विनोदी कथा || हास्य कथा || मराठी कथा || गावाकडली प्यारवाली Love Story ||
स्थळ – गुलाब पार्क
पात्र अर्थात character – आपला हीरो नंदू आणि त्याची हेरोईन नीतू
दिवस – प्रियकरांचा आवडता: valentine day
वेळ – धोक्याची
जागा – मोक्याची
संध्याकाळच्या वेळी नीतू बराच वेळ वाट बघत बसलेली असते (खुलासा: नंद्या आला नाही म्हणून खरोखरच ती खड्डे पडलेल्या वाटेकडे बघत असते) आणि बर्याच वेळाने घाम पुसत नंद्या येतो एकदाचा…
नीतू (थोडीशी रागात अन नखरे करत) – आप यहाँ आए किसलीये…?
नंदू (थोडासा गोंधळून) – आपणे बुलाया इसलीए…
नीतू (थोडा राग कमी) – आए है तो काम भी बताइये…?
नंदू (गाणं म्हणत आहे हे लक्षात आल्याने थोडा लाडात येत) – पेहले आप थोडा मुस्कूराइये…
नीतू (आता राग कमी आणि लाड जास्त) – हे काय नंद्या तू आजबी लई उशिरा आलास…?
नंदू – काय करू राणी सॉरी कर मला… म्या लवकर निगालतो गं, पर तिकडं cultural लोक वाट अडवून उभी ठाकली हुती…
नीतू – तू कशाला ‘कचरल’ (अर्थात cultural) लोकांशी नादी लागतो…?
नंदू (हसत) – हे..हे… कचरल नाही गं बाय, cultural असतं ते… ते म्हणजे सांकृतिक रक्षक गं…
नीतू – म्हणजे रे काय बाबा…?
नंदू – अगं… म्हागल्या वेलांटी दिनाला (अर्थात Valentine day… गावाकडं याला वेलांटी दिन म्हंत्यात; कारण एका पिच्चर मदि ह्या दिवशी प्रियकर (दुकान) आणि प्रेयसी (सामान) एकमेकांला वेलांटी घालून बसलेले दाखीवलं व्हुतं तवापासनं गावकडल्या लोकांनी valentine day ला वेलांटी दिन म्हंत्यात… कळलं का भाऊ?) आपला बाळू आन बबीता बसले हुते नं हिथच पिरेम करत… तवा न्हाईका ते परशुरामभौ आनं त्याचे टाळभैरव टोळकं आले हुते आणि पुना मंग पंचाइति म्होरं त्यांना डोरलं बांदून जन्माचं न्हाई का बांदून टाकलं… म्हंजी लगीन लौन दिलं हुतं की त्यांचं…
नीतू (लाजत) – जन्माचं न्हाय.. साता जन्माचं…
नंद्या (भयंकर कल्पनेची व्याप्ती कळल्याने, जरासा घाबरून) – होय… तेच ते…
नीतू (गोंधळून) – आर त्याचं काय मंग…?
नंदू – अगं खुळी म्हणू की काय तुला…
नीतू (लाडाने नाराज होणे) – ए नंद्या…
नंदू – अगं तसं नव्ह… परशुरामभौ सारख्या लोकास्नीच तिकडं मोठ्या शरात म्हंजी पुण्या-मुंबेला cultural protector का काय ते म्हंत्यात…
नीतू (लाड वाढला) – म्हायते लय शाना हाइस… अन तुला कोण सांगितलं समदं…?
नंदू (इकडे-तिकडे बघत) – अग्ग कोणाला काय म्हणू नगस, न्हायतर तोंड उचकटशील कुटतार जाऊन…
नीतू (चिडून) – हो तेवडच काम हाय मला…?
नंदू – माहिती न किती कौतिकाचं हाय आमचं पाखरू… मागल्या येळला तुझ्यासाठी चोरून त्या भीम्याच्या रानावरनं कैरी-चिंचा आणून दिल्या तर गावभर बोंबलात उडाईली होतीस की…?
नीतू (चिडणं संपलं. आता पुन्हा लाजत) – तुझंच कौतिक सांगत हुते की रं मी…
नंदू (चिडून) – ह्या येळेला कौतिक नगं बरं आमाला…
नीतू – बर राहीलं… म्होरं बोल…
नंदू (बारीक आवाजात) – मला बाळूनंच सांगितलं…
नीतू (जोरात) – काय बाळूनंच…
नंदू – सांग वरडुन सार्या गावाला… आईला… अगं त्याच्यासोबत तसं झालं नं तवापासनं त्येनं ह्या ईषयावर लई म्हंजी लई अभ्यास केला तिकडं शरात जाऊन… अन आता तिकडं कुठलीतरी संघटना चालीवतो हाय… आपल्यासारख्या पिरमात अडल्या-नडल्या तरुणांसाठी…
नीतू – खरंच…?
नंदू (हसत) – आगं ते जाऊदे चिमणे… मी बघ तुझ्यासाठी काय आणलं हाय तुझ्यासाठी पेशल घरच्या पास्न लपावून… आ…
नीतू (खुशीत) – माझ्यासाठी… दाखीव ना लवकर…
नंदू (शर्टातून पिशवी काढतो) – ह्ये बघ… गुलाबाचं फूल माझ्या फूलपाखरासाठी आणि ह्ये चॉक्लेट…
नीतू (अतिउत्साह) – ह्ये माझ्यासाठी आणलंस तू नंद्या…?
नंदू (रागानं) – न्हाय, तुझ्या त्या रेड्यागत बा साठी…
नीतू (लाडाने रडत) – नंद्या…
नंदू – रडू नको बाय… तुझ्यासाठीच आणलाव ना…. मंग…
नीतू – लय भारी नंद्या… माझं तुझ्यावर लय पिरेम हाय…
नंदू (मनात: हे गिफ्ट दिल्यावर आठवलं व्हय?) – मंग… लग्नाचं जांगड घालती का माझ्यासांग…?
नीतू – अर्र… पर माझा बा… त्यो न्हाय ऐकायचा… तुला उलटा टांगल, रेड्यावर बसवून फिरवल अन नंतर गावची कुत्री मागं लावल…
नंदू (ह्या कल्पनेने आधी घाबरून जातो अन नंतर छाती फुगवून म्हणतो) – त..न…प… तू कशाला घोर लौन घेती जीवाला… म्या हाय नव्ह… बर हे चोक्लेट खल्यावर काय करत्यात माहिती हाय का…?
नीतू (अजाण पोरगी) – नाय… काय करत्यात…?
नंदू – अग्ग… ओठावरली साखर घेत्यात…
नीतू (लाजेने चूर होत) – चल… चावळट कुटचा… मागं उसातली साखर दावतो म्हणून उसात नेलास अन साखर पेरलास… आगाव… दुसरं काही सुचतच न्हाई तुला…
(आधी नीतू थोडी लाजते अन नंतर तीही तयार होते… वेलांटी पडते… ओठावरची साखर घेतल्यावर काही वेळाने नंदू खिशातला फोन काढतो अन ओरडतो)
नंदू – परशुरामभौ ओ परशुरामभौ… या आता इकडं…
(पाच मिनिटात परशुरामभौ येतात… आसपास थांबलेले असावेत…)
नीतू – हे काय नंद्या…
नंदू – अग्ग… घाबरू नगस… म्याच बुलीवलं हाय त्येसणी… आता परशुरामभौ आपल्याला पकडून पंचायती समोर पेस करतील… आपलं लफडं हाय ते सांगतील… घरचे बी हांतील दोन-दोन दोघास्नीबी… आन नंतर… देतील की आपलं लगीन लौन… तुझं माझ्यासंगती जांगड हाय हे समजल्यावर तुला कोण नवरा देईल… तुझ्या बा समोर मीच तेवडा इलाज… मीच संकटमोचक… मनाविरुद्ध का हूईना, त्याला आपलं लगीन लौन द्यावच लागल बग… कस्स…
नीतू (सगळं डोक्यात घुसल्यावर) – लय पोचलेला निगालास रं तू…
नंद्या – प्रेमासाठी एवडं करावाच लागतं चिमणे… प्रेमात समदं माफ असतं…
परशुरामभौ (हात पुढे करून, मोठ्या विश्वासाने) – हं.. बस करा… आता घाबरायचं न्हाय पोरान्नू… औ… मी म्हंटलं म्हंजी तुझा बा काय त्याचा बा बी आडवा न्हाय याचा… आन संस्कृती रक्षण करतानी तुमचं लगीन लौन दिलं की आमचे पक्षातले साहेब बी माझ्यावर लई खुस होतील… आमच्या कारकिर्दीत आणखीन एक मानाचा तूरा… आजपत्तूर त्या बामणापेक्षा चार लगीन जास्तीची जमीवलीत मी… चला माझ्या संगतीनं… त्या बाळू आणि बबीतागत तुमचा बी बार उडवितो किनाय बगा… घरच्या म्हातार्याना सांगा, नुक्ती घ्या म्हणावं वळायला… असाबी उद्याचा मुहुरत लय ब्येस हाय, येतानाच पचांग इचारून आलाव… चला बिगि बिगि…
-*-*-*-समाप्त-*-*-*-
सर्व हक्क सुरक्षित @ latenightedition.in || @Late_Night1991
अभिषेक बुचके लिखित “मराठी कथा” e-book मधून…
© 2014 – 2017, ||-अभिषेकी-||. All rights reserved.
Leave a Reply
Be the First to Comment!