#मॉल संस्कृती #Mall Culture #भारतीय संस्कृती X Indian Culture
दोन-तीन वर्षांपूर्वी केंद्रात सत्तेत असलेल्या कॉंग्रेस ने रीटेल मध्ये एफडीआय (#FDI) म्हणजे Foreign Direct Investment नावाचा प्रकार आणला होता. त्या प्रकाराला संपूर्ण देशातून विरोध झाला होता. आजचा सत्ताधारी अन तेंव्हाचा विरोधक भाजप ही त्या प्रस्तावाच्या विरोधात ठाण मांडून उभा होता. आज तोच भाजप संरक्षण क्षेत्रातही शंभर टक्के #एफडीआय आणत आहे. हा झाला राजकारणाचा भाग. यात महत्वाचा भाग असा की, किरकोळ व्यापारी अन छोट्या व्यापार्यांगनी त्यावेळेस अशा प्रस्तावाला कडाडून विरोध केला होता. यात मॉल नावाची परकीय संस्कृती फोफावेल आणि भारतातील ‘किराणा’ अन किरकोळ व्यापाराची सद्दी संपेल असं त्यांचं म्हणणं होतं.
मॉल संस्कृती बद्दल सोशल मीडिया आणि पेपर मधून संवेदनशील लेखक संस्कृती वगैरे करत जुन्या आठवणी जागवत अश्रु गाळत असतात. नव्याने आलेल्या किंवा खासकरून पाश्चिमात्य देशातून आलेल्या सुविधा ह्या आपली जुनी संस्कृती नष्ट करत आहेत असा अनेकांचा आक्षेप असतो. पण हेच संस्कृतीरक्षक मुलींनी पाश्चिमात्य कपडे घालण्यात गैर नाही असं सांगून पुरोगामित्व सिद्ध करत असतात. असो. जुन्या काळात प्रत्येक दुकानदार आपल्या ग्राहकाला वैयक्तिकरीत्या ओळखायचा, आपुलकीने बोलायचा आणि स्नेहसंबंध जुळले जायचे.
म्हणजे नेने नावाचा ग्राहक काहीही झालं तरी महिन्याचा किराणा तिरूपती किराणा स्टोर मधूनच न्यायचा. तेथे तो गेला की त्याला दुकानदार मान देऊन बोलायचा, त्याने यादी काढायच्या आधीच दुकानातला पोर्यान निम्म सामान आणून ठेवायचा. मग मालक-ग्राहक गप्पा व्हायच्या. शेवटी घेतलेल्या सामनसोबत साबण किंवा तेलावर फ्री असलेली कापडी किंवा दोर्या्ची पिशवी मालक दिलदारपणे द्यायचा अन ग्राहकाला त्याचच अप्रूप असे. मग नेने नेहमीच ओळखीचा म्हणून त्या दुकानदाराकडे जायचे. वर्षाचं धान्य वगैरे घेताना आडती मारवाडी वाहतुकीचे पैसे कमी करायचा. नेने खुश! सणा-वाराला नेने कपडे घ्यायला बाहेर निघायचे. गावातला सर्वात जुना कपड्याचा व्यापारी किंवा कधीतरी ओळख झालेला मारवाडी कितीही गर्दी असली तरी जरा ‘अॅडजस्ट’ करून त्यांना प्राधान्य द्यायचा मग नेनेंना तो चार-चौघात मान वर करणारा प्रसंग वाटायचा. गावात सगळे व्यापारी नेने यांना आपले वाटायचे. घरात एखादी वस्तु घ्यायची म्हंटली की नेनेंच्या डोक्यात त्या-त्या व्यापार्यााचा चेहरा लगेच उभा राहायचा. पण दिवस सरत गेले. स्पर्धा तर वाढलीच पण ग्राहकही वाढले. ग्राहकाची क्रयशक्ती वाढली. मग ओळख वगैरे मागे पडून पैशाला जास्त मान मिळू लागला. नेने यांचा काळ गेला होता. नेनेंचा मुलगा सुरूवातीला नेनेंच्या ओळखीच्या व्यापर्यानकडेच जात असे. पण किराणा दुकानात त्याला लोकांच्या गर्दीत अर्धा तास उभं राहावं लागे. तो नेनेंपेक्षा चौकस बुद्धीचा होता. व्हरायटी ची चौकशी करे. दुकानातला पोर्याप साबनातले चार प्रकार दाखवून कंटाळून जाई. त्याचे भाव सांगेपर्यंत दुसरं गिराईक निघून जाई. मग नेनेच्या मुलाकडे दुर्लक्ष होई. नेनेंचा मुलगा मग जरा तिथे जायला कंटाळा करे. त्याला मानाची नसली तरी चांगल्या ‘सर्विस’ ची अपेक्षा असे. पण ती काही त्याला मिळत नसे. मग एकदा छोटा नेने त्याचा मित्र पेंडसे सोबत एका बड्या मोठ्या मॉल मध्ये शिरतो. इतके दिवस त्या मॉल च्या काचा बघून त्याला मध्ये असलेल्या ‘महागाई’ च्या झळा इथवर जाणवत. तिथे सगळं ‘महाग’ असेल आणि आपल्यासारख्याला ते परवडणार नाही. ती श्रीमंताची जागा आहे असं म्हणून छोटा नेने त्या मॉल समोरून अनेकदा फिरायचा. पण आज वेगळा दिवस होता. पेंडसेही नेनेप्रमाणेच सामान्य होता. पण तो मॉल मध्ये जाई. आणि तेथून काही-काही खरेदी करे. मग नेने एकदा त्याच्यासोबत गेला आणि त्याची विचारसरणीच बदलून गेली. मध्ये गेल्या-गेल्या एक सुंदर बाला विनाकारण स्मितहास्य करून हसते हे त्याला आनंद देणारं होतं. मग तो संपूर्ण मॉल अतिशय उत्साहाने फिरू लागला. त्याला तेथे कोणीही अडवणारा नव्हता की चौकशी करणारा नव्हता. बागेत फिरल्याप्रमाणे तो मुक्तपणे सगळीकडे वावरत होता. दिसतील ते प्रॉडक्ट हातात घेऊन बघत होता. त्याने साबणच्या विविध प्रकारच्या व्हरायटी बघितल्या. मग त्या सगळ्यांच्या किमतीची तुलना केली. कोणीही त्याला रोखलं-टोकलं नाही. त्याला जे हवं ते मिळत होतं. तो सगळे प्रॉडक्ट चॉइस करत होता. काही अडचण असेल तर शांतपणे उभ्या असलेल्या मॉल मधील मुलीला विचारत होता. जे हवं ते आणि जे नको ते, याचे निर्णय तो स्वतःचा वेळ घेऊन अन विचार करून घेत होता. शेवटी पैसे त्याला इथेही द्यायचे होते आणि बाहेरही. MRP प्रमाणेच! चार-दोन रुपये इकडे तिकडे. मग गर्दीत उभा राहून, घाम पुसत, वाट बघून, तुसडेपणा सहन करण्यापेक्षा आरामात फिरून, थंडगार हवेत प्रेमाने गोष्टी घडत असतील तर चार रुपये जास्तीचे द्यायला तो तयार झाला. शिवाय पैसे जास्तीचे द्यावेच लागतात हा समजही खोटा ठरला होता. आठवड्यातील एखाद दिवशी किंवा महिन्यातून एकदा त्या मॉल मध्येही स्पेशल discount offers असतात हे त्याला समजलं. जाताना सगळं सामान बांधून झाल्यावर दुकानात देतात तसे चिल्लर ऐवेजी chocolate मिळायचे अन प्लॅस्टिक च्या पिशवीचे चार रुपये जास्त द्यावे लागायचे. पण मोठ्या नेनेंना फ्री मिळणार्यार कापडी पिशवीचे अन येथे पैसे देऊन मिळणार्याध पिशवीत बरच अंतर होतं. एक वैयक्तिक नात्याचं होतं तर दुसरं निखळ व्यवहाराचं! मग नात्याची ठिकाणी नाते अन व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार हा छोट्या नेनेचा निर्णय झाला. मॉल मध्ये discount विचारताना त्याला काहीही वाटायचं नाही कारण तो केवळ व्यवहार असायचा, उलट दुकानात ‘बरोबर लावा’ म्हणताना जरा कमीपणा वाटायचा. हा फरक पडला होता.
मॉल संस्कृती चांगली का वाईट हे कोण ठरवणार? आजची पिढी व्यवहारात व्यवहार करते अन नात्यात नातं ठेवते. मोबाइल ला रेंज मिळत नसेल तर ते सिम फेकून देऊन नवीन घेणे किंवा पोर्ट करणे यात नवीन पिढीला काहीच चूक वाटत नाही. मग ती कंपनी भारतीय आहे की परदेशी की अजून काही, असले criteria हल्लीची पिढी बघत नाही. मिल तुला ह्या-ह्या कामासाठी नेमलं होतं, ते तू करू शकत असशील तर हा व्यवहार पुढे चालेल अन्यथा नाही, असं ठामपणे सांगायची आजच्या पिढीची तयारी आहे. मी हे तोडलं तर समोरच्याला काय वाटेल किंवा वैयक्तिक संबंध बिघडतील का असा भावनिक विचार करत बसणं हे त्यांना मानवत नाही. आज प्रत्येक शहरात अनेक छोटे-मोठे दुकानदार आहेत. अनेक वर्षांपासून आहेत पण काळानुसार ते धड पुर्णपणे व्यावहारिकही झाले नाहीत आणि पुर्णपणे वैयक्तिक नाते जोपासणारेही झाले नाहीत. म्हणून मग नवीन पिढी तेथे जाऊन स्वतःला relate करू शकत नाही. दुकानात गेल्यावर जर तुम्हाला हवं ते हव्या त्या प्रकारे मिळत नसेल तर मग तुमची चिडचिड होते आणि तुम्ही दुसरे मार्ग शोधू लागता. मागे #थेट परकीय गुंतवणूक संबंधी निर्णय झाला तेंव्हा अनेक किरकोळ व्यापारी व दुकानदारांनी त्याला विरोध केला. त्यांचा धंदा बसेल अशी त्यांची शंका होती. पण सुदृढ स्पर्धा ही त्यांना मान्य नव्हती. आजही कोण उठ-सूट थेट मॉल गाठत नाही. एखादी साधी वस्तु वगैरे आणायची असेल तर तो जवळच्या दुकानातच जातो. पण जर मोठी खरेदी असेल तर तो दूसरा पर्याय उपलब्ध असल्याने तिकडेही आशादायकपणे बघत आहे.
#ऑनलाइन शॉपिंगचा चढता आलेख #Online Shopping
आता यातील दूसरा भाग बघूया. ऑनलाइन शॉपिंग. हा तर आता सर्वाधिक वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. अगदी टाटा सारखे उद्योजकही यात विशेष रस राखून आहेत. गेल्या वर्षी दिवाळीत ऑनलाइन खरेदीची उलाढाल बघितली तर डोळे फिरतील असेच आकडे समोर येतात. हजारो कोटींची उलाढाल केवळ दिवाळीच्या काळात झाल्याच्या बातम्या आपण वाचल्याच असतील. ह्या काळात Amazon, Flipkart आणि यासारख्या ऑनलाइन शॉपिंग विश्वातील कंपनी भरमसाट आणि आकर्षक offers देऊन ग्राहकांना खेचत आहेत. त्यामुळे जेवढी गर्दी दुकानातून होत असे तितक्याच तोडीची #traffic आता ह्या websites वर होताना दिसून येत आहे. दुकानातील गर्दी आधी मॉल आणि नंतर ऑनलाइन शॉपिंग च्या बाजूने झुकताना आपण पाहत आहोत. हा बदल अगदी अलीकडच्या काळात आहे. ऑनलाइन शॉपिंग तर गेल्या तीन वर्षातील अपत्य अवाढव्य प्रमाणात वाढलेलं दिसून येतं.
सुरूवातीला कोण ह्या ऑनलाइन खरेदीच्या भानगडीत पडत नव्हतं. येथे फसवेगिरीचे अनेक सापळे आहेत असा अनेकांचा समज होता आणि बर्या्च जणांचा अजूनही तसा समज आहे. पण ‘डर के आगे जीत है’ म्हणत सुरूवातीला काहींनी डेरिंग केली आणि हा प्रकार यशस्वी आहे हे सिद्ध केलं. मग एकाचे दोन अन दोनचे चार होताना वेळ नाही लागली. मग देशात सर्वाधिक लोकसंख्येने असलेली तरुणाईला याची भुरळ पडली नसती तरच नवल. कधीही, कुठेही बसल्या-बसल्या तुम्ही काहीही मागवु शकता (ऑर्डर करणे म्हणतात याला) आणि तुम्हाला हवं ते एका निश्चित दिवशी तुमच्या घरासमोर हजर असतं. तुम्हाला आवडलं तर घ्या नाहीतर परत करा.
शिवाय असं नाही की केवळ तरुण मंडळीच हे ऑनलाइन शॉपिंग वगैरे करतात. ज्यांच्याकडे ऑनलाइन बँकिंग सुविधा, घरात इंटरनेट आहे ते कोणत्याही वयाचे व्यक्ति यात मागे नाहीत. आता तर ऑनलाइन शॉपिंग चे विशेष टीव्ही चॅनल दिवसभर सुरू असतात. किचन पासून बेड आणि मेडिकल पर्यन्त सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे भेटतात आणि discount ही! अजून काय पाहिजे ग्राहकाला. एकदा विश्वास बसला की माणूस पुढे सरकायला घाबरत नाही. आणि ह्या परदेशी कंपनी ‘सर्विस’ देतात आणि नाव कमवून त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडतात. आता पुस्तकापासून, किराणा मालपर्यंत आणि कपड्यांपासून कोंडोम पर्यन्त ऑनलाइन शॉपिंग करायला कोण कचरत नाही.
हे इतकं विष्णुपुराण सांगायचं तात्पर्य काय? तर आजचा काळ ‘रिजल्ट ओरिएंटेड’ result oriented आहे. जिथे चांगली सर्विस मिळेल तिथे माणूस आकर्षित होतो आहे. बदलत्या काळाची ही पाऊले आहेत. ह्या ऑनलाइन जगात किंवा मॉल संस्कृतीत सारं काही आलबेल आहे आणि निखळ आहे असं म्हणायचं धाडस आम्ही करत नाहीत. पण ह्या गोष्टींना नावे ठेऊन पुढे जाता येणार नाही. जुन्या काळाच्या गरजा वेगळ्या होत्या आणि त्या काळाची गणितेही वेगळी होती. आता बदललेल्या आणि विशेषतः जागतिकीकरण प्रबळ असलेल्या जगात काही गोष्टींशी सलोखा ठेऊन किंवा हातात हात घेऊन पुढे जाणं योग्य पाऊल ठरेल. हे करण्यात काही आधुनिकीकरण किंवा पुढारलेपणा आहे असा समज कोणीही करून घेऊन नये. ही एक काळाचं अपत्य आहे. त्याच्याशी खेळणारे खेळातील आणि जबाबदारीने संस्कार देऊन वाढवणारे वाढवतील. प्रश्न सामन्यांचा असतो. ते इतरांचं अपत्य आपण आपल्याकडे किती अन कसं ठेवतो. काळाच्या कुठल्याही पटलावर दोन आणि दोन चारच असणार हे जारी सत्य असलं तरी त्या बेरजेची आणि उत्तर आलेल्या संख्येची किती किम्मत आहे हे जरूरी आहे.
© 2016, ||-अभिषेकी-||. All rights reserved.
Leave a Reply
Be the First to Comment!