.

आज “मराठी कथा” मध्ये विविध प्रकारच्या तीसेक कथा आहेत. त्या नुकत्याच update केल्या आहेत. वेळ भेटेल तसं यात अजून भर टाकायची इच्छा आहेच. आज दीड हजार मोबाइल्स वर हे app install आहे, एकूण दहा हजार इंस्टॉल झालेले आहेत… हा आनंद खूप मोलाचा आहे… प्रत्येकाचे आभार…!

 

आजच आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करा… 

https://play.google.com/store/apps/details?id=com.latenight.somethingsamajik.MarathiKatha&hl=en

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991

मराठी कथा – अभिषेक बुचके

लेखक-वाचक

लेखक-वाचक

#लेखनशैली अन वाचनशैली   #वाचक म्हणून बघताना   #लेखन म्हणून ओळख करून घेताना  #मराठी साहित्य

प्रत्येक लेखकाची स्वतःची अशी लेखनशैली असते त्याचप्रमाणे वाचकाचीही एक वैशिष्टपूर्ण वाचनशैली असते. त्याला छंद किंवा नाद म्हणता येईल. मला एखादा लेखक अन त्याचं साहित्य आवडलं की मग मी त्याच्याच मागे लागतो. त्याचे भेटतील तेवढे पुस्तक वाचायचे असा अट्टहास असतो आणि मग आजवर वाचलेल्या त्याच्या पुस्तकांशी तुलना सुरू होते. सुरूवातीला मला इतिहासाचा नाद लागला होता. तो दोन-तीन वर्षे डोक्यावरुन उतरला नाही. सुरूवातीला बाबासाहेब पुरंदरे यांचं #राजा शिवछत्रपती वाचलं आणि हा सिलसिला सुरू झाला. मग इतिहासाची भेटतील तेवढी पुस्तके वाचायला लागलो. अगदी शिवाजी महाराजांवर आधारित चाळीस पानांची पुस्तकेही सोडली नाहीत. शिवाजी महाराजांवर आधारित बरीच पुस्तके वाचली. जणू काही नवीन काही शोध लावणार होतो. मग संभाजी महाराज. मग पेशवाई. मग पानिपत. असे क्रमाक्रमाने सगळे येत गेले. दोन-तीन वर्षे त्यालाच मी वाचन म्हणत होतो. त्याव्यतिरिक्त दुसर्‍या विषयांची पुस्तके वाचलेली आठवत नाहीत. इतिहासातील सगळे संदर्भ, लिंक्स जुळल्यावर आणि आपल्याकडून काही शोध लागत नाही हे कळल्यावर हळूहळू इतिहासातून बाहेर आलो. नंतर मग काही महीने साधे-सुधे, भेटतील ते पुस्तके वाचत होतो. त्यात मोठ्या लेखकाचं कुठलही पुस्तक नव्हतं. असंही माझं शिक्षण ‘मराठी साहित्य’ याच्याशी अजिबात निगडीत नसल्याने दिग्गज लेखक, कवी, साहित्याचा इतिहास वगैरे यांचा काही अभ्यास नव्हता. डोळ्यासमोर येईल ते वाचत होतो.

बर्‍याच दिवसांनी #भालचंद्र नेमाडे यांची #कोसला वाचली. अप्रतिम होती हे मी सांगायला नको. तीच मग दोन-तीनदा वाचून काढली. काही महीने त्यातच गेले. भारी लेखक म्हणून नेमाडेंना मानू लागलो; पण #नेमाडपंथी झालो नाही. त्याच दरम्यान त्यांची #हिंदू चर्चेत आली. ती वाचायची प्रचंड इच्छा होती आणि ती अजूनही इच्छाच आहे. तिला काही अजून हात लागला नाही. दरम्यानच्या काळात #चांगदेव चतुष्त्कोन वगैरे मधील झूल अन बिढार वाचली. त्याही उत्तमच!

परत बाज बदलला. टीव्हीवर महाभारत आणि त्याच्याशी संबंधित कार्यक्रम सहज म्हणून बघत होतो आणि मग एक-एक गोष्टी नव्याने उलगडत होत्या. आता उत्सुकता जागी झाली होती. आता माझ्यातला वाचक का कोण असतो तो महाभारत ह्या विषयात पारंगत होऊ पाहत होता. चेष्टेचा विषय! मग संपूर्ण महाभारत वाचण्याऐवेजी त्यातील प्रत्येक पात्र स्वतंत्रपणे जाणून घेतलं. भीष्म, द्रोण, पांडव, कौरव, कृष्ण, आणि अशा अनेक गोष्टी वाचल्या. इंटरनेट वर महाभारत संबंधित माहिती अन ज्ञांनाचा भंडार आहे हे कळल्यावर तिथे डोळे खुपसले. बरच वाचलं. त्यातून एक फायदा असा झाला की एक अप्रतिम आणि आजवर कधीही न झालेली एक नवीन #कथा #चित्रपटकथा सुचली. महाभारताने वर्ष-दीडवर्ष घेतलं. पण तो आध्यात्मिक अनुभव असण्यापेक्षा मानवी पातळीवरचा एक व्यावहारिक शिकवण अन जाग देणारा अनुभव होता. अजूनही त्यावर काम चालू आहे.

आता महाभारत झाल्यावर काय? उत्तर शोधलं नाही. पुस्तक समोर आले अन ते सापडलं. #नारायण धारप. धारप यांच्या कथा, कादंबर्‍याने वेड लावलं. तेही रात्री झोपताना अशा #गोष्टी वाचायची नशा झाली. धारप यांची एक-एक पुस्तके हाती घेतली अन वाचत गेलो. गूढ काय असतं याची जाणीव झाली. नुकसान एक झालं की, रात्री बेकार स्वप्नं पडू लागली. पण वाचन सोडलं नाही. त्यांची 70% पुस्तके वाचली. काही अप्रतिम होती तर काही रटाळ. पण एकंदरीत अनुभव अंधारातील काजव्याप्रमाणे होता.

धारप झाले. आता कोणाला धरायचं? हा प्रश्न होता. मध्यंतरी वाचन थोडं बंद केलं होतं. मेंदू बधिर पडला होता. नव्याने सुरुवात केली ती साधारण कुठलीतरी पुस्तके हातात घेऊन. डोक्याला ताप देणार नाहीत अशीच होती. विनोदी वगैरे वाचायचं म्हंटलं पण उगाच @कॉम्प्लेक्स येईल म्हणून त्या नादी लागलो नाही. इकडची-तिकडची पुस्तके वाचली. भारतीय स्वातंत्र्यलढा याला हात घालावं म्हंटलं पण हिम्मत झाली नाही. तो इतिहास वाचून राजकीय प्रवक्ते बनतात असं ऐकण्यात आलं. त्या प्रवक्त्यांची हाल फार ठीक नसते हे टीव्हीत बघत होतो. नारायण धारप यांचे भूत स्वप्नात आलेले परवडले पण उगाच गांधी, नथुराम, बोसXगांधी, आंबडेकरXनेहरू, नेहरूxपटेल, टिळकxआगरकर वगैरे स्वप्नात येऊन थैमान घालू लागले तर कठीण होईल म्हणून मी तो नाद सोडला.

आता कुठल्या विषयाला हात घालावा असा विचार करत होतो. कोण आपल्याला झपाटेल असा प्रश्न होता. मग सहज म्हणून काही चांगली पुस्तकेही हातात पडली. मराठीत तसे दर्जेदार आणि कसलेल्या साहित्याची वानवा नव्हती. लेखक तर एकास एक तोडीचे होते. मग सहजच व्यंकटेश माडगूळकरांचं ‘वावटळ’ हाती पडलं. वाचून थक्क वगैरे झालो. पुन्हा वाचलं. मग माडगुळकर माझ्या रडार वर आले…! मग माडगूळकरांची पुस्तके मिळतील तशी घेऊन वाचू लागलो. त्यातल्या कथा तर केवळ अप्रतिम! एकाहून एक भारी. बर कथांचे विषयही फार काही वैशिष्टपूर्ण असतात असं नाही. सामान्यपणे घडणार्‍या घटना ते सांगतात आणि आपण वाचण्यात गर्क होऊन जातो. आयुष्यात येणारे अनुभव अन घटना या केवळ सांगून चालत नाहीत तर त्या पावसाच्या थेंबाप्रमाणे नैसर्गिकरित्या बाहेर पडल्या पाहिजेत. तो नैसर्गिकपणा माडगुळकर यांच्या लेखनातून जाणवत असतो. मी शहरी भागातला असल्याने त्यांच्या ग्रामीण भागातील कथेशी समरस होणार नाही अशा चौकटी तिथे उभ्या राहत नाहीत. कथेतील अनेक शब्दांची पुसटशी ओळखही नसताना त्यात आपण गुंफले जातो यात लेखकाची शैली असते.

मी मराठी साहित्यात अजून पाच टक्के भागही बघितलेला नाही असा माझा समज आहे. माझ्या वाचनात जे आलं ते दर्जेदार आहे यात शंका नाही. मी वाचलेले लेखकही स्वयंभू व्यक्तिमत्वाचे आहेत. अजून बर्‍याच लेखक मंडळींशी गाठभेट होणे बाकी आहे. तूर्तास गाडी माडगुळकर यांच्या मुक्कामी आहे, पुढच्या अनंत रस्त्यावर अजून बरीचशी मुक्काम येणार आहेत… कुठे विश्रांतीही असेल… अंत असेल, पण मला… ह्या प्रवासाला… पण हा मार्ग अमाप आहे…

error: Content is protected !!