Tag: Philosophy

मार्गस्थ – प्रवास

मार्गस्थ – प्रवास

प्रवास  ||  आत्मभान  ||  विरक्ती   ||  भटकंती  ||  लेख  ||  मराठी कथा  ||

सुट्टीचा दिवस असल्याने सकाळी आरामात पेपर वाचत बसलो असताना फोन वाजला. जब्याचा फोन होता.

“आज फिरून येऊ कुठेतरी, तयार हो! मी येतोय!” फोन कट!

पाऊस वगैरे बरा झाला असल्याने दर्‍या–खोर्‍यात, राना-वनात निसर्गसौंदर्यने किमया केली होती. भटकंतीसाठी, फिरण्यासाठी (म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात वगैरे) चांगलं चैतन्यमयी वातावरण होतं. पण स्वतःच्या तंद्रीत राहणार्‍या आळशी माणसाला याचं काही नसतं. उगाच कवीसारखा उत्साह वगैरे संचारत नाही.

आधीच डोकं भनभनू लागलं होतं. आज सुट्टी आहे म्हणून काल रात्री चित्रपट बघत बराच वेळ जागरण झालं होतं. आज निवांत उठूयात अन टाइमपास करत बसू असा विचार होता. पण जब्या ऐकणार (जमलंच तर ऐकवणारा) नव्हता हे माहीत असल्याने हातातला पेपर आपटून मी लवकर आवरून घेतलं.

तासाभरात जब्या, जीवन अन अमर आले. म्हणजे मोहिमेवर निघण्यासाठी सैन्यच जमा झालं होतं. ते जीवन अन अमर मला नाक्यावर उभे दिहाडी मजूरच वाटतात, जे खांद्यावर फावडे, कुदळ घेऊन तयारच असतात. चल म्हंटलं की कसलाही विचार न करता पाठीमागे चालू लागतात. हे दोघेही तसेच! चल फिरायला म्हंटलं की निघाले तोंड वर करून. कुठे? काय? कसं? असले फालतू प्रश्न त्यांना कधी पडत नाहीत.

गाडी वगैरे काढली. सारथी मीच होतो. नको वाटत असताना निघालो. साधारणपणे 100 किमीवरील एका पर्यटनस्थळावर जायचं होतं. अवकाळी पाऊस पडावा तसे दौरे ठरतात साला. अचानक!!!

गाडी जरा गावाबाहेर आल्यावर मलाही उत्साह वगैरे आला. हिरव्यागार झाडींमध्ये काळेशार घाटवळणी रस्ते बघितल्यावर उत्साह येणार नाही तरच नवल. त्यात पावसाची रिपरिप सुरू झाली होती. गाडीच्या काचेवर फिरणार्‍या वायपरचा लयबद्ध आवाज अन हालचाल भारी वाटत होती. समोरून वेगाने येणारा बस-ट्रकच्या मोठ्या टायरमुळे बाजूला उडणारा चिखल, पाणी यामुळे ती लय बिघडल्यासारखी वाटायची.

अगदी सुखावणारा प्रवास!

प्रवासात कितीही खडतर, दूरचा असला तरी “अध्यात्मिक” गप्पा मारणारे मित्र सोबतीला असतील तर तो प्रवास कंटाळवाणा होतच नाही. हा नियम सगळ्याच प्रकारच्या प्रवासाला लागू होतो.

पंजाबी ते तामिळ गाणे वाजवत प्रवास सुरू होता. अपरिचित भाषेतील गाणे ऐकून त्यावर मजा करणे ही जुनीच खोड. त्यातील एखादा शब्द शोधून त्याचा पार अफजलखान करण्यात वेगळीच मजा!. अशीच मजा-मस्ती वगैरे करत ठरलेल्या ठिकाणी पोचलो. तिथे पर्यटकांची झुंबड होती. तूफान गर्दी! मनातल्या मनात मी जब्याची उधळली. इथे येऊन पण आता माणसेच पहायची तर! Successfully wasted your ‘holy’day मेंदूने मेसेज दिला।

माणूस भटकंतीसाठी गर्दीतून गर्दीकडे जातो अन फोटोंची अन विचारांची गर्दी घेऊन परततो. हेच पर्यटन! (हे वाक्य ट्विट करायला भारी आहे असं वाटतं.)

इतकी गर्दी बघून मूड गेला होता. त्यात अर्ध्या चड्डीवर येणारे पुरुष बघितल्यावर तर उत्साह ढगांआड जाऊन लपयाचा. तसं वातावरण धुंद, मस्त असल्याने नैराश्य लवकरच निघून गेलं.

पाऊस-पाणी होतं, समोर हे-ते होतं. बरेच फिरलो, दमलो, फोटो काढले, खाल्लं (आम्ही पीत नाही) वगैरे अन परत निघालो.

पार्टीचा म्हणजेच परतीचा प्रवास!

दुपार वगैरे उलटून गेली होती. दिवसभरात एकदाही फोन वाजला नाही याचं मोठं कौतुक वाटलं मला. त्यात पोट, मन, नेत्र सुखावले होते. आज सुख लाभलं. चांगलं वाटत होतं. प्रसन्न वाटत होतं. एकट्याला कोंडून घेऊन काही होत नाही, मिसळावं लागतं, सर्वांसारख राहावं लागतं असं सांगतात ते खरं असावं. माणसात राहिलं म्हणजे जरा माणसाळलेपण येतं. बंद दरवाजे-खिडक्या उघडल्यावर घरात प्रकाश पडावा तसं.

टाईमपास करत परतीच्या वाटेवरचा प्रवास सुरू होता. अर्धी वाट संपली होती. गाडी चालवत असताना हिरव्या झाडांच्या गर्दीतून त्या मंदिराचा कळस दिसू लागला. सकाळचं मंदिर परत दिसलं. सकाळी ह्या रस्त्यावरून जात असताना झाडीतून एका मंदिराचा कळस दिसला होता. तेंव्हाच ते मंदिर बघावं वाटत होतं पण उशीर होईल म्हणून त्यावेळेस थांबलो नाही. आता थांबावसं वाटलं.

मंदिर रस्त्यापासून थोडंस आत होतं. आजूबाजूला गर्द झाडी होती. मंदीरापर्यन्त कच्ची सडक जात होती.

आम्ही मंदीरापर्यन्त जाऊन पोचलो. सगळेजण गाडीतून उतरलो.

अगदी छोटंसं मंदिर होतं. काळ्या ढगांतून चंद्र डोकावून पहावा तसं ते मंदिर हिरव्यागार, डेरेदार झाडांच्या कुशीतून डोकावत असल्याचा भास होत होता. त्यात पावसाची भुरभुरी चालूच होती.

केवळ अप्रतिम! विलोभनीय! सुरेख! अवर्णणीय!

जे दृश्य दिसलं ते विहंगम होतं. पावसाच्या भुरभुरीत, हिरव्या झाडांच्या गर्दीत, जुनं, काळ्या दगडांचं बनवलेलं ते मंदिर! अव्वल चित्रकाराने रेखाटलेलं सुंदर चित्र बघावं असं वाटत होतं.

काही क्षण तिथेच अडखळलो. ते दृश्य डोळ्यांत, मनात साठवून घेत होतो. पाऊले सावकाशपणे, अगदी स्वेछेने मंदिराच्या दिशेने पडू लागली. मंदिराच्या आतमध्ये दिवसाही अंधार वाटत होता. एक पांढरा बल्ब कुठेतरी लावला होता ज्याचा मंद प्रकाश पसरला होता. मंदिराच्या एका खांबाला टेकून एक तरुण आपल्या लहानग्या मुलीसोबत खेळत बसला होता. आम्ही येताच तो गडबडीने जागेवरून उठला. मुलीला पलीकडे बसलेल्या एका स्त्रीकडे दिलं अन आमच्याकडे येऊ लागला. कधीकाळी पांढरं असलेलं बनियन अन खाली दाक्षिणात्य पध्दतीने गुंडाळलेली लुंगी. तो तिथला पुजारी असावा. त्याने आम्हाला नम्रपणे नमस्कार केला. इतक्या आदराची खरंच सवय नव्हती. मग आम्हाला गाभाऱ्यापर्यन्त नेलं. अतिशय सुंदर मूर्ती होती. मंदिर जुनं होतं पण मूर्ती नवी वाटत होती. आम्ही त्याबाबत कसलीच विचारणा केली नाही. आमच्यातील इतिहासप्रेमी किंवा संशोधक वगैरे जागा झाला नाही.

त्या शांत गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर विश्वाच्या एका वेगळ्याच, अज्ञात भागात आल्यासारखं वाटत होतं. अत्यंत गूढ असं काहीतरी. आईच्या पोटात, गर्भाशयात असतो तेथेही असच वाटत असेल का? तेंव्हा जाणिवा नसायच्या, त्या आत्ताही उरल्या नव्हत्या. तिथे फक्त श्वास चालू असतो तसंच अगदी!

ती निश्चल अवस्था भंग पावली. त्या पुजाऱ्याने पुढे येऊन आम्हाला प्रसाद म्हणून खडीसाखर दिली अन अपेक्षेने आमच्याकडे बघू लागला. त्याच्यासमोर पैशांची, म्हणजेच दक्षिणेची थाळी होती. आम्ही पैसे टाकावेत असं अपेक्षित होतं. तसं देवाच्या दानपेटीत कधी काही टाकत नाही, पण आज टाकावं वाटलं.

तो पुजारी माझ्याच वयाचा (म्हणजे तरुणच बरका) असावा. मनात कसंतरीच झालं. आम्ही आलं की तो दहा वीस रुपयांच्या अपेक्षेने त्या दक्षिणेच्या ताटावर येऊन बसला होता. बेक्कार! त्याचा तो गरीब चेहरा अन आत्ताची त्याची कृती बघून मनात कालवाकालव झाली. जगण्याच्या संघर्षात काहीही करावं लागतं. तो शिकला नाही हा त्याचा दोष होता की भिक्षुकी करून पोट भरणे हे त्याचं प्राक्तन??? विचारी मेंदूने त्रास द्यायला सुरुवात केली होती. आपण त्या मानाने खूप सुखी आहोत असं वाटलं! त्याचा विचार डोक्यातून काढून टाकावा असं वाटलं. नाहीतर सगळं पर्यटन वाया गेलं असतं.

मंदिर अप्रतिम आहे. खूप शांत. एकांत अनुभवता येईल असं. कोणी जर विचारलं तर त्याला सांगू नये असं. कारण आता ह्या जागेवर, ह्या एकांतावर, इथल्या गुढतेवर माझा हक्क आहे असा स्वार्थी विचार मनात कायमचा स्थिर झाला. लोकांनी इथे येऊन सगळी माती करू नये असं वाटत होतं. ही मानवजात नकोच कुठे!

त्या परिसरात कसल्याच बाह्य अस्तित्वाची जाणीव होत नव्हती. ते स्वतंत्र विश्व होतं. मंदिराच्या आवारातून इकडून-तिकडे वाहणारं वारं स्तब्ध करून टाकायचा. चेहर्‍यावर होणारे वार्‍याचे ते गारेगार स्पर्श आयुष्यातील सर्व वेदनेवर फुंकर मारल्याप्रमाणे वाटायचे.

हात मोबाईलकडे वळला. फोटो काढुयात असं वाटलं पण मग नकोही वाटलं. इतर मित्र फोटो काढत होते. मी ती स्थिर अवस्था शोषून घेत होतो. मनातील कुठली तार हलल्या गेली माहीत नाही, पण मला अचानक उचमळून आलं. पुन्हा पूर्वीचा विरक्ती विचार (लोक त्याला आजार म्हणतात) डोक्यात आला. अगदी अचानकच!!! थोडीशी भीती वाटली अन मी तिथेच पायर्‍यावर बसलो.

मोठे श्वास घेतल्यावर जरा हलकं वाटलं. स्वतःला परत Restart केलं.

अमर्‍या मोबाईल सोबत स्वतःही खाली-वर होऊन फोटो काढत होता. एखादा बहादुर सेनापती उभ्या उभ्या नुसताच तलवार फिरवतो तसा अमर्‍या चौफेर DSLR उडवत होता.

आपण फोटो का काढतो? आठवण रहावी म्हणून? का स्वतःला आवडतं म्हणून? पण ते फोटो आपल्या नाही तर कॉम्प्युटरच्या किंवा मोबाइलच्या मेमरीतच राहतात. असे 50 Gb चे फोटो आठवणीच्या लेबलखाली जागा अडवून बसलेत. ते ‘आठवणींचे फोल्डर’ आपण नंतर कधी उघडून बघतो का? शक्यतो नाही. कधी त्या आठवणी जाग्या केल्या? नाही. मग कशाला हा अट्टहास? सगळं जवळ ठेवण्याचा, जपून ठेवण्याचा स्वार्थ?

हे फोटो काढून जपून ठेवणं कधी-कधी नको वाटतं. आपण फोटो काढणार; आपल्या अनेक फोटोंच्या गर्दीतील तो एक बनून राहणार; मग ‘केंव्हाही बघता येईल’ असं मनाला सांगून आपण त्या फोटोकडे कधी बघणारही नाही. त्यापेक्षा हे दृश्य एखाद्या चित्राप्रमाणे मनात साठवून ठेवावं. हवय तेंव्हा ते स्मृतीमधून बाहेर काढता यावं. कॅमेरात बंदिस्त केल्यापेक्षा मनात त्याला कायमचं बंदिस्त करण्याचा निर्णय झाला. फोटोत ते स्थिर असतं, पण मनात साठवून ठेवलं तर ते तरल ठरतं. त्याला मनाप्रमाणे रंगवता येतं. आपल्याला हवेत तसे रंग भरता येतात.

कुठे कुठे देवाचे फोटो काढायला बंदी असते. ते मला तेंव्हा पटलं. देवाचे वगैरे फोटो घेऊन करणार काय? फार तर मोबाईलमध्ये ठेऊन रोज दर्शन घेऊ. पण समजा, ती मूर्ती मी मनापासून बघितली अन कायम स्मरणात ठेवली तर? फोटो वगैरे काही नको. कारण एखादी गोष्ट आपण स्मरणात ठेवतो तेंव्हा त्याची आठवण केल्यावर आपल्याला ती प्रतिमा दिसते. आता हे मंदिर अन ती मूर्ती मला कधीही आठवतील. आपण रोज आई वडील भाऊ बहीण यांचे चेहरे बघतो. पण कधी विचार करतो का की त्यांच्या मनात काय चालू आहे. बघण्यात आणि जाणून घेण्यात फरक असतो. देवासमोर डोळे झाकून हात का जोडतो? कारण तो आपल्या आतमध्ये कुठेतरी असतो. त्याला शोधता आलं पाहिजे. ती मूर्ति केवळ आरसा असतो.

बराच वेळ तेथे रमलो अन निघायची वेळ झाली. सगळं चित्र मनामध्ये रेखाटून ठेवलं होतं. परत एकदा दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो.

मंदिराच्या बाहेर, बदामाच्या झाडाखाली एक आजोबा बसलेले दिसले. त्यांच्याजवळ भगवा झेंडा होता तरीही ते कट्टर हिंदुत्ववादी वगैरे वाटत नव्हते. आपली शबनम उघडून ते बसले होते. त्यांनी आम्हाला लांबूनच राम-राम केला. अमर्‍या (साला दिहाडी मजूर) लागलीच त्यांच्या जवळ गेला.

मला जे नको वाटत होतं तेच झालं.

आम्ही आजोबांजवळ गेलो. आधी काय-कुठले वगैरे बोलणं झालं. मग आजोबांनी आपली कथा (व्यथा) सांगायला सुरुवात केली. त्यांच्याकडे दुरून बघितलं तेंव्हाच लक्षात आलं की यांचं आयुष्य फार काही सुखी असणार नाही. ते नक्कीच आपली करून कहाणी सांगणार. ज्या प्रश्नांवर आपल्याकडे उत्तरे नसतात ते प्रश्न ऐकून घ्यायला आपण काही देवळातील मूर्ति आहोत का? कारण त्या प्रश्नांतून निराशा अन हतबलतेशिवाय काहीच पदरी पडणार नाही हे माहीत असतं. स्वतःचं दुखं किमान सहन तरी करता येतं, पण दुसर्‍यांचं दुखं ऐकल्यावर प्रचंड हतबलता जाणवते.

आजोबा सांगत होते. घरी कोण लक्ष देत नाही. मुलं-सुना ऐकत-बोलत नाहीत. पत्नी वैकुंठवासी झालेल्या. घरात कोंडमारा होऊन मेल्यापेक्षा पंढरीच्या वारीला जाऊ. निघालो सगळं मागे टाकून.

ह्या दोन-चार वाक्यात त्यांचं आयुष्य काय असेल याची जाणीव झाली.

साला ही माणसेच नकोत…. नकोतच ही माणसे… सगळीकडे तीच-तीच दुखे अन विवंचना… मला ही माणसेच नको वाटतात… विनाकारण मेंदूला ताण असतो. जो तो दुखीचं आहे का? अन सुखी असणारे तरी खरे सुखी आहेत की सुखाचे मुखवटे घालून वावरत असतात. इतक्या जर विवंचना असतील तर माणसाच्या प्रगत असण्यालातरी काय अर्थ? का प्रगत असणं, विचार करू शकणे, भावना व्यक्त करू शकणे, संवेदनशील असणे हाच सर्व समस्यांचं मूळ आहे? हे आयुष्य इतकं गुंतागुंतीचं का असावं? साधं-सरळ का जगता येऊ नये. इतके साधू-संत होऊन गेले, त्यांनीही हेच सांगितलं तरीही हे का बदलू नये. आपण प्रगत असू पण तो नागड्याने फिरणारा आदिमानव सुखी होता.

ते मेडिटेशनवाले वगैरे सांगतात की सुखाकडे बघा, सकारात्मक विचार करा, सगळी negativity बाजूला ठेवा. पण हे कसं शक्य आहे? हे म्हणजे सत्य नाकारण्यासारखं नाही का? तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केल्याने ती दुखे संपणार आहेत का? ती तशीच राहतील, तुम्हीच भूल देऊन जगल्यासारखे राहाल. पाहुणे येणार म्हंटलं की घरातील पसारा पडद्याआड लपवल्याने घरातील पसारा कमी होत नाही. प्रत्येकजण कुठलंतरी ओझं घेऊन जगतोय, सल घेऊन जगतोय, दुखी आहे असं जाणवत राहतं. भेटणार्‍या प्रत्येक माणसांसोबत ही दुखे आपल्या मेंदूला चिकटली जातात. एखाद्या रेडियोअॅक्टिव substance प्रमाणे हा मेंदू त्यांचं सतत उत्सर्जन करत राहतो.

माणूसच नको, हा आत्माही नको, सुख नको, दुखंही नको! हा प्रवासच नको. निश्चलता हवी. एक चिरनिद्रा हवी! अखंड! विश्वाला शांतता हवीय!

तो बुद्ध सुखी होता. सर्वस्व त्यागून मोक्षाच्या मार्गावर लागला होता. ह्या सगळ्या वेदनेच्या अन दुखच्या पसार्‍यातून त्याने स्वतःची सुटका करून घेतली होती. मलाही हे जग, ही माणसे नको वाटतात. जर माझ्यावर बुद्धासारखी जगाला त्यागायची वेळ आली तर मग मी ह्या जागेची निवड करेन. हाच माझा बोधिवृक्ष असेल. हे वर्तुळ मोडून बाहेरच्या अगाथ, अथांग विश्वात संचार करावा वाटतो. खर्‍या जाणिवा तेथे कोठेतरी दडलेल्या असतील. मानवी जीवन म्हणजे निव्वळ त्या जाणिवांचा खोटा आभास असावा. ती जागा ईश्वराने नक्कीच निर्माण केली असेल जिथे स्थिरता आहे, अखंडता आहे, शांतता आहे, मुक्ती आहे आणि एकांत आहे!

            सगळं मागे सोडून जातोय असं वाटत होतं. सकाळच्या गप्पा-हास्यकल्लोळ, पर्यटन, प्रवास, मंदिर, आजोबा… सगळं! अस्तित्वाने ते जरी मागे राहिलं असलं तरी कोणत्याना कोणत्या अवस्थेत ते सोबत येणार होता. कोणाचीतरी Intensity नक्कीच जास्त असणार होती. सकाळी कुठलीही गाणी लावून मजा-मस्ती करणारे आम्ही आता जुनी हिन्दी गाणी लावून शांतपणे जात होतो. कदाचित सर्वांचं शरीर आणि मन थकलेलं होतं. मुसळधार पाऊस सुरू होता. आता वायपरच्या लयबद्ध चालीला साथ द्यायला गाडीच्या टपावर पडणारे पावसाचे टपोरे थेंबही होते. एखाद्या डब्यातून जुना पदार्थ काढावा अन त्याऐवेजी नवा ठेवावा तसं झालं होतं. जुन्या आकांक्षा शोषून घेतल्या होत्या अन नव्या जाणिवा भरल्या होत्या. सगळे शांत होते. एक प्रवास संपत होता… एक मार्गस्थ वाटेवर होता!

भरती येताना प्रचंड उधाण असतं. उत्साह असतो. ते खळखळणं असतं. किनार्‍याला टक्कर देण्याच्या, जमिनीला गिळंकृत करण्याचा आक्रमकपणा असतो. पण ओहोटी अशी नसते. ती स्वतःकडे जात असते. ती शांत, निश्चल असते. ती निर्मळ, अंतर्मुख असते. किनार्‍याला स्वतःकडे खेचणारी असते.

–  abhishek buchake

मार्गस्थ…!

तोच असे सोबती…

तोच असे सोबती…

तोच असे सोबती…  ||  मराठी कथा   ||   गुंतागुंत   || पौगंडावस्था   ||  मैत्री  || Marathi Story  || Alone

माझी त्याची ओळख घरासमोरच्या बागेत झाली. अस्मित त्याचं नाव. माझं नाव नचिकेत. मी पाचवीत वगैरे असेन, त्यावेळेस शाळा सुटली की मी त्या बागेत जाऊन बसायचो. मैदानी खेळ खेळावेत म्हणून घरचे फार आग्रही असायचे. तसे माझे फार कोणी मित्र नव्हते. म्हणजे अगदी पहिलेपासूनच. मी थोडासा मितभाषी होतो. फार कमी बोलायचो. घरी नातेवाईक आले तरीही तोच प्रकार होता. आई-बाबांशीही फार बोलायचो नाही.

अस्मित मला फार जवळचा वाटायचा. तो जवळपास माझ्याच वयाचा. अगदी थोड्या वेळात आमची मस्त मैत्री झाली होती. दिसायलाही तो खूप गोड. गोरापान, मांजरासारखे हिरवट डोळे, छोटुसं नाक अन तो गोंडस चेहरा. मला तो खूप आवडायचा. माझे बाकीचे कोणी मित्र नव्हते पण हा मात्र मित्र म्हणून सदैव माझ्यासोबत असायचा. तोच एकटा होता ज्याच्याशी मी खूप आणि मनसोक्त बोलायचो.

रोज संध्याकाळी पाच वाजता मी त्या बागेत जायचो. गुलमोहराच्या झाडाखाली एक हिरवा बेंच ठेवलेला होता. तो तिथे बसलेला असायचा. त्यालाही फार कोण मित्र नव्हते. माझ्यासारखीच परिस्थिती. तो माझीच वाट बघत तिथे बसलेला असायचा. आम्ही भेटलो की भरपूर गप्पा मारायचो. मी कधीच कोणाला न सांगायच्या गोष्टी अस्मितला सांगत होतो. मनात जे जे येईल ते ते ते मी बोलून मोकळं व्हायचो. तो मला खूप जवळचा, विश्वासार्ह वाटायचा. त्याच्याशी बोललं की मन शांत व्हायचं. तोही सगळं सांगायचा.

अस्मितचे आई-वडील त्याच्याकडे लक्ष देत नसत. त्याला मारत. म्हणून तो दिवसभर बाहेरच बसायचा. तो कोणत्यातरी महापालिकेच्या शाळेत जात असे. तो इथे येऊन बसत हे त्याच्या घरी माहीत नसायचं. दिवसभर शाळेत, संध्याकाळी इथे बागेत अन मग उशिरा रात्री घरी असं तो करायचा म्हणे!

अस्मित मला माझ्या प्रत्येक गोष्टीत मदत करत असे. माझा अभ्यास, स्पोर्ट्स, कपडे कसे घालावे असो किंवा इतर अनेक लहान-मोठ्या बाबी, त्यात तो मला सहकार्य करत असे. मी लिहीलेल्या कविताही तो लक्ष देऊन ऐकत असे. मी इतरांना माझ्या कविता सांगत नसे.

रोज संध्याकाळी पाच ते सात आमच्या गप्पा चालायच्या. तो खूप हुशार आहे असं मला वाटायचं. पण त्याने कधीच तसं भासू दिलं नाही. कदाचित यातच त्याचं मोठेपण होतं.

काळानुरूप आमची मैत्री खुलत गेली. आमच्या दोघांच्या मैत्रित तिसरा कधी कोण आला नाही. नंतर नंतर तर मला त्याच्याशिवाय बिलकुल करमायचं नाही. सतत त्याची सोबत असावी असं वाटायचं. मनात गर्दी करत असलेल्या अनेक गोष्टी त्याच्याशी बोलून मन मोकळं करावं असं वाटायचं. तोही निमूटपणे सगळं ऐकून घेत अन त्यावर मला सल्ला देत. मी त्यासाठी कुठे गावाला जायचंही टाळायचो. माझ्या घरी, आई-बाबाला मी अस्मितबद्धल फार काही सांगितलं नव्हतं. एक दोनदा आईने मला त्याच्यासोबत बागेत बघितलं, पण ती कधी काही बोलली नाही.

आमची मैत्री नवनवे टप्पे गाठत होती. कदाचित जगात तोच एकटा होता जो मला व्यवस्थित समजून घ्यायचा. निव्वळ काळ्या पेन्सिलीने काढलेलं चित्रात त्याने रंग भरले होते. त्याच्यामुळेच माझं आयुष्य उत्साही अन मनोरंजक झालं होतं. सतत वाटणारा एकटेपणा नाहीसा झाला होता.

आता दोन वर्षे झाली होती आमच्या मैत्रीला. आम्ही हुल्लडबाजीही करायला शिकलो होतो. त्या नाल्याच्या तेथून वेगाने धावणार्‍या रेल्वेवर पाण्याने भरलेले फुगे मारायचो अन पळून जायचो, कधी लहान मुलांना चॉकलेट देऊन खुश करायचो, हमाल लोकांच्या गाडीला धक्का मारून मदत करायचो, झाडवरच्या मधमाशीच्या मोहोळाला दगड मारून पळून जायचो तर कधी दुसर्‍यांच्या लग्नाच्या वरातीत जाऊन नाचायचो. खूप मजा यायची… मला तर इतकं हलकं हलकं वाटायचं जणू मी आकाशात उडत असल्याचा भास व्हायचा.

आता आम्ही केवळ मित्र नव्हतो तर भागीदार होतो. खट्याळपणा, दंगामस्ती, लोकांची मदत या सर्व गोष्टी आम्ही मिळून करत असू. मैत्रीचे बंध अधिकच घट्ट झाले होते. मला सख्खा भाऊ किंवा बहीण नव्हती. पण तोच मला भावासारखा होता. असंही, सख्या भावाप्रमाणे तो माझी काळजीही घेत असे. मला खूप चांगला मित्र मिळाल्याचा खूप अभिमान वाटत होता.

इतके वर्षे एकटं, अभ्यासाच्या गर्तेत अन नीरसपणे जाणारं माझं आयुष्य अतिशय झगमगीत अन खेळकर पद्धतीने जात होतं. घरी गेल्यावरही मी मजेत राहत असल्याने आई-बाबा निश्चिंत होते.

नववीत असतानाची घटना असेल. मी खूप आजारी होतो. मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. बरेच नातेवाईक वगैरे भेटून गेले. क्लासटीचर, शाळेतील एक-दोन मित्रही भेटून गेले पण हा अस्मित काही आला नाही. मला त्याचा खूप राग आलेला. त्याच्याशी कधीच बोलायचं नाही असं मी मनाशीच ठरवलं होतं. मी बरा झालो. बरेच दिवस बागेकडे फिरकलो नाही. मला अस्मितची आठवण येत पण मी जाणीवपूर्वक टाळत असे. मी त्याच्यावर नाराज होतो. पण एके दिवशी सहज म्हणून बागेत फिरत गेलो. त्या बेंचवर शांतपणे, एकटाच बसलेला असताना अस्मित मागून आला अन त्याने माझ्यासमोर केक ठेवला, मला गिफ्ट दिलं अन आम्ही माझ्या दुखण्यातून बरं झाल्याची पार्टी केली. माझा राग लागलीच गेला. मला समजलं की तोही आजारी होता. पण तो रोज माझी वाट बघायचा म्हणे त्या बागेत.

मला खरच स्वतःचं वाईट वाटलं. मी त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा होता. त्याला माझी चिंता होती. पण ह्यामुळे आमची मैत्री अजूनच घट्ट झाली.

मला आठवतं, मी दहावीला असेन. आम्ही गावाबाहेरच्या एका चिल्ड्रेन पार्कमध्ये चेस खेळत बसलो होतो. तो जिंकत होता, पण मीही हार मानणार नव्हतो. आम्ही खेळत असताना एक मुलगी समोर बसलेली दिसली. आमच्यापेक्षा थोडीशी मोठी होती. आमची पैज लागली… त्या मुलीला जाऊन कीस करायचा… मला खरं तर प्रचंड भीती वाटत होती. ही कल्पना अस्मितची होती. तो आग्रह करत होता. पण कोणाला जर समजलं किंवा त्या मुलीने कोणाला सांगितलं तर कठीण होणार होतं. पण मलाही ‘ते’ करावंसं वाटत होतं.

आधी अस्मित गेला. तो तिला काहीतरी म्हणाला अन त्या मुलीने त्याला लागलीच कीस केलं. मला आश्चर्य वाटलं. चित्रपटात दाखवतात तसं माझ्या डोळ्यांसमोर घडलं होतं. माझ्या अंगातून घाम गळत होता. शरीर मात्र थंडगार पडलं होतं. तो हसत, आनंदाने उड्या मारत माझ्याकडे आला अन म्हणाला, “आता तुझी बारी…”

मला भीती तर वाटत होती पण खूप उत्सुकता तर होती. अस्मित म्हणल्याप्रमाणे त्याला ‘ते’ करण्यात खूप मजा आली होती. पण तो खूप हँडसम दिसायचा. त्याच्याकडे कोणतीही मुलगी आकर्षित झाली असती. पण मी फार काही चांगला नाही दिसायचो. पण किल्ला लढवणे तर भाग होतं.

मी हळूहळू त्या मुलीजवळ गेलो. तिच्यासमोर जाऊन उभा राहिलो. तिच्या खांद्याला हात लावला तशी ती माझ्याकडे आश्चर्याने बघत होती. मी तिच्याकडे बघून हसलो. ती उभी राहताच मी तिला कीस करायचा प्रयत्न केला… तिच्यावर स्वतःला लादत होतो… पण क्षणात तिने माझ्या कानफटात लगावली. गाल लालबुंद झाले. ती रागाने माझ्याकडे बघत होती.

“how dare you? Who are you?” म्हणत होती…

नशीब की त्या वेळेस बागेत कोणीच नव्हतं. तिने कोणाला बोलवायच्या आधी मी आणि अस्मितने धूम ठोकली. तो माझ्यावर प्रचंड हसत होता. मला मात्र त्याचा खूप दुस्वास वाटत होता. त्या मुलीने त्याला स्वीकारलं अन मला नाकरलं याचा जास्त खेद होता. तो माझी खिल्ली उडवत होता.

त्या दिवसानंतर आम्ही त्या जागेवर परत कधीच गेलो नाहीत. पुढे काय झालं आम्हाला समजलं नाही, पण आम्ही तिथे परत कधीच गेलो नाहीत. मी दोन-तीन दिवस अस्मितलाही भेटलो नाही. मला त्याचा राग आला होता. पण त्या दिवशी दुपारी, आई-बाबा कामाला गेलेले असताना तो आमच्या घरी आला. आज तो पहिल्यांदाच आमच्या घरी आला होता. मी त्याला भाव दिला नाही. पण तो नेहमीप्रमाणे खेळकर मूडमध्ये होता.

मी काही बोलत नाही, त्याला भाव देत नाही हे बघून तो माझ्याजवळ आला अन म्हणाला, “मी असताना तुला कधीच कसल्याच गोष्टीची कमी पडणार नाही असं म्हणत त्याने माझा कीस घेतला…”

मला क्षणभर ओकारी आली… कसतरीच वाटलं… अत्यंत घाण… त्याला मारवसं वाटत होतं… पण क्षणात ते घडलं अन मला प्रतिक्रियाही देता आली नाही…

“हा असा करायचा असतो कीस…” असं म्हणत तो क्षणपणे निघूनही गेला.

मी रात्रभर विचार करत होतो. मला त्याचं वागणं उमगलं नाही. तो असा विक्षिप्त कधीच वागलेला नव्हता. पण आज तो असा का वागला? तो ‘तसला’ तर नाही न? शक्य नाही…

परत काही दिवस आमची भेट झाली नाही. काही दिवसांनी बागेत आमची भेट झाली. मी जरा सावधपणे अन आकसलेपणाने वागत होतो.

“त्या दिवशी काय केलस?” मी निग्रहाने विचारलं.

तो जोरजोराने हसू लागला. त्याचं हसणं थांबतच नव्हतं.

मी गंभीरच होतो. मी त्याच रोखाने म्हणालो, “तुझ्याशी मैत्री ठेवायची का नाही याचा विचार करावा लागेल…?”

तो लागलीच शांत झाला अन माझ्याकडे बघू लागला. तो नंतर म्हणाला, “तू माझा खरा अन एकमेव मित्र आहेस… तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो… तुला आयुष्यात जर कोणत्या गोष्टींची कमी वाटत असेल तर मी ती भरून काढेन… तुला त्या मुलीने स्पर्श करू दिला नाही… तुला त्यातलं काहीच कळत नाही… तू नाराज होतास… तुला सगळ्या गोष्टी ज्ञात करून देणं मित्र म्हणून माझं काम आहे…”

मी आश्चर्याने म्हणालो, “बास एवढच????”

तो ठामपणे म्हणाला, “हो… तू मला काही वेगळं समजलस का मग? मी मैत्री निभावतो… तुझ्यासाठी काही पण…”

मग मीही हसायला लागलो. त्याने केवळ माझ्यासाठी ‘तो’ प्रकार केला आणि तो ‘तसला’ नाही हे ऐकून बरं वाटलं.

रात्री बराच विचार केला. अस्मितचा स्वभाव माझ्यापेक्षा भिन्न होता. अगदी उलटा. माझ्यात जे नव्हतं ते त्याच्यात होतं. मित्र म्हणून तो माझ्यासाठी काहीही करायला तयार होता. त्याची ही मैत्री बघून मला खरंच अतिशय आनंद होत होता. जगात कोणीतरी माझ्यासाठी कायम उभा आहे ही जाणीव दृढ झाली होती. मला भाऊ असता तर त्यानेही माझ्यासाठी इतका विचार केला नसता. अस्मित मला त्याच्या आयुष्यातील आमुलाग्र स्थानी समजतो हे मला समजलं होतं. त्याच्या घरातील वातावरण असेल किंवा अजून काही, तो मला खूप मानत होता.

आम्ही तो प्रसंग विसरूनही गेलो. पुन्हा पहिल्यासारखे कुचाळक्या करत गावभर फिरत होतो. आमची मैत्री आता आमच्या दोघांच्या आयुष्यात सर्वोच्च ठिकाणी गेलेली होती.

दहावीचं वर्ष होतं. खूप हौस, मजामस्ती झाली होती. परीक्षाही आलेल्या. ज्याची भीती होती तेच झालं. मी दहावीत नापास झालो. आई-बाबा प्रचंड संतापले. त्यांनी माझ्या संगतीचा, माझ्या सर्व सवयींचा अन आयुष्याचा धांडोळा घ्यायला सुरुवात केली. काहीच दिवसांत त्यांना माझं समांतर आयुष्य समजलं होतं.

मला डॉक्टर बोरफळे यांच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भारती केलं होतं. डॉक्टर बोरफळे psychiatrist होते. ते मला वेडा समजत होते. माझ्या समांतर आयुष्यात गुप्तहेरी, हेरगिरी केल्यानंतर माझ्या आई-बाबांना ज्या गोष्टी समजल्या त्यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की मला मानसोपचारतज्ञाची गरज आहे.

ते म्हणतात की “अस्मित” नावाचा मुलगा अस्तीत्वात नाहीच…! हे कसं शक्य आहे? गेली चार-पाच वर्षे मी ज्याच्यासोबत आयुष्य काढतो आहे तो मुलगा, मनुष्यप्राणी अस्तीत्वात नाही…? मग मी कोणाशी बोलायचो…? कोणासोबत खेळायचो…? माझा डॉक्टर आणि इतर लोकांवर विश्वास नव्हता. अस्मित माझा जवळचा मित्र आहे यावर माझा ठाम विश्वास आहे.

डॉक्टर बोरफळे यांनी याचं काहीतरी विश्लेषण केलं होतं म्हणे… मी लहानपणापासून एकलकोंडा होतो. मला बोलायला, खेळायला व्यक्त व्हायला कोणीच नव्हतं. आजी-आजोबा-भाऊ-बहीण नाही. आई-बाबा दिवसभर कामावर जायचे. मी अबोल होत गेलो. माझ्यासोबत कोणीही मैत्री करत नव्हतं. मी कोणाशी बोलू शकत नव्हतो. माझ्या मेंदूचा मानसिक विकास थांबला. मग माझ्या मेंदूनेच एक प्रती “मी” उभा केला. एक मित्र म्हणून. तो फक्त माझ्या मेंदूने “consider” केला होता. मला “मी” जसा हवा आहे तसा अस्मित बनत गेला. कारण माझा मेंदुच त्याला घडवत होता. तो फक्त मला दिसायचा, माझ्याशी बोलायचा अन सर्वकाही माझ्याशी त्याचं विश्व मर्यादित होतं. त्यामुळेच तो मला कधी दुसर्‍यांसोबत दिसला नाही. कारण माझा मेंदू मलाच मूर्ख बनवत होता. तो मला ह्या भ्रमातून बाहेर येऊ देत नव्हता की “अस्मित” खोटा आहे. त्याचं चांगलं दिसणं, भाडभड बोलणं, हुशार असणं, हुल्लडबाजी ही मला मनातून हवी होती. ती मी स्वतःहून, माझ्या ‘नचिकेत’ या प्रतिमेसह, स्वभावासह ते करू शकत नव्हतो. माझ्या इच्छा असल्या तरी त्या मी पूर्ण करू शकत नव्हतो. माझं व्यक्त होणं बंद झालं होतं. त्यामुळेच मेंदूने “अस्मित” उभा केला अन त्याच्याकडून सर्व घडवून घेतलं. मी सतत मीच निर्माण केलेल्या ‘आवरणाखाली’ वावरत होतो.

मला ‘मीच’ सर्वात जवळचा मित्र होतो. दुसरे सजीव मित्र माझ्याजवळ येत नव्हते, त्यांची माझी मैत्री होत नव्हती म्हणून मीच स्वतःचा सर्वोत्तम मित्र बनलो होतो. माझ्याशिवाय माझा कोणीच मित्र नव्हता. म्हणूनच मी आजारी असलो की ‘अस्मित’ही आजारी असायचा. माझ्या मनाची अवस्था त्याच्या आयुष्य बनली. पण एक क्षण आला जेंव्हा माझ्याच मेंदूला अस्मित खरा की खोटा यातील भेद समजत नव्हता. तो समजेना झाला म्हणून मी अस्थिर झालो.

आता गेली सहा महीने झाले माझ्यावर ह्या रुग्णालयात उपचार चालू आहेत. ते डॉक्टर लोक रोज नसलेल्या ‘अस्मित’ बद्धल बोलत असतात. ते ‘अस्मित नाही’ असं माझ्या मनावर बिंबवत असतात. अस्मित असो किंवा नसो, माझ्याशी त्याचं काही देणं घेणं नव्हतं. मीच माझा सर्वोत्तम मित्र होतो हे तरी मला समजलं होतं. जोपर्यंत मी जीवंत आहे तोपर्यंत मीच माझा मित्र राहणार होतो हे मला लक्षात आलं होतं. मग ते रूप आज अस्मित सारखं असलं तर उद्या अन्य कोणाचं असतं… पण माझा मित्र मीच…

===समाप्त===

कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित || copyrights @ abhishek buchake

latenightedition. in   }{  @Late_Night1991

कल्याण

पोर्णिमा ते अमावस्या!

पोर्णिमा ते अमावस्या!

#Effect Of New Moon & Full Moon on Human Mind/Soul/Heart/Psyche

#पोर्णिमा अन अमावास्येचा मानवी मनावर खोलवर परिणाम

#मनाचा कारक चंद्र

Not Science/ विज्ञान विरहित

अंधश्रद्धा म्हणा किंवा गैरसमज म्हणा पण एक अनुभव मला वारंवार येत असतो… अमावस्या किंवा पोर्णिमा तिथी असेल किंवा आसपास ची तिथी तर मन विचलित होतं… जुन्या-पुराण्या, गाडल्या गेलेल्याही आठवणी सारख्या मनात येत असतात… मन अस्थिर होतं… चंचलपणा, हळवेपणा वाढतो… सारासार विचार करायचा अन शिस्तप्रिय असलेला मेंदू सैरावैरा किंवा सैराट होतो… दिवसा काजवे चमकू लागतात…. कुठल्याही गोष्टी चटका लाऊन जातात… कधी विषन्नता, नैराश्य मनाचा ताबा घेतं… कोठुनतरी ओढलेपणा जाणवतो… शारीरिक बदल काही नसतात… नेहमीप्रमाणे कामे होतात पण मन मात्र बेचैन असतं… नको त्या गोष्टी नको त्या प्रमाणे छळ मांडतात… विझलेला विस्तव फसफसून आवाज करतो अन मधूनच भयंकर पेट घेतो… मनाला लगाम राहत नाही… मेंदूचा मनावरील ताबा सुटलेला असतो… मनाचा स्वैराचार चालू असतो… भकासपणा, रुखरुख, वाहवत जाण्याचा प्रकार ठरलेला असतो… काय करावं समजत नाही… मनातील बंद दरवाजे अचानक उघडले जातात.. पूर्वीच्या गोष्टी तर आठवतातच शिवाय भविष्याची ओढ आणि वर्तमान याच्यातील अंतर्गत संघर्ष एका पातळीवर घडत असतो जो मनाला एका वेगळ्या प्रतलात घेऊन जातो… अज्ञात वाटेवरील चमकणारे मंद दिवे अन अरुंद वाटा खुणावत असतात…. भयंकर मनोवस्था असते… कधी निर्वाण, मोक्ष, मुक्ती संन्यासत्व इथपर्यंत विचार पोचतात… अर्थात अविचार! अर्थात नेहमीच असे अन इतक्या तीव्रतेचे विचार येतात अस नाही… कमी-अधिक प्रमाणात तो परिणाम असतो, पण काही क्षणांचा तर नक्कीच असतो… कधी मार्गही सापडतात अन उत्तम चालना मिळते… पण एक परिक्रमा असते ना, एक रेंज असते ना तसं ह्या टोकाला किंवा त्या टोकाला मनाचा काटा स्थिरावत असतो… neutral नसतो हे नक्की!!!

विज्ञान काय म्हणतं याकडे लक्ष दिलं पाहिजे… अमावस्या-पोर्णिमा आणि समुद्राला ओहोटी-भरती हे सत्य विसरून चालणार नाही… दूरवर असलेला चंद्र पृथ्वीवर असलेल्या अथांग समुद्रावर आपली छाप अन वर्चस्व ठेऊन असतो… स्वतःच्या गुरुत्वाकर्षनाची ताकत सिद्ध करत असतो… त्याच्या कक्षेतील बदलाने पृथ्वीवर अनेक गोष्टी घडत असतात… अगदी पाऊस-पाणी, भूकंप, वगैरे… त्याच्या जराशा हालचालीने आपल्याकडे आपत्ती येत असतात… असा हा चंद्र!!! यावर मागे ‘जयदेव’ ने ह्याच ब्लॉग वर एक कविता रेखाटली आहे…

बारा राशींच्या विश्वात किंवा कुंडलीत चंद्राला मनाचा कारक म्हंटलं गेलं आहे… हृदय हे एक स्वतंत्र अस्तित्व ठेवणारा अवयव आहे.. रक्ताचा पुरवठा आणि पेसमेकर यावर ते काम करत असतं… रक्त हे प्रवाही असतं… समुद्रातील पाण्याप्रमाणे… समुद्राच्या पाण्याप्रमाणे… चंद्राच्या कलेचे अन कक्षेचे समुद्रातील पाण्यावर परिणाम होतात तर शरीरातील प्रवाहांवर त्याचा परिणाम होत असेलच? चंद्र हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत असतो, पृथ्वीभोवती फिरत असताना पृथ्वीवर त्याच्या गुरुत्वाचा परिणाम असतो… अनेक धर्मातील कालगणना यंत्र हे चंद्राच्या कक्षेवर अवलंबून आहेत… चंद्राला प्रत्येक संस्कृतीत मोठं महत्व आहे… त्याच्या अनेक गूढकथा, दंतकथा आहेत…

असो… काल बुद्ध पोर्णिमा झाली… मन अस्थिर होतं… तेंव्हा…

error: Content is protected !!