मराठी कथा || हास्यकथा || विनोदी || Marathi Movie ||
गडावर गनिमाचा हल्ला….
होळी पोर्णिमेची रात्र होती. अर्थात आम्हास दिवस आणि रात्री सारख्याच, कारण आमच्या उठायच्या आणि झोपायच्या वेळ सांगणे म्हणजे यमाच्या रेड्याची येण्याची वेळ सांगण्याइतपत अवघड. असो. तर, रात्र होळी पोर्णिमेची होती, दिवस अन संध्याकाळ बोंबलून-बोंबलून घसा वाळलेल्या रताळ्या सारखा झाला होता. तसंही बोंबलणे हा प्रकार आमच्यासाठी काही नवा नाही; एरवी गावभर बोंबलत फिरत असतो, आज होळी केवळ निमित्यमात्र! असो.
रात्रीचे दोन अडीच वाजत असावेत (रात्री घड्याळ्याकडे बघण्याची आणि झोपण्याची अर्थाअर्थी सवय आम्हास नाही, आली हुक्की दिली बुक्की ह्या हिशोबाने झोप येईल तेंव्हाच अंथरुणात अंग टाकण्याची सवय आहे आम्हास; तसे झोप आली नसतानाही आम्ही अंथरुणावर लोळत असतोच, पण तो संदर्भ वेगळा). मुख्य विषयाकडे येऊ. तर, रात्रीचे दोन अडीच वाजले असावेत (मध्यरात्रीचा प्रथम प्रहर म्हणा हवं तर). आम्हाला computer वर काम करून कंटाळा आला होता; काम काय होते हे विचारण्याचे धाडस नको.
तर,computer वर काम करून कंटाळा आला होता आणि डोळ्याच्या पडदे चड्डीच्या elastic प्रमाणे ताणले जात असल्याने आम्ही computer बंद करून,अंग जरासं वेडंवाकडं करून झोपण्यसाठी आमच्या बिछान्यावर जाऊन पडलो. आमचा बिछाना म्हणजे जमिनीवर सतरंजी, सतरंजीवर मऊ गोधडी, गोधडीवर गालीचा आणि गालीच्यावर रेशमी चादर. यापेक्षा गादी बरी असे तुम्ही म्हणाल, पण एका अतिशहाण्या डॉक्टरने आमच्या पाठीच्या दुखण्यावर ईलाज म्हणून जमिनीवर झोपण्यास सांगितले होते. डॉक्टर कसाही असला तरी त्याचं ऐकणे हे कर्मकठिण कर्तव्य असं आजवर आम्ही मानत आलो आहोत. ह्या घटनेपासून ‘ईलाज’ आणि ‘जालिम’ शब्दाची सोयरीक का आहे हे आम्हास समजले. अर्थात प्रथम दिनी अथवा रात्री म्हणूया आपण; तर प्रथम रात्री आम्ही फक्त एक सतरंजी आणि रेशमी चादर टाकून झोपण्याचा प्रकार केलेलं आमच्या चांगलच स्मरणात आहे, पण तो प्रकार ‘अंगलट’ आल्याने दुसर्या दिवशी (हो दिवशीच) आम्ही आमचा मऊ ‘बिछाना’ तयार केला.
तर, रात्री आम्ही आमच्या बिछान्यावर निवांत पहुडलो अर्थात लोळत होतो. मघाशी computer समोर बसलो असतानाची झोप आता तितकीशी जाणवत नव्हती. डोक्यात काही शंका, मसलती होत्या, चिंताही होत्या, म्हणून कदाचित आम्हास झोप येण्यास विलंब लागत असावा. व्याप वाढला की ताप वाढतोच असं म्हणतात ते काही खोटं नाही. स्वतःचा मुलुख आणि कारभार सांभाळणे ही नित्यनियमित कामे मेंदूला रोज नवीन खाद्य पुरवत असतात. अशा अनेक कारणांनी, आजवरच्या आयुष्यात, आमचा मेंदू नेहमी अस्थिर असतो; हे सगळं सामान्य आहे, असामान्य आहे, अतिसामान्य आहे की वेड्याची लक्षणे आहेत हे आजतागायत आम्हाला उमगले नाही. असो. पुन्हा विषय बदलल्याने माफी.
आम्ही इकडे गाफिल होऊन पडलो (अर्थात, पुन्हा एकदा लोळत) होतो आणि तिकडे शत्रूची हालचाल चालू असल्याची आम्हास दमाडीचीही जाणीव नव्हती आणि असावी ती का??? आमची तटबंदी, पहारे, फौज-फाटा वगैरे मजबूत असल्याचा आमचा ठाम विश्वास आहे. पण नेहमीच सारे अंदाज-विश्वास खरे ठरतातच असे नाही.
आम्ही आमच्या महाली, आमच्या कक्षेत झोपत अर्थात पडलो अर्थात लोळत होतो, आमचा सारा कुटुंब-कबिला अर्थात परिवार खालच्या मजल्यावर झोपला होता आणि आम्ही प्रथम मजल्यावर (अतिसुशिक्षित लोक खालच्या मजल्यास Ground Flore आणि त्याच्या वरच्या मजल्याला First floreअसे संबोधतात. असो) होतो. आमच्या कक्षेत येण्यासाठी आम्ही मागच्या बाजूने विशेष अर्थात separate अशा पायर्याय करून घेतल्या होत्या कारण, अहो कारण काय विचारताय आम्हास कधी काय हुक्की येईल हे आम्हीच जाणो म्हणून त्याचा अडसर अर्थात disturbance आणि धोका आमच्या कुटुंब-कबिल्यास होऊ नये ऐसा आमचा मनसुबा होता. तात्पर्य, अशा कारणांनी आम्ही आमच्या येण्या-जाण्याची वेगळी वाट योजली होती. पण आम्हास काय ते ठाऊक होते की गनिम ह्याच रस्त्याचा फायदा उठवेल? छे…छे… गनिम तर कुठल्याही गोष्टीचा अन कमजोर दुव्याचा फायदा उचलू शकतो हे आमच्या ध्यानातून सुटले होते. घोडचूक! हा मार्ग म्हणजे त्यांना आपली इस्पित साध्य करण्याचा मार्ग वाटत होता.
तर आम्ही बिछान्यावर असताना (समजलाच असाल ना झोपलो अर्थात पडलो अर्थात लोळत असताना) दबकत आवाजात चार-पाच गनिमांचं एक टोळकं त्या पायर्यांतवरून दबकत-दबकत-दबकत-दबकत-दबकत (पाच वेळा का लिहिलं म्हणून काय विचारता, अहो म्हणालो ना चार-पाच होते ते म्हणून) आवाजात (आता दबकत असतो तो आवाज कसला म्हणून काय विचारता, अहो म्हणजे गुपचुपपणे) वर येत होता. आम्हालातर याची मान्सून पावसाइतकीही जाणीव नव्हती. आम्ही आमच्याच विश्वात गर्क होतो. पडल्या-पडल्या कोणत्या विश्वात रम्य होतो हे आत्ता आठवतही नाही आणि आठवलं तरी ते सांगण्यायोग्य आहे का याचीही शास्वती नाही. तर, गनिम आमच्या अंथरुणपर्यंत अर्थातच येऊन पोहोचला होता, आमच्याकडे ना तलवार ना ढाल ना कोण जीवाला जीव देईल ऐसा ना साथीदार. घात झाला… घात… दगा… दगा… दगा….
अखेर गनिमाने डाव साधला. पण आई जगदंबेची कृपा आणि पूर्वजांची पुण्याई असावी की काय पण आम्हास कूस बदलाविशी वाटली आणि आम्ही ती बदलली आणि….आणि…आणि… काय सांगू आमच्या बगल्याजवळ अर्थात काखेत काहीतरी गुदगुल्या झाल्याचा भास आम्हास झाला आणि सहज म्हणून आम्ही आमचा हात तेथून झिडकारला आणि हाताला काहीतरी-कसलातरी स्पर्श झाला; आम्ही दचकलो, आम्ही पाहिलं आणि आम्ही उठलो (अर्थात बिछाण्यावरून). एक खुलासा करतो; झोपताना आम्हास अतिबारीक दिवा ठेऊन झोपण्याची सवय त्यामुळे कक्षेत तसा बर्याोपैकी अंधारच असतो. पण आमची नजर भेदक,तीक्ष्ण आणि बुद्धी शाबूत, तल्लख असल्याने आम्हास कळले की आम्ही आत्ताच झुरळस्पर्श अर्थात cockroach-touch केला आहे. हे राम! साक्षात मृत्यूस्पर्श! आम्हास तर आमच्या आऊसाहेबच आठवल्या. आणि काय सांगू? आम्ही कसेबसे उठलो आणि धडपडत जाऊन कशीतरी सर्व खटके अर्थात button लावली आणि सर्व दिवे वगैरे चालू जाहले आणि एकंदरीत सारा डाव अर्थात plan आमच्या लक्षात आला. महालात आणि आमच्या मेंदूत लख्ख प्रकाश पडला. आम्ही जाणलं की गनिमाने आम्हाला गाफिल असताना कोंडीत पकडलं आहे. आमच्या डोळ्यासमोर चार-पाच झुरळ होते, जे आमच्याकडे मोठ्या द्वेषाने पाहत होते. आपल्याकडे हर हर महादेव अशा गर्जना दिल्या जातात तशाच अर्थाच्या गर्जना ते देत असल्याचं आम्हाला जाणवलं. कुठल्याही क्षणी ते आमच्यावर त्वेषाने तुटून पडणार हे आम्ही हेरलं होतं. पण आम्हीही अस्सल मर्द मराठे वाघ आहोत म्हणून कोणी त्यांना सांगितलं नसावं. अशा अनेक प्रसंगातून वाचत-वाचत आज आम्ही इथे उभे आहोत हे त्यांना माहीत नसावे कदाचित. आम्ही काहीही आरडाओरडा न करता आमच्या regular बिछान्यावर एक मोठी उडी टाकली. हा regular बिछाना म्हणजे सर्वसामान्य पलंग ज्यावर आम्ही पाठीचं दुखणं लागण्यापूर्वी पडायचो.
तुम्ही म्हणाल आमच्यासारख्या मर्द मावळया गड्याने झुरळसारख्या क्षुद्र किटकास घाबरावे? छे…. छे…. आम्हास सांगताना आज शरम वाटते आहे की जगात आम्ही केवळ दोन गोष्टींना घाबरतो त्यातली एक म्हणजे झुरळ आहे. काय…? दुसरं कोणाला घाबरता म्हणून काय विचारता, अहो प्रसंग काय तुम्ही विचारता काय? अजून कोणाला घाबरतो हे पुन्हा केंव्हातरी गरज पडल्यास अवश्य सांगेन.
आमचे नशीब की आमचा बिछाना (regular वाला) फार पूर्वीचा असल्याने बर्यानपैकी उंच होता जेणेकरून, माफक प्रमाणात उडता येणार्याल झुरळासारख्या क्षुद्र किटकास वर येता येत नव्हतं. ह्या पलंगावर असेस्तोवर तरी आम्ही काही काळ सुरक्षित होतो. ह्या प्रसंगातून सहीसलामत सुटल्यावर ह्या बेजड, निराकार,कुरूप वाटणार्या् पलंगाची दृष्ट काढायची आम्ही मनोमन ठरवले.
आत्ताच्या घडीला कोणास फोन करून मदतीस बोलवावे ऐसा मनसुबा मणी आला म्हणून नेहमीप्रमाणे हात खिशात गेला पण पुढच्या क्षणाला समोर पडलेल्या आमच्या आमच्या बिछान्यवर (अर्थात जमीनीवरील, ज्यावर आम्ही गाफिल होऊन पहुडलो होतो) पडलेल्या आमच्या फोनकडे लक्ष गेले आणि एक झुरळ त्याची निगराणी करत असलेले आमच्या दृष्टीस पडले आणि आमच्या पोटात गोळाच आला. आम्हाला कोणाची मदत घेता न यावी याचीही योजनाच गनिम करून आल्याचे लक्षात येताच स्वतःच्या गाफिलपणाचा राग अन शत्रूच्या होशियारीचं कौतुक वाटलं. पण हा क्षण राग-लोभ-कौतुक याचा विचार करायचा नव्हताच मुळी.
एक वेळ आम्ही, मोठयाने आवाज देऊन कोणा व्यक्तीस बोलवावे ऐसा मनसुबा आखला, परंतु आम्हाला हे ध्यानी आले की सारी कवाडे बंद असल्याने आवाज खालील मजल्यावर न जाता खिडकीतून शेजारील नाना यांच्या घरी जाईल आणि त्यांना हे समजेल की आमच्यासारखे पराक्रमी पुरुष झुरळास घाबरतात आणि हे ते नानीला सांगतील. आजवरच्या इतिहासात नानी काकूंकडून का कुठली गोष्ट पोटात राहिली आहे, असं आमच्या आठवणीत नाही. त्या ही सारी गोष्ट केवळ आमच्याच नव्हे तर सार्या् मुलाखी ही वार्ता वार्या सारखी पसरवतील आणि आमची अब्रू त्याच वेशीवर टांगली जाईल. आणि असेही आम्ही त्या नानी काकूंच्या धाकट्या मुलीशी संधान अर्थात डाव साधून आहोत. आमच्या अशा गोष्टीने आमचे impression down होईल आणि उगाच एक कारण मिळेल त्यांस. असो,विषयांतर होतं आहे. तर आमची अवस्था इकडे कॉंग्रेस तर तिकडे भाजपा दिसणार्याय मतदाराप्रमाणे झाली होती.
आम्ही निकराची अन निर्णायक झुंज देण्याचे मनाशी ठरवले. आमच्या बिछान्यावर (अहो ज्यावर मी उभा होतो. पुढल्या खेपेला समजून घ्या बरे.) पडलेली उशी आम्ही हाती घेतली आणि झुरळांना हाकलू लागलो. खाली त्या झुरळांचे उडून वर येण्याचे प्रयत्न चालूच होते. काहीही करून आम्हाला बेड्या ठोकायच्या किंवा मृत्यूदंड द्यायचा त्यांचा विचार होता, हे त्यांच्या चवताळलेल्या कृतीवरून दिसून येतच होतं. त्यांच्या मधील एकाने तर कहरच केला. तो आधी एका बुटक्या चौरंगावर उडी घेऊन तेथून आमच्या बिछान्यावर (कोणता बिछाना ते समजले ना?) उडी मारण्याचा प्रयत्न करीत होता. न्यूटनची अवलाद साला. पण त्याच्या बापजन्मी तरी त्यास हे शक्य नव्हते कारण एक तर चौरंगही बिछान्यापासून लांब होता आणि तो ज्या दिशेने येण्याचा प्रयत्न करीत होता त्या बाजूला आम्ही एक तक्या उभा करून टाकला. तो बसला तक्याला धडका देत. *$#@&*.
निकराची झुंज सुरू झाली होती. एक घनगोर संग्राम उभा राहणार होता. आम्ही उक्ती लढवली. लांब असलेल्या कूलरचे button आम्ही जवळ असलेल्या पुस्तक फेकून चालू केले आणि त्या कूलरच्या बलशाली वार्याtने पाहता पाहता त्या हरामखोर झुरळांच्या उड्या कमी झाल्या पण थांबल्या मात्र नाहीत. ते उडायचा प्रयत्न करायचे पण तो जड वारा त्यांना वर उठू देईना. मी त्यांना चिडवत होतो,‘हेहे… या की वर… उडा अजून… काय झालं? जिरली का? जा मग परत. &#@*$’.
ह्या सार्याच गडबडीत रात्रीचे तीन सव्वातीन वाजल्याचे आम्हास घड्याळ्याकडे पाहता कळले. चड्डीच्या elastic प्रमाणे ताणलेले डोळे आता फाटलेल्या पिशवीप्रमाणे सताड उघडे होते. झोप तर तडीपार झाली होती. पण रात्रभर ऐसे जागणे शक्य नव्हते म्हणून काहीतरी करण्याचे योजले.
आम्हास एक शंका आली, की हे बिलंदर माझ्या रक्ताचे प्यासे का म्हणून झाले असावेत? आमची तर यांच्याशी, यांच्या मुलखाशी कसलीच सलगी नाही. आम्ही तर शांतताप्रिय! नंतर आम्हास आठवले (कवितावाले नाही remember-remember) की कालच पागा साफ करीत असताना आमच्या चुलतबंधूंनी त्यांच्या एका निष्पाप साथीदारस ठेचून मारले होते. यांच्यातही निष्पाप असतात हे आमच्या चुलतबंधूंस माहीत नव्हते. ही वंशावळ अट्टल गुन्हेगार प्रवृत्तीचीच असते अशीच समजूत अनेकांची असते; त्यांच्यातील काहींची ख्यातीही तशीच आहे म्हणा. घरात गप-गुमान स्वायपाक करणार्याक बाईच्या पायात येऊन त्यांना घाबरावून हलकल्लोळ माजवणे ही त्यांच्यातील काहींची जुनी रीत-परंपरा! यांच्या अशाच परंपरेची प्रचिती आपण मिस्टर इंडिया, अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा वगैरे चित्रपटांत पाहिलीच आहे. असो.
आमचे चुलतबंधू तर गेले आपल्या गावी निघून (महाराष्ट्र देशी चुलत ह्या शब्दापासून जपूनच राहावे) आणि कदाचित त्यांच्या साथीदाराला आम्हीच मारले असे त्यांच्या देशी समज झाला असावा. सार्या झुरळ मुलखी आमच्या नावाची बदनामी झाली असावी आणि त्याचाच बदला घेण्यासाठी कदाचित त्यांच्या राजाने हे हुश्शहर टोळकं आम्हास नेस्तनाबूत करण्यास पाठवलं असावं. आता त्यांना हे स्पष्टीकरण कोण देणार की, आम्ही त्यांच्या वंशावळीच्या वार्याालाही थांबत नाही.
पण आता हे सारे निरर्थक. यातून सहीसलामत सुटका करून घेणे तर भाग होते.आता ह्या सार्याा गोष्टींना वेळ नव्हता नि अर्थही नव्हता. आमचा जीव ह्या वेढ्यात गुदमरत होता. आम्हास ह्या वेढ्यातून सुटका करून घ्यायचीच होती पण आमच्या मदतीस ना सह्याद्रीचा मेघराज ना शिवा काशिव ना बाजीप्रभू. आम्ही एकटे होतो; पण झुंजणार होतो हे नक्की!
आम्ही दिव्य करायचे ठरवले. दिव्यातून गेल्याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही हातातील उशी अचानक जोर-जोरात फिरवत जमिनीवर, गनिमाच्या दिशेने आपटली आणि ह्या अचानक धक्क्यामुळे झुरळ फौजी पळापळ माजली, धांदल उडाली आणि वेढ्यातील हयाच विस्कटलेपणाचा फायदा घेत आम्ही थेट उडी घेतली आणि सलग धावत सुटलो (मिल्खासिंग यांच्यापेक्षा जास्त वेगाने; मुल्खाचा भित्रा असल्याप्रमाणे). धावत जाताना कोपर्यापत ठेवलेला झाडू हाती लागला आणि आम्ही सरळ bathroom मध्ये गेलो आणि दरवाजे गच्च लाऊन घेतले. पन्हाळा ते विशालगड अशी ही आमची मजल. अचानक झालेल्या हल्यानंतर स्वतःला सावरत-सांभाळत झुरळी फौज आमच्या मागावर होतीच. त्यांचा पाठलाग अयशस्वी ठरला. आम्ही सुखरूप bathroom मध्ये घुसलो होतो.
हल्ला करायची किंवा प्रतीहल्ला करायची वेळ आली होती. फौज जवळ आली आणि आम्ही आमचं bathroom मध्ये असलेल्या ब्रम्हास्त्र पर्यन्त पोहोचलो होतो. आता कसलीच भीती नव्हती. युद्ध आमच्या बाजूने झुकणार होते. झुरळ फौज जवळ येताच आम्ही झप्पकण दरवाजा उघडला आणि उजव्या हातातील झाडू पुढे करून डाव्या हातातील त्या ‘hit’ नावच्या झुरळ मारायच्या अस्त्र घेऊन चवताळून त्यांच्यावर तुटून पडलो आणि त्यांच्यावर वार केले आणि एकेक झुरळाने टाहो फोडायला सुरू केली आणि त्यांच्या अशा अवसान गळालेल्या क्षणी आम्ही हातातील झाडूने त्यांचा कायमचा अंत केला. ठेचून मारलं एकेकाला! उद्या कामावली दासी घाण झालेली फरशी पुसताना आम्हाला उलट बोलेल हेही आमच्या लक्षात राहिले नाही. क्रोधच तितका होता. ज्याप्रमाणे त्यांचा मेलेला साथीदार निष्पाप होता तसाच मीही निष्पापच होतो. कसलीही शहानिशा न करता मी गाफिल असताना माझी कत्तल करण्याचा त्यांचा डाव सर्वथा अमान्य आणि चीड आणणाराच होता.
त्या फौजेतील काही त्याच बिछान्याखाली लपण्याचा प्रयत्न केला ज्याचा आम्ही आसरा घेतला होता. पण आमच्या हृदयी काहीच दया शिल्लक नव्हती, आम्ही प्रत्येकास चुन-चुनके ठार करण्याचा विडाच घेतला होता. जवळ जवळ अर्ध्या तासाच्या संग्रामानंतर आमचा विजय झाला. त्यावेळची वेळ होती (अर्थात निकरीची वेळ होती) पहाटे पाचची. अर्थात निशंकपणे आम्हीच ही लढाई जिंकलो पण जेंव्हा शत्रूचे मृतदेह जमा केले त्यात एक मृतदेह कमी आढळला. कदाचित लढाईच्या वेळेस एखादा जखमी होऊन पडला असेल आणि आम्ही त्यास मृत समजून पुढे गेलो असू आणि तो त्या वेळेस पळून जाण्यास यशस्वी जाहला असेल. तो आता त्याच्या राजाला आमच्या बद्दल जाऊन सांगेल आणि विनाकारण एक युध्द छेडले जाईल, अजून मोठी फौज आमच्यावर, आमच्या मुलूखावर चालून येईल. आता सतर्क झाले पाहिजे; तयारी केली पाहिजे. भविष्यात काहीही असो, पण आजची रात्र गाजवली ती आम्हीच……!
===समाप्त===
@Late_Night1991
अजून विनोदी कथा वाचा…
© 2014 – 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.
Leave a Reply
Be the First to Comment!