आपल्याला जर आपल्या रचना, संकल्पना, मत येथे मांडायचं असेल किंवा कुठलीही जाहिरात ह्या संकेतस्थळावर करायची असेल तर latenightedition.in@gmail.com यावर संपर्क करावा!

Tag: सामाजिक

आधुनिक अस्पृश्यता

आधुनिक अस्पृश्यता

आधुनिक अस्पृश्यता   ||  Un-touchability  ||   सामाजिक  ||  जातीव्यवस्था  ||  Something सामाजिक 

आपला समाज जरा वेगळ्या दृष्टीकोणातून…

दुपारचा एक वगैरे वाजला होता. माझी जेवणाची वेळ झाली होती. पायात चपला सरकावुन मी मेसच्या दिशेने निघालो.रूमच्या जवळच असलेल्या मेसमध्ये पोचलो. मेस तशी लहान जागेतच, घरगुती वगैरे. आमच्या मेसमध्ये बसण्यासाठी मुख्य दोन टेबल आहेत, तिसरा टेबल गर्दी असेल तरच ‘अरेंज’ केला जातो.

मी मेसवर पोचलो तेंव्हा दोन तरुण (कदाचित मित्र, कलीग वगैरे असावेत) एका टेबलवर जेवत बसले होते. दोघेही अगदी भारी कपडे इन करून वगैरे होते; कुठेतरी चांगल्या कंपनीत काम करत असणार… त्या दोघांना कशाला अडचण म्हणून मी दुसर्‍या, रिकाम्या असलेल्या टेबलवर जाऊन बसलो.

मेसवाल्या काकांनी मी काहीही न सांगता रोजप्रमाणे माझ्यासाठी थाळी लावायला सुरुवात केली होती. त्या मेसच्या खोलीत मस्त सुवास पसरला होता. त्या दोन तरुणांपैकी कोणीतरी किंवा कदाचित दोघांनीही (मी विचारलो नाही आणि जवळ जाऊन वासही घेऊन बघितला नाही!) भारीचा डेओड्रन्ट वगैरे मारला असावा. त्या दोघांना मी मेसवर प्रथमच पाहत होतो.

दोघांचं जेवण करत करत गप्पा मारणं चालू होतं. मला काही देणं-घेणं नव्हतं. काकांनी माझी थाळी आणली आणि समोर चालू असलेल्या टीव्हीत बघत-बघत माझं निवांतपणे जेवण सुरू झालं.

पाच मिनिटे झाली नसतील तोच एक तरुण मुलगी मेसवर आली. ही पुण्यातील घटना आहे. पलीकडच्या टेबलवर दोघे तरुण होते आणि इकडे मी… ती मुलगी काहीतरी विचार करून माझ्या टेबलवर, माझ्या विरुद्ध दिशेला येऊन बसली आणि तिनेही थाळी वगैरे मागवली. तिलाही त्या दोन तरुणांना ‘डिस्टर्ब’ करावं वाटलं नसावं. कारण माझ्यासमोर येऊन बसायला मी खूप देखणा-रुबाबदार वगैरे नव्हतो. समोरची खुर्ची रिकामी होती एवढाच काय तो योगायोग. आणखी एक सांगायचं म्हणजे, मी काही डेओड्रन्ट मारला नव्हता, उलट तो वास तिकडून, त्या दोन स्मार्ट तरूणांकडून येत होता. यावरून एक गोष्ट पक्की की, टीव्हीवर डेओड्रन्टच्या ज्या जाहिराती दाखवतात त्यात अजिबात तथ्य नाही, की असा वास मारल्यावर मुली तुमच्याकडे खेचल्या जातात. त्या निव्वळ मादकपणा निर्माण करतात. ह्या जाहिराती आधुनिक काळातील अंधश्रद्धा आहेत… अंनिस ने याची दखल घ्यावी. केवळ धर्मातील सुधारणा करण्यानेच समाज सुधारतो असं नाही. असो…

सगळं व्यवस्थित चालू होतं. आता मेसवर एक तरुण आला. त्याने एक क्षण विचार केला आणि तो त्या दोन तरुणांच्या टेबलवर रिकाम्या असलेल्या खुर्चीवर जाऊन बसला. त्याचा निर्णय साहजिक होता. इकडच्या टेबलवर ती मुलगी होती. तिच्या बाजूला किंवा एकदम समोर येऊन बसणं बरोबर वाटलं नसेल म्हणून तो तिकडच्या रिकाम्या खुर्चीवर जाऊन बसला. त्यानेही थाळी वगैरे मागवली.

दोन मिनिट जातात तोच मेसमध्ये एकच आवाज घुमला!! महाराष्ट्राच्या पुरोगामित्व का काय म्हणतात त्याला, आधुनिक समाजाच्या विचारधारेला, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या तत्वांना तडा घालू पाहणारा तो आवाज होता,

“अये, उठ… केसं पडायलेत सगळे… दुसरीकडे जाऊन बस… चल…”

तिथे बसलेल्या त्या दोनपैकी एका तरुणाने त्या नुकत्याच आलेल्या तरुणाला हे बोल सुनावले होते…

गोष्ट अशी होती की, तो जो नुकताच आलेला तरुण होता, तो होता न्हावी, अर्थात कटिंग करणारा! मी रूमवरुण इकडे-तिकडे जाताना त्याला त्याच्या कटिंगच्या दुकानात पाहिलेलं होतं. त्या अपमानास्पद गर्जनेसह तो जागेवरून उठला होता. झालं असं होतं की त्याच्या शर्टवरचे वगैरे कटिंगचे केस (इतरांचे) तिथे टेबलवर पडले आहेत असं त्या ओरडणार्‍या तरुणाचं म्हणणं होतं. तो न्हावी तरुण बिचारा लागलीच टेबलजवळून लांब सरकला होता. आपल्या गलिच्छपणाचा लोकांना, त्यातल्या त्यात अशा सुशिक्षित, स्मार्ट लोकांना त्रास होत आहे हे जाणून तोच लांब सरकला होता. त्याचे डोळे लाल झाले होते, चेहरा एकदम पडला होता. तो तसाच उभा होता, मेसवाल्या काकांकडे बघत… त्या गर्जनेसह काकाही तो सगळा प्रकार पाहतच होते म्हणा… काका कोणालाच काही बोलू शकत नव्हते… दोघेही त्यांचे गिराईक अन त्यातल्या त्यात परमब्रम्ह अन्न ग्रहण करण्यासाठी आले होते…

आज नेमक्या तिसर्‍या टेबलवर त्यांचं काहीतरी सामान ठेवलं होतं… काका माझ्या जवळ आले अन हळूच म्हणाले, “हा बसला तर चालेल न?” एकदा नजर माझ्याकडे अन दुसर्‍यांदा समोरील मुलीकडे… दोघांनीही काही हरकत नसल्याचं सांगितलं… मीही आंघोळ न करताच आलो आहे हे काही मी त्यांना सांगितलं नाही… काकांनी त्या तरुणाला बोलावलं, माझ्याजवळची खुर्ची माझ्यापासून थोडी लांब नेऊन टेबलच्या दुसर्‍या टोकाला ठेवली अन तेथे त्याला बसायला सांगितलं… तो तरुण तसेच लालबुंद डोळे अन थरथरणारं शरीर घेऊन तेथे येऊन बसला…

त्याचवेळी टीव्हीवर बातमी चालू होती, तीही पुण्यातीलचं… मॅकडॉनल्ड का डोमिनोज मध्ये एका लहान, गरीब मुलाला येऊ दिलं नाही आणि त्या हाय-फाय शॉपमधून बाहेर हाकललं…

दोन्हीही घटनांत साम्य होतं…

Image result for प्रश्न

त्या न्हावी तरुणाच्या मनात काय वादळ निर्माण झालं असेल? स्वतःच्या गलिच्छपणावर त्याला राग येत असेल की स्वतःच्या व्यवसायाची, स्टेटस ची लाज वाटत असेल ? पण त्याने त्या दोन तरूणांकडून ते ऐकून का घेतलं असावं असा प्रश्न मला पडला. का त्यानेच मनाशी ठरवलं होतं की मी त्या दोन तरुणांपेक्षा कुठेतरी कमी, अस्वच्छ अन लो स्टेटस चा आहे ?त्याने हे सगळं सहन करण्याची गरजच नव्हती. अर्थात, प्रतिक्रिया द्यावी की देऊ नये तो स्वभावाचा गुणधर्म झाला म्हणा. पण मी जेवत असताना त्याच्या कपडे-शरीरावरील केस किंवा घाण माझ्या ताटासमोर पडत असेल तर मलाही ते किळसवाणा प्रकार अप्रियच वाटेल. कारण आरोग्य अन स्वच्छतेच्या निकषावर तो चुकीचाच असणार आहे. फक्त मी तशी अपमानास्पद प्रतिक्रिया दिली नसती. किंबहुना, माझ्याकडे असलेला पैसा, पद, प्रतिष्ठा इत्यादिमुळे मला माज असता तर मी तसं केलं नसतं तरच मी माणूस असं म्हणता येईल…

जेवता जेवता विचारचक्र सुरू झालं… अगदी कुठलेही संदर्भ आठवू लागले…

पूर्वीच्या काळी अशा घटनांना जातीयतेचे संदर्भ होते… आता ते वर्गाचे, अर्थात गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण, स्वच्छ-अस्वच्छ वगैरे वगैरे असे झाले आहेत… मेसमध्ये घडलेल्या प्रकारात कोणाचीच जात कोणाला माहीत नव्हती… मग्रुरीने बोलणार्‍या त्या तरुणाची जात माहिती नव्हती, न्हावी तरुण कोणत्या जातीचा आहे हेही माहीत नव्हतं आणि त्याने काही फरकही पडत नव्हता. ते दोघे एकाच जातीचे असते तरी हा प्रकार घडलाच असता… ही अस्पृश्यता जातीतून नव्हे तर पद-पैसा-प्रतिष्ठा-वर्ग अन राहणीमानातील भिन्नता यातून जन्मली असावी. इथे अस्पृश्यता पाळणारा ब्राम्हण आणि अस्पृश्य हा दलित वगैरे होता असं समजण्याचं कारण नाही…

विचार करायचं म्हंटलं तर मीही स्वतःहून कधी अशा अस्वच्छ व्यक्तीच्या बाजूला बसेन अशी शक्यताच नव्हती. टपरीवर चहा पिताना बाजूला कुठला सफाई कामगार, मजूर येऊन बसला तरी आपल्याला कसतरी होतं. आपण त्याला उठायला लावत नाही हा संस्कृती, सभ्यता म्हंटली पाहिजे. आणि तीच महत्वाची.

हे तर केवळ एक उदाहरण आहे… आपण किती स्वच्छ आहोत, किती सुवासित आहोत, किती सुंदर वगैरे-वगैरे आहोत आणि आपल्यासमोर हा शरीराने गलिच्छ, अस्वच्छ, दुर्गंधीत येऊन बसतो… याने आपल्याला किळस येत आहे, त्यात मी वर्चस्ववादी असल्याने त्याला येथून हाकलणे हा आपला अधिकार आहे असं त्या तरुणाला वाटत असावं… तो स्वतः असं कोणाच्या जवळ जाऊन, त्याला तेथून उठवून स्वतः तेथे बसेल असंही घडलं नसतं….

पूर्वीच्या काळीही कदाचित असच घडत असावं का? एक वर्ग सकाळी-सकाळी लवकर उठून मस्त आंघोळ करून, देवाची-ज्ञानाची उपासना करत असेल,त्यातल्या त्यात त्याला समाजात किम्मत असेल, आर्थिकदृष्ट्या तो मजबूत असेल आणि त्याच्यासमोर जर कोण शारीरिक कष्ट करणारा, ज्याच्या अंगाला शारीरिक कष्टाने उगम पावलेला घाम, त्याचा येणारा दुर्गंध जर कोणी आला तर पहिला वर्ग दुसर्‍या वर्गाशी असाच वागत असेल… त्या दोन भिन्न राहणी, दिनचर्या आणि संस्कार असलेल्या वर्गात भेद निर्माण झाले असावेत आणि नंतर मग त्याला जातीचे पदर असतील…?जातीय परंपरा अन मग अनुचित रूढी येथूनच उगम पावल्या असाव्यात का?

असो!! पूर्वीच्या काळी मी नव्हतो.

माझ्या डोळ्यासमोर घडलेली घटना फारच वाईट होती. त्या तरुणाच्या मनाला खोलवर घाव देणारी घटना होती. त्याच्या मनात काय वादळ उठलं असेल हे त्यालाच माहीत. कदाचित त्याने स्वतःला अपराधीही ठरवलं असेल. ते दोन तरुण जे सुशिक्षित, स्मार्ट वगैरे होते ते त्यांच्या जागेवर ठीक अशासाठी होते की, अशी अस्वच्छता (limit of hygienicness) समाजातील उच्चाभ्रू लोकांना आवडत नाही. ते कुठल्याही जातीचे असोत, ते स्वतःला इतर सर्वांपेक्षा भारी समजतात. पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणारे,AC ऑफिसमध्ये बसणारे, भारी गाड्यांत फिरणारे, महागडे सूट-बूट घालणारे स्वतःला फुटपाथवर चालणार्‍या-राहणार्‍या लोकांच्या बरोबरीने राहू शकतील का किंवा त्यांच्या गळ्यात गळे घालून वावरू शकतील का ? हा मोठा प्रश्न आहे.

हे सगळं बरोबर का चूक हे मी सांगत नाही, ती माझी पात्रताही नाही. प्रश्न असा आहे की शाहू-फुले-आंबेडकर होऊन गेले, त्यांनी समाजाला योग्य दिशा दिली तरी ही साली अस्पृश्यता तशीच का? ती आजही तशीच आहे, फक्त वेगळ्या स्वरुपात आहे. जाती मागे पडल्या असून ‘वर्ग’ झाले आहेत.

खेड्यातुन येणार्‍या आपल्या साध्या, ग्रामीण भागातील लोकांना पुण्या-मुंबईसारख्या शहरात आल्यावर तेथील लोक कोणत्या नजरेने बघतात???गावाकडचे लोकं ग्रामीण पेहराव करून शहरात आली तर त्यांच्या राहणीकडे बघून कमीपणाची वागणूक दिली जाते. कुठल्या मोठ्या हॉटेलमध्ये लुगडं घातलेली आजी अन धोतर घातलेले आजोबा गेले तर आधी पैशाचा फलक दाखवला जातो. असो, भयंकर आहे हे सगळं…

माझं मेसवर जाणं चालूच आहे. कधी आंघोळ करून तर कधी आंघोळ न करता (फक्त इतरांना काही सांगत नाही मी). ती दोन तरुण मुले मेसवर परत कधी दिसली नाहीत. तो तरुण न्हावी येतो, पण थाळी पार्सल बांधून नेतो…!

===समाप्त???

          सर्व हक्क सुरक्षित @ latenightedition.in  || लेखन – अभिषेक बुचके

Something सामाजिक या e-book मधून…

मजूर

लग्नं, हुंडा आणि गोंधळ

लग्नं, हुंडा आणि गोंधळ

हुंडा || हुंडाबंदी  ||  माझंमत  ||

लातूरमध्ये एका निष्पाप तरुणीने हुंड्यापाई विहिरीत उडी मारून आत्महत्या केली अन सगळा समाज हळहळला. ज्या जीवाने अजून जीवनाचे सर्व रंगही पाहिलेले नव्हते त्या जीवाने आपली जीवनयात्रा संपवली होती. कुठल्याही संवेदनशील मनाला बोचणारी ही घटना होती. आपण अजूनही कुठल्या समाजात राहतो याचं ते दाहक वास्तव होतं. अशा गोष्टी काही क्षण खूप वेदना देऊन जातात पण नंतर हेच वास्तव म्हणून आपण आपलं जीवन नित्याने जगू लागतो. दुर्दैवाने त्या घटनेच्या काहीच दिवसांच्या नंतर एका लग्नाला जाण्याचा योग आला होता. लातूरपासून फार लांब नाही; नांदेडमध्ये! तिथे लग्नाला गेलो अन एका जोरदार लग्नाचा भाग बनून गेलो. त्यावेळेस काही वाटलं नाही. त्या लातूरच्या मुलीचा वगैरे विचार काही आला नाही. त्यात अगदी गुलाबजामून किंवा मठ्ठा मिळाला नाही म्हणून नाराज झालेली काही गावाकडची मंडळीही बघितली. ती मंडळीही साधारण घरचीच, शेतकरी वगैरेच दिसत होती. पण नंतर घरी आल्यावर ती लातूरची बातमी पुन्हा टीव्हीवर पाहिली अन मनात विचारचक्र सुरू झालं. ज्या लग्नाला गेलो होतो ते आणि ज्या मुलीने आत्महत्या केली होती ते एकाच जातीचे होते. खरं तर जात काढायची गरज नाही पण अलीकडेच समाजात संक्रमण घडवणार्‍या घटना त्याच्याशी संबंध वाटला म्हणून हा विषय.

काहीच दिवसांपूर्वी जगाने भव्यदिव्य मोर्चे बघितले होते ज्यात आमच्या एकीचे दर्शन घडले होते. त्या मोर्च्याच्या प्रेरणास्थानीही आमचीच एक निष्पाप बहीण होती. मोर्चात दिसणारी ती एकी अशा सामाजिक कार्यात कधी फारशी दिसत नाही हीच तर मोठी खंत आहे. एका बाजूला असे कुटुंब आहेत जिथे बापाला हुंडा द्यायला पैसा नाही त्यामुळे लग्न होत नाही ह्या विवंचंनेतून त्या ताईने आत्महत्या केली अन दुसरीकडे त्याच समाजाच्या लग्नात हजारोंच्या पंगती उठत होत्या. हा सामाजिक असमतोल अतिशय भीषण आहे. याला कुठल्याही जातीचं रूप द्या संदर्भ सारखेच लागतील. कारण सर्वच जातीत असे वर्ग निर्माण झाले आहेत हे सत्य आहे. आम्ही स्वतःच्या हक्कासाठी मोर्चे काढतो पण कर्तव्य असताना मागे पडतो. एकत्र आलेल्या समाजाने हुंडा घेणार नाही देणार नाही अशी प्रतिज्ञा केली असती तर आमच्यातील अनेक कुटुंब देशोधडीला लागल्यापासून वंचित राहिली असती.

          एखादा विचार दुसर्‍यावर थोपवणे अतिशय सोप्पी गोष्ट आहे पण तोच स्वतः अवलंबायची वेळ आली की मेंदू लख्ख विचार करू लागतो. ह्या एका प्रश्नाने मेंदू अक्षरशः गुंगावून गेला अन ह्या विषयाच्या कितीतरी बाजू डोळ्यासमोर येऊ लागल्या. साधा विचार केला की आपण स्वतःचं लग्न कसं करावे? म्हणजे ‘साध्या पद्धतीने’ की नेहमीच्या पद्धतीने? म्हणजे, लग्नात संपत्तीचं प्रदर्शन करावं की उगाच चोरी केल्याप्रमाणे गपचूप लग्न करावं हा जटिल प्रश्न उभा होता. टीव्ही वर जे थोर लोक, त्यात पत्रकारतर पहिले, साधेपणाने लग्न करा वगैरे ओरडत असतात त्यांची खरंतर कीव येते. कारण कोणीतरी साधेपणाने लग्न केलं तर कुठेतरी हुंड्याची समस्या कमी होईल, आर्थिक असमतोल कमी होईल असे निर्बुद्ध विचार मांडणारी मंडळी आहेत तोपर्यंत काही खरं नाही.

माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय करावे ही माझी स्वतःची इच्छा आहे. म्हणजे मुलींनी कपडे कसे घालावेत, कधी यावे-जावे किंवा अजून काय ह्या बाबी इतरांनी ठरवणे मागासलेपणा आहे तसाच मी (मुलगा/मुलगी) लग्न कसं करावं हाही तितकाच मूर्खपणा आहे. जे लोक आपल्या मुला/मुलींच्या वाढदिवसाच्या पार्टीवर हजारो-लाखो खर्च करतात ते इतरांना लग्न कसं साधेपणाने करावं याचं बौद्धिक देत असतात. स्वतः मस्त हजारांचे कपडे घालणार, हजारांचा मेकअप करणार, गाड्या घेऊन फिरणार, उठ-सूट निमित्य शोधून पार्टी करणार, मनाला वाट्टेल तसा पैसा खर्च करणार आणि शेवटी इतरांना सांगणार की नाही बाबा लग्न अतिशय साधेपणाने कर आणि सामाजिक भान राख. कारण लग्नावर खर्च म्हणजे अपव्यय आहे असं बर्‍याच जणांना वाटत असतं. वाटल्यास साधेपणाने लग्न झाल्यानंतर बॅचलर पार्टी देता येईल, मित्रांना मरेपर्यंत दारू पाजून पार्टी देता येईल, नातेवाईकांसाठी वेगळं रीसेप्शन ठेवता येईल पण लग्न मात्र साधेपणाने कर म्हणजे सामाजिक भान राखले जाईल! साधेपणाने म्हणजे काय? तर मंडप नको, भटजी नको, उगाच कपडे नको, पत्रिका नको, पाहुणे नको, मित्र नको, त्या निरर्थक प्रथा नको, मुख्य म्हणजे जेवण नको. सहज फिरत-फिरत गेल्यासारख चार-पाच लोक जाऊन मयताला करतात तसा शांतपणे लग्नाचा विधी करून ये अन मिरवत बस जगभर स्वतःच्या सामाजिक भानाचे किस्से!!!

मी महिन्याला चाळीस हजार कमावत असेन तर ते कुठे अन कसे खर्च करायचे हे मीच ठरवायला हवं. ते मी ठरवतोही. मी मस्त गाडी घेतो, भारी मोबाइल घेतो, चारशे रुपये घालून बाहुबली पिक्चर बघतो, रात्री बाहेर जेवणावर, दारूवर पैसे उडवतो, मित्रांचे वाढदिवस, सेंड ऑफ वगैरे सगळं कसं मनासारखं एंजॉय करतो… पण लग्न आलं की मला साधेपणा अन काटकसर आठवते???

हे सगळं असं असतं. म्हणजे तुमचा पैसा तुम्ही कसाही वापरू शकता, Bday, mother’s day, father’s day, friendship day, valentines day वगैरे सगळे उत्साहात साजरे करायचे. वाट्टेल तसा पैसा उडवून एंजॉय करायचं आणि लग्न वगैरे आलं की साधेपणा!!! ज्यांना इतकीच चळ होती न साधेपणा, हुंडाबंदी वगैरेची आणि इतरांना अक्कल पाजत होते त्यांनी ठरवायला पाहिजे होतं, बाहुबली न बघता त्याच्या महाग तिकिटाचे पैसे मी समाजात देईन!!! पण तिथे आम्ही चिकार पैसे घालतो (माझ्या कमाईचे आहेत, माझ्या बापाचे आहेत तुम्ही कोण सांगणारे) अन…???

म्हणजे ह्या सर्व गोष्टीचं कसं काहीच देणं-घेणं नाही. पण थाटामाटात लग्न आणि ह्या साधेपणाचं थेट दुष्काळ, आत्महत्या अन हुंड्याशी संदर्भ जोडणे हा तर महाबिनडोकपणाचा कळस म्हणावा लागेल. शहरतल्या लोकांना मुळात समस्याच माहीत नसते काय आहे ते; पण त्यावर स्वतःचं बुद्धिजीवी डोकं वापरुन मत देऊन सल्ला देण्याची घाई झालेली असते. आपलं वाचन किती आहे अन आपण जग किती बघितलं आहे यातून त्यांच्यात हा निष्ठुरपणा आलेला असतो हे विशेष करून सांगावं लागेल. हे तर असं म्हणतात जसं हुंडा ही पद्धती आम्ही जाणीवपूर्वकच पाळत आहोत. हे #हुंडादेणारनाहीघेणारनाही अशा शपथा घेतात ते चांगलं आहे पण हुंडा म्हणजे काय ते तरी समजून घ्या. तो केवळ सोनं आणि पैशांच्या स्वरुपात असतो असं ज्यांना वाटतं ते चुकीचे आहेत हे मी ठामपणे सांगू शकतो. हुंडा मेंदूच्या पातळीवर सुरू झालेली गोष्ट असते जी दोन्हीही बाजूने तितक्याच मोठयाने बडवलेला ढोल असतो.

जे आई-बाप आपल्या मुलीला वाढदिवसाला मोबाइल, गाडी किंवा महागडी वस्तु घेऊन देतात त्यांची हुंडा ही संकल्पना खूप वेगळी आहे. जे आपल्या मुलीला नेहमी काहीतरी भौतिक सुख देत असतात त्यांना त्याची किम्मत नसते. पण खेड्यात राहणारा गरीब बाप आपल्या मुलीला ओवाळणी म्हणून साडीही देऊ शकत नाही त्याला हुंडा काय असेल ते माहीत असेल. जिला आपण आयुष्यभर काही देऊ शकलो नाही तिला सासरी जाताना एक कर्तव्य म्हणून आपल्या परीने सर्वस्व देता यावं एवढीच त्याची इच्छा असते. तिला संस्मरणीय राहील अशी आठवण देण्याचा तो प्रयत्न असतो. जे आपण मुलाला देऊ शकलो अन मुलीला देऊ शकलो नाही ते सुख देण्याचा प्रयत्न तो मुलीचा बाप करत असतो. आता सर्वच आई-बाप हे इच्छेने देतात असं मी म्हणत नाही. गावी जाणार्‍या मुलीच्या हातातही आपण पैसे ठेवतो, काही खायला देतो तोही हुंडाच का मग? शिवाय बापाच्या संपत्तीत हिस्सा मागणे हाही मुलीने हक्काने घेतलेला हुंडाच का मग? पोरला जमीन-घर पैसा दिलात अन मुलीला काय? असा प्रश्न नंतर कोण विचारणार तर नाही न मग? मग हुंडा म्हणजे असतो तरी काय मग???

माझा मुलगा इतके-इतके कमावतो, दिसायला उत्तम आहे वगैरे वगैरे असं स्थळ तुमच्या मुलीच्या पदरी पडायचं असेल, तर द्या मग इतके पैसे अन आम्ही घेऊ मग तिला आमची सून करून! ती आयुष्यभर इथे सुखात नांदू शकते हे बघा, आत्ता जातील पैसे लग्नात, पण पोरगी आयुष्यभर सुखी राहील बघा!!! असं जेंव्हा मुलाचे आई-बाप म्हणतात तेंव्हा ते मुलाचा दर ठरवत असतात. आमच्या मुलाला आम्ही वाढवलो, शिकवलो अन वळणावर लावलं त्याचं व्याज तर मिळालं पाहिजे न???? हा हुंडा असतो.

आपण कुठल्या समाजात राहतो अन त्यातील प्रथांचे अर्थ काय हे समजून घेऊन त्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे. उगाच अमेरिकेत राहिल्याप्रमाणे शहरात राहून आम्ही किती शहाणे हे दाखवून देण्यात काय अर्थ आहे. याचा अर्थ असा होत नाही की मी #हुंडा ह्या प्रथेचा पाठीराखा आहे…! बिलकुल नाही… अजिबात नाही… त्रिवार नाही…

लग्नाची ‘बोलणी’ करताना निर्लज्जपणे इतके पैसे द्या, तितकं सोनं द्या, लग्न तुम्ही करून द्या, हे करा, ते करा असं अधिकारवाणीने नव्हे तर मग्रुरीने सांगणारे मुलाकडचे मंडळी हे नालायकच म्हंटले पाहिजेत. मुलगी दिसायला-वागायला-शिक्षणात जितकी वाईट तितका हुंडा जास्त असा व्यवहार करताना माणुसकी केंव्हाच मेलेली असते. तिथे फक्त जनावरांचा व्यवहार चालू असतो. शुद्ध व्यवहारच. मुलीला तो मुलगा पसंत आहे का नाही हा प्रश्नच नसतो कारण तिच्यासारख्या मुलीसमोर काही पर्यायच नसतो. तिला नशिबी आलेलं आयुष्य कसतरी पूर्ण करायचं असतं ज्यासाठी बापाकडे पैसा असावा लागतो. हा आहे आपला समाज. सुंदर, नोकरी असलेली, हुशार मुलगी असेल अन ती मुलापेक्षा सर्वच बाजूने चांगली असेल तर हुंडा घेण्याचा अधिकार मुलाकडचे विसरून जातात हेही व्यावहारिक सत्य आहे.

पण दुसर्‍या बाजूला मुलाला पुण्यातच नोकरी हवी, हक्काचं घर हवं, मुलाला लग्नाची बहीण आहे का? आणि भाऊ किती? त्यात नोकरी permanent आहे का? पगार कसा आहे? जमीन किती आहे? ह्या सगळ्या बाबींवर मुलगी देणारे अन मुलगा करून घेणारे तरी हुंडा घेणार्‍यांपेक्षा वेगळे कसे म्हणायचे. तेही शुद्ध व्यवहारच बघत असतात की. कोणी असं बघितलं आहे का, की मुलगी जास्त शिकलेली, जास्त कमावणारी अन मुलगा एकदम टाकाऊ अन बेरोजगार? असं लग्न तरी झालं असतं का? पण जर त्या मुलाचा बाप जर आधीच करोडपती असेल तर हे लग्न सहज होईल कारण मुलीकडच्याना समोर पैसा दिसत असतो, मुलगा नाही. तोही हुंडाच की मग??? इथे लग्न हा फक्त व्यवहार मानायचा… बाकी सगळं गौन… आवड-निवड वगैरे तर दोन्ही बाजूने दुय्यम क्रमांकावर असते…

आता अजून एक मुद्दा. इथे हुंडा ह्या पद्धतीत ‘महिला’ असा प्रकार पाडून नको तसला महिलावाद काही उपयोगाचा नाही. हुंडा हा केवळ महिलेवरील अन्याय किंवा महिलेचा कमी समजण्याचा प्रकार मानण्याची चूक करू नका. म्हणजे माझा मुलगा राजबिंडा त्याला मिळेल लाखांचा हुंडा असं म्हणणारी वरमाय ही स्त्रीच असते अन लेक माझी लाडकी, सोन्याने सजवीन तिला अन धाडेन तिच्या सासरला! असं म्हणणारी मुलीची आई हीसुद्धा स्त्रीच असते. स्त्री असलेल्या सुनेचा छळ करणारी सासूही स्त्रीच असते की… इथे कसला स्त्रीवाद येतो… त्यामुळे उगाच ह्याला स्त्री विरुद्ध पुरुष असा प्रकार बंद केला पाहिजे. उलट हुंडा ह्या पद्धतीत मुलीचा बापच सर्वाधिक खंगला जातो अन नवरा मुलगाही! पण स्त्रीला कमी समजून जे हुंडा घेतात त्यांना तुरुंगवास हीच एक जागा योग्य आहे.

आज कुठल्याही मुलीचा बाप आपल्या मुलीला शेतकरी मुलाला द्यायला तयार नाही. हुंडा मागायची त्या शेतकर्‍याची परिस्थिती तरी आहे का? मध्यमवर्गात हुंडा हा आता खूप वेगळं रूप धारण करतो आहे. शिकलेल्या, नोकरी करणार्‍या किंवा माध्यम कुटुंबातील मुली मुलाकडे पैसा-घर-जमीन असल्याशिवाय लग्नच करत नाहीत. तिथे हुंड्याचा प्रकार खूप वेगळा आहे. ऑलरेडी श्रीमंत असलेला मुलगा स्वतःच्या कमाईप्रमाणे मोठा हुंडा अपेक्षित धरतो. पण तिथे मुलीकडची पार्टी श्रीमंत असायला हवी. आणि श्रीमंत असून जर मुलगा दिसायला भंगार असेल तर तो एखादी सुंदर मुलगी बिनहुंड्याचंही करून घेईल. सुशिक्षित मुली असल्या मागण्या धुडकावून लावतात हे उत्तम आहे. हा स्वतःचा सन्मान त्यांनी राखला पाहिजेच. शिवाय, जा माहेरून पैसे घेऊन ये, तुझ्या माहेरी आह की इतकी इस्टेट असं म्हणणारे (खासकरून सासू) हीन बुद्धीचेच असतात.

आता मूळ मुद्दयाची बात आहे. खेड्यात हुंडा अजूनही चालू आहे हे खूप वाईट आहे. जात-वर्ग-वय-रूप ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन कुठे-कुठे हुंडा ही रूढी अतिशय क्रूरपणे चालू आहे. अतिशय गोड अन हुशार मुलींनाही केवळ हुंड्याला पैसा नाही म्हणून घरीच बसून राहावं लागत आहे. एका बाजूला मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत अन लग्न करायचं आहे मात्र हुंड्यासाठी पैसा नाही म्हणून अनेक मुली घरी बसून आहेत असा विरोधाभास आपल्या समाजात आहे. ही साखळी तुटली पाहिजे. अनेक तरुण हुंडा घेणार नाही असं ठरवतातही पण काहीतरी गडबड होतेच. माझ्या बहिणींना हुंडा देऊन घरची आर्थिक स्थिती बिघडली, त्यांनी ओरबाडून घेतलं मलाही तेच करावं लागणार ही अडचण येतेच. हुंडा मागत नाहीत? मुलातच काही गडबड असणार. घरी काही अडचण असेल म्हणून मुलीकडचेच माघार घेतात. लग्नाचा व्यवहार आई-बाप बघतात तिथे मुलांचं (वधू-वर) काहीच चालत नाही हेही सत्य आहे. असे एक न अनेक लटांबर आहेत जे ‘हुंडा’ ह्या शब्दाला तिलांजली देऊ देत नाहीत.

Image result for हुंडाबंदी

दिवसेंदिवस हुंडा, लग्न अन संसार किंवा नाती ही आर्थिक वर्ग याप्रमाणे खूप किचकट होत आहे अन बदलही घडवत आहे. इथे जातीत विभागणी होत नाही; पैसे यानुसार वर्ग पडतात. बदललेली सामाजिक समीकरणे, आर्थिक असमतोल, जागतिकीकरण अन जेनेरेशन गॅप हे लग्न, हुंडा व संसार याची समीकरणे बदलत आहेत. कुठलीही एक बाजू दाखवताना जरा काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा चुकीचं विश्लेषण समाजाला वेगळ्या वाटेवर नेतील. लग्न हा नात्यापेक्षा एक परिपूर्ण अन चोकस व्यवहार होत आहे. बदललेलं जग अन जीवनशैली यात माणूस मजबूर होत आहे हे नक्की! हुंडा हा फक्त आर्थिक असमतोल अन अराजकला मिळालेलं सामाजिक नाव आहे.


वाचा -> दवाखाना: एक वेदनाघर

PROMOTIONS
error: Content is protected !!