आपल्याला जर आपल्या रचना, संकल्पना, मत येथे मांडायचं असेल किंवा कुठलीही जाहिरात ह्या संकेतस्थळावर करायची असेल तर latenightedition.in@gmail.com यावर संपर्क करावा!

Tag: हास्य

Half Day In A Barber Shop

Half Day In A Barber Shop

Half Day In A Barber Shop  || Crazy In Barber Shop  || न्हावी  || न्हाव्याच्या दुकानी रमला || मराठी लेख+कथा || विनोदी वगैरे || Marathi Story

[ठासून – शीर्षक इंग्रजीत ठेवलं म्हणून मला मराठीचे मारेकरी वगैरे म्हणायचा अधिकार मीच तुम्हाला बहाल करतो]

श्रावण महिना संपलेला होता. नेहमीप्रमाणे श्रावण संपत असताना पाऊस बरसला अन सृष्टी बहरून टाकली होती. तसं मला श्रावण महिन्याचा फार फरक पडत नाही. कारण मी काही खात-पित नसल्याने त्या पवित्र महिन्याचा माझ्या अतिपवित्र कामात काही अडथळा होतोय असं काही नव्हतं. शिवाय मी श्रावण सोमवार वगैरेही पाळत नाही. कांदा-लसूण वर्ज असंही काही नाही. म्हणजे ही सगळी अंधश्रद्धा आहे, असलं काही करू नये असं नाही म्हणत; पण चाळीशीनंतर हे सगळं करावं अशा मताचा मी आहे. यावरून मी चाळीशीचा नसून तरुण आहे याचा अंदाजा तुम्हाला आला असेलच. त्यामुळे श्रावण असल्या-नसल्याने मला व माझ्या खाण्यात (पिण्याचातर संबंधच नाही) काही फरक पडत नाही. ते नेहमीप्रमाणे उत्तम चालू असतं. म्हणजे, गणपती ते दिवाळी हा काळ वर्षभराच्या डायट नावाच्या प्रकारावर पाणी फेरायला पुरेसा असतो.

तसं मी कुठलच बंधन पाळत नाही असं नाही. पण कधी-कधी केसाला धक्का न लावण्याचं वचन मी पाळतो. अर्थात तेही जमेल तसं. पण यंदा ते पाळण्यात (जो जो वाला पाळणा नाही) आलं.

थोडसं विषयांतर आहे. श्रावण महिन्यावरून मला एका मित्राने (अर्थात मीच) खूप भारी logic प्लस theory मांडली होती. जैन धर्मात पर्युषण, मुस्लिम धर्मात रोजा आणि आपल्यात श्रावण वगैरे असली धर्मनिरपेक्ष theory नाही. ही theory थेट लैंगिकतेशी जोडण्यात आली होती. आता तर तुम्ही लक्ष देऊन वाचणारच याबाबत मला शंकाच नाही. म्हणजे असं की, श्रावणात मस्त पाऊस पडलेला असतो. सगळीकडे डोळ्याला मनाला तृप्त करणारा हिरवागार निसर्ग असतो. मन अतिशय मोहरून जातं. कवींना तर पेवच फुटतो. सगळं कसं प्रफुल्लित करणारं असतं. नजरेसमोरची फुलपाखरे मनातही बागडू लागतात. अशा रम्य वातावरणात साथीदारची सोबत असावी असं वाटून जातं. मग मनातल्या मनात हा प्रसंग पुढे रसभरीत प्रणयापर्यन्त जाऊ शकतो. तो आपल्याच जोडीदाराबरोबर असला तर ठीक, नाहीतर गडबड होईल. आता ह्या गोष्टींचा खाण्या-पिण्याशी संबंध कसा?

तर तुम्हाला तर माहीत आहेच की कांदा-लसूण-मांस-मद्य यात पुरुषाचे लैंगिक कामुकता वाढवण्याचे गुणधर्म आहेत. अगदी विज्ञान आहे यात. ह्या अशा वातावरणात ते इंजेक्शन नको म्हणून त्यावर बंदी. म्हणजे उगाच कामुकता वाढवून भलतंसलतं होऊ नये याची काळजी. बाकी हे खाण्याने पोट खराब होणे ही तर निव्वळ अफवा आहे. नाहीतर पावसात पचायला जड असलेला मका चापून खाण्यावर बंदी का नसती? आहे की नाही पॉइंट?

तसेच केस न कापणे हेही त्याच्याशीच संबंधित आहे. पावसाळ्यात मस्त पाऊस असतो. त्यात वाढलेले केस वगैरे वगैरेने थोडी अस्वच्छता येते. म्हणजे माणूस मानसापासून जरा दूरच राहतो. केस-दाढी वगैरे वाढलेली यामुळे रूपही जरा रानटी अन रखरखीत दिसल्याने उगाच कोण स्त्री पुरुषाच्या प्रेमात पडत नाही किंवा आकर्षित होत नाही हे विशेष. मग तुम्ही त्याला भगवान शंकराशी, त्याच्या वैरागीपणाशी जोडत असाल तरी चालेल. पण खाणाबंदी अन केस वाढवणे हे निव्वळ लोकसंख्या नियंत्रणात राहावी यासाठी केलेली उपाययोजना असावी… असं माझा मित्र सांगतो! अर्थात यावर वाद घालण्यात तुम्ही समर्थ आहात याबद्धल मला शंकाच नाही.

हे विषयांतर जाऊ द्यात. पण श्रावण संपलेला होता. पोळापण उरकला होता. अमावास्या, सूर्यग्रहण हेसुद्धा झालं होतं. आणि विशेष म्हणजे ज्या कारणासाठी केसांना मोकळं सोडलं होतं ते कारणही पूर्ण झालं होतं. म्हणजे, एक प्रण केला होता. आम्ही एक ‘Unique’ सॉफ्टवेअर बनवत होतो. त्यात बर्‍याच अडचणी येत होत्या. त्यावेळेसच प्रण केला की, आता हे सॉफ्टवेअर झाल्याशिवाय केसांना कात्री लागणार नाही. सॉफ्टवेअर व्यवस्थित पूर्णत्वास गेलं. ती प्रणपूर्ती झाल्याने मी दाढी-कटिंग करण्यास मोकळा झालो. हा तो सूर्य अन हा तो जयद्रत म्हंटल्याप्रमाणे हे ते वाढलेले केस अन तोच तो न्हावी अशातला प्रकार. दरम्यान, कटींग-दाढी न केल्याने माझ्या चेहर्‍यावर फक्त नाक तेवढं उठून दिसायचं इतपत केस वाढले होते. डोळ्यावर ‘सस्ते में और रस्ते पे लिया हुवा’ काळा गॉगल असल्याने फक्त नाकच दिसायचं. बाकी सगळं काळ्या केसांनी व्यापलेला चेहरा! अक्षरशः रानटी दिसत होतो. पण मित्र म्हणतात मी असाही रानटीच आहे. असो.

 

मग त्या दिवशी सकाळी मी आळसावलेला रानटी चेहरा घेऊन त्या न्हाव्याकडे गेलो. सकाळ म्हंटलं तरी साडेदहा-अकरा वगैरे वाजले असावेत. तिथे गेलो तर समजलं की ‘श्रावण केसव्रत’ धरणार्‍यांची बरीच गर्दी उसळली आहे. म्हणजे चार-पाच तरी नंबर होते. आता सांगायची गोष्ट म्हणजे मी त्याच न्हाव्याकडे का जातो. तर दुसरे न्हावी गलीच्छ असतात असा अनुभव आहे.

पुन्हा एकदा विषयांतर! म्हणजे एकदा असं झालं होतं बघा की, एका दुसर्‍याच न्हाव्याकडे गेलेलो होतो. एकाचं ‘भादरणे’ चालू होतं. कटींगच्या दुकानात अगदी अडाणी माणूसही पेपर वाचू शकतो; हे कसं साध्य होतं माहीत नाही. तिथे एक तसाच मेंबर बसलेला होता. पेपर त्याच्या ताब्यात होता, म्हणून मी शांतपणे चाललेल्या आयुष्यावर गंभीरपणे (येथे शांतपणे आणि गंभीरपणे शब्दांची जागा आदला-बदलली तरी चालेल) मंथन करत बसलो होतो.

त्या भादरणेची (कोणतंही गिराईक हो) कटींग वगैरे झाली अन त्या कटींग वाल्याने त्या भादरणे ला विचारलं, काका पाणी मारू का? आता पाणी मारू का म्हणजे, झाडाला, बागेला किंवा नवीन बांधकामाच्या गिलाव्याला पाणी मारू का असा विषय नसतो. तर पाणी मारू का म्हणजे भादरणेला (गिराईक गिराईक) बंद पंखा अडकवलेल्या छताकडे तोंड करायला लावून त्याच्या तोंडावर फुर्र…फुर्र पाणी मारणे, त्यावर कुठलंतरी फेसवॉश लावणे, मग धोते जाव धोते जाव धो… करून एका नॅप्किनने (कळकट्ट, कधीच न धुतलेला) त्या भादरणेचं तोंड तासून-घासून-ठासून पुसणे अन चकाचक करणे. आता झालं असं की त्या भादरणे म्हणजे जरा काका टाइप व्यक्तिमत्व; पन्नाशीकडे झुकलेलं. त्यांना झालेली होती सर्दी… दाढी करताना गालावर पांढरं जेल लावलं तसं त्या भादरणे काकांच्या नाकातलं ताजं जेल त्या नॅप्किनला लागलं… अक्षरशः मला मागून दिसलं अन ऐकूही आलं… अंगावर शिसारी आली…

बर्‍याचदा पाणी मारणे ह्या प्रक्रियेत भादरणेचे (गिराईक हो गिराईक) तोंड, नाक, झालच तर डोळ्यांतील चिपाड हेसुद्धा स्वच्छ करतात. काही मंडळी तर भादरत असतांनाही अमृततुल्य गुटखा तोंडात ठेवतात अन तो मग नॅप्किनला लागतो…. असं हे पाणी मारण्याची प्रक्रिया…

ही कृती झाल्यावर ते काका उठले अन तो न्हावी हातातला नॅप्किन झटकत, हसत-हसत माझ्याकडे बघत म्हणाला ‘बसा भय्या’. खरं सांगतो, आयुष्यात इतकी कीव-भीती मला कधीच वाटली नव्हती. खाटकाच्या हातातील हत्यार बघून कोंबडं-बकरं घाबरेल तितका मी त्याच्या हातातील तो नॅप्किन बघून घाबरलो होतो. पण प्रसंगावधान राखत, ‘पोट बिघडलं’ असं म्हणत मी जी धूम ठोकली ती आजपावतोर तिकडं कधी म्हणजे कधी फिरकलो नाही. त्या दुकानाकडे गेलो की तो काका भादरणे, तो न्हावी हातात नॅप्किन घेऊन उभेत हसत-हसत माझी वाट बघत आहेत असाच भास होतो.

सध्या मी ज्या न्हाव्याकडे जातो तो बर्‍यापैकी स्वच्छता दूत आहे. कदाचित मोदींचा भक्त असावा. त्याने दुकानाच्या बाहेर कपडे वाळत घालतात त्याचं मोठं स्टँड लावलं आहे. त्यावर नॅप्किन (नॅपकीन असं आहे हे पण typing ला प्रॉब्लेम आहे. समजून घ्या) वगैरे वाळत घातलेले असतात (कपडे वाळायला घालत असतात, ठेवत नसतात हे मी पुण्यात शिकलो. खुलासा). त्याची स्वच्छता खरच वाखणण्याजोगी होती. तो न्हावी आधी पुण्यातच कामाला होता हे त्यानेच मला सांगितलं. म्हणजे स्वच्छता वगैरे तो कुठून शिकला असेल याची शंका मिटली होती.

न्हावी म्हंटलं की कट्ट्यावर बसलेला, किंवा पत्र्याच्या शेडमध्ये दुकान टाकून बसलेला कळकट्ट पण हसर्‍या चेहर्‍याचा मनुष्य अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. हा ‘न्हावी’ दाढी-कटींग सोबत गावापासुन जगापर्यंत आणि पारावरच्या ते वार्‍यावरच्या सर्व गप्पा फ्री…फ्री…फ्री भेटतात. एका कटींग ला निदान पाऊण तास लावावा अन बाकीच्या बसलेल्या मंडळींचंही मनोरंजन व्हावं यासाठी त्याच्यात जे कलागुण असतात ते कोणाकडेच नसतात.

आमचा (मी ज्याच्याकडे जातो तो. बाकी ‘आमचा’ म्हणजे विशेष असा काही संबंध नाही) न्हावी हा अगदीच न्हावी नव्हता. तो barber टाइप होता. जरा standard वगैरे. बाकी मूळ कलागुण कोणाला चुकलेत देवा! पण sweeney todd demon barber चित्रपटातील न्हाव्याप्रमाणे त्याचं काही नव्हतं. तर हा न्हावी barber होता.. म्हणजे आहे…

तर खरी कहाणी इथे सुरू होते. वर होतं ते संक्षिप्त प्रास्ताविक म्हणा किंवा नमनाला घडाभर तेल म्हणा… जमलं तर वाचा पण चावू नका…

तर, सकाळ-दुपारच्या आसपास मी आमच्या नेहमीच्या बार्बरकडे निघालो. दुकान घरापासून जवळच. मघाशी म्हंटल्याप्रमाणे, तिथे गेलो तर समजलं की ‘श्रावण केसव्रत’ धरणार्‍यांची बरीच गर्दी उसळली आहे. मी गपचूप कोपर्‍यात बसलो. एक-दीड तास तरी लागतील असं तो बार्बर म्हणाला. पर्याय नव्हता. श्रावणापूर्वी अन नंतर दारू-मटनाच्या दुकानावर (मी जात नाही. सहज माहिती) जशी गर्दी होते तशी श्रावण संपल्यावर कटींगच्या दुकानात गर्दी होतच असते. डोक्यावरचे, गालावरचे केस एक दिवसही ठेऊ शकत नव्हतो. मी आजच सगळं क्लियर करायचं म्हणून वाट बघत बसलो. कुठल्यातरी पेपरचं एक पान हाती लागलं. आम्ही ‘you are in a queue’ मध्ये असणार्‍या मंडळींनी समजुतीने पेपर वाटून घेतला होता. एक-एक पान वेगळं करून आम्ही पेपर वाचत बसलो. दरम्यान एका मित्राचा फोन आला. मी timepass म्हणून त्याच्याशी बोलत बसलो. त्याने अर्धा-पाऊण तास मनोरंजन केलं. परत दुकानात येऊन बघितलं तर फक्त एकच नंबर पुढे सरकला होता. आधीच्या मेंबर ने डाय (मरणे वगैरे नाही, केसाला रंग लावणे या अर्थाने) केला. त्याच्या ह्या कृतीने इकडे रांगेत बसलेले डाय (इथे मरायला अशा अर्थाने) व्हायला आले होते. तिथे वेळ गेला.

काही वेळ मी बसून होतो. पण माझ्यापुढे तीन नंबर होते. अजून एक-दीड तास तरी नक्कीच लागला असता. मला जोराची भूक लागली होती. इथे वेळ लागला असता. घरी जाऊन आंघोळ वगैरे करून जेवण म्हणजे उपास घडला असता. श्रावणात केला नाही तो आता करून काय पुण्य? म्हणून मी जेवण करून परत यायचं ठरवलं. पण केसांना आज अलविदा करायचाच असा चंग बांधला होता. मग मी बार्बरला सांगितलं की ‘जाऊन येतो, नंबर लावून ठेवा.’ आता नंबर म्हणजे मोबाइलचा नसून ‘you are in a queue’ वाला.

मी मस्तपैकी जेवण करून परतत होतो. जाताना आनंदी होतो. सगळे गिराईक संपले असतील, आता माझी बारी बार्बर देतो टाळी असं आनंदाने म्हणत मी निघालो होतो. तिथे गेल्यावर मघापासुन ठाण मांडून बसलेला चिवट म्हातारा खुर्चीवर पेंगत बसला होता. त्याचा नंबर माझ्या आधी होता. अजून एक दोन नवीन नग येऊन बसले होते. मला धक्काच बसला. तहसील कार्यालयातही एवढा वेळ लागला नसता तेवढा इथे लागत होता. मी बार्बरला विचारलं, ‘आहे का माझा नंबर? का नाही?’ असं म्हणत अतिशय केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे बघितलं. तो काहीच बोलला नाही. क्षणभर थांबला. खुर्चीवर बसलेल्या गिराईकच्या केसातील कंगवा अलगद काढला, माझ्याकडे एकवार बघितलं, बाहेर गेला… मला वाटलं हा देतोय आता शिव्या.. नेमकं काय झालं असं करायला… तर गटारीत जाऊन ठुकून आला अन मला हसत हसत म्हणाला, ‘तुमचा नाय तर कोणाचा नंबर लावून ठेवाचा भय्या… बसा की… झालं का काम काय होतं ते…?”

बिचार्‍याने आपुलकीने चौकशी केली. माझा जीवात जीव आला. त्या पेंगणार्‍या म्हातार्‍याच्या बाजूला जाऊन बसलो. मी बसताना खुर्चीचा धक्का त्या म्हातार्‍याला लागला. बिचारा बेशुद्धीत होता शुद्धीत आला अन गडबडत उठत म्हणाला. ‘आला का नंबर?’

बार्बरने त्याला बसवलं. मी मंद(पणे) वगैरे हसलो. त्यांना सहज विचारलं, “काय काका, कटींगच न?”

तो कुत्सित चेहर्‍याने माझ्याकडे बघत होता. त्याच्या डोक्यावरचे समोरचे केस नियतीने उडवले होते; अर्धटक्कल; बघा नियती किती क्रूर असते. पण दाढी माफक वाढलेली होती. तो म्हातारा म्हणाला, “दाढीच हो. नियतीने कटींगचा खर्च कमी केला आमचा.”

मी त्या विनोदावर वरवर हसलो पण मनात वाटलं, ‘नियती’ शब्द त्यालाही कसा सुचावा? मनातलं वगैरे वाचतो की काय? एका दाढीसाठी दोन-तीन तास चिवटपणे बसला आहे म्हणा.

आधीचं गिराईक उठलं की हा टुन्नकन उडी मारून खुर्चीवर जाऊन बसला. दूसरा बसू नये म्हणून. शेवटी ‘खुर्चीची’ जादुच अशी असते. असो.

त्या म्हातार्‍याचं कार्य उरकत आलं तसा मी निश्वास सोडला. तेवढ्यात तिथे एक मध्यमवयीन बाई आल्या. त्यांचा पिंट्या पलीकडच्या दिढमुड होऊन बसला होता. चेहरा अगदी रडवेला झाला होता. पिंट्याचा. त्याची आई, मघाची बाई आश्चर्याने म्हणाली, अरे झालं नाही का अजून? तपशील असा होता की त्या बाईंनी त्यांच्या पिंट्याला दीड-दोन तासांपूर्वी इथे सोडलं होतं; कटींगसाठी. पण त्याचा नंबर माझ्यानंतर होता. त्याच्या त्या सडपातळ देहावर केसांचा टोप बराच मोठा दिसत होता. इतक्या लहान वयात इतका भार (तो पिंट्या) कसा सोसत असेल याचं मला नवल वाटलं. मनात गाणं वाजल, ‘सोसावेना भार घामाघूम झालं अंग’ वगैरे.

त्या बाईंनी बार्बरला अर्जी केली की त्याची कटींग तातडीने करून देणेबाबत… बार्बरने माझा घात केला अन मला घाटावर सोडलं… त्या बाईंच्या विनवणीला अन त्या पिंट्याच्या मासूम चेहर्‍याकडे बघून तो पाषाणहृदयी ‘न्हावी’ नरमला अन ‘लागलीच करून देतो’ असं म्हणाला अन माझा तिळपापड झाला. मी जोरदार प्रत्युत्तर देणार होतो पण त्या बाई तिथेच उभ्या होत्या… कटींगच्या दुकानात बाईशी भांडणं बरं दिसलं नसतं म्हणून कुकरसारखा धुसफूसत बसून राहिलो. म्हणजे निदान माझी कटींग वाढलेली असेपर्यंत तरी नाही.

त्या पोट्ट्याची कटींग झाली. तोपर्यंत ती बाई तिथेच उभी होती. कटींगपूर्वी मासूम दिसणारा त्या पोराचा चेहरा पोट्ट्याप्रमाणे शैतानी दिसत होता. त्याला तिथेच फोडावं वाटत होतं. तो बागडत बागडत निघून गेला. माझा अर्धा तास फुकट गेला.

मी नाराजीनेच त्या खुर्चीवर जाऊन बसलो. बाई कोपर्‍यापर्यंत गेलेली पाहून बार्बरने माझी माफी मागितली. मला म्हणाला, “कधी कधी अॅडजस्ट करावं लागतं भय्या. तुम्ही काय नेहमीचेच. बाईला असं दुकानासमोर उभं करणं बरोबर नसतं न वाटलं, म्हणून त्या बेट्याला पटकन कटवलं.”

माझी नाराजी पटकन गेली. शेवटी माझी मान त्याच्या हातात होती.

बार्बरने आधी दहा मिनिट केसांवर पाणी मारलं (यासाठी वरील संदर्भ वापरावा. पण तोंडाच्या ऐवेजी केसांवर इतका मूलभूत फरक) आणि केसं मोकळे केले. तुमचे केस कितीही राठ, कुरळे, सरळ, विरळ असले तरी त्यांच्यावर न्हाव्याच्या दुकानात पाणी अन कंगवा लागला की ते सुतासारखे सरळ होऊन त्यांना वळण लागतं. खूप confusing असलं तरी मला आवडलं हे वाक्य.

बार्बरने केसांना कात्री लावली, अन पुढच्याच क्षणी म्हणाला, “भय्या, किती वाढवलेत हो केस?”

मी उत्तरलो, “अहो मी कशाला वाढवत बसू त्यांना. ते आपोआप वाढतात. मी फक्त अंघोळ करताना पाणी घालतो.”

माझा विनोद त्याला फार आवडला नाही. त्याने केसं कंगव्याने खस्सकन ओढले. पुढचा विनोद मी मनातल्या मनात गिळला.

केसं इतके का वाढवले यावर चर्चा झाली नाही. पण तो सारखं कात्री अन कंगवा बदलत होता. माझ्या दाट केसांत त्याचा छोटा गुंतून राहत होता. कदाचित बार्बरला ते आवडलं नाही. त्याने तो कंगवा ड्रावरमध्ये ठेऊन दिला. कात्री मात्र सपसप चालत होती. पाणीही भरपूर लागत होतं.

बार्बर बाहेर जाऊन थुकून (थुंकून नव्हे) आला अन म्हणाला, किती दाट केसं हो तुमचे, दाढीपण साधूपरमाणे वाढीवली; तुम्हालीच अजून तासभर लागतोय बघा…

हे वाक्य ऐकताच ‘you are in a queue’ मध्ये असलेले बाकीचे लोक पेपर खाली करून माझ्याकडे रागाने बघत होते. मला ते समोरच्या आरशात दिसलं.

माझ्या केसांच्या घनदाट जंगलात एखाद प्राणी (अर्थात किडा, उवा वगैरे) सापडू नयेत अशी इच्छा मी मनातल्या मनात केली. पण त्यांनाही जगण्यासाठी सूर्यप्रकाश हवा असतो; तो काही त्यांना माझ्या केसात भेटला नसता.

मघाशी गेलेली टीव्हीची लाइट (वर उल्लेख नाही ओ, उगाच विचार करू नका) आली आणि डायरेक गाणं लागलं “हो उडे जब जब जुल्फे हो तेरी, कुवारीओ का दिल धडके…”

माझी नजर माझ्या कमी होत जाणार्‍या केसांवर गेली. उगाच खंत वाटली. कशाला कट करतोय असं वाटलं. निदान समोर आलेला गुच्च झुपका तरी कट करू नये असं वाटलं. पण भावनांवर नियंत्रण होतं. मी तसा काही आदेश बार्बरला दिला नाही. तो त्या गाण्याचे बोल गुणगुणत कट मारत होता. पानझडी झाल्यावर झाडांची पाने जशी इकडे-तिकडे पसरलेली असतात तशी कट झालेले केसं इकडे-तिकडे पडत होते. उगाच शरीराचा एक निरोपयोगी अवयव वेगळा झाल्यासारखा वाटत होता. असे अनेक निरोपयोगी अवयव शरीरात आहेत जे काढून टाकता येत नाहीत. मेंदुपासून हृदय अन लिंग इथपर्यंत अनेक भाग जगातील अनेक लोक फार वापरत नाहीत. म्हणजे त्यांचा मूल जो उद्देश असतो तो ‘सारासारपणे’ केला जात नाही. पण ते मरेपर्यंत सोबत असतात. बिचारे केस अन नखं आपण स्वेछेने अन निर्दयीपणे काढून टाकत असतो.

केसांवरून आई-आजीने मायेने तर प्रेयसीने खट्याळपणे फिरवलेले हात; पावसात भिजल्यावर आपणच भिजलेल्या केसांना ऐटीत मागे करतो; शाळेत भांडणं करत असताना मित्रांनी ओढलेले केस तर मारामारी करताना मास्तरांनी रागाने ओढलेले केस फक्त आठवणी वगैरे मागे ठेऊन जातात. बाकी वेळोवेळो तो स्पर्श असलेले केस आपण कुर्बान करून टाकतो. त्यांचा कसलाच मुलाहिजा रखत नाही. सगळं काही निरर्थक असतं. त्याठिकाणी वार्‍यावर उडणारे नवनवीन केसं उगवत असतात. अगदी शेतकर्‍याच्या धान्याप्रमाणे; जमीन तीच पण प्रत्येकवेळेस पीक नवीन!

उगाच असलं काहीतरी आठवतं अन विषयांतर होतं. कटींग चालू असताना टीव्हीची लाइट पुन्हा गेली. चॅनेल बंद पडले. बार्बरला राग आला. त्याने पेनड्राइव लावला अन गाणे वाजवायला सुरुवात केली. मग एक-एक भन्नाट विरहगीत लागले. किशोर पासून अरजीत सिंग पर्यन्त सगळे आले. ती गाणी ऐकताना बार्बर भावुक झाला होता. आरशात मी त्याच्या उतरलेल्या चेहर्‍याकडे बघत होतो. खरं तर काही गाणी अशी असतात जी ऐकली की प्रेमभंग न झालेल्या लोकांनाही आपला प्रेमभंग झालाय असच वाटू लागतं. मलाही उगाच कसतरी होत होतं. म्हणजे विरहाच्या अग्नीत जळतोय वगैरे टाइपचं फीलिंग येत होतं. कदाचित ती त्या गाण्यांची जादू असावी.

पुढच्या दहा मिनिटांत त्या बार्बरने एक गाणं तीनदा वाजवलं. ते गाणं होतं अक्षय कुमारच्या अफलातून चित्रपटातील “ये खबर छपवादो अखबार में, पोस्टर लगवादो बाजार में…”

ह्या गाण्यातील “प्यार के दुश्मन दुनियावाले करले जो है करना…” हे कडवं लागलं की बार्बरचे हात शिवशिवायचे अन केसांवर त्याचा जोर वाढायचा. मला ते जाणवत होतं. अतिशय त्वेषाने बार्बर केसांवर कात्री फिरवत होता. कदाचित त्याचं काहीतरी असावं अन मग ते कोणाच्यातरी विरोधामुळे तुटलं असावं असा अंदाज मी काढला.

पुढचं गाणं लागलं “पल पल दिल के पास तुम रहती हो…” अतिशय रोमॅंटिक! मग बार्बरने मघाशी ड्रावरमध्ये ठेवलेला तो छोटा कंगवा परत बाहेर काढला अन अतिशय हळुवारपणे केसात फिरवू लागला. मला गाण्यात किती ताकत असते हे समजलं. बिचारा बार्बर बरबटला बोटा! मलाही त्याच्यासाठी वाईट वाटलं. कदाचित माझ्यावरही त्या गाण्यांचा परिणाम झाला असावा.

बार्बरने स्वतःहून माझ्या केसांचा समोर आलेला झुपका तसाच ठेवला. मला बरं वाटलं. एक तास झाला होता. दाढी राहिली होती. खरं तर ती वैरागी अन आपल्याच मौजेत असल्याची साक्ष देत असते. कोणाची कसली फिकीर न करता चेहर्‍यावर मजेने पसरत असते. आपला चेहरामोहराच बदलत असते. सपाट पठारावर, मोकळ्या पडीक जमिनीवर गवत वगैरे वाढतं तसं ती वाढत असते… त्यामुळेच चेहर्‍याला काहीतरी शोभा येते… पण तिचाही बळी जात होता…

शेवटी दीड तासांच्या प्रयत्नानंतर माझं रुपडं पालटलं होतं. समोर असलेल्या भव्य अन स्वच्छ आरशात मी जरा वेगळाच दिसत होतो. जणू परकाच… बर्‍याच दिवसांनी स्वतःला बघितल्याप्रमाणे वाटत होतं… ओझं उतरल्याप्रमाणे… त्या बार्बरचे पैसे दिले… अर्धा दिवस ह्या ‘कामात’ गेला होता…

@Late_Night1991

हे झालं श्रावण नंतर काय केलं ते| श्रावणआरंभ अन श्रावण वाचायचं धाडस असेल तर खाली बघा| RELATED STORIES

श्रावण आरंभ

 

फिरती

श्रावणमास

 

दशेरी हत्याकांड!

दशेरी हत्याकांड!

मराठी विनोदी कथा || मराठी साहित्य  || Marathi Story  ||  हास्य  || नवरा-बायको 

जगाच्या प्रत्येक कोपर्याीत देवा-धर्माच्या-परंपरेच्या-संस्कृतीच्या अन अशा अनेक कारणांमुळे अनेकांची हत्याकांड, छळवणूक, अत्याचार वगैरे झाल्याचे अनेक उदाहरणे जगात उपलब्ध आहेतच. तसं पाहायला गेलं तर भारतातही अशा घटनांची काही कमी नाही. हत्या,हिंसा,अत्याचार वगैरे खूप वाईट गोष्ट. मी तर अशा गोष्टींपासून लांबच राहत असतो. खेडेगावात अजूनही शाळेतील मास्तर विद्यार्थ्यांना तुडव तुडवतात हे ऐकूनही मला घाम फुटतो. मी तसा अहिंसक मनुष्य आहे… अर्थात, येथे गांधी विचारसरणी वगैरेचा काही संबंध नाही… स्वभाव एकंदरीतच घाबरट असल्याने नाईलाजाने मी अहिंसक झालो आहे… कधी कुठे रस्त्यावर मारहाण बघितली तरी ‘सोडव रे त्यांना’ अशी प्रार्थना करून मी गपचूप मार्ग बदलून मार्गक्रमण करत असतो… मला आठवल्याप्रमाणे मी एकदा एमएसईबी च्या लोकांशी भांडल्याचं मला आठवतं; पण त्यानंतर तीन दिवस बिनपंख्याचे, रात्री बिनलाइट विथ मच्छर उपभोगल्याचे कष्ट पडले होते; शिवाय त्या कार्यालयाच्या चकरा-चकरा-नखरा-नखरा बघून माझा गपचूप ‘शांत’राम झाला होता… ती शेवटची दाखवलेली आक्रमकता असावी… घरी तर अहिंसेशिवाय कुठलाही पर्याय नसतो… कोण कितीही मोठा मनुष्य असो, त्याला घरी अहिंसक मार्गानेच राहावे लागते अन्यथा लादलेल्या उपोषणाचे चटके नशिबी असतात…

हे पहा असं विषयांतर होतं… छे! तर मी सांगत होतो एका हत्याकांडाबद्धल… आपल्याकडे नवस फेडताना, बकरी-ईद ला वगैरे प्राणी मारण्याचे प्रकार सर्रास होत असतात… छे… वाईट… बिचारे मुकप्राणी… पण त्यांना नावे ठेवावी अशी नैतिकता माझ्याकडे शिल्लक नाही राहिली… का?तर झालं असं की,दसरा काही दिवसांवर येऊन ठेपला होता… आम्ही आपले सकाळी-सकाळी उत्तेजक द्रव्य अर्थात चहा घेत आमच्या दिवाणखान्यात बसलो होतो… वृत्तपत्रातील जगभरातील घडामोडी एक-एका घोटासोबत संपवत होतो तितक्यात घरातून अणुबॉम्ब फुटावे ऐसे आवाज… आम्ही हारदलो, घारबलो. टकरलो… तुम्हाला वाटत असेल येथे छपाई चूक झाली असेल… तसं नाही ते…. तो क्षण आठवून आम्ही अजूनही घारबलो आहोत… तर अशा आवाजानंतर आमच्या हातातील वृत्तपत्र जमिनीवर पडले, चहाचे पात्र (रिते झालेले) जमिनीचा मुका घेऊन लागले… आम्ही ताडकन उठलो अन धावतच घरात शिरलो… काय झाले असेल याची कल्पनाच नव्हती मुळी… आम्हाला तर क्षणभर वाटले की आमच्या वर (टुकार विनोद नको) राहणार्या. अन आकाराने अवजड असणार्या डांबरे काकू छताच्या छातीतून आमच्या घरात धूमकेतूसारख्या कोसळल्या की काय??? छे.. छे… ही तर अघोरी कल्पना होती… आम्ही घरात पोचताच ते भय असत्य असल्याचे जाणून हायसे वाटणार तितक्यात आमच्या नजरेस ते दृश्य पडले जे बघून मघाचे भय क्षुल्लक वाटू लागले… कोणते दृश्य??? ते दृश्य जे बघून तमाम नवरे मंडळी घारबतात ते… आपल्या पत्नीचे दुर्गारूप!!!! हे प्रभो!!! कमरेवर हात ठेवलेल्या, केसं पिंजरलेल्या साक्षात आमच्या सौ उजव्या हातात कुंचा घेऊन (आता हात कमरेवर होते अशी शंका काढू नका… हात कमरेवर ठेऊन त्या हातात कुंचा कसा पकडला जातो याचं प्रात्यक्षिक आप-आपल्या सौ बरोबर करावी ही विनम्र विनंती विशेष!) लालबुंद डोळ्याने, फसफसणार्याल नाकाने आमच्याकडे बघत होती!!! समजलो… आमच्या मयताचा दाखला काढायची जबाबदारी कोणावर तर लवकरच येणार!!!! खर्यान कालीमातेला बघून महिषासुर जितका घाबरला नसावा तितका मी आत्ता घारबलो होतो… हे दृश्य बघून कोणत्याही पत्नीव्रता पतीची तीच अवस्था होईल…

बघता बघता सुरू झाली एकतर्फी चकमक… आम्ही तर सुरुवातीलाच पांढरा झेंडा वर केला… आमच्या सौ म्हणू लागल्या, घर काही माझ्या एकटीचं आहे का?? दोन दिवस झाले राब-राब राबतीय… आज सकाळपासून पाण्याचा थेंब नाही घश्यात अन तुम्ही चहाचा एक-एक घोट घश्याखाली ढकलत पेपर वाचत बसताय… आम्ही मघाशी फुटलेल्या चहाच्या पात्राकडे हळूच दृष्टिक्षेप टाकला… खजील होऊन शांतपणे मान घातली… सौ चिडलेल्या होत्याच… इथे अख्खं स्वयपाकघर आवरायचं आहे… मला एकटीला झेपेल का याचा साधा विचार तरी केला का? (मला प्रश्न विचारल्याने थोडसं समाधान) का मजुरासारखं राबायचं मी? (पुन्हा उत्तराची अपेक्षा नसलेला प्रश्न) हे विचारणे झाल्यावर आमच्या सौ धाडकण बाजूला सरकल्या… आम्ही घाबरलो… सौ ने ओट्यावर असलेले सर्व (शिल्लक असलेले) भांडे जमिनीवर ढलकले आपलं ढकलले… पुन्हा अनुविस्फोट व्हावा तैसा आवाज… आम्ही तर साफ हबकलो… आज घर शिल्लक राहतं की नाही असा निरागस सवाल एक क्षण आमच्या मनात डोकावतो न डोकावतो तितक्यात एक भांडे आमच्या दिशेने आलेले आमच्या तीक्ष्ण नजरेने पाहिले अन तितक्याच गतीने आमच्या चलाख मेंदूने खाली वाकायची आज्ञा आमच्या शरीरास सोडली अन आमच्या चपळ शरीराने ती तातडीने अमलात आणली म्हणून आज आम्ही तुमच्याशी संवाद साधायच्या स्थितीत आहोत, अन्यथा…. हे प्रभो!!!

आम्हाला जमिनीवर लुडकलेले पाहून आमच्या सौ विजयी आवेशात जोरजोरात ओरडू लागल्या… रणचंडीचा जल्लोष तो… बोलण्यात काय काय विषय आले असतील याची जाण तमाम अखिल भारतीय पत्नीव्रता संघटनेच्या सदस्य असलेल्या पतींना असेलच… अशा झगड्याचा विषय काहीही असला तरी आशय एकच असतो… पतीने सपशेल माघार घ्यावी!!! आणि आम्ही ती घेतली… पर्याय तो काय होता??? सांगेल कोण??? तुम्ही काय सांगणार… घरी आल्यावर आपल्या ऑफिसमधील पराक्रमाचे किस्से अन ऑफिस मध्ये गेल्यावर आपल्या घरच्या पराक्रमाचे किस्से सांगणारे लोक तुम्ही (आपण)… शेवटी प्रत्येक पुरुषास घरी आल्यावर, आपण कामाच्या ठिकाणी किती वाघ आहोत आणि कामाच्या ठिकाणी, आपण घरी किती वाघ आहोत हे खोटी उदाहरणे देऊन जगावेच लागते… याला जीवन ऐसे नाव!

अर्ध्या-एक तासाच्या एकतर्फी चकमकीनंतर वाद संपून त्यावर विस्तृत पर्याय शोधला गेला होता… आम्ही आमच्या सौ ची कशी-बशी (मघाशी फुटलेली नव्हे!) समजूत काढली अन आज सर्व काम खुद्द आम्ही करणार अन दोन दिवस बाहेरचे जिन्नस जेवायला आणणार अशा आश्वासनांनंतर आमच्या सौ च्या अंगात आलेली काली माता शांत झाली… मग काय, आमच्या सौ च्या हातात असलेला कुंचा आम्ही दुरूनच आमच्या हाती घेतला अन मोहिमेस सुरुवात केली… आमच्या अन आमच्या सौ मधील तुंबळ खडाजंगी चालू असताना डांबरे काकू आमच्या दरवाज्याच्या बाहेर येऊन उभ्या होत्या हे आमच्या नजरेतून सुटले नाही… शेवटी परराज्यातील गुप्तहेर ते… आता ही बातमी वाढत्या वर्णनासह गल्लीत कशी पोचली हा प्रश्न आम्हाला सतावणार नव्हता…

७१ आकाराने मोठ्या अन शरीराने बारीक असलेल्या कोळ्या, २३ शरीराने जाड अन आकाराने लहान असलेल्या कोळ्या, त्यांची असंख्य अंडी, कोपर्‍या-कोपर्या त बांधलेले त्यांचे अनधिकृत घरे, चार मोठ्या अन आठ छोट्या (हम दो, हमारे चार) पालींना हुसकावून लावले, तीन उंदरे घराबाहेर काढली,असंख्य अनोळखी किड्यांची निर्घुन हत्या… अशा पराक्रमानंतर आमची मोहीम संपली!!!! आमच्या सौ समोर सपशेल शरणागती स्वीकारल्यावर आलेल्या संतापाला वाट अशा रीतीने मिळाली.आमच्या सौ समोर भलेही डरपोक असलो तरी भल्या-भल्यांना आडवं करायची धमक आहे म्हणावं आमच्यात, नव्हे त्याची चुणूक ह्या अजाणांनी पाहिलीच असेल!!!

महाराजांच्या काळात एक प्रथा होती, पराक्रमाचे कौतुक करायची. एखाद्या मावळ्याने, सरदाराने एक हजार पेक्षा जास्त शत्रू मारीले तर त्या मर्दाच्या तलवारीवर चांदीचे किंवा सोन्याचे डाग लावायचे… आज जर कोण दिलदार माणूस असता तर त्याने माझ्या हातातील झाडूवर अन सुपावर घरभर भ्रमंती करणारा केसाचा गुंता बांधला असता… अर्थात आमची रणमर्दुंगी होतीच तशी…

आमच्या सौ कडून बोलणी खात असताना त्या नादान पाली मघाशी कोपर्यासत बसून मजा पाहत होत्या… आम्ही काय सोडणार होतो त्यांना… एकेकाची फे फे नाही उडवली तर नाव बदलून ठेवा म्हणावं… खरं तर त्यांचा वध करायचीच इच्छा होती, पण ती घाण आम्हालाच काढावी लागेल केवळ एवढ्या भीतीपाई थोडेसे निवळलो आम्ही… अन्यथा आम्हीही मराठी मातीतील मर्द मावळे आहोत हे का सांगायची गोष्ट आहे… आयुष्यभर अहिंसेच्या मार्गाने चालत आलो म्हणून काय कोणीही केलेली थट्टा सहन करू की काय…. Spidermanच्या सग्या-सोयर्यां नी तर बातच करू नये… त्यांना तर खिजगिनतीत धरतच नाही आम्ही… नाही म्हणायला उंदरांनी त्रास दिला आम्हाला… त्यांना बेदखल करायच्या नादात आमच्या सौ च्या माहेरून आलेला एक काचेची डिश फुटली, आमच्या सौ धावत स्वयपाकघरात आल्या, त्यांची मुद्रा बघून आम्ही घाबरलो पण त्यांचा पारा चढायच्या आत त्यांना अन त्यांच्या माहेरी नवीन वस्तू घेण्याचे आश्वासन देऊन आम्ही त्यांचा राग कमी केला. त्यांनीच विचार केला असावा, खड्ड्यात असणार्या्च्या अंगावर माती कशाला टाकायची…? पण पुढील आयुष्यात एक टोमणा कायम माथी चिटकून राहील यात वाद नव्हता,‘माझ्या माहेरून आणलेली डिश जाणूनबुजून फोडून टाकली…’

असो… आमचा अख्खा दिवस ह्या हत्याकांडात गेला… दसरा तसा पवित्र सण, पण ह्या निमित्ताने अनेक निष्पापांचे जीव गेल्याचं शल्य मनाला टोचत होतं… आम्ही असे पापभीरू, गरीब, बिचारे, अहिंसक, विनम्र, मितभाषी, निस्वार्थी व्यक्ति… आयुष्यात पहिल्यांदाच इतकी हिंसा केली… छे… ती रात्र झोप नावाची गोष्ट नव्हती… अंग दुखत होतं तो भाग वेगळा, पण त्या बिचार्या. आत्म्यांचे आवाज आमच्या कानात घुमटात घुमावे तसे घुमत होते, त्यांच्या लेकरा-बाळाचे, नातेवाईकांचे रडके चेहरे वारंवार डोळ्यासमोर येत होते, बेघर केलेल्यांचे रस्त्याच्या कडेला उघडे असणारे संसार मनाला टोचत होते… हे प्रभो!!! आमच्या हातून मोठे पातक घडले; पण आमचा नाईलाज होता… सौ इच्छेपुढे कधी कोणाचे का चालले? हे दशेरी हत्याकांड घडले याचा खेद वाटतो अन हे पुन्हा आमच्या हातून न घडो यासाठी पुढच्या वेळेसपासून चहा-वृत्तपत्र यांची एकत्रित संगत सोडायचा प्रयत्न करू असेही ठरवले आहे…!

टीप:- सौ ची समजूत काढताना, नवे भांडे घेण्यास, नवी केरसुणी घेण्यास, नंतर आमच्या आजारपणावर बराच खर्च आला… इतरांनी तशी तरतूद करावी!!!

नमस्कार!!

लोभ असावा!!!

-*-*-*-*-*-समाप्त-*-*-*-*-*-

सर्व हक्क सुरक्षित @ latenightedition.in

अभिषेक बुचके लिखित “मराठी कथा” e-book मधून संग्रहीत.

एक रात्र गाजवलेली…

वेलांटी डे

वेलांटी डे

विनोदी कथा   ||  हास्य कथा    ||   मराठी कथा    ||  गावाकडली प्यारवाली  Love Story  ||  

स्थळ – गुलाब पार्क

पात्र अर्थात character – आपला हीरो नंदू आणि त्याची हेरोईन नीतू

दिवस – प्रियकरांचा आवडता: valentine day

वेळ – धोक्याची

जागा – मोक्याची

संध्याकाळच्या वेळी नीतू बराच वेळ वाट बघत बसलेली असते (खुलासा: नंद्या आला नाही म्हणून खरोखरच ती खड्डे पडलेल्या वाटेकडे बघत असते) आणि बर्‍याच वेळाने घाम पुसत नंद्या येतो एकदाचा…

नीतू (थोडीशी रागात अन नखरे करत) – आप यहाँ आए किसलीये…?

नंदू (थोडासा गोंधळून) – आपणे बुलाया इसलीए…

नीतू (थोडा राग कमी) – आए है तो काम भी बताइये…?

नंदू (गाणं म्हणत आहे हे लक्षात आल्याने थोडा लाडात येत) – पेहले आप थोडा मुस्कूराइये…

नीतू (आता राग कमी आणि लाड जास्त) – हे काय नंद्या तू आजबी लई उशिरा आलास…?

नंदू – काय करू राणी सॉरी कर मला… म्या लवकर निगालतो गं, पर तिकडं cultural लोक वाट अडवून उभी ठाकली हुती…

नीतू – तू कशाला ‘कचरल’ (अर्थात cultural) लोकांशी नादी लागतो…?

नंदू (हसत) – हे..हे… कचरल नाही गं बाय, cultural असतं ते… ते म्हणजे सांकृतिक रक्षक गं…

नीतू – म्हणजे रे काय बाबा…?

नंदू – अगं… म्हागल्या वेलांटी दिनाला (अर्थात Valentine day… गावाकडं याला वेलांटी दिन म्हंत्यात; कारण एका पिच्चर मदि ह्या दिवशी प्रियकर (दुकान) आणि प्रेयसी (सामान) एकमेकांला वेलांटी घालून बसलेले दाखीवलं व्हुतं तवापासनं गावकडल्या लोकांनी valentine day ला वेलांटी दिन म्हंत्यात… कळलं का भाऊ?) आपला बाळू आन बबीता बसले हुते नं हिथच पिरेम करत… तवा न्हाईका ते परशुरामभौ आनं त्याचे टाळभैरव टोळकं आले हुते आणि पुना मंग पंचाइति म्होरं त्यांना डोरलं बांदून जन्माचं न्हाई का बांदून टाकलं… म्हंजी लगीन लौन दिलं हुतं की त्यांचं…

नीतू (लाजत) – जन्माचं न्हाय.. साता जन्माचं…

नंद्या (भयंकर कल्पनेची व्याप्ती कळल्याने, जरासा घाबरून) – होय… तेच ते…

नीतू (गोंधळून) – आर त्याचं काय मंग…?

नंदू – अगं खुळी म्हणू की काय तुला…

नीतू (लाडाने नाराज होणे) – ए नंद्या…

नंदू – अगं तसं नव्ह… परशुरामभौ सारख्या लोकास्नीच तिकडं मोठ्या शरात म्हंजी पुण्या-मुंबेला cultural protector का काय ते म्हंत्यात…

नीतू (लाड वाढला) – म्हायते लय शाना हाइस… अन तुला कोण सांगितलं समदं…?

नंदू (इकडे-तिकडे बघत) – अग्ग कोणाला काय म्हणू नगस, न्हायतर तोंड उचकटशील कुटतार जाऊन…

नीतू (चिडून) – हो तेवडच काम हाय मला…?

नंदू – माहिती न किती कौतिकाचं हाय आमचं पाखरू… मागल्या येळला तुझ्यासाठी चोरून त्या भीम्याच्या रानावरनं कैरी-चिंचा आणून दिल्या तर गावभर बोंबलात उडाईली होतीस की…?

नीतू (चिडणं संपलं. आता पुन्हा लाजत) – तुझंच कौतिक सांगत हुते की रं मी…

नंदू (चिडून) – ह्या येळेला कौतिक नगं बरं आमाला…

नीतू – बर राहीलं… म्होरं बोल…

नंदू (बारीक आवाजात) – मला बाळूनंच सांगितलं…

नीतू (जोरात) – काय बाळूनंच…

नंदू – सांग वरडुन सार्‍या गावाला… आईला… अगं त्याच्यासोबत तसं झालं नं तवापासनं त्येनं ह्या ईषयावर लई म्हंजी लई अभ्यास केला तिकडं शरात जाऊन… अन आता तिकडं कुठलीतरी संघटना चालीवतो हाय… आपल्यासारख्या पिरमात अडल्या-नडल्या तरुणांसाठी…

नीतू – खरंच…?

नंदू (हसत) – आगं ते जाऊदे चिमणे… मी बघ तुझ्यासाठी काय आणलं हाय तुझ्यासाठी पेशल घरच्या पास्न लपावून… आ…

नीतू (खुशीत) – माझ्यासाठी… दाखीव ना लवकर…

नंदू (शर्टातून पिशवी काढतो) – ह्ये बघ… गुलाबाचं फूल माझ्या फूलपाखरासाठी आणि ह्ये चॉक्लेट…

नीतू (अतिउत्साह) – ह्ये माझ्यासाठी आणलंस तू नंद्या…?

नंदू (रागानं) – न्हाय, तुझ्या त्या रेड्यागत बा साठी…

नीतू (लाडाने रडत) – नंद्या…

नंदू – रडू नको बाय… तुझ्यासाठीच आणलाव ना…. मंग…

नीतू – लय भारी नंद्या… माझं तुझ्यावर लय पिरेम हाय…

नंदू (मनात: हे गिफ्ट दिल्यावर आठवलं व्हय?) – मंग… लग्नाचं जांगड घालती का माझ्यासांग…?

नीतू – अर्र… पर माझा बा… त्यो न्हाय ऐकायचा… तुला उलटा टांगल, रेड्यावर बसवून फिरवल अन नंतर गावची कुत्री मागं लावल…

नंदू (ह्या कल्पनेने आधी घाबरून जातो अन नंतर छाती फुगवून म्हणतो) – त..न…प… तू कशाला घोर लौन घेती जीवाला… म्या हाय नव्ह… बर हे चोक्लेट खल्यावर काय करत्यात माहिती हाय का…?

नीतू (अजाण पोरगी) – नाय… काय करत्यात…?

नंदू – अग्ग… ओठावरली साखर घेत्यात…

नीतू (लाजेने चूर होत) – चल… चावळट कुटचा… मागं उसातली साखर दावतो म्हणून उसात नेलास अन साखर पेरलास… आगाव… दुसरं काही सुचतच न्हाई तुला…

(आधी नीतू थोडी लाजते अन नंतर तीही तयार होते… वेलांटी पडते… ओठावरची साखर घेतल्यावर काही वेळाने नंदू खिशातला फोन काढतो अन ओरडतो)

नंदू – परशुरामभौ ओ परशुरामभौ… या आता इकडं…

(पाच मिनिटात परशुरामभौ येतात… आसपास थांबलेले असावेत…)

नीतू – हे काय नंद्या…

नंदू – अग्ग… घाबरू नगस… म्याच बुलीवलं हाय त्येसणी… आता परशुरामभौ आपल्याला पकडून पंचायती समोर पेस करतील… आपलं लफडं हाय ते सांगतील… घरचे बी हांतील दोन-दोन दोघास्नीबी… आन नंतर… देतील की आपलं लगीन लौन… तुझं माझ्यासंगती जांगड हाय हे समजल्यावर तुला कोण नवरा देईल… तुझ्या बा समोर मीच तेवडा इलाज… मीच संकटमोचक… मनाविरुद्ध का हूईना, त्याला आपलं लगीन लौन द्यावच लागल बग… कस्स…

नीतू (सगळं डोक्यात घुसल्यावर) – लय पोचलेला निगालास रं तू…

नंद्या – प्रेमासाठी एवडं करावाच लागतं चिमणे… प्रेमात समदं माफ असतं…

परशुरामभौ (हात पुढे करून, मोठ्या विश्वासाने) – हं.. बस करा… आता घाबरायचं न्हाय पोरान्नू… औ… मी म्हंटलं म्हंजी तुझा बा काय त्याचा बा बी आडवा न्हाय याचा… आन संस्कृती रक्षण करतानी तुमचं लगीन लौन दिलं की आमचे पक्षातले साहेब बी माझ्यावर लई खुस होतील… आमच्या कारकिर्दीत आणखीन एक मानाचा तूरा… आजपत्तूर त्या बामणापेक्षा चार लगीन जास्तीची जमीवलीत मी… चला माझ्या संगतीनं… त्या बाळू आणि बबीतागत तुमचा बी बार उडवितो किनाय बगा… घरच्या म्हातार्‍याना सांगा, नुक्ती घ्या म्हणावं वळायला… असाबी उद्याचा मुहुरत लय ब्येस हाय, येतानाच पचांग इचारून आलाव… चला बिगि बिगि…

-*-*-*-समाप्त-*-*-*-

सर्व हक्क सुरक्षित @ latenightedition.in  ||  @Late_Night1991

अभिषेक बुचके लिखित “मराठी कथा” e-book मधून…

दशेरी हत्याकांड!

PROMOTIONS
error: Content is protected !!